Thursday 21 March 2013

पारध - अशोक जैन

पारध - अशोक जैन

क्षेत्रफळात महाराष्ट्र साधारण १४ पट मोठा आहे इस्राइलपेक्षा, भारताशी तुलना करण्याच्या भानगडीत न पडलेलच बरं. मुळावर उठलेले हिटलर आणि त्याचे साथीदार यांच्या तावडीतून जे सुटले, निसटले, पळाले, वाचले त्या ज्यूंचा हा देश. आख्ख्या देशात एक नदी, चारी बाजूनी शत्रू, पालेस्तीनी लोकांशी रोजचा संघर्ष अशी अनेक संकटं असतानाही हे राष्ट्रं ताठ मानेनं उभं आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकेला फाट्यावर मारून.

हिटलर, त्याचा नरसंहार, पराभव, अधोगतीची कारणमीमांसा यावर बरीच पुस्तकं आली. कुणावरही हल्ला न करणारा, कुणाचीही भूमी कुरापत काढून, युद्ध करून न जिंकणारा, सहिष्णू आणि स्वभावाने गरीब समाज नेहमी भरडला जातो हे सत्य मात्रं त्यामुळे जास्तच उठून दिसतं. असं काही घडलं की तो समाज एकतर नाहीसा तरी होतो, अगदी अस्तित्व पुसून जातं, नाहीतर तो पेटून तरी उठतो आणि असा धडा शिकवतो की परत कुणी वाटेला जायला नको. आपण ही त्यातलेच आहोत फक्तं पेटून कधी उठणार याचं उत्तर मात्र सापडत नाही (थोर ज्योतिषी Naustradamus पण हयात नाही, अर्थात तो हि सांगू शकला नसता हा भाग वेगळा).

''पारध'' ही साठ लाख ज्यूंना संपवणारा अडोल्फ आईशमान आणि त्याला शोधणारी ''मोसाद'' याची चित्तथरारक कहाणी आहे. रशियाची के.जी.बी., अमेरिकेची सी.आय.ए., इंग्लंडचं स्कॉटलंड यार्ड आणि इस्राइलची मोसाद या मान्यवर गुप्तचर संघटना आहेत. यांच्या कारवाया आपण पुस्तकातून, बोंडच्या चित्रपटातून पहात आलोय. (आपल्याकडील सी.बी.आय.किंवा RAW वरचं पुस्तक ऐकिवात नाही). दुस-या महायुद्धानंतर १८ वर्षांनी त्यांनी आईशमानला अर्जेन्टीनामधून शोधून काढलं. नुसतं शोधलं नाही तर विमानात घालून इस्राइलला घेऊन गेले कुणालाही न सांगता आणि त्याला शिक्षाही केली.

उत्सुकता, तो सापडल्यावर, संशय आल्यावर रचलेल्या चाली, पूर्ण कारवाई होईपर्यंत पाळलेली गुप्तता हा सगळा भाग वाचनीय आहे. दुस-या राष्ट्राच्या भूमीत जाऊन हा उद्योग करायचा हे काम सोप्पं नाहीये. केवढा मानसिक ताण असेल उच्चपदस्थ अधिका-यांपासून ते मोहिमेत भाग घेणा-या लोकांपर्यंत याची कल्पनाच केलेली बरी.

कसं जमतं हे त्यांना? की रक्तातच लागतं ते? बरं, सूड तर घेतला पण तो ही कायदेशीर मार्गांनी रीतसर, कसं शक्यं होतं? एवढी गोपनीयता कशी पाळता येते? अठरा वर्षांमध्ये आलेल्या अपयशानी खच्चीकरण का झाल नाही त्यांच? असे अनेक उद्विग्नता आणणारे, निरुत्तर करणारे आणि आपल्याकडे का असं शक्यं होत नाही असे प्रश्न फक्त पडतात.

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment