Monday 9 July 2018

सुटका..

सुटका... 

हिरव्यागार डोंगराच्या कुशीत लपलेल्या त्या छोट्याश्या गावात जन्मं आणि मरण याशिवाय फार दखल घेण्याजोगी गोष्टं फार कधी घडायचीच नाही. गावात माणसं रहात नव्हती असं नाही पण सगळी पोटासाठी पहाटे घराबाहेर पडायची ती संध्याकाळ झाल्याशिवाय घरी यायची नाहीत. खंडाळा सोडला की दोन चार बोगदे गेल्यावर गाडी शब्दशः क्षणभराकरता एके ठिकाणी थांबायची. माणसं उतरायची तिथे. रेल्वेलाईनच्याकडेने एक पायवाट फुटायची ती काही अंतर समांतर जाऊन डोंगराला वळसा घालून सरळ दरीत उतरल्यासारखी दिसायची. उतरलेली माणसं त्या पायवाटेवरून गावात जायची. वरून वस्ती दिसायची नाही. लपून बसल्यासारखी सगळी घरं डोंगराच्या मागे होती. प्रत्येकाची शेती होती पण उत्पन्न फार नव्हतं, पोटापुरतं धान्यं निघायचं. मग रानमेवा द्रोणात भरून विकायचं काम बायका, मुली करायच्या. बरीचशी माणसं रेल्वेत बिगारी होती. सगळी कष्टाची काम तीच माणसं करायची, मग ते रूळ चेक करणं असो, गुड्सच्या गाड्यांवर माल भरणे असो ही सगळी कामं करायला बाप्ये जायचे वाडीतले. त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी आणि परत आणल्यावर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबत असे. पावसाळ्याचे चार महिने मात्रं जिकीरीचे असायचे. एकतर संततधार, निसरड्या वाटा, शेतीची कामं वगैरे प्रकारात पार घाम निघायचा त्यांचा. 

अर्थात ती सगळी माणसं काटक होती. सततच्या कष्टामुळे पोट सुटलेला माणूस दिसणं अवघड, सगळे कसे खराट्याच्या काडीसारखे बारीक आणि ताठ. तिथे म्हातारी माणसं मरायला टेकली की मगच घरकोंबडी व्हायची. नाहीतर रुळाच्या कडेला बसून घरच्या माणसांची वाट बघत विड्या पीत, तंबाखू मळत, वाढलेल्या दाढ्या खाजवत बसायची आणि मग आलेल्या माणसाच्या सोबतीने घराकडे जायची. सडा टाकल्यावर जसे पाण्याचे थेंब अंगणात पडतात आणि काही दूरवर पण कुठेही पडतात तशी त्या इवल्याश्या गावातल्या वस्ती विखुरलेली होती. अमाप जागेचा त्यांना काहीही उपयोग नव्हता. कुणी अतिक्रमण करत नव्हतं, भांडण करत नव्हतं, दावे लावत नव्हतं. सगळ्यांचीच परिस्थिती एकसारखीच होती. अंधार पडल्यावर त्या पायवाटेवर स्वतःहून कुणी चालत येईल अशी अजिबात शक्यता नव्हती. आलाच तरी घाबरून तो माणूस दरीत गेला असता पाय घसरून. त्यामुळे तसं गाव सुखी होतं. एरवी दिवसभर घरात लहान रांगती मुलं, कमरेत वाकलेल्या म्हाता-या, बाळंतीण बायका किंवा आजाराने अंथरूण धरलेलं कुणीतरी असंच असायचं. बाकी सगळी गडबड रात्रं होत आली की चालू व्हायची आणि लगेच संपायचीही. लाईट नव्हतेच, सकाळी जायचं असायचं. त्यामुळे जेवलं की बिड्या ओढणे, तंबाखू खाणे आणि बायकांना मिसरी लावणे एवढेच उद्योग असायचे, या किरकोळ व्यसनांनंतर त्यांची चैन संपायची आणि गाव कुणीतरी दम दिल्यासारखं शांत झोपून जायचं. 

शनिवारी रात्री कर्जत किंवा लोणावळ्याहून येताना बरेचजण गुत्त्यावर जाऊन पैसे असतील तेवढी पिऊनच घरी यायचे. पावसाळयात मग पडझड व्हायचीच, कुणी न कुणी नशेत घसरून पडायचं. मग गावात गावठी उपचार केले जायचे आणि माणूस बरा व्हायचा, अगदीच हाड मोडलं तर लोणावळा, मग घरातल्या बाईच्या अंगावरचा एखादा दागिना मोडला जायचा. कमीत कमी गरजा असणारी माणसं सगळी खरंतर पण शहरात गेले की ती कफल्लक व्हायची. त्यामुळे ब-याच वेळा माणसं दुखणी अंगावरच काढायची. रम्या सुर्वे तर पार मेटाकुटीला आला होता खर्च करून. सहा महिन्यामागे त्याचा बाप पाय घसरून रुळावर पडला आणि घोट्याजवळ हाड मोडलं होतं. अज्ञानात सुख असतं, इतकी वर्ष माहित नव्हतं तोवर व्यवस्थित चालू होतं. तपासण्या झाल्यावर त्याला शुगर निघाली. त्यामुळे जखम काही लवकर बरी होईना. एकतर क्षणभर थांबणा-या गाडीत चढायचं त्यात परत लोणावळ्याला उतरून बाहेर यायला जीव जायचा, तिथून दवाखान्यात रिक्षा आणि परत येताना हाच सगळा व्याप. पण नाईलाज होता. म्हातारा तसाही पार ऐंशीला टेकला होता पण टेकीला आला तरी टिकून होता. तसा तो ही रेल्वेतून रिटायर्ड होऊन पेन्शन खात होता इतकी वर्ष. पण गेल्या सहा महिन्यात साठवलेली सगळी पेन्शन संपली होती. 

आज मात्रं दोघे हतबल झाले होते. हाड जुळत आलं होतं पण दुस-या पायाला झालेली जखम दिवसेंदिवस चिघळतच चालली होती. पाण्याने गच्च भरलेल्या पॉलीथीन पिशवीसारखा पाय बदबदला होता नुसता. गँगरीन झालं होतं, पाय कापावा लागणार होता घोट्यापासून. दोन दिवसांनी येतो म्हणून दोघं निघाले. म्हाता-याची अवस्था रम्याला बघवेना. दोघेही स्टेशनवर येईपर्यंत शांत होते. एक्स्प्रेसचा ड्रायव्हर ओळखीचा होता त्यामुळे दोघे इंजिनातच बसले. विचारपूस झाली पण शेवटी ज्याचं त्यालाच. मिनिटभर गाडी त्याने जास्ती थांबवली. बाहेर पाऊस तुफान होता. अंगावर फाटके रेनकोट घालून दोघंही चालू लागले. आता पाय अजूनच रग लागल्यासारखा झाला होता. पायवाटेच्या पहिल्याच वळणाला म्हातारा झाडाच्या आडोशाला थांबला. थोड्या अंतरावर रेल्वेची एक पडीक भंगार लोखंडी केबिन होती. तिथे गेलो तर भिजणार नाही म्हणून रम्याने त्याला कसंबसं तिथे आणलं. पाच मिनिटांच्या अंतराला पंधरा मिनिटं लागली. रम्या अजूनच काळजीत पडला. म्हातारा तापाने फणफणला होता तेवढ्यात. घरी न्यायचं कसं आणि परत आणायचं कसं दोन दिवसांनी हा यक्ष प्रश्नं होता त्याच्यापुढे. वाहन नाही एकतर त्यात पाऊस. रम्याने हात कोरडे करत दोन बिड्या पेटवल्या, एक म्हाता-याला दिली, एक आपण ओढायला सुरवात केली. 

'टैम काय झाला रे?' 
'सात वाजलेत. दम धर. पाऊस थांबल, तोवर सांजच्या गाडीला कुणी ना कुणी येईलच, तुला उचलून न्यायाला हवं, इथे हाय बघ एक खुर्ची, त्यात बसवून नेतो'. 
'ते डागदर काय का म्हणना, म्यां काय यायचो नाय परत तिकडे. घरीच मरतो. किती जगू अजून आणि पैश्ये कुटून आणशील'. 
'ते बघतो मी. ते पाय कापावा लागलंच नायतर अख्खा पाय सडल म्हन्लाय त्यो. घोटाभर गेला तर काठी घेऊन चालशीला तरी, गुडघ्यात कापला तर काय करशील? परवाच्याला पहाटच निघू म्हंजी निवांत आलो तरी एक्स्प्रेस घावतीये बघ. आजचा शिंदे ड्रायव्हर आहे परवा सकाळी. थांबवितोय म्हन्लाय जास्ती वेळ'. 
'तू काय बी म्हन, म्यां काय यायचा नाय. थोट्या पायाने घरात पडून -हावू का? आणि करनार कोन माझं. आपल्या दोगांना बी बायकू नाही, दोगी गेल्या मागच. तू कामावर जाशील का माझं करशील? तुला प्वार असतं तर काय तरी झालं असतं. त्ये जाव दे, घरीच मरन मी त्यापेक्षा, चल जावू हळूहळू. पाऊस काय थांबनारा नाय ह्यो. 

रम्याला काय सुचेना. दोघंही शांत बसून राहिले. अंधार आणि पाऊस, दोन्ही वाढतच राहिले. अंधारात माणसं जात होती गावाकडे पण केबिनला कुणी बघितलं नाही, तशीही ती थोडीशी आतल्या अंगाला होती. घड्याळात नऊ बघून रम्याचे धाबे दणाणले. आपल्याला झोप लागली हे त्याला मान्यं होईना. म्हातारा  पार भट्टीसारखा गरम झाला होता. आता कुणी येईल याची खात्री नव्हती. काय करावं त्याला काही सुचेना. म्हातारा झोपेत बरळत होता. रात्रं तिथे काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आता. बिडी बंडल पण सादळलं होतं. तिथेच पडलेली जुनी ताडपत्री त्याने म्हाता-याचा अंगावर घातली. बिड्या ओढत रम्या अंधारात बघत बसला. तो ही आता पंचावन्नच्या आसपास असेल. सगळा गतकाळ डोळ्यापुढून झरझर जात राहिला. त्याची आई आणि बायको सहा महिन्यांच्या अंतराने गेल्या त्यालाही आता चार वर्ष होऊन गेली होती. त्याला पोरंबाळं काहीच नव्हती. कधी एकदा सकाळ होतीये असं त्याला झालं होतं.सकाळ झाल्यावर प्रॉब्लेम्स सुटणार नव्हते पण उजेड पडणार होता, माणसं दिसणार होती. त्याच्यासाठी ते ही खूप आशादायक होतं. तो ही रेल्वेत होता. रिटायर व्हावं आणि बापाची सेवा करावी जमेल तेवढी हे त्याने डॉक्टरकडे असतानाच मनाशी ठरवलं होतं. त्याला परत झोप लागली. सहाच्या सुमारास पावलं वाजली आणि तो खडबडून जागा झाला. केबिनच्या बाहेर येत त्याने चाहूल घेतली, सगळी ओळखीचीच होती. बाप्ये माणसं पटापट धावली आतमधे. 

म्हातारा रात्रीच कधीतरी थंड पडला होता. मग एकंच हल्लकल्लोळ झाला. जो तो जमेल तेवढं रडू लागला आणि हळूहळू शांत झाला. मग आजारपण, अडचणी यांचा पाढा वाचला गेला. शेवटी त्याला गावात न्यायचं ठरलं, नशिबाने पाऊस थांबला होता. ताडपत्रीत गुंडाळून त्याला न्यायचं ठरलं. लोक आळीपाळीने ओझं उचलत होते आणि रम्या मागे मागे चालत राहिला. गावात परत एकदा सगळा सोपस्कार झाला रडण्याचा आणि विचारपूस करण्याचा. संध्याकाळपर्यंत सगळं पार पडलं. परत येताना खरंतर रम्याला हायसं वाटत होतं. पाय कापायला बाप आला नसता हे ठाम माहित होतं त्याला. तो सुटला याचं खरंतर त्याला खूप समाधान वाटलं होतं पण तसं बोलणं जनरीतीला धरून नव्हतं. घरी आल्यावर तो मग पहाट होईस्तोवर एकटाच हमसाहमशी रडत बसला आणि ग्लानी आल्यासारखा झोपी गेला. जग आल्यावर त्याने बाहेर डोकावलं तर अगदी सोनसळी प्रकाश पडला होता, पाऊस थांबला होता. त्याला खूप प्रसन्नं वाटलं खरंतर आणि लगेच तो ओशाळलाही पण खरंच होतं ते. कितीही माया असली तरी पैसे, ने आण त्याला शक्यं नव्हतं अर्थात त्याने ते पार पाडलं असतंच उरापोटावरून पण काहीवेळा देव करतो ते ब-यासाठी असं म्हणायचं. झेपेल एवढं दुःखं देतो, झेपेनासं झालं, त्याला दया आली की सुटका करतो. 

सुटका, गेलेल्या माणसाची तर होतेच पण पाठीमागे राहिलेल्या माणसाची पण होते, हेच खरं. 

जयंत विद्वांस

Wednesday 4 July 2018

''चारित्र्य ड्रायक्लिनर्स फिल्म्स लि.'


''चारित्र्य ड्रायक्लिनर्स फिल्म्स लि.''...   


'राज्या, लेका बोर्ड तर मस्तं जमलाय. खरंतर पांढ-या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहावं असं माझं मत होतं पण तुझं नेहमीच जगावेगळं. काळ्या बोर्डवर पांढ-या अक्षरात लिहिण्यात काय लॉजिक आहे तुझं?'
'विनू, कसं आहे माहितीये का तुला, एवढ्या सगळ्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर पांढरा रंग कसा झळकतोय बघ. आपण नाहीतरी तेच केलंय ना. सगळा काळा रंग ती माणसं घेऊन येणार मग आपलं काँट्रीब्युशन काय सांग त्यात. आपण काय करायचं, पॅलेट घ्यायचं, त्यात आपल्याला हवा तेवढाच काळा रंग किंवा डाग घ्यायचा. विनोदाचा साबण, सहानुभूतीची जेल, कौटुंबिक केमिकल टाकून तो धुवायचा. कपडयावर डाग होता हे आपण दाखवलंच त्यामुळे खोटेपणाचा आरोप नाही. वरतून डाग कसा नाईलाजाने पडला हे ठसवलं की झालं'. 
'आयला, राज्या, तू लेका चेह-याने गरीब आहे फक्तं. पटकथा घट्ट लिहितोस त्यामुळे जमतं तुला सगळं नीट'. 
'अरे, तसाही निखळ विनोद लोकांना आवडतो कारण तो दुर्मिळ आहे. कितीही वाईट विचार असेल, दुर्गुण असेल त्याला विनोदाचं अस्तर लावायचं म्हणजे पब्लिक हसत राहतं, दुर्गुण कोण बघतंय आता. तू थेटरात जाऊन पाहिलास का? तीनशे प्लस म्हटल्यावर लोक काय मनापासून हसलेत. असूया रे, लोक सिनेमा का बघतात सांग? जे आपल्याला करता येणं अशक्यं आहे, अर्धवट स्वप्नं आहेत ती कुणीतरी पडद्यावर पूर्ण करतंय ते बघायला पैसे मोजतात. प्रत्येकाला वाटतं चिकणी पोरगी पटवावी, गुंडाना दे घपाघप धुवावं, विनाकष्ट भरपूर पैसे मिळवावेत पण हे सगळं करण्यासाठी लागणारं धैर्य नसतं आणि त्याकरता आऊट ऑफ द वे गेलो तर परिणामांची जाणीव पण असते, त्यापेक्षा बघायला पैसे मोजलेले परवडतं'. 
'तू एवढा विचार करतोस? वाटत नाही'. 
'अरे, मी ही आधी सर्वसाधारण माणूस होतोच की. तुला मानसिकता सांगतो पब्लिकची, सज्जन, चारित्र्यवान, आदर्श माणसांची चरित्र खपतात? समजा त्यांच्यावर फिल्म निघाली तर लोक जातात? नाही जात. कारण ज्यात काही भन्नाट घडत नाही ते लोकांना आवडत नाही. आचरणात आणणं त्यांना जमणारही नाही. हल्लीच्या काळात ऊगाच मनाला टोचणी वगैरे लागली तर? त्यापेक्षा वाईट जास्ती खपतं, बघून मजा घ्यायचीये, तसं वागायची डेअरिंग कुठे आहे? आणि एक गंमत, एखाद्या माणसाला सतत चारी बाजूने लोक बोलत राहिले की त्याला आपोआप सहानुभूती मिळते. आपण तेच एनकॅश केलंय. आपण म्हटलंय का तो इनोसंट आहे? पण तो तसा असण्याची शक्यता आहे हे इतर पात्रं सुचवतात'. 
'ए बाबा, तुझ्याकडून एवढं बौद्धिक नको आता. फोन लावून गल्ला विचार. सहावा दिवस आजचा, आयला आधीच्या सिनेमात पण एवढा गल्ला पाहिला नव्हता आपण पहिल्या दिवशी. काही पब्लिक शिव्या देतंय राव पण आपल्याला. आपल्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती वगैरे.'
'छोड यार, पैसा हवा शेवटी. नावं ठेवणा-यांपेक्षा बघणारे जास्ती आहेत. मिडिया आहे, कुणाचं पोरगं आज बाबा म्हटलं, हागलं याची पण ब्रेकिंग न्यूज असते. 'बदनामही सही नाम तो हुआ' हा आजचा फंडा आहे. हाच आठवडा आहे कमवायचा. नंतर चॅनलवर येईल ते छनछनराम वेगळे, कंटाळणार बघ मग लोक. आपल्याला दुस-या सिनेमाची तयारी करायला हवी आता'. 

'एवढ्यात? तुझ्या डोक्यात आहे का काही थीम'?
'डोक्यात? कालच फोन आलेत, एका निष्पाप, निरागस माणसावर सिनेमा करायचाय. सतत 'प्रेम' वाटणारा माणूस आहे. तीनशे प्लसचा आकडा असू शकेल त्याच्याकडेपण. अतिशय ह्यूमन माणूस आहे. अरे प्राणिमात्रसुद्धा त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्यावर होणारे सततचे आरोप ऐकून एका काळविटाने आत्महत्या करून स्वतःचा काळ ओढवून घेतला. चुकून गाडी चढली फुटपाथवर त्याला काय करेल सांग तो, बरं तो चालवत होता असा पुरावा नाही, असला तरी दाखवायचा नाही. आपल्यासारखंच रे, जेवढं सोयीस्कर आहे तेच दाखवायचं पब्लिकला. मला सांग, आपण वाईट का म्हणा कुणाला. समस्त तरुणी आणि आता काकवा वयाला पोचलेल्या त्याच्या वयाच्या बायकांनाही तो क्यूट वाटतो, त्याच्यावर भाळतात मग काय फक्तं आपण मक्ता घेतलाय का संस्कारांचा. त्या तुकाराम ओंबाळेंवर काढ फिल्म, तीन शो पण नाही चालणार'. 
'ए बाबा, तुझ्या डोक्यात आहे की काय तो सिनेमा काढायचं? सगळा गल्ला घालवशील आणि फक्तं पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीला दाखवतील चॅनल्सवरून, बाकी काय शष्प नाही मिळणार त्यात'. 
'छे रे, पागल कुत्तेने काटा है क्या? हे फक्तं मुलाखतीत, कॅमेरासमोर बोलायचं असतं, करायचं नसतं. बाय द वे, अजून दोन फोन आलेत'. 
'माय माय माय, तू तो 'हिरा' है मेरा! कुणाचे आलेत'. 
'एक हिरे विकणारा आणि एक दारू विकणारा'. 
'मग? त्यांच्यावर काय काढणार सिनेमा'?
'बघशील, पटकथा जवळपास सेम असेल. विनोद, क्लीन चित्रपट, बरी गाणी, इमोशन हा फॉर्म्युला आपल्याला गवसलाय, आधी ते कसे डाग बाळगून आहेत ते दाखवायचं, मग कुणाचंही नाव न घेता टीका करायची, पब्लिकला कन्फ्युज केलं की झालं'. 
'अरे पण फार काळ चालणार नाही एकंच फॉर्म्युला'. 
'पागल आहेस. मलाही माहितीये, कधी थांबायचं हे कळलं की झालं, नासिर हुसेन, मनमोहन देसाई एकाच थीमवर काढायचे की नाही सिनेमे, पॅटर्न ठरलेले असायचे, महेश कोठारे घे, वर्षानुवर्षे एकंच पॅटर्न. आपण एवढे दोन सिनेमे केले की थांबूयात. तू कशी मला संधी दिलीस आणि स्वतः बंद झालास, नंतर आपण दोघं मिळून ते करूयात. नवीन माणूस धरू, बॅनर आपला. तो माणूस पण ऋणात रहातो, आपल्याला पैसे आणि मोठेपणा मिळतो. मागचं कोण लक्षात ठेवत नाही इथे, पब्लिक मेमरी इज शॉर्ट. आणि आपल्याकडे 'डाग अच्छे है' म्हणणारे आणि ते अभिमानाने मिरवणारे लोक काय दुर्मिळ आहेत का? एक धुंडो, हजार मिलेंगे! विनू, अच्छाई की हद होती है, बुराई की नहीं!.  

'अरे पण ज्यांनी या व्यक्तींमुळे भोगलंय त्यांचे पण फोन आले होते रे मला, तळतळून बोलत होते'. 
'आपण ऐकून घ्यायचं फक्तं. मत नसतं व्यक्तं करायचं आणि अजून एक आयडिया आहे. नफ्यातला काही हिस्सा दान करायचा काही वर्षांनी, पब्लिक लगेच चांगलं म्हणतंय बघ आपल्याला, प्लस लाभार्थी म्हणजे आपली भलामण करणारे लोक वाढतात ते वेगळंच. आणि झूठ असतं रे सिनेमा बघून पब्लिक बिघडतं हे, 'माफीचा साक्षीदार', 'पुरुष' बघताना लोकं नानाच्या एंट्रीला टाळ्या वाजवायचे यात दिग्दर्शकाची किंवा नानाची काय चूक आहे सांग? पब्लिकची बुद्धी आहे तसेच चित्रपट ते बघणार आणि आवडणार त्यांना. खाली काय सबटायटल टाकायचं का दारू, तंबाखूचं टाकतात तसं, 'हा व्हिलन आहे, याचा द्वेष करा' असं'. यांच्या घरी काय संस्कार झाले नसतील का? पण समाजच असा झालाय, वाईटाची ओढ जास्ती आहे प्रत्येकाला. हिरो कोण, आदर्श कोण, वाईट काय हे काय समजत नाहीये का? समजतं पण इन्स्टंट यश हवंय, वासना, अधिकार, सत्ता, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी गोचीडासारख्या चिकटल्यात या पिढीला. आपण काय मक्ता नाही घेतलेला. छान पैसे कमावू. बाहेरचं नागरिकत्व घेऊ, मुलंबाळं तिकडेच रहातील. वय झालं की 'फाळके पुरस्कार' स्वीकारायला काठी टेकत येऊ. नाहीच मिळालं ते तर गेलाबाजार 'पद्मश्री' सेफ आहेच, कुणालाही मिळतं. पैसे देऊन दोन चार चॅनल्सवर 'लाईफ टाईम घेऊ', हाय काय नाय काय'.  
'धन्यं आहेस राजा तू. एवढा विचार मी पण नव्हता केला कधी'. 
'थांब, फोन आलाय'.  

'हॅलो, यस स्पिकिंग. फिल्म बनवायचीये? थ्री पर्सेंट इन प्रॉफिट, नॉट ऑन कलेक्शन, देऊ. माहिती मेल करा, तरी चार वर्ष लागतील, दोन सिनेमे ऑलरेडी फ्लोअरवर घेतोय लवकरच. साधारण काय कॅरॅक्टर आहे. सांगा, लाजू नका, रेकॉर्ड नाहीये करत कॉल'. 
'अरे कट काय केलास ऐकता ऐकता?'. 
'दोन खून आणि फक्तं एकशे ऐंशी कोटीचा बँक घोटाळा. पागल समझा है क्या! वी आर इन अप्पर सर्कल नाऊ! या असल्या लो बजेट थीमसाठी नवा डायरेक्टर शोधायला घे आता तू. 'बायोपिक फिल्म्स लिमिटेड', हाय काय आणि नाय काय'. 
 
जयंत विद्वांस 




Thursday 28 June 2018

चकवा...


चकवा...

अभद्र कथा लिहिल्यावर ब-याच जणांनी भुताखेताचे अनुभव आलेत का कधी असं विचारलं होतं. तसे अनुभव कधीच आले नाहीत. कोकण डोकावत असलं काही कथांतून तरी मी काही फार कोकणात राहिलेलो नाही किंवा तिथले असले अनुभवही नाहीत. सहसा हे अनुभव ऐकीव असतात. ते सांगणा-या माणसाला दुस-या कुणीतरी सांगितलेले असतात. अर्थात कोकणात मी स्वतः पाहिलंय असं सांगणारी पाचपन्नास माणसं सहज मिळतील. 'चकवा' नावाचा एक प्रकार असतो. तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी परत तिथेच येता असा प्रकार असतो त्यात अर्थात त्याचे अनेक किस्से आहेत ऐकलेले पण अनुभवलेला एकंच आहे. अर्थात त्याला चकवा म्हणायचं का हे माहित नाही. आता चिंचवड, आकुर्डी कायच्याकाय बदलून गेलं. मी सांगतोय गोष्टं ८६/८७ ची.

पिंपरीला आत्या रहायची. काकांना घेऊन तिच्याकडे गेलो होतो. आकुर्डीला अजून एक जण रहायचे त्यांच्याकडे जायचं होतं. त्यांच्याकडे मी एकदा गेलो होतो आधी. सहसा मी रस्ता विसरत नाही. बजाज ऑटोच्या समोरच्या गल्लीतून गेल्यावर मला कसं जायचं ते माहित होतं. आम्ही बसने उतरलो. सहा साडेसहा वाजले असतील. एका गल्लीतून गेलो तर समोर रेल्वेलाईन आली. त्यांच्या घरी जाताना ती लागायची नाही हे कन्फर्म होतं. मागे आलो, अलीकडच्या गल्लीत शिरलो, परत रेल्वेलाईन. असं अजून एकदा झालं. मग रिक्षास्टॅन्डला गेलो. विठ्ठलमंदिराजवळ एवढंच माहित होतं. तो म्हणाला, दोन आहेत, खालचं की वरचं? आता आली का पंचाईत. तोवर अंधार पडलेला. काका म्हणाले, राहू दे, सकाळी येऊ. आम्ही परत पिंपरीला आलो. बसमधे येताना त्यांनी मला चकवा प्रकार काय असतो ते सांगितलं. रिक्षेवाल्यानी आम्हांला नक्कीच गंडवलं असतं आणि फिरवून पैसे काढले असते. आम्ही एका संकटातून वाचल्याचा आनंद झालेला मला.

आम्ही सकाळी परत निघालो बसने, बजाज ऑटोला उतरलो. समोरच्या गल्लीत गेलो. तिथून दहा पंधरा मिनिटात चालत त्यांच्या घरी गेलो. झालं काही नव्हतं, अंधारात मी बस थांबली त्या समोरच्या गल्लीत शिरल्यामुळे खरंतर रेल्वेलाईन आली होती. पलीकडच्या गल्लीत जायच्या ऐवजी दोनदा अजून अलीकडच्या गल्लीत शिरल्यामुळे रेल्वेलाईन आली. तेंव्हा आणि आताही हसू येत असलं तरी सलग तीनवेळा रेल्वेलाईन, अंधार, निर्मनुष्यं रस्ता वगैरे अनुभव थ्रिलिंग होता. अनुभव हे नेहमी ऐकायला थ्रिलिंग असतात, ते जो अनुभवतो त्याची काय फाटलेली असते ते त्याचं त्यालाच माहित. माझ्या सास-यांच्या बाबतीत असं झालं होतं. ष्टोरी ऐकताना लय भारी वाटतं पण आपण स्वतःला त्याजागी बघितलं की घाम सुटतो. गणपती पुळ्याच्या रोडला एका गावात ते पूजा की कायतरी कामाला गेले होते. बरोबर अजून चारपाचजण होते. बाकी माणसं पाच वाजेस्तोवर आपापल्या घरी पण आली. कोकणी माणूस गप्पिष्ट त्यामुळे कुठे गप्पा मारत असतील उभे म्हणून फार फॉलोअप नाही झाला. सात, आठ वाजले तरी पत्ता नाही मग फोन झाले. बाकीची माणसं कधीच घरी आली म्हटल्यावर सासूच्या मनात नाय नाय ते. त्यात तुफ्फान कोकणातला पाऊस. एकटी बाई कुठे जाणार रात्री शोधायला. ज्यांच्या घरी गेले होते, ते म्हणाले आमच्याकडून दुपारीच गेले.

मग माणसं गेली दुस-या दिवशी सकाळी शोधायला. बरं शोधायचं कुठे. निर्मनुष्यं जंगलं जास्ती. दुस-या दिवशी संध्याकाळी चार वाजता एक पोरगी म्हणाली, एक म्हातारबा बसून आहेत तिकडे झाडाखाली. मग ते सापडले आणि घरी आणलं. एसटीच्या रस्त्याला येताना त्यांची पायवाट चुकली आणि ते जंगलात जात राहिले. त्यात मिट्ट काळोख आणि तुफान पाऊस. एका झाडाखाली ते रात्रंभर बसून होते पावसात भिजत. पोटात काहीही नाही. बरं, दुस-या दिवशी काय करावं ते सुचलंच नाही त्यांना. झपाटले गेले असा सगळ्यांचा सूर होता. त्यामुळे ते एकाच जागी रात्रंभर भिजून तसेच बसून होते. घरी आणल्यावर कोकणातले सगळे उपाय करून झाले. पण तेंव्हापासून त्यांची तब्येत ढासळत गेली ती शेवटपर्यंत. त्यांच्या स्वभावात पण बराच फरक पडला. नक्की काय झालं असेल ते त्यांच्या गावच्या झोळाईला माहित.

भुतंखेतं आणि त्यांचे अनेक प्रकार या गोष्टी वाचायला, चघळायला, तिखटमीठ टाकायला सुरस असतात. अनुभवतो तो माणूस हे सगळं विसरत असणार त्यावेळी. मग देवगण आहे की मनुष्यगण, आज अमावस्या की पौर्णिमा वगैरे गोष्टी या फक्तं त्यातून सुटका झाल्यानंतरच्या खमंग चर्चेसाठी असतात. अभद्र लिहिताना ते एक बरं असतं, आपण अनुभवण्याची गरज नाही, ऐकीव माहितीवर किंवा वाईट सुचण्यावर आपल्या कल्पनेचं कलम केलं की जमतंय.

चकवा, वाचायलाच बरा, अनुभव नको रे बाबा.

जयंत विद्वांस



Wednesday 27 June 2018

आदर्श...

एक तिरंदाज सरावासाठी जंगलात जातो. बघतो तर अनेक झाडांवर गोल आणि त्याच्या मध्यात अचूक बाण मारलेले. आश्चर्याने त्याने चौकशी केली तेंव्हा त्याच्यासमोर एका मुलाला आणून उभं केलं गेलं.
'काय रे, कसा काय एवढा अचूक नेम साधतोस?'

'मी आधी बाण मारतो आणि मग त्याच्याभोवती वर्तुळ काढतो'.

तो पोरगा आदर्श आहे आपला. पोस्ट चांगली जमली तरंच टाकायची अन्यथा बाद करायची म्हणजे मग 'नेहमीप्रमाणे अप्रतिम' अश्या कॉमेंट्स येण्याची दाट शक्यता असते.

आधी वर्तुळ काढून मग बाण मारायला जमेल तेंव्हा जमेल, तोपर्यंत....

:P  :P :P

जयंत विद्वांस