Showing posts with label Truth is a shortcut. Show all posts
Showing posts with label Truth is a shortcut. Show all posts

Thursday, 9 June 2016

ट्रूथ इज अ शॉर्टकट... (४)

जयकांत शिक्रे २०११ च्या 'सिंघम'मध्ये म्हणाला 'कुछ भी करनेका लेकिन जयकांत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका' पण जयंत शिक्रे ९२ लाच हे म्हणालाय. मोकळेपणानी कुणी मुलगी (तेंव्हा, आता बायका) बोलली की माझे डोळे लगेच गाभूळल्यासारखे वगैरे होत नाहीत, नो मनोरे, नो ड्रिम्स. एकतर मी स्वत: कुणाशी बोलायला जात नाही आणि माझ्याशी अवगुणांमुळे बोलायला येणा-या कमीच होत्या. आमच्या क्लासला एक गुज्जू आणि अजून एक आमच्याच वर्गातली पण होती. गुज्जू आणि मी जाम धमाल करायचो मागच्या बेंचवर. एकदम भोळसट. ए शम्मे, नीट बस, अंघोळ केलीस का अशी खेचाखेची सतत चालायची. ती दुसरी होती, ती एकदम अलका कुबल, आशा काळे मटेरीअल. डोक्यावर पदर घेऊन घरी नेली तर आईबाप आनंदाश्रू इंट्रप्ट करून 'मला अश्शीच सून हवी होती' असं म्हणून तिला जवळ घेणार आणि मीच नालायक जावई असल्यासारखे माझ्याकडे बघणार असला एकूण ऐवज तो. मी कधीच तिला काही बोललो नाही. तिला आम्ही ससा म्हणायचो. आत्ता पुढे कधीही पडू शकेल अशी चालायची ती. पोरगी छानच होती. गुब-या गालांची, गोरी, सज्जन एकदम. पण असं काही दिसली पोरगी की बसलं प्रेम असं होत नाही (यश चोप्रा काही का दाखवेना). काहीतरी हळूहळू क्लिक होत जातं.

तर ९१ ला मी परत पुण्याला आलो बदलापूरवरून, जानेवारी ९२ ला जाऊन अभ्यास करून टी.वाय.द्यायचं असा प्लान. एस.वाय.चा शेवटचा पेपर होता त्या दिवशी. कुठेही सतत गेलं की किंमत कमी होते म्हणून मी दोन वर्ष तसाही क्वचित गेलो कॉलेजला, परीक्षेला काय सलग गेलो असेन तेवढाच (त्या थापा आणि फी माफीच्या पैशांची गंमत परत कधीतरी). तर येताना शम्मी, हेमा आणि ती बरोबर होत्या ट्रेनला. अंबरनाथला शम्मी म्हणाली, 'प्लाटफॉर्मला थांब, तिरसटासारखा जाऊ नकोस लगेच, तुझ्याशी बोलायचंय'. ती सात मिनिट लई भारी होती. गुज्जू काय वाईट आहे, घरी काही म्हणणार नाहीत, मलाही आवडतेच, पण ती लई पैकेवाली आहे पण तीच तयार असेल तर आईबाप काही म्हणणार नाहीत अश्या पट्ट्या ब्रेकिंग न्यूज सतत दाखवतात तशा डोक्यात स्क्रोल होत होत्या. जर ती म्हणाली ILU तर आपण पण लगेच 'आय टू' म्हणायचं. ट्रूथ इज अ शॉर्टकट, स्पेलिंग चुकायला नको, जीभ चाचरायला नको, मोजकं बरं पडतं अशावेळी. बोलताना खांबाला धरून उभं रहायचं फक्तं. हेमा, शम्मी आणि ती थांबल्या. माझ्या पोटात लोणार सरोवराएवढा खड्डा. शम्मी आली, 'ती'ला तुझ्याशी बोलायचंय'. जलयुक्तं शिवार अभियानात एका वळवाच्या सरीत खड्डा भरावा तसं झालं, लोणार गायब.

ती घाबरत पुढे आली. खाली मान घालून म्हणाली, 'कधी बोलले नाही पण मला तू फार आवडतोस.' मला काय शब्दं फुटेना, उर्मट असलो तरी 'आय डोंट' एवढं मोजकं बोलणं काही बरोबर दिसणार नाही म्हणून गप्पं बसलो. 'उद्या मी पुण्याला चाललोय, तुला शक्यं असेल तर आपण संध्याकाळी भेटू आणि बोलू', 'चालेल, सहाला येते ब्यारेज रोडला', 'बाय'. संध्याकाळी मी आणि धना गेलो. माझ्यावर विनयभंगाचे चारपाच गुन्हे दाखल असल्यासारखी ती शम्मी आणि हेमाला घेऊन आली होती. (हेमा पोरांच्यावर गुटखा खायची, एकदम फटकळ). आम्ही आपले एका कट्ट्यावर बसलो बाकीचे पुढच्या कट्ट्यावर. प्रेम असं व्यक्तं करणं मला कधी जमलेलं नाही. कळतं ते आपोआप. 'आवडतो म्हणजे काय आवडतं नेमकं?' 'तुझी हुशारी, मला उंच मुलं आवडतात आणि तू दिसतोस ही छान (पिरेम आंधळं असतं किंवा ती माझं मन मोडू नये म्हणून म्हणाली असणार हे वाक्यं)'. मला पाल्हाळ जमत नाही. म्हटलं, 'तू छानच आहेस, कुणालाही आवडावी अशी आहेस पण मी तुझ्याकडे कधीही त्या नजरेने बघितलेलं नाही, त्यामुळे माझी ती मानसिक तयारीही नाही. उगाच तुला हो म्हणून, फिरवून नंतर नाही म्हणणं हे मला जमणार नाही, मी तसं कधीही केलेलं नाही, अजून माझं जॉबचं काही माहित नाही, त्यामुळे आपण इथेच थांबूयात. तू मोठ्या मनानी आधी विचारलंस त्याबद्दल आय रिस्पेक्ट यू पण कुठलाही वाईटपणा न घेता आपण चांगले मित्रं राहूयात'.

इगो हर्ट झाला की संपलं सगळं. खदखदून राग आला होता तिला. माणूस मग वाकड्यात शिरतो, भांडायचं म्हणून भांडतो. मुलगी विचारतीये आणि मुलगा नाही म्हणतोय, बहोत नाइंसाफी है वाली बात. 'मला एवढ्या जणींनी सांगितलं 'हा मुलगा चांगला नाहीये' तरीही मी तुला विचारलं याचं तुला काहीच नाही'. 'चांगला नाहीची व्याख्या काहीही असू शकते ना पण प्रत्येकाची, चांगला नाहीये म्हणजे नेमकं काय?' 'तू सिगरेट ओढतोस, तंबाखू खातोस, कॉलेजला येत नाहीस, उद्धट आहेस एवढं सगळं असून पण मी तुला विचारलं त्याची तुला किंमत नाही.' 'मी ते स्वकष्टार्जित पैशानी करतो (तेंव्हा मी इस्त्री करायचो दिन्याच्या लॉन्ड्रीत, पंधरा पैसे नग, तासाला वीस, असे आठ तासाचे साधारण पंचवीस रुपये मिळायचे), त्यामुळे मला कुणाच्या सर्टिफिकेटची, परवानगीची गरज नाही, ते चांगलं की वाईट हे मी ठरवेन आणि 'एवढं सगळं असून पण' या मेहेरबानीची गरज तर अजिबात नाही, बाय'. कवटी फुटल्यावर पाय ओढत निघतात तसे सगळे निघालो आणि चौकात वेगळे झालो. मी विसरून गेलो. तिनी पुढे बरेच उद्योग केले चिकाटीनी मी हो म्हणावं म्हणून पण माणूस एकदा उतरला की उतरला मनातून.

मी इकडे आल्यावर तिनी एकदा धनाला चौकात गाठून सांगितलं, जयंताचं पत्रं माझ्याकडे आहे, ते माझ्या भावाला सापडलंय आणि तो त्याला धरून मारणार आहे. धनानी सांगितलं, 'एक तर तो नाही म्हणालाय म्हणजे तो पत्रं लिहिणार नाही हे कन्फर्म, एक पानी पत्रं तर नाहीच, तो रेग्युलर पत्रं कमीतकमी वीसेक फुलस्केप लिहीतो (नो अतिशयोक्ती), तू पत्रं आणि भाऊ घेऊन ये, आधी मला मार, मग त्याचा पत्ता देतो'. पत्रं नव्हतंच. ती आलीच नाही. मग ती लोकं पण पुण्याला शिफ्ट झाली. 'हॉटेल रविराज'ला पत्ता शोधून ती, तिची एक मैत्रिण आणि दोन मुलं घेऊन आली होती. तू नाही म्हणालास तर ती मुलं काय करतील ते मी सांगू शकत नाही म्हणाली. म्हटलं दोघांनाही इथून बाहेर जाऊ देणार नाही, कसं करूयात. दोनेक तास ती आणि तिची मैत्रिण मला समजावत होत्या. मी नंतर सांगतो वगैरे घोळ घातलाच नाही. ट्रूथ इज अ शॉर्टकट. 'आय डोंट' म्हणालो. पंचाण्णवला ती सिंहगड रोडला भेटली होती मला. अर्धाएक तास गप्पा मारल्या मी रस्त्यातच. 'लग्नं झालं तुझं?' 'नाही अजून', 'माझंही नाही आणि अजूनही मला तू आवडतोस, आपण महिन्यातून एकदा फक्तं कॉफी प्यायला तरी भेटत जावूयात का?'.

'नको, भेटू परत कधी असेच रस्त्यात', असं म्हणून मी निघालो. यू नो, ट्रूथ इज अ शॉर्टकट.

जयंत विद्वांस

    

Wednesday, 8 June 2016

Truth is a shortcut... (३)

कुणाला कशावरून काय आठवेल आणि काय लक्षात राहील हे सांगता येत नाही. किल्लारीचा भूकंप तीस सप्टेंबर ९३ ला झाला हे लक्षात राहण्याचं माझं कारण वेगळंच आहे. एका बँकेत ट्रेनी म्हणून लागलो होतो सहा महिन्यांकरिता. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर, मोजून सहा महिने. स्टायपेंड भरभक्कम पाचशे रुपये महिना. आम्हांला भरावे लागले नाहीत शिकण्यासाठी हाच आनंद. कॉम्प्यूटर नव्हताच, सगळं म्यानूअली काम. परंपरागत लेजर्स. संचालक ओळखीचे होते. ते म्हणाले, एन्ट्रन्स पास झालास तर मला शब्दं टाकता येईल. त्यांची परिक्षा दिली. साडेचारशे मुलं होती परिक्षेला, म्हटलं आपलं काही होईलसं वाटत नाही पण दिली. माझा दुसरा नंबर आला असता तरी एकंच जागा होती हे त्यांना कारण झालं असतं. ग्रहयोग बलवत्तर असावेत. मी बोर्डावर रिझल्ट पहायला गेलो होतो वैकुठांत जातात त्याच उत्साहानी. चारशेएकोणपन्नास माझ्या नावाच्या खाली होते त्यामुळे बहुतेक नाईलाजानी त्यांना मला घ्यावं लागलं.  

सहा महिने चोख काम, एकही दांडी नाही, लेट मार्क नाही, हाफ डे सुद्धा नाही, एकही चूक नाही. मी 'करंट'ला बसलो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. माझा स्पीड बघून माझ्या सिनिअरला भवानी पेठ ब्रांचला माणसं कमी म्हणून तिकडे पाठवला पंधरा दिवसात. मी आणि मागचे ऑफिसर सोडून आजूबाजूला सगळ्या बायका. तिथे माझ्या बरोबरच जॉईन झालेली एक स्क्रोलला होती. (उसके बारेमें फिर कभी). तर सगळी बारा दणदणीत लेजर्स माझ्या उरावर टाकून सगळे निर्धास्त झाले. खातं ओव्हर झालं की लगेच व्याज काढणे, पान संपलं की व्याजाची टोटल मारणे वगैरे काम लगेच असायचं, पेंडिंग काही नाही. स्वत:च्या सबसिडीज लिहून झाल्या की 'सीसी'ला मदत करणे, 'डे बूक'चा घोळ काढणे, बंडलं मोजून देणे, फ्यासिट मशिनवर क्लिअरिंगच्या टोटल मारणे वगैरे कामं मी चकाट्या पिटत करायचो. हेतू हा की माहिती होते. रोजच्या कामवालीला पन्नास जास्ती देऊन बायका जशा पितळी भांडी, खिडक्या धुणे, जळमट काढणे, फरशी पुसणे, चादरी पिळून घेणे वगैरे जमतील तेवढी कामे उरकून घेतात तसा मी सहा महिने तिथे होतो. श्यामच्या आईनी श्यामला दुस-या मांडीवर ठेऊन मला दत्तक घेतलं असतं इतका गुणी. 

आमच्या व्याजाच्या आम्ही २९ लाच ३० ची तारीख टाकून एन्ट्रीज् केलेल्या. त्या सकाळी आल्यावर चेक करून सबसिडीज लिहून मी तासात मोकळा पण झालो. काही अशुभ घडलं की वातावरण बदलतं (इंदिरा गांधी गेल्या तेंव्हाचं मला अजून आठवतं). मळभ होतंच, कुणीतरी बातमी आणली की किल्लारीला भूकंप झाला. तेवढ्यात लाईटही गेले. वेळेत काम करण्याचा आणि क्याल्क्युलेटर न वापरण्याचा आनंद त्यादिवशी मी सगळ्यात जास्ती घेतला. बँकेत अंधार. आकडे दिसेनात क्याल्क्युलेटरचे, फ्यासिट मशिन एकंच. हातानी बेरजा करण्याची सवय नाही, पब्लिक पागल नुसतं, मेणबत्त्या लावून सेव्हिंग, लोन, सीसीची व्याजं काढणं चालू झालं. मी आणि ऑफिसर मस्तं खुर्च्यात बसून गंमत बघत होतो. त्यांचा माझ्यावर जीव होता. माझा सी.आर.पण त्यांनी मला दाखवला होता. चांगला होता सगळा. 'म्यानेजर होशील तू चारेक वर्षात, ग्रिप आहे तुला' असं म्हणाले होते. सगळ्यांना आणि माझ्या त्या दोस्तीणीला बाय करून निघालो. ती पण मला भेटलेली नाही आजतागायत त्यानंतर. असो!

नंतर वर्षभर संचालकाला फोन झाले, करतो म्हणायचे नेक्स्ट मिटिंगला. शेवटी त्यांनी सांगितलं कंटाळून 'आम्ही नाही घेत कुणाला (?), असलं काही तर सांगेन'. जात आडवी आली असावी असा अंदाज होता. नंतर पुरोगामी ज्यांचा वारसा सांगतात त्या त्रयीपैकी जातपात न मानणा-या एका राजाच्या नावानी असलेल्या बँकेत एकानी जायला सांगितलं होतं इंटरव्ह्यूला. त्यांनी आधी बायोडेटा देऊन कौतुक करून ठेवलं होतं. मी रीतसर फोन करून गेलो. म्यानेजर सरळमार्गी असावा. एकतर माझी आडनावावरून जात ब- याच जणांना कळत नाही. दाढी वरून कुणी कुणी मला ईदच्या शुभेच्छासुद्धा दिल्यात, कुणाला विद्वांस हे नाव आहे असंही वाटलंय. एक जण मला यूपीचा समजून माझ्याशी कायम हिंदीत बोलायचा आणि मी मराठीत. तर तिथे एका ओळीचा इंटरव्ह्यू झाला फक्तं. अतिशय शरमून त्यांनी विचारलं, 'विद्वांस म्हणजे कोण तुम्ही?' मी सांगितलं. 'फोनवर विचारणं बरं दिसणार नाही म्हणून तुम्हांला या भेटायला म्हणालो होतो, आम्ही घेत नाही 'तुम्हांला', आमची अघोषीत पॉलिसी आहे ती, सॉरी'. 

त्या सज्जन माणसाची कुचंबणा मी समजू शकतो. पाल्हाळ तसाही मला मुळातच आवडत नाही. मोजकं आणि मुद्देसूद असलं की अर्थ पटकन कळतो. मी म्हणालो तसं Truth is a shortcut, त्यांनी तोच तर शॉर्टकट वापरला. 

जयंत विद्वांस      

Truth is a shortcut... (२)

अकरावी उरकल्यानंतर बारावीचे दोन महिने झाले असतील आणि मी रस्टनला गेलो 'टर्नर' अप्रेंटीस म्हणून. 'मशिनिस्ट' म्हणून घेतलं आणि नंतर 'टर्नर' सांगितल्यामुळे माझा मूड गेलाच होता नाहीतरी. अर्थात मशिनिस्ट होऊन मी काही फार मोठे दिवे नसते लावले पण दु:खी व्हायला कारण लागतं माणसाला काहीतरी. माणूस आधी कारण शोधतो मग त्याप्रमाणे दु:खाची क्वांटीटी ठरवतो. तिथे तीन वर्ष गेली. थेअरी, गणित वगैरे मला भन्नाट मार्क्स पडायचे. आयसोमेट्रिक ड्रोईंग मी ए डबलप्लस ग्रेडचं काढायचो. आम्हांला अत्यंत खत्रूड व्ही.पी.जोशी म्हणून ट्रेनिंग ऑफिसर होते. शिव्या देणे, घाणेरड (म्हणजे आमच्या लेव्हलचं) बोलणं, आम्हांला एखादा शब्दं समजेपर्यंत पुढची दोन वाक्यं फाडफाड इंग्रजीत बोलणं असली कामे ते करायचे. एकतर कानडी हेल भाषेला आणि हातात सतत शिग्रेट. आम्हांला गुरुवारी एटीएसएसला थेअरीला जावं लागायचं. ते ही तिथे यायचे. साठीच्या आसपास असतील. तिथली पंचेचाळीशीची क्लार्क आणि त्यांचं झेंगट आहे असं लोक म्हणायचे आणि खात्री होईल असं ते वागायचे पण. 


त्यांना दोन असिस्टंट, साळवी आणि कोकाटे. कोकाटेंना लॉगटेबल पाठ होतं पण त्याचं टेक्निक त्यांनी शेवटपर्यंत कुणाला सांगितलं नाही. तर अशी तीन वर्ष संपली. थेअरीचा प्रॉब्लेम नव्हताच. प्र्याक्टीकल औंध आय.टी.आय.ला होतं. तिथली मशिन्स कशी दिव्यं आहेत हे सिनिअर लोकांनी सांगितलं होतं. तरीपण आम्ही जीवावर उदार होऊन पोचलो. आमच्या इथून तीनचार प्रकारची टूल्स धार लावून, सेंटर ड्रिल नविन करकरीत नेलंच होतं. सकाळी आठला गेलो होतो सगळे. आमचे नंबर पाडून झाले. रात्री तीनच्या आसपास माझी परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलं. निम्मी पोरं सेटिंग लावायच्या मागे, ड्रोईंग घ्यायचं आणि बाहेरून जॉब करून आणायचा आणि मास्तरला पैसे द्यायचे. मला आर्थिक दृष्ट्या शक्यं नव्हतं आणि मी ते करणारही नव्हतो. काहीजण दारू प्यायला गेले रात्री पेपर म्हणून. 



एवढी भिकार परीक्षा मी आजवर दिलेली नाही. दिवसभर तिथे आम्ही सगळे बसून होतो. घरी जा आणि रात्री या यावर कुणी ठाम सांगेना. रात्री तीन साडेतीन आमचा लास्ट लॉट आला. मी ड्रोईंग, एमेसचा बार, त्यांनी दिलेलं एक दळीद्री टूल घेऊन मशिनपाशी आलो. जॉब सिंपल होता.पण मशिन बघून मी नापास होणार हे कन्फर्म झालं. त्याचे जॉ कितीही टाईट केले तरी जॉब पकडायचे नाहीत, 'की' नुसती फिरायची. तो कसाबसा पकडला आणि टूल लावलं तर ते सेन्टरच्या खाली. प्याकिंग पट्ट्या शोधायला अर्धा तास गेला. जो तो ज्याच्या त्याच्या जॉबच्या मागे. टूलपोस्ट गदागदा हलायचं. फेसकट काढतानाच टूल उडालं. मग परत तोच सगळा खेळ. मग सेंटर ड्रिल मारायला घेतलं तर ते एक्सेंट्रिक जात होतं. तरीही कसबसं ड्रिल मारून जॉब बाहेर काढला आणि टर्निंगला लावला. मशिनला फौंडेशनच नव्हतं. एक एमेमच्या कटला ते हलायचं. दोन इंचावर गेलो असेन, मशिन हललं आणि जॉब निसटला, टूल उडालं. मी मशिन बंद करून शांत उभा राहिलो. पहाटे साडेपाचला परत सगळा खेळ करायची माझी मानसिक तयारीच नव्हती. 



एकाचं मशिन एचएमटीचं होतं. त्याचा जॉब होत आला होता पण त्याच्याकडे दुस-यानी नंबर लावला होता. त्याचा होणार कधी आणि माझा लावणार कधी. सातला मास्तर आला आणि हाकारा झाला जॉब सबमिट करायचा. सगळ्यात पहिला तो दळीद्री रॉड आणि तुटलेलं टूल त्याच्या पुढ्यात टाकलं आणि मी निघालो. मला बोलावून त्यानी विचारलं, 'काय झोपला होता का रात्रभर'. एक तर राग आलेला त्यात झोप आणि उद्विग्नता. म्हटलं 'नाही, #* घालत होतो रात्रंभर'. 'काय मस्ती आली का रे, नापास तर होणारच आहेस पण परत बसलास तरी इथंच यायचंय परीक्षेला'. 'बसलो तर प्रश्नं येईल ना हा, तुम्ही जॉब करून दाखवा त्या मशिनवर, पैसे घेतलेत तरी जमणार नाही'. मी आपलं घरी आल्या आल्या सांगून टाकलं मी नापास होणार आहे ते. थेअरी आणि इतर विषयात ७५ टक्केच्या आसपास होते मला. ८८ साली मी तो नापास रिझल्ट आणायला पण गेलो नाही. तरीही मी फिनोलेक्स केबलला दोन महिने रिझल्ट लागायचाय म्हणून नोकरीही केली. 



नापास झालो तेच बरं झालं. तो माझा प्रांत नव्हताच. उगाच पास झालो असतो तर त्यात नोकरी करावी लागली असती आणि कुचंबणा वाढली असती. तरीही मी काही काळ पुढे तो उद्योग केला. मग महाजनांच्या 'स्वाध्याय'ला आर्ट्सला गेलो सहा महिने पण यात काही चरितार्थ चालणार नाही हे लक्षात आलं. काय करावं हा गहन प्रश्नं होता मग डायरेक्ट बारावी कॉमर्स. अकरावी न केल्यामुळे मला नियम माहित नव्हते अकाउंटिंगचे. एफवायला नियम माहीत नाही असं सांगितल्यामुळे उद्धटपणा केल्यामुळे मला बाहेर काढलं होतं. मग मी गेलोच नाही दोन वर्ष कॉलेजला. अजूनही मला ते नियम माहित नाहीत. त्यामुळे मला जर्नल एन्ट्र्या यायच्या नाहीत, त्यामुळे मी बारावीला बारा मार्कांचा 'बिल ऑफ एक्स्चेंज' सोडवलाच नाही तरीपण मला ८५/८८ पडले होते. चुकून ते आलं असतं तर ९७ पण पडले असते. पोरं म्हणायची, मग तुला येतं कसं, नियम माहित नाही तर. मी सांगितलेलं त्यांना पटणार नाही म्हणून कधी सांगितलं नाही. 



जे उरावर आहे ते देणं, ते डाव्या हाताला, ते देण्यासाठी जे विकता येईल ती मालमत्ता, ती उजव्या हाताला. एवढं समजलं की झालं. तिचा समतोल ढासळला की धंदा बुडीत एवढं निश्चित. दुस-यानी कमावलेल्या आणि खर्च केलेल्या पैशाचा हिशोब ठेवण्याचा बदल्यात पैसे घेणे एवढाच माझा त्याचा अर्थ आहे. 'वर'च्या चार्टर्डनी आपलं अकौंट राईट ऑफ करेपर्यंत इथली येणी आणि देणी यांचा मेळ घालता आला म्हणजे झालं. लोकांना फक्तं आकडे दिसतील, ते आले कसे त्यातलं खरं खोटं आपल्यालाच माहित. :)   


जयंत विद्वांस       

Tuesday, 7 June 2016

Truth is a shortcut...

आज दहावीचे रिझल्ट लागले. हल्ली सत्तर टक्क्यांच्या आसपास मार्क्स मिळालेले नाराज वगैरे असतात. मी ८३ ला दहावी झालो तेंव्हा सत्तरच्यावर मार्क्स म्हणजे शंखपुष्पीच्या जाहिरातीला घेतील एवढा हुशार माणूस. मला ६५.३३ होते आणि बारावीला ६५.८६. डॉट पलीकडचे टक्के वाढले हे ही नसे थोडके. पण या सगळ्यात सहा वर्ष गेली.

डिएमईला गेलो साता-याला तर फी, हॉस्टेल, क्लास खर्चाचा अंदाज घेऊन डोळे पांढरे झाले होते. पुण्यात परत येईस्तोवर वर्ग चालू झाले होते. विमलाबाई गरवारे मध्ये ओळख होती बाबांची, केळकरकाका म्हणाले, काय करायचंय तुला, म्हटलं सायन्स. जा बस समोरच्या वर्गात. खरंतर कुठली साईड घ्यावी ही अक्कल नव्हती आणि सांगायलाही कुणी नव्हतं. फिजिक्स, हा अध्यात्मापेक्षा गहन विषय आहे. एकवेळ मी ध्यान, अध्यात्म, योग यात प्राविण्य मिळवेन पण फिजिक्स मध्ये या जन्मात शक्य नाही.

पहिल्या दुस-या चाचणीत कसाबसा तरलो. सहामहीला कित्तीही सोपा पेपर असता तरी मी नापासच झालो असतो इतका मी हुशार होतो. ज्युनिअर कॉलेजला प्रगतीपुस्तक होतं अकरावीला. मी कॉलेजात ओळख असल्यामुळे रीतसर नावात लावतो त्या मधल्या नावाची सही घ्यायची ठरवलं. अत्यंत गुणी अभ्यासू अशी ख्रिस्तपूर्व ८४ काळात माझी ओळख होती. कुठलेही फार कष्ट न घेता मी ती पुढे पुसली. बाबा थबकले, 'तुझी बाई चुकली काय रे, फिजिक्स मध्ये तीन काय लिहिलेत शंभरपैकी'. 'तेवढेच आहेत, पाच गाळलेल्या जागा सोडवल्या होत्या, तीन बरोबर आल्या, अजून किती देणार त्या तरी'. त्यानंतर सही करायची वेळ मी त्यांच्यावर येऊच दिली नाही.

थुंकी उडवत बोलणा-या जोशी बाईंनी अत्यंत उपहासात्मक (कुजकं म्हणतात त्याला) शब्दात सगळ्या वर्गाला ऐकू जाईल असं हलक्या आवाजात सांगितलं, 'आडनाव काय, मार्क काय, निदान एकशे पाच तरी कर बेरीज म्हणजे वर्ष तरी सुटेल हे'. चिडून उठेन वगैरे शक्य नव्हतं. उगाच अशक्यं पैजा मी घेत नाही. मला काय येत नाही हे मला लहानपणापासून कळतं.

तिस-या चाचणीला एकच धडा फिजिक्सचा. मी वर्गात हायेस्ट, सत्तावीस तीसपैकी. बाईंनी टेबलापाशी उभा करून पद्मश्री दिल्यासारखं कौतुक वगैरे केलं. खरे हुशार, अभ्यासू लोक आयुष्यातून उठले असते, साला एवढा अभ्यास करून हा पहिला येणार असेल तर रस्त्यावर बसून पंक्चर काढलेल्या ब-या असले विचार त्यांच्या डोक्यात तरळायला लागले असणार. मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं, 'मला त्या धड्यातली एकही ओळ येत नाही, तुम्ही म्हणालात एकशेपाचचं बघ म्हणून त्या धड्याची गाईडची पानं माझ्या खिशातच होती.' 

जोशीबाई दयाळू म्हणून वाचलो. ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची कॉपी. लाज वाटायला लावणारं यश कसं असतं ते कळलं. नंतर बरेच उद्योग झाले. त्यावर परत कधीतरी. पण तेंव्हापासून दोन वाक्यं मी कोरून ठेवलीयेत मनात 'Truth is a shortcut' आणि 'Justifying the fault doubles it'. चुकलं ते चुकलं, नाही जमत ते नाही जमत.

आपलं अपयश आपण बोंबलून सांगितलं की लोकांचा आपल्याला चघळण्यातला इंट्रेस्ट संपतो. लपवायला गेलात की लोक मागे लागतात. यश कुणीही सांगेल, अपयश पण यश मिळाल्यासारखं सांगता यायला हवं. ;)

जयंत विद्वांस