Monday 3 November 2014

लल्याची पत्रं (१७)…. बाबुल मोरा……

लल्याची पत्रं (१७)…. बाबुल मोरा……

खूप दिवसांनी पत्रं बघ. मधे वेळच झाला नाही. सैगलच्या गाण्यांची एक क्यासेट माझ्याकडे आहे (जी हेडफोन घालून ऐकावी लागते नाहीतर इतरांकडून मारहाण होण्याची शक्यता असते). मोजकीच गाणी आहेत त्यात पण त्यातली तीन मला जर जास्तच आवडतात - गम दिये मुस्तकील, नुक्तचिं है गमे दिल आणि सगळ्यात आवडतं बाबुल मोरा. उर्दू शब्दांचा अर्थ कळो न कळो, सैगल दु:खं दहा एच.पी.च्या मोटारला होज पाईप लावल्यासारखं ओततो.

मुकेश, हेमंतकुमार, सैगल किंवा कुठलेही जुने गायक यांच्याबद्दल चेष्टेनी बोलणं खूप सोप्पं असतं. त्यांच्या मर्यादा काय, बेसूर कुठे कुठे झालेत वगैरे माहिती अभ्यासू(?) लोकांच्या तोंडपाठ असते. १९३८ सालच्या स्ट्रीट सिंगर मधलं गाणं आहे हे. संगीतकार रायचंद बोराल. शहात्तर वर्ष झाली, गाणं टिकून आहे. पुस्तकात बघून बनवलेली रेसिपी नाहीये ती. चिमूटभर, चवीपुरतं, हातात घेऊन नजरेने किती टाकायचं याचा अंदाज घेऊन टाकलेल्या सुगरणीच्या हातची रेसिपी आहे. आजी म्हणायची, स्वयंपाक बनवणा-याचा स्वभाव त्याच्या जेवणात उतरतो म्हणून बाहेरचं खाऊ नये. मीठ मोहरीला चिकटून वात्सल्यं सोबत येत असावं. असो!

जिव्हारी लागलं ना की प्रतिकात्मक काय कुठलंच लिहिताना शब्दं शोधावे लागत नाहीत बघ. लखनौचा नवाब वाजिद अली शहाला इंग्रजांनी कोलकत्याला हाकललं आणि शेवटपर्यंत तो तिथेच राहिला. लखनौ त्याचं माहेर आणि कोलकता सासर. नुसतं ऐकताना वाटेल बिदाईचं गाणं आहे. मागे आई बाप, डोली मधे पोरगी हमसून हमसून रडत असणार. असलं काहीही नाही. हकालपट्टी झालेल्या राजाचे मूक अश्रू आहेत, रडगाणं नाही. सावरकरांना 'ने मजसी ने…' लिहिताना जे वाटलं तेच इथेही आहे. काय असतं खरं तर जिथे जन्माला आलो त्या मातीत जीव अडकण्यासारखं? नेमकं कुणालाच नाही सांगता येणार. गड्या, आपला गाव बरा, हे मात्रं सत्यं आहे. मला वाटतं बालपणच्या निरागस, दुर्गुण रहित मनावर जो ठसा उमटतो ना तो पुसला जात नाही. निखळ आनंदाचे सहज, विनासायास भोगलेले क्षण मनात रुतत असावेत. एखाद्याचं बालपण जन्मभूमीत कटू जरी गेलं तरी ओढ रहातेच. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ते काय खोटं नाही.

भीमसेन जोशी, जगजीत सिंह यांचंही मी ऐकलंय हे गाणं पण सैगल का मजा उसमें नही. कदाचित पहिला ठसा म्हणूनही असेल. थोर गायक मल्लिकार्जुन मन्सूर म्हणाले होते या गाण्याबद्दल "सैगलनी अजून चांगल्या पद्धतीनी म्हटलं असतं हे गाणं खरंतर". मोठी माणसं निर्विष, मत्सररहीत बोलतात बघ. चुका काढायच्या कामासाठी आजूबाजूल अर्धी हळकुंड खूप आहेत. आपण चांगलं ते बघायचं, ऐकायचं. 

मला एक प्रश्नं कायम पडतो, तुम्हां मुलींचं काय होत असेल उंबरा ओलांडताना?. वीस बावीस वर्ष बागडलेल्या घरात क्षणार्धात परक्या, पारख्या होता तुम्ही. पाहुण्या होता तुम्ही. हे फक्तं स्त्रीलाच जमू शकतं. बघ ना वाजिद अली सुद्धा किती सल घेऊन जगला ते. म्हणून मला तर कायम वाटतं बापाला हे तुटणं कळण्यासाठी मुलगी व्हावी. क्षणार्धात नाळ तुटते आणि मग जिवंत आहे तोवर त्याच्या मनात चिळकांड्या चालू. हव्याहव्याश्या वाटणा-या ओल्या जखमाच या, सुकलीये वाटलं तर खपली काढायची, परत ताजी. 

चल पुढच्या पत्रापर्यंत ये संग छूटो न जाए.

जयंत विद्वांस

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...


आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...


(फिल्म : स्ट्रीट सिंगर, संगीतकार रायचंद बोराल, गायक : कुंदनलाल सैगल, गीत : वाजीद अली शाह) 



No comments:

Post a Comment