Thursday 7 March 2013

पॅपिलॉन

पॅपिलॉन ......

हेन्री शारीअरनी लिहिलेल (रवींद्र गुर्जर अनुवादित) पॅपिलॉन मी अनेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचल होतं. त्या नंतर किती वेळा वाचलं हे मोजणं सोडून दिलं. एका गुन्हेगाराचं आत्मचरित्र आहे ते. (विकिपीडिया च्या माहितीनुसार हे आत्मचरित्र १० % खरं आहे फक्तं, इतर कैद्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी यात पॅपिलॉनने स्वतःच्या नावावर घुसडल्या आहेत). अर्थात मी हे पुस्तक इतकी वर्ष वाचतोय की या माहितीमुळे माझं त्या पुस्तकावरच प्रेम यत्किंचीतही कमी होणार नाही. स्टीव्ह म्याकवीनचा 'पॅपिलॉन' चित्रपटही पहिला होता पण अजिबात कळला नव्हता, आता इतकी वर्ष वाचल्यामुळे कदाचित कळेल अशी आशा आहे. :)

न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला जन्मठेप झालेली असते. सुडाच्या भावनेने तो एकूण आठ वेळा पळून जायचा प्रयत्न करतो. अर्थात शेवटच्या प्रयत्नात तो यशस्वी होतो. पुस्तकाची भाषा साधी सोपी आहे  (रवींद्र गुर्जर यांना त्याचं श्रेयं द्यायलाच हवं), मी त्याचा उतरार्धही वाचलाय "बँको". पण तो एवढा नाही भिडला, कदाचित तेंव्हा त्याचे सुटकेचे प्रयत्न संपल्यामुळे त्यात थ्रिल उरलं नसावं. प्रचंड जिद्द, कमालीचा आत्मविश्वास आणि आशावाद या तीन गोष्टींसाठी हे पुस्तक वाचनीय आहे. मनाच्या खचलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी हे पुस्तक वाचलं की खूप मदत होते. अतर्क्य, कल्पना करता येणार नाही अशी साहस, कैद्यांची वाईट अवस्था आणि त्यातूनही त्यांनी धरलेला तग यामुळे पुस्तक हातचं  सोडवत नाही. 

भले या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडलेल्या नसतील असं जरी क्षणभर खरं मानलं तरी त्या अजून कुणाच्या तरी आयुष्यात घडल्या हे मात्रं नक्की होतं. तो जो काही अंगावर काटा आणणारा सुटकेचा प्रवास आहे तो मुळातूनच वाचायला हवा.आशा निराशेच्या खेळात आपणही त्याच्याबरोबर प्रवास करत असतो. भयंकर वु दू नाचाबद्दल परत कधीतरी अस सांगून ते त्यानी बँको मध्ये पण सांगितलेलं नाही असे दोन तीन संदर्भ अर्धवट राहून गेलेत. त्याच्याप्रमाणेच सुटका करून घेणारे अनेक कैदी होते. त्यांनी पुस्तक लिहिली आहेत की नाहीत ते माहित नाही त्यामुळे त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हेन्री शारीअर उर्फ पॅपिलॉनला सलाम.

(असच एका पोलिश युद्धकैद्याचं पुस्तक वाचल होतं, सैबेरियातून हिमालायामार्गे तिबेटपर्यंत पळून येतात. अप्रतिम पुस्तक. नाव लक्षात नाही, कुणाला माहित असेल तर जरूर सांगा)  

जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment