Saturday 31 October 2015

विन्या पानसे....

विन्या पानसे....

"कपाळ, नाक, कान, तळपाय आणि तळहात सोडले तर अळीव टाकल्यासारखे केस आहेत लेका तुझ्या अंगावर. लहानपणी कुठे शेतात सुफला १५:१५:१५ टाकल्यावर लोळला वगैरे होतास का डुकरासारखा". कुठलीही ओळख नसताना विनय पानसे या महाभागानी मला हा प्रश्नं विचारलेला. महिनाभर लेट आडमिशनमुळे अड्ड्यात मी नविनच होतो, विनय गावाला गेल्यामुळे ओळख झाली नव्हती. बाकीच्यांच्या बोलण्यात सतत त्याचं नाव यायचं. मी ही उत्सुक होतो या प्राण्याला भेटायला. त्याचे उद्धटपणाचे किस्से कानावर आलेच होते.

चेह-यानी (फक्तं) अतिशय सालस, गोरापान, दाट काळेभोर कुरळे केस, व्यायामानी अगदी पिळदार झालेला सहाफुटाचा दणकट सागवानी खांब दिसायचा तो. मधाच्या रंगाचे पिंगट डोळे, व्यवस्थित कापलेली ट्रिम मिशी आणि विनोद खन्नासारखे कानापर्यंत जाड कल्ले असा सगळा एकूणच देखणा मामला होता. तो गावाहून आला ते बॅग रूमवर टाकून थेट अड्ड्यावर म्हणजे टपरीवर आला. टपरी मालक आबा पालकरना जोरात हाक मारलीन आधी बाहेरून 'आबा, आहात ना?' आतून आबांनी पण तितक्याच जोरात उत्तर दिलं 'आहे, मायझ्या मी मरायचीच वाट बघ. गिळलं आहेस का काही? गरम वडे टाकतो थांब'. गेल्या आठ दिवसात न खाल्लेले गरम वेगळ्याच चवीचे वडे आणि आख्ख्या दुधातला चहा आला.

आठवडाभराचा वृत्तांत ऐकून झाल्यावर त्यानी सगळ्यांकडे अत्यंत कौतुकानी बघितलं आणि अचानक आठवण झाल्यासारखं मला विचारलं, 'नाव काय रे तुझं?' मी आपलं पुर्ण नाव सांगितलं. 'मयताचा दाखला काढायचाय का? पुर्ण नाव तिथे सांगायचं. आजपासून तू जया'. जसं काही मी माझं नाव ठेवायलाच आलो होतो तिथे. खिशातून विल्सचं पाकिट काढलं, सिगरेट काढली, पेटवली. 'तुला हवीये? ही घे, सेपरेट पेटव, माझी कुणाला देत नाही, कुणाच्या तोंडातली मी ओढत नाही'. मी माझी सेपरेट विकत घेउन पेटवली. 'रागावला काय रे? असशील तर ह्याच्या मारी माझ्या' म्हणून हसत सुटला. प्रथमभेटीत वाईट मत होईल असाच होता तो.

वर्गात मात्रं तो सगळ्या तासांना बसायचा मागच्या बाकावर. तल्लफ आली की बाहेर टपरीवर जाऊन धूर काढून यायचा. त्याला कुणीच काही बोलायचं नाही. आम्ही सगळे लास्ट इयरला होतो इंजिनिअरिंगच्या. बाबांची बदली झाल्यामुळे मी या आडगावात आलेलो. हळूहळू ओळख झाली विन्याशी. त्याला आई नव्हती, वडिलांचा कारखाना होता. त्याला त्यामुळे बरीच माहिती होती आधीच मेकॅनिकलची, डिग्री हवी म्हणून तो आलेला फक्तं. 'काय करतोस घरी संध्याकाळी? अभ्यास सांगू नकोस, इथेच मारेन'. 'का रे?' 'योनेक्सच्या दोन रॅकेट आहेत. येशील?'. मग आम्ही रोज बॅडमिंग्टन खेळू लागलो. मी ही पावणेसहा होतो पण पावफुटाचा फरक पडायचाच. मजा यायची. खेळ झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. हळूहळू कवचातला विन्या दिसू लागला होता.

एक दिवस अचानक म्हणाला 'कधी प्रेमात पडलाएस?' 'हो, अजून आहे, का रे?' 'नशीबवान आहेस. फक्तं कविता बिविता देउ नकोस हा'. नंतर तो माझ्या घरी येउ लागला. घरचाच एक झाला. अनंत वेळा आला. जाताना आईच्या पाया मात्रं पडायचा कायम. एकदा आईनी काहीतरी काम सांगितलं, मी उद्या आणेन म्हटलं. हा तिरसटल्यासारखा उठला आणि ते काम करून आला आणि म्हणाला, 'भडव्यो, आई आहे म्हणून किंमत नाही तुम्हा लोकांना'. तो घरी फार कमी जायचा. मी विचारलं एकदा त्याला दिवाळीला. 'काय करू जाऊन, बाप पैसा जमवतोय फक्तं माझ्यासाठी, मोठेपणासाठी. लॉज आहे माझं घर, फाईव्ह स्टार एकदम. चेक इन,  चेकाउट, नोबडी आस्क मी, हाउ आर यू, व्हाय सो लेट, इज नेसेसरी टू गो टूडे? रहा अजून दोन दिवस कुणी म्हणायला हवं ना?' गाडीला किक मारून गेला सुद्धा तो.

आबा पालकर आजारी पडले म्हणून दवाखान्यात होते. सगळे गेलो होतो तर विन्या तिथे लाल डोळ्यानी बसलेला. '##मारीच्यान्नो आत्ता येताय होय, आहेत अजून' आणि ढसाढसा रडायला लागला. ' डॉक्टर म्हणालेत चोवीस तास काढायला हवेत हे'. चोवीस तास पार पडले, आबा वाचले. मी डिस्चार्जला गेलेलो विन्याबरोबर. चार पाच हजाराचं बिल यानीच भरलं. आबांनी घरी गेल्यावर डब्यातून दोन हजार काढून विन्यासमोर धरले. 'सुरनळी करा आणि घाला माझ्यात, खायला घालताना हिशोब केला होतात का? चार पाच महिन्यात मी जाईन, त्याच्या आत जा म्हणजे घोर नाही रहाणार मला'. आबा ढग फुटल्यासारखे रडले. लहान मूल रडतं तसा विन्या रडला त्यादिवशी.

'तुझी कविता दे की रे एखादी वाचायला, मी ही केल्यात मागे, थांब देतो'. अतिशय सुवाच्यं मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेली एक वही त्यानी दिली. पहिल्याच कवितेला मी गार झालो.

नक्षी.....

तिनी नक्षी काढल्यासारख
माझ्या तळहातावर
नाजूक बोटांनी कोरलं
'माझं तुझ्यावर प्रेम आहे'
आज इतकी वर्ष झाली
पुसलंही जात नाही, दिसतही नाही

माझा चेहरा ओंजळीत धरत
तिनी बाण मारल्यासारखे
माझ्या डोळ्यात डोळे घालून
टोकदार तीर सोडले
आज इतकी वर्ष झाली
निघतहि नाहीत, मारतही नाहीत

माझ्याकडे बघत हात हलवत
डोळ्यांना रुमाल लावत ती
कधीतरी परत येईन म्हणत
दूर अज्ञातात निघून गेली
आज इतकी वर्ष झाली
येतही नाही, कळवतही नाही

आणि खाली फक्तं तिरक्या अक्षरात ठोंब्या लिहिलेलं त्याखाली दोन टिंबं. मी त्याच्याकडे पाहिलं. 'ती म्हणायची मला, चल दे इकडे, वाच परत कधी, खेळायला उशीर होतोय'.

हाहा म्हणता वर्षं संपलं, परीक्षा झाल्या, रिझल्ट लागला. आईनी विन्याला जेवायला घरी बोलावलं होतं. जाताना आईला त्यानी भारीतली कांजीवरम आणली होती ती दिली आणि पाया पडला. 'परत कधी भेट होईल माहित नाही पण तुमच्या घरचं मीठ खाल्लंय त्याचे ऋण फिटणार नाहीत, फेडणारही नाही'. रात्रीची गाडी होती. तासभर आधी आबांकडे गेलो. आबांनी त्याला डबा भरून दिला होता. म्हाता-याला शब्दं फुटेना. विन्या पाया पडला, त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि आम्ही निघालो. 'एकदा टपरीवर जाऊ चल' टपरीच्या बंद दरवाज्याला त्यानी खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, 'अन्नं खाल्लय रे इथे' आणि रडू लागला.

त्यानी आमच्यातलाच एका गरजूला गाडी अशीच देउन टाकली होती. माझ्या गाडीवर स्टेशनला सोडायला गेलो त्याला. 'पत्ता कशाला घेतलास आबांचा'. 'अरे कढईजवळ बसून खोकं झालंय पार, पैसे पाठवीन दर महिन्याला. कुणाला माहित नाही, मी आजारी होतो मागच्या वर्षी पंधरा दिवस. आबा चहा, नाश्ता, दोन वेळचं जेवण घेउन रुमवर यायचे. असो. फोन नंबर दिलाय तुला, कळवत रहा, चल बाय'. स्मशानातून परत यावं तसा मी परत आलो.

बाबांची बदली झाली दोन महिन्यात आणि आम्ही सगळे मुंबईला आलो. विन्याला सांगितलं. तो पुढे शिकायला यूएसला गेला तेंव्हा भेटून गेला. आबा गेले म्हणाला मागच्याच महिन्यात. पुढे संपर्क तुटला. मी ही नोकरीच्या निमित्तानी अनेक शहरं बदलली. विन्याचा काही तपास नाही. पंचविसेक वर्षं झाली. आईनी जीर्ण कांजिवरम अजून जपून ठेवलीये. येईल म्हणते शोधत बरोब्बर तो, भूत आहे ते. यायला तर पाहिजेच. अनंत गोष्टी अर्धवट सांगून गेलाय त्या विचारायच्यात आणि खूप काही. 

कॉलेजच्या रोडला टपरी दिसली की मी अजूनही थांबतो. एक वडा, एक कटिंग आणि दोन विल्स घेतो, एक सेप्रेट माझी, एक सेप्रेट विन्याची.

जयंत विद्वांस




Tuesday 27 October 2015

विनासायास वेट लॉस - लेखक डॉ.जगन्नाथ दिक्षीत

विनासायास वेट लॉस - लेखक डॉ.जगन्नाथ दिक्षीत 

वीतभर पोटाची खळगी वगैरे शब्दंप्रयोग आता बाद होणार अशी परिस्थिती आहे. तमन्ना, करीना कपूर आणि काही तत्सम सपाट तलम पोटं सोडली तर बाकीची सगळी पोतं दिसतात. वीतभर पोट मीटरभर होतं, शिंप्याच्या टेप ऐवजी सुताराचा मेझरिंग टेप लागेल अशी पाळी येते मग माणसं झटून विचार (फक्तं विचार, नथिंग एल्स) करायला लागतात. सौंदर्य काही आपल्या हातात नसतं पण फिट राहणं निश्चितच आपल्या हातात आहे. तरुण माणूस त्याच्या केशरचनेकडे, कपड्यांकडे फार लक्ष देत नाही पण जिमला मात्रं जातो अर्थात फिट रहाण्यापेक्षा वेगळा हेतू त्यात असतो पण निदान तो ती नाटकं चार सहा महिने तरी करतो.

दिखाव्याला जग भुलतं असं म्हणतात. माणूस एकदा तिशी ओलांडून गेला की त्याच्या पाठीमागे व्याप लागतात. पैसे कमावून तो आधी घर सजवतो, मग बायका, मुलं सजवतो, पैसे साठवतो. या सगळ्यात चाळीशी येते आणि मग पुढची वर्ष पटापट चालली आहेत असं त्याला वाटतं. केस शिल्लक राहिले असले तर पांढरे होऊ लागतात, मान, पोट, मांड्या, दंड, पार्श्वभागावर चरबीच्या अनधिकृत वसाहती उभ्या रहातात. मार्करनी नकाशावर मिठी नदीचा मूळ प्रवाह मार्क करतात तसं 'इथे हनुवटी संपते किंवा मूळ इथंपर्यंत होती ' अशी रेघ आणि पाटी लावायला लागेल अशी परिस्थिती येते. आपण महापालिकेला उगाच नावं ठेवतो, 'डोळ्यांसमोर उभ्या रहात होत्या तेंव्हा दिसली नाहीत का अनधिकृत बांधकामं?' हे वाक्यं आपल्यालाही लागू होतं. मग आपल्या एकूणच पळ काढण्याच्या वृत्तीनुसार समस्येच्या मुळाशी न जाता निरुपयोगी बाह्य उपाय चालू होतात.

ढगळे शर्ट, टी शर्ट घालणे, प्यांट वर नेसणे, शर्ट इन न करणे, आपण कसे फिट आहोत याच्या आपल्याच ढेरपोट्या मित्रांबरोबर चर्चा करणे, 'आयुष्यं एकदाच मिळतं, खा प्या मजा करा' असे वरकरणी छान वाटणारे कोट्स फेकायला सुरवात होते. डाय लावायला सुरवात होते. मग कुणाच्या तरी सांगण्यावरून बर्मुडा, टीशर्ट, चारपाच हजाराचे शूज खरेदी करून रनिंग, योगा (योग कोण म्हणालं रे? गावठी कुठला), जॉगिंगचं प्लानिंग होतं. नेट आणि अर्धवट माहिती असणा-यांकडून डायेटिंग चार्ट तयार होतात. अर्धा किलोमीटर चालून आल्यावर येता येता रुपया खर्चून २०० ग्रॅम वाढलेलं वजन शूज मुळे असणार असा दिलासा देता येतो. आलेला घाम व्यायामामुळे नसून न झेपलेल्या कष्टामुळे आलाय हे फक्तं मनाला माहित असतं. रक्तात साखर वाढते आणि जीभ मात्रं कडवट होते, रक्तं उसळ्या मारतं ते पेटून उठल्यामुळे नाही तर वाढलेल्या दाबामुळे, त्यात मग छातीत हलकीशी चमक जरी उठली तरी जीव घाबरा होतो.

तात्पर्य, आपण अस्ताव्यस्त वागून शरीर जुगारी माणसाच्या कर्जासारखं आटोक्याच्या बाहेर जाऊ देतो आणि सरकारसारखं समस्येच्या मुळाशी न जाता कर्ज माफीसारखे वरवरचे उपाय वारंवार करतो, निष्पन्न काही होत नाही. आयुष्यं एकदा मिळालंय हे कळतं पण ते कसं जगावं हे कळत नाही. जाहिरातींना भुलून कचरा आपण सोन्याच्या भावात खातो आणि नको असलेले नातेवाईक चिकटतात तशी बिनकामाची चरबी अंगात मेहनत न करता साठवतो. मिळेल तेवढं खातो आणि ताण सहन झाला नाही की अजून खातो. दुष्टंचक्रं आहे ते. वेळीच बाहेर पडायला हवं असं मन सांगत असतं पण मन, मसालेदार, चमचमीत खायला चटावलेली जीभ ऐकत नाही. शिस्त कुणाला प्रिय असते तशीही? टाळण्याकडे कल असतोच प्रत्येकाचा. अर्थात जमिनीत तोंड खुपसून बसलं म्हणून वादळ यायचं काही थांबत नाही.

परवा डॉ.जगन्नाथ दिक्षीत भेटले होते. एबीसीडी लिहावी तशा या माणसाच्या नावापुढे डिग्र्या आहेत. नावाखाली दोन तीन ओळी सहज भरतील एवढा मजकूर आहे ज्ञानाचा. माणूस साधा आहे, जमिनीवर पाय असलेला आहे. त्यांनी मला परवा पुस्तक सप्रेम दिलं. एका बैठकीत वाचून होईल एवढं छोटं आणि नगण्यं किंमतीचं आहे. अतिशय सोप्या शब्दात आणि मराठीत सगळ्यांना समजेल असं आहे. ये दिक्षीत भी पागल आदमी मालूम पडता है! रिझल्ट मिळत असताना असं कमी पैशात साधे सल्ले कुणी देतं का? कसं मस्तं अवघड इंग्लिशमधून गुळगुळीत कागदावरचं, अनेक स्लीम देखण्या बायकांचे फोटो टाकून, आधीचा एकशेवीस किलोचा लाल भोपळा आणि नंतरचा सत्तर किलोचा दुधी भोपळा (ते पण फक्तं चार महिन्यात [फक्तं चार महिन्यात बोल्ड लेटरिंग]) असे चार पाच जणांचे फोटो त्यांच्या मुलाखती सकट टाकून हार्ड बाउंड चार पाचशे रुपयाचं पुस्तक काढायला हवं होतं. बल्क एसेमेस वर जाहिरात करून चार पाच शहरात आठवड्यातून एकदा एसी रुमात कन्सल्टंसी ठेवायला हवी होती. लई पैका ओढला असता.

आपणांसी जे जे ठावे…या भावनेनी त्यांनी पुस्तक लिहिलंय. स्वत:वर प्रयोग करून लिहिलंय. ऐकीव, वाचलेल्या माहितीवर लिहिलेलं नाही. सगळ्यांनी निरोगी रहावं इतका आणि इतकाच स्वच्छ हेतू आहे त्यात. काय खा, कधी खा, केवढं खा इतकंच सांगितलंय त्यांनी. उपाय साधा आणि स्वस्तं असला की तो लायकीचा नाही अशी आपली मानसिकता आहे. "भोपळी मिरचीची भाजी साठ रुपये? लुटतात साले". "स्टफ्ड कॅप्सीकम अडीचशे रुपये, यू नो, इट्स रिअली माउथ वॉटरिंग". दिक्षीत साध्या शब्दात सांगतायेत ते लक्षात घ्या. पुढचा काळ वाईट आहे. किती पैसे साठवाल असे? कितीचा काढाल मेडिक्लेम? त्यानी फारतर बिल भरलं जाईल पण भोग तुम्हांलाच भोगावे लागणार ना? It's better late than never. नुसता पश्चात्ताप होऊन उपयोग नाही, अंमलात आणाल तर निरोगी जगाल.

मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी काढलंय पुस्तक. मिळतंय सगळीकडे. नवी पेठेत वजन जास्ती म्हणून कुणी खांदा देणार नाही अशी वेळ आणू नका. अजून या कामाला जेसीबी वापरल्याचं ऐकिवात नाही. एकतर पुस्तक वाचून अंमलात आणा नाहीतर जेसीबीचं कोटेशन आणून बिझनेस करा. सोप्पं काय ते तुमचं तुम्ही ठरवा. 

जयंत विद्वांस        




Thursday 22 October 2015

सत्तर एमएम चे आप्तं (९)…. हेलन रिचर्डसन खान…

सत्तर एमएम चे आप्तं (९)…. हेलन रिचर्डसन खान… 

पुढच्या महिन्याच्या म्हणजे एकवीस नोव्हेंबरला ही देखणी बाई वयानी सत्त्याहत्तर वर्षाची होईल. सलीम खानची दुसरी बायको. त्याच्या घरात एक सर्वधर्म समभाव, अनेकतामें एकता वगैरे स्लोगन न ठरवता आचरणात आहेत. त्याची पहिली बायको धारकर, मुलाची बायको मलाईका हिंदू, हेलनचा बाप अंग्लोइंडियन तर आई बर्मी, त्यांच्या मुलीशी लग्नं केलंय तो अग्निहोत्रींचा अतूल. हेलनचा सगळ्यात पहील्यांदा पाहिलेला चित्रपट म्हणजे शोले. मेहबूबा मेहबूबाला एवढ्या कमी कपड्यात नाचणारी बाई म्हणजे हेलन हे खूप नंतर समजलं. दुस-या महायुद्धात तिचे वडील वारले आणि ती  पाच वर्षाची असताना लपत छपत  कुटुंबासकट भारतात आली. आसामला त्यांचा गट पोचला तेंव्हा निम्मा राहिला होता. वाटेत तिच्या आईचा गर्भपात झाला, ती आणि तिची आई हाडांचा सापळा झाली होती. तिथून ते कलकत्त्याला आले. आईचा पगार पुरेना चारजणांच्या कुटुंबाला म्हणून तिनी शिक्षण सोडून एकोणिसाव्या वर्षी कामधंदा बघायला सुरवात केली आणि तिला पहिला ब्रेक मिळाला 'हावडा ब्रिज' मधे.    

आद्य उत्तम नर्तिका कुक्कूच्या मदतीनी तिला कोरस डान्सरचं काम मिळालं मग ती गाजली ती 'हावडा ब्रिज'च्या 'गीता दत्तनी म्हटलेल्या मेरा नाम चिन चिन चू' पासून (त्यातला मेरा, मेर्रा म्हटल्यामुळे सुरवात काय झकास होते ना). दारासिंघच्या चित्रपटात हिरोईन होण्याचं तिच्या नशिबात होतं त्यामुळे ती हिरोईन म्हणून बी ग्रेड राहिलीपण डांस मधे ती एवन होती. किती नाच-या आल्या नी गेल्या, हेलन अढळ आहे. अजूनही तिचं गाणं एका ठिकाणी आणि दुसरीकडे स्टीम हॉट आयटम सॉंग लागलं असेल तरी मी हेलनचंच बघतो. गवयाच्या गळ्यातला सूर जसा मुळात अंगात असला की जास्ती छान लागतो तसा हेलनच्या अंगातच नाच होता. कमनीय बांधा म्हणजे काय ते हेलन. नॉट अ पेनी लेस, नॉट अ पेनी मोअर, तिच्या अंगावर काय, नाचण्यात काय, उगाच अतिरिक्तं काही नाही. माला सिन्हा, मुमताज, योगीताबाली, चंदावरकर भरल्या अंगाच्या स्फोटक होत्या पण हेलन म्हणजे स्लिम ट्रिम बॉंब होती. 

हेलन कधीही चीप, व्हल्गर, बीभत्सं वाटली नाही. आशा भोसलेचा आवाज तिला लाभला हे तिचं भाग्यं आणि आशा भोसलेचंही. हेलनच्या सुसंस्कृत थिरकण्यामुळे आशाची गाणी थिल्लर झाली नाहीत. परवाच कुणीतरी काण्या लोकांसाठी मालस असा शब्दं सांगितला. हेलन, अमिताभ, गौतम राजाध्यक्ष, भूमिका चावला हे या क्रमानी सुंदर दिसतात, आशा पारेख मात्रं लिस्टच्या शेवटच्या टोकाला. हेलनचा चेहरा मला कायम लोभस आणि हसरा दिसत आला आहे. म्हातारपणातही ती काय गोड दिसते अजून. हेलनसारखे रसाळ, लुसलुशीत नाजूक ओठ, आताच्या नट्यांच्या रंगवलेल्या आणि घडवलेल्या आताच्या मादक ओठांपेक्षा लाखपटींनी सरस आणि कामुक आहेत (क्यातरीना कैफ सोडून अर्थात). 

'गुमनाम'मधे काय तो तिला मोठा रोल होता. 'गम छोडके मनाओ रंगरेली' म्हणणारी हेलन लैच ग्वाड दिसलीये. भावाच्या खुनाचा बदला घ्यायला आलेली सोनिया त्या आनंदात 'ये मेरा दिल'ला काय भन्नाट नाचलीये पण 'सोनिया, ये तुम जानती हो के ये रिव्हाल्वर खाली है…' या नंतर तिचा क्षणार्धात उतरलेला चेहरा, हात तोंड बांधून नेतानाची धडपड असहाय्यता बघा, अभिनय असा चमकून जातो एखाद्या क्षणी. 'मेहबूबा मेहबूबा' मधे त्या काळाच्या काय आताच्या मानानीही तिच्या अंगावरची कापड तोकड्या शब्दाला लाजवतील इतकी तोकडी होती पण तो ठेका, चाल आणि अमजदमुळे त्याचा फार गवगवा नसेल झाला. त्या ठेक्यावर ती जी काय कंबर हलवते ना, तोड नाही. आताच्या कुणी तशी हलवली तर मणक्यात ग्याप येईल किंवा कमरेचं सुटण्याची शक्यता आहे असं मला सारखं वाटत रहातं. 'कारवा' मधलं 'पिया तू अब तो आजा' बघा, चेंज म्हणून 'इन्तकाम' मधलं लतानी मादक गायलेलं 'आ जाने जा' बघा. 

'तिसरी मंझिल' मधलं 'ओ हसिना जुल्फोवाली' बघा. पाण्यात मासोळी सुळसुळ फिरावी तशी हेलन नाचलीये. पब्लिक तिच्या देहाकडे बघूच शकत नाही इतकी फास्ट आणि लुब्रिकेटेड नाचते ती. आशा पारेख ला मार्केट व्ह्यालू होती नाहीतर विजय आनंदनी तिलाच घ्यायला हवं होतं त्यात हिरोईन म्हणून असं आपलं मला प्रेमापोटी वाटतं. स्मूथनेस म्हणजे काय तर हेलन, बोनलेस हेलन. मी चार लिहिली की वाचणारा अजून चार गाणी सांगेल तिची. 'आओ ना गले लगाओ ना', 'आजकी रात कोई आने को है' बाकी आहे पण 'इन्कार'चं 'मुंगडा मुंगडा' मात्रं अजरामर आहे, त्याचा उल्लेख नाही केला तर अपमानच तिचा. पिवळ्या चेक्सची चोळी आणि हातात कोयता घेतलेली हेलन. दारूच्या अड्ड्यावरती विजेसारखी हलणारी, अमजदला भुरळ घालू पहाणारी हेलन. उषा, आशा, लता - तिघी बहिणींनी तिला आवाज दिलाय. आशाचा जास्ती फिट. एकमेकांना पूरक अगदी.  

उदबत्ती गरागरा फिरवल्यावर कशी डोळ्यापुढे ती लाल सर्पिल रेषा फिरते तशी हेलन नाचायची. पहिला आकार, स्टेप बघतोय तर पुढे निघून गेलेली असायची ती, जिभा बाहेर काढून काय बघणार तिच्याकडे डोंबल. सुलोचना चव्हाण अंगभर पदर घेऊन, खाली मान घालून सोज्वळपणाने शृंगारिक, चावट, सूचक लावण्या अत्यंत शालीनतेनी म्हणतात तसा हेलन क्याब्रे करायची, एक कला म्हणून, नृत्याविष्कार म्हणून. सोळा वर्ष ती तिचा गॉडफादर पी.एन. अरोरा बरोबर तशीच राहिली आणि मग त्यानंतर आठ वर्षांनी तिनी सलीमखान बरोबर लग्नं केलं तेंव्हापासून ती तिथेच आहे. 'हम दिल दे चुके सनम' मधे ती सलमानची पडद्यावरची आई होती. चांगली गुटगुटीत झालेली हेलन गोड दिसली.तिच्यापेक्षा तरुण स्मिता जयकर त्यात फुगलेली, सुजरट चेह-याची दिसते पण हेलन मात्रं  तृप्तं, गोड आणि मायाळू दिसली मला तिच्यापेक्षा. 


काळ बदलत राहील, माझ्या म्हातारपणात कुणी डांसचं कौतुक केलं की मी नातवाला/नातीला सांगेन, 'तुला ग्रेसफुल, हलणारं रबर, फ्लेक्झिबल देह बघायचाय? गुगलला सर्च कर हेलन सॉंगज म्हणून, कशावरही क्लिक कर', त्यावेळेस एट जी वगैरे कनेक्शन असेल, माझा चष्मा लावून होईपर्यंत ती उदबत्तीच्या वलयासारखी पुढे निघून गेलेली असेल. रिवाइंड करेन आणि बघेन. 'हेलन, तुझ्या काळात बाकीचे टू जी स्पीडला नाचत होते तेंव्हा तू फोर जी ला इझीली नाचत होती हे आत्ता लक्षात आलं, एवढं मात्रं खरं. फार लवकर आलीस जन्माला.  

जयंत विद्वांस 
            

Friday 16 October 2015

किती देते रे...

आयुष्यातली पहिली गाडी होती सेकंड ह्यांड स्प्लेंडर. तिच्यावर मी खूप फिरलो. नंतर नविन गाडी घ्यायचा विचार चालू झाला. सीबीझ आणि फिएरो नव्या आल्या होत्या दोन हजार साली. सीबीझला किक मारताना फूटरेस्ट आत घ्यावं लागायचं म्हणून मी ती घेतली नाही. एकतर माझ्या लक्षात राहिलं नसतं आणि किका बदलायचा खर्च झेपला नसता सारखा आणि नडगी किंवा घोटा पांढरा स्कार्फ घालून ठेवावे लागले असते..

मग पर्याय उरला फिएरो. तेंव्हा बावन्न हजाराला होती फिएरो. ऐपतीच्या बाहेरचीच गाडी खरंतर. दीडशे सीसी. मला झेपायचीही नाही. पण हौस दांडगी. तीन बारा दोन हजारला मी ती दाराशी लावली तेंव्हा मेन स्ट्यांडला लावताना तोल जात होता. एकतर त्या गाडीला लूक नाही. विचित्रं टाकी आहे तिची. एकंच फायदेशीर गोष्टं म्हणजे पुढे आणि मागे साईड इंडिकेटर आणि ल्याम्प एकाच साडग्यात आहेत. बाहेर कान आल्यासारखे नाहीत. त्यामुळे ते धक्का लागून तुटण्याची भीती कमी होती आणि ते आजतागायत शाबूत आहेत.

पंधरा वर्षात मी त्यावर रग्गड हिंडलो. अष्टविनायक, कोल्हापूर, महाबळेश्वर, अलिबाग, रोहा आणि अगणित वेळा बदलापूर, डोंबिवली. टायर, ट्यूब, बॅटरी, लॉक सोडल्यास एकही पार्ट चेंजलेला नाही. कुत्रं मधे आलं म्हणून चार जून चारला अपघात झाला एवढाच डाग तिच्यावर, बाकी अजूनही ती थंडीतसुद्धा फर्स्ट किकला स्टार्ट होते.

आता जरा वय मात्रं जाणवायला लागलंय तिचं. धापा टाकते चढावर. पण मी तिला काढणार नाहीये. तिच्या ब-याच गमतीजमती माझ्या आठवणीत आहेत. स्पीडोमीटर बंद होउन बरीच वर्ष झाली. तसंही असता चालू तरी मी ते अॅव्हरेज वगैरे चेकायच्या भानगडीत पडलो नसतो. लोकांनी सांगितलेलं अॅव्हरेज बाईनी सांगितलेल्या वयासारखं असतं, मजेशीर प्रकार आहे तो. कॉंट्रीब्युट असेल तर ते नेहमीच कमी असतं.

परवा पार्किंगमधे नेहमीप्रमाणे माझी फिएरो चेष्टेचा विषय होता. नेहमी पब्लिक एक प्रश्नं विचारतंच 'किती देते रे?'. म्हणतो मी, माहित नाही. जो पर्यंत ती चालतीये तोवर ती किती देते याची काळजी मला नाही. तिनी किती दिलंय ते मला माहितीये.

आता ती रुपवान नाही. पंधरा वर्ष उघड्यावर राहिलीये. दिवसातून किमान दोनदा माझ्या लाथा खातीये. तिच्या अंगावर तिसरा माणूस बसला तेंव्हा ती शहारली असेल, आनंदली असेल. निर्जीव असली म्हणून काय झालं तिच्यात माझा जीव अडकलाय एवढं मात्रं खरं.

परत कुणी विचारलं ना 'किती देते रे?', विचारणारा पाठमोरा दिसू दे, दोन पायातून पुढचं चाक काढणार आहे.

--जयंत विद्वांस
.



Tuesday 13 October 2015

घास….

घास…. 

काल घराघरातून खिडक्यात, अंगणात, टेरेसवर पान वाढून ठेवलं गेलं. श्रद्धा अंधश्रद्धा भाग सोडून देऊ. त्यावरच्या चर्चेतून निष्पन्न काही होत नाही. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. ती अंध आहे की डोळस हे आपण कशाला ठरवूयात. मला त्याच्या मागची भावना दिसते. खरंतर अनेक माणसं आयुष्यातून भरल्या पानावरून उठून जावं तशी कायमची निघून जातात परत न येण्यासाठी. त्यामुळे ठेवलेलं पान नेमक्या कुणासाठी हा प्रश्नं चेष्टेने विचारतात लोक, त्याला उत्तर नाही आणि देऊही नये.

जीनी ठेवलं तिला ते रिकामं उचलताना हुंदका फुटला असेल. तीच्या मनातला माणूस येउन गेला, जेवला, आशीर्वाद दिला आणि गेला. या न घडलेल्या गोष्टी कदाचित तिच्या दु:खावर पांघरुण घालत असतील. ते शल्यं/सल यावर फुंकर बसत असेल. वर्षभर आठवण येतेच की, येतंच असणार पण रोज रडू येणं शक्यं नाही, तसं केलं तर जगणंही मुश्किल होईल. आपणही त्याच मार्गावर आहोत, पुढे गेलेल्यांच्या आठवणी काढत आपणही तिकडेच चाललोय मग का जीव गुंततो एवढा? गुंततो, त्याला उत्तर नाही.  

माणूस निर्वतला म्हणजेच आठवण येते? काही लोक आयुष्यातून दूर जातात. चूक कुणाची, कारणं काय वगैरे मुद्दे सोडा, प्रत्येकाची एक बाजू असते आणि ती त्याच्या मते खरी असते. तरीपण त्या मोकळ्या जागा आपल्या लक्षात रहातात. घासातला घास आपण ज्याला देत होतो किंवा जो आपल्याला देत होता, त्याची आठवण होते. आपण कुणासाठी किंवा कुणी आपल्यासाठी काही चांगलं चुंगलं केलं तर दोन घास बाजूला काढायची पद्धत होती. आज्जी म्हणायची, 'राहू दे थोडं, मूलं डोकावली तर हातावर द्यायला राहू दे'. माया असायची. गुप्तंधन ठेवल्यासारखं भांड्यात ठेवलेला खरवस, साखरभात, मोडकळीला आलेली अर्धी पुरणाची पोळी, नारळाच्या दोन वड्या, बेसनाचा बुडाला चिकटलेला लाडू, खारट गाळ जास्ती असलेला चिवडा कुणी मायेचं माणूस घासभर काढून ठेवायचं. जिभेवर ती काढलेल्या घासाची अमृतचव अजून रेंगाळतीये

'हॉटेल रविराज'ला असताना ऑफिसमधे आम्ही चार पाचजण एकत्रं जेवायला बसायचो. एक दिवशी जेवताना मी नव्हतो, उशिरा आलो आणि दुष्काळातून आल्यासारखा जेवायला बसलो, *** जेवायची थांबली होती, मला माहित नव्हतं. कुणीच काही बोललं नाही. माझं जेवण झालं, मी जागेवर येउन बसलो. सगळे हसत होते. तिनी डबा काढला, कोप-यात जाऊन जेवायला बसली. नकळत घडलं माझ्याकडून, त्या चुकीला माफी नव्हतीच. मी कडेला जाऊन बसलो आणि 'सॉरी' म्हणालो. काहीवेळा काहीच बोलू नये चूक झाल्यावर, समोरच्याला पश्चात्ताप कळतो. हातातला घास तसाच ठेऊन तिला हुंदका फुटला आणि ती हमसाहमशी रडायला लागली. ऑफिसमधे मी तिला जवळ घेऊ शकलो नाही. बेसिनपाशी जाऊन आवाज न करता रडलो, तोंड धुतलं आणि परत आलो. कधीतरी डबा खाताना ती आठवते. घास अडकतो, डोळ्यात पाणी येतं मग उरलेले दोन घास तसेच घरी जातात.   

आता सुबत्ता आली. पैसा, माणसं मुबलक झाली, लोक घास जेवढे खातात त्याच्यापेक्षा दुप्पट वाया घालवतात. आता लोक वगळून खातात, दोन घास वगळून, काढून ठेवायचे दिवस गेले. कधीतरी आज्जी आठवते, जेवायला थांबणारी ती आठवते, आठवण उफाळून येते आणि मग घास अडकतो. डोळ्यात पाणी येतं. त्या सगळ्यांसाठी प्रथा म्हणून आपण घास ठेवत नाही तर ज्यांच्यासाठी घास अडकतो त्यांच्यासाठी ठेवतो, एवढाच मी त्यातला काढलेला अर्थ आहे.   

जयंत विद्वांस 





Friday 9 October 2015

ऐकत रहावं फक्तं....

वाचाळ असणं हा खरं तर दुर्गुण आहे पण इथले काही वाचाळ मला आवडतात. वृत्तांत, कौतुक सोहळे मला अण्णांनी गळ्यात मारलेत आणि मलाही ते आवडतं आणि खोटी स्तुती करायला कुठे फार कष्टं आहेत, त्यामुळे ती मी अधूनमधून करतोही.

गेटूगेला समजलेला पहिला वाचाळ राजेश मंडलिक. हा माणूस सुंदर कविता वाचतो. स्पष्टं शब्दोच्चार मला मोह घालतात. बरं तो छापील वाचत नाही. त्या छापखान्यातल्या खिळ्याला चिकटून आलेला कवीच्या मनातील अर्थ तो शब्दं इकडचा तिकडे न करता आव न आणता पोचवतो. माणसाचा स्वभाव त्याच्या कृतीत, कलेत कुठे न कुठे डोकावतो असं म्हणतात. राजेश मोकळा माणूस आहे, कलासक्तं आहे हे त्याच्या वाचण्यात दिसतं. प्रोफेशनल तयारी त्याच्यात दिसत नाही पण अभियंत्याचा काटेकोरपणा मात्रं दिसतो. आनंद द्यायची सुद्धा वृत्ती लागते. फक्तं स्वत: आनंद घेणं वेगळं आणि स्वत: घेत असताना तो हसमुख चेह-यानी दुस-याला देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

काही गवई गाताना अतिशय विद्रूप हावभाव करतात. सतत बद्धकोष्ठं झाल्यासारखा चेहरा असतो. लहान मूल जसं न ठरवता कागदावर कुठलाही आकार, चित्रं मनात न धरता रेघा मारतं तसं राजेश सहज वाचतो. त्याची आणि अण्णांची संपू नये अशी वाटणारी जुगलबंदी ज्यान्नी पाहिली ते लोक भाग्याचे. 

