Saturday 30 April 2016

दिसतं असावं...

दिसतं असावं... 

परवा दोन मुंजीना गेलो होतो मुंबईला. दगदग, धावपळ करून माणसं येतात, जमतात, लगेच गायब होतात. पहिल्यासारखं आधी चारपाच दिवस तयारी मग बोडण किंवा पूजेला थांबण्याचे दिवस इतिहासजमा झाले. वेळ नाही, जागाही कमी आणि उत्साह पण कमी झालाय एकूणच. प्रथा चालत आल्यात म्हणून पार पाडल्या जातात. संध्या कोण करतंय तसंही आता? मुंज झालेल्या मुलानी विचारलंच चुकून तर आधी वडिलांना यायला हवी ना. त्यामुळे तिची सुरवातच होत नाही. ती केली म्हणजे काय होतं, नाही केली म्हणून काय होतं याचा उहापोह नको. मी ही ती एकदाही केलेली नाही. पण संस्कार असतात, ते करायचे एवढं खरं. मुलगा आता शिकायला आश्रमात जाणार नाही, ब्रम्हचर्य पाळणं शक्यं नाही लग्नं होईस्तोवर, बरं , त्या काळासारखे बालविवाह झाले असते तर थांबायची गरजही नव्हती. पण एकूणच इतर बाबी, हेतू, कारणं बदलली तरी संस्कार चालू आहे अजून तरी तो.

धार्मिक गोष्टं बाजूला राहू दे, मी जातो कारण की तिथे सगळे भेटतात. आपल्या मुंजीत ज्यांनी लगबग केली त्या आत्या, काकू. मामा, माम्या आता थकलेल्या असतात. त्यांना भेटता येतं, म्हणून जायचं. हे सगळे म्हातारे लोक उठून दिसतात, वेगळे दिसतात त्या सगळ्या झगमगाटात. गळ्याशी कातडी लोंबत असते. हातात काठी, ती नसली तरी, आहे पण आणलेली नाहीये, हे कळतं. फार वेळ उभं रहावत नाही, बसूनही रहावत नाही. उकाड्याचा त्रास होत असतो. त्यांची बायकोही त्याच वयाची असते. म्हातारी नटून थटून आलेली असते. दिवस खराब म्हणून सोन्याचा दागिना घरात असतो. पण मोत्याचे चारपाच घालतीलच. कधीकाळी कमरेपर्यंत असलेल्या शेपटाची मानेवर टोचेल एवढी लांब बोन्साय वेणी असते किंवा मग अंबाडा घालून त्यावर गजरा गोल फिरवलेला असतो. ब्लाउजच्या हाताला घड्या असतात. म्हातारी बाहेर ब-याच दिवसात गेलेली नाहीये हे कळतं. हाताशी छोटीशी पर्स असते. कुणी आलंच बाळाला घेऊन भेटायला तर? म्हणून आत पन्नासाच्या नोटा असतात. 

त्यांच्या वयाचे एकत्रं छान कोंडाळं करून बसतात. गप्पा असतात त्या म्हणजे फक्तं चौकश्या - तब्येतीच्या, अनुपस्थित माणसांच्या, कुणाचं तरी कळलं का - अशाच. कुणीकडे सुनेनी, मुलीनी मिरवताना अडचण नको म्हणून आणून दिलेलं वाह्यात पोर असतं. ते काही केल्या एका जागी बसत नाही आणि म्हातारीचा प्राण कंठाशी येतो. तरीपण ती त्याला सांभाळत असते आणि गप्पात भाग घेत असते. त्याच गावात असेल घर तर जास्ती वेळ बसता येतं. पण जेवणं  झाल्यावर लोकल, रिक्षा पकडून एसटी/रेल्वे पकडायची असेल तर तारांबळ उडते त्यांची. जाऊ ना वेळेत? या धास्तीपोटी लक्ष लागत नाही आणि मग 'चला लवकर'चा धोशा एक कुणीतरी लावतो. कुणाचं अर्धांग घरीच असतं त्यामुळे लवकर जाणं गरजेचं असतं. धावपळ होते. निघावं लागतं. ब-याच वर्षांनंतर कुणाची तरी भेट होते. आठवणी निघतात. दाटून येतं. तो/ती पाया पडतात. म्हाता-यांना भरून येतं.

आता लोकांना आशीर्वाद तरी कुठे देता येत आहेत. 'आयुष्यमान भव' हे कानावर पडायला तर हवं ना. कुणीतरी अजून आशीर्वाद देतंय वाकल्यावर ह्यात पण अजून आपण म्हातारे नाही झालो असा छुपा आनंद आहे खरंतर. दरवेळेला कुठे जाणं झालं की सगळी माणसं बघून बरं वाटतं. दरवर्षी कार्य निघेलच असं नाही, एवढी संख्याही आता घराघरात नाही. त्यामुळे भेटी होणं अवघड होत जाणार यापुढे. म्हणून मी आपला वर्षातून एकदा फुलपुडी टाकल्यासारखा का होईना पण जाउन येतो. गदिमांची आई पुलंना म्हणाली होती, 'माणसानी दिसतं असावं रे'. खरंय, माणसानी दिसतं असावं, कोण कधी 'नसतं' होईल काय सांगावं?    


जयंत विद्वांस 


Monday 25 April 2016

सावल्या…

सावल्या… 

तुम्ही तरुण असता त्यावेळेस तुम्हांला वेळ कायम कमी पडतो. स्पर्धेत रहाण्यासाठी, उद्दिष्टं, ध्येय गाठण्यासाठी, थोडा है थोडेकी जरुरत है वाली जरुरत पूर्ण करण्यासाठी, भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी म्हणून अजून उजळण्यासाठी, स्टेटससाठी, सुखं विकत घेण्यासाठी, पोटासाठी, म्हातारपणाच्या तरतुदीसाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि बहुतांशी वेळा जगण्यासाठी आपली धावपळ चाललेली असते. त्यात गैर काहीही नाही. हौशी लोक त्यातही वेळ काढून छंद जोपासतात, वाचतात, ऐकतात, गातात आणि जगतात ही. आपण खूप बिझी आहोत हे दाखवण्याचा जो आनंद आहे त्याला तोड नाही. वपु म्हणतात तसं माणूस रिटायर्ड झाला की तो फक्तं रिटायर्ड असतो. कुठलीही पोस्ट, मानमरातब, श्रीमंती त्याला चिकटलेली नसते. तारुण्यात वेळ नसल्यामुळे कित्त्येक गोष्टी माणूस उतारवयात करायचं ठरवतो. पण सगळयांना ते शक्यं होतंच असं नाही. 

आधी न पुरणारा वेळ नंतर पुरून खूप उरणारा वेळ असतो. शरीर थकतं, पंचेंद्रियं रुसायला सुरवात झालेली असते, दरवाजा वाजत नाही एवढी हाडं करकर वाजतात, उठताना त्रास होतो म्हणून हळूहळू उठणं बंद होतं आणि माणूस इंजिन नसलेल्या बोगीसारखा एकाजागी ठुप्पं बसायला सुरवात होते, जाणं येणं कमी होतं, बोलणं तुटतं, तुम्ही सोडून बाकी सगळ्यांना कामं असतात. गाणी ऐकावीत तर कमी ऐकू येत असतं, वाचायला गेलं की डोळ्यातून पाणी येतं, फक्तं जगण्याकरता सगळी धावपळ केलेल्या माणसाला कसले छंद नसतात, वाचन नसतं, कुठे जावं म्हटलं तर सोबत लागते त्यामुळे ते हळूहळू बंद होतं. पिढ्या बदलतात, विषय पूर्ण वेगळे होतात, तंत्रज्ञान पटकन अंगवळणी पडत नाही. काहीवेळा तर तुमच्या वयाचे मित्रं, नातेवाईक हयात नसतात, असले तरी त्यांचीही परिस्थिती तुमच्यासारखीच असते. मग करायचं काय?

बाई म्हातारी झाली तरी तिचं फार अडत नाही. तिच्यासाठी भरपूर कामं असतात. एक नातवंड वेळ कमी आहे असं वाटायला लावतं. सून गेल्यावर आवराआवर, पेपर वाचन, जेवण, वामकुक्षी, दुपारचा चहा, संध्याकाळच्या कामाची किरकोळ तयारी, अधूनमधून भिशी, वेळ कसा जातो कळत नाही त्यांना. पुरूषाचं मात्रं अवघड असतं. एक तर झोप कमी झालेली असते. मग चालू होतो टि.व्ही. मी ही सिरिअल्स, होम मिनिस्टर अशा अनेक प्रोग्राम्सची खिल्ली उडवत आलेलो आहे पण हे सगळं त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं, हे मला जाणवलं. कित्त्येक वयस्क मला माहितीयेत जे फक्तं डोळ्यासमोर काही रंगीत हलतंय एवढ्यासाठी टिव्ही लावतात. समोर काय चाललंय याच्याशी काही सोयरसुतक नसतं. वेळ… अतिशय भयानक प्रकार आहे. घालवायचा असला की शिक्षा परवडली पण ते नको. बरं आज गेला, घालवला, ढकलला, उद्या? मला आत्तापासूनच याचं दडपण आहे. (समाजपयोगी कामं करता येतील, छंद जोपासता येईल, शिकवता येईल गरिबांना, पेन्शनर ग्रुप जॉईन करता येईल, फिरायला जायचं वगैरे सल्ले नकोत. कुठे जाऊ न शकणा-या, जगण्यातला रस संपलेल्या माणसांबद्दल बोलतोय मी हे). 

वीसेक वर्ष झाली. माझ्या ओळखीत एक आजोबा होते. बायको गेलेली. घरातली सगळी माणसं कामाला जायची. रस्ता चुकल्यासारखे ते घरात एकटेच असायचे मग दिवसभर. त्यांच्याकडे एक पूर्वी शाळेला दप्तर म्हणून असायची तशी अल्युमिनिअमची पेटी होती. त्यात साताठशे रुपयाची चिल्लर होती. पाच पैसे ते रुपये अशी नाणी होती. सकाळी सगळी माणसं कामावर गेली की ते ती पेटी काढायचे. चादर ताणून घ्यायची आणि पेटी ओतायची त्याच्यावर. मग पुढचे दोनेक तास मस्तं जायचे त्यांचे. वीस x पाच पैसे = एक रुपया यापासून सुरवात, सगळ्यात शेवटी दोन रुपये पाच वेळा. त्यात पण सगळे सिंह एकाच बाजूला डोकं करून. षटकोनी वीस पैसे, अल्युमिनिअमचे वेगळे, पितळी वेगळे. दहा पैसे छोटे वेगळे, मोठे वेगळे, नवीन पन्नास पैसे वेगळे. त्यावर छापलेल्या वर्षानुसार ते लावायचे नाहीत एवढाच प्रकार काय तो शिल्लक होता. मग त्यांची रांग करायची आणि पैसे मोजायचे. कमी भरायचे नाहीतच पण जर भरलेच तर परत सगळे गठ्ठे मोजायचे. हॉरिबल. 

एकदा त्यांना म्हणालो कंटाळून, 'कोण घेणार आहे त्यातले पैसे, रोज मोजताय ते'. 'घेतंय कोण कशाला रे, घेतले तर उलट मला शोध लावायला बरं पडेल, त्यात निघतील चारेक दिवस. वेळ जात नाही रे, तुला नाही कळणार. घड्याळाचे काटे पायाला मुंग्या आल्यासारखे हळू चालतायेत असं वाटतं. तासाभरानी घड्याळ बघितलं तरी वीसेक मिनिट झालेली असतात म्हणून मी घड्याळ बघणं पण सोडलंय. पण इतकी वर्ष जगलोय, उन्हावरनं कळतंच किती वाजले असतील ते. संध्याकाळी सावल्या लांब पडतात नुसत्या, गायब व्हायची वाट बघतोय'.

मला नाही कळणार म्हणे. माझ्याही संध्याकाळच्या सावल्या काही वर्षात लांब पडू लागतील. गायब व्हायची वाट बघायला लागायला नको, एवढंच मागणं.

जयंत विद्वांस 

Saturday 23 April 2016

लल्याची पत्रं (२८)…. 'चलते चलते मेरे ये गीत…'

 
लल्याची पत्रं (२८)…. 'चलते चलते मेरे ये गीत…'

लल्यास,

बरेच दिवसांनी पत्रं. चौथ्या पत्रात (मंझिले अपनी जगह…वरचं) तुला 'चलते चलते मेरे ये गीत'च्या तिस-या कडव्याबद्दल सांगितलं होतं, तू दिलंस मला ते लगेच पण त्यावर लिहायचं राहूनच गेलं होतं. तर चलते चलते. अत्यंत टुकार सिनेमातून अतिशय चांगली गाणी वाया गेलेली आहेत. खरंतर अशी गाणी परत नविन चांगल्या सिनेमातून प्रसंगानुसार वापरायला हवीत. उदा : सचिन, बिंदिया गोस्वामीच्या 'कॉलेज गर्ल' मधलं 'प्यार मांगा है तुम्हीसे' (परत एकदा बप्पी, टुकार सिनेमात चांगली गाणी द्यायची सवय असावी त्याला). मागे तुला म्हणालो तसं किशोर काही गाण्यांना वेगळा, अप्रतिम सुंदर आवाज लावतो. भाचा बप्पी लाहिरी त्याचा लाडका असावा. त्याच्याकडे म्हटलेलं 'इन्तेहा हो गई इंतजार की' हे सुंदर गाणं पण आहे आणि प्रेमापोटी म्हटलेलं टुकार 'झझझ झोपडीमें चचच चारपाई पण आहे.

'चलते चलते' सिनेमा पाहिलाय म्हणणारे सज्जन माणसांसारखे दुर्मिळ लोक असतील पण हे गाणं मात्रं सगळ्यांना पाठ असेल. लग्नं कुणाचं हे विसरायला झालं आणि जेवण लक्षात असा प्रकार एकूण. आपणच निर्माता असलं की एक बरं असतं बघ. आवडीची हिरोईन घ्यायची, हवे ते प्रसंग लिहून घ्यायचे, होऊ दे खर्च, इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. मागे त्या श्रीराम गोजमगुंडे नावाच्या निर्मात्यानी ८२ ला स्वत: आणि सरला येवलेकरला घेऊन 'झटपट करू दे खटपट' नावाचा शिणेमा काढला होता. त्याकाळात त्याला 'ए' सर्टिफिकेट होतं त्यामुळे मला तो पहाता आला नाही (खंत वाटणे म्हणजे नेमकं काय ते कळलं मला यावरून). विजयला लागलेलं ते पोस्टर माझ्या अजून लक्षात आहे, नववीत होतो पण वय वाढल्याची जाणीव करून दिलेली सरला येवलेकरनी. 'ए' असल्यामुळे तो पहायचा राहून गेला (आता बालचित्रपट ठरेल म्हणा तो इतकं 'ए' 'ए प्लस' झालंय). या चित्रपटाचा निर्माता भीष्म कोहली म्हणजे पडद्यावर विशाल आनंद. 


तुपकट चेह-याचा आणि किरणकुमारचा जत्रेत हरवलेला भाऊ दिसतो तो. इस्त्री केल्यासारखा चेहरा. सुरकुती म्हणून दिसणार नाही. अशा लोकांसाठी किशोर गायला हे त्यांचं भाग्यं ('प्यार का मौसम' मधलं भारत भूषण वरचं 'तुम बिन जाऊ कहा' बघ. कुठलाही प्रयत्नं न करता अत्यंत निर्विकार चेह-यानी ते म्हटलंय त्यानी). सिमी ग्रेवाल ही सरला येवलेकरच्या तोडीचीच अर्थात. येवलेकर दिसायला मात्रं तिच्यापेक्षा सरस. सरला नाव किती सरळ, बाईला वळणं किती (नावात काय नसतंय बघ). तर मुद्दा 'चलते चलते'. गाणं चालता चालताच आहे शब्दश: ते. ग्रेवाल आणि क्यातरीना कैफ दोघींचे ओठ मात्रं सुंदर, गाभूळलेले दिसतात, मोहक आहेत. सूचक हालचाली केल्यासारखी ती बोलते मुळात (पहा : मेरा नाम जोकर). त्या काळातली ती सगळ्यात उंच नटी असावी त्यामुळे तिची कुणाशीच जोडी जमली नसावी. ठोकळा चेह-याचा विशाल आनंद सिमी ग्रेवालला हात लावायला मिळाल्याच्या आनंदात दिसतो संपूर्ण गाणं संपेस्तोवर. 

याचं मराठी केलेलं मी. मजा यायची म्हणताना. याचं तिसरं कडवं आहे हे मला माहितीच नव्हतं. रेडीओ, क्यासेट, टीव्हीवर पहिली दोनच कडवी लागतात. तिसरं स्याड व्हर्जन असल्यामुळे सलग नसावं ते सिनेमात. किशोर या प्रकारात दादा आहे. 'ये दोस्ती' चं शेवटचं कडवं ऐक - 'साथी तू बदल गया, मैं अकेला रह गया' म्हणताना तो वेगळाच ऐकू येतो. त्याचं 'गाडी बुला रही है' मधे म्हटलेल्या त्या दोन ओळी ऐक, 'आते है लोग, जाते ही लोग, पानीके जैसे रेले, जानेके के बाद, आते है याद, गुजरे हुए वो मेले'. ' रेडिओवर एकदा कुठल्यातरी रसिक माणसानी ते लावलं आणि कानी पडलं. 'बुनियाद' 'देख भाई देख'चं टायटलसॉंग, मधुबन खुशबू देता है, एक लडकी मेरा हाथ पकडकर, सुनिये, कहिये, कहिये, सुनिये (बातो बातोमे), जब छाये मेरा जादू आणि देवानंदच्या शिनेमात गाणी लिहिणा-या अमित खन्नानी लिहिलंय हे गाणं. त्याचं फार नाव नव्हतं कधी पण हे गाणं मस्तंच आहे त्याचं. 

'चलते चलते' म्हटलं की पाकीझातलं आठवतं लगेच खरंतर, तो ठेका आणि शेवटी वाजणारी ती आगगाडीची शिट्टी. या 'चलते चलते'ला ते भाग्यं नाही अजून काही वर्षांनी चित्रपट कुठला वगैरे पुसलं जाईल, गाणं राहील. चल पुढच्या पत्रापर्यंत बाय.

जयंत विद्वांस

चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना
रोते हँसते बस यूँ ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना

प्यार करते करते हम तुम कहीं खो जायेंगे
इन ही बहारों के आँचल में थक के सो जायेंगे
सपनों को फिर भी तुम यूँ ही सजाते रहना

बीच राह में दिलबर बिछड़ जायें कहीं हम अगर
और सूनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर
हम लौट आयेंगे तुम यूँ ही बुलाते रहना

अलविदा तो अंत हैं और अंत किसने देखा
ये जुदाई ही मिलन हैं जो हमने देखा
यादों में आकर तुम यूँही गाते रहना

(चलते चलते (१९७६), बप्पी लाहिरी, अमित खन्ना, किशोर कुमार)

Monday 18 April 2016

'आखरी रास्ता'…

'आखरी रास्ता'… 
 
उन्मळून पडणे, उध्वस्त होणे, विश्वासघाताचा धक्का, जिगर, बदले की आग, खर्जातले संवाद, चेह-याच्या हलणा-या नसा वगैरे गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बघण्यापेक्षा के.भाग्यराजनी लिहिलेला तमिळ 'कमल हसन अभिनित - Oru Kaidhiyin Diary' चा हिंदी अवतार 'आखरी रास्ता' बघावा. मी अनंतवेळा तो पाहिलाय, अजूनही पाहीन. 'तूने मेरा दुध पिया है' ह्या भंकस गाण्याला फक्तं मी रिमोट घेतो हातात (मोहम्मद अझीझ, शब्बीरकुमार ही खूप नशीबवान लोकं, यांना हिमेश रेशमियासारखे स्वत:साठी पिक्चर काढावे लागले नाहीत. 'मर्द' हा आधीच टुकार होता त्यात ह्या दोघांची गाणी म्हणजे सुधीरच्या तावडीतून सुटलो तर शक्तीकपूरच्या ताब्यात गेल्यासारखं), त्यामुळे एकूणच या आणि इतर काही सिनेमात गाणी नसती (उदा : अर्जुन, घायल, 'चायना गेट'ला नाईलाजानी 'छम्मा छम्मा' घेतलं असणार संतोषी बाबानी) तरी चालली असती. सिनेमाची लय हरवते, कथानकाची पकड सैलावते. असो! के.भाग्यराजला जास्ती कळतं. या सिनेमासाठी मी बोहारणीसारखे अमिताभचे 'गिरफ्तार', 'मृत्युदाता', 'मर्द', 'गंगा जमुना सरस्वती' वगैरे महान सिनेमे बदल्यात द्यायला तयार आहे. 

चित्रपटाची कथा मी इथे सांगायची गरज नाही. बच्चा बच्चा जानता है! डेव्हिड डिकास्टाचा विग, ती दाढी, तो गांधी चष्मा, शाल हा गेटप ज्यानी केला असेल तो महान माणूस आहे. त्याचे कपडे पण चोबीस साल पुराने फ्याशनचे आहेत सिनेमात. डिटेलिंग बॉस, मजा येते बघायला. संपूर्ण चित्रपटात इन्स्पेक्टर विजय हा अमिताभच्या चित्रपटात शशी, ऋषी कपूर जसे दबलेले असतात तसा आहे. अर्थात ही किमया 'बिग बी'ची आणि पटकथेची. कुठेही 'विजय' वरचढ वगैरे वाटत नाही. जेलात जायच्या आधीचा खेळकर डेव्हिड आणि बाहेर आल्यावर गंभीर झालेला बुढ्ढा डेव्हिड, दोन वेगळी पात्रं, वेगळ्या देहबोली आहेत. अमिताभनी या चित्रपटात सरसर बदलणारे चेहरे काय अप्रतिम दाखवलेत. नेमक्या वाक्याला, शब्दाला त्याचा चेहरा जो काही बदलतो ना त्याला तोड नाही (तो ज्या भोळेपणानी रडतो, दलीप ताहिलला विश्वासानी सांगतो, ते बघाच). पात्राच्या वयोमानानुसार बदललेला आवाज ऐकणीय आहे त्याचा. डेव्हिडचा आधीचा गमत्या आवाज, विजयचा कठोर माणसाचा आवाज, म्हाता-या डेव्हिडचा खर्जातला, राग दाबलेला आवाज. त्या आवाजाला पार्श्वसंगीत आहे संताप, चीड, धुमसण्याचं. राही मासूम रझा. त्यांचे संवाद सांग बघू गाजलेले असं कुणी म्हटलं तर मी पळ काढेन पण या चित्रपटातले संवाद मात्रं तुफान होते.

'विजय'चा बाप आपण नसून अनुपमनी स्वत:चं नाव लावलंय त्याच्या नावापुढे हे समजल्यावर त्यानी जे तळतळून विचारलंय ना ते ऐका. व्होकलकॉर्ड आतड्याला जोडली गेलीये त्याची त्या संवादाला. कुणीतरी खोडरबरनी मजकूर पुसावा तसं बापमुलाचं नातं पुसलं गेल्यामुळे आलेली विषण्णता आहे त्यात. त्याला हाताशी धरून बदला घ्यायचे चोवीस वर्ष डोक्यात जपलेले प्लान्स क्षणात धुळीत. परत या वयात नव्यानी सुरवात आता. 'मैने अपनी जिंदगीका अंधेरा दूर करनेके लिये तुम्हे दिया जलानेको कहा था, तुमने तो मुझकोही जलाकर अपने जिंदगीमे उजाला कर दिया' (चु.भू.दे.घे.). खाऊन टाकलंय त्यानी. लगेच घाईने निघताना तो अबरप्टली विचारतो, 'पिस्तोल कहा है'! खतरा थंडपणा आहे पुढच्या संवादाला. त्याचा कन्फेशन देतानाचा, 'विजय' चेकिंग करत असतो तेंव्हा 'तीन स्पेशालिस्ट मेरे दिमाग में है', 'सहाय'ला स्टोरी सांगताना, 'तुम्हे इतनी जल्दी डि.आय.जी.बना दिया, इन्स्पेक्टर विजय' चा खवचट, स्मशानातलं ते एकेक शब्दं उच्चारून बोललेलं परफेक्ट इंग्लिश, 'समंदर के बीच जाकर जो मछलीया पकडता है' किंवा त्या आधीचा हातावर 6 आणि 9 चा संवाद, श्रीदेवीला 'And that is a fact' म्हणतानाचा आवाज. 'फर्ज करो, तुम घर जा रही हो' कुठलाही आक्रस्ताळेपण न करता तो त्याची बाजू श्रीदेवीला सांगतो, तो आवाज. किती सांगणार. 

चेहेरे बघायचेत? कोर्टात 'चतुर्वेदी' बरळत असतो तेंव्हा तो फक्तं कठडा दाबतो आणि शांत होतो, जज्जनी विचारल्यावर तो फक्तं शांतपणे भिंतीकडे बघतो, श्रीदेवीमुळे त्याला बोलणी खावी लागतात तेंव्हा, भरत कपूरला भेटणार एवढ्यात विजय येतो तेंव्हा, त्याला उडवणार तेंव्हा नेमका परत 'विजय'मधे येतो तेंव्हा, 'विजय'साठी दोरी फेकताना त्याची होणारी घालमेल, अनुपमला दाढी लावून फसवल्यावर त्याचा झालेला अर्जुन, ओम शिवपुरीनी झापल्यावर झालेला चेहरा, विजयच्या हातातून पिस्तोल उडवल्यावर झालेला करारी चेहरा, श्रीदेवीच्या लॉकेटमधे विजय दिसल्यावर झालेला हळवा चेहरा, बापलेक दोघं कबरीसमोर बसतात तेंव्हा विजयचा चेहरा, ग्रेव्हयार्डमधे 'सॉरी माय सन' म्हणतानाचे पाणावलेले डोळे, चतुर्वेदीच्या गाडीला बाँब लावयाची धडपड, चरफड आणि शेवटी कपाळात गोळी घातल्यावरचा तो विजयी चेहरा आणि लाल बर्फाळ नजर. अमिताभवर बोलणं म्हणजे कापूसकोंड्याची गोष्टं, न संपणारी.   

बाकी सिनेमा अमिताभ सोडून बोलण्यासारखं फार काही नाही त्यात. एकदा कमल हसनचा बघायला हवा. लहान मुलीसारखं लाडात बोलणं म्हणजे अल्लडपणा असं समजणारी श्रीदेवी यात फार वाव नसल्यामुळे सुसह्य वाटली ('ती कशी ग्रेट आहे' याच्या कॉमेंट्सवर उत्तरं दिली जाणार नाहीत, क्षमस्व). जयाप्रदा गोड दिसते, अनुपम खेर पण फार लाउड नाहीये. तीनही व्हिलनमधे अमरापूरकरना जास्ती फुटेज आहे आणि ते भाव खाऊन गेलेत पण. बाकी ते सेट आणि सोनी म्याक्सचे आभार मानायलाच हवेत (बच्चनचेच च्यानल नाहीत ना मालकीचे). अर्थात कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है म्हणून 'सुर्यवंशम'ही बघावा लागतो, हा भाग वेगळा.

जयंत विद्वांस
 

  

Friday 15 April 2016

ओळख…

ओळख… 
 
मुळात मला देवादिकांचा ओढा कमीच आहे. रांगेत, गर्दीत दर्शन घ्यायची मला हौस नाही. चेंगराचेंगरीत हाताला लागलेला दगडी भाग म्हणजे परमेश्वराचे पाय आहेत याचा आनंद घ्यायची मला अज्जिबात हौस नाही. पण माझं सुट्टीतलं बालपण मात्रं अनेक देवळांच्या परिसरात गेलंय. आज्जी भिकारदास मारुतीच्या वर रहायची. परवाच बघितलं, तिथे आता ती रहायची ती लोड बेअरिंगची एकमजली इमारत कधीच नामशेष झालीये. कॉन्क्रीटची सुबक इमारत तिथे उभी आहे. खालचा मारुती नावानी भिकारदास असला तरी बाजूनी रहाणारी लोकं सुखवस्तू आहेत. मारुतीच्या समोर सदावर्ते राम मंदिर, बाजूला नारद मंदिर आहे. आता राम आणि मारुती मंदिर बोन्साय झालेत. पहिल्यांदा प्रशस्त जागा होती आता अतिक्रमण केल्यासारखे दोघे उभे आहेत. संगमरवरातली ती अडीच एक फुटांची राम, लक्ष्मण, सीतेची आणि समोर बसलेला रामदास हनुमान यांची मूर्ती मात्रं सुबक आहे. शंकर, विष्णू, राम हे सगळे देव, कुठलीही देवी बघा, कशा एकदम देखण्या, नाजूक जिवणी, सरळ नाक, सौष्ठव असलेल्या असतात फोटो आणि मूर्त्यांमध्ये. हनुमानाला ते भाग्यं नाही. शेकडो वर्ष जिम केलेली बॉडी (काहीवेळा केसाळ ही), फुगलेले गाल, खांद्यावर गदा, चेह-यावर शोलेतल्या 'रामलाल' सत्येन कप्पूसारखे इमानी सेवकाचे भाव. 

तर रामनवमी. मोठा उत्सव असायचा (आता असावाही, माहित नाही). कुंटे कुटुंब देखरेख करायचं. अक्का कुंटे. त्यांच्यावर आम्हां सगळ्या मुलांचा राग. दुपारी पुढच्या कट्ट्यावर त्या खेळू द्यायच्या नाहीत म्हणून आणि लाकडी व्यासपीठावर बसलो की ओरडायच्या म्हणून. पण आम्ही त्यांना अजिबात धूप न घालता कोकलायचो तो भाग वेगळा (त्यांची नातवंडपण घरची भेदी असल्यासारखी आम्हांला सामील असायची). एका वेगळ्याचा सांस्कृतिक वातावरणाची रेलचेल असायची. आठवड्यातून दोन दिवस दुपारी पुणतांबेकरांचं भजन असायचं, रोज संध्याकाळी नारद मंदिरात किर्तन असायचं. सज्जनगडावरून रामदासी लोक यायचे. मोठं अभ्यासपूर्ण, गंभीर बोलायचे ते लोक. पण ऐकत रहावं असं वाटायचं. एक फक्तं रामाला समर्पित छोटीशी पुस्तिका होती. त्यात मनाचे श्लोक होते, करुणाष्टके होती आणि पहिल्याच पानावर १०८ रामाची नावं होती. बरंच काही हरवलं त्यात ते ही हरवलं. अर्थ कळो न कळो ती सगळ्या मुलांना क्रमानी पाठ होती. अगदी तालात ती म्हटली जायची.

रामनवमीला लोणीसाखर हा प्रसाद असायचा. जन्माच्या वेळेला बायका लोटायच्या अगदी एकमेकींवर. आम्हांला इंटरेस्ट प्रसादात. अक्का अत्तर लावल्यासारखं लोणीसाखर तळहातावर द्यायच्या. साखरेनी सुटलेलं पाणीच जास्ती असायचं त्यात. लाज सोडून आम्ही अजून द्या म्हणायचो, दोन शब्दं ऐकून अजून एक बोट तळहातावर मिळवायचा आनंद आता अगदी पावकिलो लोण्यात साखर कालवून खाण्यातही नाही. तिथे साखळी लावलेलं तीर्थपात्रं असायचं. खेळता खेळता आम्ही सगळे ते सुद्धा प्यायचो लहर आली की. तुळशीचं पान आलं की मस्तं चव लागायची, किती थेंब? मोजून चमचाभर फार तर, पण मस्तं लागायचं, गंमत म्हणून प्यायचो तरी डोळ्याला हात लावून हात डोक्यावरून जायचाच. कार्य पार पडल्यावर जशी एक शांतता असते तसा माहोल असायचा नंतर. आमचा खेळ थांबल्यामुळे ते सगळं कधी एकदा संपतंय असं व्हायचं. किर्तन असायचं. पूर्वरंग, उत्तररंग कुठे कळायचं तेंव्हा (आता कळतंय असा अर्थ निघतोय ना, आताही कळत नाही). पण सगळे किर्तनकार उत्तम स्टोरीटेलर, अभिनय, थोडीफार गायकी येणारे असायचे. ऐकत राहायची सगळी चुळबुळ न करता. सिन्नरकर, आफळे, कोपरकर, जावडेकर, अनेक रामदासी बुवा, रविंद्र मुळे ऐकले तिथे.    

आठवड्याभरानी हनुमानजयंती असायची. आधी श्रीमंताघरचं कार्य झाल्यावर त्याच्याच नात्यातल्या गरीबाचं कार्य असतं ना तसं वाटतं मला ते. हनुमान जयंतीला जास्ती पब्लिक लोटायचं, खणखणीत प्रसाद. रास होईल एवढे नारळ फुटायचे. जाताजाता वाटी घ्यायची आणि दगडानी फोडून खायची, कुण्णीसुद्धा ओरडायचं नाही. प्रदक्षिणेचे, जपाचे अनंत प्रकार दिसायचे. पिशवीत माळ ओढणारे, पुटपुटणारे, जोरात ओरडून आल्याची वर्दी देणारे, रमतगमत प्रदक्षिणा घालणारे, स्पीडपोस्टवाले, मारुतीच्या, रामाच्या समोर (समोर म्हणजे अगदी समोर, साईड आर्टीस्ट नाहीच चालणार) उभे राहून डोळ्यात डोळे घालून बघणारे, आव्हान देणारे, आवाहन करणारे, 'आहे ना लक्षात माझ्या कामाचं' अशी मूक विचारणा करणारे, अत्यंत भाबड्या भक्तिभावाने फुल, प्रसादाचा हार घेऊन जाणारे, कपडे मळण्याची काळजी न करता साष्टांग घालणारे (हा प्रकार तर दुर्मिळ झाला आता, हवी त्याची लाज वाटत नाही पण याची वाटते लोकांना), प्रदक्षिणा झाल्यावर खांबाला टेकून शांत बसणारे, वाती वळण-या आज्ज्या. माझ्या स्मृतीपटलावर तिथलं हे शेवटचं चित्रं कोरलं गेलंय. 

आता अक्का कुंटे, हनुमानाची पूजा करणारे नारायणभाऊ दवे, गोविंदस्वामी आफळे आणि माझी आज्जी यापैकी कुणीही नाही. मी एक उरलोय इकडे आणि तिकडे जागा आक्रसलेले राम, लक्ष्मण, सीता आणि तो शेंदरी हनुमान. माझं लहानपणीचं हे विश्वं तिथेच उदबत्तीच्या धुरासारखं हरवलंय, वातावरणात असेलही पण दिसणार नाही, जाणवेल. नेता असो की देव, त्यांच्या वाढदिवसाला गर्दी व्हायचीच. तेंव्हा एकदा गर्दी नसताना जाईन, बघू काही जुनी ओळख एकमेकांना  पटतीये का ते.
 
जयंत विद्वांस   


Wednesday 6 April 2016

'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच'…

'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच'… 

'उद्या भेटशील का संध्याकाळी 'पूनम'ला?'
'आहेस कुठे? इतक्या दिवसात फोन नाही, काही नाही. झाली का तयारी? पंधरा दिवस राहिले ना? आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय की काय?'
'मी बोलू? आमंत्रण आपल्या माणसाला काय द्यायचं आणि समजा नाही दिलं तरी तू येणार आहेस हा माझा विश्वास आहे. बरं ऐक, उद्या जरा मला वेळ आहे. सहापर्यंत येशील का 'पूनम'ला? फार वेळ नाही घेणार तुझा. अर्धा तास फारफार तर'.
'बरं, मग रस्त्यात भेटू की, पूनमला कशाला हवंय भेटायला? काय काम आहे एवढं अर्जंट?'
'सॉरी, चिडू नकोस रे. तोंडातून गेलं. तासंतास बसायचो ना रे आपण पूनमला. तुझ्याकडे आपली पत्रं आहेत?'
'मुर्ख, मी लिहिलेली माझ्याकडे कशी असतील, तुझी आहेत. का?'
'ती आणशील?'
'आणतो, जाहीर वाचन करायचं आहे का? मिसिंग? की स्मरणयात्रा? ऑफिस फाईल असेल माझी तुझ्याकडे. एकावेळी कमीत कमी बारा फुलस्केप असायचे माझे. तुझी पण मोठी असायची पत्रं, तारखेनीशी आहेत माझ्याकडे. आणतो. ये उद्या, वोईच टेबल, वोईच टाईम, वोईच लोग, बाय, सी यू'
'बाय, पत्रं आण रे सगळी, मस्तं वाटेल परत सगळी वाचताना'.


-------------
'नेहमीप्रमाणे तू आधी असशील असं वाटलेलं. पण आज पहिल्यांदाच मी लवकर आलोय. म्हणजे वेळेत, सव्वा सहा झाले. बरं, बस, कॉफी झाली माझी एकदा, तू आलीस की दोन आण सांगितलंय त्याला, येईल'.
'अरे निघता निघता उशीर झाला. पन्नास कामं'.
'कितीला निघायचंय तुला?'
'लगेच, म्हणजे वीस मिनिटात. सातला सासरी जायचंय, तिथून एके ठिकाणी जायचंय'.
'मग पत्रं किती आहेत एवढंच मोजून होईल फारतर'.
'ऐकशील का? तुझी पत्रं मी माझ्याकडेच ठेवणार आहे, माझी तुझ्याकडे आहेत ती दे, तारखेनीशी एक तुझं एक माझं लावणार मी निवांत.'
'घे ही सगळी, पण मला वाचायची झाली तर काय करू? की बाईंडिंग करून पुस्तक करणार आहेस? :P
'कॉफी घे, दहा मिनिट राहिलेत तुला निघायला, एक तर याचा कप म्हणजे बादलीएवढा असतो'.

….….

'निघू? उशीर होतोय? नको रे असं बघूस. आय नो. नंतर भेटणं होणार नाही, तुझी पत्रं आणि आठवणी यावर मी राहीन.  सविस्तर लिहीन एकदा पाच सहा महिन्यांनी निवांत झाले की. निघू?'
'हो, आठवण येईल? कुठे ठेवशील आणि पत्रं नीट?'
'ठेवेन, तू नको काळजी करूस, चल येते'.
'बाय'
'बाय, सी यू, विल मिस यू लॉट'
'बास, सासरी जायचंय हसरा चेहरा करून, रडवू नकोस, आता मागे न बघता मी निघणार आहे, बाय'.

….….
थोडं पुढे गेल्यावर तिनी गाडी नदीच्या अलीकडे थांबवली. लागूनच असलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर ती बसली. सगळी पत्रं बाहेर काढली. त्याचे हात दुखेपर्यंत तिनी अतिशय बारीक तुकडे केले. आणलेल्या प्लास्टिक पिशवीत सगळा कचरा भरला आणि पिशवी नदीपात्रात भिरकवून दिली. 'चांगला आहे तो, पण काय सांगावं, कुणाची मती कधी फिरेल'. घड्याळाकडे बघत तिने किक मारली आणि ती निघाली.

….….
ती गेल्यावर त्यानी अजून एक कोफी मागवली. त्याचं विचारचक्र चालू झालं. 'तिचा माझ्यावर विश्वास नाहीये. मी पत्रांचा गैरवापर करेन असं तिला का वाटलं पण? इतका मी खालच्या पातळीचा आहे? मीच मूर्ख असं वाटायचं मला पण काहीवेळेस ना भाबडेपणा पण फायद्याचा असतो. तिची आठवण म्हणून मी सगळ्या पत्रांच्या झेरॉक्स काढल्या होत्या. मी करणार तसं काहीच नाहीये ही काळ्या दगडावरची रेघ आहे पण असाव्यात वेळ पडली तर. फार मजा येईल तिला सांगितल्यावर मला तिचा चेहरा बघताना. नको, नाही सांगणार मी तिला, मला गंडवल्याचा तिचा आनंद राहू दे तसाच. फक्तं सगळ्या पत्राखालचं 'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच' याला हायलाईट करून ठेवलं की झालं

जयंत विद्वांस

 





Friday 1 April 2016

पण…

पण… 

मागे एकदा नात्यातल्या एका आजींच्या मयतीला गेलो होतो. कुणाच्यातरी मयतीला जायचा योग(?) आपण वयानी मोट्ठे झाल्यावर येतो. मी आयुष्यात पहिल्यांदा मयतीसाठी गेलो ते ८९ साली. अजूनही माझ्यापुढे, तिथे स्मशानात किंवा त्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर काय बोलायचं, हा यक्ष प्रश्नं असतो. अशावेळी मी फक्तं परत निघताना भेटतो, बाकी जास्ती काही बोलत नाही कारण मला बोलता येत नाही. अनेक लोकांनी ब-यापैकी औपचारिक बोलून झालेलं असतं. एक टिपिकल वातावरण असतं, तेच डायलॉग, वर्षानुवर्ष ऐकत आलो आहे. अतिशय दु:खद प्रसंग असतो खरंतर, एक अवकाळी शांतता, कुजबुज असते. थोडं मोठ्यानी बोललं तरी माईकवर बोलल्यासारखं वाटतं, इतकं वातावरण शांत असतं. 


'कधी नेणारेत?' 'साता-याचा हा आला का?' 'कुणाला फोन करायचेत का?' 'ठाण्याहून कधी निघालीये ती?' 'शिवनेरी?' 'स्वारगेट आहे का पुणे स्टेशन?' 'मोघे गुरूजींना कळवलंय का?' 'सामान आणायला कोण गेलंय?' 'पास आणलाय?' 'बरं झालं गेल्या, उगाच अंथरुणात पडण्यात काय मजा नाही, सगळ्यांचेच हाल' 'परवाच तर भेटून गेलो, बोलल्या माझ्याशी, बरी झाले की गोंदवल्याला जाउ म्हणालेल्या' 'आज संकष्ट चतुर्थी, उपास असायचा त्यांचा, त्याचंच पुण्यं म्हणून गेल्या आज' 'ऐकायची नाही ओ अज्जिबात, हेकेखोर पहिल्यापासून' 'जप रे, तूच मोठा आहेस, सावर, तूच धीर सोडलास तर कसं होणार?' 'काय म्हणाली रे शेवटचं?, शुद्धीत होती? किती वाजता गेली?' 'कळवायचं नाही का रे आधी, आलो असतो उभ्या उभ्या तरी, ती असताना' हे आणि असे अनेक कुणीही न लिहिलेले संवाद वर्षानुवर्षे पाठ केल्यासारखे चालू आहेत. 


तिरडी बांधणा -यात एक तरी टक्कल पडलेला, फाटक्या तोंडाचा, बिडी/सिग्रेट ओढणारा किंवा तंबाखूचा बार भरणारा, इतरांपेक्षा जास्ती अक्कल असलेला माणूस असतोच. तिरडी बांधायचं आयटीआय सर्टिफिकेट असल्यासारखा तो सगळ्यांना ज्ञान वाटत असतो. मडकं ठेवायच्या तिकटीच्या बांधकामापासून बडबड सुरु होते. बांबूच्या क्वालिटीवरून त्या दुकानदाराच्या विशिष्ठ भागात तो बांबू रोवल्याचा संवाद हवाच. मग सुतळी ओली करणे, त्यासाठी ओरडून पाण्याचा तांब्या मागणे, ब्लेड शोधणे, दोन बांबूतील आणि दोन कामट्यातील अंतर ठरवणे, पांढरं कापड त्या कामटीत घुसवताना शक्यतो कापड फाडल्याचा कमाल आवाज करणे, मणी, वाटी, गुलाल, बुक्का, हळदी कुंकवाच्या पुड्या जोरदार हाक मारून कुणाच्यातरी ताब्यात देणे वगैरे फ्लोचार्ट प्रमाणे काम चालू होतं. 'अनेकांना पोचवून आलोय आजवर, दोन जण नेलीत एकावेळी तरी सुटणार नाही याची ग्यारंटी आहे' वगैरे म्हणजे काम पूर्ण झाल्याची आरोळी असते. लोक बिनआवाजाचं हसतात. 'कोण रे हा?' 'माहित नाही, वाड्यातलाच असेल, चेकिंगसाठी दुसरा म्हणून यालाच न्या'. साउंड कमी केल्यासारखा दबका हशा पिकतो, परत सगळे दु:खाचा स्क्रीन सेव्हर ओढून उभे रहातात.  

तोंडाला पदर लावून कोरडे डोळे पुसणा-या शेजारपाजारच्या बायका, गंभीर चेहरे करून उभे राहिलेले कलिग, एकमेकाला न ओळखणारी किंवा ओळखून असणारी माणसं चिडीचूप उभी असतात. सगळ्यात कळीचा मुद्दा असतो 'कधी नेणार'? घड्याळं बघितली जातात, मोबाईलवर मेसेजेस पाठवले जातात किंवा आलेले वाचले जातात, तेवढ्यात कुणाचातरी 'पप्पी दे, पप्पी दे पारूला' किंवा तत्सम फडकत्या चालीच्या रिंगटोनचा फोन वाजतो, ज्याचा आहे तो पहिल्यांदा काय करत असेल तर फोन घेऊन लाजल्यासारखा रस्त्याकडे निघतो आणि येताना सायलेंटवर टाकूनच परत येतो, वातावरण सैलावतं. खूप गरजेचं असतं ते. कुणाला भुका लागलेल्या असतात, कुणी येतानाच उशीर होणार हे गृहीत धरून खाऊन आलेलं असतं, काहींचे आधी निघून वैकुंठाच्या अलीकडे मिसळ तरी चेपावी मग लागू देत कितीही तास असे प्लान तयार असतात. 

इथे रडण्याचे अनंत प्रकार पहायला मिळतात. काहीजण शोएब अख्तरसारखं वाड्याच्या दरवाज्यापासून किंवा जिन्याच्या खालच्या पायरीपासून स्टार्ट घेऊन फुंदत येतात आणि १४५ केएमपीएचचा यॉर्कर बोटावर बसल्यावर फलंदाज जसा ओरडेल तशी भसकन रडण्याची डिलिव्हरी करतात. काहीजणी पदर, रुमाल तोंडात धरून रडण्याला बोळा घातल्यासारखं करतात. काहीजण नळाखाली भांड्यात टुबुक टुबुक थेंब पडत असतो तेंव्हा ते पाणी कसं पडायला काठावर जमा झालेलं असतं तसं त्यांचं रडू पापणीच्या वळचणीला थांबलेलं असतं. काहीजण उगाच नाकाचे शेंडे पुसतात. काहीजण कोण समोर आल्यावर रडायचं ते ठरवून रडतात. मयताच्या अंगी नसलेले गुण सांगितले जातात, आठवणी निघतात. काहींचा नुसताच आवाज असतो, काहींची ढगफुटी असते, काहींना शब्दं सापडत नाहीत, काहींना आता पुढे काय याची चिंता तर काहीना सुटका झाल्याची भावना. एकाच ठिकाणी अनंत भावना, चेहरे, मुखवटे तरंगत असतात. 

या सगळ्या गलबल्यात माझ्या लक्षात राहिलेत ते म्हणजे फक्तं बायकोकडे एकटक बघत रहाणारा तो सत्तर पंचाहत्तरीचा पाण्यात बुबुळं ठेवावीत तसा डोळे भरलेला, थरथरणा-या ओठांचा, अंगाला कंप सुटलेला, शब्दं संपलेला म्हातारा, भांबावलेली, कुणी खांद्यावर हात ठेउन थोपटलं तर कधीही सांडतील अशी पोरं, लाल नाकाच्या पोरी, सुना, नेमकं काय घडलय ते न कळलेली, मोठे सगळे गप्पं आहेत म्हणून शेजारी चिडीचूप बसलेली नातवंड आणि शेवटचं उचलल्यावर पोटातून आलेले, कळवळयाचे, फुटलेले बांध. खरंतर तिथून निघाल्यावर मागे उरते ती स्मशानशांतता असते. हुंदके आटतात, वास्तवाचं भान येतं, स्मशानात न गेलेली माणसं थोडं थांबून दहाव्या तेराव्याची चौकशी करून निघतात आणि मागे उरते ती फक्तं बोलकी शांतता. 


वैकुंठातून घरी पोचेपर्यंत स्मशानवैराग्यं टिकतं, घरी येउन आंघोळ केली की रिमोट घ्यायचा त्याशिवाय आपली पण हीच गत हा विचार डोक्यातून जात नाही. एवढे तरी जमतील? कुणी रडेल असं उर फुटल्यासारखं आपल्यासाठी? एका बोटाचं एक दशक धरलं तर आपली अंदाजे दोन बोटंच उरतात हे लक्षात आल्यावर पाची बोटं उघडली जातात. आपल्याच अशा एखाद्या गेलेल्या माणसाची आठवण येते आणि अस्वस्थ व्हायला होतं. मी तरी अंमलात न येणारा पण केलाय, पुढच्या वेळेपासून आपण गेलो तरंच जायचं, नाहीतर जायचंच नाही मुळी स्मशानात. 

जयंत विद्वांस