Friday 29 March 2013

मनश्री - सुमेध वडावाला (रिसबूड)



काही पुस्तकं वाचून मनोरंजन होतं, काही वाचून ज्ञान वाढतं, इतिहास कळतो, सत्यं असत्य कळतं, प्रश्न पडतात तर कधी प्रश्न वाढवतात, कधी उत्तरं सापडतात, काही पुस्तकं मनमुराद हसवतात आणि काही तुमच्या नकळत तुम्हांला आतून हलवतात, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी डोळ्यातून पाणी कधी वहायला लागेल तुम्हांला सांगता येत नाही. 'मनश्री' वाचताना शेवटचा प्रकार होतो.  


मनश्री सोमणची जन्मापासून सुरु झालेली ही संकटांची मालिकाच आहे. वाहिन्यांवरच्या मालिकांबद्दल वाचलं की कायम प्रश्नं पडायचा मला की एकाच घरात वर्षानुवर्ष फक्त प्रॉब्लेम्स, कारस्थानं, संकट कशी काय येऊ शकतात? पण "मनश्री" वाचल्यावर मात्रं पटत की संकट, दु:ख हे न संपणारंही असू शकतं. असं का? का उपाय नाही या वर? या प्रश्नांची उत्तर सापडणार नाहीत हे माहित असूनही ते शोधण्याच्या नादात मेंदू कुरतडला जातो विचार करून. ती जन्माला येतानाच डोळे विसरून आणि फाटलेला ओठ घेऊन आली किंवा तिला पाठवलं गेलं. डोळ्यांच्या जागी बुबुळ नाहीतच फक्त दोन रेषा. वाचूनच रडू फुटलं. डॉक्टर म्हणाले, जशी जशी मोठी होईल तसं तसं अजून काय काय प्रॉब्लेम आहेत ते बघाव लागेल. तिच्या तपासण्या, उपचार वाचताना पटकन संपतात पण ते दृश्य डोळ्यापुढे उभ राहिलं की अस्वस्थ व्हायला होत. येणा-या अडचणी या तिच्यासाठी रुटीन होत्या, आहेत, रहाणार.


या प्रवासात त्यांना चांगली माणसं भेटली, वाईट ही भेटली. पण कुठलाही तिरस्कार न ठेवता त्यांनी ते पुस्तकात मांडल आहे. एक इंद्रिय निरुपयोगी असेल तर त्याची ताकद दुस-या इंद्रियाला मिळत असावी. अफाट स्मरणशक्ती आणि न हरण्याची तिच्यातली जिद्द ठाई ठाई जाणवते. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिनी 'बालश्री' पुरस्कार मिळवलाय आणि तो ही अपंगत्वाच्या कुबड्या घेऊन नाही तर धडधाकट इतर मुलांबरोबर भाग घेऊन. इतर अपंगत्व आलेल्या मुलांचाही उल्लेख यात आहे. व्हीलचेअरवर बसलेला मुलगा पहिला की हिला चालता तरी येतंय हा सुद्धा आनंद होऊ शकतो आणि त्याला वाटत आपल्याला निदान दिसतंय तरी. काय बोलणार? नि:शब्द करून टाकतात. 


सुमेध वडावाला यांनी केलेलं शब्दांकन दोन चार पानाआड पाणी आणतातच. कुठेही अलंकारिक भाषा नाही, साध्या सोप्या, संवाद शैलीत ते पानागणिक हलवून सोडतात. तिचे प्रॉब्लेम वाचले की काहीवेळेस सुचत नाही. आपण त्या जागी असतो तर? या कल्पनेनी सुद्धा भीती वाटते. मनश्री सोडा तिच्या आई वडिलांच्या जागी पण आपण स्वत:ला कल्पू शकत नाही. मनश्री सोमणला जेवढा सलाम तेवढाच तिच्या आईला, वडिलांना आणि सा-या कुटुंबाला. कधी जमलं तर मी त्यांच्याकडे जाऊन येणार आहे. काय बोलेन माहित नाही, शब्द की अश्रू आधी कोण फुटेल माहित नाही पण निदान त्यांच्या जिद्दीला एक नमस्कार तरी करून यावं असा मनात आहे.


देवाकडे काय काय मागावं हेच अजून आपल्याला कळलेलं नाही तिथे त्याचे आभार मानायचे वगैरे भानगडीत आपण पडतच नाही. मनश्री सोमण, सांगलीची करमरकर या लोकांचं समजलं, वाचलं की आपल्या देवाकडच्या मागण्यांची लाज वाटते. धडधाकट शरीर दिलंय याचे आभार कधी मानणार आपण? नुसतं आपल्याला नाही तर आपल्या प्रियजनांना पण. पुस्तक वाचून रडू येईल, चार जणांना सांगू, त्यांच्या दु:खाची, कष्टाची, कल्पना येईल पण जो माणूस या दिव्यातून गेला त्याच काय? जिद्द आपोआप येते की लादली जाते? मन होतं तयार की करावं लागतं? देवाचा राग त्यांनी केला तर काय चूक आहे? आपण मात्रं साधे आभार सुद्धा मानत नाही.   


देवा, एकवेळ पैसा देऊ नकोस, मान मरातब नको, गोरा रंग नको, देखणेपण नको, दीर्घायुष्य नको पण या पुढे निदान प्रत्येकाला फक्त धडधाकट शरीर तरी दे रे. तुला यात काही आनंद मिळत नसणार हे माहित आहे. दुस-याच्या दु:खात आनंद मानायला लागलास तर मग तुझ्यात आणि आमच्यात फरक तो काय? त्यामुळे लई नाही मागणं. बघ काही जमतंय का. 

 --जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment