Tuesday 7 June 2016

चरा…

'आबा, फेकून द्या तो शर्ट आता'. 'अगं याला काय झालंय, उसवला नाहीये, फाटला नाहीये कुठे, अजून चार वर्ष सहज काढेल, उगाच काय टाकून द्यायचा आणि, घरात घालायला बराय अजून. पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत तेंव्हा असे कपडे असावेत चार राखणीतले'. 'आबा, डिसेंबर आहे हा चालू, सहा महिने आहेत किमान अजून कपडे न वाळायला'. 'शब्दश:अर्थ काढू नकोस ग कार्टे, सांगण्याचा अर्थ लक्षात घे'. 'आबा, एक काम करूयात का, तुमच्या सगळ्या शर्ट प्यांटना आतून खरेदी वर्ष लिहून ठेऊ धोब्याच्या शाईनी, ते पुसलं जाईल पण कपडा सापडेल जसाच्या तसा कपाटात, शेवटचा शर्ट प्यांट जोड ख्रिस्तपूर्व काळात घेतला असेल तुमचा, ते काही नाही, मी हे सगळे कपडे काढून टाकणारे जुने आणि नवीन घेणारे'. 'अगं पण कशाकरता? फाटल्याशिवाय, विटल्याशिवाय उगीच कपडा टाकू नये, मस्ती आल्यासारखा. द्यावा नाहीतर कुणा गरजूला'. 'आबा, हल्ली कुणी गरजू बिरजू नसतं बरं का, कमीपणा वाटतो लोकांना, लोक घेतात आणि विकतात बाहेर'. 'हे बघ, उगाच मला भरीला पाडू नकोस, मी टाकून देणार नाही कुठलाही कपडा कारण नसताना, फार तर कुणाला तरी देऊ मगच नविन आणूयात, चालेल?' 'बरं, पण काढून ठेवा सगळे, रविवारी तुमचं नव्यानी पासिंग करून घेऊ'. 

मी सतीश वाघ, आडनाव वाघ असलं तरी आता म्हातारा झालोय. आत्ता बोलत होती ती माझी नात. मोठी गोड आहे. कथा कादंब-यात असतात तशी म्हातारपणाची दु:खं मला अजिबात नाही, सगळं कसं छान आहे. तसा मी काही चिकट नाहीये पण कपड्यांवरून मला हे सगळे सतत बोलत असतात. पण यांचं फ्रांसच्या राणीसारखं झालंय, अनुभवलं नाहीये त्यामुळे एखाद्या गोष्टीची तीव्रता यांना कळत नाही, अडचण पोचत नाही. आपल्याला सोसावं लागलं, मिळालं नाही ते पुढच्या पिढीला मिळावं यासाठी मधली पिढी धडपड करतीये पण त्यांना सगळं कष्टाविना देऊन आपण घाबरट प्रजा तयार करतोय असं माझं मत आहे. म्हणून कुठलीही अडचण आली की हे लगेच सैरभैर होतात. असो? म्हातारपणी कुणाला मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये, किंमत रहात नाही, लोक टाळतात मग आपल्याला. पथ्य पाळलं की आजार जवळ येत नाही हे इथेही लागू आहे.

लहान असताना मोठ्या असलेल्या चुलत, मामे भावंडांचे त्यांना लहान झालेले पण चांगले असलेले कपडे घालताना कधीही कमीपणा वाटला नाही कारण वडिलांनी तशी सवय लावली होती. त्यामुळे आम्ही हक्कानी घ्यायचो, द्यायचो. वह्या, पुस्तकं इकडून तिकडे जायची पण त्यात दान, भीक अशी भावना नव्हती कधीच. हे सगळं आठवायचं कारण मात्रं वेगळंच आहे. एखादी घटना घडून जाते पण तिचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की ती कायम लक्षात रहाते. मी बहुराष्ट्रीय कंपनीत होतो तेंव्हा. कंपनी आणि कामगार मिळून काही निधी गोळा व्हायचा चांगल्या उद्दिष्टांसाठी, आमचीच एक अंतर्गत संस्था होती. आदिवासी, गरजू लोकांना मदत करणारी. एकदा एका आदिवासी पाड्यावर आम्ही गेलो होतो. त्यांना त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी मुरुमाचा रस्ता श्रमदान करून बांधायचा होता. मशिनरी आणि आम्ही तीसेक लोक होतो पण मशिनपेक्षा जास्ती काम त्याच लोकांनी केलं खरंतर. काय कृतकृत्य भावना असते त्या लोकांची चेह-यावर. कुठलाही नाटकीपणा, खोटेपणा नाही. आपल्यासाठी कुणीतरी चांगलं करतंय हे त्यांच्या चेह-यावर दिसतं. त्यांना शब्द सापडत नाहीत, पण आशीर्वाद त्यांच्या चेह-यावरून, बोलण्यातून निथळत असतात.

त्यांचा एक म्होरक्या होता. त्याला मान होता. सगळे कसे लंगोटी लावलेले, शिसवीच्या लाकडासारखे काळे कुळकुळीत पण तुकतुकीत, अंगावर चरबीचा कण नाही, काटक सगळे, चपळ आणि झटून काम करणारे. तेल लावलेला कडप्पा चमकावा तसे सगळे ग्लॉसी ब्ल्याक दिसायचे. काम संपलं, बाकी सगळे परत आले. मी हौसेने थांबलो रात्री तिथे. ज्यानी आम्हाला हे काम सुचवलं तो कार्यकर्ता पण थांबणार होता म्हणून. काय मस्तं संध्याकाळ असते माळरानावरची, आपल्याला सवय नसते शुद्ध हवेची. कुठलीही इस्टेट नसलेली ती माणसं काय आनंदी दिसतात, हेवा वाटतो. आम्ही त्या म्होरक्याच्या घरी गेलो. अंधार झाला म्हणजे रात्रंच त्यांच्यासाठी. त्याचं घर जरा मोठं होतं म्हणजे मधे कुडाचं पार्टिशन एवढाच फरक इतर घरांपेक्षा. तो, बायको आणि त्याचा भाऊ. मोठा रॉकेलचा टेंभा त्यानी मधे आणून ठेवला. शहरातला माणूस घरी आल्याचा आनंद आणि न्यूनगंड पण होता त्याच्या हालचालीत. त्याची बायको काही कामावर आली नव्हती. लाल गावठी तांदुळाचा भात, मुगाची आमटी आणि चुलीत भाजलेली कसली तरी कंदमूळं. आम्ही दोघे जेवायला बसलो. काही लागलं की तों आत जायचा आणि मग बायको बाहेर यायची. ती आत गेली की तो किंवा त्याचा भाऊ बाहेर यायचा. 

जेवणं झाली आम्ही गप्पा मारत बसलो बाहेर. त्याची भाऊ आणि बायको दाराचा आडोसा करून बसले होते. भावाला हाक मारली की तो आत जायचा मग भाऊ बाहेर यायचा. मला काहीतरी खटकल्यासारखं झालं. सकाळी आम्ही निघालो लवकरच. म्होरक्या आला होता सोडायला मेन रोड पर्यंत. 'चक्रावलात ना काल? नविन माणसाला असंच वाटतं की हे एकावेळी एकंच का बाहेर येतात म्हणून. तुम्ही शहरातून आलात त्यामुळे आधीच त्यांची फार कुचंबणा झालेली असते. ते असे एकेक का येत होते समोर असंच विचारणार आहात ना?' होय'. 'तुमच्या लक्षात आलं नाही, तुमच्यापुढे येताना सगळे जे कापड गुंडाळत होते तेवढं एकच आहे त्यांच्याकडे. अतिशय जपून वापरतात ते, ते फाटलं तर? हा त्यांच्या दृष्टीने मोठा प्रश्नं आहे. त्यामुळे एकजण आत गेला की दुसरा तेच गुंडाळून बाहेर येतो. एरवी ते लंगोटीवर असतात पण घरी आलेल्या शहरी पाहुण्यासमोर ते वाईट दिसतं म्हणून ते त्यांचं हे ठेवणीतलं कापड वापरतात समोर येण्यासाठी. आपल्याला आपले प्रॉब्लेम किती मोठे वाटतात ना? आत्ता जेवताना डोक्यात संध्याकाळी? हा प्रश्नं ज्याला आहे त्याला भेटा एकदा, माणूस अन्न टाकणार नाही. खूप दरी आहे या दोन जगात. मधे पूल बांधायला कुणाला वेळ नाहीये. फोटो काढून वार्षिक दान करणारे खूप आहेत, कायमस्वरूपी उपाय करणारे कमी आहेत'.    
        
एक प्रचंड मोठ्ठा चरा उमटलाय तेंव्हापासून. कपडा टाकवत नाही त्याला काय करू.  

जयंत विद्वांस 

(कुणाच्या आठवत नाही पण एका मोठ्या माणसाच्या लेखात वारली आदिवासी आणि एक कपडा उल्लेख वाचलेला खूप वर्षामागे, तो डोक्यात खिळा मारल्यासारखा रुतलाय)

No comments:

Post a Comment