Monday 10 March 2014

The Dead Stay Dumb - James Hadley Chase

The Dead Stay Dumb - James Hadley Chase

चेस आणि सुहास शिरवळकर यांच्यात मला एक साम्यं नेहमीच वाटत आलंय. त्यांचं एखादं पुस्तक वाचून संपल्यावर फार काही हाती लागलं नाही हे जरी उमजलं तरी उगाच वाचलं, टुकार होतं असं काहीही  वाटत नाही. अर्थात प्रत्येक पुस्तक कसं आपल्या आवडीचं निघणार (Miss Shumway Waves a Wand मात्रं चेसनीच लिहिलय का हे वाटण्याइतपत यथातथाच होतं). कदाचित वाचक त्याचे ठोकताळे आधीच ठरवतो, मग त्यात त्याला हव्या  असलेल्या गोष्टी तो शोधतो, त्या नसतील तर मग त्याचा भ्रमनिरास होतो. उद्या  संपूर्ण सिनेमात अंगभर कपडे घालून वावरणारी आयटम गर्ल दिसली तर चुकल्यासारखंच वाटणार ना, तसंच. 

चेसचा हिरो आणि मुख्यं स्त्रीपात्रं वेगळं असतं दरवेळी ते एक बरं असतं. त्याचा अंदाज येईपर्यंत आपण गुंतलेलो असतो. आपण जे नाही ते आपल्याला वाचायला आवडतं. स्वप्नरंजनच आहे ते एक प्रकारचं. आपण पिस्तोल चालवू शकत नाही (हातातसुद्धा घ्यायला मिळण्याची शक्यता नाहीये इथे), गुंडांना, आडव्या येणा-या माणसांना थंड डोक्याने नेस्तनाबूत करणं, ज्यांची चित्रं चोरून बघावी लागतात अशा वर्णनाच्या बायकांनी आपल्यावर जीव  टाकणं वगैरे तर लांबच, ही सगळी स्वप्नं कदाचित आपण ही पुस्तकं वाचून पूर्ण करतो.

कुठल्याही माणसाला अंडरवर्ल्डचं आकर्षण असतंच. त्यात मिळणारा पैसा, सत्तेचा माज हे भीतीदायक असलं तरी त्याचं आकर्षण काही सुटत नाही. म्हणून तर त्यावर आधारित निघालेले सिनेमे चालतात. लोकांना परिंदाचा  अण्णा, बाजीगरचा शाहरुख आवडतो यात सगळं आलं. त्या नटाचा अभिनय आवडला हे मान्यं पण ती व्यक्तिरेखा ग्लोरिफाय होते हे वाईट आहे.  (म्हणूनच नानानी 'पुरुष'च्या गुलाबरावला टाळ्या  यायला  लागल्यावर नाटक सोडलं.)  चेस मला इथे जास्तं आवडतो. तो तुमच्यापुढे ठेवतो. सूचकतेने या सगळ्या वाईटाचा शेवट वाईटच होतो हे ही सांगतो. आपल्या स्वप्नांना फुटलेले पंख तो शांतपणे कापतो.
The Dead Stay  Dumb एक गुन्हेगारी विश्वाचं अंतरंग सांगणारी, वेग असलेली कथा आहे. थंड डोक्याचा, दारू, सिगरेट न पिणारा, कमी बोलणारा कुणालाही न घाबरणारा, बायकांना चार हात लांब ठेवणारा  डिल्लन कथा(खल)नायक आहे.  त्याच्याबरोबर पैशासाठी, शरीरसुखासाठी आसुसलेली मायरा होगन पळून येते. पळायच्या आधी  डिल्लननी तिच्या बापाला, आंधळ्या बूच होगनला तिच्यासमोरच गोळी घातलेली  आहे. तिचा प्रियकर निक गुर्नी पण त्यांच्याबरोबर पळतो. डिल्लन अतिशय धोकादायक आहे हे दोघांना दिसत असूनही ते चुंबक लावल्यासारखे त्याच्या बरोबर जातात. 
तिचा निकला हाताशी धरून डिल्लनला मारायचा बेत फसतो, उलट निकच त्यात मरतो. एवढं असूनही मायराला खंत वगैरे वाटत नाही. उलट ती डिल्लनच्या कलानी घेते. त्याला एक न एक दिवस आपण धडा शिकवूच असं स्वप्नं ती उराशी बाळगून आहे. डिल्लनला भुरट्या कमाईत रस नाहीये. त्याला आता मोठं व्हायचंय. मोठ्या शहरात दोघे जातात. तिथे फांक्विस्त आणि तिचा प्रियकर त्यांना मदत करतात. मेरा नाम जोकर मधे पद्मिनीचं कुत्र्याबाबतचं मत ऐकून जसा राजकपूर चमकतो तसे आपण इथे वारंवार चमकतो. पैशासाठी, सत्तेसाठी दल, गट बदलणारे जोडीदार इथे पावलोपावली सापडतात. अशीही माणसं असतात यावर आपला विश्वास नसेल तर तो हळूहळू बसतो. अतिनम्रतेनी, हसत हसत बोलणारी माणसं मला कायम धोकादायक वाटत आली आहेत. चेसच्या पुस्तकांचा हा ही एक  फायदाच आहे. माणसं कळतात. अमूक एक माणूस असं का वागला असावा हा विचार मला चेसनी दिला.

खालच्या पायरीवर असलेले डिल्लन आणि मायरा. एकावेळी २-३ पाय-या चढत घाईत जिना चढावा तसे, वरही जातात. ज्याच्याकडे तो कामाला असतो त्या हर्स्टला संपवतात. पण नेहमीप्रमाणे माशी शिंकते (ती चेस स्पेशल आहे, हमखास शिंकते) आणि मग सुरु होतो Survival of the fittest चा जीवघेणा खेळ. 'मारा आणि वाचलात तर जगा'  या एकाच पर्यायावर आयुष्यं येउन थांबतं. बुद्धिबळात  प्यादी जशी पहिली मरतात तसच इथेही होतं. मागावर असलेले पोलिस, त्यानी आलेली अस्वस्थता आणि संपवण्याची ताकद नसल्यामुळे शक्यतोवर लांबवलेलं जगणं. मायरा मरते, डिल्लनही मरतो, फक्त त-हा वेगळ्या. तर चेस हे एक व्यसन आहे आणि ते जोपासण्यात काही गैर नाहीये. :)
चल, पुढचं Paw In The Bottle आणि One Bright Summer Morning पण वाचून झालंय, त्यावर पुढच्या वेळेस, तोपर्यंत बाय. 
...........  
जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment