Thursday 15 September 2016

गेला तो गेलाच...

गेल्या कित्त्येक वर्षात गणपती बघायला, विसर्जन मिरवणुकीला गेलो नाहीये. तेवढीच गर्दी कमी. पूर्वी दिवाळीपेक्षा ती धमाल जास्ती असायची. लहान असताना आमचा मामा विजय अभ्यंकर आम्हांला गणपती दाखवायचा. तसे कुणी दाखवणार नाही आता आणि बघणारही नाही. विक्षिप्तपणाचा इसेंस त्याच्यात ओतप्रोत होता. पुणे दर्शन असायचं. भिकारदासला त्याच्याकडे जायचं, मग तो आला की निघायचं. दिशा ठरायची मग त्याच्यामागे जायचं फक्तं, का, कुठे वगैरे विचारायचं नाही. तिकडे पार कॅम्पापर्यंत, इकडे शिवाजीनगर, पश्चिमेला डेक्कन असा एरीया कव्हर व्हायचा. माणूस तिरळा होईल त्याच्याबरोबर गणपती बघताना कारण एक डोळा गणपती आणि एक त्याच्यावर ठेवायला लागायचा. फार कुठे न रमण्याचा त्याचा स्वभाव होताच. लहान मुलांचे हात धरण्याची वगैरे पद्धत नव्हतीच आमच्यात. एक तर तो तरातरा चालायचा आणि कधी पुढच्या गणपतीकडे सटकेल ते सांगता यायचं नाही. त्याचा बघून झाला म्हणजे आमचा पण झाला असा त्याचा समज होता. तक्रार केली तर उद्यापासून गणपती बंद. त्यामुळे हरवलो तर चूक आमचीच. 'नाही दिसलो मी तर शोधत बसायचं नाही, भिकारदासला जाऊन झोपायचं' इतका सोपा सल्ला होता. 

देखावा कितीही भारी असो, मूर्ती देखणी असो, भन्नाट लायटिंग असो, तो निर्विकार चेह-यानी बघायचा. कुठल्या वाड्यात वगैरे असलेला गणपती पण तो दाखवायचा. गुहेत शिरून बघायचे झाकलेले देखावे तो बघून या म्हणायचा. कॅम्पापर्यंत एवढे गणपती नसायचेच फार, उगाच तंगडतोड व्हायची पण बोलणार कोण. पेशव्यांचा रयतेचा एखादा गणपती बघायचा राहिला हा बट्टा नको म्हणून आम्ही जायचो, अगदी चार दिशांना स्वार सोडावेत तसं. 'इकडे कशाला'? कोण बोलणार. त्याच्या आवडीची मंडळं ठरलेली होती आणि त्या प्रत्येक मंडळाची खासियत पण होती. मंडईचा लाकडी शारदा गणपती, बाबू गेनूला फुलांची सजावट आणि पुढे वाजणारा तो चौघडा, सनई, ते ऐकत बराच वेळ आम्ही उभे रहायचो, तुळशीबाग अवाढव्य मूर्ती आणि खेडकरांची शिल्पकला, हिराबागेला कारंजी नाहीतर देखावा, जिलब्या मारुती, जोगेश्वरी, गुरुजी तालीम साधी मंडळं, दगडूशेठ म्हणजे न पाहिलेलं कुठलं तरी अवाढव्य मंदिर असायचं, सगळ्यात खतरा गणपती म्हणजे नातूबाग. 'हॊठोपे ऐसी बात', 'मुंगडा', 'नाच रे मोरा', 'परदेसीया, ये सच है पिया', 'ये मेरा दिल' असल्या गाण्यांवर उघडझाप करणारे विविध पॅटर्नचे रंगीबेरंगी दिवे बघण्यात तास निघायचा. क्षणार्धात गोल, त्याची चांदणी, तारा, लंबगोल, उभ्या सळया, आडव्या लहरी, तिरके बाण, स्वस्तिक काय नी काय एकेक व्हायचं. बघताना संगम साडी सेंटरच्या पायरीवर नाहीतर नवा विष्णूच्या दारात तो विड्या फुकत बसायचा निवांत. 

आमचं पर्वती दर्शनचं मंडळ अदृष्यं देखाव्यासाठी 'सौ साल पहिले'च्या धर्तीवर प्रसिद्ध होतं/आहे/राहील. गणपती आणि मंडप फक्तं, आपण मनातल्या मनात देखावा बदलून बघायचा. क्वचित दारूच्या किंवा ताडीगुत्त्यातून वगैरे वर्गणी बरी आली तर लाजेकाजेखातर गणपतीला अगदी उघड्यावर पडलोय असं वाटू नये म्हणून काहीतरी उभं रहायचं. त्यामुळे गावात पळ काढणं जास्ती आकर्षक होतं. या सगळ्या प्रकारात भेळ किंवा भजी मिळायची फक्तं. एकेवर्षी नऊला निघून पण आम्ही मंडईच्या पुढे सरकतच नव्हतो, साडेअकरा झाले तरी. बरं सांगायची पद्धत नव्हतीच आमच्यात. कंटाळून विचारल्यावर तो म्हणाला बारा वाजले की मग जाऊयात कारण त्याचा शनिवारचा उपास होता. 'समाधान'च्या बाहेर पोहे, भजीचा स्टॉल होता. १२.०१ मिनिटांनी रविवार लागल्यावर आम्ही पोहे, भजी हाणली मग विश्रांती घेऊन ताज्या दमाचे घोडे कूच करतात तसे आम्ही निघालो. दुस-या दिवशी पाय जाम दुखायचे तरीपण आम्ही जायचो. नंतर आमचे आम्ही जाण्याची अक्कल आल्यावर ते न बोलता बंद झालं.
.
बदलापूरहून, ओळखीतून, कुठून कुठून माणसं गणपतीत यायची आणि आम्ही हौसेने फिरायचो. धमाल यायची. आता तो उत्साह राहिला नाही. खिशात पैसे आहेत, कंटाळा येईल तिथून रिक्षानी घरी येऊ शकण्याची, भूक लागल्यावर समोर दिसेल त्या हॉटेलात खाण्याची ऐपत आहे पण जाणं काही होत नाही. देखावे अजून सुंदर असतील, लायटिंगचे पॅटर्न जास्ती मनोहारी असतील, नुसता ठेका असलेली शब्दं हरवलेली गाणी असतील पण पुणं काय किंवा अजून कुठलं दुसरं शहर काय लहान मुलांनी चुकण्यासारखं राहिलेलं नाही. 

आता ती रुपयात बचकभर मिळणारी गरम गोल भजी आणि तर्कटासारखा पुढे निघून जाणारा विजूमामा पण नाही. तो २५ जानेवारी २००६ निघून गेला तो गेलाच. 

जयंत विद्वांस    

मन्या मराठे...

पावणेसहा फुटाच्या आसपासची उंची, गव्हाळ वर्ण, लबाड वाटणारे डोळे, सरळ नाक, शिडीशिडीत अंगकाठी आणि प्रथमदर्शी अबोल वाटेल असा हा गोष्टीवेल्हाळ माणूस माझा मित्रं आहे. चुकलो, त्यानी मला मित्रं मानलंय हा त्याचा मोठेपणा आहे, नाहीतर माझी त्याच्याशी बोलण्याची सुद्धा लायकी नाही असं त्याचं मत आहे. हा नावावरून वाटतो तेवढा साधा, सरळ माणूस नाही. फक्तं दिसायला सालस, भिडस्तं वाटू शकतो पण ओळख वाढली की वाट्टेल ते बोलेल, चारचौघात तुमची लाजही काढेल. मुळात तो अतिशय भावनाप्रधान माणूस आहे पण त्याचं प्रदर्शन करणं त्याला जमत नाही, त्याला गर्दीचा त्रास होतो, म्हणाल तर माणूसघाणा आहे आणि तुमचं मैत्रं जुळलं चुकून तर मात्रं तो अतिशय लाघवी माणूस आहे. अतिशय पराकोटीचा दुराग्रह एवढा दुर्गुण सोडला तर बाकीचे दुर्गुण सुसह्य आहेत किंवा त्यांची सवय झाल्यामुळे ते दुर्गुण आहेत हे आपण हळूहळू विसरतो. त्याचे गुण शोधावे लागतील इतके विरळ आहेत कारण स्वतःबद्दल जास्तीत जास्ती गैरसमज कसा होईल याची तो पुरेपूर काळजी घेतो.

फटकन, कुचकं बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. अतिशय घाणेरडं, मनाला लागेल असं तो शब्दं न शोधता बोलू शकतो. आता पन्नाशीला आलेला हा माणूस मनानी मात्रं अजून लहान आहे. रस्त्यानी जाताना बॉलिंग करेल, गाडीवरून जाताना मोठयांदा ओरडेल, समोरचा दचकला की आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करेल, मागे रस्त्यात चालताचालता लंगडी पण घालायचा पण आता जरा आचरट चाळे त्यानी बंद केलेत. एकदा गंभीर चेहरा करून तो मला म्हणाला होता, 'तुझं वय काय रे?' 'तुझ्याएवढंच'. 'तुम्हांला भडव्योहो विचारलंय तेवढंच सांगता येत नाही, **त बोट घालायचं आणि मग वास येतो म्हणायचं'. 'बरं, सत्तेचाळीस, त्याचं काय आता'. 'तू काय म्यॅच्युअर्ड वाटतोस रे, काय करतोस एक्झॅक्ट्ली तसं वाटण्याकरता की मठ्ठ दिसत असल्यामुळे मॅच्युअर्ड वाटतोस?' असल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसतात. तिस-या चौथ्या वाक्याला जर त्याला वास आला की आपण त्याचं बौद्धिक घेतोय तर मूळ विषय विसरून आपल्याला कशी अक्कल नाही याचा मोनोलॉग चालू होतो, मग आपण फक्तं श्रोते.

त्याला पडणारे प्रश्नं आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतात. तो कधी काय विचारेल ते तुम्ही सांगूच शकत नाही. 'कधी गांजा ओढला आहेस का?' माझे डोळे बाहेर आले. 'गांजाssss? छे, तू ओढला आहेस?' 'मी तुमच्यासारखी भिकारडी व्यसनं करत नाही, साला पण तो नवाबासारखा हुक्का आणून मागे लोडबिड लावून वर ती फरकॅप घालून ओढावा अशी माझी जाम इच्छा आहे'. त्याची बायको आणि मुलगी गरीब आहेत म्हणून हा तर्कट माणूस तरलाय. 'अरे पण बायको धूर काढेल की घरात असले उद्योग केलेस तर'. 'ती कशाला काय बोलेल, एकदा करून बघायचंय फक्तं, माझा काय त्रास आहे आणि त्यात, कोळसे माझे मी पेटवेन आणि मी काय मीनाकुमारीसारखं तिला 'इन्ही लोगोने' म्हणायला सांगतोय का? बरं ते मरू दे, पण साला एकदा ते लखनौला जाऊन आपण मुजरा बघून येऊ. आपल्याला काय हात धरायचा नाही, काही नाही, बघू तरी काय प्रकार आहे'. त्याच्या कुठल्याही बोलण्यापुढे गप्पं बसण्यासारखा सोनेरी उपाय नाही. कुठलीही वाईट गोष्टं जाणून घ्यायची त्याला हौस आहे, करणार काहीच नाही पण माहिती हवी.

तसा तो कामात वाघ आहे कारण नोकरीच्या ठिकाणी त्याची वट आहे. ऑफिसची कामं कधीही पेंडिंग न ठेवणारा हा माणूस घरात मात्रं अत्यंत बेशिस्त आहे. तेवढ्या एका कारणाकरता बायको त्याला सतत झोडते आणि हा चक्कं ऐकून घेतो. 'सुधार की लेका, पण मला कोडं आहे, तू ऐकून घेतोस याचं'. 'अरे, तिला पण आऊटलेट पाहिजे की, मला बोलल्याच्या आनंदात तिचे पुढचे किती तास सुखात जात असतील सांग'. मन्या माणसाला निरुत्तर करण्यात पटाईत आहे. बरेचजण त्याचं चटपटीत बोलणं ऐकण्यासाठी, शिव्या खाण्यासाठी त्याला मुद्दाम उकसवतात आणि मग पट्टा चालू झाला की अपमानसदृश कुचकं बोलणं समाधानानी ऐकतात. एकदा असेच आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. त्याच्या एका कलीगचं लग्नं व्हायचं होतं. डोक्यानी थोडा कमी आणि चाळीशीच्या आसपासचा होता. एकतर दिसायला अतिशय कुरूप पण बाता सगळ्या 'किती सामानांना कसं कसं फिरवलं'. मन्या सगळं निमूट ऐकत होता. अति झाल्यावर म्हणाला, 'जोश्या, तू जेवढी स्वप्नं बघितली आहेत ना तेवढ्या वेळा मी झोपलोय सामानांबरोबर'. जोश्या बिचारा गार पडला. 'कशाला बोलायचं उगाच, थापा मारतोय तर मारू दे की, तुला काय करायचंय'. 'बाता माराव्यात पण इतक्या पण नको रे, आजारी पडेल अशाने, जे व्हायला हवंय ते नशिबात नाही त्याच्या, वेडा होईल अशानी'.  

