Wednesday 19 August 2015

कितने आदमी थे….

शोले पंचाहत्तर साली हाफ चड्डीत असताना तिसरी किंवा चौथीत पाहिलेला मी नटराजला, सत्तर एमेम पडदा म्हणजे काय हे आयुष्यात पहिल्यांदा बघितलं होतं. तिसरी चौथीच्या बुद्धीच्या मानानी मला प्रत्येक पात्राविषयी चिकार प्रश्नं पडलेले त्या वेळेस आणि बरेचसे गैरसमजही झालेले कारण हिंदी पाचवीपासून असायचं आणि सिनेमे क्वचित बघायला मिळायचे त्यामुळे त्या भाषेची एकूणच माहिती कमी होती. जी काय भाषा माहित होती ती 'भैय्या हमने भांडा घासा लेकिन दूध नासा' लेव्हलची. 

तर काही प्रश्नं, शंका अशा होत्या : 

१) अमजद - तो ओठात तंबाखूची चिमूट न ठेवता जराशी मळून तोंडात टाकतो तेंव्हा ती त्याच्या नाकात कशी जात नाही, त्याला शिंका कशा येत नाहीत, तो इतका कळकट्ट का राहतो
२) संजीवकुमार - ठाकूरला कपडे कोण घालतं? त्याला जेवण कोण भरवतं?
३) जया भादुरी - ही ठाकूरची सून आहे तर मग कामवालीसारखे दिवे का बंद करते फक्तं?     
४) हेमा मालिनी - जब तक है जां, मैना चुंगी असं गाणं का म्हणते? कित्त्येक दिवस राघु मैना सारखी मैना चुंगी अशी पक्ष्यांची जोडी असेल किंवा हिंदीत राघूला चुंगी म्हणत असावेत असा माझा समज होता. 

शोले. एक गारुड, एक संमोहन आहे. शोले प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आम्ही पाहून आल्यावर वडील आणि बापटकाका यांना आग्रह करून पाठवलेलं आम्ही. भिकार पिक्चर म्हणाले एकदम. आम्ही त्यांना सुचवलेला तो शेवटचा चित्रपट. मी पुण्यात जेंव्हा जेंव्हा तो सिनेमा लागलाय त्या प्रत्येक थेटरात तो पाहिलेला आहे. अनेक वर्षांनी रिलीज झाल्यावर श्रीनाथला चक्क ब्ल्याकनी घेऊन पण पाहिलाय. आताशा च्यानलवर तो लागतो वरचेवर तेंव्हा मी आणि मुलगी घरचं कार्य असल्यासारखं हजर रहातो. मी ज्या वयाचा असताना पहिल्यांदा पाहिला साधारण त्याच वयाची असताना तिनी पहिल्यांदा पाहिलाय आणि तिला तो आवडलाही. याचा मी काढलेला अर्थ असा आहे की पटकथा बांधेसूद असेल तर भाषेची फार गरज भासत नाही चित्रं समजायला. अभिनय म्हणजे काय?, क्यामे-याचा वापर, डायरेक्शन, म्युझिक, गाणी, संवाद या बाबतीत त्या वयात कुठलंही मत असणं केवळ अशक्यं तरी तो आवडतो, याला चांगला चित्रपट म्हणतात. 

शोले लागला तेंव्हा म्हणे पडला होता पहिले दोन आठवडे. शोलेला फक्तं एक फिल्मफेअर आहे - एम.एस.शिंदे - संकलनासाठी. बरं झालं त्याला फार बक्षिसं मिळाली नाहीत ते, डब्यात गेला असता तो. 'विझलेले शोले, मेरा गाव मेरा देशची भ्रष्टं नक्कल, वेस्टर्नची कॉपी - ना धड इकडचा, ना धड तिकडचा, आयरिश मायकेल गलघेर म्हणाला टेक्निकली सिनेमा अप्रतिम आहेपण "As a spectacle it breaks new ground, but on every other level it is intolerable: formless, incoherent, superficial in human image, and a somewhat nasty piece of violence". कुछ तो लोग कहेंगे… शोलेनी भारतभर साठ गोल्डन ज्युबिली केल्यात एकावेळी (अजून कुणी हे रेकॉर्ड तोडलेलं नाही) आणि शंभर थेटरात सिल्व्हर ज्युबिली साजरी केलीये आणि पाच वर्ष मिनर्व्हा, मुंबई, (यश चोप्रानी स्वखर्चानी डीडीएलजे चालवला ते सोडा, तसं काय राजेंद्रकुमारपण स्वखर्चानी ज्युबिल्या करायच्या). 
रेकॉर्ड करा रे कायपण पैसा टाकून, लोकांना माहितीये सत्यं. २०१२ ला भारतीय चित्रपटसृष्टीचा धंदा १.६३ बिलियन रुपये होता म्हणे, जेवढा शोलेचा नेट ग्रॉस आहे. आकड्यांनी सगळ्या गोष्टी सिद्ध करू नयेत. दहा बायका आहेत, त्यातली एक गर्भार आहे. सांख्यिकीच्या नियमानुसार मग प्रत्येक बाई एक दशांश गर्भार आहे. वास्तवात नाही ना शक्यं पण हे. शोले तो शोले. त्याच वर्षी प्रसिद्ध झालेला लो बजेट 'जय संतोषी मा' पण सुपरहिट होता. त्यावर लावलेले पैसे आणि कलेक्शन रेशो मधे शोलेला कदाचित मागे टाकेल तो पण म्हणून 'जय संतोषी मा'ला 'आल टाईम ब्लॉक बस्टर' म्हणायचं का? 

मला मार्क टेलर आठवतो. पाकिस्तानात ब्र्याडमनला (३३४) मागे टाकून त्याला हायेस्ट स्कोअर करण्याची संधी होती, त्यानी रेकॉर्ड न तोडता स्वत:च्या ३३४ नाबाद वर डाव डिक्लेअर केला. त्या टप्प्यावर ब्र्याडमनच्या सोबत उभं रहाण्यात जो मान आहे तो त्याला मागे टाकण्यात नाही. यासाठी वेगळीच मानसिकता लागते. किशोरला विचारलेलं सैगलला श्रद्धांजली म्हणून त्याची गाणी गाशील का? किशोरनी नकार दिला. काय सुंदर म्हणाला तो, 'मी भिकार गायलोय असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटणार नाही पण मी त्याच्यापेक्षा चांगली म्हटली असं कुणी म्हणालं तर मला त्रास होईल'. बस, शोलेबद्दल माझं हेच मत आहे.  






शोलेचे अनेक किस्से आहेत ते अनेक जणांनी वाचले असतील, ऐकले असतील. नाकारलेले किंवा नाईलाजानी सोडलेले रोल दुस-यानी केले की नेमके हिट ठरतात. (अमिरखान - डर, राजकुमार - जंजीर, सलमान - बाजीगर) तसाच ड्यानी करणार होता गब्बर. पण धर्मात्माच्या अफगाणिस्तानातील शुटींगसाठी त्याला जावं लागलं आणि शोले निसटला हातातून. ड्यानी माझा अत्यंत आवडता माणूस आहे पण अमजद हाच गब्बर, त्याच्या जागी दुसरा नकोच. ठाकूरसाठी पहिली पसंती प्राण होता पण रमेश सिप्पींनी संजीवकुमारच्या पारड्यात माप टाकलं. स्क्रिप्ट ऐकल्यावर अमिताभ, संजीव कुमारला गब्बर करायचा होता, ते नसेल तर मग संजीवकुमारला वीरू करायचा होता. संपूर्ण चित्रपटात एक लाईन असलेल्या, रविना टंडनचा मामा, म्याकमोहनचा सांभाचा मोठा रोल होता आधी. चित्रपट पाहिल्यानंतर तो नाराज झाला. रमेश सिप्पिनी एवढंच सांगितलं, 'सिनेमा रिलीज होऊ दे, मग सांग'. गब्बरचा उजवा हात सांभा एक ओळ बोलून पण अजरामर झाला आणि  भरमसाठ बोलून जगदीपचा वखारवाला सुरमा भोपाली, असरानीचा अन्ग्रेजोके जमानेका जेलर, विजू खोटेचा 'कालिया', जया भादुरीचा बाप 'खुराणा' इफ्तिकार, केश्तोचा खब-या 'हरिराम नाई', तोंडाळ बसंतीची गोड मावशी लीला मिश्रा, इमानी नोकर 'रामलाल' सत्येन कप्पू, ए.के.हंगलचा रहिमचाचा, सचिनचा 'अहमद', आद्य आयटम सॉंग मेहबूबा, मेहबूबा मधले जलाल आगा आणि हेलन ही दुय्यम पात्रं लोकांना अजून नावानिशी माहितीयेत. 

'संजीवकुमार' ठाकूर बलदेवसिंह, धर्मेंद्र' वीरू', अमिताभ 'जय', जया भादुरी 'राधा, हेमा मालिनी 'बसंती'  आणि अमजद 'गब्बर' ही महत्वाची पात्रं. फ्यान असावं तर आमच्या भाल्या फडके सारखं. आवाज म्युट करा, काना, मात्रा, अनुस्वाराचा फरक न करता तो शोले म्हणतो आख्खा. द ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड. एकेक संवाद अजरामर झाला, सगळे वन लायनर अफाट होते. कितने आदमी थे, अब तेरा क्या होगा कालिया, बहुत याराना लगता है, होली कब है, जो डर गया, समझो मर गया, ये हाथ हमको दे ठाकूर, ये हाथ नही फांसीका फंदा है, तुम्हारा नाम क्या है बसंती, मौसी भी तैय्यार, बसंती भी तैय्यार, जब तक तेरे पांव चलेंगे, इसकी सांस चलेगी' . शोले कुठे पूजा असली श्रावणात की काळ्या तबकड्या लावून ऐकला, ऐकवला जायचा. दुस-या कुठल्याही शिनेमाला हे भाग्यं नाही. सलीम जावेदनी एवढी सुंदर पटकथा, संवाद परत लिहिले नाहीत. मौसीकडे बसंतीला मागणी घालण्याचा सीन वास्तवात जावेद अख्तरनी सलीमसाठी केलेला होता.सचिननी या सिनेमासाठी मानधन घेतलं नव्हतं, हुशार माणूस, त्या बदल्यात त्यानी एडिटिंग शिकायचं सांगितलं. रमेश सिप्पींनी त्याला त्याकाळात एसी भेट दिला होता. तो आणि अमजद शॉट नसायचा तेंव्हा सेटवरची बाकी सगळी व्यवस्था बघायचे. 





काय आहे खरंतर शोलेत वारंवार बघण्यासारखं? थोडी अक्कल आल्यावर सलीम जावेदचा लिहिण्यातला मोठेपणा लक्षात आला. एकेक पात्रं संपूर्ण सिनेमाभर त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागतं. बिटवीन द लाईन्स त्यानी आणि रमेश सिप्पीने बरंच काम केलंय. लग्नाआधीची अवखळ होळी खेळणारी राधा, होली के दिन गाणं संपताना पांढ-या कपड्यात अंगावर येते, म्याचुअर्ड, कमी पण नेमकं, मार्मिक बोलणारा जय, राधा बघतीये म्हटल्यावर म्हशीवरून अलगद उतरतो, बोलभांड वीरू आणि बसंतीपुढे ते तेवढेच उठून दिसतात. गब्बरनी पाय धरायला सांगितल्यावर पुढे जाणा-या जयकडे बघताना, ठाकूर बंदूक उचलून देत नाही म्हटल्यावर आलेल्या रागासाठी धर्मेन्द्रचा चेहरा बघाच परत एकदा, ठाकूरची स्टोरी कळल्यावर पैसे परत देतानाचे त्यांचे चेहरे बघा, जयला गोळी लागल्यावर त्याला बघायला धावत आलेली राधा मर्यादेनी सास-याला बघून झटक्यात थांबते तेंव्हा तिचा आणि ठाकूरचा चेहरा बघा, इतना सन्नाटा क्यू है भाई म्हणणारा रहिमचाचाचा कापरा आवाज थेटरात डोळ्यात पाणी आणतो. खूप खूप आहे सांगण्यासारखं पण किती सांगणार?






गब्बरची भाषा अमजदनी ठरवली होती असं वाचलंय. तुटक बोलतो तो. संत जसा शंभर टक्के सज्जन असतो तसा गब्बर सौ प्रतिशत डाकू होता यात. उगाच बायकांना पळव, अत्याचार कर वगैरे भानगडी नाही, हेलनकडे गाण्यात एकदा काय ते लाल डोळ्यांनी बघतो तेवढंच. दहशत हीच त्याची नशा, वासना. त्याला लोकांनी घाबरायला पाहिजे एवढंच त्याला हवंय. ऑपोझीशन पण तसं हवंय त्याला. तो म्हणतो ना, '… जो इतनी बात कर सके, अब आयेगा मजा खेलका'. असहाय्य ठाकूरला अपंग करून झालेला क्रूर आनंद तो जबरा दाखवतो. शेवटी पायात पाय घालून फेंगडा चालणारा अमजद डोळ्यापुढे आणा. मस्तीत कणभरही कमतरता नाही. मागे सचिनला मारतात तो सेन्सारनी हिंसाचार अति दिसतोय म्हणून कापलेला शॉट दाखवला होता. त्यापेक्षाही अमजद हातावर चालणा-या मुंगळयाकडे बघून एका फटक्यात त्याला मारतो ते जास्ती परिणामकारक ठरलं, काहीवेळेस सेन्सारचा असा फायदाही होतो. सिनेमाच्या शेवटी ठाकूर गब्बरला मारतो असा एंड होता जो बदलला गेला. 

टायटलची अजरामर ट्यून, अमिताभ बाजावर वाजवतो ती ट्यून, ये दोस्तीच्या शेवटी बाजावर वाजणारी 'आ आ आजा'ची ट्यून, एका चाकावर धन्नो सुसाट पळते तेंव्हाचा तबला, मेहबूबाचा भन्नाट बीट देणारा आरडी आणि त्याला की सिप्पीला माहित नाही पण धर्मेंद्रला किशोरचा आवाज देण्याची सुचलेली बुद्धी, जेणेकरून रडक्या 'ये दोस्ती'ला किशोर आपसूक येतो. ठेसनसे गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है अशी समजायला अत्यंत कठीण ओळ लिहिणारा आनंद बक्षी शोलेत मिळतात. शोलेला आधी संगीत शंकर-जयकिशन देणार होते. क्यामेरामन द्वारका दिवेचांनी टिपलेली पहिली रेल्वे फाईट कधीही बघायला थरारक अशीच. एवढा मोठ्ठा शोले कापून कंटाळवाणा होणार नाही आणि लिंक तुटणार नाही याची काळजी घेणारे शिंदे यांच्यावर लिहिण्याइतकं त्या क्षेत्रातलं ज्ञान नाही. 

स्टोरीलाईन, संगीत, एखाद्या गाण्याची चाल, सीन्स उचलेले असतीलही मी म्हणतो पण नुसती उचलाउचली करणारे आपल्याकडे काय कमी आहेत का? गॉडफादर इतका नसेल पण धर्मात्मा चांगला होता त्यानंतर डायरेक्ट सरकार (आतंक ही आतंक बघा आणि आत्महत्या करा). मधुबाला एकदाच जन्माला येते तसाच शोलेही एकदाच होतो. नाहीतर मग रामगोपाल वर्माकी आग पण पेटली असती, सिप्पीचाच शान पण चालला असता की (कमलाकर तोरणे दिग्दर्शित 'दरोडेखोर'चा प्रिमिअर मी विजयानंदला बघितला होता, त्याची जाहिरात 'मराठीतील प्रति शोले' अशी यायची पेपरला, खूप हसलो होतो).

काही सिनेमे पडद्यावरच बघावेत. माहौल पाहिजे. सत्तर एमेम पडद्यावर हातात पट्टा घेऊन फिरणारा गब्बर, त्याचा घुमणारा आवाज, 'कितने आदमी थे', त्याचं ते विकट हास्यं, तंबाखू खाऊन थुंकणं, कोर्टात ठाकूरला खुन्नस देणारा तो गिड्डा अमजद, अंधारात बसून माऊथ ऑर्गन वाजवणारा अमिताभ, माडीवर आयुष्यातला उजेड संपलेली दिवे म्लान करणारी जया भादुरी लक्षात राहिलीये, शेवटचा आचका देण्याआधी 'ये कहानीभी अधुरी रह गयी म्हणणारा अमिताभ आणि समाज बंधनाच्या ताब्यात असलेली जया बच्चन दु:खाचा कडेलोट होऊन संजीवकुमारच्या छातीवर डोकं ठेवते तेंव्हा तिच्या पाठीवरून हात फिरवता न येण्याची संजीवकुमारच्या चेह-यावरची असहायता लक्षात आहे, क्षणभर तो सगळं विसरून हात बाहेर काढेल की काय असं वाटतं इतका तो सीन भारी केलाय त्याने. शोले न संपणारा विषय, किती बोलणार. आत्ताच्या घडीला श्री.व सौ.बच्चन आणि देवल, रमेश सिप्पी, सचिन, विजू खोटे, असरानी, जगदीप एवढीच लोकं शिल्लक आहेत आणि मी आहे. 





गेल्यावर चार आदमी तो लगते है कम से कम. जाण्याची वेळ आली की विचारेन 'कितने आदमी है', उत्तर येईल 'दो' चार जमेपर्यंत 'शोले' लावा रे कुणीतरी म्हणेन, कितने आदमी थे…. ऐकेन, मग चार काय चाळीस काय, जमली काय न जमली काय, आपल्याला काय सोयर सुतक नाही त्याचं. 

--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment