Thursday 24 November 2016

नाव...


'What's in a name' अर्थात 'नावात काय असतं' असं विल्यमपंत त्यांच्या 'रोमिओ ज्युलिएट' नाटकामधे म्हणून गेलेत. एकूणच पुण्यात रहाणारी माणसं, (रहाणारी म्हणजे जन्माला आल्यापासून रहाणारी, बाहेरून आलेले रेफ्युजी यात मोडत नाहीत), दुस-याचं विधान जगप्रसिद्ध असलं तरी त्याला तोडीसतोड काही सापडतंय का बघतात किंवा त्याला निरुत्तर करणारं काहीतरी शोधतात. आनंदीबाईंचा वारसा सांगत मी फक्तं 'अ' चा 'न' केला आणि प्रतिप्रश्न तयार. विल्यमराव, नावात काय नसतं?. गंमतीचा भाग सोडून देऊ. पण जन्माला आल्यावर सगळ्यात मोठं कार्य काय तर नाव शोधणे. लगेच शोधमोहीम चालू होते. आधी अभिमन्यू अवस्थेत असताना आपल्या कानावर चर्चा पडत असाव्यात पण नंतर लक्षात रहात नाहीत एवढंच. जन्माला आल्यापासून आपण परस्वाधीन असतो. आपल्याला काय हाक मारली तर आवडेल प्रश्नाचं उत्तर देण्याएवढी अक्कल आल्यावर खरंतर नाव ठेवायला हवं. पूर्वज किंवा मागच्या पिढीच्या कुणाचं नाव चिकटवून आठवण तेवती ठेवणं हे सगळ्यात सोपं काम.  

पत्रिका आली की शुभाक्षरानुसार शोधमोहीम चालू होते. काहीच्या काही अक्षरं असतात. एकाला ठा अक्षर होतं. त्यामुळे त्याचं नाव ठामदेव ठेवलं होतं. अर्थात देव आणि मंडळी नाराज होऊ नयेत म्हणून. आता गुगल याद्या देतं अर्थांसकट, कित्त्येक नावं ऐकलेलीही नसतात. पण श्रीमंतांच्या पोरांची असली तर त्याला अर्थ असतो. 'कीया', 'वालीनी' ही मुलींची नावं आहेत हे समजल्यावर मी हैराण झालो होतो. 'मी शोधली' असं मुलीच्या काकानी सांगितल्यावर मी म्यूट झालो होतो. तयार केली असं म्हणायचं असावं त्याला कदाचित. त्यांच्याकडे ऑडी आणि बीएमडब्ल्यू होती त्यामुळे नाव काय का असेना. पण काळानुसार नावं बदलत जातात. पूर्वी देवलोक चार्टला अग्रभागी असायचे. बाप्यांसाठी शंकर, मारुती, राम, कृष्ण, विष्णू आणि इतर देवलोक, मुलींसाठी देव्या, फुलांची, नद्यांची नावं असायची. राम, श्रीराम, सीताराम, आत्माराम, जगन्नाथ, विष्णू, विठ्ठल, बाळकृष्ण, बळवंत, श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शंकर, महादेव, हनुमान, मारुती, बजरंग, मग देवांचे इतर नातेवाईक यायचे, लक्ष्मण अँड ब्रदर्स, बलराम, मेघनाद, अभिमन्यू. मुलींसाठी सीता आणि तिची अनेक नावं, देव्यांमध्ये अंबा, लक्ष्मी, रेणुका, गौरी, नद्यांमध्ये गोदा, कृष्णा, भीमा, कावेरी, इतर नातेवाईकमधे कौसल्या, द्रौपदी, उर्मिला, राधा, सत्यभामा, रुक्मिणी, फुलांमध्ये सुमन, सरोज, पुष्पा, गुलाब. कमतरताच नव्हती. 

रावण, बिभीषण, कुंभकर्ण, दु पासून चालू होणारी शंभर कौरव नावं, वाली, सुग्रीव, गांधारी, कुंती, माद्री, मंथरा, कैकयी, शिशुपाल नावं काही माझ्या ऐकण्यात नाहीत. कौरवांना एकुलती एक बहीण होती दु:शला, ती जयंद्रथाची बायको होती (त्या रवी शास्त्रीच्या वडिलांचं नाव जयंद्रथ आहे) पण तुम्ही कोणत्या पार्टीत आहात त्याप्रमाणे तुमच्या नावाला किंमत असते हे तेंव्हापासून आहे. पूर्वी घरात दिवाळी अंकासारखी दरवर्षी पोर व्हायची त्यामुळे आत्याच्या, मावशीच्या, आजीच्या आवडीचं नाव एकेकाला देता यायचं. बाळाला आणि त्याच्या आईला कोण विचारतंय तेंव्हा. मग ती आई आपली तिच्या आवडीचं नाव लाडानी हाक मारायची. विनासायास देवाचं नाम (आपलं नाव असतं, देवाचं नाम असतं, संपला विषय) घेतलं जातं हाक मारताना म्हणून देवादिकांची नावं ठेवली जायची . पण म्हटलं ना आर्थिक परिस्थितीनुसार नाव बदलतं. रामचा रामभाऊ होतो किंवा राम्या होतो. मनोहरला पंत चिकटतं नाहीतर मग मन्या होतो. तुमची पत ठरवते तुमचं नाव किती पूर्ण हाक मारायचं ते. बाळ्या, पैसे असतील तर बाळासाहेब होतो आणि दरारा असेल तर 'बाळ' हे सुद्धा नाव चालतं मग. :)

काळानुसार नावं बाद होतात. आमच्या एका मित्राला त्याचं नाव वासुदेव असल्याचा भयंकर राग होता. घसघशीत नावं केंव्हाच बाद झाली. पद्मनाभ, पद्माकर, जानकीदास, द्रुष्टद्युम्न, सात्यकी, मदन, बब्रुवाहन, हणमंत, श्रीकृष्ण, सीताराम, वामन, केशव, आत्माराम, पुरुषोत्तम, अच्युत, बाळकृष्ण, धोंडो, दत्तो, गोदावरी, द्रौपदी ही नावं आता दुर्मिळ. नविन नावं जास्ती आकर्षक आहेत. इरावती, प्रियदर्शिनी, संजीवनी, इंदिरा, मल्लिका, प्रियंवदा ही नावं मला कायम आवडत आलीयेत. ती ग्रेसफुल वाटतात मला. पण आता सगळं कमीतकमी शब्दात काम. दोन किंवा तीन अक्षरी नावं. ओळखीतल्या एका मुलीचं नाव कादंबरी होतं. जेमतेम पॅम्प्लेट वाटेल इतकी बारीक होती बिचारी. नावाला अर्थ असतो ना? 'आमची कादंबरी आलीये का हो तुमच्याकडे?' 'तक्रार नोंदवायचीये, आमची कादंबरी हरवलीये दुपारपासून' अशी वाक्यं ऐकणारा माणूस आ वासेल आधी. वेगळेपणाचा हट्टापायी नाव ठेवताय फक्तं. गावसकरनी त्याचे आदर्श 'रोहन कन्हाय', एम.एल.जयसिंहा' आणि मेव्हणा 'गुंडप्पा विश्वनाथ' यांची मिसळ करून मुलाचं नाव रोहनजयविश्व ठेवलं पण पुढे पडद्यावर फक्तं रोहनच आलं, ते तीन आणि मधे बापाचं नाव असून पण त्याचा त्याला फायदा काही झाला नाही. मिथुननी स्वतः आणि मोहंमद अलीची भेसळ करून मुलाचं नाव मिमोह ठेवलं होतं. अरे, हाक मारायला तरी जमतंय का ते नाव.        

अपभ्रंश करण्यात तर आपण वाकबगार आहोत. एवढं सुंदर नाव असतं पण जवळीक झाली की किंवा आहे हे दाखवण्यासाठी एरवी जास्ती अपभ्रंश होतात लगेच. अव्या, सु-या, नित्या, रव्या, नंद्या, अथ्या, नच्या, सुन्या, संज्या, मुक्या, दिल्या. मूळ नावं काय स्वस्तं होती म्हणून मोठी ठेवली होती का? फारीनात जॉन्या, मायकेल्या, अंद्र्या, बराक्या. मॅथ्यूड्या, रॉबन्या अशा हाका कुणी मारत असतील असं वाटत नाही. मुलींना सुद्धा पुष्पे, सुमे, धुरपे, कुमे, प्रभे, गोदे, कृष्णे हाका असायच्या. पण आजीनी अशी नातीला मारलेली अपभ्रंशित हाक मात्रं मला कायम कानाला गॉड वाटत आलीये. म्हणून घरात माणसं असावीत खूप. सगळी तुमच्या जन्माच्या आधीची असावीत. प्रत्येकजण तुम्हांला कागदोपत्री नावापेक्षा लाडानी काहीतरी नाव देतो, मजा असते त्यात. समजा दहा बारा वर्षाची सुमी परकर पोलक्यातली एक चुणचुणीत मुलगी आहे, तिला अशी भरल्या घरात किती नावं असतात बघा. आजी कार्टे म्हणते, आजोबा लबाडी कुठेय म्हणतात, काका तिला गोपीचंद, बंड्या म्हणतोय, भाऊ तिला ताई म्हणतोय, मोठा असेल तर सुमडी कोमडी  म्हणतोय, आई सुमे म्हणते, बाबा तिला उगाचच महाराणी असल्यासारखं सुमाताई म्हणतायेत. वय कितीही वाढू देत पण त्या नावासरशी ती हाक मारणारा माणूस न बघता आठवतो. 

नावात काय असतं? काहीही नसतं पण ते धारण करणारा माणूस स्वकर्तुत्वाने त्याला योग्यं ठरवतो तेंव्हा ते अचूक आहे असं वाटायला लागतं. अमिताभ म्हणजे अमित है आभा जिसकी. नो लिमिट्स. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इतकं साधं आणि अनाकर्षक नाव बाळगणारा माणूस, उत्तम पुरुषाची सगळी लक्षण बाळगून होता. सचोटीने, स्वकर्तृत्वावर पैसा जमवला, दान केला. धोंडो केशव कर्वे इतकं जुनाट वाटणारं नाव धारण करणारा माणूस काळाच्या पुढचं काम करत होता. ग्लॅमरस जगात अजिबात न शोभणारं 'नाना' असं एरवी चारचौघात हाक मारण्यासाठी वापरलं जाणारं नाव घेणारा माणूस त्याच सामान्यं नावाची दहशत टिकवून आहे. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे या नावात काय आहे नतमस्तक होण्यासारखं? कार्य असलं की सगळं होतं. त्शेरिंग फिंन्त्सो डेंझोंग्पा हे काय सुटसुटीत नाव आहे का? 'थ्री इडियटस' मधलं फुनसुख वांगडू हे काय आवडण्यासारखं नाव आहे? नावात काय नसतंय, ते आणावं लागतं, स्वकर्तुत्वानी. त्यामुळे विल्यमसाब, आप बराबर है एकदम!

जन्माला आल्यावर मी दोन दिवस सतत रडत होतो म्हणे. जुन्या जाणत्या एक वयस्कं नर्स त्या दवाखान्यात होत्या. त्यांनी आईला विचारलं. घरात कुणी अकाली गेलंय का? वडिलांचे वडील, माझे आजोबा, वडील बारा वर्षाचे असताना गेले, माहिती पुरवली गेली. त्या म्हणाल्या, त्यांचं नाव ठेवा. शांत होईल. मग आज्जीनी कैक वर्षानंतर तिच्या मिस्टरांचं नाव माझ्या कानात घेतलं आणि मी एकदम म्युट झालो म्हणतात. कागदोपत्री जे नाव आहे ते कुणीही हाक मारत नाही, कुणी हाक मारली तरी मी लक्ष देणार नाही कारण अट्ठेचाळीस वर्षं ती कानाला सवयीची नाही. आजोबांच्या नावाचा अपभ्रंश आज्जीला ऐकावा लागू नये म्हणून तिनीच जयंत नाव ठेवलं. मतदान करताना मी आणि वडील पाठोपाठ जात नाही. आधीच आमचं आडनाव एकदम धड आहे, तिथली मठ्ठ माणसं आम्ही डुप्लिकेट मतदान करायला आल्यासारखी संशयानं बघतात.