मन्या विकतची दुखणी घेण्यात हुशार आहे. सल्ला मागायचा असेल तर मन्याकडे मागावा. कुठल्याही विषयवार तो सल्ला देऊ शकतो पण तुम्हांला रुचावं म्हणून तुमच्या सोयीचा सल्ला तो देणार नाही. तो लॉजिकली बोलतो, आपल्याला न सुचलेली शक्यता त्याला पहिल्यांदा सुचते. त्याचा सल्ला पहिल्यांदा पचनी पडत नाही त्यामुळे तो ऐकला जात नाही पण त्याचा त्याला राग येत नाही. फक्तं त्याचं भविष्य खरं झालं की तो पटाशीनी तासल्यासारखी आपली सालं काढतो. 'फुकट *वायला मिळालं की किंमत नसते, पैसे टाकून मिळालेला सल्ला शिरसावंद्य असतो'. आपण गप्पं बसायचं. 'काय काय हागून ठेवलंय ते सांग म्हणजे निस्तरायला'. मन्या मग त्याला जेवढं शक्यं आहे तेवढं करतो पण त्याचे आभार वगैरे मानलेले त्याला आवडत नाहीत. त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्याच्या तोंडातून कधीच येणार नाही. अनंतवेळा पैसे बुडून सुद्धा तो लोकांना पैशाची मदत करतो. चिडला की शिव्या देतो, परत कुणाला उभं करायचं नाही वगैरे ठरवतो. ते अर्थात अल्पकाळ टिकतं.

मन्याचं एक मात्रं आहे. तो फसवत नाही कुणाला. एवढा तोंडाळ, उर्मट, फटकळ असूनही बायकांशी मात्रं त्याचं जास्ती पटतं. त्याला भडकवण्याकरता मी म्हटलं एकदा, 'मन्या, लफडी किती केलीस आत्तापर्यंत, खरं सांग'. 'दोन हाताची बोटं पुरतील, एवढी नक्की. पण कधीही कुणाला फसवलं नाही आणि माणूस आवडला, बोललो म्हणजे काय लफडं असतं का लगेच? कधी कधी नुसत्या गप्पा मारल्या तरी माणूस आवडतो'. 'पण मग कधी गुंतला नाहीस का?' 'गुंतलो की, समोरचा माणूस पण तसा हवा रे गुंतायला. माझं 'झोपणं' हे उद्दिष्टं कधीच नव्हतं त्यामुळे मी कुणाशीही डोळ्यात डोळे घालून मोकळेपणानी बोलू शकतो. बायकांना गोंडा घोळणारी माणसं आवडत नाहीत, तुम्ही लोक तिथेच मार खाता कारण तुमची ध्येयं ठरलेली असतात. कुठलीही गोष्टं सहज घडायला हवी, मॅनेज करता तुम्ही लोक'.

मन्या कसा का असेना एक माणूस म्हणून मला तो आवडतो. तर्कट आहे, विक्षिप्त आहे, माणूसघाणा आहे, उर्मट आहे पण मनानी लोण्यासारखा आहे, चटकन वितळणारा. सगळ्या गावाची दु:खं तो गंभीर चेह-यानी ऐकतो, त्यावर बोलतो, लिहितोही पण स्वतःबद्दल तो क्वचित बोलतो. एकदा बोलता बोलता तो म्हणाला होता, ''आपलं आपल्यापाशी, आणि आपण सांगताना नेहमी आपलं कसं बरोबर आहे हेच सांगतो. त्यामुळे जे काही असेल ते माझं माझ्याकडे, ते माझ्याबरोबर जाईल. त्यावर चर्चा कशाला? एकटा असलो की मी सगळं परत आठवतो सगळं. माझी आठवण कुणी काढत असेलच की आणि समजा नसेल काढत तर राहिलं, मग तक्रार कशाला? त्यामुळे मी माझ्या मते जे बरोबर वागलोय त्याची खंत मी करत नाही. मला कुणी फसवलं, खोटं बोललं की राग येतो पण मी त्या माणसाबद्दल कधी वाईट बोलत नाही'. सापडला सापडला वाटेपर्यंत हा माणूस कायम वाळूसारखा माझ्या हातातून निसटत आलाय.

पाय जमीनीवर ठेवायचे असतील तर मन्यासारखा दोस्तं हवा. तोंडावर शिव्या देऊन मागे कुणाकडे तरी कौतुक करणारा. परवाच त्याला म्हटलं. 'व्यक्तिचित्रं चांगली जमतात ना रे मला आता?' 'चांगली? माकडा, बरी असा शब्दं आहे त्यासाठी. चांगली हे लोकांनी म्हणायला पाहिजे. पुलंसारखी लोकांना तोंडपाठ आहेत ती? त्यातलं एखादं वाक्यं म्हटलं तर कशातलं आहे हे आठवतं लोकांना? एका वाक्यात तुझी लायकी सांगू? 'तू बरं लिहितोस, फक्तं इतरांपेक्षा चांगलं लिहितोस एवढंच'. कुणापेक्षातरी चांगलं यात रमू नकोस, आपल्यापुढे आहेत त्यांच्या लेव्हलचं जमतंय का हा ध्यास हवा'. खरंतर आपल्यात पण एक मन्या मराठे लपलेला असतोच, उर्मट, तिरसट, लोक काय म्हणतील याची काळजी न करणारा पण आपल्याला तसं वागता येत नाही म्हणून असली तिरपागडी माणसं आपल्याला आवडत असावीत. त्याला म्हटलं, 'तुझ्यावर लिहितो आता'.

मन्या म्हणाला, 'याचा अर्थ तुझ्याकडे विषय नाहीत. तुला काय माहितीये आणि माझ्याबद्दल? वरवरचं खोटं, नाटकी लिहिशील. आपल्या माणसाबद्दल लगेच लिहायचं नसते रे माकडा, उत्सुकता संपते'. मन्याकडे मी लक्ष देत नाही, तो 'आपल्या' माणसाबद्दल म्हणाला या आनंदात उरलेल्या आयुष्यात मी त्याच्या शिव्या हौसेने खात राहीन एवढं नक्की. :)

जयंत विद्वांस
 

'दी'ज्, 'दा'ज्, 'अक्का'ज् आणि 'भैय्या'ज्...

