Monday 24 November 2014

सवाई.....

मुळात मांड्या ठोकून शास्त्रीय गायन ऐकण्याइतपत मला त्यातलं कळत नाही. नाट्यसंगीत फार त्रास न होता ऐकता येतं, आवडतंही. ३१ डिसेंबर ९१ ला मी रविराज सोडणार होतो हे नक्की होतं. "सवाईला येशील"? म्हणजे ती जायचीच हे त्यात आलं. येतो म्हटलं. एकतर थंडी मरणाची, आधीच पुण्यातली माणसं वेधशाळेच्या आकड्यानुसार स्वेटर घालतात, थंडी वाजायलाच पाहिजे असं नाही. तर मी येतो म्हटलं. "साडेनऊ-दहा पर्यंत ये रमणबागेच्या मेन गेटला. मी नसले तिथे तर स्टेजच्या उजव्या बाजूला ये, सापडेन. आई बाबा आहेत बरोबर, बावळटासारखं किती शोधलं म्हणू नकोस. अचानक भेट झाली असं दाखवायचंय. ते दोघं नारायणपेठेत मावशीकडे जातात बारापर्यंत, तोपर्यंत कळ काढ."

स्टेजच्या उजव्या बाजूला सापडली, अभिनय उत्तम जमला असावा मला पण कदाचित ओसंडून आनंद घात करणार असंही वाटलं. मी तिच्या घरी गेलेलो त्यामुळे नावानिशी ओळख होतीच. औपचारिकता पूर्ण झाल्यावर ते गाण्याकडे वळले, आम्ही एकमेकांकडे. साडेदहाला ती म्हणाली, "आई, फ्फार बोअर मारतोय हा, झोप येतीये, चल रे चक्कर मारून बघू अजून कोण ओळखीचं दिसतंय का ते. सांगण्यात परवानगी गृहीत असल्यामुळे आम्ही उठलो. कुणीही वळून बघावं आणि माझा दु:स्वास करावा अशी होतीच ती. माझ्या हातात नाकापाशी धरलेला अदृश्य गुलाब आणि दृश्य मस्तानी डाव्याबाजूला. असंख्य नजरा झेलत आम्ही गेटमधून बाहेर शनिवारात आलो. तिनी शाल आणली होती. तेवीस वर्षापूर्वी पुणं कमी जागायचं. रस्त्याला सन्नाटा, बोचरी थंडी, हातात हात घालून आम्ही नि:शब्द बालगंधर्वपर्यंत चालत गेलो. पूल संपतो तिथे डावीकडे वळताना मस्तं झाड होतं. "बसूयात इथे?" असं तिनी खाली बसून विचारलं. आज्ञाधारकतेने आज्ञा द्यायची तिची उपजत लकब.

पांढरी शाल गुंडाळून बर्फ झालेल्या सिमेंटवर बिलगून बसलो दहा मिनिट अंधार उपभोगत. "इथे नको बसूयात, येताना मला जागा दिसलीये एक, सेफ आहे चल", म्हणाली. देवी हाईटस कडून रमणबागेकडे येताना डाव्या हाताला दुमजली घराच्या पुढचा सिमेंटचा कट्टा आणि ओटा संपतो तिथे कॉर्नरला पंचेचाळीस डिग्रीत लोखंडी पट्टी लावलेली बंद पानटपरी. कडेच्या कट्ट्याला किंवा त्या दरवाज्याला टेकून जेमतेम दोन माणसं दाटीवाटीनी बसू शकतील इतपत जागा. थंडी मरणाची. अपुरी शाल पांघरून आम्ही बसलो चिमणाचिमणीसारखे. भुतासारखे डोकी फक्तं बाहेर ठेवून. गस्तीला बसावं तसं आम्ही पहाटे पाच पर्यंत बसलो तिथे. शब्दं हळूहळू कमी झाले, स्पर्शानी, बोटांनी खूप बोललो. रात की बात है और रात अभी जादा बाकी तो नही अशी अवस्था. "वेडे आहोत का रे आपण" निघताना ती दाटलेल्या आवाजात म्हणाली. शाल तिची होती, काढून घ्यायच्या आधी तिनी जीव गुदमरेल अशी मिठी मारली. "उद्या येशील?" मी नाही म्हटलं. कुठल्याही गोष्टीतलं पहिलेपण जपायचं असेल, स्मृतीकुपीत साठवायचं असेल तर ती गोष्टं नजीकच्या काळात लगेच करू नये. नाविन्यं संपतं.

काळ हातानी किल्ली फिरवल्यासारखा झरझर सरला. थंडी आताही पडते, सवाई दरवर्षीच भरतं (आता वेळेच्या बंधनात), शहर पुणं रात्रं काय दिवस काय झोप न आलेल्या माणसासारखं टक्कं डोळे उघडे ठेवून जागं असतं, ते घर अजून तसंच उभं आहे. थंडीत तिचे मानेशी उष्मा निर्माण करणारे गरम श्वास… जाऊ दे. कधी वाटतं त्या पानवाल्याला जाऊन विचारावं, तेविस वर्षापूर्वी डिसेंबरला सकाळी दार उघडताना दरवाजा जरा जास्तच उबदार वाटला होता का हो?

--जयंत विद्वांस



Sunday 23 November 2014

स्कॉच…

स्कॉटलंड यार्ड पोलिस आणि स्कॉच एवढ्या  गोष्टींसाठी मला स्कॉटलंड माहितीये. न पाहिलेल्या स्कॉटलंडचा मी तहहयात ऋणी आहे. मोरावळा, स्कॉच आणि बाई जितकी जुनी होत जाते तितकी ती चविष्ट होत जाते. स्कॉच म्हणजे मधुबाला. क्वालीटी अशी की क्वांटीटीची गरज नाही. अत्यंत कठोर परिश्रमानंतर स्कॉच बनवतात तिकडे. प्रत्येक कंपनीचे पाणी घ्यायचे झरे ठरलेले आहेत असं वाचलंय. एक घोट घेऊन ती स्कॉच कुठल्या झ-याच्या पाण्यापासून तयार झाली आहे असं सांगणारे व्यासंगी लोक आहेत तिकडे. हे म्हणजे कॉलेजात शंभर फुटावरून पुसट दिसणा-या पाठमो-या मुलीची डिव्हीजन, आत्ता कुठे चाललीये, डावी उजवीकडे कोण कोण आहे असा तपशील देऊ शकणा-या महाभागाच्या व्यासंगाच्या तोडीचं आहे.

स्टीलच्या ग्लासमधून घ्यायची वारुणी ही नव्हे, हे म्हणजे मधुबाला जात्याच सुंदर आहे म्हणून तिला प्लास्टिक जरीची दीडशे रुपये किमतीची लालभडक साडी नेसवण्यासारखं आहे. तिचा मान तिला द्यायलाच हवा. तिचा तो गोल्डन यलो कलर कट ग्लास मधे ओतल्यावर बघत रहावा नुसता. तळापासून संथ लयीत वरती येणारी मोहरीच्या आकाराच्या बुडबुड्यांची रांग, ग्लासच्या बाहेर जमा होऊ लागलेलं धुकं अनिमिष नेत्रांनी बघत रहावं. मला कायम तो फ़्रौस्टेड ग्लास बघितला की इक लडकी भिगी भागीसी… मधुबाला आठवते. थंड स्पर्शाची, आत ज्वालामुखी बाळगणारी. स्कॉच निष्कपटी आहे, आरपार दिसतं ग्लासातून. त्यातून बघताना तुम्ही ठरवायचं कुठल्या आठवणींची रांग समोरून न्यायची ते. दु:ख, ताण वगैरे विसरण्याच्या नावाखाली व्यसन म्हणून प्राशन करण्याचा हा मद्यार्क नव्हे. 

स्कॉच हा धांदलीचा विषयच नाही. माहौल पाहिजे. स्नेहभोजनाची गर्दी इथे कामाची नाही. चारजण म्हणजे सुद्धा गर्दीच ती. एकेमेकांचे चेहरे स्पष्टं दिसतायेत एवढा पुरेसा उजेड, तोंडात टाकायला जीभ चुरचुरेल अशी लसणाची तिखट शेव, खारे काजू, तळलेला बांगडा, सुरमईचा तुकडा, शिंगाड्याच्या पिठातले तपकिरी दाणे, चिजलिंगची मुठीनी खायला बिस्किटे, एवढं पुरेसं आहे. राजकारण, अनुपस्थित व्यक्ती, वैयक्तिक दु:खं, अडचणी यावर बोलायची ही वेळ नव्हे. मस्तं गाणी, संगीत, नविन काहीतरी वाचलेलं, ऐकलेलं सांगावं, ऐकावं. उद्या सुट्टी आहे, थोडी शिरशिरी आल्यासारखं वाटू लागलंय, गर्भारबाई सारखं शरीर आळसावत चाललंय, पाय ताणले जातायेत, ग्लास खाली ठेवून परत उचलायला कष्ट पडतील म्हणून तो तसाच हातात धरून त्याच्यावर माया माया केली जातीये. बास, यापेक्षा काही नाही लागत वेगळं स्वर्गात चक्कर मारायला.

