Thursday 20 March 2014

लल्याची पत्रं (३) ….

लल्याची पत्रं (३) ….
लल्यास….

पहिल्या पत्रात म्हणालो न तुला 'जोकर' मधलं ते 'मोहे अंग लग जा बालमा', ते परत एकदा ऐकलं आज. तुला त्यात म्हटलं होतं तसं हा ही पाऊस राघू कर्मकारनीच टिपलाय. पद्मिनीचं रहस्यं उलगडल्यावर आर.के.नी केलेला चेहरा मात्रं  मस्तं होता. पण त्याच्यातला गल्ल्याशी निगडीत असलेला डायरेक्टर जास्तं प्रभावी असल्यामुळे, रहस्यं कसं उलगडलय, समजलंय ना पक्कं  तुम्हांला? असं विचाराल्यासारखा तो सीन लांबवला होता. चित्रपटाचा नायक एक सरळमार्गी माणूस असल्यामुळे तो रितसर बाजारात जाऊन तिला साडी घेऊन येतो. आमचा एक डामरट मित्रं म्हणायचा, तुम्ही लेको  उगाच आर.के.ला नावं ठेवता. खरा सज्जन तो. बाईच्या पायाकडे बघणारा माणूस. साडी आणली. ब्लाउज आणला? कसा आणणार? साईझ कशी सांगणार तो? असो!

मला निश्चित माहित नाही कुठल्या भाषेतले शब्दं त्यात आहेत, बहुतेक ब्रज भाषेतले असावेत.  आपण बोलतो ती शुद्ध बाकी सगळ्या भाषा अशुद्ध असा आपला एक समज असतो. पण काही वेळेस हे क्वचित वापरले, कानावर पडणारे शब्दं जास्तं गोड लागतात. ह्या गाण्यातच बघ ना कारे कारे ऐवजी काले काले, बदरा ऐवजी बादल, रतिया ऐवजी रात, रैना, बिजुरी ऐवजी बिजली, छतिया ऐवजी सीना असे शब्दं टाकून म्हणून बघ, बेचव वाटतं गाणं. (असाच एक लोभस अशुद्धपणा 'दो हंसोका जोडा बिछड गयो रे' मधेही आहे). बघ ना, 'मेरा गोरा अंग ले ले' पेक्षा 'मोरा गोरा अंग लई ले' जास्तं गोड  वाटतं का  नाही? 

बोल्ड आणि अश्लील यांची सीमारेषा फार धुसर असते. पद्मिनी यात व्हल्गर वाटत नाही. शब्दं, सिच्युएशन, पाऊस, अंगावर फक्तं साडी, सगळं कसं पूरक होतं. पण एवढं असूनही गाणं चीप नाही. कालपर्यंत एकटी असल्याने स्वत:चा बचाव व्हावा म्हणून पुरुषाचा पेहराव करणारी, बिनधास्तं वागणारी मात्रं सत्यं उघडकीला आल्यावर पेचात पडलेली, पद्मिनी छान दिसते. मिनू मास्टरचं स्त्री रुपांतर मात्रं भन्नाटच होतं.  ती साडी नेसून बाहेर येते तेंव्हा, स्त्रीचा सगळ्यात  मोठ्ठा गुण 'लाज' तिच्या गोंडस गो-या चेह-यावर काय सुंदर दिसतो. तिच्या त्या मादक, कमनीय रूपानी बुचकळ्यात पडलेला, गोंधळलेला आर.के.पण  तेवढाच प्रशंसनीय आहे. विस्फारित नजरेनी त्याचं बघणं गरजेचंच होतं. नाहीतर पद्मिनीचा कायापालट ठसला नसता. न झेपणारं सत्यं समोर आल्यावर तो त्या घरातून निघतो. सुसाट वा-यापासून पदराला आवरणारी  पद्मिनी मस्तंच दिसली पण. 

मोठीशी भांडण  झाल्यामुळे यातली सगळी गाणी धाकटीच्या नशिबाला आली. तिनी गाण्याचं कितीही सोनं केलं असलं तरी नंतर आर.के.ते सोयिस्कररीत्या विसरला असणार. पत्रकार बनी रुबेननी त्याच्या आर. के.वरच्या पुस्तकात किंवा लेखात (चू.भू.दे.घे.) एका वाक्यात त्याच्या बद्दल सांगितलंय - ' त्यानी भावनांचा व्यापार केला आणि व्यापारात भावना आणली'. पद्मिनीला मादकपणा दाखवण्यासाठी शारीरिक हालचाली कराव्या लागल्या त्या आशाताईंनी नुसत्या गळ्यातून काढल्यात. ही बाई एक भन्नाटच आहे. पद्मिनीपेक्षा माझ्या लक्षात त्यांचा तो उसासाच राहिलाय.
 

जयंत विद्वांस

Monday 17 March 2014

Paw in the Bottle - James Hadley Chase

 Paw in the Bottle - James Hadley Chase
आज मी Paw in the Bottle बद्दल सांगणार आहे. अति तिथे माती, हव्यास वाईट असतो, जे मिळालंय त्यात समाधान मानावं, हातचं सोडून पळत्या पाठी जाऊ नये या सगळ्या उपदेशांचा अर्थ हे पुस्तक वाचलं की कळतो. नेहमीप्रमाणेच चेस बांधून ठेवतो. माणसांचे विविध नमुने तो पेश करतो. एकाच माणसात वाईटाबरोबरच कुठेतरी तीट लावावी एवढा चांगुलपणा असतोच हे तो इथेही सांगतो. 
ज्युली हॉलंड - कुठलाही आगा पिछा नसलेली, आजचा आज,  उद्याचा विचार उद्या असं जगण्याचं सूत्र असलेली. तिच्याकडे आकर्षक शरीर आहे, थोडंफार धाडस ही आहे. तिला फरच्या कोटांचं जबरदस्तं आकर्षण आहे. तिच्या लहानपणी तिला तिच्या लहान चोरीकरता सोडून दिलंय. त्यावेळी तिला एक माकडाची बोधकथा सांगितली गेली होती. जंगलात शिकारी माकडं पकडण्यासाठी एक मस्तं गंमत करतात. लहान तोंडाच्या बाटलीत दाणे ठेवतात. माकडच ते, पकडले जाणार हे माहित असलं तरी दाण्यांचा मोह सुटत नाही, हात बाटलीत राहतो आणि पकडला जातं. बोधकथा हा एक चेष्टेचा विषय आहे जो पर्यंत त्याच्या तात्पर्याशी आपली भेट होत नाही तोपर्यंत. म्हणी काय, बोधकथा काय, त्यांच्यात सार असतं. असो. 
Hary ग्लेब - कल किसने देखा, तारुण्यं उपभोगा, करतोय हे वाईट आहे, याची फळं कधी ना कधी भोगावी लागणार हे त्याला माहितीये. त्याचं Dana बरोबर लग्नं होणार आहे. तिची आई एक धूर्त, कावेबाज बाई आहे. जिचा त्यांच्या चांडाळ चौकडीवर वचक आहे. 
मि.आणि मिसेस वेस्ली - तो आंधळा आहे (काही प्रसंग वाचताना संजीवकुमारचा 'कत्लं', नसिरचा 'मोहरा' आठवतो). एका रिसर्च मधे गुंतलाय. बायको त्याच्या भागीदाराबरोबर संबंध ठेवून आहे. तिच्याकडे  चिक्कार फरकोट आहेत. दारू पिणे, नोकराणीला टिकू न देणे, मज्जा करणे ह्या  तिच्या आयुष्याच्या सुखाच्या कल्पना आहेत. 
वेस्लीनी त्याच्या अफाट मेंदूतून फरकोट आणि दागिने सुरक्षित रहावेत म्हणून कपाटात एक भन्नाट करामत करून ठेवली आहे. ते सगळे फरकोट ग्लेबला आणि त्यांच्या चौकडीला चोरायचेत. आत्तापर्यंत बरेच जण प्रयत्नं करून अपयशी ठरलेत. ती करामत समजावी म्हणून ज्युली हॉलंड तिथे घरकामाला जाते. मग चालू होतो रोलरकोस्टरचा प्रवास. टी-ट्वेंटी सामन्यात जसं पारडं सतत बाजू बदलतं तसं इथे होतं. आंधळा वेस्ली आणि ज्युली हॉलंड एकत्रं येतात. पुढचं  सांगण्यात मज्जा नाही. मग सस्पेन्स काय रहाणार. 
अनेक वळणं घेत पुस्तक संपत येतं. खरंतर सरतेशेवटी ज्युलीच्या मनाप्रमाणेच सगळं होतं. पण…… हा 'पण' मोठ्ठा वाईट आहे. मोह वाईट हे वाक्यं म्हणायला सोप्पं आहे. अधाशीपणा, हव्यास, अजून हवं  (म्हणजे नेमकं किती हे नाही ना राव सांगता येत. व्हिडीओकॉनचे मालक धूतसाहेबांनी मुलाला सांगितलं होतं - लक्षात ठेव पगार कितीही वाढला तरी नेहमी हजार रुपये कमी पडतात आणि घर कितीही मोठं बांधलं तरी  नेहमी एक खोली कमी पडते) पैसा, त्याला खर्च करून मिळणा-या वस्तू याला जेंव्हा सुख मानलं जातं त्यावेळी सारासार बुद्धी संपलेली असते, ख-या आनंदापेक्षा तकलादू, नकली आनंदाकडे माणसं धाव घेतात. 
ज्युलीचं नेमकं काय झालं? मी नाही सांगणार. पुस्तक वाचा. :)
..........
जयंत  विद्वांस 

Thursday 13 March 2014

लल्याची पत्रं (२) …. याराना

लल्यास….
मागचं पत्रं लिहून झालं आणि मग छायागीत लागल्यासारखी 'एका पाठोपाठ एक' गाणी ऐकू येऊ लागली. तेवढ्यात मला याराना (जुना) आठवला. जुन्या चित्रपटात ढिगभर गाणी असायची तेंव्हा असतील  सुद्धा लागोपाठ गाणी पण हल्ली नसतात. 'कट्यार काळजात घुसली' नाटकात अशीच एका पाठोपाठ एक गाणी आहेत. तो एक वेगळाच विषय आहे, त्यावर आत्ता नको. तर मूळ मुद्दा याराना अर्थात जुना.  नवीन  'याराना' मधे सगळाच चोरीचा मामला होता. कथा 'स्लीपिंग विथ द एनिमी' (त्यावरच 'अग्निसाक्षी' आणि 'दरार' पण होते. राज बब्बर, अरबाझ खान आणि नाना. काय होणार मग? नाना तो नानाच), नुसरत फतेह अली खानच्या गाण्यावरून मेरा पिया घर आया ओ रामजी, आर.डी.च्या  'कस्मे वादे' मधल्या 'कल क्या होगा किसको पता' वरून 'रब्बी रे रल्ली' अशी  दोन ओरिजिनल गाणी थोर वाद्यंवृंद संयोजक अन्नू मलिकने दिली होती. असो. 
 
तर 'याराना' मधे दोन गाणी एका पाठोपाठ येतात. ते फारसं लक्षात येत नाही कारण दोन्ही गाण्यांच्या स्वभावात विरोधाभास वाटावा एवढा फरक आहे. पहिलं अत्यंत हळूवार ' छू  कर मेरे मनको' आणि दुसरं  अगदी विरोधाभास असल्यासारखं  फास्ट ' सारा जमाना, हसिनोका दिवाना'. द्रविड गेल्यावर पिंच हिटर यावा तसं होतं बघ. द्रविडचा विसर पडतो. मला कायम हे साम्यं छळत आलंय. घाबरलेला, आयत्या क्षणी हत:प्रभ होऊ पहाणारा किशन उर्फ अमिताभ, त्याला त्या लेव्हल पर्यंत आणणारी कोमल उर्फ नीतूसिंह. तो स्टार झालेला तिला बघायचय, तो होणार या बाबतीत तिला प्रचंड आत्मविश्वास आहे. त्या रिकाम्या  स्टेडीअममधे उभे असलेले ते दोघेच जण आणि त्याचा अर्जुन झालेला. ती त्याला ताडताड बोलून निघते आणि मग त्या अंधा-या स्टेडीअममधे किशोरचं हमिंग चालू होतं. वा-याची झुळूक, मोरपिसाचा स्पर्श काय  शब्दात सांगता येत नाही तसा किशोरचा आवाज आहे या गाण्याला ' छू  कर मेरे मनको' - शब्दश: मनाला स्पर्श करणारा हळूवार.
 