पुरातन काळापासून जर फेबू असतं तर 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती', 'बहनाने भाई की कलाईपे प्यार बांधा है', 'फुलोंका तारोका सबका कहना है', वगैरे गाण्यांना मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी मुकली असती. जिला भाऊ नाही ती चंद्राला ओवाळते म्हणे. एकूणच बहीण भावाचं नातं आपल्याकडे जरा वरच्या रँकलाच आहे. बहिणी बहिणी किंवा भाऊ भाऊ यापेक्षा बहीणभाऊ नातं म्हणजे एकदम डोळ्यातून पाण्याचे लोट, छातीत डाव्या बाजूला मायक्रॉन कळ वगैरे. बहिणीवरून दिलेली शिवी मारामारीला कारणीभूत ठरू शकते इतका तो जिव्हाळ्याचा विषय आहे. मला पण लहान असताना बहीण नसल्याने (अर्थात मी मोठा झाल्यावर पण नाहीये) इतर मुलांच्या हातांवर कासाराकडून हातभर चुडा भरून घेतल्यासारखी राख्या घातलेली मुलं पाहिली की वाईट वाटायचं. उतरत्या व्यासाचे स्पंज, वर एक प्लास्टिकचं कुठल्यातरी सिनेमाचं नाव आणि एक मणी असल्या राख्या इतिहासजमा झाल्या. आता ब्रेसलेट राखी असते. खरंतर गोंडा जेवढा शोभतो तेवढं दुसरं काहीही नाही. असो! तर या नात्यात मला चुलत, मामे, आत्ते वगैरे बायफरकेशन करणारे विचार मनाला कधी शिवले नाहीत, सगळ्या सारख्याच.

या सगळ्यात मानलेल्या हा प्रकार आला नंतर. त्यात वाईट काही नाही. ज्यांना बहीण नाही किंवा जिला भाऊ नाही त्यांनी काय करायचं. वडिलांना सांगून घरात मेंबर वाढवला तर ते रस्त्यावर येतील संख्या वाढल्यानी त्यापेक्षा हे जास्ती सोपं आहे. पण त्यापैकी कुणाला प्लॅनिंग किंवा अपघाताने असेल पण भाऊ/बहीण झाली की मग मानलेली नाती मान टाकताना पाहिलीयेत. वय वाढत गेलं की ती ओढ कमी होत असावी. काहीवेळेस इतर उद्योग करण्याकरता पण हे नातं उपयोगी पडतं. सगळ्यांना सगळं माहित असतं पण ते भाऊ बहीण असतात, अर्थात कुणी कुणाशी काय नातं ठेवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे (आपल्यात नाही दम तर काड्या कशाला घालतो मग जळक्या - परममित्रं मन्या मराठे). तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे फेसबुकावर हे नातं जेवढं उदयाला आलं तेवढं कुठेच नाही. एकदा कुणाला 'दा' म्हटलं की पुढचे संभाव्यं इनबॉक्सात येऊन लाळपतनाचे धोके टळतात हा फायदाही त्यात असेल, माहित नाही. पण हे नातं चिकटवलं जातं, मिरवलं जातं.

आदराने, वयाच्या मोठेपणाने दा, जी, अक्का, भैय्या, दादू, दद्दू वगैरे उपाध्या समजू शकतो, त्यात गैर काहीही नाही. वयाचा मान ठेऊन अशी उपाधी दिली की जवळीक वाटते हे ही आहे पण उगाच नाती चिकटवायला कशाला लागतात ते मला कळलेलं नाहीये. मुळात आपल्याकडे एक बाप्या, एक बाई जरा मोकळेपणानी बोलताना दिसले की प्रद्युम्न, अभिजित, दया बायनॉक्युलर घेऊन लगेच घटनास्थळी हजर असतात. 'कुछ तो गडबड है, दया'. त्यामुळे एकदा दा, तायडे म्हटलं की बरं पडतं, सी.आय.डी.मंडळी दुस-या घटनास्थळी धाव घेतात. नात जोडलं किंवा त्याला नाव दिलं म्हणजे नेमकं काय होतं? अर्थात ते ही मान्य केलं पण त्याचं ते नाटकी मिरवणं बघितलं की हसू येतं. काय एकेक उमाळे असतात. एवढं प्रेम जगात अस्तित्वात असतं तर प्रॉपर्टीची भांडणं झालीच नसती. सख्ख्या बहिणीला गावातल्या गावात भेटायला वेळ होत नाही पण फेबुवर बंधूज आणि भगिनीज एकमेकांवाचून सुकतात. काय एकेक स्टेटस असतात, वाचून मला तर आपण माणूस नाहीये अशीच शंका वाटायला लागते. 

'तायडे, कुठायेस? मिस यू'. तायडी पण लगेच मिसकुटी होते. नाहीतर ताईराजेंच्या गंभीर पोस्टवर आकाश कोसळल्यासारखं 'काय गं, काय झालं, फोन करू का?' अरे बाबा, तिचा प्रॉब्लेम एवढा मोठा असेल तर कर की फोन, जाहिरात कशाला? पण लगेच दद्दूला हमी देणारं स्पष्टीकरण कॉमेंटला येतं आणि दादासाहेब सुटकेचा निश्वास सोडतात. आता मी एक खत्रूड आहे ते जाऊ दे त्यामुळे माझ्या भाग्यात असला योग येण्याची शक्यता नाही (असल्या कुजकट पोस्ट लिहिल्यावर तुला फक्तं कानफटायला जवळ घेतलं जाईल - परममित्रं, दुसरं कोण) पण मला असं कुणी जाहीर ममत्वं दाखवलं तर मला भरून येईल, 'दे दे प्यार दे' गाण्यात स्मिता पाटील प्रेमळ वागते तेंव्हा अमिताभ जसा चक्रावतो तसं आपण चुकीच्या गल्लीत शिरलोय असं मला वाटेल. अव्यक्तं प्रेम जास्ती भावनाशील असतं असं माझं मत आहे, मग नातं कुठलंही असो. माझी चुलत बहीण जन्माला आल्याचा सगळ्यात जास्ती आनंद मला झाला होता कारण आता ती मोठी झाल्यावर मला राखी बांधेल हा माझा आनंद अमोजणीय होता.

कुणी सेलिब्रिटी गेला की त्याचं दिवसभर अथक दर्शन असतं, त्यादिवशी विनाकारण तो माणूस मला अप्रिय होतो, त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी. काही नाती निनावी ठेवा रे, नावं चिकटवून माती करू नका. आणि नाती तयार करा, जपा पण त्यांना रस्त्यावर गळे काढून ओरडत मिरवू नका. कृत्रिम फूल जास्ती आकर्षक असतं पण त्याला वास नसतो. अडचणीच्या वेळी 'मी आहे रे पाठीशी' हे आयुष्यात कधीही न बोलता जो/जी येऊन मागे 'रॉक ऑफ जिब्राल्टर' सारखा भक्कम थांबतो/थांबते ते नातं महत्वाचं मग त्याला नाव असायलाच पाहिजे असं नाही. आपण बनेल, मतलबी आहोतच पण या सगळ्यामुळे कृत्रिम होत जाऊ की काय अशी भीती वाटते.

अत्रे काय सुंदर लिहून गेलेत 'श्यामची आई' मधल्या 'भरजरी गं पितांबर'मध्ये 'द्रौपदी बोलली हरीची मी कोण?, परी मला त्याने मानीली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचेमाझ्यावर ऋण' आणि
खालच्या ओळी कालातीत आहेत, काळ बदलला तरी हे नातं राहिलंच पण त्यात या ओळीतली भावना असेल तर मजा आहे. बाकी नौटंकी तर चालूच राहील. 

'रक्ताच्या नात्याने
उपजे न प्रेम,
पटली पाहीजे
अंतरीची खूण,
धन्य तोची भाउ
धन्य ती बहीण,
प्रीत ती खरी जी
जागे लाभाविण

जयंत विद्वांस

(सदर 'शोधनिबंध - भाग (४)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P  )

भाग (१) - फेसबुकीय वाढदिवस
भाग (२) - मैं तो आरती उतारू रे
भाग (३) - ये दिल मांगे मोअर

ये दिल मांगे मोअर...

एकमेकांचं तोंडभरून कौतुक करणं हा प्रकार एकूणच विरळ झालाय. दुस-या मुलाचं कौतुक करताना माझ्या बबड्या/बबडीला काय काय येतं हे सांगताना थकणारे पालक मला पहावत नाहीत. त्या मुलाचं निखळ कौतुक करायला काय हरकत आहे. तुमच्या मुलाचं कौतुक करताना त्यांनी असं केलं तर यांच्या नाकावर लगेच तुरे उभे रहातील. मुळात हल्ली दुस-याला चांगलं म्हटल्यानी आपल्यात काहीतरी कमी आहे असा समज असतो. दाद देणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. काहीवेळा संकोच होतो, वेळ होत नाही, काहीवेळा आपण बोललो तर चालेल का असं विनाकारण वाटतं, काहीवेळेस भिडस्तंपणा आड येतो आणि कौतुक करायचं राहून जातं. कित्त्येक लोक खूप हौशी असतात, काही चांगलं वाचलं, ऐकलं की लगेच कधी एकदा आपल्या ओळखीच्या माणसांना सांगतोय असं त्यांना होतं. ते अगदी भरभरून बोलतात. पहिल्यांदा लेखक किंवा कलाकार समोरासमोर भेटायचा योग दुर्मिळ त्यामुळे त्यांच्या लिखाणाविषयी मत, प्रतिसाद देणं व्हायचं नाही. एक अंतर असायचं.

फेसबुकावर ते एक काम सोपं झालं. लिहिणारे, वाचणारे जवळ आले. 'एकमेक प्रशंसा संघ' भूछत्रासारखे उगवले. समूह झाले. जातीत पोटजाती असतात तसे समूहात अनेक उपसमूहांचे दबावगट तयार झाले आणि मूळ हेतू बाजूला पडून निरर्थक वाद, खेचाखेची उद्योग सुरु झाले. खोट्या, नकली स्तुतींची खंडकाव्यं निघाली. बिल्डिंगमधे मयत झाल्यावर नाईलाजाने जावं लागतं तशी माणसं पोस्ट आवडो, न आवडो, पूर्ण न वाचताच लाईक कॉमेंटचा हार पोस्टच्या पायापाशी ठेऊन निघण्यात तरबेज झाली. एखादा माणूस कायम अफाट लिहितो, नि:शब्दं करतो तेंव्हा समजू शकतो की प्रत्येक वेळा काय दाद द्यायची पण 'मी हे वाचलंय बरं का' या नोंदीसाठी माणसं चिमूटभर उमटून जातात. प्रत्येक गोष्टीची फेज असते. माणूस लिहिता झाला की त्याचा लगेच आंबा होत नाही. प्रवास असतो, इवल्याश्या थेंबासारख्या कैरीपासून आंबा होईपर्यंत तो नुसताच पिकत गेला तर उपयोग नाही. कैरी म्हणजे सोळावं वर्ष. कौतुक, प्रशंसा यानी हुरळून जाणारं. पण एकदा आंबा झालात की तुम्ही पिकलात, मग कैरीसारखं लगेच हुरळून गेलात तर ते शोभणारं नाही.

कौतुकसुद्धा नम्र भावनेनी स्विकारता यायला हवं. कुणी केलंय म्हणून ते स्विकारावं जरूर पण मनात आपण त्या योग्यतेचे आहोत का असा विचार केला की हुरळणं कमी होतं, पाय जमिनीवर रहातात. सगळेच राग खरे नसतात तशीच सगळी कौतुकंही खरी नसतात. काहीवेळा प्रेमापोटी, भारावल्यामुळे कौतुक करताना अतिशयोक्ती अलंकार नकळत वापरला जातो. कुणी म्हणालं 'काय रे, तब्येत चांगली झालीये हल्ली' म्हणून आपण घरी जाऊन लगेच भिंतीवर बुक्क्या मारायला सुरवात करत नाही. फार फार तर जरा आरशात चारबाजूनी पोझ घेऊन स्वतःला पाहून खुश होतो. पण म्हणून फार वेळ आरशासमोर उभं राहू नये. त्यापेक्षा सतत चढती कमान ठेवण्यात वेळ गेला पाहिजे. मॅरेथॉन रनर मधे पाणी प्यायला जसे थांबतात तेवढंच थांबावं कौतुकापाशी. तिथे घुटमळलो तर मागे रहाणार हे नक्की. मधल्या टप्प्यावरचं कौतुक हे बाळगायचं नसतं, जिरवायचं असतं म्हणजे ताकद वाढते. आता हे सगळं सांगायचं कारण काय मुळात?      

तर फेसबुकावर काही लोक प्रेमापोटी कौतुकाच्या पोस्ट टाकतात. अमुक अमुक लोकांना जरूर वाचा, फॉलो करा. पोस्ट शेअर करतात, त्यात कौतुक लिहितात. मित्रमंडळींना आवर्जून टॅग करतात, मेसेज करतात आणि तुम्हांला जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचवतात. त्यांचं हे काम कौतूकास्पद आहे. कुठलाही हेतू नसताना ते लोक कौतुक करतात. त्या लोकांबद्दल मला आदर आहे. पण ज्यांची नावं त्यात असतात त्यांच्या  प्रतिक्रिया वाचून मला हसू येतं. ज्यांनी हा सोहळा केला त्यांचे आभार मानलेत, अजून काही वाचनीय नावं सुचवलीत, इथे विषय संपावा खरंतर. पण मग आरशासमोर उभं रहायला सुरवात होते तिथे. 'अहो, मी मोठा नाही एवढा', 'अमुकतमुक बरोबर माझं नाव म्हणजे भाग्यंच' वगैरे नकली नम्रता सुरु होते. मग कुणीतरी 'तुम्ही मोठेच आहात' वगैरे लिहून थ्रेड वाढवतो मग त्याला उत्तर, नमस्कार वगैरे पाणी घालून तांब्याभर दह्याचं बादलीभर पारदर्शी ताक तयार होतं. त्यात परत दोन टॅगलेले दिग्गज एकमेक स्तोत्रपठण करतात तो सोहळा वेगळाच.

त्या रसिक माणसानी तुमचं कौतुक केलंय, आभार जरूर माना, जास्तीचे दोन शब्दं उमटा हवंतर पण रमताय कशाला? फेसबुक म्हणजे जागतिक वर्तमानपत्रं आहे, उद्या शिळं होणारं. आजची हेडलाईन उद्याची रद्दी असते. त्यामुळे हुरळू नका. 'ये दिल मांगे मोअर' पेक्षा 'ये पब्लिक मांगे मोअर फ्रॉम यू' असा विचार करून प्रगती केलीत तर ध्रुवतारा व्हाल नाहीतर  उल्का व्हायला फार कमी वेळ लागेल. :)

जयंत विद्वांस    

(सदर 'शोधनिबंध - भाग (३)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P , हुकलेल्यांसाठी पहिले भाग खालीलप्रमाणे)

भाग (१) - फेसबुकीय वाढदिवस
भाग (२) - मैं तो आरती उतारू रे

(हुकलेल्यांसाठी म्हणजे पोस्ट हुकलेल्या लोकांसाठी असा अर्थ घ्यावा )

चित्र'कळा'...

देव कुणाच्या हातात काय कला देईल सांगता येत नाही. कला मुळात उपजत असावी लागते. समज आली की तिला फाईन करायचं काम करता येतं फक्तं. मारून मुटकून झालेला कलाकार कळतो. काही गोष्टी आपल्याला चांगल्या येतात आणि काही अजिबात येत नाहीत. मला भौतिकशास्त्रं, चित्रकला ही कामं कायम डोक्यावरून गेली आहेत. शाळेत मोजक्या मुलांच्या वह्या काय सुरेख असायच्या. सुंदर अक्षर असायचं. साच्यातून काढलेले काजू मोदक जसे रांगेत मांडल्यावर देखणे दिसतात तशा त्यांच्या ओळी दिसायच्या. जीवशास्त्राच्या वह्यातली चित्रं अगदी प्रिंट केल्यासारखी दिसायची. चित्रं काढल्यावर त्यातल्या भागांना रेषा काढून नावं देण्याची कल्पना माझ्यासारख्या दिव्य चित्रकारांमुळे जन्माला आली असावी. मी काढलेलं जास्वंदाचं अर्ध कापलेलं फूल खाली 'जास्वंद' असं लिहिल्यामुळे ओळखू यायचं. अमिबा ही जगातली सगळ्यात सोपी आकृती आहे काढायला कारण त्याला ठराविक आकार नसतो, तुम्ही जो काढाल किंवा काढल्यावर जो दिसेल तो अमिबा.

आम्हांला धाडणेकर नावाचे थोर चित्रकार ड्रॉईंगला होते. मागच्या जन्मीचं पाप असणार त्यांचं काहीतरी, कुठे कुणाला ते फेडावं लागेल कळणार नाही. फळ्यावर मोठ्ठा चौकोन काढून त्यात प्रत्येकाला मनाला वाटेल तशी रेषा काढायला ते सांगायचे आणि सगळ्या वर्गानी त्यात घाण करून झाली की डस्टरनी नेमक्या रेषा पुसून ते त्यातून गणपती, देवी वगैरे काढायचे, खडू न वापरता. एवढा थोर माणूस आम्हांला शिकवायला होता. ग्लायकोडीनच्या एका जुन्या जाहिरातीत लता मंगेशकर म्हणायची, 'जो खरा है वो कभी नही बदलता'. मी तेच केलं. माझ्या चित्रकलेत कुठलीही वाढ, घट झाली नाही. काय एकेक ताप असायचे. ते वॉटरकलरनी वॉश द्यायचा असतो पेपरला. आम्हांला एकदा स्काय ब्ल्यू कलरचा वॉश द्यायला सांगितलेला, माझा कागद नीळ घातल्यासारखा झाला होता. बरं तो पांढरा वाढवून पातळ करायला गेलो तर आकाशाला कोड आल्यासारखं दिसायला लागलं. शेवटी दुस-या पानावर आकाश रंगवेपर्यंत तास संपला. सर म्हणाले मोराच्या अंगावर कागद घासून आणला असतास तरी एवढा निळा झाला नसता.

