Tuesday 30 July 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (४)…स्मिता पाटील….


स्मिता पाटील….

फक्तं ३१ वर्षाचं तुटपुंजं आयुष्यं घेऊन ती आली होती. १०० वर्ष जगून जेवढं काम करता येणार नाही तेवढं ती या मोजक्या कालावधीत करून गेली.  दूरदर्शन वर बातम्या देताना स्वच्छ, शुद्धं मराठी वाचणारी (भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर, चारुशीला आपटे या सुद्धा) निवेदिका ते अप्रतिम, ठसा उमटवणारी अभिनेत्री असा कायच्या काय पल्ला तिनी अल्पावधीत गाठला. ज्या वयात लोकांना कुठल्या साईडला जावं हे ठरवता येत नाही त्या वयात ती तिच्या पेक्षा जास्त वयाच्या पात्रांना साकारत होती. काय घाई होती काय माहित तिला. 
'सामना' मधे या टोपीखाली दडलंय काय मधे तीची कमळी निसटतं दर्शन देऊन गेली, अगदी गोड पोरगी. ती सगळ्यात जास्तं आवडली ती 'उंबरठा' मधे. तो चित्रपट जमूनच गेला होतं सगळा. अभिनय, गाणी, विषय, दिग्दर्शन सगळच सुंदर, नेटकं. किती कमी बोलते ती संपूर्ण चित्रपटात. आपलं संसारातलं स्थान कळल्यावर ती त्रागा करत नाही. तिची खंबीरता संपूर्ण चित्रपटात तिच्या चेह-यावर, देहबोलीत आणि शांत बोलण्यात दिसते. संपूर्ण चित्रपटात ती तिच्या स्वभावा सारख्या कॉटनच्या कडक साड्या नेसते आणि त्यात ती दिसते पण सुरेख (वहिदाजी, रेखा आणि स्मिता यांना साडीत बघा - साडीत पण छान दिसता येतं हे कळेल मग).     
  

'त्रिदेव' नंतर नसिरुद्दीन शहा म्हणाला होता, आर्ट फिल्मला चिकटून बसलो ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ('जलवा' मधे त्याने केला होता चांगला प्रयत्नं पण लोकांनी हाणून पाडला). मलाही स्मिता पाटील बद्दल तीच खंत वाटते. तिला मिळाले नाहीत की तिनी स्वीकारले नाहीत हा तपशील काही माहित नाही पण ती लोकप्रिय चित्रपटात कमी आली. 'इजाजत' काय तिला झेपला नसता? 'कोंडुरा', 'निशांत', 'मंथन' किती जणांनी पाहिला असेल? 'अर्धसत्य'चं क्रेडीट ओम पुरीला मिळालं. महेश भटनी त्याच्या आणि परवीन बाबीच्या सत्यकथेवर आधारलेला 'अर्थ' मधे तिनी छान काम केलं, तिचं त्यातलं ते व्हायलंट होणं अंगावर येतं. मराठीत तिनी 'जैत रे जैत', 'सर्वसाक्षी' आणि 'उंबरठा' असे इन मीन तीन चित्रपट केले. 'जैत रे जैत' मधे ती कातक-यासारखेच डोंगर चढते,  उतरते आणि दिसतेही.

विनोद, नाच या बाबतीत मात्रं तिची बोंब होती. मराठी 'फटाकडी' वरून काढलेला विनोदी 'चटपटी' फ्लॉप झाला. ती भूमिका तिची नव्हतीच. 'शक्ती' मधल्या 'हमने सनमको' मधे सुरवातीला ती जे काही हातवारे करते त्यात तिचं कृत्रिमपणा जाणवतोच. त्यातल्याच 'जाने कैसे कब कहा' मधे ती पोपटी हिरव्या साडीत बागेत जी चालते ना ते मात्रं एकदम रॉयल होतं. 'नमकहलाल', 'शक्ती' एवढे दोनच चित्रपट तिच्या वाट्याला आले अमिताभ बरोबर. 'आज रपट जाये' मधे पण ती भाव खाऊन गेली आहे. राजेश खन्ना बरोबरच 'आखिर क्यो?' पण मस्तं  होता. 'दुश्मन न करे दोस्तं ने वो काम किया है' मधे ती बेफाट दिसलीये. त्या चित्रपटात टीना मुनीम कडे ती ज्या जळजळीत नजरेने बघते ना ते फक्तं बघत राहावं, शब्दांची गरजच नाही. टीनाची राकेश रोशन जवळ वाढत चाललेली जवळीक लक्षात आल्यावर जो चेहरा तिनी केलाय ना त्यासाठी शब्दं नाहीत.

मार्टिना आणि ख्रिस एव्हर्ट जशा आळीपाळीनी विम्बल्डन जिंकायच्या तसं ती आणि शबाना पुरस्कार घ्यायच्या. मला स्वत:ला स्मिता तिच्यापेक्षा सरस आहे असं वाटत आलय. एकतर तिच्या फिल्म्स कमी आहेत (यात शबानाचा काही दोष नाही म्हणा) आणि शबाना कुठल्याही भूमिकेत शबानाच वाटते मला. 'जैत रे जैत' मधे कातकरीण शोभेल का ती? दोघींच्यात एका बाबतीत मात्रं साम्य आहे. दोघींनीही आधीची मुलं असलेल्या घटस्फोटीत माणसाशी लग्नं केलं. पण जावेद  अख्तर आणि राज बब्बर यांची तुलनाच होऊ शकत नाही. तिच्या लग्नाबद्दल बरीच टीका झाल्याने ती दु:खी झाली होती. तिच्या बहिणीकडे ती म्हणाली होती, लोक माहित नसलेल्या गोष्टींवर का बोलतात? त्याचा घटस्फोट आधीच झालेला आहे, मी त्यासाठी कारण नाहीये. 


खरंय, माणसं माहित असलेल्या गोष्टींवर कमीच बोलतात. पण तिचा तो निर्णय मात्रं अतर्क्य होता. अभिनय आवडला म्हणावं तर तो दुर्गुण त्याच्याकडे  कधीच नव्हता. मुलगाही नेमका वडिलांचा तोच दुर्गुण घेऊन आलाय. स्मिता नाहीये ते बरंच आहे एका अर्थी. शिरीष कणेकरांनी त्यांच्या आई वर लिहिलेलं मी परत परत वाचलंय आणि प्रत्येक वेळेला रडलोय. तसंच जन्मं दिल्यावर दोन आठवड्यात ती मुलाला सोडून गेली. किती घोटाळला असेल हो जीव तिचा.

मधुबाला लवकर गेली ते बरंच झालं, उतारवयातलं तिचं ओसरलेलं सौंदर्य पाहून हळहळ तरी नाही वाटणार असं एक दु:ख्खात सुख मानणारं विधान मी वाचलं होतं (मी सहमत नाही हा भाग वेगळा, ती म्हातारी सुद्धा सुंदरच दिसली असती. अर्थात साधना, वैजयंतीमाला पाहून ते विधानही डळमळीत झालंय, नंदा, वहिदा आणि चिरतरुण हेमा मालिनी मात्रं अजूनही ग्रेसफूल  दिसतात). स्मिताच्या बाबतीत मात्रं असं नाही म्हणता येणार. ती लवकर गेली आणि अभिनयाचे विविध आविष्कार बघायला मात्रं आपण मुकलो, हे आपलं दुर्दैव.

देवाघरची ही माणसं आपल्या आयुष्यातले चार क्षण सोन्याचे करून गेली. त्यांचे उपकार कसे फेडायचे? त्यांच्या गुणांची, कर्तुत्वाची उजळणी करण  फक्त आपल्या हातात आहे, तेवढं  निमुटपणे करत रहायचं. 

--जयंत विद्वांस

Friday 26 July 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (३)… रेखा ….

अभिनेता जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्लीची ही काळी, बेढब, जाडजूड मुलगी भानुरेखा येत्या १० ऑक्टोबरला साठीत जाईल आणि तिचा कायापालट करणारा दुस-या दिवशी ७१ वर्षाचा होईल. सावन भादो, रामपूर का लक्ष्मण मध्ये ती काळी, बोजड आणि मठठ दिसते. नमक हराम,  दो अंजाने, खून पसीना, गंगा की  सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, मि.नटवरलाल आणि शेवटचा सिलसिला. मोजून आठ चित्रपट आहेत त्याच्याबरोबर आणि केवळ त्याच्या बरोबर प्रेमाचे संवाद एकटीने का होईना पण म्हणता येतील म्हणून आखरी रास्ता मधे तिने श्रीदेवीला दिलेला उसना आवाज.  

पु.लं.च्या फुलराणी मधे (पिग्मालिअनचं हे रुपांतर कुठे आणि देव आनंदचा मनपसंद कुठे) तो प्रोफेसर जसा त्या खेडवळ अशिक्षित मुलीचा कायापालट घडवतो तशी बदलली रेखा. एका शिल्पकाराला विचारलं  गेलं, कशी बनवलीत एवढी सुंदर मूर्ती? तो म्हणाला, ती त्या दगडातच होती, मी फक्तं  अनावश्यक भाग काढून टाकला. रेखाबद्दल 'तो' असच  म्हणत असेल का? त्याचं आधीच लग्नं झालेलं होतं हे तिचं दुर्दैवं. तशी ती त्या बाबतीत कमनशिबीच पण. विनोद मेहरा, किरण कुमार, तो आणि दुस-याच दिवशी आत्महत्या करणारा नवरा मुकेश अगरवाल कुणीच लाभलं नाही तिला. (अशीच कमनशिबी लीना चंदावरकर होती, लग्नाच्या दुस-याच दिवशी तिचा नव-याला - सिद्धार्थ बांदोडकरला - गोळ्या घातल्या होत्या.)




घर मधल्या सगळ्या गाण्यात (तेरे बिना जिया जाये ना चा बिट आणि चाल रेखा एवढीच सुरेख होती), इजाजत मधल्या खाली हाथ शाम आयी है (आर. डी. नी हे गाणं वडिलांच्याच अभिमान मधल्या नदिया किनारे वरून घेतलय अस नाही वाटत?) मधे ती काय अप्रतिम दिसली आहे. गायला ढीग लता, आशा आहेत पण चेहरा त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे हलायला हवा ना. इथे रेखा सगळ्यात सुंदर दिसते. नाटक काय चित्रपट काय दोन कलाकार जेंव्हा समोर समोर असतात तेंव्हा एकाच्या अभिनयाचं प्रतिबिंब प्रतिक्रिया म्हणून दुस-याच्या चेह-यावर उमटायला लागत तेंव्हाच तो सीन जास्तं परिणामकारक होतो. सलामे इष्क ला तो उठून गायला लागतो तेंव्हा रेखा मद्दडासारखी उभी रहात नाही तर त्याच्या ओळींचा अर्थ तिच्या चेह-यावर दिसतो. गाणं संपल्यानंतरच तिचं भारावलेपण बघण्यासारखं होतं.

उमराव जान, उत्सव आणि इजाजत रेखाचे म्हणूनच ओळखले जातील इतकं तिनी अफाट काम केलं आहे. उत्सव मध्ये तर ती रती भासते, अंगावरचे  सगळे दागिने एकाचवेळी काढण्यासाठी ती कंचुकीतली क्लिप काढताना ती शेखर सुमनकडे जे बघते ना त्यात तू अजून बच्चा आहेस हे न बोललेलं वाक्य ऐकायला येतं.खुबसुरत मधे दोन वेण्या घातलेली, बसेरा मध्ये बहिणीच्या संसारात रमलेली (एन्डला राखी भाव खाऊन जाते पण), खून भारी मांग मधे आधीची बावळट आणि नंतर कायापालट झालेली, अगर तुम न होते मधली सोशिक बायको या सगळ्यात ती रेखा न वाटता ते पात्रच वाटली हेच रेखा सुंदर दिसण्यामागचं कारण होतं. सुषमा शिरोमणीच्या कुठं कुठं जायाचं हनिमूनला मधे नऊवारीत ती जबरा दिसली होती. ती असली तर ठिकाण कुठलही चाललं असतं अशी. ती परिणीता मधल्या कैसी पहेली है ये जिन्दगानी मधे आणि झुबेदा मधे करिष्मा कपूर पेक्षा सरस दिसते. 

कारकीर्दीच्या उतरत्या काळात तिनी भ्रष्टाचार, फुल बने अंगारे, आस्था, बुलंदी, खिलाडीयोंका का खिलाडी असे काही भिकार सिनेमेही केले पण तिच दर्शन सुसह्य होतं. केस मोकळे सोडलेली किंवा मानेपर्यंत सैल सोडून एक शेपटा घातलेली साडीतली रेखा भन्नाटच दिसते. क्रिश-३ मधे पण ती आहे असं ऐकलय. प्रीती झिंटाची सासू आणि प्रियांका चोप्राची आजे सासू सुंदरच हवी ना?

क्रिकेट मधे गोलंदाजी किंवा फलंदाजी करताना काही जोडया जमून जातात आणि एकत्रं गाजतात तसच काहीसं तिच होतं त्याच्या बरोबर. मुकद्दर का सिकंदर तर असा चटकन उरकायचा, उल्लेख करून पुढे जायचा विषय नाहीचे मुळी. संपूर्ण चित्रपटात ती अप्रतिम दिसते. तो रोल तिचाच होता. इजाजत, उमराव जानचं जेवढ कौतुक झालं तेवढा जोहराच नाही झालं असा मला वाटतं. त्याच्या प्रभावामुळे ती ग्रेसफुल, रिस्पेक्टेबल झाली. इम्रानखानला आदर्श पत्नी कशी असावी असं विचारलं होत. तो म्हणाला भारतात वहिदा रेहमान म्हणून एक नटी आहे तशी हवी. काही काळानी विचारल असतं तर तो रेखा निश्चित म्हणाला असता. 

साड्यांच्या जाहिरातीतल्या कपडे वाळत घालायच्या काठ्या बघितल्या की वाटतं यांना रेखाचे दर परवडत नसावेत. साडीमधे ती परिपूर्ण सुंदर स्त्री दिसते. (स्मिता पाटील, वहिदा आणि आत्ताची विद्या बालन पण). खरं पहायला गेलं तर ती का सुंदर वाटली हे पटकन नाही सांगता येणार, चंदावरकर गोड होती, परवीन सुरेख होती, जयाप्रदाला तर भारतीय पडद्यावरची सर्वात सुंदर स्त्री असं प्रशस्तिपत्रही मिळालं  होतं, तस रेखात काय आहे खरं तर? ते सांगता येत नाही त्यापेक्षा ती सुंदर आहे हे मान्य करण जास्तं सोप्पं आहे. गौतम राजाध्यक्ष म्हणाले होते तिचे फोटो काढताना क्यामेरा सेट करायची गरज नसते, कुठल्याही कोनातून ती सुंदरच दिसते. सर्वसाधारण दिसणा-या माणसाला सुंदर करणारा माणूस हे म्हणतोय मग आपण काय बोलायचं अजून?

काही लोक जन्माला येताना फुटक नशीब घेऊन येतात किंवा कुठलातरी शाप घेऊन येतात. रेखा त्यातलीच एक. एकटेपणाचा शाप घेऊन आलेली. प्रसिद्धी, पैसा, मानमरातब सगळं काही बक्कळ मिळालं पण लौकिक अर्थानं मात्रं ती सुखी होऊ शकली नाही. 

जयंत विद्वांस

Wednesday 24 July 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (२)…अभिनेत्र्या (हिंदी-२) ….

अभिनेत्र्या (हिंदी-२) ….

पहिला भाग वाचून काहींनी मला राहिलेल्या सुंदर चेहऱ्यांची आठवण करून दिली. येतील त्या पण, फक्तं त्या मला सुंदर दिसलेल्या हव्यात एवढीच अट  आहे. एक मात्रं  खरं की स्मिता पाटील आणि रेखा यांच्यावर मात्रं शेपरेट हवं यावर एकमत झालंय. एक सावळी एक काळी पण अग्रक्रमावर आहेत.  गोरं  होण्यासाठी  क्रीम  लावणाऱ्यानी हे  लक्षात  घ्यायला हरकत नाही. असो. 

झीनत अमानला सुंदर म्हणणं म्हणजे चष्मा लागला हे कन्फर्म. म्हणजे बघण्यासारखं होतं पण सुंदर वाटण्यासारख मात्र काही नाही. परवाच एक एसेमेस आला होता. बिग्गेस्ट लाय ऑफ ८०'ज - बिकीनितली झीनत म्हणतीये - 'क्या देखते  हो?'  आणि  फिरोज  खान  म्हणतो - 'सुरत तुम्हारी'... छे, एवढं  खोट  नाही  बाबा बोलता येणार मला. मग तिच्यापेक्षा परवीन बाबी सरस होती. देखणा चेहरा, लोभस हसणं आणि खानदानी सौदर्य. ती गोडच होती. नाही केला फार अभिनय तरी चालून जायचं. दोघींनाही अमिताभ बरोबर चित्रपट  मात्रं  चांगले मिळाले.  पण  नऊवारी  साडी,  नाकात नथ, अमिताभकडे मिस्किल  हसत  कौतुकानी  नाक मुरडत ठुमकत  चालणारी  'मच  गया  शोर सारी नगरी रे' मधली परवीन दृष्टं लागावी अशी देखणी दिसली. या सौंदर्यानेच तिचा घात केला हे दुर्दैव.


अशीच एक गोलमटोल - नीतू सिंघ. दो कलिया मधला चेहरा आणि अगदी काल परवाचा चेहरा बघा. वयाच्या सुरकुत्या  सोडा पण आनंदी, ग्रेसफुल चेहरा आहे तिचा. ती भिकारिण, गरीब घरातली वगैरे  वाटूच  शकत  नाही. सुखवस्तू घरातली  कुठलही टेन्शन नसलेली, आनंद देणारी, आनंदात  जगणारी  अशीच  दिसायची  ती.  तिच्याबद्दल कुठलीही अफवा उठल्याचं माझ्या ऐकीवात नाही. पडद्यावरचा तिचा वावर प्रसन्न होता. दिवार, याराना, धरम वीर, अमर अकबर, द ग्रेट ग्याम्ब्लर मधे ती आवडून गेली हे खरं.


मुख्यं अभिनेत्री नसलेली तरीही आवडलेली एक अभिनेत्री म्हणजे हेलन. हेलन रिचर्डसन, सलमानची सावत्र आई. थोडी काणी दिसणारी माणसं मस्त दिसतात. उदा. गौतम राजाध्यक्ष, अमिताभ … (सन्माननीय अपवाद आशा पारेख यांचा).  नृत्यं अंगात असावं लागतं, तो ह्रिदम मुळात हवा. हेलनकडे तो मुबलक होता. गोड चेहरा, मधाळ  हसणं  आणि  नाचताना देहभान हरपून नाचणं. मुंगडा मुंगडा असो नाहीतर अजून कुठलं कॅब्रे असो ती कधी चीप वाटली नाही. त्याचं कारण  तिच  अंग  प्रत्यंग  बघायला  वेळ  होताच  कुठे  इतकी  ती  विजेसारखी हलायची.  नुसते  आकार  उकार  बघायचे तर हल्लीचे आयटम  सॉंग  आहेत  पण  भन्नाट  डान्स  बघायचा  असेल  तर  मात्र  हेलनला स्पर्धाच नाही. गुमनाम मधे  गम  छोडके  मनाओ  रंगरेली, कारवा  मधे  पिया  तू अब तो आ जा, तिसरी  मंझील  मधे  शम्मी  वर जीव टाकणारी (शम्मी सारख्या  ह्रिदम  मास्टरनी  हेलन  सोडून  आशा  पारेख  निवडावी ? अर्थात  हेलनला  कोण  हिरोईन करणार!!!) दारासिंग बरोबर ती  चमकली  हिरोईन  म्हणून  पण  सगळे  बी  ग्रेड  चित्रपट.  आशा  भोसलेच्या आवाजात जे होतं ते हेलननी नृत्यात  दाखवलं आणि हेलनच्या अंगात जे होतं  ते  आशाबाईंनी  गळ्यातून  काढलं.  जो पर्यंत मिरवणुकी, वराती निघतील, गणेशोत्सव होतील तो पर्यंत ही तीन गाणी रहाणारच - भोली सुरत (सी.रामचंद्र), नाच रे मोरा (पु.लं.) आणि मुंगडा मुंगडा (राजेश रोशन) (दोन मराठी आहेत तिघातले :)). तिन्ही अगदी भिन्नं पण तीनही अजरामर आहेत. अजूनही मला मुंगडा लागलं की पिवळ्या चेक्सचा ब्लाउज आणि कोळी साडीतली,  मांडीवर  बाटली  टेकवून अमजदकडे सहेतूक बघणारी हेलन डोळ्यापुढे उभी रहाते, ती काय आवडल्याशिवाय का?

प्रसन्न, सात्विक, गोड अशी विशेषणं लावावीत असा एक सोज्वळ खानदानी चेहरा म्हणजे दुर्गा खोटे. बँ.लाडांची  ही लाडाकोडात वाढलेली घरंदाज मुलगी  खोट्यांच  घर सावरण्यासाठी  चित्रपटात  आली. अयोध्येचा राजा त्यांचा बहुतेक पहिला चित्रपट.  त्यांचे  फार  सिनेमे नाही पाहिलेले मी पण ज्यात त्या होत्या त्यात त्या  आवडल्या.  बावर्ची मधली उषाकिरण ची मोठी जाऊ, मुघल-ए-आझम  मधली जोधाबाई आणि बॉबी मधली मि. ब्रीगांझा. खळ्या काय शर्मिला, प्रिती झिंटा, गुल पनागला पण आहेत, दुर्गाबाईंच्या खळ्या मला लोभस आणि  प्रेमळ  वाटत  आल्या  आहेत.  बॉबीमधे  डिम्पलचा हात धरून अपमानित होऊन जाणा-या, ऋषी  कपूर  कडे  कौतुकानी पहाणा-या. वात्सल्य चेह-यावरून सांडतं नुसतं दुर्गाबाईंच्या…  बावर्चीमधे किती प्रेमळ दिसल्यात त्या. सास-यापुढे अदब, धाकट्या  जावेवरचं  प्रेम…  राजेश खन्नाकडे ज्या मायेने त्या बघतात तेंव्हा  वाटतं  अभिनय नाहीच…हा त्यांचा स्वभावच आहे. (त्यांचं  आत्मचरित्र  आहे, शोधून  वाचायचं  राहिलंय खरं). मुलगा  हरेन  खोटे  अकाली  गेल्यावर  सुनेचं  (आपल्या  विजया  मेहता)  लग्नं  लावून  देणारी  प्रेमळ माउली ती. त्यामुळे तर मला त्या जास्तच सुंदर दिसतात, आवडतात. एक  प्रेमळ  आजी  दिसते  मला त्यांच्यात. 

