Saturday 26 March 2016

नमूने (२)…


नमूने (२)…

मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे तो हयात नाही आता त्यामुळे नाव सांगणार नाही. ९१ ला एका नोकरीत असताना तो भेटला मला. माझ्यापेक्षा वयानी मोठा पण सगळे करायचे म्हणून मी पण त्याला अरेतुरेच करायचो. पाचेक फुट उंची, काळा म्हटलं तर वाईट दिसतं म्हणून सावळा म्हणतात तसा रंग, उजव्या कपाळावर लाटा काढल्यासारखा तेल लावलेल्या केसाचा भांग आणि अत्यंत मिस्किल चेहरा. तोंड उघडलं की कळायचं तो किती अवली आहे ते, एरवी त्याच्याकडे लक्ष जाईल असं काहीही त्याच्यात नव्हतं. आधी अकाउंट्सला होता तो मग स्टोअरकीपर झाला. अत्यंत प्रामाणिक, हजरजबाबी, कामात चोख आणि तेवढाच कोकणी फटकळपणा असलेला. समोर मालक आहे का ज्युनिअर याचा विधिनिषेध न बाळगता तो मनात असेल ते स्पष्टं बोलू शकायचा. कपट नसलेला माणूस होता तो. 

तेंव्हा हेडक्लार्क म्हणजे अकाउंट्सचा वाघ असायचा. सगळे टरकून असायचे. तिथेही एक हेडक्लार्क होते. एकदम सगळं काम नियमात. मेमो काढायची प्रचंड हौस त्यांना. ऑफिस पहिल्या मजल्यावर होतं. सगळ्यांनी नऊला हजर असायलाच हवं असं त्यांना वाटायचं आणि हा कधीच वेळेत यायचा नाही. अर्थात संध्याकाळी पण तो काट्यावर निघायचा नाही, एकूणच निवांत कारभार पण वरचे सगळे गुण असलेला. हेडक्लार्क सांगून थकले पण याच्यात काही बदल नाही. एकदा ते जिन्याच्या वरच्या टोकाला उभे राहिले, नेहमीप्रमाणे याला उशीर. नियमाप्रमाणे ऑलरेडी तीन लेट झालेले (रोज पाच दहा मिनिट लेट हा लेट नसतोच यावर त्याचा ठाम विश्वास होता). हा जिन्याच्या खालच्या पायरीवर. दोघांनी एकमेकाचा अंदाज घेतला. मेमो काढावा की घरी हाकलावा की सगळ्यांसमोर झोडावा असा हिशोब वरच्या पायरीवर, खालच्या पायरीवर मेंदू कारण शोधण्यात गुंतलेला. तोंड फुटलंच शेवटी. 'किती वाजले? कितीदा सांगायचं वेळेत ये?' खालून जो फ्लिपर आला ना फास्ट तो अनप्लेएबल होता. 'हाफ डे टाकायला आलोय, त्यासाठी वेळेत कशाला यायला हवंय'. हार्डनिंग करताना कसं गरम लोखंडावर एकदम पाणी ओतल्यावर जसा आवाज येतो आणि ते लोखंड एकदम गार पडतं तसा हेडक्लार्क जागेवर विझला. मग रीतसर वीसेक मिनिट झोडकाम करून कामाला लागले दोघंही. 

तो टायपिंग पण करायचा. एकदा नेहमीचा टायपिस्ट नव्हता म्हणून स्वत:चा मेमो त्यानी स्वत:च टाईप केला. त्यांची सही व्हायच्या अगोदर यानी ऑफिस कॉपीवर रिसीव्हडच्या ठिकाणी स्वत:ची सही करूनच मेमो त्यांच्यापुढे सहीला ठेवला. परत एकदा यथेच्छ वीसेक मिनिट झोडकाम. त्याचा निर्लज्जपणा किती पराकोटीचा आहे हे त्यांना ठसवायचं होतं आणि 'मलाच मिळणार आहे तर मी आधी सही केली म्हणून एवढं काय चुकलंय त्यात' असा त्याचा निरागस प्रश्नं. त्याला मिळालेला तो शेवटचा मेमो. शिक्षा ही भीती बसावी, परत चूक करू नये म्हणून असते, हे याला लागूच होत नसल्यामुळे मेमो देण्यात काय अर्थ होता सांगा. अत्यंत सरळ चेहरा ठेऊन तो गुगली वन लायनर भन्नाट टाकायचा. सगळ्यांना समजल्यावर होणारा डिलेड हास्यस्फोट नेहमी जास्ती असतो. तसा तो झाला की त्याचा चेहरा पावती मिळाल्याच्या आनंदात फुलायचा अगदी. 

तेंव्हा पगार तो कितीसा असणार. स्टेपल्ड पाकिटातून रोख मिळायचा पगार. ऑफिसचं एक पाकीट याला जाताजाता पोस्टात टाकायला दिलेलं. यानी पगाराचं पाकीट पोस्टात टाकलं आणि पोस्टायचं घरी घेऊन गेला. घरी गेला, पाकिट रीतसर बायकोच्या ताब्यात दिलं देवापुढे ठेवायला. तिनंही देवापुढे ठेऊन नमस्कार करून मग ते फोडलं तर आतून पत्रं. मग घरी नेहमीप्रमाणे यथेच्छ झोडकाम झालं वेंधळेपणावरून. कुणीतरी याला सांगीतलं सकाळी सातला उघडतात ती पेटी. हा सहा वाजल्यापासून पेटीशेजारी उभा. पोस्टमन आठला आला, पेटी उघडली, सगळी पाकीट तीन तीनदा शोधली याचं पाकीट नव्हतं. संध्याकाळी पण एकदा उघडते म्हणाले पेटी. हा डेक्कन पोस्टऑफिसला पण नाहीच मिळालं त्याचं पाकीट. ऑफिसमधे येउन त्यानी पराक्रम जगजाहीर केला. मला पूर्ण पगार परत द्या आणि पाच महिन्यात कापा हे त्यानी ऑर्डर वजा विनंती या स्वरुपात सांगून पैसे घेतले पण. स्वत:च्या बावळटपणाचा, बायकोनी कसा झोडला, घरातल्यांनी कसा धुतला याचा किस्सा लोक त्याच्या तोंडून वर्षानुवर्षे ऐकत होते असा रंगवून सांगायचा तो स्वत:च. 

सकाळी बॉयलर पेटवायला तो यायचा. तीनेकशे रुपये मिळायचे त्याचे त्याला. सगळं मिळून विसेक मिनिटांचं काम. एकदा अजून का पेटत नाही म्हणून यानी वाकून बघितलं आणि खालून आगीचा लोळ वर आला. भरीताच्या होरपळलेल्या वांग्यासारखा झाला होता चेहरा. पण त्याची विनोदबुद्धी मात्रं अफाट. मालकांना म्हणाला, आत्तापर्यंत या कामाचे जेवढे मिळाले तेवढे तोंडाला औषध लावण्यातच गेले त्यामुळे आता मी ते काम करणार नाही. 'जयंता, डॉक्टरला सांगितलंय, ते क्रीम दिलंय त्यात गोरं व्हायचं काहीतरी मिसळून द्या म्हणजे त्यासाठी वेगळा खर्च नको.' दोनेक महिन्यांनी म्हणाला, 'कात टाकल्यासारखा दिसतोय का रे चेहरा माझा?' आणि हसत सुटला. हा आणि असे अनेक किस्से तो असे काही सांगायचा की नविन माणसाच्या डोळ्यापुढे चित्रं उभं रहावं आणि त्यानी खदखदून हसावं. 

आपण हजार सोडा अगदी शंभर गेले तरी किती तळतळ करतो, ज्याला मिळाले असतील त्याच्या पिढ्यांना तप केलेल्या ऋषीसारखे श्राप देतो पण सतत आनंदी रहाणारा, स्वत:च्या चुकांवर हसणारा, पूर्ण पगार गेल्यावरसुद्धा ज्या कुणी अज्ञात पोस्टमननी तो घेतला असेल त्याच्याबद्दल एकही वाईट शब्द न बोलणारा, 'जाऊ दे रे त्याच्या नशिबात लॉटरी होती ती, मिळाली त्याला' असं काळजाला हात घालणारं निरागस बोलणारा माझा हा दोस्तं वेगळाच होता. माझे कधी असे पैसे गेले की मी त्याच्यासारखा अख्खा पगार तर नाही ना गेला असं म्हणून हसतो आणि समाधान मानतो. आता तो नाही, तसा अकालीच गेला तो. पण मित्रा, काहीतरी साधं पण जगायला महत्वाचं असं शिकवून गेलास एवढं खरं.

जयंत विद्वांस 

 

Friday 25 March 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१३)… शशी कपूर…

सत्तर एमएम चे आप्तं (१३)… शशी कपूर…

 
थोरामोठ्यांच्या घरात जन्माला येणं हा शाप जास्ती आणि फायदे कमी असा प्रकार आहे. लोक तुमच्या पूर्वजांना तुमच्यामध्ये शोधतात, तुलना करतात, यशापयश लगेच मोजायला सुरवात होते, तुमच्यावर बारीक लक्ष असतं. ब्रॅडमनच्या मुलानी 'तू ब्रॅडमनचा मुलगा का?' या प्रश्नाला कंटाळून काही काळ ब्रॅडसन आडनाव केलं होतं. त्यामुळे स्वत:चं वेगळेपण दाखवून स्थिरस्थावर होणं हे खायचं काम नाही. मुळात मळलेल्या वाटेवरून चालायला सोप्पं असलं तरी रिस्की पण असतं. त्याचे वडील पृथ्वीराज शरीराप्रमाणेच भारदस्त नाव आणि आब राखून होते नाटक आणि चित्रपटसृष्टीत. काका त्रिलोक कपूर देवांच्या (शंकर स्पेशालिस्ट) भूमिकेत फेमस होता. भाऊ रणबीर'राज' आणि शमशेरराज उर्फ शम्मी आपापला किल्ला राखून होते. राजकपूर दिग्दर्शक पण होता आणि तिघात जास्ती देखणा होता. बलबीरराज उर्फ शशी कपूरचं अवघडच होतं.  शम्मीचा धसमुसळेपणा नाही, राजचा (कावेबाज पण) भोळसट चेहरा नाही. या अठरा मार्चला अठ्ठ्याहत्तर पूर्ण झालेला तो आता पृथ्वीराजच्या आकाराचा आणि चेह-याचा झालाय पण आधी तो सगळ्यात स्लिम कपूर होता.  

एकूणच तो सुखी माणूस होता पण. जेफ्री केंडालची शेक्सपिअरिन नाटक कंपनी आणि पृथ्वी थेटर यांची कलकत्त्यात गाठ पडली आणि शशी कपूर वयाच्या अठराव्या वर्षीच जेफ्रीच्या मुलीच्या, जेनिफरच्या, प्रेमात पडला. घराणी झाली की नियम तयार होतात, कायदेकानून असतात. आधी विरोध झाला पण वहिनी गीताबालीच्या पाठींब्यावर तो विसाव्व्या वर्षीच बोहल्यावर चढला. खाण्यापिण्यातली इंग्लिश शिस्त आचरणात आणायला लागल्यामुळे शशी कपूर स्लिम ट्रिम आणि फिट होता. लग्नं झाल्यावर सव्वीस वर्षांनी ती कर्करोगानी गेली आणि शशी कपूर खचला. संपूर्ण इंग्लिश चेहरा घेऊन आलेला करण कपूर मॉडेल झाला मग जुही चावला बरोबर 'लोहा' मध्ये आला आणि तिथेच संपला. तो आता लंडन मध्ये स्थायिक झालाय आणि नामवंत फोटोग्राफर आहे. कुणाल मात्रं भारतीय चेह-याचा होता. त्याचा 'विजेता' वेगळ्या विषयावरचा आणि करमुक्त असूनही फार चालला नाही. तो रमेश सिप्पीचा जावई आहे आणि जाहिरातीच्या फिल्म्स बनवतो. 'हिरो हिरालाल' मधून नसिरुद्दीन बरोबर आलेली थोडीशी किशोरी शहाणे सारखी दिसणारी संजना कपूर आली आणि गेली लगेच. आईकडून आलेला थेटरचा वारसा ती सांभाळतीये. हाच का तो असं वाटावं इतका आता तो फुगलाय. व्हीलचेअरवर बसलेला, हवा भरल्यासारखा दिसणारा, पृथ्वीराज कपूरच्या तोंडावळ्याचा शशी कपूर दिसतो मात्रं अजूनही प्रसन्न.    


त्यानी सगळ्यात जास्ती काम नंदा (८ चित्रपट) राखी, शर्मिला (९ चित्रपट), झीनत, हेमा (१० चित्रपट) आणि अमिताभ (१२ चित्रपट) बरोबर केलंय. त्यातला फक्तं 'ईमान धरम' मी पाहिलेला नाही आणि 'अजूबा' बघायची इच्छा नाही. पण तो यशस्वी होता. सभ्यं, चारचौघांसारखा गोरा गोमटा चेहरा आणि येतंय तेवढं मनापासून करणं एवढ्या मोजक्या गुणांवर तो टिकून राहिला. संवादफेकीसाठी तगडा आवाज नाही, मारामारीला शोभेल असा तगडा देह नाही, उंची फार नाही, बुटकाही नाही, विनोद उत्तम जमतोय असंही नाही, फक्तं नाचासाठी बघायला येतील असंही नाही. पण अमोल पालेकर सारखं काहीतरी सरळमार्गी, आपल्यातला वाटणारं त्याच्यात होतं. ६१ सोलो आणि ५५ मल्टीस्टारर असं संतुलन साधण्याचं कसब त्याच्यात आणि त्याचा पुतण्या ऋषी कपूर मधे होतं. 'आवारा' मधे तो राजकपूरचं बालपण होता, 'प्यार हुआ इकरार हुआ' मधे तो भावंडांना हाताला धरून घेऊन जाणारा होता. बबिता आणि नीतू या सुनांचा तो हिरो होता. संन्यास घेतल्यावर त्याच्या शब्दाखातर नंदा कुणाल कपूरच्या 'आहिस्ता आहिस्ता' मधे आली होती. ती त्याची आणि तो तिचा फेव्हरीट होता. 

'जब जब फुल खिले' मधे 'एक था गुल' म्हणणारा, 'ये समा' म्हणणा-या नंदाकडे चोरून बघणारा, 'शर्मिली'मध्ये 'खिलते है गुल यहां' आणि 'ओ मेरी शर्मिली' म्हणणारा, 'दिवार' मध्ये 'कह दु तुम्हे', 'फकीरा'त 'तोता मैनाकी कहानी', 'चोर मचाये शोर'मध्ये 'ले जायेंगे, ले जायेंगे', 'कन्यादान मध्ये 'लिख्खे जो खत तुझे' म्हणणारा शशी कपूर वेगळा आणि 'कलयुग' '३६ चौरंगी लेन' 'जुनून' 'विजेता' 'काली घटा' 'उत्सव'चा शशीकपूर वेगळा. पैसा, प्रसिद्धी मिळते माणूस त्यात खुशही होतो पण कुठेतरी न्यून जाणवतं. म्हणून पैसे बुडणार हे माहित असूनही आरके 'जागते रहो' काढतो. शशी कपूरनी पण 'कलयुग' 'जुनून' 'विजेता' '३६ चौरंगी लेन'' 'उत्सव' असे वेगळे सिनेमे काढले. 'अजूबा' त्यानी काढला आणि दिग्दर्शित पण केला होता. त्याच्याच 'प्यार किये जा' वरून काढलेल्या 'धुमधडाका'मधून वर आलेल्या महेश कोठारेने मात्रं एकापेक्षा एक रद्दड चित्रपट ईमाने इतबारे काढले अर्थात अजूनही 'जय मल्हार'च्या पैशातून तो वेगळा विषय, चित्रपट काढेल याची सुतराम शक्यता नाही. फार तर अजून एक रद्दड पण यशस्वी, टीआरपी असलेली मालिका मात्रं काढेल. इथे तर तोटा म्हणजे काय तर थोडे पैसे कमी होतील एवढंच तर आहे. पण मुळात ती खाज हवी तोटा सहन करून वेगळं काहीतरी करण्याची, शशीकपूर कडे होती, कोठारेकडे नाहीये.   

लार्जर द्यान लाईफ लिहिलेल्या व्यक्तिरेखेसमोर तो 'दिवार'मध्ये साधेपणाने पण ताकदीने उभा राहिला. चेहरा बोलतो त्याचा, गोळी घातल्यावर त्या मुलाच्या हातात सापडलेले पाव बघून झालेला त्याचा चेहरा बघा. त्याला मिळालेलं केमेव फिल्मफेअर (सहाय्यक अभिनेता). अर्थात फिल्मफेअर मिळालं म्हणजे अभिनय येतो असं नाही. 'मृच्छकटिक'वरून काढलेल्या 'उत्सव'मध्ये त्यानी केलेली भूमिका तोच निर्माता म्हणून केलेली नाहीये. अमिताभ करणार होता पण 'कुली'च्या अपघातामुळे त्याला ती करावी लागली. त्याच्या शब्दावर अमिताभला 'रोटी कपडा और मकान' मिळाला होता. शम्मी सोडून बाकी सगळ्या कपूरांना (पृथ्वीराज, राज आणि शशी) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. शशीकपूरला निदान मरायच्या आधी बरेच वर्ष दिला हे त्याचं भाग्यं. मरणोत्तर किंवा गलितगात्र अवस्थेत असलेल्या माणसाला देण्यात काय आनंद मिळतो, माहित नाही.  

पुरस्कार मिळोत न मिळोत माझ्या लक्षात तो एक सज्जन, सभ्यं, देखणा, पाय जमिनीवर असलेला, मर्यादेत रहाणारा, प्रसन्न चेह-याचा माणूस म्हणून आणि समोर कोण का असेना, संयत आवाजात, गुंडाशी बोलत असलो तरी मोठ्या भावाशी बोलतोय याची जाण ठेवून चीड दाबलेल्या आवाजात 'भाय, तुम साईन करोगे या नही' विचारणारा 'रवि वर्मा', म्हणून राहीलय, एवढं खरं.

जयंत विद्वांस 

Thursday 24 March 2016

सुखाची कल्पना…

सुखाची कल्पना… 

तसं मला सणांचं कौतुक पहिल्यापासून कमीच आहे त्यामुळे मी हिरीरीनी होळीची तयारी, गुढी उभारणे, संध्याकाळी ती काढणे, दस-याला गाडी धुऊन हार घालणे, दिवाळीत पणत्या लावणे वगैरे कामं करत नाही. अगदीच टोमणे जास्ती झाले तर मी नाईलाजाने करतोही पण शक्यतो ती कामं उरकली जाण्याची वाट बघतो, आळशी माणसाकडे पेशंस असतोच पण कुणाला त्याचं कौतुक नसतं. काम करावसं वाटतंय पण ती उर्मी दाबून पडून रहाणे हा पेशंसचा भाग आहे. पण होळी जरा वेगळाच प्रकार आहे. लहान असताना आग लावण्याची सामाजिक परवानगी यामुळे तो जास्ती आवडायचा. ती टिमकी दिवसरात्र वाजवायची, सारखी होळीत गोलगोल  फिरवून कडक करायची आणि नुसती बडवायची या पलीकडे उद्योग नसायचा. त्यावर तोडगा म्हणून त्या बदल्यात आम्हांला पिक्चर बघायला मिळायचा. वर्षभरात दोघांच्या वाढदिवसाचे दोन आणि होळीचा एक असा बिपीएल कार्डधारक शिधा मिळायचा. एकवर्षी आम्ही 'एक बार मुस्कुरा दो' पाहिलेला. हिंदी अफाट होतं, पाचवी सहावीत असू. भाऊ म्हणाला, सिनेमाच्या नावाचा अर्थ काय?  लाज कुठे काढून घ्या माहित नाही सांगून, म्हटलं 'बार एक आणि मुस्कुरा दोन' (तनुजा एक, देव आणि जॉय मुखर्जी दोन). मोठा झाल्यावर त्यानी माझ्याबरोबर सिनेमे बघायचं सोडलं. 

तर होळी. आई सकाळीच पोळ्या करायची. ते नैवेद्य वगैरे नाटक काही वर्ष होतं. मग 'घरातल्या पोराला दूध नाही आणि पिंडीवर अभिषेक' वाचण्यात आलं आणि प्रथा मोडली गेली. पुरण खाल्लेलं चालतं मग पोळी खाल्ली आधी तर काय होतं याचं समर्पक उत्तर तिच्याकडे नसल्यामुळे झाल्याझाल्या एका ताटलीत घ्यायची, त्यावर तुपाचा गोळा टाकायचा, छोट्या वाटीत दूध, त्याच्या कडेनी पाण्याचा गोल फिरवला की चेपायचं. गावभर वाटून चारपाच दिवस पुरतील एवढ्या करायची पद्धत आईपासून आहे ती आजतागायत. माझ्या नशिबानी बायको गुळाची आणि पुरणाची पोळी आणि एकूणच सगळं अप्रतिम करते. तूरडाळ आणि गूळ रटरट शिजत असताना जो एक आवाज येतो, घरभर वास सुटतो ना त्याला तोड नाही. ते त्या मिक्सर मधून काढायचं काम मात्रं फार चिकट, किचकट आहे. भांड्यात खाली तो पिवळसर, स्पर्शाला समुद्रावरच्या मऊ रेतीसारखा ढिग गोळा होतो तो बघत रहावं. लाटताना फ्लेक्झिबल कणकेत तो पिवळसर गोळा सावल्या पसराव्यात तसा पोळीभर पसरतो ना त्याचं वर्णन कसं करावं? 

सरकारी योजना जशा शेवटपर्यंत पोचत नाहीत त्याप्रमाणे ब-याच जणींच्या पोळीत पुरण कडेपर्यंत येतंच नाही, तिथे त्या वातड लागतात आणि मजा जाते, काहींच्या मी खाक-यासारख्या पातळ पोळ्या पाहिल्यात, तिथे कशाला हवीये करीना फिगर. कणकेत हळद टाकून पिवळ्या झालेल्या पोळ्यांना मी हात पण लावत नाही, लोक पोळी अगोड करून गुळवणीत बुडवून का खातात हे मला कोडं आहे. पोळी कशी नरमसूत, फरीदा जलालच्या गालासारखी गुबगुबीत हवी. कणिक अशी तिंबलेली असावी की तिच्या फिलामेंटसारख्या जाडीतून पुरणाचा पिवळा रंग दिसावा. पिवळसर, तांबूस, चटका जास्ती बसलेल्या ठिकाणी काळपट तांबड्या रंगाचे ब्युटीस्पॉट असावेत. या पोळीच्या पण स्टेजेस असतात. तव्यावरून काढल्या काढल्या गरम पोळी खायला फार आवडत नाही मला , एक तर तूप चटकन विरघळतं आणि चव समजत नाही. केलेला दिवस आणि पुढचे निदान दोन दिवस चव, रंग, अवस्था बदलत जाते, ते टिपण्यात पण मजा आहे. 

पहिल्या दिवशी ती मुमताजसारखी गच्च आणि फुगीर असते. दुस-या दिवशी तीची स्किन जरा लूज पडते, तिस-या दिवशी मात्रं ती मोडकळीला येते. मोहमायेतून सुटावं तसं पुरण वेगळं होतं. पिंजरा मधे संध्या 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा' म्हणताना जसा तो गोरा खांदा बाहेर काढते तसं घडी घातली की पुरण बाहेर येतं. अर्थात चवीत कमतरता येत नाही तर वाढ होते. केमिकली चेंजेस होत असतील का तीन दिवस झाल्यामुळे? अज्ञानात सुख असतं हेच खरं. कारण माहित झालं तरी चवीत काय फरक पडणार आहे म्हणा.