नाव टिकवण्यासाठी लोकांना मुलगा हवा असतो, तो नाव आणि आडनाव लावतो म्हणून. मला माझ्या आजोबांचं नाव माहितीये. त्याच्या आधीची नावं? कालौघात काय काय पुसलं जातं, आपल्या सामान्य नावाला कोण लक्षात ठेवणारे इथे. आधी आपण नाव ठेवतो मग नावं. नाव घे, लाजू नको (हे कालबाहय झालंय, तरीही), नाव निघालं पाहिजे, नाव काढू नकोस त्याचं, नाव काढलंस बघ, तुझं नाव कमी करण्यात आलं आहे, नावं ठेवायला जागाच नाही काही अशी अनेक कानाला प्रिय, अप्रिय वाटणारी वाक्यं त्या सामान्य नावाशी निगडीत आहेत, एवढं खरं. :)

जयंत विद्वांस

इम्मॉर्टल…


एकोणतीस वर्ष झाली त्याला जाऊन आज. जिवंत असता तर सत्त्याऐंशी वर्षाचा असता तो. ह्रषिकेश मुखर्जी त्याला आणि मेहमूदला घेऊन 'आनंद' काढणार होते. त्याच्या आवाजात 'आनंद'ची गाणी कशी वाटली असती? सुंदरच वाटली असती पण तुमचं ते 'कही दूर जब' मुकेशच्या आवाजात चांगलं आहे असं म्हणावं तर त्यापेक्षा मूळ चाल हेमंतकुमारच्या आवाजातलं 'अमॉय प्रोश्नो करे निल ध्रुवो तारा' जास्ती सरस आहे असं वाटतं. तुलनेला अंत नसतो. पण त्याच्या आवाजात हळवी गाणी जास्ती सुंदर आहेत. अत्यंत प्रतिभावान, विक्षिप्त माणूस. एखादा माणूस का आवडतो याचं नेमकं स्पष्टीकरण देता येत नाही. जे उमगतात ते मन व्यापत नसावेत. त्याची नक्कल करणारे अनेक आले, येतील. पण काही नेमके हळवे शब्दोच्चार (त्याचा 'ह' दुसरा कुणी म्हणत नाही तसा), स्याड व्हर्जन त्याच्या आवाजातच ऐकावीत.

कधी 'फंटूश' मधलं 'दुखी मन मेरे' ऐका कान देऊन. 'पत्थर के दिल मोम न होंगे' ओळ ऐका, 'होंगे'चा 'ह' स्वरयंत्रातून आलेला नाही, हृदयातून आलाय. 'दोस्त' मधलं 'गाडी बुला रही है' ऐकाल. त्यातल्या त्या दोन संथ ओळी अशाच हृदयातून आल्यात. 'आत है लोग, जाते है लोग, पानीके जैसे रेले, जानेके बाद, आते है याद, गुजरे हुए वो मेले' मधला 'गुजरे' ऐका. 'ये क्या हुआ, कब हुआ' चा हसत रडवेला म्हटलेला 'हुआ' ऐका. 'मुकद्दर का सिकंदर'मधे 'रोते हुए, आते है सब' त्याच्या आवाजात येणारच होतं त्यामुळे शेवटी विनोद खन्नाला रफी आला पण मला कायम वाटत आलंय ते त्याच्या आवाजातच पाहिजे होतं. 'शोले' मधे आर.डी.ने तो लफडा ठेवलाच नाही, 'ये दोस्ती' ला बच्चनला मन्ना डे घेतल्यावर आपसूक धर्मेंद्रला तो आला. इतक्यांदा बघूनसुद्धा 'साथी तू बदल गया' ऐकताना काहीतरी होतंच. 'शराबी'तलं 'इंतहा हो गई इंतजारकी' ऐकताना पण असा वेगळाच आवाज कानाला मोहून टाकतो. विनोदी ते गंभीर अशी टोकांची गाणी त्यानीच गावीत.     
    
त्या 'कोई होता जिसको अपना'ला, 'तेरी दुनियासे होके मजबूर चला'ला, 'मेरे मेहबूब कयामत होगी'ला, 'अगर सुन ले तो इक नगमा'ला, 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन'ला, 'ओ साथी रे'ला, 'मै शायर बदनाम'ला, 'चिंगारी कोई भडके'ला, 'वो शाम कुछ अजीब थी'ला, 'तुम आ गये हो'ला, 'मेरी प्यारी बहनिया'ला, 'तेरे बिना जिंदगीसे'ला, 'अपने प्यारके सपने सच हुए'ला,  'सफर'चं 'जीवनसे भरी'ला, 'आप की कसम'चं 'जिंदगी के सफर में'ला त्याचा आवाज वेगळा आहे. काय साला पोटातून गायलाय तो. उमाळा आतून यायला लागतो तसा हा आवाज पण आतून येतो. फॉस्फरस जसा पाण्यात ठेवतात तसा हा राखलेला आवाज, पोटात दडलेला. 'माना जनाब ने', 'अरे यार मेरी', 'छोड दो आंचल', चुडी नही ये मेरा', 'चल चल चल मेरे साथी', 'एक लडकी भिगीभागीसी', 'जानेजा, धुंडता फिर रहा', 'तू तू है वही' चा आवाज वेगळा आहे. 'मेरी प्यारी बिंदू', 'ओ मन्नू तेरा हुआ', 'मेरे सामनेवाले खिडकीमें', 'चिलचिल चिल्लाके', 'एक चतुर नार', 'देखा ना हाय रे', 'बचना ऐ हसीनो' चा आवाज वेगळा आहे. 

'जंगल में मंगल'चं 'तुम कितनी खूबसूरत हॊ', 'रात कली', 'सवेरा का सूरज', भारत भूषणचं 'तुम बिन जाऊ कहा', अमेरिकेला जायचं असल्यामुळे बच्चनची एकंच ओळ आधी गाऊन गेलेलं 'परदा है परदा', 'खिलते हैं गुल यहा', 'प्यार दिवाना होता है', 'ये शाम' कशात टाकायची? लताला वेळ नव्हता, रेकॉर्डिंग तर उरकायचंय म्हणून दोन्ही आवाजात गायलेलं 'हाफ टिकिट'मधलं 'आ के सिधी लगी दिलपे' सारखी धमाल परत होणार नाही. गाण्यांची यादी किती देणार. वारूळ फुटल्यासारखं होतं, रांग थांबतंच नाही. मराठीत पुलं आणि हिंदीत हा. यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय. गीतलेखन, अभिनय, संगीतदिग्दर्शन, गायन, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि सोड्याच्या बाटलीसारखा बाहेर येणारा निर्विष, उच्च दर्जाचा कारुण्याची झालर लावून आलेला, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, सहज, आटापिटा न केलेला विनोद. त्याच्या हस-या मुखवटयामागे दडलेला खरा चेहरा पाह्यचा असेल तर 'दूर गगन की छांवमें' बघा. त्याच्या धीरगंभीर आवाजातलं 'आ चल के तुझे' कधीही ऐका, श्रवणीयच.

त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से त्याच्या गाण्यांएवढेच प्रसिद्ध आहेत. योगीताबालीशी लग्नं केलं म्हणून त्यानी काही काळ मिथूनसाठी आवाज देणं बंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' साठी कुमार गौरवचा आवाज तो देणार होता. कबूल करूनही रेकॉर्डींगला तो गेलाच नाही, माणूस घ्यायला आला तर त्यानी दरवाजाच उघडला नाही शेवटी आर.डी.नी अमितकुमारला घेऊन काम केलं, याचा हेतू साध्यं झाला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण प्रयत्नं करतोच आपल्या मुलांना पुढे आणायला, ह्याचा खाक्या वेगळाच. अनेक हिरोंची चलती याच्या आवाजामुळे झाली. आराधना हिट नसता झाला तर हा गायन बंद करणार होता. पण सगळी गाणी हिट झाली मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही कधी. रफी, मुकेश, मन्नादा सगळे मागे पडले. यॉडलींगचा आठवा सूर होताच.

कुणीतरी त्याला श्रद्धांजली म्हणून सैगलची गाणी गाण्याचा आग्रह केला होता. काय सुरेख बोलून गेलाय तो. 'मी म्हणणार नाही, मी भिकार म्हटलीयेत असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटणार नाही पण मी त्याच्यापेक्षा चांगली म्हटली असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटेल'. आदर पाया पडलो म्हणजेच असतो असं नाही, कृतीतून दिसतो तो ही आदरच असतो. पैसे मिळाल्याशिवाय रेकॉर्डिंग न करणा-या या माणसाने राजेश खन्नानी काढलेल्या 'अलग अलग' साठी एक रुपयाही घेतला नव्हता. विक्षिप्तपणा सुद्धा ओरिजिनल हवा, तो मग हवाहवासा वाटतो. आमची ही अनंत कारणांनी काजळली गेलेली चिमूटभर आयुष्यं तू किती सुखाची करून गेलास याची तुला कल्पना नाही. अजूनही तो सतत वाजता आहे. 

सत्तेचाळीस गेलेला सैगल अजून ऐकतो मी, तुला जाऊन एकोणतीस वर्ष झालीत फक्तं. मी मरेपर्यंत तू सोबत असशील. शेवटी तूच लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, गायलेल्या, अभिनीत केलेल्या वर्णनाच्या ठिकाणीच जाणार, मी काय किंवा अजून दुसरा कुणी काय :

'आ चल के तुझे,, मै लेके चलू एक ऐसे गगन के तले 
जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले'


आहे का रे खरंच असं सगळं तिथे? तरच मजा आहे तिथे येण्यात, नाहीतर मग मेलो काय आणि जगलो काय, फरक शून्यं.

जयंत विद्वांस 

त्यात काये एवढं काळजी करण्यासारखं?...

टू व्हीलरवर मी आणि क्षमा रग्गड हिंडलोय, आधी स्प्लेंडर आणि मग फिएरो. अष्टविनायक, कोल्हापूर, अलिबाग, बोरवाडी, रोहा (याचे भयावह किस्से परत कधी) महाबळेश्वर, डोंबिवली, बदलापूर अनेकवेळा. सातारा रोडनी खंबाटकीपर्यंत सा.बां.मंत्री असल्यासारखे पण आम्ही जाऊन यायचो. घाट चढायचा, येताना बोगद्यातून यायचो. एकदा क्षमा डोंबिवलीला गेलेली. मला खाज भयंकर, म्हटलं तू बदलापूरला ये, मी इकडून येतो. सकाळी जनरली लवकर निघायचो मी. तेंव्हा मोबाईल नव्हता. गाडीचं डिझाईन करताना त्यात एरोडायनॅमिक्स असतं म्हणे. वा-याला कापताना स्पीड कमी होत नाही म्हणजे. मी स्पीडला मि.इंडिया सारखाच होतो जवळपास, वारा अडेल असा देह नव्हताच मुळी त्यामुळे गाडी विनाअडथळा बुंगाट जायची. सर्व्हिसिंग करून आणलेलीच होती. सकाळी खारदूंग ला ची मोहीम असल्यासारखा निघालो. ब्लॅक जर्किन होतं माझ्याकडे थ्री पीस सुटसारखं. त्याच्या सगळीकडच्या चेन लावण्यात एक किलोमीटर जाईल माणूस.    

तर साडेपाच पावणेसहाला निघालो असेन. अंधारच होता. डिसेंबर असेल. हाफ किक स्टार्ट झाली गाडी. पहिला स्टॉप देहूरोड फाटा असं ठरवून निघालो. टर्नला पायावर पाणी पडल्यासारखं झालं. म्हटलं असेल. सारसबाग ओलांडली तेंव्हा एकदा गाडी बुकबुक झाली, म्हटलं असेल, निलायमच्या पुलाखाली गाडीनी व्हेंटिलेटर सपोर्ट काढलेल्या पेशंटसारखा सरळ रेषेचा मॉनिटर दाखवून मान टाकली. मी हैराण, गाडी कडेला घेतली.  चोक दिला, ऑनॉफचं बटण उगाच ऑनॉफून बघितलं चारवेळा. गाडी पुलंच्या एसटीसमोर आलेल्या म्हशीसारखी ढिम्म. मागून एक टू व्हीलरवाला आला. 'मालक, पेट्रोल सांडतंय' म्हणाला आणि पुढे गेला. मी खाली बघून गार पडलो. तालिबानी व्हिडिओत मान कापतात तशी पेट्रोलची ट्यूब टाकीच्या खालच्या पायपापासून सुरी फिरवल्यासारखी तुटलेली. एक लिटरभर पेट्रोल गेलं असेल इंजिनाभिषेकात. आता आली का पंचाईत. मग मी लहानपणापासून खूपच हुशार असल्यामुळे पहिल्यांदा कॉक बंद केला (याला डॅमेज कंट्रोल असं म्हणतात). सकाळी सहाला कोण मिळणार गॅरेजवाला आणि ते ही पुण्यात. नवीपेठेत दिक्षीतांचं एमबी गॅरेज होतं माहितीचं. त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आमचा अनंत सावरकर रहातो. 

मी एका पायानी लहानपणी ती पायानी ढकलत गाडी खेळतात तसं फिएरो ढकलत नवीपेठ गाठली. जर्किनमुळे अंगातून घाम. म्हटलं आठला उघडेल, तोपर्यंत सावरकरकडे जाऊ. पावणेसातला देणेक-यासारखा रविवारचा दारात त्याच्या. ते बिच्चारे झोपी गेलेले जागे झाले. माझी स्टोरी सांगून झाली. मी चक्कर येऊन पडलो तर पुढचे उपद्व्याप करायला लागतील या भीतीनी बहुतेक दोन लाडू पण दिले त्याच्या बायकोनी पोहे होईस्तोवर. लहान मुलं शाळेत ती गुबगुबीत ससा वगैरे होतात ना त्यात चेह-यावर आतला मुलगा किती बारीक आहे ते कळतंच, तसा मी दिसत असणार जर्किन मध्ये. त्याच्या बायकोनी चेहरा वाकडा न करता भन्नाट पोहे केले, चहा झाला. 'आता जेवायला थांबतो की काय हा' अशा अर्थाचं त्यांनी एकमेकांकडे बघायच्या आत मी निघालो. गॅरेजला लागून असलेल्या टपरीवाल्यानी सांगितलं, ते साडेनऊपर्यंत येतात. मी पर्वती पायथ्याला शेलार टीव्हीएसकडे गाडी टाकायचो, म्हटलं चालत गेलो तरी परत येईन नवाच्या आत. निघालो. ते जर्किन वेटलॉसच्या जाहिरातीत खपलं असतं असा घाम काढायचं. साडेआठला त्याच्या दरवाज्यात उभा. 'संडे क्लोज्ड' ची लाल पाटी बघून तिथेच पायरीवर मटकन की काय तसा बसलो. वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखा परत चालत नवीपेठ. 

साडेनवाला एमबीचा एक कामगार आला. माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यानी झाडलोट, सडासंमार्जन, उदबत्ती सोपस्कार पूर्ण करेपर्यंत मी बिनकुत्र्यांच्या दत्तासारखा तिथे झाडाला टेकून उभा. 'एवढंच ना, आलोच' म्हणून तो फरार झाला. साधारण वीसेक मिनिटांनी आला. 'सायेब, फिएरोची ट्यूब मिळत नाहीये'. हातात कमीत कमी सोळा सत्रा आणि वीस बावीसचा पाना हवा होता. दोन्ही कान हाणले असते. 'अरे पेट्रोल ट्यूबला काय करायचीये फिएरोची ओरिजिनल, कुठलीही लाव'. मग तो परत गेला आणि राहुलकुमार बजाजचा टर्नओव्हर वाढवून आला. एक मीटर आणलेली त्यानी. मी एक तुकडा लावून अजून एक स्पेअर घेऊन ठेवला. सगळं आवरून निघायला साडेदहा झाले. निघालो. इथे पुणे लोकेशन सीन संपला. 

कट टू बदलापूर. मी सहाला निघणार म्हणजे साडेनवाच्या आत पोचणार म्हणून बायको दहापर्यंत हजर. मग अकरा, बारा, साडेबारा, एक वाजला. आमच्या आशा काळेनी घरी फोन केला. आई म्हणाली मी सहाला गेलोय. जीए, मतकरी, धारप एकापाठोपाठ एक प्रत्येकाच्या डोक्यात हजर. आता काय ऐकावं लागतंय नी काय नाही. बायकोनी भांड्यात पाणी रेडीच ठेवलेलं गणपतीला ठेवायला. मैं दुनियासे बेखबर निवांत आलो दीडला. खाली गाडी लावली तर वर बाल्कनीत काका, काकू आणि अर्धांग उभं. वरूनच ड्रॅगनसारखे फुत्कार आणि जाळ खाली यायला लागले. मग मी पीसीओवरून घरी फोन केला. वर गेलो. मुकाट जेवलो. जेवताना रेडिओवर दुपारच्या संथ बातम्या लागतात तसा वृत्तांत सांगितला. अंधार लवकर पडतो म्हणून लगेच साडेतीनला बायकोला घेऊन निघालो. 'नीट चालवणार, रस्त्याच्या कडेकडेनी, साठ मॅक्सिमम स्पीड' अशी शपथ घेऊन झाली. 

