Tuesday 7 June 2016

धमकी...

आत्मज्ञान पोस्टीत मी कविता करणं बंद केलंय हे मागेच सांगितलंय. ते लोकांनी कौतूक करावं, 'तुम्ही छान करता (कविता), का बंद केलंत, लिहा न परत आता,' 'आं, जा बाबा, एवढं पण नाही ऐकणार माझं' हे ऐकण्यासाठी नव्हतं. तर तेंव्हाही लोकांनी धमक्या दिल्या होत्या म्हणून आणि कित्येक लोकांनी पटवून दिलं होतं की 'कशाला उगाच उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेतोयेस, तुझंही तोंड खराब आणि आमच्याही डोक्याला त्रास'. जनहितार्थ मी तो लेखनप्रकार बंद केला. पण काल त्याच रिपीट पोस्टीवर एक दोघांनी गुलाबपाणी शिंपडून स्वागत केलं आणि हुरळलो झालं.

कविकिरण मंडळाकडून मेसेजेस आले. कुणाचे कुठे हात पोचले असतील सांगता येत नाही हल्ली. स्टोन चाळीतून एक, दुबैतून एक असे दोन फोन आले. अनुक्रमे मराठीतून आणि हिंदीतून.

स्टोन चाळ - 'दात आले काय रे'. 'काय झालं साहेब'. 'कविता करतो का परत'. 'नाही हो, हल्ली होतंच नाहीत, कुंथाव लागतं'. 'परत जर का दिसली कवितेची पोस्ट तर याद राख, मधीमधी बोलू नको, मला आवडत नाय, एकदा सांगितलं ना, नको की नको'. 'अहो पण...' 'आपल्या लोकांच्या पोस्टीला एक तर तू लाईक, कामेंट करत नाय, लै दिवस बघतोय, शाना समजतो का स्वतःला, बांबूनी बोटं ठेचेन उचलून आणून'. डायरेक फोन कट, काय बोलायची संधी नाय काय नाय. मी घाबरून वॉलवरच्या, मेल, ब्लॉग जिथे असतील त्या डिलीटायला घेतल्या. मेंदूत एक तरळत होती ती पण नाकात कागदाची सुरनळी घालून आकछी करून टाकून दिली.

जरा कुठे धैर्य गोळा करतोय तर बाहेरदेशाचा नंबर डिस्प्ले झाला, माझी तिकडे कुणाकडेच उधारी नाही म्हणून घेतला तर डायरेक राष्ट्रभाषेतून खर्जातला आवाज. 'कायको पंगा लेनेका रे, भाय बोला ना हमारा लोकल ब्रँचका, तो सूननेका, टपका डालेगा ना कोई येडा पोएट, बालबच्चेवाला आदमी है इस वास्ते बोल रहेला है, हमलोगाको इतनाच काम नही है रे, एक बार बताया, सूननेका, दुसरी बार फोन बिन कुछ नही आयेगा, सिद्धा पेपरमें ब्रेकिंग न्यूज, चल रख अभी, सुधर जा'.

सकाळी चौकीला गेलो तर मलाच वेड्यात काढलं. अंगठा दाखवून विचारलं 'सकाळीच का आज की रात्रीचीच बोलतीये अजून?' कंप्लेंट नोंदवायची सुद्धा लायकी नाही आपली. तीव्र दुःखानी परत आलो. परत कविता करणार नाही असं अफिडेव्हीट केलंय, फोटो काढून दुबै एचो आणि स्टोन ब्रँचला ऍप्सवर पाठवतो, म्हणजे सुटलो.

त्यामानाने कविकिरण मंडळाचे मेसेज वरणभात होते. 'तू टाक तर, दीड पायाचाच करतो'. 'आपण फार सुंदर कविता करता, तिस-या ओळीला जांभई आणि पाचव्या ओळीत गाढ झोप लागते, लिहित रहा, झोपेच्या गोळ्या घ्यायला नकोत म्हणजे मला', 'तुझं तुला कळतं का रे काय लिहितो ते, काय स्वाभिमान असला शिल्लक तर दगडानी बोटं ठेचून घे'. अत्यंत विमनस्क अवस्थेत आहे मी. आरशात बघितलं मगाशी, एक शबनम अडकवायची, मोठ्या फ्रेमचा चष्मा, चेह-यावर उपजत नैराश्य आहेच, कविसारखाच दिसायला लागलोय.
पोस्टू काय एक शेवटची?

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment