Saturday 7 July 2012

मठ्ठं....
ती मला नेहमी प्रेमानं(?) मठ्ठं म्हणते
(मला फार राग येतो)
कालचीच् गोष्टं, मी तिला म्हणालो
मी काय होउ?

डोळ्यातलं काजळ की पायातलं पायल्,
ओठावरचा तीळ की कानातला लोलक,
गालावरचं लाल लाल सफरचंद की
नाकातला हिरा की गळ्यातला तन्मणी,
तुझा नाजूक हातातला सेंटेड हातरूमाल,
गो-यापान हातावर बाजूबंद होउ की
मखमली कमरेवर कमरबंध होउ?

ती हसून म्हणाली, येडं ते येडच् शेवटी.
(मला फार राग येतो)
अरे खुळ्या, छान प्रिंटेड वायल तरी
व्हायचस्, नखशिखांत लपेटलं असतं.

मठ्ठं तो मठ्ठंच्......
जयंत विद्वांस

Tuesday 3 July 2012


कधी वाटते........

कधी वाटते पक्षी व्हावे
उंच आकाशी मस्त उडावे
कधी वाटते होउन मासा
खोल सागरी तळा धुंडावे

कधी वाटते फूल व्हावे
केशी किंवा पायी वहावे
कधी वाटते होउन वारा
मनोवेगाने जगी फिरावे

कधी वाटते आस्तिक व्हावे
मुखी नाम त्याचे रंगावे
कधी वाटते होउन नास्तिक
दांभिकतेचे बुरखे फाडावे

कधी वाटते माणूस व्हावे
मनासारखे काही जगावे
कधी वाटते होउन अंकुर
मातीतून पुन्हा उगवावे

जयंत विद्वांस