ती वर्तुळं काढून त्यात त्या वर्तुळपाकळ्या काढायच्या आणि कुणाच्या संकरातून कुठला रंग तयार होतो ते त्या पाकळीत काढायचं असायचं. कडेला त्यांचे आई बाप रंग असायचे. माझ्या तिन्ही पाकळ्यात एकाच बापाची मुलं असल्यासारखा एकंच रंग दिसायचा. ब्रश धुवावा लागतो वगैरे धुवट कल्पना मला तेंव्हा माहीतच नव्हत्या. फ्रीहँड जरा सोपं वाटायचं. पेपरला मधे फोल्ड करायचं, एका बाजूचं हवं तसं चित्रं काढायचं मग ट्रेस करून तेच दुस-या बाजूला. बादली, जग, प्लास्टिकचा मग आणि ती फळं यांनी मला कायम वात आणला होता, एक तर ती बादली चार माणसांची अंघोळ होईल इतकी असायची किंवा अगदी टमरेलाइतकी लहान. बादलीची कडी स्टीलची असली तरी माझ्या चित्रात ती पायजम्याच्या नाडीसारखी मऊ पडलेली असायची. हा सगळा ऐवज ज्या स्टुलावर ठेवून त्यावरचं जे कापड काढतात ते इतर मुलांच्या चित्रात मखमली दिसायचं. माझं सगळ्या वस्तू पायपुसण्यावर ठेवल्यासारख्या.

त्यात ती परडीत आणि विखुरलेली फळं काढायची असायची. माझा आंबा नारळासारखा यायचा आणि नारळ पपईसारखा, द्राक्षाचा घड मधाच्या पोळ्यासारखा भरभक्कम. फणस सोपा पडायचा पण ते काटे काढताना ठिपके काढायला कंटाळा यायचा आणि तो गरम पाणी पडून फोड आल्यासारखा दिसायचा. स्ट्राबेरी, सीताफळ वगैरे मी विचार पण करायचो नाही. केळी किती काढणार? त्याची चांगली फणी काढली होती चार ठिकाणी दुकान लावल्यासारखी तर मला धुतलेला त्यांनी. प्रत्येक फळ एकदाच हे कळत नाही का म्हणाले. बरं हे सगळं परत रंगवायचं. माझा आंबा केशरी पिवळसर वगैरे माझ्या मनात असायचा पण कागदावर तो नासल्यासारखा दिसायचा. नारळ चॉकलेटमधून बुडवून काढल्यासारखा यायचा, एकाच घडातली द्राक्षं विविध रंगात यायची, केळी सल्फरनी अकाली पिकवल्यासारखी दिसायची. अभ्यास करून अवघड विषय समजेल कारण ती विद्या आहे, कला कशी येईल.

एकदा 'आठवड्याचा बाजार' असं चित्रं काढायला सांगितलेलं. भाजी विक्रेता, घेणारी बाई आणि लहान मूल, देऊळ, रस्ता, बस, सायकलवाला, हातगाडीवाला वगैरे माणसं फळ्यावर त्यांनी पाच मिनिटात काढली. भाजीविक्रेता माझ्या कागदावर निघेपर्यंत तास संपला पण पुढचे अनेक तास तेच चित्रं बोर्डावर रहाणार होतं. निवांत कंप्लिट करायचं होतं. बाई आणि मुलाचे हात गजानन महाराजांसारखे अजानुबाहू, मुलाच्या हातातली पिशवी एवढी मोठी की त्याची चड्डी काढावीच, आय मिन दाखवावीच लागली नाही. माझी भाजीची गाडी तिरकी झालेली, तिला चाकं दाखवताना मागची दिसत नाहीत म्हणून दोनच काढली होती. भाजीवाला फक्तं कमरेच्या वर दिसत होता, खालचा भाग अदृष्यं आणि गाडीवर मी म्हणतोय म्हणून भाज्या. 'काय रे कुठल्या भाज्या आहेत या अशा लांबसडक'. 'सर, पालेभाज्या आहेत '. त्या दिवसापासून त्यांनी मला ड्रॉईंगच्या पिरीअडला ऑप्शनला टाकला.

माझ्यासारखे विद्यार्थी असण्याचे फायदेही आहेत. कुणाकडे लक्षं द्यायचं ते त्यांना कसं कळेल नाहीतर? नुसते फराटे मारून काहीजण क्षणार्धात माणूस उभा करतात, काहीजण फोटो काढल्यासारखी चित्रं, रांगोळी काढतात. काहीजण वाद्यं वाजवतात, मुर्त्या तयार करतात, कोरतात. प्रत्येकाला ती येणार नाहीच, आली तर मग एकमेकांना त्याची किंमत रहाणार नाही. कधीकधी वैषम्यं वाटतं, आपल्याला यातलं काहीच येत नाही पण मग लक्षात येतं देवानी हात दिलेत ते टाळ्या वाजवण्यासाठी पण उपयोगी येतात. आपल्यासाठी वाजली नाही एखादी तरी चालेल पण काही चांगलं दिसलं तर आपण जरूर वाजवावी, त्यांचे हात हातात घ्यावेत. ऑप्शनला टाकण्यापेक्षा हे ऑप्शन बरे आहेत. :)

जयंत विद्वांस


नमूने (६)…

जगात माणसाला सगळ्यात जास्ती सुख कशात मिळत असेल तर इतरांकडून स्वतःचं कौतुक करून घेणे यात आहे. अशा महाभागांना त्यांच्या सोबत रहाणारी माणसं सतततबकधारक मिळतात हे त्यांचं भाग्यं असतं. वडीलधा-यांबद्दल आदर हवाच पण जेंव्हा अती होतं तेंव्हा एकालाही त्यातला फोलपणा जाणवू नये, त्या विरोधात बोलण्याची इच्छा होऊ नये हा गंभीर प्रकार आहे. अर्थात अशा कौतुक करून घेणा-या लोकांना ती कौतुकज्योत सतत तेवत राहील याची काळजी घेणं बरोबर जमतं. त्यांना पहिल्यांदाच कुणीतरी फटकारायला पाहिजे होतं किंवा चांगलं हाणलं पाहिजे होतं. ते लहान मुलासारखं आहे, अंगठा तोंडात गेल्यावर हळुवार चापटी मारली, कडुनिंब लावला की हळूहळू हात तोंडाकडे जात नाही, एकदा सवय लागल्यावर मग अगदी चटका दिलात तरी उपयोग काही नाही.    

