Monday 31 August 2015

सत्तर एमएम चे आप्तं (२)….चंद्रा बारोट.....

'डॉन'ची स्टोरी मी सांगण्यात काही हशील नाही, बच्चा बच्चा जानता है. गाणी, डायलॉगज्, सीन टू सीन तो पब्लिकला पाठ आहे. मी लहान असताना नीलायमला पाहिलेला डॉन नंतर अनेकवेळा बघितला. सेटम्याक्सच्या कृपेने तो वारंवार बघितला जातो. त्याचं ते पोस्टर, 'डी' आणि 'एन' च्या मधे लहान आकारातला तो 'ओ' आणि कडेला पळणारा अमिताभ 'बोल्ट'. त्या पळण्यासाठी मी कितीतरी वेळा तो पाहिलाय. बाकी रिमेक मग डॉनचा असो नाहीतर जंजीरचा असो, बघायची माझी डेअरिंग होत नाही, तर तेंव्हापासून मला चंद्रा बारोट या माणसाविषयी कुतूहल होतं.

'हसता हुआ नुरानी चेहरा' गाणा-या कमल बारोटचा चंद्रा बारोट हा भाऊ. टांझानियात जन्माला आलेला चंद्रा जातीय दंगलीमुळे १९६७ ला तिथून विस्थापित झाला. लंडनला सेटल व्हायच्या आधी तो बहिणीला भेटायला भारतात आला. तिनी कल्याणजी आनंदजीशी त्याची ओळख करून दिली आणि त्यांनी मनोजकुमारशी. तेंव्हा 'उपकार'चं काम चालू होतं. यानी त्यातली एक चूक मनोजकुमारला दाखवली. मनोजकुमारनी त्याला असिस्ट करायची ऑफर दिली पण ती नाकारून तो लंडनला गेला. तिथे काही नशीब अजमावता आलं नाही म्हणून तो परत आला आणि रु.४५०/महिना फक्तं पगारावर मनोजकुमारचा 'यादगार'साठी सहाय्यक झाला. नंतर त्यानी पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, शोर त्याच्याबरोबर केले. त्यानीच बच्चनची गाठ मनोजकुमारशी घालून दिली पण 'यादगार'मधे रोल नसल्यामुळे त्यानी त्याला 'रोटी कपडा' मधे घेतलं ज्याचा क्यामेरामन होता 'चौदहवीका चांद'वाला नरिमन इराणी. तिथली दोस्ती त्यांची, अमिताभ, झीनत, इराणी आणि बारोट.  

७२ ला काढलेल्या 'जिंदगी जिंदगी' मुळे नरिमन इराणी कर्जबाजारी होऊन रस्त्यावर आला होता. नवीन चित्रपट काढून त्याला परत उभा करणे एवढंच हातात होतं. वहिदा रहेमाननी शब्दं टाकून शेजारी रहाणा-या सलीमला स्क्रिप्ट द्यायला सांगितला इराणीला. कधी नव्हे ते सुबुद्धी सुचलेला देवानंद, धर्मेंद्र आणि प्रकाश मेहरानी नाकारलेली निनावी स्क्रिप्ट यांना मिळाली. सलीम त्याला डॉनवाली स्क्रिप्ट म्हणायचा म्हणून चंद्रा बारोटनी तेच नाव बुक केलं. नुकताच 'जंजीर'ही आला होता. झीनत आणि बच्चननी पण मदत करण्याची तयारी दर्शवली. दुस-या हाफमधे गाणं नाही हे मनोजकुमारनी सुचवलं म्हणून देवानंदच्या 'बनारसी बाबू' मधून वगळण्यात आलेलं 'खईके पान बनारसवाला' यात आलं. खरंतर डॉन शब्दाचा स्प्यानिश अर्थ आहे सद्गृहस्थ त्यामुळे मनोजकुमारनी नावात सुचवलेला 'मिस्टर डॉन' हा बदल त्यानी नाकारला.


घरीच इन्स्पेक्टरचे ड्रेस होते साताठ म्हणून तेवढाच खर्च कमी करणारा इफ्तेखार डीएसपी डिसिल्वा झाला. टोप घातलेला, सगळे काळे कपडे घालणारा, पांढरा पट्टा लावणारा प्राण 'जसजीत उर्फ जेजे' झाला. झीनत 'रोमा', 'वरधान' ओम शिवपुरी, 'कामिनी' हेलन, कमल कपूर 'नारंग', अर्पणा चौधरी 'अनिता'. ज्युडो कराटे शिकवणारा पी. जयराज, सत्येन कप्पू 'इन्स्पेक्टर वर्मा' आणि टकलू शेट्टी. प्रत्येक पात्रं लक्षात राहील अशी पटकथा आणि अजरामर होतील असे वन लायनर्स सलीम जावेदनीच लिहावेत. 'डॉन को पकडना….', 'मैं तुमसे इतनी नफरत नही करता…', 'मुझे जंगली बिल्लीया….'. 'सोनिया,ये तुम जानती हो….'. प्राण मला नेहमीच आवडत आलाय, तसा त्याचा रोल फार मोठा नाहीये, दुसरा कुणी असता त्याच्या जागी तर तो एवढा गाजलाही नसता कदाचित. डॉनची सिग्नेचर ट्यून आणि अरे दिवानो, ये मेरा दिल साठी कल्याणजी आनंद्जीचा मी ऋणी आहे.


दुर्दैव माणसाची पाठ सोडत नाही. लांबलेला पाकिजा रिलिज झाला तेंव्हा त्याचं यश बघायला गुलाम मोहमद नव्हता, तो गरिबीतच गेला. डॉन रिलीज व्हायच्या आधी इराणीला अपघात झाला आणि यश न पाहताच तो गेला. ७८ ला त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर आणि सत्यम शिवम सुंदरम आले. यांच्याकडे जाहिरातीसाठीही पैसे नव्हते. पण म्हणतात ना नाणं खणखणीत असेल तर वाजतंच. तेंव्हा ८४ लाख लावलेल्या डॉननी आजवर +३१० कोटी धंदा केला. नरिमन इराणी मरणोपरांत कर्जमुक्त झाला. चंद्रा बारोट सारखा दोस्त असायला हवा. त्याचं नशीब मात्रं काही फळफळलं नाही. दिलीपकुमार सायराबानूला घेऊन तो 'मास्टर' काढत होता तो बंद पडला. सारिकाला घेऊन 'तितली' काढत होता, तिनी लग्नं केलं, तो ही बंद पडला. बोनी कपूरचा पहिला सासरा सत्ती शौरी मल्टी स्टारर 'लॉर्ड कृष्णा' काढणार होता, तो बंद पडला. इराणी जगायला हवा होता, बारोटनी अजून नगिने दिले असते, एवढं खरं. विनोद खन्ना, जयाप्रदा आणि ड्यानीला घेऊन त्यानी 'बॉस' काढला होता पण  त्याचा सिनेमा लावायला कुणी तयार होत नव्हतं, काळाचा महिमा.  

मला नेमकं आठवत नाही पण गीतकार(?) समीर की त्याचे वडील अंजानच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं अमिताभच्या हस्ते. बोलता बोलता अमिताभ म्हणाला, 'मी आलोच असतो प्रकाशनाला, माझं करिअर घडवण्यात अंजानसाहेबांच्या 'खईके पान बनारसवाला'चा मोठा वाटा आहे.' अशी कृतज्ञता आता दुर्मिळ आहे. पाय जमिनीला घट्ट चिकटलेले असले की माणसं आभाळा एवढी मोठी होतात हेच खरं. दिलीपकुमारच्या वाढदिवसाच्या पार्टीत बारोटनी शाहरुख आणि प्रियांका चोप्राचं डॉनच्या यशाबद्दल अभिनंदन केलं. शाहरुख म्हणाला, 'सर, ओरिजिनल तो ओरिजिनल है', चोप्रा म्हणाली. 'we are making money out of something that you created'. एवढं बोललं तरी खूप असतं माणसाला, नाही का?.