तो म्हणतो, तू जो कहे जीवनभर, तेरे लिये मैं गाऊ (जुन्या 'अंदाज' मधे 'तू कहे अगर, मैं जीवनभर गीत सुनाता जाऊं' असं होतं. काळ बदलला पण भावना तीच राहिली बघ). मोजक्या शब्दात तो दिलासा देतोय, तू काळजी करू नकोस, एक दिवस माझ्या गाण्यांमधेच तुला जग शोधेल. त्याचा परत आलेला आत्मविश्वास पाहून नीतूसिंह लईच प्रेमानी बघते बघ. गाणं संपतं. इतका वेळ मोकळं असलेलं ते स्टेडीअम दणाणून जातं. अंगावर दिवे लावलेला, अंधारातपण गॉगल घातलेला अमिताभ 'सारा जमाना' म्हणत मोहित करतो. अमिताभ जे काही करतो ते आवडतंच त्यामुळे त्या स्टेप्स साध्या आहेत का? काय  वेगळेपण आहे त्या स्टेप्समधे? असले एरवी पडणारे प्रश्नं अजिबात पडत नाहीत. यशस्वी पुरुषामागची स्त्री त्या गाण्यात फक्तं स्टेप्स देते, लीप मूव्हमेंट सुद्धा नाहीत. सगळा प्रसिद्धी झोत काय तो त्याच्यावरच हवाय  तिला.   
 
आम्हांला बारावीला इ.ए.रोबीनसनची 'रिचर्ड कोरी' म्हणून एक भन्नाट कविता होती. त्यात त्याचं वर्णन करताना कवी एक शब्दं वापरतो - 'इम्पिरिअल स्लिम'. अंबरनाथचे धर्माधिकारी सर होते क्लासला  इंग्लिशला. त्यांनी त्याचा सांगितलेला अर्थ कवितेइतकाच डोक्यात फिट्ट बसलाय बघ. 'इम्पिरिअल स्लिम म्हणजे अमिताभ', तो हडकुळा नाही, जाडाही नाही, कमावलेल्या शरीराचा वगैरे पण  नाही, मग कसा आहे तो? तर तो 'इम्पिरिअल स्लिम' आहे. क्या बात. असे मास्तरलोक लहानपणापासून हवे होते. 
 
झारा घेऊन लग्नाची बुंदी पाडावी तशी घाऊक गाणी लिहिणा-या गीतकार समीरच्या वडिलांनी, अंजाननी लिहिली आहेत ही गाणी आणि संगीत होतं राजेश रोशनचं. 'छू कर' जेवढं हळूवार तेवढंच पुढचं फास्ट. दोन्ही  गाणी  आपापल्या जागी करमणूक करणारी, लक्षात रहाणारीच आहेत. खूप खूप गाणी आहेत खरं तर अजून शिल्लक. यावेळेला इथेच थांबतो. पुढच्या गाण्यापर्यंत ऐका 'छू कर मेरे मनको'. 
...........  
 
जयंत विद्वांस 
 
 
 

Monday 10 March 2014

The Dead Stay Dumb - James Hadley Chase

The Dead Stay Dumb - James Hadley Chase

चेस आणि सुहास शिरवळकर यांच्यात मला एक साम्यं नेहमीच वाटत आलंय. त्यांचं एखादं पुस्तक वाचून संपल्यावर फार काही हाती लागलं नाही हे जरी उमजलं तरी उगाच वाचलं, टुकार होतं असं काहीही  वाटत नाही. अर्थात प्रत्येक पुस्तक कसं आपल्या आवडीचं निघणार (Miss Shumway Waves a Wand मात्रं चेसनीच लिहिलय का हे वाटण्याइतपत यथातथाच होतं). कदाचित वाचक त्याचे ठोकताळे आधीच ठरवतो, मग त्यात त्याला हव्या  असलेल्या गोष्टी तो शोधतो, त्या नसतील तर मग त्याचा भ्रमनिरास होतो. उद्या  संपूर्ण सिनेमात अंगभर कपडे घालून वावरणारी आयटम गर्ल दिसली तर चुकल्यासारखंच वाटणार ना, तसंच. 

चेसचा हिरो आणि मुख्यं स्त्रीपात्रं वेगळं असतं दरवेळी ते एक बरं असतं. त्याचा अंदाज येईपर्यंत आपण गुंतलेलो असतो. आपण जे नाही ते आपल्याला वाचायला आवडतं. स्वप्नरंजनच आहे ते एक प्रकारचं. आपण पिस्तोल चालवू शकत नाही (हातातसुद्धा घ्यायला मिळण्याची शक्यता नाहीये इथे), गुंडांना, आडव्या येणा-या माणसांना थंड डोक्याने नेस्तनाबूत करणं, ज्यांची चित्रं चोरून बघावी लागतात अशा वर्णनाच्या बायकांनी आपल्यावर जीव  टाकणं वगैरे तर लांबच, ही सगळी स्वप्नं कदाचित आपण ही पुस्तकं वाचून पूर्ण करतो.

कुठल्याही माणसाला अंडरवर्ल्डचं आकर्षण असतंच. त्यात मिळणारा पैसा, सत्तेचा माज हे भीतीदायक असलं तरी त्याचं आकर्षण काही सुटत नाही. म्हणून तर त्यावर आधारित निघालेले सिनेमे चालतात. लोकांना परिंदाचा  अण्णा, बाजीगरचा शाहरुख आवडतो यात सगळं आलं. त्या नटाचा अभिनय आवडला हे मान्यं पण ती व्यक्तिरेखा ग्लोरिफाय होते हे वाईट आहे.  (म्हणूनच नानानी 'पुरुष'च्या गुलाबरावला टाळ्या  यायला  लागल्यावर नाटक सोडलं.)  चेस मला इथे जास्तं आवडतो. तो तुमच्यापुढे ठेवतो. सूचकतेने या सगळ्या वाईटाचा शेवट वाईटच होतो हे ही सांगतो. आपल्या स्वप्नांना फुटलेले पंख तो शांतपणे कापतो.
The Dead Stay  Dumb एक गुन्हेगारी विश्वाचं अंतरंग सांगणारी, वेग असलेली कथा आहे. थंड डोक्याचा, दारू, सिगरेट न पिणारा, कमी बोलणारा कुणालाही न घाबरणारा, बायकांना चार हात लांब ठेवणारा  डिल्लन कथा(खल)नायक आहे.  त्याच्याबरोबर पैशासाठी, शरीरसुखासाठी आसुसलेली मायरा होगन पळून येते. पळायच्या आधी  डिल्लननी तिच्या बापाला, आंधळ्या बूच होगनला तिच्यासमोरच गोळी घातलेली  आहे. तिचा प्रियकर निक गुर्नी पण त्यांच्याबरोबर पळतो. डिल्लन अतिशय धोकादायक आहे हे दोघांना दिसत असूनही ते चुंबक लावल्यासारखे त्याच्या बरोबर जातात. 
तिचा निकला हाताशी धरून डिल्लनला मारायचा बेत फसतो, उलट निकच त्यात मरतो. एवढं असूनही मायराला खंत वगैरे वाटत नाही. उलट ती डिल्लनच्या कलानी घेते. त्याला एक न एक दिवस आपण धडा शिकवूच असं स्वप्नं ती उराशी बाळगून आहे. डिल्लनला भुरट्या कमाईत रस नाहीये. त्याला आता मोठं व्हायचंय. मोठ्या शहरात दोघे जातात. तिथे फांक्विस्त आणि तिचा प्रियकर त्यांना मदत करतात. मेरा नाम जोकर मधे पद्मिनीचं कुत्र्याबाबतचं मत ऐकून जसा राजकपूर चमकतो तसे आपण इथे वारंवार चमकतो. पैशासाठी, सत्तेसाठी दल, गट बदलणारे जोडीदार इथे पावलोपावली सापडतात. अशीही माणसं असतात यावर आपला विश्वास नसेल तर तो हळूहळू बसतो. अतिनम्रतेनी, हसत हसत बोलणारी माणसं मला कायम धोकादायक वाटत आली आहेत. चेसच्या पुस्तकांचा हा ही एक  फायदाच आहे. माणसं कळतात. अमूक एक माणूस असं का वागला असावा हा विचार मला चेसनी दिला.

