Thursday 26 February 2015

गांधीहत्या….

त्यांना नावं ठेवणे किंवा त्यांची बाजू घेणे एवढं ज्ञान मला नाही कारण एक तर तो कालावधी आपण अनुभवलेला नाही. जी काय माहिती आहे ती वाचून किंवा ऐकून मिळालेली आहे. त्याची सत्यासत्यता हा नेहमीच वादाचा विषय आहे, राहील. त्यामुळे माझी मतं त्यावर आधारित असतील.

मुळात हिंदू, भारतीय किंवा गेली तीनेकशे वर्ष इथे रहाणारे लोक सहिष्णू आहेत. एकमेकात भांडण करणं वेगळं आणि कुरापत काढून किंवा आक्रमण करून लढणं वेगळं. ते आपल्या रक्तात नाही. आपल्याकडे घराची वाटणी करताना सुद्धा भांडणं टाळण्याकडे कल त्यामुळेच असावा. वादविवाद न करता मार्ग तर काढायचा पण जाताजाता ठपका ठेवायला मिळालं तर माणूस शोधायचा हा एक गुण आपल्यात आहे. तर नमनाला किलो दोन किलो महागडं सफोला घालवून विषयावर येतो.

पाकिस्तानच्या फाळणीला एकटे गांधी जबाबदार नव्हते. गांधीच्या दोन बहुमुल्यं सुचना नेहेमी दुर्लक्षित राहिल्या, त्यातली दुसरी सहज शक्यं होती पण अंमलात आणायचं धाडस नव्हतं :-

१) इकडचे मुस्लिम तिकडे आणि तिकडचे हिंदू इकडे - हे शक्यं नव्हतं,  आपलं जन्मस्थान सोडताना सगळं उचलून दुसरीकडे कोण जाईल? त्यांना इथे सामावून घेतलं जाईल का? त्याची काही योजना होती का? इथून तिकडे गेलेले मुसलमान उपरे किंवा मुहाजिर समजले जातात तीच गत हिंदूंची झाली असती का?
२) स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस बरखास्त करावी. स्वातंत्र्य मिळवून दिल्याचं श्रेयं दवडणं नेहरूंना झेपलं नसतं हा एक भाग आणि गांधींची हतबलता.
कुठलीही गोष्टं अचानक घडत नाही, बरंच काही साठून येतं आणि मग उद्रेक होतो. गांधींची हत्या ही अचानक झालेली गोष्टं नाही. टिळक अकाली गेले, सुभाषबाबू गूढ कायम आहे आणि सावरकर आक्रमक होते पण भारतभर पाठीराखे नव्हते. आपण आक्रमक असतो तर कदाचित स्वातंत्र्य आधीच मिळालं असतं आणि गांधींचा फार झालाही नसता. इंग्रजांना गांधी परवडणारे होते कारण ते हिंसा, आक्रमण याला अनुकूल नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी किंवा त्यांच्याशीच बोलणं त्यांच्या फायद्याचं होतं. त्यामुळे तारणहार, मध्यस्थ किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योग्यं व्यक्ती म्हणजे गांधी हे लोकांच्या मनावर ठसलं. त्यामुळे त्यांना देवत्वं प्राप्तं होणं साहजिक होतं. गांधीनी उपास केला की प्रेमापोटी लोक घरी उपास करायचे. 

अशा गांधींनी फाळणीला परवानगी द्यावी हा लोकांना धक्का होता. (दिवार आठवतो मला कायम, आत जातानाचा लीडर सत्येन कप्पू आणि  बाहेर आल्यानंतरचा हताश बाप). असं काय कारण होतं हो म्हणायला हे लोकांना समजावलं गेलं नसावं किंवा पटलं नसावं. गांधींचं मुसलमान धार्जिणेपण अनेकवेळा लोकांनी पाहिलं. 'पहिल्या महायुद्धात मदत घ्या त्याबदल्यात स्वातंत्र्य द्या' या प्रस्तावाला त्यांनी केलेल्या विरोधामुळे स्वातंत्र्य तीसेक वर्ष पुढे गेलं (मिळालं असतं तर तेंव्हा तर काय मोठे दिवे लावणार हा भाग वेगळा) याचा राग होता. अडचणीत असताना अशी मागणी करणं योग्यं नाही ते त्यांचं म्हणणं होतं. असा पराकोटीचा लोकधार्जिणेपणा चीड आणणाराच होता. पाकिस्तानला पन्नास/पंचावन्न कोटी देणे हा दुसरा रागाचा मुद्दा होता आणि नौखालीत हिदुंच्या कत्तलीनंतर त्यांनी अवाक्षरही काढलं नाही हा तिसरा मुद्दा होता.
या सगळ्या घटनांचा उद्रेक कधीतरी होणं स्वाभाविक होतं. तो झाला. तो समर्थनीय आहे, नाही हे व्यक्तिपरत्वे मत बदलत रहाणार. गोपाळ गोडसेंचा नातू अजिंक्य गोडसे ८४ला माझ्या वर्गात होता अकरावीला. त्याच्या घरी त्यानी मला नेउन त्यांचा अविसर्जीत अस्थीकलश दाखवलाय. आता त्या हत्येचं समर्थन किंवा निंदा करणं हे माझ्या मते आफ्टर थौट आहेत. हत्येनंतर ब्राम्हणांना जे भोगायला लागलं ती चीड पिढ्यांपिढ्या हस्तांतरित झाली. त्यांनी खतपाणी घालून ती विषवल्ली वाढवली कारण सूड तर घ्यायचाय पण कुणावर घेणार याची फळं आहेत ती. 

--------------------------

अवांतर :

मला एक प्रश्नं पडतो नेहमी. मधुबाला जगली असती सत्तरी पर्यंत तर तिचं सौंदर्य बघणीय राहिलं असतं का? लैला-मजनू, हीर-रांझा या आणि अशा इतर जोड्यांचं लग्नं झालं असतं तर ते सुखाने नांदले असते का? गांधी जगले असते तर राष्ट्रपिता झाले असते का? त्यांना मरून मिळालेली किंमत जगून मिळाली असती का?       

आपण फार भावनिक (मुर्ख खरंतर) आहोत. ब-याच गोष्टींची आपण सरमिसळ करतो. स्वच्छ चारित्र्यं आणि सत्ता राबवता येणं या दोन भिन्नं गोष्टी आहेत. स्वातंत्र्यं मिळवायचच या भावनेनी एकत्रं आलेल्या लोकांचा समुदाय आणि त्यांचे प्रांतिक नेते हीच अवस्था होती. यात दूरदृष्टी किंवा पुढे काय करायचं नेमकं असा क्लिअर प्लान कुणाच्या डोक्यात असेल असं वाटत नाही मला तरी.


-- जयंत विद्वांस 

Wednesday 25 February 2015

वन्स अपॉन अ टाईम (११).....

वन्स अपॉन अ टाईम (९) वर मिलिंद जोशींनी मायकेल बेव्हनचा उल्लेख केला होता कॉमेंटमधे. मायकेल बेव्हन, आपला राहुल द्रविड, झेक इव्हान लेंडल यांच्या पत्रिका एकसारख्याच असणार. यांच्या आयुष्यात निखळ कौतूक कमी आणि अपेक्षांचं ओझं जास्ती. इमानेइतबारे जबाबदा-या पार पाडायच्या हा यांचा स्वभाव. फार प्रसिद्धी मिळो न मिळो, कौतुक होवो न होवो, आपलं काम काळजी घेत, चोख करत रहायचं पु.लंच्या नारायणासारखं. अशा लोकांची नावं पटकन विसरली जातात. लक्ष्मणनी २८१ केल्यात म्हणून तरी त्याचं नाव निघेल नाहीतर तो ही समान पत्रिकेचा. २००३ च्या वर्ल्ड कपला लक्ष्मणला डावलून दिनेश मोंगिया का खेळला याचं उत्तर मिळणार नाही, त्याच्या नशिबात नव्हतं एवढंच खरं. राग मोंगियाचा नाही आपल्या मतलबी वृत्तीचा आहे. आपण फार लवकर चांगल्या गोष्टी विसरतो आणि वाईट, विसरण्याच्या लायकीच्या मात्रं मेंदूत स्वतंत्र कप्प्यात कसोशीने जपतो.

बेव्हन हा अत्यंत मेहनती माणूस होता. कर्मकांडावर श्रद्धा असलेला, एकेक करीत कधी तिशी गाठायचा कळायचं नाही, उगाच मारहाण नाही करायचा, मारेन तर फोरच नाहीतर राहीन उपाशी असला माज नाही, मध्यमवर्गीय माणूस, कुटुंबासाठी रुपया रुपया साठवल्यासारखं सेव्ह करणारा. तो चायनामन पण टाकायचा. फिल्डिंग करताना बॉल अडवण्यासाठी फिल्डिंग करायचा. क्यामेरासाठी उगाच क्याच पूर्ण झाल्यावर कोलांट्याउड्या वगैरे नाहीत. धोनीचा फिनिशर म्हणून आज गवगवा असेल पण बेव्हन त्याचा पूर्वज आहे. शांतपणे आत्मविश्वासानी तो म्याच काढायचा. एक मासिकात मी वाचलं होतं. सराव करताना कोच रनिंग बिटवीन द विकेटसाठी टायमर लावायचा, बेव्हन सगळ्यात फास्ट होता ते सुद्धा सिंगल काढताना नाही, तीन पळताना. त्या कोचच्या म्हणण्यानुसार केवळ ह्या आणि फिनिशर या गुणासाठी तो संघात राहील.

पाचव्या सहाव्या क्रमांकावर तुम्ही फलंदाजीला येता तेंव्हा तुम्ही किती रन केलेत हे कुणी लक्षात ठेवत नाही. किती चेंडूत केले हे महत्वाचं असतं (नंतर ते ही कुणी लक्षात नाही ठेवत म्हणा). शेवटच्या चार पाच षटकात रन जमवा, लवकर आउट झालात खा शिव्या, मारल्या त्यांनी ४०-४५ तर उद्याच्या पेपरात जास्तीत जास्ती दोन तीन ओळीत उल्लेख संपतो, म्याच जिंकलात तर म्यान ऑफ द म्याच वरती ७०+ रन करणा-याला किंवा ३-४ विकेट काढणा-याला, हे पाचवे, सहावे खेळणारे म्हणजे सवतीची पोरं. आश्रितासारखे वागवतात यांना. बरं यांच्या जागेवर हक्कं सांगायला शहाजहानच्या मरणाची वाट बघणारे औरंगजेब रांगेत उभे असतात, जगावं तरी कसं या माणसांनी.

ऑस्ट्रेलियानी आत्तापर्यंत सगळ्यात जास्ती वेळा वर्ल्डकप जिंकलाय, त्यापैकी ९९ आणि २००३च्या टीमचा बेव्हन सदस्य होता. पण पोंटिंग, स्टीव्ह वा, वार्न यांच्यापुढे बिचारा बेव्हन कोण लक्षात ठेवणार. अंतिम विजेता माणसाच्या नेहमी लक्षात रहातो. २००३च्या इंग्लंड विरुद्धच्या म्याचला ऑस्ट्रेलिया ४/४८ अशा संपन्न अवस्थेत असताना तो खेळायला आला. ८/१३५ असताना बिकेल त्याच्या सोबतीला आला. जिंकायला अजून ७० हव्या होत्या. शेवटच्या ओव्हरला बेव्हननी म्याच काढून दिली त्यांना, तो ७१ आणि बिकेल ३४. सुपर सिक्सला पण न्यूझीलंड विरुद्ध हीच सशक्तं अवस्था होती. ऑस्ट्रेलिया ७/८४ परत एकदा बेव्हन ५६ आणि सोबतीला बिकेलला घेऊन त्यानी नैय्या पार लावली. फायनलला पोंटिंगनी हाणला तुफान आपल्याला आणि याला फलंदाजीला यायची वेळ आलीच नाही.

समान व्यसनेषु समान सख्यम असं म्हणतात. जगात डावलले गेलेले, गुणवत्ता असून मागे राहिलेले जास्ती असतात त्यामुळे तुझी आणि तुझ्यासारख्या इतरांची आठवण कुणी ना कुणी काढत रहाणार बघ. दहीहंडी फोडताना सगळ्यांचं लक्ष सगळ्यात वरती उभ्या असलेल्या माणसाकडे असतं, एकदा हंडी फुटली की लोक पाया, मधले स्तर विसरतात हे मात्रं चिरंतन सत्यं. बेव्हन, तू म्हणजे खालचा थर, वर उभ्या असलेल्या माणसाला भक्कम पाया देणारा, 'मी आहे मागे' असा आत्मविश्वास देणारा त्यामुळे कायम 'मागे' रहाणारा.

--जयंत विद्वांस  



Saturday 21 February 2015

स्पर्शात्मा.....


माणूस हरवलेल्या क्षणांना शोधू लागला की तो हळवा होतो. संगीत ही नेहमी आनंददायक गोष्टं आहे. त्याचा आस्वाद घेताना वय, शिक्षण, जात, धर्म आड येत नाही. शास्त्रीय संगीत सगळ्यांनाच कळतं असं नाही पण तरीही कुठल्यातरी दैवी अनुभूतीने माना डोलतात, चित्तं प्रसन्न होतं, आनंद मिळतो, तो मनात रेंगाळतो. माणसाला सुख मिळालं की त्याला त्याच्या पुनरावृत्तीची ओढ लागते. मग ते शारीरिक, बौद्धिक वा मानसिक सुख असो. संगीत हे असं एकमेव सुख असावं की ज्यात शरीर थकल्यानी ते भोगताना अटकाव येत नाही (बहिरा असेल तर? हा न्युसंस व्हयाल्यूचा प्रश्नं धरावा). देव जसा दाखवता येत नाही पण त्याचं अस्तित्व आपण मान्य करतो तसंच संगीत. एखाद्या गायकाच्या अमुक एक गाण्यात या जागी मला २०० मिलीग्राम आनंद मिळाला असं नाही दाखवता येत. अव्यक्तं आनंद, सदिच्छा, आशीर्वाद नेहमी ताकदवान आणि अमर्याद असतात. प्रत्येक पिढीच्या आवडीनुसार संगीतातल्या थोर व्यक्ति बदलत जातात. पण भीमसेन, किशोरीताई, शोभा गुर्टू, जसराज, अभिषेकी, मन्सूर आणि असे बरेच काही चिरंतन आहेत.

मागे एका मासिकात की पुस्तकात वाचलेलं. १९७७ ला अमेरिकेनी एक यान अवकाशात परग्रहावरची जीवसृष्टी शोधण्यासाठी सोडून दिलं, जे परत येणार नाही. पृथ्वीवरचे काही सुमधुर आवाज त्यांनी रेकॉर्ड करून त्यात ठेवलेत. ज्याला कुणाला सापडेल आणि ते जर प्रगत असतील तर ते कसे ऐकायचे हे त्यांना कळेल किंवा ते शोध लावतील. भारताच्या केसरबाई केरकरांची भैरवी त्यात घेतलीये. त्यांच्या कल्पना शक्तीला सलाम आहे. मला एक सत्यात नं येणारं स्वप्नं पडतं. जर ते यान देवलोकात पोचलं तर? कुणीतरी ती रेकॉर्ड लावेल आणि ती भैरवी ऐकून अल्लादियाखां पटकन म्हणतील ए केसर, तुझं गाणं लागलंय बघ, मी तुला कायम म्हणतो ना तुझ्या कोमल रिषभात आणि गंधारात डोळ्यात पाणी आणायची ताकद आहे त्याचा हा पुरावा आहे.

संगीताला भाषेची गरज नसते हेच खरं. जो कुणी परग्रहवासी असेल तो जर ते ऐकू शकला तर त्याला काही देणंघेणं नसेल, भाषा कुठली, राग कुठला, स्केल कोणती आहे, कुठल्या देशातला किंवा कुठल्या ग्रहावरचा आहे. यातली काहीही माहिती नसताना तो जर डोलू लागला, भारावला, आतून मोहरून गेला तर काय सांगावं. कुठून आले हे स्वर? शोध घेतलाच पाहिजे म्हणून ते आपल्यापेक्षा प्रगत असतील तर निघतील पण शोधायला. राहतील इथेच, इथलं चांगलं काही घेऊन जातील, त्यांचं आणतील. आपल्याला अज्ञात असलेलं त्यांच्याकडे असू शकतं. डोळे मिटेपर्यंत हे असलं काही होणार नाही पण कल्पना करायला काय हरकत आहे. 


सकाळी सकाळी एखादं गाणं किंवा ओळ कानावर पडते आणि दिवसभर आपण  गुणगुणत रहातो. ज्योतिषशास्त्रानुसार नेपच्यून ग्रह आपल्या राशीत असेल तर तसं होतं असं वाचलंय. तो सदानकदा माझ्या राशीत असावा असंच मला वाटतं. पण खरं सांगू का नेपच्यून असो नसो, आपल्याला कधी प्रसन्न वाटलं, कुठूनशा आलेल्या सुरांनी आठवणी जाग्या झाल्या, अंगावर काटा आला, डोळ्यात ओल आली तर समजायचं कुण्या दिग्गजाचा आत्मा रियाझ करता करता आपल्याला स्पर्शून गेलाय असं.   

(व्हाटसप वर खर्डेघाशी ग्रुपवर मुकुंद भोकरकरांची पोस्ट होती आणि त्यावर शैलेश कुलकर्णींची दमदार कॉमेंट होती, त्यावरून सुचलं हे)
--जयंत विद्वांस




Thursday 19 February 2015

वन्स अपॉन अ टाईम (१०).....

हरियाणाहून तो मुंबईला शिबिरासाठी आला होता फास्ट बोलिंगच्या. इकडच्या मुलांना झेपेल असा ब्रेकफास्ट दिलेला सगळ्यांना, एक ग्लास दुध वगैरे होतं त्यात. यानी पहिल्याच दिवशी राडा केला.  बाकीची मुलं जेवायची तेवढा हा नाश्ता करायचा. तांब्यानी दुध पिण्याची सवय असणार, ग्लासनी काय होणार त्याचं. सगळ्यांनी त्याची चेष्टा केली कारण फास्ट बॉलर हा आपल्याकडे प्रकार अस्तित्वात नव्हता खूप काळ. त्यानी सुरवात केली. दगडी खेळपट्ट्यांवर पण विकेट घेऊन दाखवल्या अनफिट न होता, समोरून दुसरा वेगवान गोलंदाज असता ना त्यावेळेस तर काय धमाल आली असती. पाकिस्तान आणि विंडीजच्या जोडीला आपण असतो. एक दौरा आठवतोय मला पाकिस्तान आलेलं आपल्याकडे, सर्फराज नवाझ, सिकंदर बख्त, इम्रान आणि कादिर. एकाचढ एक. आपल्याकडे हा फक्तं तरी पण लढला, कच न खाता. 

८३ चा वर्ल्डकप. सेमीत जाण्यासाठी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाला हरवणं गरजेचंच होतं. हायलाईटसमधे पटापट विकेट्स दाखवतात तशा सामन्यात आपल्या विकेट पडलेल्या. यशपाल आउट झाला तेंव्हा ५/१७ असा नेत्रदिपक स्कोअर होता आपला. इंग्लिश क्रिकेट मंडळानी बहुतेक आपली निघायची तिकीट पण बुक केली असतील. पण माणूसच येडा ना हा. किरमाणी आला तेंव्हा ८/१४० होता आपला स्कोअर. या पठ्ठ्यानी १३८ चेंडूत १७५ कुटल्या. केवळ त्या भन्नाट खेळीमुळे आपण सेमीला गेलो आणि नंतर इतिहास झाला. बीबीसीच्या स्ट्राईक मुळे त्या सामन्याचं चित्रीकरण उलपब्धं नाही. त्याचा रेकॉर्ड सैद अन्वरनी रनर घेऊन का होईना पण तोडला नंतर.


साल १९९०, लॉर्डस, गुचनी आधीच ३३३ हाणलेल्या, आपल्याला फॉलोऑन वाचवायला चोवीस हव्यात, आपले नऊ आउट, समोर नरेंद्र हिरवाणी, पुढची ओव्हर अंगस फ्रेझरची. दात आणि आत्मविश्वास पुढे असलेला एक येडा माणूस समोर उभा, गोलंदाज एडी हेमिंगज्. शाळेत लहानपणी शिकलेला सोप्पा गुणाकार त्याला आठवला. साही चोक चोवीस. सलग चारवेळा लोंगऑफ किंवा लोंग ऑनवरून फिल्डर असतानाही हाय जंप, एक जरी त्यातला पकडला असता तर आयुष्यभर चेतन शर्मा सारखा डाग घेऊन हिंडला असता. फॉलोऑन वाचला. पुढच्या षटकात फ्रेझरच्या पहिल्याच चेंडूवर वयात आलेल्या मुलीचा पाय घसरायची जेवढी ग्यारंटी असते त्याप्रमाणे हिरवाणी एल.बी. डब्ल्यू.झाला. सगळ्यात महत्वाचं असं की तो सामना त्या चोवीस धावांमुळे अनिर्णित राहिला. उगाच शेवटच्या चेंडूवर मी धाव घेईन मग पुढची ओव्हर मीच खेळेन वगैरे कॅल्क्युलेशन्स करणे हे त्याला जमलंच नसतं नाहीतरी.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होता. आपली धावसंख्या नेहमीप्रमाणे हरण्याच्या लायकीचीच होती. नेमका याचा गुडघा दुखावला होता. त्यानी गुडघ्यात इंजेक्शन्स घेऊन पाच विकेट काढल्या तरीही आपण हरलो, वनडेला तीन स्लीप, गली लावून टाकत होता इतका आत्मविश्वास त्याला त्याच्या आउटस्विंगरवर. मर्यादित स्पीड पण आउट स्विंग आणि इनस्विंगिंग यॉर्कर टाकायचा तो.  झहीर अब्बासला हमखास एल.बी. करायचा. आक्रमण हाच उत्तम बचाव हे त्याचं सूत्रं होतं. अनफिट आहे म्हणून त्याचा एकही सामना हुकलेला नाही. चारशे विकेट (४३४) आणि पाच हजार धावा करणारा तो एकमेव आहे. रडतखडत त्यानी ह्याड्लीला मागे टाकलं तेंव्हा खूप वाईट वाटलं होतं. श्रीनाथ, कुंबळे त्यांना विकेट पडू नये यासाठी बाहेर चेंडू टाकत होते. सरतेशेवटी तिलकरत्नेच आउट झाला बहुतेक कंटाळून.

मोडेलिंग, कमेंट्री अशा न जमणा -या गोष्टीही त्यानी करून पाहिल्या. त्याला मुलगीही खूप उशीरा - लग्नानंतर जवळजवळ सोळा वर्षांनी - झाली पण त्यानी आपलं कुटुंब प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. टेस्ट क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा, ट्वेंटी ट्वेंटीला कमेंट्री करताना नाईलाज असल्यामुळे आडव्या ब्याटनी मारलेल्या अशास्त्रीय षटकार, चौकाराचं कवतिक करणारा, मनोज प्रभाकरच्या खोट्या आरोपांनी व्यथित झाल्यावर चारचौघात रडणारा (त्याच्यावरचा आरोप खरा आहे किंवा शंकेला वाव आहे असं कुणीही म्हणालं नाही इतका तो चोख होता) तो एक जिगरबाज सभ्यं माणूस आहे. पापे, पामोलिव्ह और तेरा सच में जवाब नही!

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (९).....

वन्स अपॉन अ टाईम (८) मधे उल्लेख केलेला दुसरा हरहुन्नरी माणूस म्हणजे लान्स क्लुजनर. काहीवेळेस आपल्याला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू डोक्यात बसतात किंवा काही आवडूनही जातात. क्लुजनर दुस-या कॅटेगरीतला.  हा देखणा अष्टपैलू मला जाम आवडायचा. माणूस रेकॉर्ड करता खेळतोय की स्वत: आनंद लुटतोय वर दुस-यालाही देतोय हे बघणा-याला कळतं. आपल्या पिढीनी बघितलेल्या दिग्गजांमध्ये रिचर्डस, लारा, गॉवर, इम्रानखान, वाल्श, अम्ब्रोज, अरविंदा डिसिल्वा, गिलख्रिस्ट आणि असे अनेक या कॅटेगरीत होते. क्लुजनर त्यापैकी एक. गोरापान, सहा फुटाच्या आसपास आणि खेळाडूची शरीरयष्टी असलेला तो एक देखणा खेळाडू होता. काही हिरोइनस आणि क्रिकेटियर यांच्यात मला नेहमी एक गंमतीशीर साम्यं आढळलंय. काही जण फिगरनी (आकड्यांनी) ओळखले जातात काहीजण प्रेझेन्सचा किती आनंद देतात यावरून.

भारतात कलकत्त्याला झालेला सामना मला आठवतोय. त्याला अझहरनी धुतला होता, सलग पाच बाऊन्ड्री मारलेल्या त्याला. एक तर माझ्या अजून लक्षात आहे. लेगवर अल्मोस्ट यॉर्कर, अझहर खेळता खेळता कोलमडला पण फाईन लेगला चौकार गेला हे कळायला फार उशीर झाला होता. त्याच्या वेगाचा अंदाज आला त्यामुळे. पण तो काही जन्मत:च पडलेल्या चेह-याचा भारतीय गोलंदाज नव्हता (श्रीनाथ, प्रसाद आठवतात? प्रदीपकुमार, भारत भूषणच हे क्रिकेटचे, कायम मख्ख) त्यामुळे सर्वस्वं लुटलं गेल्यासारखा, जवळचा जिवाभावाचा माणूस गेल्यासारखा, आता सगळं संपलं असा चेहरा वगैरे नव्हता झाला त्याचा. जेन्युईन फास्ट बोलर कोण? ज्याला मार पडल्यावर जो चेहरा टाकत नाही, शिव्याही देत नाही पण कपाळावरची नस फुगलीये, डोळ्यात खुन्नस आणि जो पुढचा चेंडू अजून त्वेषानी टाकतो, अनप्लेएबल किंवा बोटं फुटतील असा मुळाशी घाव घातल्यासारखा हुकमी यॉर्कर टाकतो तो. तुम्ही स्टेनला बघा, परफेक्ट माणूस (याच्यावर परत कधीतरी). लान्स तसा होता. जिगरबाज, दुस-या डावात ८/६४ काढणारा.     

