Friday 1 April 2016

पण…

पण… 

मागे एकदा नात्यातल्या एका आजींच्या मयतीला गेलो होतो. कुणाच्यातरी मयतीला जायचा योग(?) आपण वयानी मोट्ठे झाल्यावर येतो. मी आयुष्यात पहिल्यांदा मयतीसाठी गेलो ते ८९ साली. अजूनही माझ्यापुढे, तिथे स्मशानात किंवा त्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर काय बोलायचं, हा यक्ष प्रश्नं असतो. अशावेळी मी फक्तं परत निघताना भेटतो, बाकी जास्ती काही बोलत नाही कारण मला बोलता येत नाही. अनेक लोकांनी ब-यापैकी औपचारिक बोलून झालेलं असतं. एक टिपिकल वातावरण असतं, तेच डायलॉग, वर्षानुवर्ष ऐकत आलो आहे. अतिशय दु:खद प्रसंग असतो खरंतर, एक अवकाळी शांतता, कुजबुज असते. थोडं मोठ्यानी बोललं तरी माईकवर बोलल्यासारखं वाटतं, इतकं वातावरण शांत असतं. 


'कधी नेणारेत?' 'साता-याचा हा आला का?' 'कुणाला फोन करायचेत का?' 'ठाण्याहून कधी निघालीये ती?' 'शिवनेरी?' 'स्वारगेट आहे का पुणे स्टेशन?' 'मोघे गुरूजींना कळवलंय का?' 'सामान आणायला कोण गेलंय?' 'पास आणलाय?' 'बरं झालं गेल्या, उगाच अंथरुणात पडण्यात काय मजा नाही, सगळ्यांचेच हाल' 'परवाच तर भेटून गेलो, बोलल्या माझ्याशी, बरी झाले की गोंदवल्याला जाउ म्हणालेल्या' 'आज संकष्ट चतुर्थी, उपास असायचा त्यांचा, त्याचंच पुण्यं म्हणून गेल्या आज' 'ऐकायची नाही ओ अज्जिबात, हेकेखोर पहिल्यापासून' 'जप रे, तूच मोठा आहेस, सावर, तूच धीर सोडलास तर कसं होणार?' 'काय म्हणाली रे शेवटचं?, शुद्धीत होती? किती वाजता गेली?' 'कळवायचं नाही का रे आधी, आलो असतो उभ्या उभ्या तरी, ती असताना' हे आणि असे अनेक कुणीही न लिहिलेले संवाद वर्षानुवर्षे पाठ केल्यासारखे चालू आहेत. 


तिरडी बांधणा -यात एक तरी टक्कल पडलेला, फाटक्या तोंडाचा, बिडी/सिग्रेट ओढणारा किंवा तंबाखूचा बार भरणारा, इतरांपेक्षा जास्ती अक्कल असलेला माणूस असतोच. तिरडी बांधायचं आयटीआय सर्टिफिकेट असल्यासारखा तो सगळ्यांना ज्ञान वाटत असतो. मडकं ठेवायच्या तिकटीच्या बांधकामापासून बडबड सुरु होते. बांबूच्या क्वालिटीवरून त्या दुकानदाराच्या विशिष्ठ भागात तो बांबू रोवल्याचा संवाद हवाच. मग सुतळी ओली करणे, त्यासाठी ओरडून पाण्याचा तांब्या मागणे, ब्लेड शोधणे, दोन बांबूतील आणि दोन कामट्यातील अंतर ठरवणे, पांढरं कापड त्या कामटीत घुसवताना शक्यतो कापड फाडल्याचा कमाल आवाज करणे, मणी, वाटी, गुलाल, बुक्का, हळदी कुंकवाच्या पुड्या जोरदार हाक मारून कुणाच्यातरी ताब्यात देणे वगैरे फ्लोचार्ट प्रमाणे काम चालू होतं. 'अनेकांना पोचवून आलोय आजवर, दोन जण नेलीत एकावेळी तरी सुटणार नाही याची ग्यारंटी आहे' वगैरे म्हणजे काम पूर्ण झाल्याची आरोळी असते. लोक बिनआवाजाचं हसतात. 'कोण रे हा?' 'माहित नाही, वाड्यातलाच असेल, चेकिंगसाठी दुसरा म्हणून यालाच न्या'. साउंड कमी केल्यासारखा दबका हशा पिकतो, परत सगळे दु:खाचा स्क्रीन सेव्हर ओढून उभे रहातात.  

तोंडाला पदर लावून कोरडे डोळे पुसणा-या शेजारपाजारच्या बायका, गंभीर चेहरे करून उभे राहिलेले कलिग, एकमेकाला न ओळखणारी किंवा ओळखून असणारी माणसं चिडीचूप उभी असतात. सगळ्यात कळीचा मुद्दा असतो 'कधी नेणार'? घड्याळं बघितली जातात, मोबाईलवर मेसेजेस पाठवले जातात किंवा आलेले वाचले जातात, तेवढ्यात कुणाचातरी 'पप्पी दे, पप्पी दे पारूला' किंवा तत्सम फडकत्या चालीच्या रिंगटोनचा फोन वाजतो, ज्याचा आहे तो पहिल्यांदा काय करत असेल तर फोन घेऊन लाजल्यासारखा रस्त्याकडे निघतो आणि येताना सायलेंटवर टाकूनच परत येतो, वातावरण सैलावतं. खूप गरजेचं असतं ते. कुणाला भुका लागलेल्या असतात, कुणी येतानाच उशीर होणार हे गृहीत धरून खाऊन आलेलं असतं, काहींचे आधी निघून वैकुंठाच्या अलीकडे मिसळ तरी चेपावी मग लागू देत कितीही तास असे प्लान तयार असतात. 

इथे रडण्याचे अनंत प्रकार पहायला मिळतात. काहीजण शोएब अख्तरसारखं वाड्याच्या दरवाज्यापासून किंवा जिन्याच्या खालच्या पायरीपासून स्टार्ट घेऊन फुंदत येतात आणि १४५ केएमपीएचचा यॉर्कर बोटावर बसल्यावर फलंदाज जसा ओरडेल तशी भसकन रडण्याची डिलिव्हरी करतात. काहीजणी पदर, रुमाल तोंडात धरून रडण्याला बोळा घातल्यासारखं करतात. काहीजण नळाखाली भांड्यात टुबुक टुबुक थेंब पडत असतो तेंव्हा ते पाणी कसं पडायला काठावर जमा झालेलं असतं तसं त्यांचं रडू पापणीच्या वळचणीला थांबलेलं असतं. काहीजण उगाच नाकाचे शेंडे पुसतात. काहीजण कोण समोर आल्यावर रडायचं ते ठरवून रडतात. मयताच्या अंगी नसलेले गुण सांगितले जातात, आठवणी निघतात. काहींचा नुसताच आवाज असतो, काहींची ढगफुटी असते, काहींना शब्दं सापडत नाहीत, काहींना आता पुढे काय याची चिंता तर काहीना सुटका झाल्याची भावना. एकाच ठिकाणी अनंत भावना, चेहरे, मुखवटे तरंगत असतात. 

या सगळ्या गलबल्यात माझ्या लक्षात राहिलेत ते म्हणजे फक्तं बायकोकडे एकटक बघत रहाणारा तो सत्तर पंचाहत्तरीचा पाण्यात बुबुळं ठेवावीत तसा डोळे भरलेला, थरथरणा-या ओठांचा, अंगाला कंप सुटलेला, शब्दं संपलेला म्हातारा, भांबावलेली, कुणी खांद्यावर हात ठेउन थोपटलं तर कधीही सांडतील अशी पोरं, लाल नाकाच्या पोरी, सुना, नेमकं काय घडलय ते न कळलेली, मोठे सगळे गप्पं आहेत म्हणून शेजारी चिडीचूप बसलेली नातवंड आणि शेवटचं उचलल्यावर पोटातून आलेले, कळवळयाचे, फुटलेले बांध. खरंतर तिथून निघाल्यावर मागे उरते ती स्मशानशांतता असते. हुंदके आटतात, वास्तवाचं भान येतं, स्मशानात न गेलेली माणसं थोडं थांबून दहाव्या तेराव्याची चौकशी करून निघतात आणि मागे उरते ती फक्तं बोलकी शांतता. 


वैकुंठातून घरी पोचेपर्यंत स्मशानवैराग्यं टिकतं, घरी येउन आंघोळ केली की रिमोट घ्यायचा त्याशिवाय आपली पण हीच गत हा विचार डोक्यातून जात नाही. एवढे तरी जमतील? कुणी रडेल असं उर फुटल्यासारखं आपल्यासाठी? एका बोटाचं एक दशक धरलं तर आपली अंदाजे दोन बोटंच उरतात हे लक्षात आल्यावर पाची बोटं उघडली जातात. आपल्याच अशा एखाद्या गेलेल्या माणसाची आठवण येते आणि अस्वस्थ व्हायला होतं. मी तरी अंमलात न येणारा पण केलाय, पुढच्या वेळेपासून आपण गेलो तरंच जायचं, नाहीतर जायचंच नाही मुळी स्मशानात. 

जयंत विद्वांस 


No comments:

Post a Comment