Monday 24 February 2014

But A Short Time to Live - James Hadley Chase

अप्रतिम पुस्तक आहे. 'ओळखा पाहू खुनी कोण ते' अशा धर्तीवर या माणसाचं पुस्तक नसतं. त्या उलट काय घडलंय ते तो आधीच सांगतो. मग सुरु होतो तो उंदीर मांजराचा, वेगवेगळ्या मनुष्यं स्वभावाच्या छटांचा पकडून ठेवणारा खेळ. सिडने शेल्डन, हेराल्ड रौबिन्ससारखी गरमागरम वर्णनं नसतात पण हा माणूस मला जामच आवडतो. एकूण ९० पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत म्हणे, मी साधारण ४०-४५  वाचली आहेत. तो आधीच निर्वतला असल्यामुळे त्याला पत्रं किंवा इतर मार्गांनी लिहिता येत नाही, पोच देता येत नाही हे दुर्दैवं. हे त्याचं टोपण नाव आहे. रेमंड मार्शल खरं नाव. असो, हा माणूस मला  जाम  आवडतो. पुढे काय हे  माहित असून सुद्धा मी त्याची पुस्तकं परत वाचतो. भाषेचा साधेपणा हे मुख्य कारण. इतका सोप्पं इंग्लिश की इंग्रजीची साधारण माहिती असलेला माणूसही वाचू शकतो (म्हणजे माझ्यासारखा).  'पेज थ्री मर्डर' असं एका भारतीय लेखिकेचं पुस्तक मी वाचत होतो, चार पानात पन्नास वेळा डिक्शनरी लागली. ठेवून दिलं (कदाचित माझं अज्ञान हे ही कारण असू शकेल). 
 
चेसच्या 'सकर पंच' ची सहीसही नक्कल केलेला 'आर या पार' बघण्यापेक्षा 'सकर पंच' वाचणं जास्ती थ्रिलिंग आहे. चेसची पात्रं आपल्यातली वाटतात. त्याचा कुठलाही एक हिरो नाही पेरी मेसन सारखा, अपवाद मार्क गरलंडच्या नावावर आहेत ३-४. त्यामुळे नवीन हिरो किंवा मुख्यं पात्रं कसं वागेल, त्याचे स्वभावविशेष काय आपल्याला  काही माहित नसतं. त्याचा मला सगळ्यात काय आवडत असेल तर मनुष्यस्वभावाचं सखोल अभ्यास केलेलं लिखाण. त्याचं कुठलंही पात्रं उपरं, असंबंद्ध, बुद्धीला न पटणारं वाटत नाही. ८४-८५ ला त्याच्या 'Vulture Is A Patient Bird' चं भानू शिरधनकरांनी अनुवादित केलेलं 'गिधाडांची जातच  चिवट' मी वाचलं होतं तेंव्हापासून मी या माणसाच्या पाठलागावर आहे. पुढे मागे जमलं तर समस्तं चेस मराठीत आणावा असाही माझा आरंभशूर विचार आहे. (वाट लागली तर त्याला दु:खं होणार नाही हेच मोठं). असो.
 
एका कफल्लक पण स्वप्नाळू तरुण माणसाची 'रिक्स'ची ही करुण  कहाणी आहे. तो एकटाच आहे. वडिलांनी मरताना पोस्टात ठेवलेले ३०० पौंडस एवढीच त्याची पुंजी आहे, रस्त्यावर पर्यटकांचे फोटो काढून तो जगतोय. आल्फ मुनीच्या स्टुडीओमधे तो काम करतो. (यावर पिक्चर काढला तर आल्फ मुनीचं पात्रं फक्तं ओमप्रकाश करु शकेल. अप्रतिम लिहिलाय हा माणूस त्यानी. तो आधी मालक  असतो, तो  त्याच्यावर  मुलासारखं प्रेम करतो, त्याची काळजी करतो, मग त्याच्याकडे नोकरी करतो आणि तो परागंदा होतो तेंव्हा त्यानी दिलेले २५ पौंड बंद पाकिटातून स्वत:ला गरज असतानाही 'त्या'ला लागतील म्हणून परतही करतो. आल्फ मुनी डोळे पाणावून जातो, चुटपूट लावतो हे मात्रं खरं).   
 
त्याच्या जीवनात आनंद घेऊन आलेली खिसेकापू, वाया गेलेली, कुठलीही नीतिमत्ता नसलेली क्लेअर त्याच्या -हासाला, दु:खाला आणि शेवटालाही कारणीभूत ठरते. तिचं पात्रं इतकं सुंदर रंगवलंय की आपल्याला  क्लेअरचा राग येत नाही. तिची दया येते. भूतकाळातल्या चुका तिला मान्यं आहेत, तिला बदलायचंही आहे पण स्वैर जीवन जगायची लागलेली सवय, पैशाची, मौजमजेची लागलेली चटक आणि मग त्यासाठी  कुठल्याही थराला जाण्याची तयारी त्या दोघांना रसातळाला नेते. फुटपट्टीनी मारलेल्या सरळ रेषेसारखं आयुष्यं चाललेलं असताना तिची पहिली भेट त्याला आयुष्यातून उठवायला कारणीभूत ठरते.  दोघांचं  एकमेकांवर प्रेम आहे पण फरक आहे तो स्वभावात. तिनी तिला हवं तेच करायचं आणि ह्यानी कायम समजून घ्यायचं. तो भिडस्तही आहे म्हणून दुर्दैवीही. वाईट संगत नको हे पटत नसेल तर चेसचं पुस्तक वाचावं. कुसंगतीनी होणारा अटळ शेवट त्याचा जवळपास सर्वच पुस्तकातून येतो.  
 
रिक्स एवढेच आपणही हताश होतो. तिच्यामागे धावताना त्याच्या आयुष्याची होणारी फरफट त्याच्याएवढ्याच हताशपणे आपण वाचतो. चेसचं कुठलंही पुस्तक वाचताना  मला चित्रपट बघितल्याच्या फील  येतो. रुढार्थानी हे पुस्तक थ्रिलर नाही. पण पुढे काय हे मात्रं सतत वाटत राहतं. काल्पनिक माणसाबद्दलसुद्धा आपल्याला चुटपूट लागते, अनेक प्रश्नं पडतात. वाईट माणसाला वाईट भोग आले तर निदान मनाचं समाधान तरी होतं पण चांगल्यालाही ते भोग आले तर मात्रं हताश होण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. १९०६ ते १९८५ म्हणजे चेस तसा जुनाच पण त्याची पात्रं मात्रं आजही आजूबाजूला दिसू शकतात हेच तर त्याचं वैशिष्ठ्यं.