कॉर्नरला गाडी वळल्यावर मग हाणायला घेतली, 'तुला गरजच काय घरी फोन करायची, उगाच तिकडे आणि इकडे टेन्शन'. पण मागून अस्पष्ट हुंदका ऐकायला आल्यासारखं वाटलं आणि मग मिसाईल कानावर आलं, 'काळजीनी फोन केलाय, मी आहे म्हणून एवढं तरी केलंय, मला उशीर झाला असता तर तूम्ही कॉटवर पडूनच सांगितलं असतंत 'ती काय लहान आहे का, येईल, त्यात काये एवढं काळजी करण्यासारखं?' मी निदान तसं तरी नाही केलेलं'. गाडी चालवताना ड्रायव्हरनी कुण्णाशी बोलायचं नसतं त्यामुळे गप्प बसलो आणि सुखरूप घरी पोचलो. 

जयंत विद्वांस 

या परत ...


नुकतीच गाडी घेतली होती तेंव्हा, सेकंडहँड स्प्लेंडर. बरीच वर्ष लायसन्स नव्हतंच. रम्या म्हणाला, 'साखरवाडीला जायचं का, लोणंदजवळ, उद्या लग्नं आहे, दुपारी परत येऊ'. त्याची सासुरवाडी होती ती. दीड दोन तास लागतील म्हणाला फारफार. डिसेंबर होता. सहालाच अंधार व्हायचा. साडेपाचाला निघालो, हडपसरला पेट्रोल भरलं, बार भरला आणि निघालो. दिवेघाटातच थंडी वाजायला सुरवात झाली होती. स्प्लेंडरचा हेडलाईट म्हणजे एकदम पॉवरफुल काम. चाकाच्या पुढे उजेड असल्यासारखं जाणवेल इतपत तीव्र प्रकाश. अरनॉल्ड असल्यासारखा फक्तं हाफ स्वेटर घातलेला आणि वीसेक रुपयात मिळणारे पिव्वर लेदरचे रेक्झिनचे ग्लोव्ह्ज. ते काही लायकीचे नाहीत हे घाटात बोटं गार पडल्यावर लक्षात आलं. जेजुरीच्या पायथ्याशी चहा प्यायला, अग्निहोत्र केलं, परत बार भरला आणि बुडाखाली १००० सीसी असल्याच्या थाटात निघालो.

स्प्लेंडर का असेना पण समोरून ट्रक आला की ऐकायला जाणार नाहीत अशा शिव्या देऊन डीपर डिमर स्टाईल वगैरे एक नंबर आपली. कडेनी अंधार तुफान, माझा एक टाका थंडी आणि अंधारानी उसवला होता. एकदा डीपर डिमर दिल्यावर असं लक्षात आलं की लाईट ऑफ होतोय. थांबून ट्रायल घेतली तर एकानी मान टाकली होती. मॅक्स पाच फुटावरचं दिसत होतं. आहे तो पण बल्ब गेला तर रस्त्याच्या कडेला बसायला लागलं असतं. कडेला शेती आहे, माळरान आहे की स्मशान आहे काहीही कळणार नाही असा अंधार. मग मागून एखादा ट्रक आला की त्याच्यामागे, कार मागे काही काळ कुत्रं धावतं, तसे स्पीडनी जायचो. आम्हांला घाबरून तो पुढे पळाला की आम्ही स्लो. रम्याला दहावेळा विचारलं की अरे कधी येणार. रम्या पण गूगल मॅप एकदम. लोणंदच्या आधी पहिला लेफ्ट म्हणाला. एक पूल लागतो तो ओलांडला की लेफ्टायचं. म्हणजे लोणंदला जायचं, मागे यायचं आणि राईटला वळायचं. कित्ती इझी. अनेक पूल गेले. लगेचचा लेफ्ट काही येईना.

रस्त्यात एका स्पॉटला दोन पोलीस अडथळे लावून शेकोटी करत बसलेले. दुसरा टाका उसवला. लायसन्स नाही त्याचे पैसे द्यावे लागणार. पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. टाका परत जागेवर. शेवटी एका पुलापाशी रम्या ओरडला हाच तो लेफ्ट. वळलो, पोचलो. मग एका उसाच्या ट्रॉलीमागून बार्शीलाईटच्या स्पीडनी साखरवाडी गाठलं. लोणंदला लग्नं होतं. सकाळी लोणंदला येऊन लग्नं लावलं. जेवायला थांबण्यात अर्थ नव्हताच म्हणून लवकर निघालो. हा भंगार आहे, हा भिकार दिसतोय असं म्हणत ढाबे रिजेक्ट करत जेजुरी ओलांडली. अडीच तीन झाले असतील. आग पडलेली त्यामुळे दिसलेल्या पहिल्या ढाब्यावर गाडी लावली. अघळपघळ काम होतं. खंडहर बघायला येतात तसे आम्ही दोघेच होतो उभे. दोन मिनिटांनी मग दहाबारा वर्षाचा मुलगा आला. म्हटलं हा बहुतेक बंद झाला ढाबा सांगणार. भूक लागल्यामुळे बसलो. 'काय काय आहे रे?' 'शेठ, तुम्ही मागाल ते'. पोरानी पहिल्याच फटक्यात आडवा केला मला.

झेरॉक्स काढून प्लास्टिकमध्ये घातलेलं केलेलं मेनूकार्ड टाकलं त्यानी. फक्तं जेवण होतं म्हणून मुद्दाम 'बिअर नाही का रे' विचारलं. 'कुठली हवी, सांगा नुसतं'. पोरगं चलाख होतं यात वादच नाही. त्याला पैसे देऊन दोन खजुराहो आणायला सांगितल्या. साडेतीन मिनिटात पोरगा चिल्ड बाटल्या घेऊन अवतीर्ण झाला. गावरान चिकन आहे म्हणाला. आम्ही शहरातले शहाणे. त्याला म्हटलं, 'लेका, आतून गरम करून आणणार राहिलेलं आणि आत्ता केलंय म्हणणार'. 'शेठ, कोंबड्या फिरतायेत ना त्या सगळ्या आपल्याच आहेत, बोट दावा, पकडतो आणि या माझ्या मागे, तुमच्यासमोर मान कापतो'. मी परत गार. बरं या सगळ्या बोलण्यात बनेलपणा अजिबात नाही, प्युअर इनोसंस. म्हटलं वेळ लागेल रे, आधीच भूक लागलीये, राहू देत. 'बसा ओ शेठ, रस्सा देतो बिअरबरोबर'. त्यानी मोठी ताटली भरून काकडी, टोमॅटो, चार पापड तळून, फरसाण आणून ठेवलं. आम्ही अजून एक बिअर आणायला लावली. 'ह्या संपत आल्या की सांगा, गरम होईल उगाच'. पोरगा मला आवडायला लागला होता. आधीच मला बिअर म्हणजे ख्यालगायकी होती, निवांत काम असायचं. दोघातल्या तिस-या खजुराहोपर्यंत तास निघाला. पोरानी गरम गरम मिठाचा दाणा टाकलेलं, मिरची लावलेलं चिकनचं ते गरम सूप आणलं. त्या चवीला शब्द नाहीत. इकडे थंडगार आणि वाटीतून आग नुसती. पाचेक वाट्या तरी हाणल्या मी.

नंतर त्यानी जेवण आणलं. तसा चिकनचा रस्सा मी परत खाल्लेला नाही. बकासुरासारख्या तीन मोठाल्या भाक-या आणि नंतर टेकडीसारखा भात हाणला मी रस्सा घालून. आम्हांला देताना त्यानी प्लेटचा हिशोब लावलाच नव्हता. तुडुंब भरलो. त्या दिवशीचा 'अन्नदाता सुखी भव' आशिर्वाद अतिशय खरा आणि मनापासून होता. आम्हांला मागायला लागतच नव्हतं, त्याआधीच तो वाढायचा. बरं सॅलडचे पैसे त्यानी घेतलेच नाहीत. तो ज्या तृप्तं नजरेने बघत होता ना कडेला उभं राहून ते बघणं त्याच्या वयाच्या पटीत होतं. वीसेक वर्षांपूर्वीचं बिल, कितीसं असणार ते. रम्याला म्हटलं त्याला पैसे देऊ. जेवण झाल्या झाल्या टेबल लगेच साफ. पोरगा फक्तं शाळेत शिकलेला नव्हता पण सर्व्हिस इंडस्ट्रीला लागतात ते गुण त्याच्यात उपजत होते. त्याला निघताना वीस रुपये दिले. घेताना त्याच्या चेह-यावर कुठेही तुपकट लाचारी नव्हती. उलट आपलं चीज केल्याचा अभिमानयुक्तं आनंद होता. ढाब्याच्या एंट्रीला आम्ही निघाल्यावर तो हात वगैरे हलवून कुठलाही औपचारिकपणा न करता एखाद्या मोठ्या माणसासारखं 'या परत' म्हणाला. शब्दात सांगता येणार नाही असं काहीतरी वाटून गेलं. 

त्या रोडला परत जाणं झालंच नाही. ते पोरगंही आता तिशी ओलांडून गेलं असेल. तो ढाबा असेल, नसेल, माहित नाही, असला तर आठवेल की नाही हे ही आहे. पण कसलंही नातं, दोस्ती, ओळख नसलेला तो छोटा जवान ज्या प्रेमानी, हस-या चेह-यानी म्हणाला ना 'या परत', तसं अनोळखी माणसाकडून ऐकल्यालाही तेवढीच वर्ष झाली. :)

जयंत विद्वांस     
      

गॉड नोज...



मी आस्तिक आहे की नास्तिक, हे मला स्वतःला न सुटलेलं कोडं आहे. तसंही बरीच माणसं जशी संधी न मिळाल्यामुळे, धाडस नसल्यामुळे सज्जन, अभ्रष्ट असतात तशीच ती सोयीनुसार आस्तिक/ नास्तिकही असतात, अर्थात मी ही त्यापैकीच एक. पूजाअर्चा, रांगा लावून दर्शन, अमुक देणगीत तमुक पटीत काम होतं, उपवास वगैरे प्रकार मात्रं मला आवडत नाहीत. दिसलं देऊळ की लगेच माझा हात छातीपाशी जात नाही. मी देवळात क्वचित जातो. 'तो' आहे अशी चर्चा पुरातन कालापासून आहे पण 'तो' देवळातच आहे वगैरे प्रकार समाधानासाठी आहेत. 'त्या'च्याकडून कुठलाही प्रतिवाद शक्यं नसल्यामुळे त्याच्या नावावर अनंत गोष्टी खपवल्या जातात. 'तो' निराकार आहे असं म्हणतात पण माणसांनी त्याला रूप, रंग, चेहरा, आकार आणि धर्मसुद्धा दिला. तरीपण सगळ्या शक्यता संपतात तेंव्हा आपण 'दिवार'च्या अमिताभसारखं नाईलाजाने का होईना या अदृष्यं शक्तीच्या पायाशी जातोच. कुठेतरी असं काही घडून जातं की विश्वास ठेवावा लागतो. माणसाच्या रूपात तो मदतीचा हात देऊन जातो आणि तो माणूस नंतर सापडतच नाही तेंव्हा कोडं अजून वाढतं. 

सत्रह साल पहले की बात है! पूर्वसुकृत म्हणा किंवा या जन्मातलं पुण्यं कमी पडलं असेल म्हणून क्षमाला माझ्याशी लग्नं करावं लागलं यावर ती ठाम आहे. मोरावळा जुना होत जातो तसा तो अजून चविष्ट होत जातो, त्यातले आवळे करकरीत रहात नाहीत, अगदी मऊ पडतात. पण आता सतरा वर्ष होतील तरी तिच्या मतात फरक न पडता ते अजून दृढ होत चाललंय. चांगल्या बायकांच्या नशिबात असलेच ('असलेच' म्हणजे काय याची तिची व्याख्या सांगायला साधारण दोन पानं लागतील) नवरे असतात हे पटवायला तिला स्मिता पाटील (राज बब्बर), शिवानी कोल्हापुरे (शक्ती कपूर) आणि क्षमा जोशी (जयंत विद्वांस) ही तीन उदाहरणं पुरेशी आहेत. तर लग्नं झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरची गोष्टं असेल, जेंव्हा मी बोलायचो आणि ती ऐकायची, तेंव्हाची. आता ड्युरासेल टाकल्यासारखी फक्तं ती बोलते (रेडिओ बंद तरी करता येतो बटणानी) आणि मी ऐकतो (याला बोलणी खाणं असं म्हणतात). 

तर ती डोंबिवलीहून पुण्याला येत होती. बरोबर लगेज काहीही नव्हतं. फक्तं पर्स. लोकलनी कल्याणला आली, उतरली तर समोर 'सिंहगड' उभी. तेंव्हा स्लिमट्रिम असल्यामुळे ती चपळाई करून लगेच चढली. गाडी हलली. 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाम' गाण्यात कल्याण सोडल्यावर 'दिवार'मधे शशी आणि अमिताभच्या वाटा जशा देवळापासून वेगळया होतात तसे ते कर्जत आणि कसा-याला जाणारे फाटे दिसतात, तिथे हिची 'सिंहगड' अल्झायमर झाल्यासारखी कर्जतच्या फाट्याला फाट्यावर मारून कसा-याकडे वळाली. मगाचच्या धावपळीत आलेला घाम तोवर पुसून झाला होता तो परत जमा व्हायला लागला. एकानी सायलेंट घाम काढला, 'बहेनजी, ये 'पंचवटी' है, गलती आपकी नही है, ये थोडी लेट है तो 'सिंहगड'की जगह ये लगाई थी, अनाउन्समेंट सुनी नही क्या आपने! और दोनोका कलर भी सेम है!' आता नाशिक किंवा आधी कुठे थांबेल तिथे जावं लागणार या कल्पनेनी हिला घाम फुटला. भैय्ये लोक होते गाडीत. ते म्हणाले जनरली कसा-याला सिग्नल नसतो, हळू होते गाडी, तुम्ही उतरा. खरंच गाडी कसा-याला स्लो झाली. हिला दोघातिघांनी प्लॅटफॉर्मला उतरवलं. ती चेह-यानी (फक्तं) अतिशय गरीब आहे. माझ्याकडे तिकीट नाही हे तिच्या तोंडावर स्क्रोल होत होतं. तिला टीसीने धरलं आणि इस्टोरी सांगूनही व्हीटीपासूनचा दंड घेतला. 

ठाण्याचा एक मुलगा हे सगळं ऐकत, बघत होता. त्यानी तिला धीर दिला, तिचं कल्याणचं तिकीट काढलं. कल्याणला उतरून पुण्याचं तिकीट काढून दिलं, तिला 'सह्याद्री'त बसवलं. तेंव्हा मोबाईल नव्हता. स्वतः:चं नाव आणि पत्ता लिहून दिला. माझा घरचा नंबर घेऊन गाडी सुटल्यावर काय झालंय ते त्यानी सविस्तर सांगितलं. उतरणार कुठे हे विचारायचं राहून गेलं, शिवाजीनगर की स्टेशन. साधारण दहाला 'सह्याद्री' पुण्याला येते. मी स्टेशनला गेलो आधीच. 'सह्याद्री' आली, प्लॅटफॉर्म रिकामा झाला तरी क्षमा नाही, मग शिवाजीनगरला गेलो तर तिथेही कुणी नाही, घरी फोन केला तर तिथेही नाही, परत स्टेशनला गेलो, तिथून फोन. मग रिक्षेनी गेली असेल असं गृहीत धरून घरी आलो, तरी नाही. दहाएक मिनिटांनी रिक्षा थांबल्याचा आवाज आला. सशाचा घाबरा चेहरा करून ती घरात आली आणि तिला रडू फुटलं. सगळी स्टोरी सकाळी सांग म्हटलं. मग सकाळी आम्ही 'बुगडी माझी सांडली गं' च्या चालीवर 'क्षमा आमची हरवली गं, जाता कसा-याला'च्या चालीवर सगळी स्टोरी ऐकली.  

घरी फोन करायला ती स्टेशनला थांबली. पीसीओवरून फोन करताना शेजारी ठेवलेली पर्स कुणीतरी आम्हांला नको असल्यासारखी उचलून नेली. आता घरी यायला रिक्षेला पैसे नाहीत. रिक्षा करून घरी आल्यावर द्यायचे एवढाच मार्ग. पण एक अपंग बाई आणि तिचा नवरा सिंहगड रोडला चालले होते, त्यांनी थोडी वाकडी वाट करून तिला घरापाशी सोडलं आणि एक रुपया न घेता, आभार मानायची संधी न देता ते निघून पण गेले. त्या मुलाचं नाव, पत्ता आणि फोन नं.ची चिट्ठी पर्समध्ये होती, ती पण गेली. आता तो तिला रस्त्यात दिसला तरी ती ओळखू शकणार नाही पण कुणीतरी अज्ञात सज्जन माणसानी केलेल्या मदतीचे आभार मानायचे राहून गेलं याची रुखरुख कायमची राहील. त्यानी काढून दिलेल्या तिकिटाचे पैसे तिनी तळ्यातल्या गणपतीला ठेवले. त्याचा प्रतिनिधी आला होता त्यामुळे ब्रँचऑफिसला जमा केले. आता या सगळ्यात देव कुठे आला असा प्रश्नं पडेलच पण माझं उत्तर त्या हुशार धर्मगुरूसारखंच आहे.   

एका धर्मगुरूला वाद घालण्यासाठी एकानी प्रश्नं विचारला, 'इज देअर गॉड?' त्यानी उत्तर दिलं पण आणि नाही पण, तो म्हणाला, 'गॉड नोज'. :)

जयंत विद्वांस 

(सदर पोस्ट टाकल्यानंतर पुढे आठवडाभर नविन पोस्ट न दिसल्यास मला काही नविन सुचलं नाहीये असा अर्थ काढावा. डोळ्यावरची सूज उतरली का? हाताला प्लास्टर अजून किती दिवस सांगितलंय? कामावर स्वतः गाडी चालवून जाऊ शकता का? वगैरे प्रश्नं विचारून वुंडवर सॉल्ट रबू नये,)