(पहिला भाग वाचून काहींना सुंदरता म्हणजे फक्तं चेह-यातली  सुंदरता  वाटली  असण्याची  शक्यता  आहे. पण गुणांनी, कर्तुत्वाने ही स्त्री सुंदर दिसते असं माझं ठाम मत आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात, रूपाने कर्तुत्वाने आणि गुणांनी मला सुंदर दिसलेल्या ललना वाचायला.) 

--जयंत विद्वांस


Tuesday 23 July 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (१)…अभिनेत्र्या १ (हिंदी)

अभिनेत्र्या (हिंदी) …. 
एखाद्याला कुठल्या बाईमधे काय सुंदर वाटेल, काय आवडेल हे सांगता येत नाही. ते प्रत्येकाच्या स्वभावावर, आवडी निवडी वर आणि कदाचित वयावरही अवलंबून आहे असं आपलं माझं मत आहे. गधीपे दिल आया तो परी क्या चीज है असं म्हणतातच की. पण प्रेमापोटी आवडणं आणि आवडल्यामुळे प्रेम बसणं या दोन भिन्नं गोष्टी आहेत. साधारणत: सौंदर्य हे खरंतर चेहरा पाहूनच  ठरवलं जातं त्यात परत रंग, उंची, केसांची लांबी, आकार उकार हे इतर प्रकार लागतातच मदतीला. एकच बाई आक्खी आवडल्यामुळे दुस-या बाईकडे निर्विकार नजरेने पहाणारा पुरुष एकतर भलताच प्रामाणिक असला पाहिजे  किंवा लबाड असला पाहिजे. जकात नाक्यावर कामाला असल्यासारखे एकही गाडी चुकवत नाही बघायला. असो!

मला तशा सगळ्याच नट्या आवडतात, आवडल्या असं नाही, काही अजिबात न आवडणा-या पण आहेत उदा.तनुजा,  प्रिया राजवंश (ती फक्तं चेतन आनंदलाच आवडली) आशा पारेख, झरिना वहाब, पद्मिनी कोल्हापुरे, रीना रॉय. का आवडत नाहीत हे सांगता येत नाही पण नाही आवडत. अर्थात त्यामुळे त्यांचं अडलेलं नाही आणि माझंही नाही. मुळात मला एकच नटी संपूर्ण नाही आवडली कधी, सन्माननीय अपवाद मधुबाला (तिच्यावर वेगळं लिहावं लागेल, इथे सगळ्यांबरोबर उल्लेख करावा असं प्रकरण नव्हे ते. मधुबालानी अमुक तमुक चित्रपटात भिकार अभिनय केला अस विधान तुम्ही कधी वाचलंय का? शक्यं नाही, कारण मधुबालाचा अभिनय बघायला कोणी कधी गेलेलंच नाहीये.), पण प्रत्येकीतलं काही ना काही तरी वेगवेगळ्या कारणाकरता आवडलं.

हाय चिक बोन्स म्हणे सौंदर्याचं एक परिमाण आहे. नूतन, वैजयंतीमाला, वहिदा रहेमान, सीमा देव यांना होतं ते लागू पण सिमी गरेवालला मात्रं नाही त्याला अर्थात तीच कारणीभूत आहे, चेह-याकडे लक्ष जातच नाही त्याला काय करणार? मुमताज, माला सिन्हा, बिंदू, जयश्री टी, अरुणा इराणी  यांचा चेहरा, अभिनय या गोष्टी क्वचितच पाह्यला गेल्या.  खिलौना, आप की कसम मधली मुमताज, आंखे, उजाला मधली माला सिन्हा, इत्तेफाक, इम्तिहान मधली बिंदू मात्रं अभिनयसंपन्न देखण्या दिसल्या,  आवडल्या पण. सुलक्षणा पंडित, तिचीच लहान बहिण विजयता, योगिता बाली, काजल किरण (मूळ नाव सुनिता कुलकर्णी चक्कं) या सगळ्या सोनाक्षी सिन्हाच्या मावश्या. सगळ कसं गोलमटोल नुसतं. राजेंद्रकुमार, मनोजकुमार, भारत भूषण यांना प्रतिस्पर्धीच ह्या खरतरं. 

राखी, फरीदा जलाल, लीना चंदावरकर गोलमटोल होत्या पण दिसायलाही गोड होत्या. वर्षानुवर्षं मी बघतोय राखी आहे तेवढीच जाड आहे. रामलखन, करण अर्जुन, बाजीगर मधेपण ती प्रसन्न दिसते. राखीचं बोबड बोलणं मात्रं सहन करायला हवं. आराधना मधली फरीदा जलाल जरा बारीक असती तर? सुनो सुनो कसमसे गाण्यात तर ती लैच गोड दिसलीये आणि नही मै नही देख सकता मधेपण. दूरदर्शन वरच्या देख भाई देख मधेपण ती मला आवडली होती. ती आणि जुही चावला मला फक्त सेन्स ऑफ ह्यूमर, टायमिंग याकरताच इतक्या आवडतात की विचारू नका. जुहीचा इनोसन्स आणि गोड चेहरा हे एक्स्ट्रा. परेश रावलची मिस इंडिया बायको स्वरूप संपत पण. ये जो ही जिंदगी मध्ये तिनी काय धमाल उडवली होती. परेश रावल भेटल्यावर अभिनय म्हणजे काय हे समजल्यानं तिनी काम करण बंद केल असावं. अरे हो, शुभा खोटे राहिल्याच की. त्या आवडायचं कारण पण हेच गोड चेहरा, भन्नाट सेन्स ऑफ ह्यूमर आणि टायमिंग. 


कणेकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे मोहक पण गुळगुळीत साबणाच्या वड्या पण बघितल्या. पूनम धिल्लन, टीना मुनिम, सारिका अशी वेगवेगळी नावं असलेल्या. क्वचित आवडल्याही पण अगदी जीव जडावा असं मात्र काहीच नव्हतं. मौशुमी चटर्जीचा हसताना डबल दात दिसायचा त्यामुळे फक्तं तेवढ्यापुरतीच बरी वाटायची. गालाला खळ्या पाडत लाडालाडात बोलणारी शर्मिला टागोर मात्रं नाही फार आवडली. हेमामालिनी मात्रं ग्रेसफूल, आवडायचीच ती. फक्तं वाक्यं संपतानाचा शेवटचा तो विचित्रं अक्सेंट त मात्रं ऐकायचा नाही, दुर्लक्ष करायचं.   

तेरा मेरा प्यार अमर गाण्यात अंबाडा घातलेली साधना जेवढी आवडली तेवढी इतर ठिकाणी नाही आवडली. अत्यंत लोभस चेहरा हा निकष लावून कोण आवडलं असेल तर मात्रं तदबीर से बिगडी हुई मधली गीता बाली आणि सरपर टोपी लाल हाथमे मधली अमिता आणि फक्तं (हो फक्तच) लोभस चेह-याकरता ममता कुलकर्णीही.

अजून मोठी रांग आहे मागे त्यामुळे राहिलेल्या पुढच्या भागात.


--जयंत विद्वांस

Friday 19 July 2013

विठू पंढरीला आलो.....



विठू पंढरीला आलो.....

विठू पंढरीला आलो
पालखीच्या संगे
टाळ चिपळ्या हाती
मुखी नाम तुझे

अमृतासमान आहे
तुझी चंद्रभागा
गर्दी आहे वाळवंटी
धुण्या पाप सारे

रूप काळे पाषाणाचे
परी मउ अंतरी
ओढ मनी माझ्या
इतुकेच् सांगणे

मी लहान, तुझी लीला
कशी काय वर्णू
बाप रखमा देवीवरू
सारी तुझी लेकरे

जयंत विद्वांस