Tuesday 27 May 2014

लल्याची पत्रं (११) …'गीत गाता हु मैं…'

काय गम्मत असते बघ, मागे तुला म्हटलं तसं, गाणं लक्षात राहतं चित्रपट मात्रं अज्जिबात नाही. 'लाल पत्थर' मी बालपणी दूरदर्शनला बघितला होता. काहीही आठवत नाही. त्यातलं 'गीत गाता हु मैं…' मात्रं आठवतं, अर्थात नंतर ही ते खूपवेळा बघितलंय त्यामुळेही असेल. देव कोहलीचं पहिलं हिट गाणं हे आणि शंकर जयकिशनचं कितवंतरी. आरामखुर्चीत बसलेला पाईप ओढणारा विक्षिप्तं राजकुमार, मागे डोक्यावर पदर घेऊन उभी राहिलेली डोळ्यात राग असलेली हेमा मालिनी, गोल गोबरी पण अभागी राखी आणि पियानोवर बसलेला तरणा विनोद मेहरा (याची आणि फारुख शेखची हेअर स्टाईल मात्रं मस्तंच होती).

राखीवर त्याचं प्रेम आहे पण आता ती राजकुमारची बायको आहे, हेमा मालिनीला मान आहे पण पत्नीपद नाही या सगळ्या अडलेल्या, अडकलेल्या, अडकवलेल्या माणसांचा सूत्रधार आहे राजकुमार. संपूर्ण गाण्यात त्याच्या चेह-याची रेष हलत नाही. एवढ सुंदर गाणं तो निर्विकारपणे ऐकतो. मला तरी ती अभिनयशून्यता न वाटता तो अभिनय आहे असं वाटतं. माणसाकडे सत्ता, संपत्ती आली की त्याला उद्दामपणा आपोआप येतो. साहित्यिक भाषा, काव्यं, नाजूक भावना या गोष्टी चेष्टेचा विषय होतात मग त्यांच्यासाठी. जो काय तुमचं कलाविष्कार चाललाय तो मी विकत घेऊ शकतो, पैशांनी काय विकत घेता येत नाही? सौंदर्य, स्तुतिपाठक, सर्व इंद्रियांच्या वासना क्षमाविण्यासाठी लागणा-या गोष्टी मग त्यात स्त्री अथवा पुरुष ह्या ही त्याच पठडीत बसतात.

एका बाजूला हा सत्तेचा, पैशाचा माज एका बाजूला हळवा प्रेमवीर. मला काही संगीतातलं एवढं कळत नाही पण किशोर काही गाण्यांना जर वेगळाच आवाज लावतो असं माझं मत आहे. हे त्यातलंच एक. आतून खूप काहीतरी तुटत असल्यासारखं वाटतं हे गाणं ऐकताना. कधीतरी कुणालातरी हसतमुख राहण्याची दिलेली शपथ तो अजून सांभाळून आहे. दु:ख लपविण्याचा ज्याचा त्याचा मार्ग निराळा, कुणी रडतं, कुणी  घुसमटतं, कुणी कुढून उर्वरित आयुष्यं काढतं, कुणी ती जखमेची जागा सतत जिवंत ठेवून हस-या चेह-यानी जगतं. हे सगळं ऐकायला, वाचायला सोप्पं आहे, ज्याच्या नशिबी येतं त्याचं त्यालाच माहिती बघ.
तो म्हणतो, प्रेमाचे हे क्षण किती अनमोल आहेत. खरंय, वस्तू हरविल्याशिवाय किंवा दुर्मिळ झाल्याशिवाय तिचं मोल कळत नाही. कसंय, हरवली तर मिळण्याच्या आशेवर तरी माणूस जगतो पण समोर आहे आणि आता ती आपली नाहीये याचं वर्णन काय करावं? त्याच्या शब्दांना पण कुसुमाची मृदुलता आहे तो कसा दुखावणार कुणाला. भेटेल त्याला हसतमुखानी शब्दाफुलांचे हार घालायचे एवढंच त्याच्या हातात आहे, अर्थात नाईलाजानी, तरणोपाय नाहीचे नाहीतरी.  

         
आपले ना प्रत्येक माणसाबाबतचे आडाखे ठरलेले असतात. कोण कुठल्या प्रसंगात काय वागणार याचा आपल्याला थोडा अंदाज असतो. नेमके तिथे अंदाज चुकले की माणूस चकीत होतो. स्तब्ध होतो, वेडा होतो. तो म्हणतो, एवढा प्रकाश? चकीत झालाय तो. मनाचा आरसा कसा लख्खं झाला, आधीचं काही त्यात शिल्लक नाही आता, कुणीही डोकावून बघा, आरशासारखं झालाय अगदी. प्रेमभंगाच्या कवितांमधून गाण्यांमधून जे सांगतात त्याच्या नेमकी उलट वस्तुस्थिती असते. असो!


तात्पर्य, हे गाणं कधीही ऐकायला मला आवडतं, ते ऐकतानाही मला डोळ्यापुढे दिसतं. चल, पुढच्या गाण्यापर्यंत, सॉरी, पत्रापर्यंत बाय.


--जयंत विद्वांस

Monday 19 May 2014

लल्याची पत्रं (१०) … 'एक धागा सुखाचा...'

 
लल्यास,
 
सध्या नवीन काय ऐकलंस? मी काहीही नाही. जुनंच अजून इतकं राहिलंय ना आणि परत परत ऐकायचा मोह होतो तो वेगळाच. नवं वाईट आणि जुनं तेच चांगलं असं अजिबात नाही. पण जुनी गाणी तोंडपाठ का आणि नविन का नाहीत? अर्थात नव्या पिढीला आहेत ती तोंडपाठ हा भाग आहेच. काळानुसार आवड बदलते पण आता ऱ्हिदमला जुळणारे शब्दं असतात, अर्थ नसेना का काही मग त्यात. सगळीच गाणी तशी असतात असं नाही पण संख्या कमीच. असो, मागच्या पत्रात मी तुला 'छोटीसी ये दुनिया….' बद्दल लिहिलं होतं. 
 
आज मी तुला सांगणार आहे ते मराठी गाण्याबद्दल. ते गाणं ऐकलं की स्मशानवैराग्यं आल्यासारखं होतं बघ. मूड नसेल चांगला तर हे गाणं अजिबात ऐकू नये इतके प्रभावी आणि अर्थपूर्ण शब्दं लिहिलेले आहेत. ग.दि.मा. आणि बाबूजींनी दिलेल्या अनेक अजरामर गाण्यांपैकी ते एक आहे. 'एक धागा सुखाचा…'  राजा परांजपे आणि सचिनच्या 'जगाच्या पाठीवर' मधलं. तिसरी चौथीत असताना शाळेत पाहिला होता मी तो. शब्दांचे अर्थ कळण्याइतपत अक्कलही नव्हती पण जे पाहिलं ते कोरलं गेलं. हातमागावर बसलेले राजाभाऊ, बाबूजींचा हळवा आवाज आणि  ग.दि.मां. चे शब्दं वैराग्यं,  विषण्णता आणतात अगदी.  
 
थोरांची वचनं वगैरे वाचली की कसा हुरूप येतो आपल्याला, त्याच ताकदीचं गाणं आहे हे जीवनाचा अर्थ सांगणारं. माणूस सगळ्यात कशाला घाबरत असेल ना तर तो वार्धक्याला आणि नंतर सगळ्यांनाच अटळ असणा-या मरणाला घाबरतो. आपण आता नसणार, आपल्यावाचून कुणाचं अडणार नाही, ह्या रंगीबेरंगी दुनियेचं परत दर्शन नाही, कुठे जातोय माहित नाही. मग आपण इतके दिवस जगलो ते चूक की बरोबर असा प्रश्नं पडतो. खरं तर किती क्षण खरे जगलो? माया, लोभ, मी, माझं, पैसा, स्थावरजंगम काही काही उपयोगाचं नाही याची हतबलता ग.दि.मांच्या शब्दातून अंगावर कोसळते. खरंय, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे असतानाही का जगतो आपण? नाईलाज म्हणून की हतबलता म्हणून? काय गम्मत आहे बघ, सुखाचा धागा सोनेरी असल्याने ते नकोसे वस्त्रं सुद्धा जरतारी होऊन जाते.  सुख म्हणजे नेमकं काय? हे व्यक्तीसापेक्ष आहे, मानण्यावर आहे. आहे त्यात सुख मानायचं हा हतबलतेने स्वीकारलेला मार्ग सगळेच जण चालतात. आशा मोठी वाईट चीज आहे बघ.  उद्या सुखाचा दिवस येऊही शकतो, काय सांगावं? या स्वप्नातंच आपण हे वस्त्रं विणत रहातो. शंभर कापसाच्या धाग्यात एक जरीचा धागा काय रेशो आहे बघ. 
 

काय लिहिलंय गं भन्नाट. किती जपतो न आपण बाह्यरुपाला. आपण कसे दिसतो, काय वापरतोय,  त्याची किंमत किती. आतला माणूस कवडीमोल असला तरी तसा विचार येत नाही.  ग.दि.मा. नागडं सत्यं सांगतात, 'पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी, उघडा कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे'. देवानी हे सगळं इथेच ठेवून यायला लावलंय ते एक बरं आहे. नाहीतर तो ही वेडा झाला असता बरोबरच्या लगेजनी. मोह, माया, सोस सुटत नाही. काही जणांनी आपल्याला आवडणारी, काहींनी सूड म्हणून माणसं सुद्धा बरोबर नेली असती आणि त्याची मोठी पंचाईत केली असती. 

'मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे'. शैलेन्द्रनी  'मेरा नाम जोकर' मधे काय वेगळं सांगितलं होतं? तो म्हणाला होता, 'हाँ बाबू, ये सर्कस है, शो तीन घंटे का, पहला घंटा बचपन है, दूसरा जवानी है, तीसरा बुढ़ापा है'. ही लोकं म्हणून मोठी असतात बघ. दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकसारखं वाटतं, सुचतं म्हणून ते मोठे असतात. ग.दि.मांबद्दल काय बोलणार? लायकी पण नाही, शब्दं कसे हात जोडून उभे, यमक जुळवण्याची खटपट नाही, पर्यायी शब्दं शोधायचा त्रास नाही, मनातून, डोक्यातून कागदावर थेट लिहायचं ते ही तालबद्ध, लयबद्ध. (मीराबाईच्या 'मैने मोल लियो घनश्याम' वरून त्यांनी 'बाई, मी विकत घेतला शाम' लिहिलं पण ते भाषांतर नव्हतं फक्तं विचार उसना होता). माणसाला धीर नसतो बघ. बालपणी वाटतं कधी एकदा मोठे  होतोय. तारुण्यात जबाबदा-या, भविष्याची चिंता यांनी तो हतबल होतो, खचतो. वाटतं, हीच कष्टाची वेळ आहे, उर्वरित आयुष्यं तरी सुखात घालवू. जेंव्हा तो काळ येतो तेंव्हा  सगळंच बदललेलं असतं. थकलेली गात्रं, क्वचित सुटलेली साथ, निर्धन अवस्था, आजारपण आणि मग उरतं ते वाट पाहणं. गतदिनांची आठवण काढणं आणि त्यातच रमणं. छे, अगदी अवघड परिस्थिती असणार.        

माणसाला सगळ्यात राग कधी येतो माहितीये? त्याला दोष ठेवायला, जाब विचारायला कुणी सापडलं नाही की. 'शोले'मधला ए.के.हंगलचा 'आज पुछुंगा उस खुदासे…' संवाद असाच आहे. हतबलता आहे ती. का? माझ्या बाबतीतच का आणि असे अनंत प्रश्नं आपल्याला विचारायचे असतात. पण कुणाला? तो माणूस(?) माहित नाही. त्याला कुणीच पाहिलेलं नाही. ग.दि.मा.म्हणतात 'या वस्‍त्राते विणतो कोण? एक सारखी नसती दोन, कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे!'. खरंय, प्रत्येक वस्त्राचा पोत निराळा, रंग निराळा. जगरहाटी चालूच राहील. अनेक जीव जन्माला येतील, हसतील, रडतील, ओरडतील, रागावतील, भांडतील, प्रेम करतील आणि त्या विणका-याला वाटलं की जगातून नाहीसे होतील. म्हणून 'त्या'ला वाटायच्या आत जेवढं जगता येईल तेवढं जगून घ्यावं. 
 
चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय.    
 
जयंत विद्वांस

Friday 9 May 2014

लल्याची पत्रं (९) … 'छोटीसी ये दुनिया…'.


लल्यास,

परवा तुला ट्याण्डम गाण्यांबद्दल बोललो होतो ना त्यातलंच एक 'छोटीसी ये दुनिया…'. चित्रपट : किशोर, वैजयंतीमालाचा 'रंगोली',  गायक- किशोर, लता, गीत-शैलेंद्र, संगीतकार - शंकर-जयकिशन. ही नामावली झाली फक्तं. शाळेत इतिहासात असलेल्या सनावलीमधे जसे डिटेल्स असायचे फक्तं, इतिहास नसायचा तशी. (अर्थात म्हणून मला मार्क्स काही जास्ती नसते मिळाले म्हणा). :)

हा सिनेमा मी काही पाहिलेला नाहीये. गाणंही फक्तं किशोरचच बघितलंय, लताचं ऐकलंय. ह्या गाण्याचा किस्सा मी वाचला होता त्यामुळे हे गाणं जास्तं लक्षात राहिलंय. शैलेंद्र आणि शंकर जयकिशनचं भांडण झालं एकदा. सरळ साध्या शैलेंद्रला राग आला खूप. तो व्यक्तं व्हायला पाहिजे, समोरच्याला समजायला पाहिजे यासाठी त्यानी सभ्यपणे शंकर जयकिशनला चिठ्ठी ठेवली. त्यात त्यानी लिहिलं होतं-'छोटीसी ये दुनिया, पहचाने रास्ते है, कभी तो मिलोगे, कही तो मिलोगे तो पूछेंगे हाल'. आर.के.शिवाय बाहेरही ते जोडीने काम करायचे त्याचा संदर्भ त्या निरोपात होता.

शंकर जयकिशन पण वल्लीच. चिठ्ठी वाचून म्हणाले, अरे ये तो मुखडा है, अच्छी धून बन सकती है. त्यांनी मुखड्याला चाल लावून ठेवली, पुढे शैलेंद्र कडून ते गाणं पूर्ण करून घेतलं आणि 'रंगोली' मधे वापरलं. कलाकारांचे रुसवे फुगवे पण किती वेगळे असतात ना. म्हणून कदाचित भांडण केलं की आपण कचाकचा बोलतो किंवा अबोला धरतो, मनस्वी लोक असं लिहितात. अजून एक  गंमत वाच खाली दिलीये ती अशाच एका हिट संवादाची आणि नंतर गीतात रुपांतर झालेली  -
आनंद बक्षी - 'अच्छा तो हम चलते है'
लक्ष्मीकांत - 'फिर कब मिलोगे'   
आनंद बक्षी - 'जब तुम कहोगे'


शैलेंद्र नेहमीच साधं लिहायचा, मनातलं लिहायचा. लताचं गाणं स्लो आहे म्हणजे ते सिनेमात दु:खी असणार. किशोरचं दुसरं कडवं लताच्या गाण्यात पहिलं आहे आणि तिचं दुसरं वेगळं आहे. किशोरच्या गाण्यात मिश्कीलपणा आहे,  प्रेमात पडलेल्या माणसाचा  चिवटपणा आहे. एकीकडे तो तिला पाषाणहृदयी म्हणतो आणि लगेच माझ्यासारखा दुसरा कुणी मिळणार नाही हे ही सांगतो. पुरुषाला जरा कमीपणा घ्यायला त्रासाचं होतं पण. एकीकडे म्हणतो माझ्या मनाला प्रेमात  धीर धरायची सवय आहे (आधी एकदा कुणीतरी हाकललेलं दिसतंय) आणि उपमा काय तर तावून सुलाखून निघालेलं शंभर नंबरी सोनं म्हणजे मी. येडे, ही संधी हातची दवडू नकोस, अशी मनाची श्रीमंती लाथाडू नकोस. आणि दुर्दम्यं आशावाद आहे तो वेगळाच, ज्या तो-यात आज जातीयेस तशीच एक दिवस परत येशील.
 
लताच्या आवाजात जरा दु:खी स्वर आहे. स्त्रीचं पहिलं प्रेम तेच शेवटचं असायचं तेंव्हा लिहिलंय शैलेन्द्रनी हे. त्यामुळे कदाचित ते कालबाह्य वाटू शकेल अशी परिस्थिती आहे आता.  लता म्हणते माझं हे आयुष्यातलं पहिलंच आणि शेवटचं प्रेम आहे. मनाचं नातं एकदाच जोडलं जातं. खरं आहे.
चल, शैलेन्द्रचे शब्द  म्हणतो 'छोटीसी ये दुनिया, पहचाने रास्ते है, कभी मिलोगे तो ऐसेही गानोंकी बाते करेंगे' तबतक दसविदानिया.
जयंत विद्वांस