चंद्रा बारोट, तू दोनच दोन अक्षरी चित्रपट बनवलेस, 'बॉस' लक्षात नाही कुणाच्या पण तुझा 'डॉन' अजरामर आहे. मी डोळे मिटेपर्यंत अजून दोनचार रिमेक येतील बहुतेक त्याचे. ते बाकी तुझं डायरेक्शन कसं होतं, कुठे काय चुकलं वगैरे ते मरू दे, कुणालातरी तू मदतीचा हात देण्यासाठी उभा राहिलास हे लक्षात राहील फक्तं.  

जयंत विद्वांस 


Thursday 20 August 2015

तो….

तसा मी माणूसघाणा माणूस आहे. तरीही काही लोकांशी मैत्रं  का जुळतं ते माहित नाही. उगाचच प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करणं हा माझा आणि त्याचा स्वभावही नाही. त्याचा म्हणजे 'तो' चा. साधारण तीनेक वर्षापूर्वी आमची ओळख झाली. आभासी जगातील ओळख म्हणजे चायना मेड मटेरीअल. ही ओळख अत्यंत आकर्षक दिसते, काही काळ चमकते, भुरळ पाडते पण कधी मान टाकेल सांगता येत नाही. आभासी जगातील माणसं लांब असतात तेंव्हा अतिप्रियं असतात, एकदा भेटले, घसट वाढली की हळूहळू अभिषेक बच्चनच्या करिअरसारखी त्या ओळखीला उतरती कळा लागते. एकमेकांना मिसणं कमी होतं जे मुळात नसतंच फार. माझं देव आणि मित्रं यांच्या बाबतीत सारखंच मत आहे. त्यांना रोज हात करायलाच पाहिजे असं काही नाही, दोघांना कळतं की कुठेतरी मनात आठवण शिल्लक आहे, म्हणायलाच पाहिजे असं काही नाही, दोघांना भेटल्यावर बोलण्यासारखं खूप असलं पाहिजे. तो तसाच आहे. आमच्या रोज उठून गप्पा होत नाहीत, महिनोनमहिने फोन होत नाहीत, हयात आहे, नाही, काहीही माहित नसतं पण असतं मनात कुठेतरी, करायला पाहिजे फोन म्हणून.  

तो एकटा आहे, अविवाहित (ब्रम्हचारी नाही). सहसा कुणाच्याही खाजगी आयुष्यात मी डोकावत नाही. आपण उगाच अर्धवट माहितीवर मत बनवण्यात काही अर्थ नसतो, आपल्याला सांगावंसं वाटलं किंवा आपली तेवढी लायकी आहे असं समोरच्याला वाटलं तर तो सांगतोच. त्यमुळे मी त्याला त्याचं कारण कधीच विचारलेलं नाही, विचारणारही नाही. काही लोकांचा सुखी होण्याचा मार्ग दुसयाची दु:खं, अडचणी विचारून ती आपल्याला नाहीत असा असतो. तर मूळ मुद्दा 'तो'. माझ्या पोस्ट्सना तो लाईक, कॉमेंट करायचा. तो फार कमी लिहितो पण रसिकतेने लाईक, कॉमेंट करतो. तसा तो मिश्किल आहे. ग्रेस, गुलजारचा झिजलेला कार्बन घालून खरडलेल्या दुर्बोध रचना(?), कविता त्याच्यासाठी उत्तम विनोदी लिखाण वाचायला मिळाल्याचा ठेवा असतो. पण तसा तो कुणाला नाराज करत नाही. त्याची कॉमेंट नसेल तर त्याचा अर्थ पोस्ट नजरेतून सुटली, त्याला वेळ नाही किंवा ती कॉमेंटायच्या लायकीची नाही एवढाच आहे.

गप्पा वाढत गेल्या मग तो माझ्या घरीही आला चारपाच वेळा. इतर लोकांबद्दल बोलणं कमी होऊन आपण एकमेकांविषयी बोलायला लागलो की आपण मित्रं झालो असं माझं मत आहे. त्याला महिन्यातून दहाबारा दिवस वाणं वाटत फिरायला लागतं जॉबमध्ये, त्यामुळे तो कधीही भेटायला येऊ शकतो. सुख आणि तो यात साम्यं आहे. दोन्ही कधीही येतात, न सांगता येतात, अल्पकाळ रहातात, पुढच्या येण्याची वाट बघायला लावतात. असाच तो मधे येउन गेला. 'तू कधी तरफडणार आहेस माझ्याकडे?' 'अरे, मी कशाला येतोय तिकडे आणि ते ही स्वखर्चानी? तुझ्यासारखं स्पॉन्सर्ड नशीब नाहीये बाबा माझं'. 'तुम्ही कधी सरळ बोलला आहेत का कोकणी, कुचकेपणा नसेल तर समोरच्याला चुकल्यासारखं होईल याची काळजी मात्रं सतत घ्या तुम्ही'. पुण्यात जन्म झाला की मुळामुठेच्या पाण्यातच असलेलं ते खवचट बाळकडू आपोआप मिळतं, वेगळे प्रयत्नं करावे लागत नाहीत. 

तर परवाच त्याच्याकडे जाउन आलो, आमचं बोलणं झाल्यावर दोनेक महिन्यांनी. मला त्याच्या गावात काम निघालं, त्याला फोन केला स्वस्तात लॉज कितीपर्यंत मिळेल? '**घाल्या, कुठल्या गाडीनी येणारेस एवढंच सांग, कुणाला घेऊन जायचंय का तिथे? मी सोडतो तासाभरासाठी हवंतर तिथे'. मी सकाळचाच उतरलो, पाच वाजेतोवर माझं काम केलं आणि त्याला फोन केला. शनिवार होता, तो घ्यायला आला, मग त्याच्या घरी गेलो. तीन रूमचा फ्लाट होता मस्तं. 'फ्रेश हो, गिळायला बाहेर जाऊ'. बाहेर गेलो आणि जेवून आलो. त्याच्या फ्लाटला मस्तं ओपन टेरेस आहे. खुर्च्या, पाय ठेवायला दोन स्टूल घेतली आणि बसलो. तो निर्व्यसनी आहे. त्यानी गाणी लावली एफेमवर. फोनची सेव्ह्ड गाणी ऐकायला कंटाळा येतो, आपल्याला क्रम माहित असतो, उत्सुकता रहात नाही, एफेमला ती मजा मिळते, कधी काय पदरात पडेल सांगता येत नाही. 'ये जिंदगीके मेले, दुनियामें कम न होंगे, अफसोस हम न होंगे' लागलं. 'तुझं वय किती रे?' 'तुझ्याएवढंच'. '२/३ आयुष्यं संपलं की रे'. मग विषयातून विषय निघत गेला आणि तो मोकळा झाला. 

'ब-याच दिवसांनी दोन आवाज ऐकले या भिंतीनी, रोज मी एकटाच बडबडतो. कंपनीचा फ्लाट आहे म्हणून नाहीतर मला काय करायच्यात तीन रूम्स, मी हॉल मधेच झोपतो तसाही. नाही केलं लग्नं, फार काही अडलंही नाही म्हणा तसं माझं. भाऊ माझ्यापेक्षा मोठा दहा वर्षांनी. त्याचं लग्नं झालं तेंव्हा मी दहावी झालो, दारू प्यायचा तो, मुंबईतील दोन खोल्या, आई, वडील, मी, ते दोघे . पाच माणसं रहायचो खुराड्यात. त्यांची रोज भांडणं चालायची. चुका दोघांच्याही होत्या, कुणाची बाजू घेणार? कंटाळलो सगळ्याला. घरात जाताना सतत दडपण असायचं, ग्राज्युएट झालो आणि लगेच नोकरी पकडली कारण पुणे ऑफिसला पोस्टिंग होतं. लगेच हो म्हणालो. पंचवीस वर्ष झाली बाहेरच आहे. त्याचा घटस्फोट झाला दहा वर्षांनी, मुलगी याच्याकडेच आहे. या सगळ्या रामायणात त्याचा जॉब गेला, आईवडील ही नाहीत आता. जोडून सुट्ट्या आल्या की मी जातो घरी, दोन दिवस रहातो, परत येतो. इच्छाच झाली नाही माझी, शरीराची गरज होतीच पण सारखी भीती वाटायची, असाच अनुभव आला तर?' 

'मी ठरवलंच, नको व्याप. देशविदेश, अनेक शहरं फिरलो, पाचशे रुपयापासून अठरा हजार रुपयापर्यंतचं क्षणभंगूर सुख विकत घेतलंय अगदी. आता त्याचाही फार मोह होत नाही, कंटाळा येतो खरंतर तेवढ्यासाठी जाण्याचा. असो! पण मी कामावर फेमस आहे, कमीतकमी सुट्ट्या घेणारा माणूस, लोकांना दिवाळी, ईद किंवा आपापल्या सणाला जायचं असतं तेंव्हा मी ग्यारंटीड लोकम असतो. सुट्टी घेऊन करू काय सांग, शनिवार रविवार मला निघत नाही इथे. तुला घर स्वच्छ दिसतंय ते माझा वेळ जात नाही दोन दिवस म्हणून. पण मी सुखी आहे. लोकांचे प्रॉब्लेम बघतो आणि सुटल्यासारखं वाटतं सगळ्यातून. शंभरेक पुस्तकं आहेत, डाऊनलोड केलेली वेगळीच. संध्याकाळी जेवण झालं की पुस्तकं किंवा एफबी वाचतो, कंटाळा आला की झोप येतेच मग. असो? काही 'माणसं' सापडली गेल्या काही वर्षात त्यांना भेटतो, रमतो, त्यांना आणि मला कंटाळा यायच्या आत निघतो. चुटपूट लागेल एवढाच सहवास असावा, काय म्हणतोस?' 'खरंय, निघणार आहे मी उद्या'. डोळ्यात पाणी येईस्तोवर हसलो. 'सरळ बोलशील तर शपथ, नवी पेठेत लांबच्या रोडनी नेणार बघ मी तुला'. मग झोप येईस्तोवर खूप बोलत बसलो. 

उशीराच उठलो. माझी चारची बस होती. त्यानी घरीच मटकीची उसळ, पोळ्या आणि भात केला. बाहेर जाऊ शकत होतो पण त्यानी हौसेने केलं. माझी मदत पाण्याच्या बाटल्या भरून घेणे एवढीच. त्यानी चांगलंच बनवलं होतं. जेवण संपताना लक्षात आलं हे तो रोज जेवतो. हॉटेलचं कौतुक आपल्याला कधीतरी जातो म्हणून, तो कंटाळलाय हॉटेलला. 'इतकी वर्ष तेच खातोय रे म्हणाला. कधी मग पोहे, उपमा करतो, कधी नुसती फळं खातो, कधी उपास करतो चक्कं कंटाळा आला की. एकदा थालीपीठ करायला गेलो, रात्री, दुस-या दिवशी सकाळी आणि डब्यात, एवढा गोळा भिजवला होता.' मला घरी चविष्ट मिळतंय त्यामुळे प्रत्येक गोष्टीत खोट सापडते त्यादिवशी आयुष्यात पहिल्यांदा जेवताना चव काय, पोळीचा आकार काय, कच्ची आहे का, काहीही लक्षात आलं नाही.  

गाडी सुटताना तो म्हणाला,'महाराज, गडावर पोचलात की तोफा उडवा, मिसकॉलचा शोध आपल्याच शहरात लागलाय, तेवढा करा म्हणजे खर्च होणार नाही काही'. पाठमो-या जाणा-या 'तो'ला बघून ठरवलंय मी, यायला पाहिजे वर्षातून एकदा तरी, तो येवो न येवो.  

--जयंत विद्वांस 

(यातला काल्पनिक भाग खरा आणि खरा भाग काल्पनिक वाटण्याची शक्यता आहे त्यामुळे कुणीही 'तो'ला माझ्या मित्रंयादीत, आजूबाजूच्या माणसात शोधण्याचा प्रयत्नं करू नये. 'तो'ची कथा सांगणारा 'मी' मी असेनच असं नाही)
 
 
 
 

Wednesday 19 August 2015

माया.....

भोपळ्यासारख्या सुटलेल्या पोटाचा नागू भटजी चालताना मोठा मजेशीर दिसायचा. सकाळी स्नान झाल्यावर पोटावर बांधलेलं धोतर दहा एक मिनिटात वीतभर खाली सरकलेलं असायचं. सुटण्याच्या भीतीनी तो ते परत घट्ट आवळून घ्यायचा. ओथंबलेल्या पोटाखाली ते नाहीसं व्हायचं आणि मग फक्तं मागच्या बाजूनी ते दिसत असल्यामुळे जंगलात पाऊलवाट गायब व्हावी तसं कमरेच्या दोन्ही बाजूनी ते अदृश्यं झाल्यासारखं दिसायचं. करगोटा आणि जानवं दोन्ही आलटून पालटून वापरलं असतं तरी चाललं असतं असं एकाच रंगाचं झालं होतं. वाढलेलं वजन त्याचं त्यालाच पेलवायचं नाही. त्याची फुफुसं आणि नाक यांचं कायमचं हाडवैर होतं. हट्टी मुलासारखी फुफुसं कायम मागणी करायची आणि पुरवठा करताना ऑक्सिजन पंपून नाकाच्या नाकी नऊ यायचे अगदी. नाकाची कीव येउन त्याच्या मदतीला तोंड सतत उघडं राहायचं. झिरमिळ्या सोडल्यासारख्या असलेल्या मिशांचा नागू त्यामुळे अजूनच विचित्रं दिसायचा.  

थोड्याश्या चालीनी पण नागू अभिषेकपात्रं डोक्यावर ठेवलेल्या पिंडीसारखा सतत घामानी ओला दिसायचा. कधीकाळी पांढरा रंग असलेला पंचाचा कळकट्ट चौकोनी तुकडा त्याच्या खांद्यावर असायचा. सिझन कुठलाही असो, घाम येवो न येवो, दर दोन मिनिटांनी तो खांद्यावरून पंचा काढून डोकं, तोंड आणि मान खसाखसा पुसायचा. कुणीतरी अचानक झडप घालेल अशी भीती असल्यासारखा तो दहा पावलांवर थांबून श्वास गोळा करत आजूबाजूला बघायचा आणि मग पुढे निघायचा. वाटेत कुणी भेटलं की त्याला थांबण्यासाठी कारण मिळायचं. समोरून येणारा माणूस 'काय नागूभट, बरंय ना' म्हणून त्याला वळसा घालून निघून गेला तरी तो तिथेच मिनिटभर थांबायचा. कोकणातल्या आडगावात नागू अंत्यविधीची कामं करायचा. कोकणी माणूस आधीच चिवट त्यामुळे नागूला सटीसहामासी काम असायचं. गेल्या महिन्या दोन महिन्यात कुणी मेलंच नव्हतं गावात. कुणी गेलं की गेलेला दिवस, दहावा, तेरावा असा तो व्यस्तं असायचा, तेवढाच त्याचा वेळंही जायचा, दोन पैसेही मिळायचे.

त्याचा वर्षात सगळ्यात प्रिय काळ कुठला असेल तर पितृपंधरवडा. रोज सकाळ, संध्याकाळ जेवायला आमंत्रण असायचं, पैसे कनवटीला यायचे. दिवसातून दोनदाच जेवायचं आमंत्रण आणि फक्तं पंधरा दिवसाचा काळ याचं त्याला दरवर्षी दु:खं व्हायचं. आपण त्यात काहीही बदल करू शकत नाही यामुळे त्याला अजूनच वाईट वाटायचं. शहरातून आलेला समव्यावसायिक बघितला की त्याच्या बोलण्यातून शहरात याच कामासाठी मिळणारे पैसे ऐकून त्याचा तिळपापड व्हायचा. मग तो चारपाच दिवस घरात मयत झाल्यासारखा दु:खी चेहरा करून फिरायचा. आपण उगाच इथे थांबलो, पुण्यामुंबईकडे गेलो असतो तर रग्गड पैसा मिळवून आत्ता सतत पान खाऊन, दात कोरत गावात फिरलो असतो असा विचार त्याला सतावायचा पण नंतर त्याचीच त्याला शरम वाटायची. मुळात त्याला सगळे मंत्र, विधी यायचे नाहीत हे तो जाणून होता. गावाला दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे नागूभटाची झाकली मूठ शाबूत होती. 

आज पण सकाळी सकाळी आईनी पातेलंभर दडपे पोहे, पोह्याचे चार पापड त्याच्या समोर आणून रागानी आदळले होते तरी त्याला त्याचं काही वाटलं नाही. परशुरामानी नि:क्षत्रियं पृथ्वी केली तसं त्यानी दहा मिनिटात पातेलं नि:पोहे करून टाकलं आणि निम्मं पाणी छातीवर सांडत तांब्यानी घटाघटा पाणी पिऊन सगळ्या गावाला ऐकायला जाईल एवढी मोठी ढेकर दिली आणि पडवीतून आत डोकावून बघितलं. आईनी रागारागानी बाहेर येउन सांडशीसकट चहाचं पातेलं, स्टीलचा मोठ्ठा ग्लास त्याच्या समोर आदळला आणि ती आत निघून गेली. शेवटच्या घासाला लागलेल्या मिरचीनी आधीच तोंड पोळलं होतं तरी त्यानी पाउण ग्लास गरमगरम चहा ओतून घेतला आणि मिटक्या मारत आनंदानी संपवला. अजून पातेल्यात जेमतेम अर्ध्या ग्लासचा ऐवज शिल्लक असल्याचं पाहून त्याला दु:खाचा उमाळा आला. अतीव दु:खानी त्यानी तो ग्लासात ओतून घेतला आणि कमी असल्यामुळे अगदी चवीचवीनी प्यायला. 

मस्तं पंखा लावून थोडसं लवंडावं असा विचार बळावत असतानाच आतून आईनी हाक मारली त्यामुळे त्याचा हिरमोड झाला. पुलावर जाऊन वाणसामान आणि दळण आणायचं होतं ते त्याला आठवलं, 'जेवून झाल्यावर जावू काय?' आतून आई पाय आपटतच आली. 'फुटशील एखादे दिवशी सारखं खाऊन, मी मेले एकदा की गवत खावं लागेल. दळण आणलंस तर भाकरी मिळेल ना गिळायला? कुठून भस्म्या शिरलाय अंगात, झोळाईच जाणे. कष्ट नकोत शरीराला, नुसता आराम आणि खायला पाहिजे. उठ, तासाभरात सगळं आणलंस तर भाकरी करेन नाहीतर दोन वाडगे भात एकटाच खा. उन्हं वर आली की आतमधे चुलीपुढे बसवत नाही, एक पंखा लाव सांगतीये तिथे तर ते होत नाही'. आईची बडबड ऐकण्यापेक्षा उठलेलं बरं या विचारानी तो चपळाईनी उठला. कमरेभोवती धोतरात दोन्ही बाजूंनी बोटं घालून त्यानी ते सारखं केलं. खुंटीच्या दोन पिशव्या घेतल्या, कोनाड्यात उभा राहून सुपारी कातरून ती तोंडात टाकली, काताचा लहानसा खडा, चुना लावून एक अर्ध पान दाढेखाली सरकवलं वरून तंबाखूची चिमूट सोडली आणि 'आता पुलापर्यंत कुणीही हटकायला नको, नाहीतर एवढा सगळा रस थुंकावा लागेल' असा विचार करत तो निघाला. 

नाग्याच्या चार आणि आपल्या दोन भाक-या करायच्या तिच्या जिवावर आलं होतं. कमरेला हात लावून ती उठली आणि पडवी झाडता झाडता कुणाशी तरी बोलल्यासारखं बडबडू लागली. 'कमाई नाही दिडकीची, खाऊन फुगलाय नुसता, मी मेल्यावर काय करेल हा, पालासुद्धा खाईल उकडून किंवा घाई असली तर नुसता सुद्धा खाईल. कलिंगडासारखं पोट झालंय, कोण पोरगी देणार याला, ना रूप, ना शरीर, ना बुद्धी, ना काम, असा कसा निपजलाय काय माहित. मला मेलीला एक मरण येत नाही वेळेत. सुटेन तरी, याची काळजी कुठवर करू? हा उद्या पडला आजारी किंवा मेला अगदी तरी याला इथेच ठेवतील लोक. डोंगर उतरून याला नेणार कोण? फरफटत न्यायला सुद्धा जमणार नाही लोकांना'. शेवटच्या वाक्यानी आई भानावर आली आणि तिनी शरमेने पटपट झाडायला सुरवात केली. 'आहे एका भाकरीपुरतं पीठ आणि एक चांदकी पण होईल वर, आल्याआल्या भूक भूक करेल, करून ठेवते', असं म्हणत ती चुलीकडे गेली.    

--जयंत विद्वांस


कितने आदमी थे….

शोले पंचाहत्तर साली हाफ चड्डीत असताना तिसरी किंवा चौथीत पाहिलेला मी नटराजला, सत्तर एमेम पडदा म्हणजे काय हे आयुष्यात पहिल्यांदा बघितलं होतं. तिसरी चौथीच्या बुद्धीच्या मानानी मला प्रत्येक पात्राविषयी चिकार प्रश्नं पडलेले त्या वेळेस आणि बरेचसे गैरसमजही झालेले कारण हिंदी पाचवीपासून असायचं आणि सिनेमे क्वचित बघायला मिळायचे त्यामुळे त्या भाषेची एकूणच माहिती कमी होती. जी काय भाषा माहित होती ती 'भैय्या हमने भांडा घासा लेकिन दूध नासा' लेव्हलची. 

तर काही प्रश्नं, शंका अशा होत्या : 

१) अमजद - तो ओठात तंबाखूची चिमूट न ठेवता जराशी मळून तोंडात टाकतो तेंव्हा ती त्याच्या नाकात कशी जात नाही, त्याला शिंका कशा येत नाहीत, तो इतका कळकट्ट का राहतो
२) संजीवकुमार - ठाकूरला कपडे कोण घालतं? त्याला जेवण कोण भरवतं?
३) जया भादुरी - ही ठाकूरची सून आहे तर मग कामवालीसारखे दिवे का बंद करते फक्तं?     
४) हेमा मालिनी - जब तक है जां, मैना चुंगी असं गाणं का म्हणते? कित्त्येक दिवस राघु मैना सारखी मैना चुंगी अशी पक्ष्यांची जोडी असेल किंवा हिंदीत राघूला चुंगी म्हणत असावेत असा माझा समज होता. 

