Saturday 23 February 2013

आनंदयात्रा


तुझं माझं असणं हे एक निखळ आनंददायी सुख आहे.
सुख हे आनंददायीच असतंच, पण हे निखळ आहे.
तुझी अनेक रूपं आठवताना, साठवताना 
माझी धांदल उडवून जातात आणि 
म्हातारीच्या कापसामागे धावावं तसा 
मी त्यांच्या मागे धावत सुटतो.
काही हाती लागतात, काही लांब उभी राहून 
वाकुल्या दाखवतात 
आणि काही हरवतातही… 

हाती लागली त्यांचा प्रश्न नाही, निसटलेली आवाक्यात असतात
पण हरवलेली रूपं तुझी…  जास्तंच ओढ लावतात.

डोळ्यात आठवणींचा पूर येतो
जाताजाता मला हवा तसा नाचवून, भिजवून जातो
मनाच्या तळाशी तुझं प्रेम गाळासारखं साचून राहिलय
क्रोधाचं पाणी वर जमतं, निघून जातं
गाळ आहे तसाच रहातो आणि मग शुद्ध पाण्याने मन
भरभरून वहातं
म्हणतं - माझं तुझ्यावर प्रेम आहे.

मरण आहे म्हणून प्रत्येकाला जगण्याची ओढ आहे....
तुझं माझं असणं हे एक निखळ आनंददायी सुख आहे.… 

-- जयंत विद्वांस 

1 comment:

  1. निखळ... आनंद दायी सुख.....शुध्द पाण्याने भरभरून वाहणार...पुढे,..पुढे,

    ReplyDelete