खालच्या पायरीवर असलेले डिल्लन आणि मायरा. एकावेळी २-३ पाय-या चढत घाईत जिना चढावा तसे, वरही जातात. ज्याच्याकडे तो कामाला असतो त्या हर्स्टला संपवतात. पण नेहमीप्रमाणे माशी शिंकते (ती चेस स्पेशल आहे, हमखास शिंकते) आणि मग सुरु होतो Survival of the fittest चा जीवघेणा खेळ. 'मारा आणि वाचलात तर जगा'  या एकाच पर्यायावर आयुष्यं येउन थांबतं. बुद्धिबळात  प्यादी जशी पहिली मरतात तसच इथेही होतं. मागावर असलेले पोलिस, त्यानी आलेली अस्वस्थता आणि संपवण्याची ताकद नसल्यामुळे शक्यतोवर लांबवलेलं जगणं. मायरा मरते, डिल्लनही मरतो, फक्त त-हा वेगळ्या. तर चेस हे एक व्यसन आहे आणि ते जोपासण्यात काही गैर नाहीये. :)
चल, पुढचं Paw In The Bottle आणि One Bright Summer Morning पण वाचून झालंय, त्यावर पुढच्या वेळेस, तोपर्यंत बाय. 
...........  
जयंत विद्वांस

Friday 7 March 2014

लल्याची पत्रं (१)…. प्यार हुआ इकरार हुआ

लल्यास….
आपण बरेच वेळा एखादं गाणं ऐकलं, आठवलं की बोललोय. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळेच प्रसंग घडतात असं काही नाही,  मग आपण जे घडलेलं नाही ते घडायला, अनुभवायला हवं होतं या अतृप्तं इच्छेला पुस्तकात, गाण्यात समान प्रसंग आला की रिलेट करतो. आज अशाच एका अजरामर गाण्याबद्दल बोलणार आहे तुझ्याशी.
गाणं तुला, मला काय सगळ्यांनाच मधल्या म्युझिक पिसेस सकट पाठ आहे. त्यामुळे शब्दं मी तुला सांगायची गरज नाही. तर गाणं आहे 'प्यार हुआ, इकरार हुआ'. फाटका राज कपूर, पडद्यावर आणि पडद्याबाहेर पण त्याच्या प्रेमात बुडालेली नर्गिस. केमिस्ट्री की काय म्हणतात ना ती या गाण्यात दिसते बघ. काय प्रेमानी ओथंबलेल्या चेह-यानी बघते ती संपूर्ण गाण्यात आर.के. कडे. स्त्रीची लाजरी, घाबरी मानसिकता आणि पुरुषाची बेफिकिरी शैलेंद्र काय सहज लिहून जातो.

मन्ना डे म्हणतो
प्रेम झालं, होकार झाला,  मग कशाला घाबरतेस? लता लाज-या आवाजात म्हणते, खरं आहे सगळं पण मन सावध आहे, ते बजावतंय, निघालीयेस खरी पण रस्ता अवघड आहे, जे स्वप्नं पहातीयेस ते अजून किती लांब आहे काय माहित. तो म्हणतो, आपलं प्रेमाचं  गाणं कधी  बदलणार नाही, म्हण असं तू. (किती लबाड जात आहे बघ, तिच्याकडून वचन हवं). मग ती ही म्हणते, तू पण म्हण, की शेवटपर्यंत सोबत हीच राहील. ती पण किती भाबडी आहे बघ , साथ सुटली, प्रेम संपलं तर चंद्र निस्तेज होईल म्हणते. दोघांच्या भावना एकच माणूस लिहितोय बघ. तुला गंमत सांगतो, जगात सोप्पं लिहिणं सगळ्यात अवघड आहे. शैलेंद्र ते सतत करायचा.   

प्रत्येक आईला आपलं मूल, डायरेक्टरला आपला चित्रपट आणि युगुलाला आपलं प्रेम हे नेहमीच सुंदर, जगावेगळं, हटके वाटतं. ती म्हणते, दाही दिशांना आपलीच कहाणी असेल. तो तिच्या एक पाऊल पुढे,  दिशा काय,  वेडे, पुढच्या तरुण पिढ्या आपलं गुणगान गातील म्हणतो.
लहान भावंडाचा हात धरून जाणारा शशी कपूर आणि त्या वेळच्या चपखल ओळी - मै ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेगी निशानियॉं.
हया गाण्यातला पाउस टिपलाय राघू कर्मकारनी, ब्लॅक/व्हाईट मधला सगळ्यात सुंदर पाउस (मोहे अंग लग जा बालमा चा मादक रंगीत पाऊस पण त्यांनीच टिपलाय), तो स्टुडिओ मधे टिपलाय हे सांगूनही खरं वाटत नाही इतका सुंदर. भाबडा राजकपूर (बनेल असून पण भाबडा वाटणारा) आणि चारचौघींसारखी आणि म्हणूनच आपली वाटणारी नर्गिस. त्यांच्याकडे निर्व्याज प्रेमानी, कौतुकानी बघणारा तो मिशाळ चहावाला,
सगळच् कसं न विसरण्यासारखं. शैलेंद्र नेहमीच साधं आणि म्हणूनच अतिशय गोड, आपल्या मनातलं लिहायचा. सोबतीला शंकर जयकिशन आणि गायला लता आणि मन्ना डे - दैवी कॉम्बिनेशन सगळं.

पावसात भिजवून नटीचं अंग दाखवणं गरजेचं आहे हे जेंव्हा राज कपूरला जरूरी वाटत नव्हतं तेंव्हाचं हे गाणं आणि कदाचित त्या मुळेच् अजरामर. भावी आयुष्याची स्वप्नं, तो आनंद, ती हूरहूर, साशंक मन या गाण्यात नर्गिसच्या चेह-यावर स्पष्टं दिसतं आणि सोबत अर्थवाही शब्दं. याला अभिनय म्हणतात, तो करावा लागत नाही. तो आनंदासारखा आतून चेह-यावर उमटतो. कितीही बोललो तरी उणंच रहाणार अशी ही गाणी.
आपली लिस्ट मोठ्ठी आहे, चल, पुढच्या गाण्यापर्यंत हेच गाणं म्हणायचं आता. तोपर्यंत बाय.

….....
जयंत विद्वांस 


Wednesday 5 March 2014

Trusted Like The Fox - James Hadley Chase

Trusted Like The Fox - James Hadley Chase

परवा आपण But A Short Time To Live वर वाचलं. आज अजून एका थ्रिलरची ओळख Trusted Like The Fox. चार पाच दिवसाच्या कालावधीत घडणा-या घटना इतका छोटा जीव आहे खरं तर या पुस्तकाचा. नेहमीप्रमाणे मनुष्यं स्वभावाचे विविध कंगोरे, बदलत जाणा-या भावना, परिस्थिती बदलल्यामुळे त्यात होणारे बदल आणि निर्माण होणारा हताशपणा. सगळं कसं नेहमीचं पण बांधून ठेवणारं. खूप धक्के बसले तर मग थ्रिलची मजा जाते. 'चेस'राव असलं काही करत नाही. तो हळू हळू, समजावत, पटवून देत आपल्याला कड्यावर नेतो. आपली संमती घेतो आणि मग ढकलतो.

ग्रेस क्लार्क : एक साधारण, फारसं रूप नसलेली मुलगी. पहिल्या महायुद्धात नर्सचं तिनी काम केलंय. एकटी आहे ती. पोटासाठी केलेल्या भुरट्या चोरीसाठी तिनी तुरुंगवारी ही केली आहे. आयुष्यात फक्तं हाल, तिरस्कार, भूक तिच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे कुणी तिरस्कार करत दोन घास दिले तरी ते तिला प्रिय आहेत. अचानक घडणा-या घटनांमुळे ती त्याबरोबर वहात जाते. तसंही थांबणं तिला शक्यंच नाहीये. तिची सद्सद्विवेकबुद्धी मात्रं जागृत आहे. आयुष्यातल्या एका शापित क्षणी तिची डेव्हिड एलिसशी गाठ पडते आणि मग सुरु होतो हातात स्टेअरिंग नसलेल्या, ब्रेक नसलेल्या आयुष्यंगाडीचा प्रवास. गाडी कसली, रोलरकोस्टर.

डेव्हिड एलिस : उर्फ एडविन कशमन, एक विकृत, खुनशी, चुक्कून सुद्धा चांगला विचार न करणारा, पहिल्या महायुद्धात देशद्रोह केलेला आणि त्यासाठी हवा असलेला गुन्हेगार. ज्याचा आवाज  रेडीओवर लोकांनी महायुद्धात सतत ऐकलाय आणि तो कुणीही ओळखू शकतो (मला अमिताभचा 'बेनाम' आठवला). छोट्या चणीच्या अशक्तं देहात क्रूरता आणि त्यासाठी लागणारी बुद्धी मात्रं मुबलक आहे. तो बाहेर एकटा जाऊ शकत नाही. बोलू शकत नाही. त्यामुळे आयती हातात आलेली ग्रेस क्लार्क त्याला येनकेन प्रकाराने ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. पण त्याच्या दुर्दैवाने त्याचा पाय मोडतो आणि त्याला तिच्यावर अवलंबून राहणं भाग पडतं. त्या दोघांना आश्रय देतो रिचर्ड क्रेन. त्याच्या घरात पुस्तक संपेपर्यंत तो उरलेला संपूर्ण काळ अंथरुणावर आहे. ('धुंद' मधला खुर्चीतला अपंग डयानी डेंगझोंपा आणि 'मजबूर' मधला जखमी प्राण असाच लक्षात आहे). प्रत्येक माणसात कुठेतरी चांगुलपणाचा अंश असतो. त्यामुळे त्याला ग्रेसबद्दल प्रेम वाटू लागतं आणि क्रेनपासून तिचा बचाव करायला हवा यासाठी तो शक्यं  ते सारे प्रयत्न करतो.

रिचर्ड क्रेन : एक सुखवस्तू, देखणा पण थंड डोक्यानी खून करणारा विकृत माणूस. एलिसचं गुपित त्याला ठाऊक आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच उपभोगायला मिळालेली श्रीमंती ग्रेसला उपभोगायला देताना त्यानी तिला कधीच खिशात टाकलंय.  एलीसला तो सतत त्याची पुढची स्टेप सांगतो आणि त्याचं जगणं काळजीयुक्तं करतो. तो त्याचा आनंद मिळवण्याचा एक भाग आहे. 

ग्रेसला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्नं करणारा, बदलत जाणारा, तिच्या बद्दल प्रेम उत्पन्न झालेला एलिस सुरेख उतरलाय पुस्तकात. हाच का तो माणूस, जो पहिल्या २/३ भागात होता असं वाटायला लागण्याइतपत. नेमकं काय होणार शेवटी याची ओढ मात्रं हे सगळं वाचताना लागतेच पण चेस त्या शेवटाकडे उगाच घाईगडबडीत जात नाही, आपल्याला नेत नाही. पटतील अशी कारणं देत तो सगळा ताण संपवतो. सगळ्यात भन्नाट काय तर क्रेन ग्रेसला मारणार आहे हे चेस आधीच सांगतो, मग सस्पेन्स काय त्यात? वाचलं की कळेल, तो प्रवास कसा दोरीवरून चालण्यासारखा आहे ते. ('बाजीगर'मधे काजोलचा रहस्याचा पाठलाग त्याच पद्धतीचा आहे, आपल्याला सगळं माहित असतं तरी खुर्चीत ताठ बसतोच आपण).

'Mission to Venice' वाचून झालं पण त्यावर लिहावं एवढी भन्नाट नाही. 'चेस'चे सगळे गुण आहेतच त्यात अर्थात. The Dead Stay  Dumb वाचतोय, त्यावर पुढच्या वेळेस. तो पर्यंत सायोनारा. 

जयंत विद्वांस