Tuesday 7 June 2016

एक घोट आहे अजून…

काळ बदलला. गरिबीच्या व्याख्या बदलल्या. गरीब असण्याची आता लाज वाटायला लागली. याचा अर्थ पहिल्यांदा नव्हती का? होती, पण गरिबी ही अवस्था आहे, यातून पार पडू अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असायची, स्वाभिमान जपलेला असायचा, लाचारी केवळ आणि फक्तं केवळ नाईलाजापोटी करावी लागायची. वाममार्गाला जाऊन गरीबी दूर करण्याचे प्रयत्नं नसायचे, कष्ट, नशीब आणि देव ही भरोश्याची त्रिसूत्री होती. पापभिरूपणा गरीबाकडेच असायचा शक्यतो. आता गरीब असलो तरी दाखवायचं नाही यासाठी माणसं कर्जबाजारी व्हायला लागली. गरिबाला काय किंवा मध्यमवर्गाला काय, कर्ज घेऊन खर्च करणे म्हणजे माथ्यावरून पायथ्याकडे निघालेला उतारावरचा दगड आणि कर्जफेड म्हणजे पायथ्यापासून मुद्दल आणि व्याजाचे दोन दगड परत माथ्यावर ढकलत नेणे असं असतं. 

चाळीत रहायचो तेंव्हाची गोष्टं. इनमिन चार ब्राम्हण कुटुंब सगळ्या चाळी मिळून. आमच्या पाठीमागे एक कुटुंब रहायचं त्यातलं. वृद्धत्वाकडे धावणारं जोडपं, दोन मुलं, चार मुली, त्यातल्या एकीनी पळून जाऊन लग्नं केलं होतं, त्या दिवसापासून ती कधीच परत सुद्धा आली नव्हती. प्रत्येक वेळी वासना हे कारण नसतं, दोनवेळचं जेवण हे की कारण असू शकतं. एकारांती आडनावाला साजेसा तापटपणा अंगात ओतप्रोत भरलेला. इसम इंदोर की ग्वाल्हेर संस्थानात खाजगीत होते कधी काळी. संस्थानं बुडाली, खालसा झाली. मालकाची मस्ती, अहंकार सेवकांकडेही आलेला. नोकरी नाही. अधूनमधून भिक्षुकी, सकाळी दुधाची लाईन मुलं टाकायची. पण एक मीटर कापड आणि चौघांना शर्ट शिवा, कापड राहिलं तर एक छोटी पिशवी चालेल अशी रिक्वायरमेंट, कसं होणार? दारिद्र्याचं पण एक वातावरण असतं, सगळ्या गोष्टींवर एक अदृश्य लेप दिल्यासारखं ते चिकटलेलं असतं. दिवस काय कुणाचे रहात नाहीत. मोठा मुलगा बँकेत लागला (आता रिटायर्ड पण झाला), मुलींची लग्नं झाली पण **ची आई अजून माझ्या लक्षात आहे.

नित्यनियमाने आई दर शुक्रवारी कुणाची तरी ओटी भरायची. ओळख झाल्यावर त्या यायला लागल्या ते त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत, मग त्यांची मोठी सून यायची बरेच वर्ष. ओटीचे तांदूळ असे कितीसे असणार, दोन तीन ओंजळी फारफार तर. एकदा त्या म्हणाल्या तुमचे तांदूळ मी वेगळ्या डब्यात ठेवते, सणासुदीला भात करायला उपयोगी पडतात, चव जात नाही जिभेवरून त्याची. तेंव्हा सुरती कोलम असायचा आमच्याकडे. कसंतरीच झालं ऐकून. विक्षिप्त तापट नवरा, कायम ओढ्ग्रस्तीची परिस्थिती, त्यात आजारपण. साडेचार फुटाच्या आसपास उंची, बारीक इतक्या की वेताला कापड गुंडाळलय असं वाटेल, मागे कायम बोटभर वेणी, ओटीला येताना कायम हातात पिशवी. त्यांच्या नजरेत 'नाही रे' वर्गाच्या असतो तसा हेवा कधीच दिसला नाही मला. आपण काही बोललो आणि नाही कुणाला आवडलं तर अडचणीचं ठरू शकतं म्हणून गरीबी अबोल होत असावी. फार कमी बोलायच्या त्या.

मला बाळदमा होता दहाव्या वर्षापर्यंत साधारण. मी म्हणालो बोलताबोलता एकदा, मला आता दम लागत नाही. त्या पटकन म्हणाल्या, 'विषयसुद्धा काढू नकोस, बरा झालाय ना, मग मनातसुद्धा आणू नकोस'. त्यांना दमा होता. थंडीचे चार महिने त्या रात्री कॉटवर बसून असायच्या. कफ निघायचा नाही, दम लागायचा, आडवं झालं की श्वास थांबल्यासारखं व्हायचं म्हणून खोकत किंवा श्वास गोळा करत रात्रंभर बसून रहायच्या. अशी अनेक वर्ष त्यांनी काढली होती. कुठले भोग असतात माहित नाही पण अशा माणसांना देव पुरवणी आयुष्यं लिहित असावा कपाळावर. आयुष्याचा प्रवास सिंगल मीटर गेज लाईनवरच्या पॅसेंजरसारखा हळू आणि न संपणारा. न पाहिलेल्या देवाच्या आशेवर आणि या जन्मातलं चांगुलपण पुढच्या जन्मात कामाला येईल असल्या न पटणा-या विचारांवर अनेक आयुष्यं जगत राहिली फक्तं त्या काळी. काहीच अनुकूल घडत नसताना कधीतरी चांगलं होईल, घडेल ही आशा जगायला भाग पाडत असावी.

माझी आर्या किंवा कुठलीही लहान मुलं हल्ली दूध पिताना कटकट करतात, आईबापांवर मेहेरबानी करतात. एक शेवटचा घोट त्यांनी शिल्लक ठेवायचा आणि आपण आरडाओरडा केला की राग आल्यासारखं दाखवून तो नाईलाजानी त्यांनी प्यायचा हा ड्रामा बरीच वर्ष चालतो. चूक त्यांची नाही, त्यांनी कित्त्येक गोष्टी पाहिलेल्या नाहीत म्हणून आपण त्या सांगायला हव्यात. आता पिशवीतून दूध येतं. तेंव्हा सकाळी किंवा दुपारी केंद्रावर जाऊन बाटल्या आणाव्या लागायच्या. त्यांची मुलं त्याची लाईन टाकायची. व्याप होता तो. लोक बाटल्या धुवून न देता तसेच द्यायचे. दुस-याची बोलणी घेणा-याला खावी लागायची. एकानीच अनेक घेतल्या की मागचं पब्लिक आरडा ओरड करतं, वेळ जातो म्हणून दोघांनी रांगेत उभं राहून त्या बाटल्या घ्यायच्या. त्या सगळ्या बाटल्या घरी आणायच्या. त्याच्यावर अतिशय नाजूक सील असायचं, एक निळ्या आणि एक तांबड्या रंगाचं असायचं. ती जमवून त्याचेही खेळ व्हायचे त्याबद्दल परत कधीतरी. तर त्या बाटल्यांना वरच्या बाजूल रिंग असायची ज्यावर ते सील फीट बसायचं.

स्किलफुली ते सील जरा काढायचं आणि त्या साधारण तीन एमेम उंच आणि एक इंची डायमीटर रिंग मध्ये जेवढं दूध असेल तेवढं पातेल्यात घ्यायचं, सील परत बसवायचं म्हणजे रिंगच्या भागात दूध नाही हे कळायचं नाही. 'जळो जिणे लाजिरवाणे' असं वाटतं अगदी, आठवलं की. ते वापरून सगळ्यांना सकाळचा चहा मिळायचा. कुणी याला चोरी म्हणत असेल तर असा विचार करणं सुद्धा पाप आहे मी म्हणेन. कसलं आलंय पाप नी पुण्यं. आता ती पिढी हयात नाही, संपत आली पण त्यांना रात्री शांत झोप लागायची, हसतमुख असायचे, संसार झाले, मुलबाळं रांगेला लागली पण त्यांच्या आयुष्यात कायम उन्हात उभे राहिल्यामुळे सुखाचा कवडसा क्वचितच पडला. माणसानी स्वत:चे किंवा दुस-याचे असतील तरी आधीचे दिवस विसरू नयेत. सतत त्याच आठवणी काढून टिपंही गाळू नयेत पण आपण मस्तवालपणे वागत असू तर मात्रं पाय जमिनीवर रहाण्यासाठी कुठेतरी आयुष्याच्या पुस्तकाची आरंभाची जीर्ण पानं परत वाचावीत.

जेंव्हा मी ओरडतो आर्याला की  'एक घोट आहे अजून, टाकायचा नाही, पी सगळं' तेंव्हा माझ्या डोक्यात त्या दुधाची किंमत किती, हे नसतं तर डोळ्यासमोर **ची आई असते. त्यांना कळत नसेल तर 'खाऊन माजा पण टाकून माजू नका' हे आपणच सांगायला पाहिजे, सांगायलाच पाहिजे. 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment