Wednesday 25 February 2015

वन्स अपॉन अ टाईम (११).....

वन्स अपॉन अ टाईम (९) वर मिलिंद जोशींनी मायकेल बेव्हनचा उल्लेख केला होता कॉमेंटमधे. मायकेल बेव्हन, आपला राहुल द्रविड, झेक इव्हान लेंडल यांच्या पत्रिका एकसारख्याच असणार. यांच्या आयुष्यात निखळ कौतूक कमी आणि अपेक्षांचं ओझं जास्ती. इमानेइतबारे जबाबदा-या पार पाडायच्या हा यांचा स्वभाव. फार प्रसिद्धी मिळो न मिळो, कौतुक होवो न होवो, आपलं काम काळजी घेत, चोख करत रहायचं पु.लंच्या नारायणासारखं. अशा लोकांची नावं पटकन विसरली जातात. लक्ष्मणनी २८१ केल्यात म्हणून तरी त्याचं नाव निघेल नाहीतर तो ही समान पत्रिकेचा. २००३ च्या वर्ल्ड कपला लक्ष्मणला डावलून दिनेश मोंगिया का खेळला याचं उत्तर मिळणार नाही, त्याच्या नशिबात नव्हतं एवढंच खरं. राग मोंगियाचा नाही आपल्या मतलबी वृत्तीचा आहे. आपण फार लवकर चांगल्या गोष्टी विसरतो आणि वाईट, विसरण्याच्या लायकीच्या मात्रं मेंदूत स्वतंत्र कप्प्यात कसोशीने जपतो.

बेव्हन हा अत्यंत मेहनती माणूस होता. कर्मकांडावर श्रद्धा असलेला, एकेक करीत कधी तिशी गाठायचा कळायचं नाही, उगाच मारहाण नाही करायचा, मारेन तर फोरच नाहीतर राहीन उपाशी असला माज नाही, मध्यमवर्गीय माणूस, कुटुंबासाठी रुपया रुपया साठवल्यासारखं सेव्ह करणारा. तो चायनामन पण टाकायचा. फिल्डिंग करताना बॉल अडवण्यासाठी फिल्डिंग करायचा. क्यामेरासाठी उगाच क्याच पूर्ण झाल्यावर कोलांट्याउड्या वगैरे नाहीत. धोनीचा फिनिशर म्हणून आज गवगवा असेल पण बेव्हन त्याचा पूर्वज आहे. शांतपणे आत्मविश्वासानी तो म्याच काढायचा. एक मासिकात मी वाचलं होतं. सराव करताना कोच रनिंग बिटवीन द विकेटसाठी टायमर लावायचा, बेव्हन सगळ्यात फास्ट होता ते सुद्धा सिंगल काढताना नाही, तीन पळताना. त्या कोचच्या म्हणण्यानुसार केवळ ह्या आणि फिनिशर या गुणासाठी तो संघात राहील.

पाचव्या सहाव्या क्रमांकावर तुम्ही फलंदाजीला येता तेंव्हा तुम्ही किती रन केलेत हे कुणी लक्षात ठेवत नाही. किती चेंडूत केले हे महत्वाचं असतं (नंतर ते ही कुणी लक्षात नाही ठेवत म्हणा). शेवटच्या चार पाच षटकात रन जमवा, लवकर आउट झालात खा शिव्या, मारल्या त्यांनी ४०-४५ तर उद्याच्या पेपरात जास्तीत जास्ती दोन तीन ओळीत उल्लेख संपतो, म्याच जिंकलात तर म्यान ऑफ द म्याच वरती ७०+ रन करणा-याला किंवा ३-४ विकेट काढणा-याला, हे पाचवे, सहावे खेळणारे म्हणजे सवतीची पोरं. आश्रितासारखे वागवतात यांना. बरं यांच्या जागेवर हक्कं सांगायला शहाजहानच्या मरणाची वाट बघणारे औरंगजेब रांगेत उभे असतात, जगावं तरी कसं या माणसांनी.

ऑस्ट्रेलियानी आत्तापर्यंत सगळ्यात जास्ती वेळा वर्ल्डकप जिंकलाय, त्यापैकी ९९ आणि २००३च्या टीमचा बेव्हन सदस्य होता. पण पोंटिंग, स्टीव्ह वा, वार्न यांच्यापुढे बिचारा बेव्हन कोण लक्षात ठेवणार. अंतिम विजेता माणसाच्या नेहमी लक्षात रहातो. २००३च्या इंग्लंड विरुद्धच्या म्याचला ऑस्ट्रेलिया ४/४८ अशा संपन्न अवस्थेत असताना तो खेळायला आला. ८/१३५ असताना बिकेल त्याच्या सोबतीला आला. जिंकायला अजून ७० हव्या होत्या. शेवटच्या ओव्हरला बेव्हननी म्याच काढून दिली त्यांना, तो ७१ आणि बिकेल ३४. सुपर सिक्सला पण न्यूझीलंड विरुद्ध हीच सशक्तं अवस्था होती. ऑस्ट्रेलिया ७/८४ परत एकदा बेव्हन ५६ आणि सोबतीला बिकेलला घेऊन त्यानी नैय्या पार लावली. फायनलला पोंटिंगनी हाणला तुफान आपल्याला आणि याला फलंदाजीला यायची वेळ आलीच नाही.

समान व्यसनेषु समान सख्यम असं म्हणतात. जगात डावलले गेलेले, गुणवत्ता असून मागे राहिलेले जास्ती असतात त्यामुळे तुझी आणि तुझ्यासारख्या इतरांची आठवण कुणी ना कुणी काढत रहाणार बघ. दहीहंडी फोडताना सगळ्यांचं लक्ष सगळ्यात वरती उभ्या असलेल्या माणसाकडे असतं, एकदा हंडी फुटली की लोक पाया, मधले स्तर विसरतात हे मात्रं चिरंतन सत्यं. बेव्हन, तू म्हणजे खालचा थर, वर उभ्या असलेल्या माणसाला भक्कम पाया देणारा, 'मी आहे मागे' असा आत्मविश्वास देणारा त्यामुळे कायम 'मागे' रहाणारा.

--जयंत विद्वांस  



No comments:

Post a Comment