दुसरी वैशाली. ती लहान मुलासारखा आवाज काढते, कार्टून्सना बोलतं करते यात मला काही आश्चर्यं वाटत नाही. ती मोठ्यानी ओरडली तरी नाजूक आणि लयबद्ध ओरडेल अशी मला खात्री आहे इतकी ती गोड आहे. काही शब्दं काही भाषांमधून घ्यावेच लागतात. प्लेझंट फेस. हाच शब्दं योग्यं आहे तिच्यासाठी, गोड पेक्षा सरस आहे तो. ती एरवी बोलताना सुद्धा मंजूळ बोलते. सिंथेसायझरवर काढलेला आणि मूळ वाद्यावर काढलेला आवाज यात फरक असतो. यंत्रावर भास निर्माण करता येतो फारतर, मूळ वाद्यात आस निर्माण करता येते. तसा वैशालीचा गळा मूळ वाद्यासारखा आहे.

एखाद्या माणसाबद्दल आपण प्रथमदर्शनी ठोकताळे मांडत असतो. ती चेह-यानी जेवढी आनंदी दिसते तेवढीच आवाजानीही आहे. गेटूगेला ती आवाज काढत असताना मी एकटक तिच्या आनंदी चेह-याकडे बघत होतो. तो चेहरा मी विसरणार नाही.

तिसरी वाचाळ, स्वरूपा. हौशी आणि एकूणच दणकट प्रकरण आहे. तिचा एरवी फोनवर आवाज ऐकलात तर तुम्ही फोन पुढे धरून नंबर चेक कराल की मी फोन तर स्वरूपाला लावला आणि कुठल्यातरी बाप्याला कसा काय लागला. तिच्या आवाजाला एक कोकणी मालवणी अनुनासिक स्वर, हेल आहे. एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्हाला तो मंजूळ वगैरे वाटण्याची पण शक्यता आहे. मकर राशीच्या माणसाला एकानी सांगितलं पुढची दहा वर्ष तुम्हाला खडतर आहेत. त्या बिचा-यानी उत्साहानी विचारलं, नंतर? तो म्हणाला, नंतर सवय होईल. असा प्रकार आहे.

श्रीनिंच्या वर्कशॉपला जाउन तिनी मेहनत घेतलीये. तिनी वाचलेल्या काही कथा माझ्याकडे आहेत. अतिशय मन लावून वाचल्यात तिनी. प्रत्येकवेळेला तिच्यातला तो नविन काहीतरी करण्याचा उत्साह मला मोहवून जातो. उपजत कला असणं हे भाग्यं लागतं आणि आपल्यालाही हे यायला पाहिजे या हौसेनी शिकणं हे वेगळं असतं. (श्रीनीचा आवाज बिघडायला लागलाय त्यामुळे ते आता ती यायच्या आत दार घट्ट बंद करून घेतात असं कानावर आलंय. लोक बोलतात काहीही, आपण लक्ष नाही द्यायचं).

चौथी लेटेस्ट सापडलेली वाचाळ शिल्पा केळकर. ती सराईत वाचाळ आहे. ती अभिनय करते वाचताना. लहानपणी रेडिओवर श्रूतिका लागायची. ती ऐकून सुद्धा समोर घडत असल्याचा फील यायचा. बातम्या देताना पण वाचतातच की पुढ्यात लिहिलेलं (भक्ती बर्वे इथून तुला एक सलाम) पण अर्थात त्यात भावना, अभिनय अपेक्षित नसतो. पण पुढ्यातला कागद असा वाचायचा की कागद नाहीसा व्हावा आणि समोर सगळं घडतय असं वाटायला लागण्याची ताकद शिल्पाकडे आहे.

उशाशी, शिक्षा, गोष्टं, काढायची या शब्दातले ष श क्ष च तिच्या तोंडातून मूळ रुपात बाहेर येतात. उच्चारात पण अर्थ असतो. वेद, ऋचा, मंत्र शुद्ध त्यासाठीच म्हणतात. प्रत्येक व्यंजनाला, स्वराला वजन आहे, अर्थ आहे, त्याचे वेगवेगळे परिणाम आहेत. शिल्पानी ते कसोशीने जपलंय. (श फार वेळा येतोय का माझ्या लिहिण्यात?). माणसं चेह-यानी आज सुंदर असतील, उद्या नसतील पण ती असं काही सादर करताना, बोलताना जेवढी सुंदर दिसतात तेवढी इतर वेळी मला दिसत नाहीत.

'ओव्हरड्राफ्ट'मधलं तिचं '.. ऐकत रहावं फक्तं' हे वाक्यं ऐका. ऐकत मधे ऐ वर दिलेला जोर, आपण सहसा राहावं म्हणतो तसं न म्हणता म्हटलेलं 'रहावं' ऐका आणि सांगा. गोष्टं छोटी असते पण फार आनंद देउन जाते.

असा एक छुपा रुस्तूम आहे विशाल वाड्ये. त्याचा आवाजही ऐकत रहावा असा खर्जातला आहे. त्याच्याकडे सादरीकरण आहे, आवाजात सुत्रसंचालन आहे.

स्टेजवर राजेश वैशाली स्वरुपा शिल्पा श्रीनी नंदू बसलेत, विशाल आणि अण्णा त्यानां बोलतं करतायेत, मधूनच स्वत: आपल्याला चकित करताहेत. आपण सगळे समोर बसलोय. शोची सगळी तिकिटं मुकुंदा आणि शैलेशनी प्रेमळ भाषेत विकली आहेत. शो फूल आहे. समोर कधीही संपू नये असं वाटायला लावणारा काव्यं कथा गझल सुर गाणी यांचा उत्सव चालू आहे. टाळ्या वाजवून हात थकतील. नेमकं काय सुख प्राप्तं झालं हे सांगता येणार नाही अशी अवस्था असेल.

जमवा राव एकदा, नवी पेठेत जायच्या आधी अशा काही आठवणी सोबत घेउन जाउयात.

--जयंत विद्वांस