स्कॉच जिभेवरून पोटात जाते तो अनुभवण्याचा विषय आहे. आळवून म्हटलेल्या ठुमरीचा मजा, बेगम अख्तरच्या जाने क्यू आज तेरे नामपे रोना आया चा दर्द, हुरहूर, तलतची शामे गमकी कसमची कंपनं, सैगलचं बाबुल मोरा, किशोरचं ये क्या हुआ, मुकेशचं कही दूर जब त्यात वस्तीला आहेत. तिचा घोट कसा जिभ मखमलीनी ल्यामिनेट करून जातो. तो थंड प्रवाह इच्छित स्थळी पोचेपर्यंत गळ्यातून मिनिएचर मोरपिसं फिरवत जातो. न चावणा-या गोड काळ्या मुंग्या गुदगुल्या करत नखशिखांत फिरतात. दोनचार आवर्तनं झाली की तुम्हांला नील आर्मस्ट्रोन्ग झाल्यासारखं वाटू शकतं. तुम्ही चंद्रावर उतरला आहात, चंद्रावरचं काळं कुत्रं सुद्धा तिथे नाहीये, वजनरहित अवस्था, तरंगणं चालू डायरेक्ट. एवढी स्वस्तातली चांद्रसफर इस्रोच्याही आवाक्याबाहेरची आहे. 

डोक्याला मस्तं मुंग्या आल्या की थांबावं, असोशीने संपवायच्या मागे लागू नये,
बाटलीत राहिली म्हणून ती वाया जात नाही, नासत नाही, चव, रंग बदलत नाही.  सरड्यासारख्या रंग बदलणा-या दुनियेत ही मात्रं इमान राखून आहे.

--जयंत विद्वांस 




Friday 21 November 2014

मस्साला डोस्सा.....

साल १९९१. हॉटेल रविराजला अकाउंटसला ट्रेनी म्हणून जॉईन झालेलो. पगार पाचशे आणि बिन पेट्रोलची टू व्हिलर हर्क्युलस. मस्तं चाललं होतं. एकतर ऑफिसमधे तीन मुली, असेना का म्हटलं पगार कमी. मला अकाउंटसचं काहीच यायचं नाही त्यामुळे प्रत्येक जण माझा गुरु. ज्ञान देण्याच्या आनंदापेक्षा आपल्यापेक्षा कमी माहितीचा माणूस सापडला की काय आनंद होतो ना पब्लिकला. तर यथावकाश xxx xxकर ला माझ्या बद्दल जरा वेगळं वाटायला लागलं. ती पर्मनंट होती तेंव्हा, माझ्या पेक्षा एक वर्षांनी मोठी. मग गप्पा, जे.एम.रोड ला रविवारी चक्कर मारणं चालू झालं. भरभक्कम पगार असल्यामुळे हॉटेल मधे कोण चल म्हणणार? भेळ परवडेबल मेन्यू होता.

आणि तो काळा दिवस आला एकदाचा. मला म्हणाली, उद्या आपण सनराईझला जायचं रे. तिथे हाकलत नाहीत कितीही वेळ बसलं तरी. (माझ्या हयातीत पुण्यात झालेल्या एकमेव दंगलीत लोकांनी सनराईझ पेटवलं इराण्याचं हॉटेल म्हणून. ते अक्रोडचं फर्निचर, केक, सामोसे, तो स्पेसिफिक चवीचा चहा, गेलं सगळं). म्हटलं जाउयात. त्यातला त्यात बरा असलेला ड्रेस घरी जाऊन इस्त्री केला. दाढी सकाळी केली कारण तेंव्हापासूनच ती सुफला १५:१५:१५ टाकल्यासारखी मायंदाळ उगवतीये. कावळा जेवढा देखणा दिसू शकेल तेवढा मी निश्चित दिसत होतो आणि पोचलो एकदाचा. हॉटेल मधे जाण्याचे प्रसंग त्या दिसापर्यंत मित्रांबरोबर ते ही क्वचित. आयुष्यात पहिल्यांदा देखण्या मुलीबरोबर (अरुणा इराणी सारखी दिसायची, कोब्रा गोरी, बुटुक) हॉटेलमधे, रात्रभर झोप नाही. 

मी वाटतोय एवढा बावळट नाहीये अशी पाटी गळ्यात अडकवावी का असंही वाटून गेलं. आम्ही बसलो, सोड्याच्या बाटलीसारखी फसफसत म्हणाली, काय खाणार? मी मेनू कार्ड घेतलंच नाही हातात, रेट बघून पडलेला चेहरा तिनी ओळखला तर? म्हटलं तू सांग. "मसाला डोसा, ओक्के?" मला ब्रम्हांड आठवलं, चटणी, सांबार मी कपड्यांवर स्पर्धा लावल्यासारखं सांडतो. मोठी पंचाईत. म्हटलं छे, इराण्याकडे? उसके लिए अण्णा लोग चाहिये. इथे सायकल मारून भूक मरणाची लागलेली. तिनी माझ्यासाठी सांडविच सुचवून उपकार केले. मी सौस लावला नाही. नाही म्हणजे नाही कपड्यावर सांडवायचं, ठरवलेलंच मी. कौफी पण गार होत आली की प्यायची ठरवलेलं, जीभ भाजली म्हणून सांडली तर? (बावळट म्हटलं की राग का येतो मग मला? असण्याची शक्यता आहे कारण अजूनही फारसा फरक पडलेला नाहीये). 

डोसा आला,सांडविच आलं. आम्ही चारलाच गेलेलो, आम्ही दोघेच फ्यामिली सेक्शनला. वेटर पण शहाणा, हाक मारली तरच येणारा, तिनी डोळे मिचकावले, म्हणाली, खाण्यासाठी एकांत? बस म्हणावं पलीकडच्या खुर्चीत. माझ्या अंगावर मोरपिसं, मोराच्या मागे सुद्धा कमी असतील. म्हणाली, लोक का घाबरतात काय माहित, मला हातानी डोसा खायला जाम धमाल येते. तिचा डोसा संपेपर्यंत मी "बावळट स्पर्धे"त पोल पोझिशन मिळवून गोल्ड मेडल साठी मान झुकवून उभा होतो. 

तेवीस वर्ष झाली. असेना का बावळट मी पण अजूनही डोसा खाताना सनराईझ आठवतं, ती आठवते आणि मिरची लागल्यासारखं डोळ्यात पाणी येतं. 
--जयंत विद्वांस



Monday 17 November 2014

"नवीन सभासदांचे सहर्ष स्वागतपत्रक"

ANGS उर्फ 'अखिल नेपाळ गुरखा संघ', मुख्य कार्यालय, पुणे,

"नवीन सभासदांचे सहर्ष स्वागतपत्रक"

नमस्कार,

ANGS उर्फ 'अखिल नेपाळ गुरखा संघ', मुख्य कार्यालय, पुणे, ( काही हितशत्रू  "मुख्य कार्यालय? बाथरूम सुद्धा मोठी असते हो" असं म्हणतात, आपण लक्ष देऊ नये) आपले म्हणजे नविन सभासदांचे सहर्ष स्वागत करत आहे. सोशल नेटवर्क वर रात्री उपस्थित रहाणा-या लोकांकडे नेहमी तुच्छतेने बघितले जाते आणि एकीत बळ असते त्यामुळे अशा लोकांसाठीचा हा संघ आहे. खरंतर आपण सर्व झोपलेल्या समाजापासून वेगळे आहोत, जागृत राहून आपण सांस्कृतिक गस्तं घालतो. खाली दिलेल्या विविध कारणांनी आपण सर्व रात्रं झाली की ऑनलाईन असतो ते घुबड, निशाचर आहोत म्हणून नाही, तर कर्तव्यं म्हणून : 


) नेटप्याक रेट कमी असणे

) दिवसभर वेळ नसणे

) च्याटिंगला कुणी डिस्टर्ब करत नसल्यामुळे पोस्ट्स निवांत वाचता येतात

) नवरा/बायको/आई/वडील (लागू नसेल ते खोडावे) बाहेरगावी गेल्यामुळे

) विशिष्ठ व्यक्तिशी गप्पा मारणे (संघ याच्या म्हणजे गप्पांच्या पातळीला जबाबदार नाही) सोयीस्कर असते
६) झोप न येणे (याची अनंत कारणे सभासदांनी सादर केलेल्या शोधनिबंधात वाचून आपलं ज्ञान वाढवू शकता) 
७) रूमपार्टनरच्या डोंगलवर वायफाय फुकट आणि स्पीड जास्ती मिळणे

तुम्हांला अजून काही कारणं माहित असतील तर ती लेखी स्वरुपात कार्यालयात द्यावीत (वरील कारणं आपल्या शब्दात नवी म्हणून देण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित हकालपटटी करण्यात येईल), कारणं योग्यं आणि नविन वाटल्यास पुढील स्वागत पत्रकात त्यांचा समावेश केला जाईल (सभासदाचे नाव देण्यात येणार नाही, समावेश हीच प्रशंसा समजावी). वर्षातून एकदा सभासदांची एकमेकांशी ओळख व्हावी यासाठी गेट-टूगेदर आयोजित केले जाते. त्याचे रुपये पाचशे त्वरित माहितीपत्रकात दिलेल्या बँक खात्यात जमा करावेत. पैसे भरले म्हणून तुम्ही यायलाच पाहिजे असं नाही, पैसे मात्रं तरीही भरावेच लागतील. पैशाचा हिशोब मागू नये कारण तो आम्ही ठेवत नाही. फार आग्रह केल्यास लाईट घालवून डोक्यावरून पोतं टाकून स्वागत समिती पै  न पैचा हिशोब देईल.



तर नविन सभासदांचे परत एकदा स्वागत. तूर्तास इथेच थांबूयात. सभासदांचे हक्कं, जबाबदा-या पुढील पत्रकात आपल्याला माहितीसाठी देण्यात येतील. फक्त त्यासाठी आपल्याला आधी 'फेसबुक, व्हाटसॅप (किंवा कुठलेही सोशल नेटवर्क) - निद्रानाशाची कारणे की निद्रानाशातला विरंगुळा' यावर पंधरा दिवसात शोधनिबंध सादर करावा लागेल. त्यानुसार आपणास तहहयात प्राथमिक सद्स्यत्व बहाल करण्यात येईल (शोधनिबंध पूर्ण अथवा काही अंशी स्विकारण्याचा/नाकारण्याचा हक्क संचालकांकडे अबाधित. त्या संदर्भात कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही. मेसेज, मेल, फोन करुन त्रास दिल्यास रात्री लवकर झोपण्याची शिक्षा दिली जाईल याची नोंद घ्यावी). 

हुकुमावरून,  
ANGS उर्फ 'अखिल नेपाळ गुरखा संघ'
मुख्य कार्यालय, पुणे.
--------------

जयंत विद्वांस 







Saturday 15 November 2014

एलिझाबेथ एकादशी.....

एलिझाबेथ एकादशी..... 
काही गोष्टींची मजा ऐकण्यात असते, काहींची वाचण्यात असते तर काही दृश्यं माध्यमात चांगल्या दिसतात. मोकाशींची एलिझाबेथ शेवटच्या प्रकारात मोडते. नावातला वेगळेपणा आणि निर्माण झालेली उत्सुकता पहिल्या पाच मिनिटातच संपते अर्थात याचा परिणाम सिनेमा बघताना अजिबात होत नाही. सव्वा दीड तासात मोकाशी आपल्याला हरवून, हलवून, हसवून सोडतात.

लहान मुलांची निरागसता दाखवणं मोठं अवघड काम आहे. नुसते चटपटीत संवाद असून काम भागत नाही तर बोलके निरागस चेहरेही गरजेचे असतात. मोकाशींची ग्यांग सरस आहे. धूल का फूल, नया दौरची डेझी इराणी, मासूमचा जुगल हंसराज आठवतात. इथे श्रीरंग महाजन, सायली भांडारकवठेकर (हिच्या गोडव्याकरता बघाच एकदा) धमाल करतात. चित्रपटात अमूक एक असेल असं ठरवून गेलात तर निराशा होईल. ग्लामरस हिरोईन नाही, व्हिलन नाही, गाड्या बंगले नाहीत, मारामा-या नाहीत, गाणी नाहीत, लोकेशन्स नाहीत. मग आहे तरी काय?

पंढरपुरच्या गल्ल्या आहेत, टेरेसवर रहाणारं, कर्जाच्या दलदलीत बुडालेलं कुटुंब आहे, परिस्थितीमुळे चेह-यावरचं हसणं पुसलं न गेलेली  मुलं, याच्या मागे संसारगाडा ओढताना त्यांची कातावलेली आई आणि हताश आजी आहे,  मुलांना मदत करणारी त्यांची मित्रमंडळी आहेत. मुंगीला मुताचा पूर अशी एक म्हण आहे त्याचा खरा अर्थ आज जास्ती कळला. निटिंग मशिनचं पाच हजार रुपयांचं कर्ज फेडायचंय इतकी क्षुल्लक बाब आहे. भांडी विकून आलेले पाचशे, कामाचे येऊ घातलेले पाचशे, स्कालरशिपचे पाचशे आणि घरातले असे मिळून तीनची सोय आहे. एलिझाबेथ विकून दोन असं पाचचं गणित बसतंय.

आईला मदत म्हणून पोरं उद्योग करतात कारण एलिझाबेथ विकायची नाहीये, ती त्याच्या वडिलांनी घरी बनवलीये. सगळी स्वप्नं कुठे खरी  होतात म्हणा. देवाच्या गावात पोरांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. बघताना जीव गलबलतो.  खूप राग आला, दु:खं झालं की माणूस शांत बसतो.  त्रागा करण्याची त्याची शारीरिक, मानसिक ताकद संपते. आहेत ते तीन हजार पण गेल्यामुळे कोप-यात बसलेली आई, फुरंगटून झोपलेली पोरं ओरखडा काढतात. जगात चांगुलपणा दिसत नसला तरी तो शिल्लक असावा अशी शंका यायला अजूनही वाव आहे असं सांगणारा शेवट मोकाशी करतात. तसं गेलं तर ही छोट्या मुलांची दुनियादारी आहे. हिशोबी मदत करत नाहीत लहान मुलं.

पोरांची ग्यांग, आई, मित्राची गणिका आई सगळी पात्रं सरस, त्यांची निवड सरस. मुलांचे ढगळ कपडे, रंग उडालेलं घर, मानेची हाडं दिसणारी, साध्या साड्यातली तेलकट चेह-याची कातावलेली नंदिता धुरी पटते. खूप दिवसात निर्मळ निरागस हसला नसाल, छातीत डाव्या बाजूला हलल्यासारखं वाटलं नसेल, डोळ्यात काहीही गेलेलं नसताना डोळे पुसावेसे वाटत असतील, कंठमणी गहिवरानी हलला नसेल तर एलिझाबेथ बघाच एकदा.
 
जयंत विद्वांस

Tuesday 11 November 2014

उर्मिला....

प्रिय सीतावहिनीस,

कोण म्हणतं कैकयीनं रामासाठी वनवास मागितला? जगाच्या दृष्टीने असेलही तसं पण माझ्या दृष्टीने नाही.  त्यांनी मागितला तुमच्यासाठी, भोगला मी. आपण दोघीही साधारण एकाच वयाच्या ना गं तेंव्हा. सहजीवनाची रंगीत स्वप्नं दोघींनाही जवळपास थोड्याफार फरकाने सारखीच पडली असणार. किती हरखून गेलो होतो ना आपण.

त्या कोवळ्या वयात तुझ्यावर झालेला आघात जबरदस्तच होता. एका स्त्रीच्या हट्टापोटी, पुत्रप्रेमापोटी दुस-या स्त्रीच्या नशिबी वनवास आला. पावसाळ्यात जसा क्षणार्धात वातावरणात बदल होतो, घटकाभरापूर्वीचं निरभ्रं आकाश काळ्या ढगांनी गजबजत तसं तुझ्या प्रारब्धावर काळे ढग जमा झाले. आकाशातला पाऊस तुझ्या डोळ्यात वस्तीला आला.

पण मोठेपणा, मानमरातब मिळायला सुद्धा नशिब लागतं बघ. युद्धात मरणा-या सगळ्याच वीरांच्या नशिबी सन्मान येतो असं नाही. तसंच झालं माझ्या बाबतीत. तू गेलीस् त्याच्या पाठोपाठ, तुझं चूक नव्हतंच काही. तू पत्नीधर्म सांभाळलास. तू नायिका झालीस गं. तुझ्या सुखदुःखाचे पोवाडे झाले, मी मात्रं उंबरठ्याशीच् राहिले.  माझ्या दु:खाची नोंद नाही. हे चल म्हणाले असते तर  आले नसते? पण मग रामायण वेगळं लिहिलं गेलं असतं.

वनवासात का होईना पण तो तुझ्या सोबत होता. रानावनात का होईना तू चार सहवासाचे अमृत क्षण भोगलेस तरी, मी मात्रं एकटीच् राहिले मागे, दिवसरात्र एकांतात पावसाळी ढगासारखी रडत, सकाळ झाली की नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून बघत. गळवासारखं ठसठसणारं आयुष्यं भरजरी वस्त्रासारख सांभाळत. घरात सतत तुमचच कौतुक, सतत तुमचीच् काळजी. माझा त्याग राजवाड्यातला त्यामुळे मी उपेक्षितच् राहिले. अगं नवरा बरोबर असेल तर वनवास सुद्धा सुसह्य असतो, मी गाद्या गिर्द्यांवर, ऐश्वर्यात सालंकृत वनवास भोगला.

वाईट असेल पण घडलं तरी गं तुझ्या आयुष्यात काही. माझं आयुष्यं सपाट, रसहीन, सगळ्यांच्या सहानुभूतीच्या नजर झेलण्यात गेलं. मी तरीही जगतच् राहिले उद्याच्या आशेने. मला असूया नाही, द्वेषही नाही. वहिनीच्या नात्यापेक्षा आपलं बहिणीचं नातं जवळचं आहे. पण माणूस मोठा झाला की त्यानी लहान लहान स्वप्नं बघूच नयेत का गं? मोठ्या स्वप्नांचे स्वप्नभंगही मोठेच असतात.

नाही जास्तं काही लिहित आता. पण माझ्या मनातली इच्छा सांगते तुला. परत जेंव्हा रामायण घडेल तेंव्हा मी तुझा जन्मं मागितलाय. याचा अर्थ अदलाबदल करून तुला माझा मिळावा इतका माझा क्षुद्र हेतू अजिबात नाही. पण मला ते रानावनातलं का असेना सहजीवन उपभोगायचंय. मी देवाकडे ऐश्वर्यात निर्माल्यं करणारा नवरा नको, वनवासात बरोबर नेणारा मागितलाय...बरोबर नेणारा मागितलाय...
तुझीच अभागी ….

उर्मिला
.....
जयंत विद्वांस


Saturday 8 November 2014

काजळे.....

चौ-याऐंशीला ओळख झाली आमची रस्टनला. दोघांचाही ट्रेड सेम होता. सहा फुटाच्या आसपास उंची, गोरापान, देखणा, सरळ नाकाचा, डबल हाडाचा आणि उठून दिसणारा, लक्ष वेधून घेणारा, केस, मिशी, डोळे आणि भुवयांचा काळा रंग. त्याच्या गो-यापान चेह-यावर अगदी मुद्दाम रंगवल्यासारखा तो रंग रेखीव दिसायचा. दाढी वाढवली तर उर्वरित लाल गोरा चेहरा अगदी मस्तं दिसायचा. त्याचे वडील नेहरू स्टेडीअमजवळ जिम मधे इन्स्ट्रकटर होते, हा ही तसा कमावलेल्या अंगयष्टीचा माणूस.

खूप कमी बोलायचा, कुणाच्याच अध्यात मध्यात नसलेला,  सेन्स ऑफ ह्यूमर उपजत असलेला, पण हसणंही अगदी मोजकं, गालातल्या गालात. आम्ही सगळे १७-१९ वयाच्या रेंज मधले. अचकट विचकट बोलणे, शिव्या देणे, शिग्रेटी ओढणे, टपरीवर भजी, चहा वर तासंतास गप्पा ठोकणे, एस.पी.वर संध्याकाळी क्रिकेट खेळणे असे उद्योग करायचो. हे सगळं त्याला माहित असायचं पण तो कशातच नसायचा. त्याच्या वाटेलाही कुणी जायचं नाही, एक तर तो तगडा होता आणि सज्जन होता. कमी बोलणा-या माणसांचा एक अदृश्यं दरारा तयार होतो, तसा होता त्याचा. आमच्या दृष्टीने तो निरुपद्रवी होता.

गुरुवारी आम्हांला थेअरीसाठी ए.टी.एस.एस., चिंचवडला जावं लागायचं. टवाळ्क्याच जास्तं. मी, मोडगी, कुट्टी गाणी म्हणायचो भसाड्या आवाजात. ठेका धरायला भरपूर होते. काजळे एकच गाणं म्हणायचा आवाज बदलून, 'सून सायबा सून……'. बाहेरून ऐकणा-या माणसाला खरोखर मुलगी/बाईच गातीये असं वाटेल इतकं सरस म्हणायचा. कुठेही आवाज चिरकणं नाही, बेसूर नाही. बरं या गोष्टीचा त्याने मोठेपणा कधीच मिरवला नाही. मुळात त्याला काही त्यात विशेष वाटायचंही नाही. दोनचारवेळा आग्रह झाला की आढेवेढे न घेता म्हणायचा आणि परत शांत बसून सगळी गंमत अब्सोर्ब करत बसायचा. माझ्या सततच्या विनोदी बोलण्याला स्मित हास्याची दाद असायची आणि भन्नाट हजरजबाबाला डोळ्यात कौतुक. 


सत्याऐंशीला रस्टन संपलं आणि वाटा वेगळ्या झाल्या. मी ही बदलापूरला गेलो अठ्ठ्याऐंशीला मग सगळ्यांशी पार संपर्क तुटला. आमचाच एक त्यावेळचा कॉमन मित्रं भेटतो अधूनमधून. तरी आठ नऊ वर्ष झाली या गोष्टीला. एकदा त्याचा मला फोन आला, म्हणाला "काजळे आठवतोय?" म्हटलं "हो, का रे?" "अरे, तो काल मला अरण्येश्वरच्या देवळात भेटला. वेडा नाही म्हणता येणार पण तीच स्टेज. दाढी, केस वाढलेले आणि चेह-यावर निष्प्राण शांतता, तासंतास देवळात बसून असतो, चेंज म्हणून घरी जातो, तिथे कंटाळा आला की देवळात. काय झालंय नक्की कुणाला विचारणार, त्यामुळे मी जनरल गप्पा मारल्या, आपल्या ब्याचच्या मुलांची नावं विचारली. माझं नाव ही त्याला आठवेना. विद्वांस आहे लक्षात म्हणाला. कधी गेलास तर जा देवळात, बघ सापडतोय का."

मी आजतागायत त्या देवळात गेलेलो नाही. गेलो तरी माझं बोलायचं धाडस होणार नाही. विचार केला की वाटतं त्या माणसाच्या दृष्टीनी वेड लागणं किती फायद्याचं असेल ना? अपेक्षाभंग, प्रेमभंग, अपयश कशाचंही दु:खं नाही. पॉझ केलेलं आयुष्यं. पुढे काय घडतंय याची उत्सुकता नसलेलं. मरणाची तर नाहीच पण जगण्याचीही भीती नाही. काय घडत असावं मेंदूत इतकं? सगळा डाटा इरेझ होण्यासारखं? त्याचा त्या व्यक्तीला त्रास होत असेल? दु:ख काय किंवा आनंद काय सहनशक्तीच्या पलीकडे गेलं की हार्ड डिस्क उडत असावी बहुतेक. पीसी सारखी रिप्लेस करता येत नाही हे दुर्दैवं. 
जयंत विद्वांस


Tuesday 4 November 2014

लल्याची पत्रं (१८) …. 'तेरे बिना जिंदगीसे'

लल्याची पत्रं (१८) …. 'तेरे बिना जिंदगीसे'
लल्यास,
कुणावाचून आयुष्यं थांबेल, संपेल एवढं कुणाला आयुष्यात स्थान देऊ नये बघ. हे म्हणणं फार सोपं आहे. असं ठरवून काहीही करता येत नाही. बादलीत निळीचा पहिला थेंब पडतो आणि सगळ्या पाण्याचा रंग बदलून जातो ना तशी एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि मग आपलं अस्तित्वं तिच्याशिवाय अपुरं वाटायला लागतं. अहंकार, तत्वं, अधिकाराची भावना, ध्येयं, आकांक्षा, स्वप्नं अशा अनेक गोष्टींपायी फारकत होते. प्रत्येकजण आपापल्या जागी योग्यं वाटतो पण एकटेपण, अपुरेपण पायातला काटा निघावा पण आत राहिलेला बारीक कण सलत रहावा तसं टोचण्या देत रहातं.
आयुष्याच्या संध्याकाळी चुका उमगतात, त्यावेळेस त्या मान्यं केल्या काय केल्या काय, निसटलेलं, हरवलेलं डोळ्यांपुढे तरळतं. आयुष्यं तसंही जगता आलंच असतं की, ते ही फार वाईट नव्हतं खरंतर, असं वाटून जातं. आयुष्याचा जमाखर्च मांडताना तारांबळ उडते. काही गोष्टींसाठी मनाच्या कागदावर केलेल्या तरतुदी आठवतात. राहून गेलं त्या अंमलात आणणं ही भावना विषण्णं करते. We regret more for what we miss than what we had already lost.
गुलझार हे सगळं मोजक्या जीवघेण्या शब्दात 'तेरे बिना जिंदगीसे' मधे मांडतो. मुळात 'आंधी'ची तिन्ही गाणी रत्नं आहेत. इस मोडसे जाते है, तुम गये हो आणि हे (चौथं विस्मरणात टाकण्यासारखं म्हणून तीन). ज्यावेळेला मनातलं बोलायचं असतं पण बोलता येत नाही अशावेळी माणसं वेगळंच बोलतात. गुलझारनी गाण्याच्या मधे संजीवकुमार, सुचित्रा सेनचं गद्य असंच लिहिलंय. संजीवकुमारच्या खालच्या पट्टीतल्या आवाजाला सुचित्रा सेनचा गहिवरलेला आवाज वरचढ ठरतो. "वैसे तो अमावस पन्ध्रह दिनकी होती है, लेकिन इस बार बहोत लंबी थी", नौ बरस लंबी थी ना?" त्यानंतर बोलणं खुंटलेल्या अवस्थेला सावरून घ्यायला "जी में आता है…" चालू होतं. ते संपतं आणि तिथून किशोर तेरे बिनाउचलतो. अशीच जादू त्यानी  सलामे इश्कंलाकेली होती आणि गाणं खाऊन टाकलं होतं.
मागे तुला म्हटल्याप्रमाणे काही गाण्यांना तो वेगळा, राखलेला आवाज लावतो किंवा लागत असावा. शेवटचं कडवं तसंच आहे. इतक्या दिवसांनी भेटलेली ती, खूप काही बोलायचंय, ऐकायचंय. हताशपणाचा कळस लिहिलंय गुलझारनी. तू म्हणशील तर आज चंद्रास्त होणारच नाही, कालचक्र थांबवून ही रात्र फ्रिज करू, चिरंतन करू. एका रात्रीची तर गोष्टं पण आयुष्यंच शिल्लक नाही. गालिब म्हणतो. "हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले". अशीच भावना होते गाणं ऐकून. सकाळ झाली की दोघे दुरावणार. अबोल शल्यं, सल, रुखरुख, दाटलेले, साठलेले गहिवर पाचोळ्यासारखे असेच मनात तळाशी दबून पडणार आणि त्याची फौसिल्स झाली की ती उकरून काढून गुलझार अशी गाणी लिहिणार.
गाण्याचं इंट्रो, इंटरल्यूड म्हणजे शब्दरहित कडवीच ती. "ये जो फुलोंके बेले नजर आते है ना…. इसे दिनके वक्त देखना चाहिये" हे वाक्यं दिवसाच म्हटलंय हा एक त्यातला गमतीचा भाग. रात्रीच्या शुटिंगला लागणारी फिल्म संपली असल्यामुळे ते पिक्चरायीझ करून घेतलं आणि बदलायचं राहून गेलं असं वाचलंय मी. पण ते कुणाच्या लक्षात येणार नाही इतकं गाणं श्रवणीयं आहेआर.डी., लता (आशा पण), किशोर, गुलझार, अस्वस्थ आत्मे, अशी गाणी करतात आणि त्यांचा त्रास आपल्याकडे सरकवतात, बाकी काही नाही.
चल पुढच्या गाण्यापर्यंत कोई शिकवा नहीं आणि तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं.

जयंत विद्वांस

तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
तेरे बिना..

काश ऐसा हो, तेरे क़दमों से चुन के मंजिल चलें और कहीं, दूर कहीं
तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं
तेरे बिना..

जी
में आता है, तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहें, रोते रहें
तेरी भी आँखों में आंसुओं की नमी तो नहीं
तेरे बिना...

तुम
जो कह दो तो, आज की रात चाँद डूबेगा नहीं रात को रोक लो,
रात की बात है, और ज़िन्दगी बाकी तो नहीं
तेरे बिना..

(आंधी (१९७५), आर.डी.बर्मन, गुलज़ार, किशोर कुमार, लता मंगेशकर)