Wednesday 8 June 2016

Truth is a shortcut... (२)

अकरावी उरकल्यानंतर बारावीचे दोन महिने झाले असतील आणि मी रस्टनला गेलो 'टर्नर' अप्रेंटीस म्हणून. 'मशिनिस्ट' म्हणून घेतलं आणि नंतर 'टर्नर' सांगितल्यामुळे माझा मूड गेलाच होता नाहीतरी. अर्थात मशिनिस्ट होऊन मी काही फार मोठे दिवे नसते लावले पण दु:खी व्हायला कारण लागतं माणसाला काहीतरी. माणूस आधी कारण शोधतो मग त्याप्रमाणे दु:खाची क्वांटीटी ठरवतो. तिथे तीन वर्ष गेली. थेअरी, गणित वगैरे मला भन्नाट मार्क्स पडायचे. आयसोमेट्रिक ड्रोईंग मी ए डबलप्लस ग्रेडचं काढायचो. आम्हांला अत्यंत खत्रूड व्ही.पी.जोशी म्हणून ट्रेनिंग ऑफिसर होते. शिव्या देणे, घाणेरड (म्हणजे आमच्या लेव्हलचं) बोलणं, आम्हांला एखादा शब्दं समजेपर्यंत पुढची दोन वाक्यं फाडफाड इंग्रजीत बोलणं असली कामे ते करायचे. एकतर कानडी हेल भाषेला आणि हातात सतत शिग्रेट. आम्हांला गुरुवारी एटीएसएसला थेअरीला जावं लागायचं. ते ही तिथे यायचे. साठीच्या आसपास असतील. तिथली पंचेचाळीशीची क्लार्क आणि त्यांचं झेंगट आहे असं लोक म्हणायचे आणि खात्री होईल असं ते वागायचे पण. 


त्यांना दोन असिस्टंट, साळवी आणि कोकाटे. कोकाटेंना लॉगटेबल पाठ होतं पण त्याचं टेक्निक त्यांनी शेवटपर्यंत कुणाला सांगितलं नाही. तर अशी तीन वर्ष संपली. थेअरीचा प्रॉब्लेम नव्हताच. प्र्याक्टीकल औंध आय.टी.आय.ला होतं. तिथली मशिन्स कशी दिव्यं आहेत हे सिनिअर लोकांनी सांगितलं होतं. तरीपण आम्ही जीवावर उदार होऊन पोचलो. आमच्या इथून तीनचार प्रकारची टूल्स धार लावून, सेंटर ड्रिल नविन करकरीत नेलंच होतं. सकाळी आठला गेलो होतो सगळे. आमचे नंबर पाडून झाले. रात्री तीनच्या आसपास माझी परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलं. निम्मी पोरं सेटिंग लावायच्या मागे, ड्रोईंग घ्यायचं आणि बाहेरून जॉब करून आणायचा आणि मास्तरला पैसे द्यायचे. मला आर्थिक दृष्ट्या शक्यं नव्हतं आणि मी ते करणारही नव्हतो. काहीजण दारू प्यायला गेले रात्री पेपर म्हणून. 



एवढी भिकार परीक्षा मी आजवर दिलेली नाही. दिवसभर तिथे आम्ही सगळे बसून होतो. घरी जा आणि रात्री या यावर कुणी ठाम सांगेना. रात्री तीन साडेतीन आमचा लास्ट लॉट आला. मी ड्रोईंग, एमेसचा बार, त्यांनी दिलेलं एक दळीद्री टूल घेऊन मशिनपाशी आलो. जॉब सिंपल होता.पण मशिन बघून मी नापास होणार हे कन्फर्म झालं. त्याचे जॉ कितीही टाईट केले तरी जॉब पकडायचे नाहीत, 'की' नुसती फिरायची. तो कसाबसा पकडला आणि टूल लावलं तर ते सेन्टरच्या खाली. प्याकिंग पट्ट्या शोधायला अर्धा तास गेला. जो तो ज्याच्या त्याच्या जॉबच्या मागे. टूलपोस्ट गदागदा हलायचं. फेसकट काढतानाच टूल उडालं. मग परत तोच सगळा खेळ. मग सेंटर ड्रिल मारायला घेतलं तर ते एक्सेंट्रिक जात होतं. तरीही कसबसं ड्रिल मारून जॉब बाहेर काढला आणि टर्निंगला लावला. मशिनला फौंडेशनच नव्हतं. एक एमेमच्या कटला ते हलायचं. दोन इंचावर गेलो असेन, मशिन हललं आणि जॉब निसटला, टूल उडालं. मी मशिन बंद करून शांत उभा राहिलो. पहाटे साडेपाचला परत सगळा खेळ करायची माझी मानसिक तयारीच नव्हती. 



एकाचं मशिन एचएमटीचं होतं. त्याचा जॉब होत आला होता पण त्याच्याकडे दुस-यानी नंबर लावला होता. त्याचा होणार कधी आणि माझा लावणार कधी. सातला मास्तर आला आणि हाकारा झाला जॉब सबमिट करायचा. सगळ्यात पहिला तो दळीद्री रॉड आणि तुटलेलं टूल त्याच्या पुढ्यात टाकलं आणि मी निघालो. मला बोलावून त्यानी विचारलं, 'काय झोपला होता का रात्रभर'. एक तर राग आलेला त्यात झोप आणि उद्विग्नता. म्हटलं 'नाही, #* घालत होतो रात्रंभर'. 'काय मस्ती आली का रे, नापास तर होणारच आहेस पण परत बसलास तरी इथंच यायचंय परीक्षेला'. 'बसलो तर प्रश्नं येईल ना हा, तुम्ही जॉब करून दाखवा त्या मशिनवर, पैसे घेतलेत तरी जमणार नाही'. मी आपलं घरी आल्या आल्या सांगून टाकलं मी नापास होणार आहे ते. थेअरी आणि इतर विषयात ७५ टक्केच्या आसपास होते मला. ८८ साली मी तो नापास रिझल्ट आणायला पण गेलो नाही. तरीही मी फिनोलेक्स केबलला दोन महिने रिझल्ट लागायचाय म्हणून नोकरीही केली. 



नापास झालो तेच बरं झालं. तो माझा प्रांत नव्हताच. उगाच पास झालो असतो तर त्यात नोकरी करावी लागली असती आणि कुचंबणा वाढली असती. तरीही मी काही काळ पुढे तो उद्योग केला. मग महाजनांच्या 'स्वाध्याय'ला आर्ट्सला गेलो सहा महिने पण यात काही चरितार्थ चालणार नाही हे लक्षात आलं. काय करावं हा गहन प्रश्नं होता मग डायरेक्ट बारावी कॉमर्स. अकरावी न केल्यामुळे मला नियम माहित नव्हते अकाउंटिंगचे. एफवायला नियम माहीत नाही असं सांगितल्यामुळे उद्धटपणा केल्यामुळे मला बाहेर काढलं होतं. मग मी गेलोच नाही दोन वर्ष कॉलेजला. अजूनही मला ते नियम माहित नाहीत. त्यामुळे मला जर्नल एन्ट्र्या यायच्या नाहीत, त्यामुळे मी बारावीला बारा मार्कांचा 'बिल ऑफ एक्स्चेंज' सोडवलाच नाही तरीपण मला ८५/८८ पडले होते. चुकून ते आलं असतं तर ९७ पण पडले असते. पोरं म्हणायची, मग तुला येतं कसं, नियम माहित नाही तर. मी सांगितलेलं त्यांना पटणार नाही म्हणून कधी सांगितलं नाही. 



जे उरावर आहे ते देणं, ते डाव्या हाताला, ते देण्यासाठी जे विकता येईल ती मालमत्ता, ती उजव्या हाताला. एवढं समजलं की झालं. तिचा समतोल ढासळला की धंदा बुडीत एवढं निश्चित. दुस-यानी कमावलेल्या आणि खर्च केलेल्या पैशाचा हिशोब ठेवण्याचा बदल्यात पैसे घेणे एवढाच माझा त्याचा अर्थ आहे. 'वर'च्या चार्टर्डनी आपलं अकौंट राईट ऑफ करेपर्यंत इथली येणी आणि देणी यांचा मेळ घालता आला म्हणजे झालं. लोकांना फक्तं आकडे दिसतील, ते आले कसे त्यातलं खरं खोटं आपल्यालाच माहित. :)   


जयंत विद्वांस       

No comments:

Post a Comment