तर बाहेर ऊन तापलंय, दुपारचा दिडेक वाजलाय. मस्तं वाडगा घ्यावा. त्यात किमान दोन अडीच पोळ्या घ्याव्यात. वरती दोन घट्ट तुपाचे पिवळे धम्मक स्कूप टाकावेत, साय ओतावी, दूध घालावं, सोबतीला मिरचीचा खार किंवा लोणच्याची फोड असावी. मग मांडी घालून चावण्याचे फार कष्ट नसलेला तो ऐवज तोंडात भरत रहावं. अशावेळी कुणीही काही बोललं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नं केला तरी तोंडातून अनाकलनीय आवाज यावेत इतका तोबरा भरलेला हवा. शेवटचे चारेक घास राहिल्यावर अत्यंत दु:खं व्हावं आणि मग उर्वरित भाग मायेनी खावा, तुपाचा ओशटपणा, सायीचा तुकडा त्यात अडकलेलं पुरण यापेक्षा जगात सुळसुळीत, मऊ काहीही नाही, याची खात्री पटावी. वर थंडगार पौणेक तांब्या पाणी प्यावं आणि वाट काढत ढेकर स्प्रिंगसारखी वर यावी. उगाच एवढं पाणी प्यायलो, अजून अर्धी गेली असती या विचारानी तीव्र की काय ते दु:खं व्हावं. वर बनारस एकसोबीसतीनसो, नवरतन, पक्का सुपारी भुगा दाढेखाली घेऊन पंख्याखाली दहाएक मिनिट बसावं. ग्लानी येऊ लागली की बेडरूमात जाऊन पडदे लावून अंधार करावा, पंखा फुलस्पीडला लावून पात्तळ चादर अंगावर घेऊन झोपावं. उठल्यावर आज वार काय, आत्ता सकाळचे उठलोय की संध्याकाळचे? असा प्रश्नं पडेल अशी झोप लागावी. रात्रं व्हायची वाट बघत आळसात वेळ काढावा आणि दुपारच्या निदान निम्मा तरी ऐवज फस्तं करावा आणि परत सुखनैव झोपावं, निदान माझी तरी सुखाची कल्पना इतकी साधी सोप्पी आहे.

पण वय वाढत गेलं की या अशा रग्गड पुरणपोळ्या चेपण्यात खरी मजा नाही. कुणीतरी आपल्यासाठी बाजूला काढून ठेवलेली, शेवटची अर्धी मुर्धी, गलितगात्र, मोडकळीला आलेली पोळी खाण्यात जास्ती मजा असते. त्याच्या बरोबर खार लागत नाही चवीला, थोडासा खारटपणा प्रत्येक घासाला चवीसाठी मिसळला जातो आपोआप. कुणाच्या तरी आठवणीनी घास अडकावा आणि आपण तो पाण्याच्या घोटाबरोबर खाली सरकवावा यात त्या पोळीचा दोष नसतो. त्या आठवणीतल्या सुखाची कल्पना गोड नसते मात्रं.  


जयंत विद्वांस 



  

Thursday 10 March 2016

पळावं की न पळावं…

पळावं की न पळावं…

विजय गुल्ल्या भिंतीला टेकून बसला होता. लाईट लावावा अशी सुद्धा इच्छा त्याला होत नाही. बायको सुरेखा, मुलगा सिद्धू आणि दोन्ही मुली त्यानी गावाकडे पाठवल्या होत्या. काय करावं हा मोठ्ठा प्रश्नं त्याच्यापुढे आ वासून होता. अती दारू, मांसाहार यामुळे त्याला मूळव्याधीचा त्रास होताच. चार वर्षामागची गोष्टं, त्याला फिशर्सचा पण त्रास चालू झाला होता. ती रेघ एवढी मोठी होती की डॉक्टर गंमतीने त्याला किंग'फ़िशर्स' म्हणायचे. गरीबाची काय हो, सगळेच टर उडवतात. ज्याचं दु:खं त्याला माहित. मूळव्याधीच्या ऑपरेशनकरता त्याला पैसे हवे होते. कुणी मदत करेना. एक तर शब्दश: अवघड जागचं दुखणं त्यात आर्थिक अडचण. मग त्याचा एक मित्रं होता इस्टेट बँक ऑफ इंडियात. तो ऐनवेळी पुढे आला.

आजारपणाच्या खर्चासाठी लोन देण्याची आपल्याकडे पद्धत नाही एक तर, काय करावं गरीब माणसांनी मग. इथे खोटेपणा चालू होतो बघा. नुसत्या आजारपणाच्या ख-या कारणासाठी लोन मिळणार नाही म्हणाला म्यानेजर. बरं या बिचा-याकडे गहाण ठेवायला काही नाही, आता आली का पंचाईत. तळपायाची आणि पार्श्वभागाची अशा दोन आगी विज्जूला अस्वस्थ करत होत्या. मग त्यानी म्यानेजरला घरी बोलावलं. त्याला पार्टी दिली. दारू पिता पिता म्यानेजर, विज्या आणि त्याचा राजकारणातला मित्रं यांच्या गप्पा लोनच्या मुद्द्यावर आल्या. म्यानेजर म्हणाला 'शेतजमीन आहे का? 'आहे, थोडी?' 'राहतं घर मालकीचं आहे का?' होय' माझंच आहे'. विज्याचा मित्रं म्हणाला 'अरे मग दे की लेका ते तारण म्हणून आणि घे पैसे'. म्यानेजर दारू सांडेपर्यंत हसला. 'अरे ते दिवस गेले आता, तुझ्याकडे असं काही आहे का की जे जप्तं झालं तरी तुला फरक पडणार नाही, अशा गोष्टी दे तारण म्हणून'.


शेवटी माळ्यावर सिद्धूसाठी तो लहान असताना आणलेली दोन बोईंग विमानं, पंचवीस वर्षापासून साठवलेला चावट क्यालेंडर्सचा गठ्ठा आणि साधारण दोन ट्रक भरतील एवढ्या मागच्या अंगणात पडलेल्या बिअरच्या बाटल्या यावर कर्ज द्यायचं ठरलं. साधारण लाखभर रुपये मिळाले त्याला नको असताना. विजू नको म्हणत होता एवढे खरंतर, ऑपरेशनला दहा पंधरा खूप होणार होते. पण नेत्यानी वीस घेतले, म्यानेजरनी वीस घेतले. 'व्याज भर काही वर्ष फक्तं, मुद्दल कशाला फेडतोयेस, आम्ही बघू एंडला' असा भक्कम निर्वाळा दोघांनी त्याला दिला. आता दोघांनी हात वर केले होते. म्यानेजर रिटायर्ड झाला होता आणि नेता मोठा मंत्री. कागदावर विजूची सगळी इस्टेट गहाण. चार महिने झाले बँकेची पत्रं येतायेत, अजून नऊ हजार भरायचे बाकी होते. दोघांना गेलेल्या चाळीसचा हिशोब त्यानी बोंबलून सांगितला पण कागदोपत्री पुरावा काहीही नव्हता त्यामुळे विजू अगदी हतबल झाला होता. 

शेवटी त्यानी म्यानेजरला फोन लावला. त्यानी त्याला आयडिया दिली. 'हे बघ, आमची हद्द कोल्हापूरपर्यंत आहे. तू पळून क-हाडला जा. तिथे तुझी इस्टेट आहे त्याला आम्ही हात लावू शकत नाही. एवढं काय मनावर घेतोयेस. चार दिवस पेपरात येईल मग लोक विसरतील सगळं आपोआप. काही दिवसांनी तू सुद्धा विसरशील की तुझ्यावर कर्ज होतं. मी बोललोय मंत्र्याशी, त्यानी काय तुझ्या एकट्याच्या लोन मधला वाटा घेतलेला नाहीये, त्यामुळे काळजी करू नकोस. संसदेत सरकार मदत जाहीर करेल इस्टेट बँक ऑफ इंडियाला पुढच्या आठवड्यात. त्यात तुझं कर्ज राईट ऑफ होऊन जाईल. नोटीस परवा निघेल, तू उद्याच्या पहिल्या एसटीनी निघ क-हाडला. माणूसच नाही जागेवर तर नोटीस कुणाला देईल कोर्टाचा माणूस, फार फार तर दारावर चिकटवेल, रात्रीत दार गायब करतो बघ. न रहेगा दरवाजा, न रहेगी नोटीस'. 

विजूनी उठून लाईट लावला. किडूक मिडूक पिशवीत भरलं. भरल्या डोळ्यांनी त्यानी ती दोन विमानं, रिकाम्या बाटल्यांचा खच आणि क्यालेंडर्सचे गठ्ठे याकडे बघून घेतलं. एक अस्फुट हुंदका फुटला, क्षणभर त्याला पाय जडावल्यासारखं वाटलं. पिशवी काखेत मारून तो पहाटेच्या अंधारात निघाला. बुलककार्ट रेसिंग मधे तो उतरवायचा ती गाडी दाराशीच होती. तिच्यावरून त्यानी मायेने शेवटचा हात फिरवला. आता मात्रं त्याचा बांध फुटला. पळावं की न पळावं हा एकंच प्रश्नं कालपासून त्याला सतावत होता. पण आयुष्याची अखेर उगाच कशाला कायद्याच्या कचाट्यात काढायची हा विचार प्रबळ झाला. सगळ्या खिशातून चाचपून त्यानी तिकीटापुरती रक्कम आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि पहाटेच्या अंधारात तो स्टयांडकडे निघाला.  
     
जयंत विद्वांस

'विजयची काशी' : दिग्दर्शक परेश मोकाशी...

'विजयची काशी' : दिग्दर्शक परेश मोकाशी... 

एलिझाबेथ एकादशी वर १६ ११ १४ ला लिहिताना मी लिहिलं होतं....

<<यात पंढरपुरच्या गल्ल्या आहेत, टेरेसवर रहाणारं, कर्जाच्या दलदलीत बुडालेलं कुटुंब आहे, परिस्थितीमुळे चेह-यावरचं हसणं पुसलं न गेलेली  मुलं, नव-याच्या मागे संसारगाडा ओढताना त्यांची कातावलेली आई आणि हताश आजी आहे,  मुलांना मदत करणारी त्यांची मित्रमंडळी आहेत. मुंगीला मुताचा पूर अशी एक म्हण आहे त्याचा खरा अर्थ आज जास्ती कळला. निटिंग मशिनचं पाच हजार रुपयांचं कर्ज फेडायचंय इतकी क्षुल्लक बाब आहे. भांडी विकून आलेले पाचशे, कामाचे येऊ घातलेले पाचशे, स्कालरशिपचे पाचशे आणि घरातले असे मिळून तीनची सोय आहे. एलिझाबेथ विकून दोन असं पाचचं गणित बसतंय.

आईला मदत म्हणून पोरं उद्योग करतात कारण एलिझाबेथ विकायची नाहीये, ती त्याच्या वडिलांनी घरी बनवलीये. सगळी स्वप्नं कुठे खरी  होतात म्हणा. देवाच्या गावात पोरांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. बघताना जीव गलबलतो.  खूप राग आला, दु:खं झालं की माणूस शांत बसतो.  त्रागा करण्याची त्याची शारीरिक, मानसिक ताकद संपते. आहेत ते तीन हजार पण गेल्यामुळे कोप-यात बसलेली आई, फुरंगटून झोपलेली पोरं ओरखडा काढतात. जगात चांगुलपणा दिसत नसला तरी तो शिल्लक असावा अशी शंका यायला अजूनही वाव आहे असं सांगणारा शेवट मोकाशी करतात. तसं गेलं तर ही छोट्या मुलांची दुनियादारी आहे. हिशोबी मदत करत नाहीत लहान मुलं.

पोरांची ग्यांग, आई, मित्राची गणिका आई सगळी पात्रं सरस, त्यांची निवड सरस. मुलांचे ढगळ कपडे, रंग उडालेलं घर, मानेची हाडं दिसणारी, साध्या साड्यातली तेलकट चेह-याची कातावलेली नंदिता धुरी पटते. खूप दिवसात निर्मळ निरागस हसला नसाल, छातीत डाव्या बाजूला हलल्यासारखं वाटलं नसेल, डोळ्यात काहीही गेलेलं नसताना डोळे पुसावेसे वाटत असतील, कंठमणी गहिवरानी हलला नसेल तर एलिझाबेथ बघाच एकदा.>>

परेश मोकाशी नवीन सिनेमा काढावा लागेल तुला आता. काय ते दळीद्री विचार तुझे. पाच हजार कर्ज? फक्तं? त्यावर सिनेमा? आग लागो तुझ्या कल्पना शक्तीला. तसाही सध्या चरित्रपटाचा ट्रेंड आहे. उगाच ते इंग्लिश नाव नको आणि, 'विजयची काशी' असं नाव सुचतंय.

परीक्षण लिहून तयार आहे, तू चित्रपट रिलीज करायच्या आधी व्हायरल करतो बघ, बक्कळ कमावशील, त्यालाच घे मेन रोलात म्हणजे गरिबाला मदत पण होईल.

१४ ११ १६

यात पॅरिसच्या गल्ल्या आहेत, टेरेसवर दारू प्यायला बसणारं, कर्जाच्या दलदलीत बुडालेलं कुटुंब आहे, परिस्थितीमुळे चेह-यावरचं हसणं पुसलं न गेलेली मुलं, नोटीशींना उत्तरं देताना त्यांचा कातावलेला वकील आणि हताश सी.ए.आहे, विज्जूला मदत करणारी त्याची मित्र नेतेमंडळी आहेत. मुंगीला मुताचा पूर अशी एक म्हण आहे त्याचा खरा अर्थ आज जास्ती कळला. एवढ्या मोठया व्यापाचं सात हजार कोटी रुपयांचं कर्ज फेडायचंय इतकी क्षुल्लक बाब आहे. शेअर विकून आलेले पाचशे, येऊ घातलेले पंधराशे, विमानं विकून येतील ते दोन हजार पाचशे, बिअर आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या विकून येतील ते बाराशे आणि घरातले दागिने, शेअर्स, अनेक घरं, मालकीच्या टीमा, कॅलेंडरचे गठ्ठे विकून येतील ते असे मिळून सहाची सोय आहे.

विजूला मदत म्हणून पोरं उद्योग करतात कारण किंगफिशर विकायची नाहीये, ती त्याच्या वडिलांनी घरी बनवलीये. सगळी स्वप्नं कुठे खरी होतात म्हणा. लाचखोरीच्या गावात विजूच्या स्वप्नांचा चुराडा होतो. बघताना जीव गलबलतो.  खूप राग आला, दु:खं झालं की माणूस शांत बसतो. त्रागा करण्याची त्याची शारीरिक, मानसिक ताकद संपते. आहेत ते सहा हजार कोटी पण द्यावे लागतात की काय या भीतीने कोप-यात बसलेला विजू, फुरंगटून झोपलेली पोरं ओरखडा काढतात. जगात चांगुलपणा दिसत नसला तरी तो शिल्लक असावा अशी शंका यायला अजूनही वाव आहे असं सांगणारा शेवट मोकाशी करतात. सगळ्या इस्टेटीवर पाणी सोडून स्वतःच्याच मालकीच्या विमानात बसून पळून जाणारा विजू बघून गलबलायला होतं.

वकिलांची ग्यांग, कॅलेंडरच्या मॉडेल्स सगळी पात्रं सरस, त्यांची निवड सरस. मॉडेल्स मदत म्हणून त्यांचे कपडे काढून लिलाव करतात पण मुळातच अपुरे कपडे असल्यामुळे नगण्य रक्कम येते तेंव्हा डोळ्यात पाणी येतं. मानेची हाडं दिसणारी, बिन कपड्यातली मॉडेल्स बघताना लोक थेटरात डोळे पटापट पुसून आ वासून बघतात, ते केवळ अविस्मरणीय दृश्यं.

खूप दिवसात पॅरिसच्या गल्ल्या, रेसिंग कार्स, आयपीएलच्या टीमचा लिलाव पाहिला नसेल, कंडा मॉडेल्स बघून छातीत डाव्या बाजूला हलल्यासारखं वाटलं नसेल, डोळ्यात काहीही गेलेलं नसताना डोळे पुसावेसे वाटत असतील आणि पडद्यावरची पुष्ट ललना बघून कंठमणी हलला नसेल तर 'विजयची काशी' बघाच एकदा.

जयंत विद्वांस




Wednesday 9 March 2016

नमूने (१)…

नमूने (१)… 

प्रत्येक माणसात एक विक्षिप्तं माणूस दडलेला असतो असं माझं मत आहे. प्रत्येकजण तो विक्षिप्तपणा चारचौघात दाखवतोच असं नाही. काहीजण लोकांना काय वाटेल वगैरे विचार करून ती उर्मी दाबतात, काहीजण सहनेबल झालं नाही की तसं वागतात, काहीजण रेग्युलर तसं वागतात. माणसाला अंदाज आला की आपला त-हेवाईकपणा खपतोय की मग अशांना अजून चेव येतो. पण जे न ठरवता तसं वागतात ते लोक मला प्रिय असतात किंवा समानधर्मी असतील म्हणून आवडत असतील पण हे लोक मजा आणतात. 

मी रस्टनला असताना दोनेकशे पोरं होती अप्रेंटीस म्हणून. त्यात पण ज्युनिअर, सिनिअर प्रकार होताच. ते प्रकरण संपून सुद्धा २९ वर्ष झाली. क्वचित कुणाची भेट होते. सगळी नावं काही आता लक्षात नाहीत पण काही अर्क डोक्यात नावानिशी लक्षात आहेत. आम्हांला सिनिअर एक नरेंद्र आगाशे म्हणून वल्ली होता. पराकोटीचं घाणेरडं, अचकट विचकट बोलण्यात त्याचं तोंड कुणीही धरू शकणार नाही, असा होता. सणसणीत सहा फूट उंची, गोरापान, सुदृढ, हसरा तोंडावळा, हुशार पण येड्याचा आव आणणारा. जेवण, बोलणं, वागणं एकूणच आचरट प्रकार. त्याच्या अचाट कल्पना मी इथे देऊ शकत नाही इतकं बीभत्स, अश्लील सुचायचं त्याला. उदा : समजा तोंड नाकाच्या खाली ऐवजी बेंबीच्या खाली असतं तर काय झालं असतं? असल्या विषयांवर चर्चा. मग अगदी सरस्वती जिभेवर नाचायची त्याच्या. त्यात माझी सोबत म्हणजे दोन आचरट प्रवक्ते एकत्रं आल्यावर उडतो तसा धुरळा चालू असायचा. पण कुणी काही बौद्धिक, सिरिअस बोलत असलं तर मात्रं न-याचा वेगळा चेहरा दिसायचा.

अभ्यासात तो हुशार होता पण दाखवायचा नाही तसं. युनिव्हर्सिटीच्या मागे आम्ही क्रिकेटायला जायचो सायकल हाणत, तिथे यायचा तो आमच्याबरोबर खेळायला. अत्यंत हजरजबाबी, मदतीला तत्पर, फटकळपणाचा, आचरटपणाचा मुखवटा लावलेला न-या. इतक्या वर्षात कधीही साधा रस्त्यात सुद्धा दिसलेला नाही. आता अवचित कुठे बायकापोरांबरोबर भेटला तर उपयोग नाही, रस्त्यात त्यांच्या समोर सभ्यंपणा दाखवायला त्याची होणारी कुचंबणा मला बघवणार नाही. 


अजून एक सिनिअर होता औरंगाबाद की मराठवाड्याकडचा, मुळे त्याचं आडनाव. एरवी अतिशय विनोदी बोलणार, चेष्टा मस्करी करणार पण त्याचं काही बिनसलेलं असलं की समोर उभा रहाणार 'आजपासून दोस्ती खतम आपली' एवढं बोलून निघून जाणार. त्याला का? वगैरे विचारायचं नाही. त्याचा मूड जागेवर आला की तो बोलायचा. परवा आपण काय बोललो हे त्याच्या लक्षात पण नसायचं. आठवण करून दिली तरी 'ते मरू दे रे, बोलू का नको बोलू सांग आत्ता' असा चिडायचा.

मी, मिलिंद घाणेकर आणि ड्यानिअल असे जेवायला बसायचो काही महिने एकत्रं. दोघेही मला सिनिअर. ड्यानिअलएवढा थंड रक्ताचा प्राणी मी आजतागायत बघितलेला नाही. भरताचं करपलेलं वांगंसुद्धा उजळ दिसेल इतका तो काळा जांभळा होता. पण काळ्या रंगाला एक मस्तं तुकतुकी असते तसा होता तो आणी चेहरा कायम हसतमुख. मी आणि घाणेकर दोघांना एकावेळी त्यानी हाणला असता आरामात पण त्याला मी कधीही चिडलेला पाहिला नाही. प्रत्येकजण त्याला त्याच्या रंगावरून चिडवायचा, टोमणे मारायचा पण हा हसरा बर्फ. नंतर नंतर सगळं आपोआप कमी झालं कारण तो चिडायचाच नाही. पब्लिक ज्या हेतूनी त्याला बोलायचं तो ते साध्यंच होऊ द्यायचा नाही. त्याला ती बुद्धी सतराअठराव्या वर्षीच होती, जी आमच्याकडे नव्हती. अर्थात हा सगळा प्रकार त्याच्या लहानपणापासूनच असणार पण तरीही राग येउन द्यायचा नाही, हे अवघड होतं. 


माणसं आयुष्यात येतात, भेटतात, सोबत रहातात, काही दुरावतात, नाहीशी होतात, खोडरबरनी खोडावीत अशी पुसली जातात स्मृतीतून, काही उगाच लक्षात रहातात, काही कारणांनी लक्षात रहातात. त्या 'अनुरोध' मधल्या गाण्यात आनंद बक्षीनी हे सगळं सुंदर लिहिलंय 'आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे, कभी कभी इत्तेफ़ाक से, कितने अनजान लोग मिल जाते हैं, उन में से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं! माझ्या पोतडीत असे असंख्य नमुने आहेत. सगळेच चांगले नव्हते तसंच सगळे वाईटही नव्हते. त्यांना चांगलं वाईट आपण आपल्या मतलबानुसार, सोयीनुसार ठरवतो नाहीतरी. कुठेतरी कुणीतरी स्वत:चा उल्लेख इथे वाचेल, कदाचित मी अंधुकसा आठवेनही त्यांना, माहित नाही, मुळात लिहिण्याचा हेतू तो नाही. सरलेल्या काळातले आता जे आपण करत नाही ते उद्योग, गप्पा, प्रसंग आठवतात, मग ती माणसं आठवतात, एवढंच.

जयंत विद्वांस 



सहृदयी लोकांस आवाहन....

सहृदयी लोकांस आवाहन....

थोर सद्गृहस्थ श्री.विजय मल्ल्या सध्या खूप अडचणीत आहेत. त्यांच्याविरुद्ध पासपोर्ट जप्ती, बँकेतून पैसे काढण्यास अटकाव, अटक करणे वगैरे अत्यंत निर्दयी उपाय करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे अशी अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी वाचली.

या सद्गृहस्थाने पैशेवाल्या लोकांसाठी हवेत उडण्याची सोय केली आणि जोडीने कमी खर्चात गरीबांसाठीही हवेत तरंगण्याची व्यवस्था केली याची सरकारला जाण नसली तरी सामान्य माणसाला हवी. इतकी वर्ष व्याज भरूनसुद्धा क्षुल्लक मुद्दलासाठी बँकेने सरकार, न्यायालयाकरवी मागे लागणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे.

अशा उपायांनी अनेक भावी उद्योगपती उद्योगवाढीसाठी कर्ज घेण्यास कचरतील. कर्ज काय कुणी बुडवण्यासाठी घेतो का? धंदा बुडू शकतो. त्यामुळे परतफेड शक्य नसते, इतका साधा विचार सरकार का करत नाहीये याचा अचंबा वाटल्याशिवाय रहात नाही. ज्या मालमत्तेच्या तारणावर कर्ज दिले ती मालमत्ता बँकेने ताब्यात घ्यावी. किंगफिशर या नावाच्या गुडविलवर काही शे कोटी दिले यात विजयभाऊंची काय चूक? हवं तर खुशाल बँकेने ते नाव जप्त करावं पण त्यांच्या उतारवयात त्यांना या मानहानीकारक यातना देऊ नयेत.

सहाराचा सुब्रतो एकटा पडलाय आत हे कारण सयुक्तिक वाटत नाही यासाठी. संजूला शिक्षा झाली म्हणून सल्लूला का नाही असं विचारण्यासारखं आहे हे. आधीच शेतकरी आत्महत्या करत आहेत आता उद्योगपतींना करायला लावू नका अशी सरकारला विनंती आहे. 

दिवस काय कुणाचे रहात नाहीत. आपण सर्व सामान्य माणसांनी विजयकाकांच्या उत्पादनाची जोरदार खरेदी करूयात, जेणेकरून त्यांची कंपनी नफ्यात जाईल आणि त्यांना कर्जफेड शक्यं होईल. बँकेत स्पेशल काउंटर उघडून तिथे किंगफिशर आणि त्यांची इतर उत्पादनं कर्जफेड सेस लावून विक्रीसाठी ठेवण्यात यावीत. हाहा म्हणता कर्ज संपेल. मग परत एकदा The Thief will be King of good times.

जयंत विद्वांस