शोले. एक गारुड, एक संमोहन आहे. शोले प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आम्ही पाहून आल्यावर वडील आणि बापटकाका यांना आग्रह करून पाठवलेलं आम्ही. भिकार पिक्चर म्हणाले एकदम. आम्ही त्यांना सुचवलेला तो शेवटचा चित्रपट. मी पुण्यात जेंव्हा जेंव्हा तो सिनेमा लागलाय त्या प्रत्येक थेटरात तो पाहिलेला आहे. अनेक वर्षांनी रिलीज झाल्यावर श्रीनाथला चक्क ब्ल्याकनी घेऊन पण पाहिलाय. आताशा च्यानलवर तो लागतो वरचेवर तेंव्हा मी आणि मुलगी घरचं कार्य असल्यासारखं हजर रहातो. मी ज्या वयाचा असताना पहिल्यांदा पाहिला साधारण त्याच वयाची असताना तिनी पहिल्यांदा पाहिलाय आणि तिला तो आवडलाही. याचा मी काढलेला अर्थ असा आहे की पटकथा बांधेसूद असेल तर भाषेची फार गरज भासत नाही चित्रं समजायला. अभिनय म्हणजे काय?, क्यामे-याचा वापर, डायरेक्शन, म्युझिक, गाणी, संवाद या बाबतीत त्या वयात कुठलंही मत असणं केवळ अशक्यं तरी तो आवडतो, याला चांगला चित्रपट म्हणतात. 

शोले लागला तेंव्हा म्हणे पडला होता पहिले दोन आठवडे. शोलेला फक्तं एक फिल्मफेअर आहे - एम.एस.शिंदे - संकलनासाठी. बरं झालं त्याला फार बक्षिसं मिळाली नाहीत ते, डब्यात गेला असता तो. 'विझलेले शोले, मेरा गाव मेरा देशची भ्रष्टं नक्कल, वेस्टर्नची कॉपी - ना धड इकडचा, ना धड तिकडचा, आयरिश मायकेल गलघेर म्हणाला टेक्निकली सिनेमा अप्रतिम आहेपण "As a spectacle it breaks new ground, but on every other level it is intolerable: formless, incoherent, superficial in human image, and a somewhat nasty piece of violence". कुछ तो लोग कहेंगे… शोलेनी भारतभर साठ गोल्डन ज्युबिली केल्यात एकावेळी (अजून कुणी हे रेकॉर्ड तोडलेलं नाही) आणि शंभर थेटरात सिल्व्हर ज्युबिली साजरी केलीये आणि पाच वर्ष मिनर्व्हा, मुंबई, (यश चोप्रानी स्वखर्चानी डीडीएलजे चालवला ते सोडा, तसं काय राजेंद्रकुमारपण स्वखर्चानी ज्युबिल्या करायच्या). 
रेकॉर्ड करा रे कायपण पैसा टाकून, लोकांना माहितीये सत्यं. २०१२ ला भारतीय चित्रपटसृष्टीचा धंदा १.६३ बिलियन रुपये होता म्हणे, जेवढा शोलेचा नेट ग्रॉस आहे. आकड्यांनी सगळ्या गोष्टी सिद्ध करू नयेत. दहा बायका आहेत, त्यातली एक गर्भार आहे. सांख्यिकीच्या नियमानुसार मग प्रत्येक बाई एक दशांश गर्भार आहे. वास्तवात नाही ना शक्यं पण हे. शोले तो शोले. त्याच वर्षी प्रसिद्ध झालेला लो बजेट 'जय संतोषी मा' पण सुपरहिट होता. त्यावर लावलेले पैसे आणि कलेक्शन रेशो मधे शोलेला कदाचित मागे टाकेल तो पण म्हणून 'जय संतोषी मा'ला 'आल टाईम ब्लॉक बस्टर' म्हणायचं का? 

मला मार्क टेलर आठवतो. पाकिस्तानात ब्र्याडमनला (३३४) मागे टाकून त्याला हायेस्ट स्कोअर करण्याची संधी होती, त्यानी रेकॉर्ड न तोडता स्वत:च्या ३३४ नाबाद वर डाव डिक्लेअर केला. त्या टप्प्यावर ब्र्याडमनच्या सोबत उभं रहाण्यात जो मान आहे तो त्याला मागे टाकण्यात नाही. यासाठी वेगळीच मानसिकता लागते. किशोरला विचारलेलं सैगलला श्रद्धांजली म्हणून त्याची गाणी गाशील का? किशोरनी नकार दिला. काय सुंदर म्हणाला तो, 'मी भिकार गायलोय असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटणार नाही पण मी त्याच्यापेक्षा चांगली म्हटली असं कुणी म्हणालं तर मला त्रास होईल'. बस, शोलेबद्दल माझं हेच मत आहे.  






शोलेचे अनेक किस्से आहेत ते अनेक जणांनी वाचले असतील, ऐकले असतील. नाकारलेले किंवा नाईलाजानी सोडलेले रोल दुस-यानी केले की नेमके हिट ठरतात. (अमिरखान - डर, राजकुमार - जंजीर, सलमान - बाजीगर) तसाच ड्यानी करणार होता गब्बर. पण धर्मात्माच्या अफगाणिस्तानातील शुटींगसाठी त्याला जावं लागलं आणि शोले निसटला हातातून. ड्यानी माझा अत्यंत आवडता माणूस आहे पण अमजद हाच गब्बर, त्याच्या जागी दुसरा नकोच. ठाकूरसाठी पहिली पसंती प्राण होता पण रमेश सिप्पींनी संजीवकुमारच्या पारड्यात माप टाकलं. स्क्रिप्ट ऐकल्यावर अमिताभ, संजीव कुमारला गब्बर करायचा होता, ते नसेल तर मग संजीवकुमारला वीरू करायचा होता. संपूर्ण चित्रपटात एक लाईन असलेल्या, रविना टंडनचा मामा, म्याकमोहनचा सांभाचा मोठा रोल होता आधी. चित्रपट पाहिल्यानंतर तो नाराज झाला. रमेश सिप्पिनी एवढंच सांगितलं, 'सिनेमा रिलीज होऊ दे, मग सांग'. गब्बरचा उजवा हात सांभा एक ओळ बोलून पण अजरामर झाला आणि  भरमसाठ बोलून जगदीपचा वखारवाला सुरमा भोपाली, असरानीचा अन्ग्रेजोके जमानेका जेलर, विजू खोटेचा 'कालिया', जया भादुरीचा बाप 'खुराणा' इफ्तिकार, केश्तोचा खब-या 'हरिराम नाई', तोंडाळ बसंतीची गोड मावशी लीला मिश्रा, इमानी नोकर 'रामलाल' सत्येन कप्पू, ए.के.हंगलचा रहिमचाचा, सचिनचा 'अहमद', आद्य आयटम सॉंग मेहबूबा, मेहबूबा मधले जलाल आगा आणि हेलन ही दुय्यम पात्रं लोकांना अजून नावानिशी माहितीयेत. 

'संजीवकुमार' ठाकूर बलदेवसिंह, धर्मेंद्र' वीरू', अमिताभ 'जय', जया भादुरी 'राधा, हेमा मालिनी 'बसंती'  आणि अमजद 'गब्बर' ही महत्वाची पात्रं. फ्यान असावं तर आमच्या भाल्या फडके सारखं. आवाज म्युट करा, काना, मात्रा, अनुस्वाराचा फरक न करता तो शोले म्हणतो आख्खा. द ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड. एकेक संवाद अजरामर झाला, सगळे वन लायनर अफाट होते. कितने आदमी थे, अब तेरा क्या होगा कालिया, बहुत याराना लगता है, होली कब है, जो डर गया, समझो मर गया, ये हाथ हमको दे ठाकूर, ये हाथ नही फांसीका फंदा है, तुम्हारा नाम क्या है बसंती, मौसी भी तैय्यार, बसंती भी तैय्यार, जब तक तेरे पांव चलेंगे, इसकी सांस चलेगी' . शोले कुठे पूजा असली श्रावणात की काळ्या तबकड्या लावून ऐकला, ऐकवला जायचा. दुस-या कुठल्याही शिनेमाला हे भाग्यं नाही. सलीम जावेदनी एवढी सुंदर पटकथा, संवाद परत लिहिले नाहीत. मौसीकडे बसंतीला मागणी घालण्याचा सीन वास्तवात जावेद अख्तरनी सलीमसाठी केलेला होता.सचिननी या सिनेमासाठी मानधन घेतलं नव्हतं, हुशार माणूस, त्या बदल्यात त्यानी एडिटिंग शिकायचं सांगितलं. रमेश सिप्पींनी त्याला त्याकाळात एसी भेट दिला होता. तो आणि अमजद शॉट नसायचा तेंव्हा सेटवरची बाकी सगळी व्यवस्था बघायचे. 





काय आहे खरंतर शोलेत वारंवार बघण्यासारखं? थोडी अक्कल आल्यावर सलीम जावेदचा लिहिण्यातला मोठेपणा लक्षात आला. एकेक पात्रं संपूर्ण सिनेमाभर त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागतं. बिटवीन द लाईन्स त्यानी आणि रमेश सिप्पीने बरंच काम केलंय. लग्नाआधीची अवखळ होळी खेळणारी राधा, होली के दिन गाणं संपताना पांढ-या कपड्यात अंगावर येते, म्याचुअर्ड, कमी पण नेमकं, मार्मिक बोलणारा जय, राधा बघतीये म्हटल्यावर म्हशीवरून अलगद उतरतो, बोलभांड वीरू आणि बसंतीपुढे ते तेवढेच उठून दिसतात. गब्बरनी पाय धरायला सांगितल्यावर पुढे जाणा-या जयकडे बघताना, ठाकूर बंदूक उचलून देत नाही म्हटल्यावर आलेल्या रागासाठी धर्मेन्द्रचा चेहरा बघाच परत एकदा, ठाकूरची स्टोरी कळल्यावर पैसे परत देतानाचे त्यांचे चेहरे बघा, जयला गोळी लागल्यावर त्याला बघायला धावत आलेली राधा मर्यादेनी सास-याला बघून झटक्यात थांबते तेंव्हा तिचा आणि ठाकूरचा चेहरा बघा, इतना सन्नाटा क्यू है भाई म्हणणारा रहिमचाचाचा कापरा आवाज थेटरात डोळ्यात पाणी आणतो. खूप खूप आहे सांगण्यासारखं पण किती सांगणार?






गब्बरची भाषा अमजदनी ठरवली होती असं वाचलंय. तुटक बोलतो तो. संत जसा शंभर टक्के सज्जन असतो तसा गब्बर सौ प्रतिशत डाकू होता यात. उगाच बायकांना पळव, अत्याचार कर वगैरे भानगडी नाही, हेलनकडे गाण्यात एकदा काय ते लाल डोळ्यांनी बघतो तेवढंच. दहशत हीच त्याची नशा, वासना. त्याला लोकांनी घाबरायला पाहिजे एवढंच त्याला हवंय. ऑपोझीशन पण तसं हवंय त्याला. तो म्हणतो ना, '… जो इतनी बात कर सके, अब आयेगा मजा खेलका'. असहाय्य ठाकूरला अपंग करून झालेला क्रूर आनंद तो जबरा दाखवतो. शेवटी पायात पाय घालून फेंगडा चालणारा अमजद डोळ्यापुढे आणा. मस्तीत कणभरही कमतरता नाही. मागे सचिनला मारतात तो सेन्सारनी हिंसाचार अति दिसतोय म्हणून कापलेला शॉट दाखवला होता. त्यापेक्षाही अमजद हातावर चालणा-या मुंगळयाकडे बघून एका फटक्यात त्याला मारतो ते जास्ती परिणामकारक ठरलं, काहीवेळेस सेन्सारचा असा फायदाही होतो. सिनेमाच्या शेवटी ठाकूर गब्बरला मारतो असा एंड होता जो बदलला गेला. 

टायटलची अजरामर ट्यून, अमिताभ बाजावर वाजवतो ती ट्यून, ये दोस्तीच्या शेवटी बाजावर वाजणारी 'आ आ आजा'ची ट्यून, एका चाकावर धन्नो सुसाट पळते तेंव्हाचा तबला, मेहबूबाचा भन्नाट बीट देणारा आरडी आणि त्याला की सिप्पीला माहित नाही पण धर्मेंद्रला किशोरचा आवाज देण्याची सुचलेली बुद्धी, जेणेकरून रडक्या 'ये दोस्ती'ला किशोर आपसूक येतो. ठेसनसे गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है अशी समजायला अत्यंत कठीण ओळ लिहिणारा आनंद बक्षी शोलेत मिळतात. शोलेला आधी संगीत शंकर-जयकिशन देणार होते. क्यामेरामन द्वारका दिवेचांनी टिपलेली पहिली रेल्वे फाईट कधीही बघायला थरारक अशीच. एवढा मोठ्ठा शोले कापून कंटाळवाणा होणार नाही आणि लिंक तुटणार नाही याची काळजी घेणारे शिंदे यांच्यावर लिहिण्याइतकं त्या क्षेत्रातलं ज्ञान नाही. 

स्टोरीलाईन, संगीत, एखाद्या गाण्याची चाल, सीन्स उचलेले असतीलही मी म्हणतो पण नुसती उचलाउचली करणारे आपल्याकडे काय कमी आहेत का? गॉडफादर इतका नसेल पण धर्मात्मा चांगला होता त्यानंतर डायरेक्ट सरकार (आतंक ही आतंक बघा आणि आत्महत्या करा). मधुबाला एकदाच जन्माला येते तसाच शोलेही एकदाच होतो. नाहीतर मग रामगोपाल वर्माकी आग पण पेटली असती, सिप्पीचाच शान पण चालला असता की (कमलाकर तोरणे दिग्दर्शित 'दरोडेखोर'चा प्रिमिअर मी विजयानंदला बघितला होता, त्याची जाहिरात 'मराठीतील प्रति शोले' अशी यायची पेपरला, खूप हसलो होतो).

काही सिनेमे पडद्यावरच बघावेत. माहौल पाहिजे. सत्तर एमेम पडद्यावर हातात पट्टा घेऊन फिरणारा गब्बर, त्याचा घुमणारा आवाज, 'कितने आदमी थे', त्याचं ते विकट हास्यं, तंबाखू खाऊन थुंकणं, कोर्टात ठाकूरला खुन्नस देणारा तो गिड्डा अमजद, अंधारात बसून माऊथ ऑर्गन वाजवणारा अमिताभ, माडीवर आयुष्यातला उजेड संपलेली दिवे म्लान करणारी जया भादुरी लक्षात राहिलीये, शेवटचा आचका देण्याआधी 'ये कहानीभी अधुरी रह गयी म्हणणारा अमिताभ आणि समाज बंधनाच्या ताब्यात असलेली जया बच्चन दु:खाचा कडेलोट होऊन संजीवकुमारच्या छातीवर डोकं ठेवते तेंव्हा तिच्या पाठीवरून हात फिरवता न येण्याची संजीवकुमारच्या चेह-यावरची असहायता लक्षात आहे, क्षणभर तो सगळं विसरून हात बाहेर काढेल की काय असं वाटतं इतका तो सीन भारी केलाय त्याने. शोले न संपणारा विषय, किती बोलणार. आत्ताच्या घडीला श्री.व सौ.बच्चन आणि देवल, रमेश सिप्पी, सचिन, विजू खोटे, असरानी, जगदीप एवढीच लोकं शिल्लक आहेत आणि मी आहे. 





गेल्यावर चार आदमी तो लगते है कम से कम. जाण्याची वेळ आली की विचारेन 'कितने आदमी है', उत्तर येईल 'दो' चार जमेपर्यंत 'शोले' लावा रे कुणीतरी म्हणेन, कितने आदमी थे…. ऐकेन, मग चार काय चाळीस काय, जमली काय न जमली काय, आपल्याला काय सोयर सुतक नाही त्याचं. 

--जयंत विद्वांस 

Thursday 6 August 2015

सतू...

 १९८८ ते ९१ मी बदलापूरला काकांकडे कॉलेजला होतो. त्या दरम्यान अनेक वल्ली मला तिथे भेटल्या. ब-याच वर्षात गेलेलो नाही निवांत. पण ती ३-४ वर्ष अविस्मरणीयं आहेत. छोटंसं होतं अगदी गांव, सगळे एकमेकांना चेह-यानी ओळखायचे, लाल मातीचे रस्ते, रया गेलेल्या फुलप्यान्टीच्या केलेल्या हाफ चड्ड्या आणि दोन टी शर्ट एवढ्यावर मी गांव फिरलेलो आहे. व्यसनाला घरचे पैसे नकोत म्हणून स्वकमाईसाठी मी इस्त्री करायचो दिन्याच्या लौन्ड्रीत. पंधरा पैसे नग, तासाला वीस कपडे, आठ तास राबलो की साधारण पंचवीस रुपये, साताठशे रुपये झाले की काम बंद आंदोलन. तर संतोष पटवर्धन आणि इतर अनेक टोळभैरव तिथे नित्यंनियमानी हजेरी लावायचे. एवढं पूर्ण नावानी कुणी कुणाला हाकारायचा नाही. त्याला सगळे सतू म्हणायचे, प्रदिप गोखलेची आई घरी पापड करायची म्हणून तो लाटी गोखले आणि असे अनेक.

तसं बाराही महिने रमीचे अड्डे चालायचे तेंव्हा बदलापुरात, गणपतीत जरा जास्ती जोर, त्यात तिथे माघी गणपती बसायचे स्टेजबीज घालून, त्यामुळे अजूनच धमाल. दोन पैसे पासून आठ रुपये पोइन्टपर्यंत लोक नित्यनियमाने बसायचे. मी दारिद्र्यरेषेखाली सात गज जमीनके नीचे असल्यामुळे पाच रुपये एक्कावन्न पोइन्ट ज्याकपॉट खेळायचो. तर सतू हळूहळू तिथे रमायला लागला. चांगल्या घरचा मुलगा खरंतर. वडील पोस्टात होते. तेंव्हा रिटायर्ड झालेले. पोस्टाच्या आवारातच दोन खोल्या होत्या. एक बहिण लग्नं झालेली, घरात ही तिघंच. सतूचा फिटर ट्रेडचा आय.टी.आय.झालेला. पुढे त्या जोरावर तो कुणाच्यातरी शब्दानी एसटी मधे पर्मनंट झाला.त्याला शिफ्ट असायच्या. मुरबाड डेपोला होता. संख्या कमी असल्याने असेल पण ओव्हरटाईम ब-यापैकी मिळायचा.

लोकलनी जा ये, त्यात बदलापूरला तेंव्हा फार गाड्या नव्हत्या. आठ तासाच्या ड्युटीला जाणंयेणं धरून बारा तास जायचेच. बावन पत्त्यांनी सतूला पुरता पागल केला. रम, रमा, रमी ह्यांच्या विळख्यात तो कधी सापडला ते त्याचं त्यालाच कळलं नाही. कामावर तर खेळायचाच, लोकलमधे जाताना येताना आणि प्लाटफॉर्मला उतरला की घरी ब्याग टाकायला जी काय दोन मिनिट वाया जातील तेवढीच की हा पठ्ठा व्रत घेतल्यासारखा अड्ड्यावर हजर व्हायचा. तसा मितभाषी, पाच फूट, सडसडीत अंगकाठी, सावळा आणि उत्तम विनोदबुद्धी असलेला होता. भेंxx, एकदा Hand लागू दे मग उद्या कोण जातंय कामावर म्हणायचा. पण ड्युटीला इमानेइतबारे जायचा. कदाचित खेळायला पैसे लागतीलच म्हणूनही जात असावा.

नंतर नंतर आपण काहीतरी वेगळं करतोय असं त्याला वाटू लागलं. प्रिन्स गुटखा होता तेंव्हा, तो नसेल तोंडात तर विल्स, दोन्हीचा कंटाळा आला असेल तर गाय छाप, डाव लागत असतील तर व्हिस्की, बिअरच्या बाटल्या. कसली तरी घाई असल्यासारखा जगत होता. आई वडिलांनी हात टेकले असणार. बरं रस्त्यात पिऊन पडणे, कुणाला शिव्या देणे, भांडणं वगैरे प्रकार नाहीत, कुणाकडे उधारी नाही, कुणाची छेड काढणं नाही, स्वकमाईवर नरकात पडत होता. सरळमार्गी होताच तो खरा, नाकासमोर चालणारा पण दुर्दैवाने म्हणा, लहानपणी दारिद्र्यात काढलेल्या दिवसांची शिसारी म्हणा पण पैसा उधळायचा नाद त्याला लागला एवढं खरं. या व्यसनांनी झिंग येईनाशी झाली असावी म्हणून नंतर ग्रांटरोड, घाटकोपरच्या वा-या चालू झाल्या.

शेवटी व्हायचं तेच झालं, सगळ्या प्रकारची व्यसनं, वेळी अवेळी जेवण, जागरणं आणि वेश्यागमन, सतूला एड्स झाला. वर्षभर तग धरला असेल फार तर. कातडी सोलायचीही गरज नव्हती, सायन्सच्या पोरांना अभ्यासाला सापळा म्हणून डायरेक्ट वापरता आला असता. का माणसं अशी जीवावर उदार होऊन जगतात, कंटाळा येतो? की दारिद्रयापेक्षा आलेली किरकोळ सुबत्ताही भोगून घ्यावी असं वाटतं? बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे असं होतं? आपल्यापेक्षा पटीत कमावतोय म्हणून वडिल कानफटात मारायचं विसरतात की शारिरीक दौर्बल्यं आड येत असावं? असे अनेक आहेत काही काळ माझ्या जगण्यातले सहप्रवासी झालेले त्यांच्याबद्दल परत कधीतरी खास करून कानिटकर जोडप्याबद्दल नक्की सांगेन.

पण काही म्हणा, सतू उर्फ संतोष पटवर्धन, पोरगा चांगला होता राव.

--जयंत विद्वांस



Tuesday 4 August 2015

शापित विक्षिप्त…

अत्यंत प्रतिभावान माणूस. त्याच्या गाण्यांची यादी मी इथे देणार नाही, फार उल्लेखही करणार नाही. हा माणूस सोडून इतर गायक नेहमी नंतरच्या क्रमांकावर राहिलेत माझ्या, याचा अर्थ ते टुकार, भिकार, कमी दर्जाचे आहेत असं नाही. एखादी गोष्टं, माणूस का आवडतो याचं नेमकं स्पष्टीकरण देता येत नाही. जे उमगतात ते मन व्यापत नसावेत. त्याची नक्कल करणारे अनेक आले, येतील. पण काही नेमके हळवे शब्दोच्चार (त्याचा 'ह' दुसरा कुणी म्हणत नाही तसा), स्याड व्हर्जन त्याच्या आवाजातच ऐकावीत. 

मराठीत पुलं आणि हिंदीत हा. यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय. गीतलेखन, अभिनय, संगीतदिग्दर्शन, गायन, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि सोड्याच्या बाटलीसारखा बाहेर येणारा निर्विष, उच्च दर्जाचा कारुण्याची झालर लावून आलेला, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, सहज, आटापिटा न केलेला विनोद. त्याच्या हस-या मुखवटयामागे दडलेला खरा चेहरा पाह्यचा असेल तर दूर गगन की छांवमें बघा. त्याच्या धीरगंभीर आवाजातलं 'आ चल के तुझे' कधीही ऐका, श्रवणीयच. 

संगीत शिकलेला अशोककुमार आणि न शिकलेला हा. आपण जे शिकतो ते काम सोडून दुस-याच गोष्टीत जेंव्हा अफाट यश मिळतं तेंव्हा दैवी देणगी शब्दाचा अर्थ कळतो. मोठ्या भावानी सहज अभिनयाचे मापदंड निर्माण केले, यानी एकाच गळ्यातून नवरस बाहेर काढले. स्वत:विषयी फार कुणी चांगलं बोलणार नाही याची काळजी त्यानी सतत घेतली. त्याचे आचरटपणाचे, विक्षिप्तपणाचे अनेक खरे खोटे किस्से आहेत पण आपण नेहमी सांगणा-याची बाजू ऐकत असतो. मूळ घटना वेगळी असू शकते याची जाणीव आपण ठेवायला हवी. 

योगीताबालीशी लग्नं केलं म्हणून त्यानी काही काळ मिथूनसाठी आवाज देणं बंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' साठी कुमार गौरवचा आवाज तो देणार होता. कबूल करूनही रेकॉर्डींगला तो गेलाच नाही, माणूस घ्यायला आला तर त्यानी दरवाजाच उघडला नाही शेवटी आरडीनी अमितकुमारला घेऊन काम केलं, याचा हेतू साध्यं झाला.फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण प्रयत्नं करतोच आपल्या मुलांना पुढे आणायला, ह्याचा खाक्या वेगळाच. अनेक हिरोंची चलती याच्या आवाजामुळे झाली. आराधना हिट नसता झाला तर हा गायन बंद करणार होता. पण सगळी गाणी हिट झाली मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही कधी. रफी, मुकेश, मन्नादा सगळे मागे पडले. यॉडलींगचा आठवा सूर होताच. 

माणूस होता मात्रं हळवा, प्रेमळ. आपल्या भिकार संगीत देणा-या भाच्यासाठी - बप्पी लाहिरी साठी - त्यानी कुठलंही गाणं गायलं (ऐका सुमधुर - झ झ झ झोपडीमें चारपाई आणि खरोखर चांगलं दिलेलं - इंतेहा हो गई इंतजार की, चलते चलते  मेरे ये गीत). कुठलंही लग्नं याला लाभलं नाही. पहिल्या रूमाला आणि शेवटच्या लीनाला पोर झालं एवढंच. रुमा गुहा पहिली (५०-५८) मग अप्सरा मधुबाला (६०-६९), मग योगिता बाली (७५-७८) आणी अत्यंत दुर्दैवी, पहिल्या लग्नाच्या दुस-या दिवशी विधवा झालेली लीना चंदावरकर (८०-८७). कुणाच्या खासगी आयुष्याबाबत आपण अर्धवट माहितीवर खूप बोलतो.

आज त्याचा वाढदिवस. जिवंत असता तर ८६ वर्षाचा झाला असता. पण काय करायचं एवढं जगून? तुझ्या मागे अनेक पिढ्या तुझं नाव राहिल. सत्तेचाळीस गेलेला सैगल अजून ऐकतो मी, तुला जाऊन अठ्ठावीस वर्ष झालीत फक्तं. मी मरेपर्यंत तू सोबत असशील. शेवटी तूच लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, गायलेल्या, अभिनीत केलेल्या वर्णनाच्या ठिकाणीच जाणार, मी काय किंवा अजून दुसरा कुणी काय :

आ चल के तुझे मै लेके चलू एक ऐसे गगन के तले 
जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले

आहे का रे खरंच असं सगळं तिथे? तरच मजा आहे तिथे येण्यात. 

--जयंत विद्वांस

Saturday 1 August 2015

निरोप…

मला नेहमी तिला स्ट्यांडवर सोडायला जायची वेळ येते कारण मी तिच्या गावाला जाण्याचा प्रसंग विरळ. तिलाच असं नाही कुणालाही सोडायला गेलं की मला भरून येतं. घरातून पाहुणे जातानाही मला असं होतं. तीन मे ला आलेले मुकुंदा, नंदू, स्वरूपा जाणार होते. मी कामावर निघालो साडेआठला, ते नंतर जाणार होते (सावीला मी सकाळीच सोडलेलं स्वारगेटला), माझा काय पाय निघेना. मग तो संपूर्ण दिवस मला फार उदास वाटतं. त्यादिवशी त्यामुळे असेल पण मी जास्ती काम करतो. मी कुणाकडे गेलोय आणि त्याला मला सोडायला येताना भरून आलंय अशी ठिकाणं माझ्या आयुष्यात नाहीत फार. उलट माझ्या जाण्यानी होणारा आनंदच असू शकेल, असला तर. तर मूळ मुद्दा… 

तर एकदा मी तिच्या गावाला होतो. निघण्याचा वेळ जवळ येत चालला. मी एकटा जाऊन बस पकडून, खिडकीतून हात बाहेर न काढता येऊ शकतो खरंतर पण ती आली. पुण्याच्या बस ढिगानी लागलेल्या पण सगळ्या पुणे स्टेशन, मला स्वारगेट बरं पडतं. पण तिला अर्धा तास होता आणि स्टेशनची सुटणार होती दहा मिनिटात. मी स्वारगेटनी जावं असं तिच्या चेह-यावर होतं पण निरोप लांबला की त्यातली मजा जाते. आर्ट फिल्म सारखं घडत काहीच नाही, नुसतेच नजरेचे क्यामेरे फिरत रहातात. तिला रडू फुटण्याच्याच बेतात होतं. पण ती मुळातच हुशार आहे. गाडीत त्या दोन बोन्साय पाण्याच्या बाटल्या देतात की खरंतर पण पाणी घेऊन येते म्हणाली रोडच्या पलीकडून. 

ती फ्रुटी आणि बिसलेरीची बाटली घेऊन येईपर्यंत तिकीट काढून झालं होतं. गाडीत मी निरक्षर आहे, सीटचे इंग्लिश आकडे समजत नाही अशा भावनेने ती पुढे गेली, सीट दाखवली, मी ही शहाण्यासारखा बसलो लगेच. बसमध्ये पब्लिक नसतं तर तिनी बोनक्रशर मिठी मारली असती निश्चित. कंडक्टरच्या आवाजानी ती थरथरत्या ओठांनी आणि ओथंबलेल्या डोळ्यांनी खाली उतरली. बसच्या पुढे जावून फ्लायओव्हरच्या पिलरखाली जाऊन थांबली. बस वळून निघाली आणि तिनी हात केला माझी काच समोर आल्यावर. 

मी मान तिरकी करून बघत होतो. हरवल्यासारखा तिचा चेहरा आणि कधीही रडू फुटेल असे भरलेले डोळे. अशावेळी सिग्नल हिरवा असतो, रोड मोकळा असतो, गाडी सुसाट निघते. तिचा निरर्थक मेसेज आला 'नीट जा'. गाडी काय मी चालवणार होतो का? एसी गाडीला उघडी खिडकी नाही म्हणजे हात बाहेर काढणार नाही. हसू आलं. डोळ्यात पाणी आलं ते हसण्यामुळे असा समज मी करून घेतला आणि पुणं यायची वाट बघायला सुरवात केली. 

--जयंत विद्वांस