कोणे एकेकाळी म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी आटपाट नगरात डेक्कन जिमखाना सुभ्यात चाळीत एक त्रिकोणी कुटुंब रहात होतं. कर्ता पुरुष भारत संचार निगममधे ऑफिसर होता. पिण्याची सवय त्या काळी फार कुणाला नसल्यामुळे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. नव-याबद्दलचं कौतुक बाईंच्या चेह-यावरून लिकेज्ड टाकीतून पाणी गळावं तसं सतत ओघळत असायचं. एकेदिवशी त्यांनी 'ह्यांचं' कौतुक सांगितलं ते ऐकून मी मूक, अबोल, म्यूट, दिग्मूढ असं बरंच काय काय झालो होतो मग नंतर खूप काळ हसत होतो. काकू वदल्या, 'आमच्याकडे दुधावरची साय आम्ही कुणी खात नाही, यांनीच सांगितलंय तसं, ते कमावतात ना एकटेच घरात, त्यांची तब्येत चांगली रहायला पाहिजे म्हणून ती फक्तं त्यांनाच द्यायची खायला'. कुणाला ही अतिशयोक्ती, अतिरंजित, धांदात खोटं वाटेल कारण असा विचार असू शकतो हे नवीन आहे पटायला. हे असले आजार उपायापलीकडचे असतात. आमचे अनिल अंबिके म्हणाले असते, 'त्याला हगायला काय गुलकंद होणार आहे का?'

कोणे एकेकाळी म्हणजे अडतिसेक वर्षांपूर्वी आटपाट नगरात सदाशिवपेठ प्रांतात एक उच्चमध्यमवर्गीय कुटुंब रहायचं. दारात फियाट असणारं, ड्रिंकिंग चॉकलेट वगैरे पिणारं, हम दो हमारा एक असं बेतशीर आयुष्यं जगणारं. तर मुलं मुलं खेळायची अंगणात. एकदा मुलं खेळत असताना पाचच्या सुमारास थकले भागले काका घरी आले आणि वरच्या बाईसारखीच सतत कौतुकोघळ वहाणा-या चेह-याची काकू मुलांना डाफरली, ' हे दमून आलेत, आवाज करू नका'. पोरं घाबरली. चिडीचूप आत बसली. काकूंनी सगळ्यांना पोहे दिले. मिस्टर आराम खुर्चीत अत्यंत थकलेल्या चेह-यानी, वर फॅन, हातात पोह्यांची डिश, कडेला चहा, हातात सिगरेट घेऊन बसते झाले आणि तेवढ्यात चपळाईने काकूंनी डोक्याला अमृतांजनचं बोट पण फिरवलं शेवटी नाकपुडीपाशी धरून मृदू आवाजात त्यांना जोरात श्वास घ्यायला लावला. शेजारचा पोरगा एवढी माया, काळजी बघून भांबावला, त्याचे वडील पण दमून यायचे पण त्याच्या घरात असलं दृश्यं कधी दिसलंच नव्हतं.

पोहे झाल्यावर ते गप्पा मारत बसले. त्यानी कौतुककुमारच्या मुलाला चेह-यावर न जाणवणा-या प्रचंड थकव्याचं कारण विचारलं. तो कौतुककुमारसूत म्हणाला, 'अरे आज पगाराचा दिवस असतो ना, बाबा मेन आहेत, जवळ जवळ चाळीसेक हजार मोजावे आणि वाटावे लागतात त्यामुळे खूप दमतात ते'. मान्यं आहे तेंव्हा पाचशे, हजारच्या नोटा नसतील निदान शंभरच्या नोटांनी केला पगार तरी शंभर गुणिले चार बंडल मोजायला एवढा थकवा? संतती कशी झाली हेच मोठं कोडं. तेंव्हा थकव्यानंतर अंगभर बाम, अमृतांजन लावलं असणार बहुतेक. मुळात जो माणूस कामावरच्या क्षुल्लक गोष्टी रोज घरी सांगतो तो माझ्या दृष्टीने महामूर्ख आहे आणि ऐकणारे मागच्या जन्मीचे घोर पापिष्ट. आता घरटी दोघंही कामाला जातात त्यामुळे कौतुक नसेल राहिलं पण तेंव्हा अशी कुटुंब होती. नवरा म्हणजे अगदी हरून अल रशीद, त्याच्या सगळ्या स्टो-या सुरस आणि त्या जीवाचे कान करून ऐकायच्या. कुठल्या जगात वावरतात लोक, काय माहित.    

कोणे एकेकाळी म्हणजे तेवीस वर्षांपूर्वी एका बँकेत मी कामाला होतो सहा महिने अप्रेंटीस म्हणून. एक स्लिम ट्रिम पर्मनंट कारकुंडा होता. एकारांती अर्क अगदी. कपडे, बूट, पट्टा सगळं मिळून ऐवज फार फार तर पंचेचाळीस किलो. नशीबवान होता पण लेकाचा. त्याला स्क्रोलला बसवलं की त्याची बदली करावीच लागायची. अतिशय घाणेरडं अक्षर आणि टोकनाचे घोळ घालायचा. कॅशला बसवलं की त्याची बोटं दुखायची बंडलं मोजून मग तो काउंटरसमोर तिरुपतीच्या रांगा लावायचा मग आरडाओरडा झाला की कुणीतरी त्याच्या मदतीला जायचं. आपली चार बंडलं मोजून होतील तेंव्हा हा कसबसं एक बंडल मोजेल आणि 'बघ रे एकदा परत हे, मला एक कमी लागतीये'. तिथेच डोकं आपटायला हवं होतं कुणीतरी पुढच्या काउंटरच्या जाळीवर. त्याला क्लिअरिंगला बसवलं तर टाचण्या लागून धनुर्वात होईल हे कारण दिलं होतं त्यानी. एक नंबर कामचुकार. तो सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक सभा किंवा बँकेच्या इतर कार्यक्रमात स्वागत गीत, गणेश वंदना म्हणायचा. सुरेश वाडकरचं 'ओंकार स्वरूपा' तो त्याच्यापेक्षाही रटाळ म्हणायचा खरंतर.पण त्याच्या नशिबानी त्याची बाजू घेणारे, कौतुक करणारे जीएम होते तेंव्हा नाहीतर तो हाकलायच्या लायकीचाच होता    

कौतुक ही भीक मागून घ्यायची गोष्टं नाही. ती गुणांनी मिळवायची गोष्टं आहे. कर्तृत्व नसलं काही की ही असली कौतुकं चालू होतात. समोरच्याच्या डोळ्यात दिसतं ते कौतुक खरं, ह्या असल्या स्पॉन्सर्ड जाहिराती काय कामाच्या नाहीत एवढं खरं.

अन्याय करणारा जेवढा दोषी तेवढाच सहन करणाराही असं असेल तर मग कौतुकं करून घेणारा जेवढा दोषी त्यापेक्षा असली फालतू कौतुकं करणारे जास्ती दोषी आहेत. :)

जयंत विद्वांस