माणसाला कितीही यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली तरी एखादी गोष्टं राहून जातेच. त्याच्या यशोगाथेपेक्षा ती चुटपूट लावणारी गोष्टं त्याच्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करणा-या माणसांच्या चिरंतन लक्षात रहाते. ब्रॅडमनला शेवटच्या डावात चार धावा काढता आल्या असत्या तर? अपुर्णतेत मजा असते म्हणतात. न वाजलेल्या सुरावटी वाजणा -या सुरावटींपेक्षा जास्ती आर्त असतात.मरेपर्यंत विसरू शकणार नाही अशा गोष्टी घडून जातात ( चेतन शर्मा, गोलकीपर नेगी यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे, आपण सुजाण प्रेक्षक नसून अजूनही अडाणी प्रेक्षकच आहोत). क्लुजनरच्या बाबतीत असंच झालं.

नव्व्याण्णवच्या वर्ल्डकपला आफ्रिकेच्या नऊ पैकी जिंकलेल्या सलग चार सामन्यात तो म्यान ऑफ द म्याच होता. ऑस्ट्रेलियाशी सेमीत गाठ पडली त्यांची. आत्ताच्या क्षणाला हसू येईल इतकं कमी टार्गेट होतं. ५० ओव्हरमधे २१४. पंचेचाळीसाव्या ओव्हरला ६-१७५ असताना क्लुजनर खेळायला आला. ९-२०५ एकोणपन्नासाव्या ओव्हरला. शेवटच्या सहा चेंडूत नऊ धावा हव्यात. डेमियन फ्लेमिंगला पहिल्या दोन चेंडूंवर त्यानी सीमापार पोच केलं. चार चेंडूत फक्त एक धाव हवी होती. समोर डोनाल्ड. तिसरा चेंडू निर्धाव गेला, चौथा चेंडू मिस हिट, मिडविकेटला मार्क वा कडे गेला.क्लुजनरचा धीर सुटला, त्या क्षणावर सटवीनी दुर्दैव स्वत:च्या बोटांनी लिहिलं होतं. क्लुजनर समोर पोचला तरी मोरू डोनाल्ड चेंडूकडे बघत होता, पळाला तो शेवटी पण उसेन बोल्टचा स्पीड असता तरी तो आउटच होणार होता. सामना टाय झाला आणि साखळीत आफ्रिकेला हरवलं असल्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयी झाली आणि त्यांनी कपही जिंकला.

हातातोंडाशी आलेला घास जाणं म्हणजे काय, जाणून घ्यायचंय? भेटा अथवा लिहा - लान्स क्लुजनर, मु.पो.द.आफ्रिका. मेरा नाम जोकर मधे ऋषीकपूरला बेस्ट म्यानच्या नावाखाली जसं सिम्मी ग्रेवालला चुम्बायला मिळतं तसं लान्स क्लुजनरला त्या वर्ल्डकप मधे 'प्लेअर ऑफ द सिरीज' गौरवण्यात आलं. दुधाची तहान ताकावर, कमनशिबी लेकाचा.

--जयंत विद्वांस     

वन्स अपॉन अ टाईम (८).....

वन्स अपॉन अ टाईम (७) वाचून मला दोघांनी फ्यानी डिव्हिलिअर्स आणि लान्स क्लुजनर वर लिहायला सांगितलं. सुदैवानी मला दोघंही आवडायचे, फ्यानी जास्तच जरा. आपल्या मोहिंदरसारखा फसवा गोलंदाज. सव्वासहा फुटाच्या आसपासचा फ्यानी हडकुळा वाटायचा, त्यामुळे त्याच्याकडे बघून वाटायचं नाही हा स्पीड जनरेट करेल असं. आफ्रिका परत खेळायला लागल्यावर त्यांच्या तेंव्हाच्या ज्या दोन-तीन टीम होत्या त्यात काही खेळाडू अविस्मरणीय होते पण काही लवकर नाहीसे झाले, काही टिकले. मशीन असल्यासारखा सलग गुड लेंग्थ टाकणारा क्रेग म्याथ्युज, अमर अकबर मधल्या झेबिस्को - युसफ खान - सारखा दिसणारा हसरा आणि देखणा ब्रायन म्याक्मिलन, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेकडून खेळलेला केपलर वेसल्स, खाली मान घालून विचित्र गोलंदाजी करणारा पौल अडम्स, धिप्पाड प्याट सिमकोक्स आणि हन्सी क्रोनिए पण. कधीही मोठी टूर्नामेंट ते जिंकले नाहीत पण ते मस्तं खेळायचे. 

तर विषय होता फ्यानी, फेंगडा पळणारा, वाकड्या नाकाचा फ्यानी, मला तो जाम आवडायचा आणि राग पण यायचा कारण तो तेंडुलकरला मस्तं गंडवायचा. जेमतेम अठरा टेस्ट आणि त्र्याऐंशी वनडे खेळला तो. आकड्यांमधून मोठा दिसणारा हा माणूस नव्हे. तर एक हरहुन्नरी माणूस. फलंदाजाला फसवून आउट करणारा. तो सैन्यात होता. त्या दरम्यान एकदा बॉम्बची चाचणी चालू होती. बॉम्ब याच्या जवळच फुटला. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली, थोडासा बहिराही झाला आणि नाकाला जखम झाली. तरीपण पठ्ठा खेळला बराच. नंतर दृष्टीवर परिणाम व्हायला लागल्यानी तो रिटायर्ड झाला. परवाच एबी डिव्हीलिअर्स कसा चतुरस्त्र आहे याचा मेसेज वाचलेला. फ्यानीनी शालेय जीवनात आफ्रिकेचं भालाफेकीसाठी प्रतिनिधित्व केलेलं आहे. नवीन काहीतरी किंवा अजून काहीतरी करून बघायचं हा तिकडच्या लोकांचा गुणधर्मच आहे. झिम्बाब्वेचा कीपर डेव्ह हौटन हा त्यांच्या देशाच्या हॉकी टीमचा गोलकीपर होता आणि त्या टीम मधले ५-६ जण हॉकी टीमचा भाग होते. फ्यानी ९५ च्या मिस वर्ल्डला जज होता, त्याचा भाऊ आणि मुलगी दोघंही बहिरे होते. बही-या लोकांच्या संस्थेसाठी त्यानी केपटाऊन ते प्रिटोरिया सायकलिंग करून आफ्रिकन चलनातले ८ लाख जमवले.  

सिडनीला ऑस्ट्रेलियाला जिंकायला एकशेसतरा हव्या होत्या फक्तं. आफ्रिकेत जन्मलेला, इंग्लंडकडून खेळलेला आणि ऑस्ट्रेलियात रहाणा-या टोनी ग्रेगनी (कॉमेंट्री सुरेख करायचा, २००३ च्या वर्ल्डकपला त्यांनी फायनलला भारत का जिंकू शकत नाही याचं केलेलं विश्लेषण, भावनिक नव्हतं ते, अभ्यासपूर्ण होतं आणि शारजातल्या तेंडूलकरच्या ऐतिहासिक म्याचेसची कॉमेंट्री मला अजून लक्षात आहे) खेळाच्या आधी आफ्रिकेला विजयाची संधी १००:१ आहे असं सांगितलेलं. ऑस्ट्रेलिया पाच रननी हरली. फ्यानीनी त्या डावात ६/४३ काढल्या आणि म्याच मधे १०/१२३. म्यान ऑफ द म्याच स्विकारताना त्यानी त्याच्यापेक्षा चार इंच उंच असलेल्या टोनी ग्रेगला बाउन्सर टाकला. त्याला त्याच्या १००:१ या वाक्याची आठवण करून देत म्हणाला "You know South Africans; we never give up."

फ्यानी, तू लेका फार कमी काळ खेळलास. तुला भेटणं काही शक्यं नाही त्यामुळे इथूनच तुझ्या कर्तुत्वाला सलाम.

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (७) .....

आपल्याला एखाद्या माणसाचे कसब, एखादा इतरांपेक्षा वेगळा गुण दिसतो, त्याचं आपल्याला वारेमाप कौतुक वाटतं. क्वचित तसं म्हणजे त्याची नक्कल करायचा आपण प्रयत्नही करतो पण त्यापाठीमागे त्याचे कष्ट किती आहेत ते आपण बघत नाही, जाणून घेत नाही, कळाले तरी अंमलात आणत नाही म्हणून आपले अयशस्वी होण्याचे प्रसंग जास्ती. फिल्डिंगचं नाव निघालं की सगळ्यांना जोंटी -होड्स आठवतो. क्यामेरामुळे त्याच्या हालचालींची लय कळते, त्याची अक्युरसी कळते, त्याचा रबराचा लवचिकपणा दिसतो. हे एका रात्रीत झालेलं नाही. त्याचा सराव पण इतरांसारखा नव्हता. मैदानाच्या कुठल्याही कोप-यातून एकच स्टंप लावून तो उडवण्याचा सराव तो करायचा. त्याचे अनेक अशक्यं झेल यूट्यूबवर बघायला मिळतील पण मला त्यानी आपल्या रॉबिंनसिंगला रनाऊट केलेलं ते आठवतंय कारण ते रनाऊट नव्हतंच. त्यानी चेंडू खेळून काढला जो गलीकडे गेला, फॉलोथ्रूमधे तो क्रीजच्या बाहेर आला. गलीतून -होडसनी स्टंप काढला. बिचा-या रॉबिंनसिंगला क्षणभर आपण का आउट झालो हेच कळलं नव्हतं. 

नेम साधताना अर्जुनाला फक्तं जसा डोळा दिसला तसं त्याच्या मेंदूच्या सि.पि.यू.मधे - फलंदाज क्रीजच्या बाहेर आहे, त्याला त्याची कल्पनाही नाहीये, चेंडू माझ्या हातात आहे आणि मी इथून दिसणारा एकमेव स्टंप उडवू शकतो, एक खेळाडू स्वस्तात बाद - असा फ्लोचार्ट तयार झाला असणार. त्यापुढच्या सगळ्या क्रिया रोबोप्रमाणे प्रोग्रॅम रन झाल्यामुळे घडल्या असणार इतकं परफेक्शन होतं त्यात. एखादा गायक जशी गानसमाधी अनुभवतो तसं होत असणार -होडसचं. नुसत्या हालचालींनी आणि चेंडू कुठे जाणार याच्या अचूक अंदाजानी डावी उजवीकडे पाच पाच फूट एवढा एरिया तो एकटा कव्हर करायचा. बस, नाम ही काफी है, त्याच्याकडे चेंडू असताना एक्स्ट्रा रन असा विचार मनात आणला तरी आउट देतील अशा भीतीनी फलंदाज पळत नसणार.    

आफ्रिका परत खेळायला लागल्यावर पहिल्यांदा भारतात आलेली. ग्यारी कर्स्टनचा मोठा भाऊ पिटर कर्स्टन होता त्या टीममधे. सगळे खेळाडू तसे वयस्कंच टीम मधले. त्यात तो टकलू असल्यामुळे अजूनच म्हातारा वाटायचा. एका म्याचला दिवसाचा खेळ संपला, प्रेक्षक घरी गेले, भारतीय संघ हॉटेलला गेला. काही पत्रकार मागे राहिलेले. त्यांच्या असं लक्षात आलं की एक माणूस ग्राउंडला पळत फे-या मारतोय, बघितलं तर पिटर कर्स्टन. दिवसभर उन्हात फिल्डिंग करो नाहीतर प्याव्हेलियन मधे बसून असो, रोजची सवय म्हणून आम्ही कमीत कमी पाच राउंड मारतोच त्यात विशेष काही नाही, असं त्यानी सांगितलं. हे असतात कष्ट. मी अजून चांगलं देईन हे मनात लागतं मग त्यासाठी वय, अडचणी, कमतरता, आजूबाजूची परिस्थिती या गोष्टी आड येत नाहीत. 

कैक वेळा मिस्टर युनिव्हर्स झालेल्या अर्नोल्डचा किस्सा मी वाचला होता. हार्ले किंवा तत्सम रणगाडा घेऊन तो थोड जंगल असलेल्या भागातून येत होता. मधेच गाडी पंक्चर झाली. या पठ्ठ्यानी ती हायवेपर्यंत ढकलत आणली. त्याच्या नंतर असं लक्षात आलं की पोटरीच्या स्नायूंना या एक्झरसाईजचा चांगला उपयोग होतोय. मग ते येडं रोज जायचं, हवा काढायचं आणि गाडी ढकलत आणायचं. विक्षिप्तपणा सोडा यातला पण ध्यास महत्वाचा आहे जो कष्ट घ्यायला भाग पाडतो. शिखरावर जाणं कदाचित सोपं असेल पण तिथे बराच काळ उभं रहाणं हे मात्रं कष्टाचं काम आहे.    

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (६) .....

परवा त्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बाऊन्सर लागला आणि तो गेला. आमचा गावसकर महानच होता मग. एकसेएक फास्टर खेळले पठ्ठ्यानी पण टचवूड माणूस. थोम्सन, लिली, वेस्टइंडीजचे सगळे आग्यावेताळ यानी सहजरीत्या पचवले, रन काढले, विक्रम केले. पाकिस्तानमधे शकूर राणा आणि खिजर हयात असे दोन सद्गृहस्थ होते. दोघांनाही असलेल्या शारीरिक व्यंगामुळे समोरच्या फलंदाजाच्या पायाला चेडू लागला, लागेल असं जरी त्याच्या डोळ्याला, मेंदूला दिसला तरी त्यांचं बोट आपोआप वर जायचं आणि फलंदाज आउट व्हायचा. यात खरं तर त्यांची काही चूक नव्हती. असो! तर एका टेस्टमधे (बहुतेक पहिल्याच) या व्यंगामुळे गावसकरला आउट दिलं. त्यानी जाताना चेतन चौहानला सांगितलं, 'पायाला लागलेला हा शेवटचा चेंडू'. संपूर्ण मालिकेत गावसकरच्या पायाला चेंडू लागला नाही त्यामुळे त्याला एल.बी.देता आलं नाही. याला म्हणतात टेक्निक आणि स्वत:वरचा विश्वास.


क्रिकेट हा माईंड गेम होता एकेकाळी. फलंदाजाला गन्डवण्याचा, गंडवून आउट करण्याचा आनंद वाटायचा तेंव्हा गोलंदाजाला, आता 'आउट केला ना, संपला विषय'. इम्राननी एक किस्सा सांगितला होता. समोर अर्थात आदरणीय गावसकर. त्याच्या टेक्निकवर, संयमावर इम्रानचा विश्वास स्वत: गावसकरपेक्षा जास्ती असावा. इम्रान म्हणाला, 'तो तिशीच्या पुढे किंवा विसेक ओव्हर खेळला तर आम्हांला अवघड होतं. मी गोलंदाजी करताना सगळी खबरदारी घेतली होती. स्विंग मिळत होता. तो गाफील नसतोच कधी पण मी इनस्विंगिंग यॉर्कर राखून ठेवला होता. पहिला तासाभरात मी तो ट्रायच केला नाही. जर नसता पडला नीट तर त्याला कळलं असतं मला काय अपेक्षित आहे ते आणि मग तो दिवसभर आउट झाला नसता. शेवटी धीर करून मी टाकलाच तो आणि तो चक्क बोल्ड झाला'. एकमेकांबद्दल आदर असण्याचे दिवस खेळातून संपले आता. 

गावसकर काय कपिल काय, अनफिट आहेत म्हणून टेस्ट खेळले नाहीत असं कधीच झालं नाही. फार क्रिकेट नव्हतं त्यावेळी हे कारण मला कधीच मान्यं होत नाही. उलट ग्याप असताना फिट रहाण्यासाठी जास्ती कष्ट पडतात. माणूस आळशी होण्याची शक्यता असते. एका म्याच मधे कपिल बारावा होता, संघाला गरज असतानाही. त्याला गावसकरनी वगळलं होतं. आधीच्या इनिंगमधे बेजबाबदार फटका मारून आउट झाला म्हणून. नंतर कपिलने पण त्याला एकदा बारावा करून फिटटमफाट केली होती (त्याचं कारण मात्रं लक्षात नाही). गावसकरनी दहा हजारवर रन केले. कपिलनी टेस्ट आणि वनडे मधे अनुक्रमे ५२४८/३७८३ रन्स आणि ४३४/२५३ विकेट्स घेतल्यात. गावसकरने टेस्ट आणि वनडे मधे अनुक्रमे १०१२२/३०९२ रन्स आणि १/१ विकेट घेतलीये. गावसकर एकदा कौतुकानी म्हणाला होता, तो निम्मा गावसकर आहे रन्सच्या तुलनेत आणि मी विकेटच्या बाबतीत?


अजूनही कमेंट्री करताना ते कधी एकत्रं दिसतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यात मला एकमेकांबद्दलचा आदर दिसतो. मोठ्या लोकांचा आदर, प्रेम हे ठराविक काळासाठी मर्यादित नसतं हेच खरं.
--जयंत विद्वांस   
 

वन्स अपॉन अ टाईम (५) .....

काही माणसं एखाद्या विशिष्ठ रोल किंवा परफॉरमन्स किंवा इतर काही गोष्टींसाठी आवडून जातात, लक्षात रहातात. असं का होतं माहित नाही पण असं घडतं खरं. काहीतरी  जुळून येतं किंवा त्यांच्या नशिबात त्यावेळी ग्रहांनी शुभबैठक मांडलेली असावी. अशा काही व्यक्ती माझ्या स्मरणात आहेत.

संगीतकार रामलाल. मोजक्याच सिनेमांना संगीत दिलंय त्यांनी, त्यातले दोन व्ही.शांताराम यांचे - 'सेहरा आणि गीत गाया पत्थरोने'. गीत गाया…' मधलं 'तेरे खयालोंमे हम' आणि 'सेहरा' मधलं 'पंख होती तो उड आती रे…'. या दोन गाण्यांपुरताच मला रामलाल माहितीये. तो मागे पडला की पाडला वगैरे इतिहास माहित नाही. 'सेहरा' मी पाहिलेलाही नाही पण 'पंख होती तो…' च्या सुरवातीचं ते टीटीटीव पहिल्यांदा गाणं ऐकलं असेन तेंव्हापासून आजतागायत लक्षात आहे. संधी मिळाली नाही की काय घुसमट होत असेल चांगल्या कलाकाराची हे त्याचं तोच जाणे. सगळी रत्नं पिशवीत आहेत आणि दुकान लावायलाच कुणी जागा देईना अशी विचित्रं परिस्थिती होत असावी.

सुरिंदर खन्ना. दोन अर्धशतकांच्या जोरावर आपण शारजाहला जिंकलेल्या एशिया कप मधे हा 'म्यान ऑफ द सिरीज' होता. त्यानंतर तो एखादी म्याच खेळला असेल. मी त्याला डायरेक्ट कॉमेंटटेटर म्हणूनच पाहिला.  म्याचेस लो स्कोरिंग होत्या त्यामुळे त्याच्या अर्धशतकाची किंमत मोठी होती. फास्ट खेळायचा तो. त्याचा त्यावेळचा इंटरव्ह्यू पण मला आठवतोय, फार फार आशावादी होता पण तो फेल व्हायच्या आधीच त्याला काढला. पुढे अस्तित्वं राहणं त्याच्या नशिबात नव्हतं. आपल्याकडे रबरनी नाव खोडतात एखाद्याचं, अगदी नामोनिशाण गायब करतात. त्याच्यापेक्षा डफ्फड लोक वर्षानुवर्ष खेळले (उदा.दोन ऑफ स्पिनर - आशिष कपूर आणि निखिल चोप्रा [ज्या विकेट पडल्या असतील त्यांना, त्यात चेंडू न वळल्याचा किंवा इतर कुणाचा सहभाग निश्चित समजा}, हडकुळा चश्मिष विजय भारद्वाज आणि असे अनेक), त्याचं नशिब नव्हतं हेच खरं.

आयेशा जुल्का. 'जो जीता वोही सिकंदर' मधली फक्तं. नंतर फक्तं तिचा -हास पहायला मिळाला. 'जो जीता…' मधे ती जी आवडून गेली ती बात नंतर नाही आली. शाळेचा स्कर्ट, दोन वेण्या, अल्लड, निरागस चेह-याची, अमिरवर मूक प्रेम करणारी, त्याच्या यशासाठी झटणारी, एवढं करून तो पूजा बेदीवर मरतोय हे लक्षात आल्यावर खट्टू होणारी पण गप्प रहाणारी म्यच्युअर्ड लहान मुलगी तिनी जी चेह-यानी दाखवलीये त्याचं वर्णन शब्दात नाही करता येणार. लोभस आणि म्यच्युअर्ड दोन्हीचं मिश्रण गेलं होतं. पुढे तिनी नाना बरोबर हिंदीमधे 'पुरुष' पण केलं. नाटकापेक्षा नाना बरोबर नाव जोडल्याचं वाचण्यात आलं. अकाली नाहीशी झाली ती.

ली जर्मोन, न्यूझीलंडचा विकेटकीपर कप्तान. बारा टेस्ट, सदतीस वनडे, तो अचानक धुमकेतू सारखा आला आणि गायब झाला. मला आठवतंय, त्या टीम मधे मला तरी त्यावेळेस फक्तं कप्तानाचच नाव नवीन होतं. एकोणतिसाव्या वर्षी तो रिटायर्ड झाला. असं एकदम प्रसिद्धीतून डायरेक्ट एकांतवास ज्याला पचवता येतो तो माणूस माझ्या दृष्टीनी जिगरबाज आहे. सांत्वनासाठी लोक रुमाल घेऊन तयार असतातच पण कीव करून न घेणारे फार थोडे असतात, बरेचसे माझी संधी कशी हुकली व इतर इतिहास सांगण्यातच उर्वरित आयुष्यं काढतात.
भेटू परत, असंच एखादं काहीतरी घेऊन.

--जयंत विद्वांस        

लेखन, लेखनशैली आणि लिहावं काहीतरी हा कंड......

मला स्वत:ला एफबीचा या करता खूप फायदा झाला. पोस्ट टाकायची म्हणजे नेमकं काय करायचं इतकं लो लेव्हलचं अज्ञान होतं. हळू हळू शिकत गेलो. पण मिळणा-या प्रतिसादामुळे ते जास्तं आवडत गेलं हे ही सत्यं आहे ('एकमेक प्रशंसा संघा'चा सभासद नसतानाही). एफबीच्या आधी जे कुणी लिहित असेल ते डायरी, पत्रं किंवा ज्याच्याकरिता लिहिलंय तेवढ्यापुरताच मर्यादित वाचक होता. बाकी आम पब्लिकला काय वाटतंय हे कळण्याचा मार्ग नव्हता. 

प्रतिसादांनी लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, आपल्याला अपेक्षा पूर्ण करणं किती जमतं, दुसरा आपल्यापेक्षा वेगळं काय लिहितो, ते वाचण्यासारखं असतं का?, दुस-याचं वाचताना जसा आपल्याला कंटाळा येतो तसंच आपलं वाचताना दुस-याला पण येत असेल का?, आपण लिहिलेलं परत वाचताना आपल्याला कंटाळा येतो का?, असेल तर, सुधारणा काय कराव्या लागतील?, मजकूर हा अनुभव असला तरी आपण तो चटपटीत करण्याच्या नादात भरकटवतोय का? असे अनेक प्रश्नं विचारले स्वत:ला. मग जी काय शैली असेल ती आपोआप होत गेली. कणेकरांचे वडील त्यांना म्हणाले होते - 'तुझं वाचताना कंटाळा येत नाही'. एवढी साधी गोष्टं लिहिताना पाळली तरी लिखाण वाचनीय होऊ शकतं. लिहिणं हे एक चांगलं व्यसन आहे. फक्तं त्याचा रतीब झाला की गुणवत्ता उतरते. सतत वाचनीय लिहिणं ही देणगी असू शकते किंवा तेवढा व्यासंग असू शकतो, जे प्रत्येकाला जमेलंच असं नाही. आपण व्यक्तं होण्याकरतो लिहितोय की बाजू मांडण्यासाठी, उगाच विरोधाकरता विरोध म्हणून लिहितोय हे मात्रं ठरवलं पाहिजे.
एकदा लिहित गेलं की तो कंड पाठ सोडत नाही. पण प्रतिसादाकरता लिहू नये मग निराशा येते नाही कुणाला आवडलं तर. आधी स्वत:ला आवडलाय का याची खात्री असावी. मिळणारे सगळेच प्रतिसाद खरे किंवा मनापासून असतात असं नाही त्यामुळे त्यांनी खूष किंवा नाराज होऊ नये. एकदा आपली रेंज कळली की त्रास होत नाही. उगाच बांबू मोठा आहे म्हणून पोल व्हाल्टच्या भानगडीत पडू नये त्याकरता आपण तेवढ्या उंचीवर जाऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे.
आणि माणसानी ना साधं लिहावं. साधं जास्ती परिणामकारक असतं, उगाच सतत अवघड शब्दांचे ड्रायफ्रुट्स टाकायचा हव्यास नको, दिसतं छान, भरजरी पण पेललं पाहिजे ना वाचणा-याला आणि आधी स्वत:लाही. स्वच्छ धुतलेल्या चेह-याची हसरी बाई, मेकपची पुटं चढवून लिपस्टिक बिघडू नये अशा बेतानी नकली हसणा-या बाईपेक्षा देखणी असते एवढं लक्षात ठेवलं की झालं.



-- जयंत विद्वांस