Friday 31 October 2014

शिकार.....

शिकार..... 

जिवाच्या आकांतानी सैरावैरा पळतोय मी, अर्धा तास झाला. मेलेलं परवडलं पण यमाच्या झडपेची वाट बघणं फार वाईट. पुढे पळताना अंगावर त्याची सावली पडली तरी थरकाप होतोय, त्राण जातात हातापायातले. एकदा डोळे मिटून जागीच थांबलो मेल्यासारखा, त्याला दया येईल ही आशा किंवा मेलो तर या ताणातून सुटका तरी होईल अशी भितीयुक्त आशा. पण तो क्रूर आहे. गोल रिंगण केलंय त्यानी भोवती, काठावरून उडी मारून मी सुटू शकतो खरंतर पण मांजर जसं उंदराला खेळवत मारते ना तसा तो मला मानसिक खच्ची करतोय आधी मग मी गलित गात्रं झालो की एका घावाची गरज फक्तं. तो मला पळू देतो, मला वाटतं सुटकेपासून मी बोटभर लांब आहे फक्तं, मनातल्या वाढत्या आशेनी सुटकेचा किरण दिसतो, जवळपास मी अठ्याणव टक्के भिंत चढलेली असते, कडेवरून उडी मारायची, दोन चार हाडं मोडली तरी चालतील इतपत माझी तयारी आहे. मग तो परत मला बखोटीला धरून मूळ जागी आणून ठेवतो. तावडीतून सुटलो की जिवाच्या आकांतानी पळेन. कुठल्याही आडोशाला निदान क्षणिक सुटकेचा का होईना श्वास घेईन. अशी आशा मातीमोल होते. 

असं काय चुकलंय माझं खरंतर? मी दुर्बल आहे त्याच्यापेक्षा, ही चूक आहे? दुर्बलांनी असंच मरायचं? कुणाची इच्छा झाली की. आपण त्याला त्रास दिला असो नसो, त्याला वाटलं की संपलो आपण. शब्दश: माझ्या डोळ्यात दाटून आलेले प्राण त्याला दिसत नाहीयेत? काय मिळतंय त्याला असं करून? असुरी आनंद की विकृत आनंद? मला सोडून दिलं तर काय मिळणार म्हणा त्याला. मी निष्कांचन आहे, परतफेड, खंडणी असं काहीही देऊ शकत नाही. नुसते मनापासून आभार मानेन, चांगलं चिंतेन त्याचं. पण अशा गोष्टींना कुठे किंमत आहे हल्ली. 

आणि समजा बाजू उलट्या असत्या तर? निश्चितच मी नसतं असं केलं. मी कशाला त्याच्या वाटेला गेलो असतो आणि मारायचं तर मारून टाकलं असतं, असं खेळवत नसतं मारलं मी. पण हे सगळे विचार म्हणजे वंध्यामैथुन आहे. शक्तीहीन, असहाय्य व्यक्तिच्या रुदनाला रडगाणं म्हणतात हे माहितीये मला. कुणाच्यातरी जिवाशी खेळ हा दुस-यासाठी आनंदाचा विषय होऊ शकतो. माझंच नशिब फुटकं, पण मी प्रयत्नं सोडणार नाहीये. शेवटचं एकदा जीवाच्या आकांतानी धावेन म्हणतो.

****   
"आदित्यं, अभ्यासाला बस बरं का, अर्धा तास झालाय त्या मुंगळ्याशी खेळतोयेस तू आणि उगाच मारू नकोस त्याला, बागेत नेउन सोड."
"हो, सोडतोय, ओरडू नकोस गं सारखी"
जयंत विद्वांस 


Sunday 26 October 2014

अंगुष्टीक / अबिस (Abyss) - श्रीनिवास नार्वेकर

अंगुष्टीक / अबिस (Abyss) - श्रीनिवास नार्वेकर 
 
सर्वसाधारण वाचकाला (मी ही त्यातच आलो) गूढ, कोडं न उलगडणारं, बुचकळ्यात पाडणारं. अंगावर काटा आणणारं रहस्यं वाचायला आवडतंच. त्यात बौद्धिक फार काही मिळत नाही असा समज आहे. त्यामुळे आपल्याकडे असं लिहिणारे थोडेसे वाळीत असतात, कमी दर्जाचे समजले जातात. रह्स्यकथांना वाचक मोठ्या प्रमाणावर आहे पण गूढ कथांचा वाचक सिमित आहे.

घाबरवण्याचे अनेक प्रकार असतात. चित्रपटात ती संधी जास्तं असते. पार्श्वसंगीत, अभिनय, मेकप, क्यामेराची कमाल, अंधाराचा खेळ, आधी घडलेल्या घटना, त्यावरून आपण बांधलेले आडाखे त्यामुळे जास्ती बसणारे धक्के इतक्या गोष्टी मदतीला असतात. रामसे बंधूंचे विनोदी भयपट हा मात्रं अभ्यासाचा विषय आहे. (रामगोपाल वर्माचा, रेवतीचा "रात" सरस होता). वाचताना मात्रं हे सगळं नसतं. तिथे लेखक कळतो, त्याची ताकद कळते. इंग्रजी शब्दसंग्रह अल्प असल्याने त्या भाषेतलं असं काही वाचलेलं नाही. मराठीत मतकरी, जी.ए. वाचताना त्यांची या विषयावरची हुकुमत जाणवते. त्यांच्या काही गोष्टी अजिबात कळलेल्या नाहीत. जी.ए. तर मी सलगही वाचत नाही. काही वेळानंतर अशुभ काहीतरी घडणार आता असं वाटू लागतं. 

तेल महाग झालंय त्यामुळे नमनाला उपलब्ध असलेलं चमचाभर तेल संपत आलंय. तर विषयावर येतो. परवा नार्वेकरांची दोन पुस्तकं वाचली - अंगुष्टीक ही दीर्घकथा आणि अबिस हा सहा कथांचा कथासंग्रह. अबिस पेक्षा मला अंगुष्टीक सरस वाटलं. अबिस मधे त्यांच्या सुरवातीच्या लेखन काळातील कथा आहेत (त्यांच्याशी बोलताना तेच म्हणालेत, उगाच माझा फार अभ्यास आहे असं वाटायला नको) त्यामुळे वाचताना शेवटाचा अंदाज येतो पण त्या टाकाऊ, सपक, साधारण नाहीत. आधी त्या वाचा मग अंगुष्टीक वाचा.

अंगुष्टीक वाचून झालं की दचकायला होत नाही, अशुभाचा फील येतो. असं आपल्या बाबतीत काही घडलं तर? असा विचार करायचा. आपण टेडी बेअरला कवटाळून घरात एकटेच झोपलोय. झोपेत आपण त्याला कवटाळलं इथपर्यंत ठीक आहे, त्यानी रिस्पोन्स दिल्यासारखं कवटाळलं तर? "उसवते" (सुई कामाची नाही, दाभणंच लागेल). समोर, मागे, आजूबाजूला माणसं असलेली परवडतात पण कुणीतरी आहे आसपास हा भास खत्तरनाक. माणूस अदृश्य, अमानवी व्यक्तीशी नाही लढू शकत. इथेच तो पहिला मानसिकरीत्या खच्ची होतो. अमानवी शक्ती कमकुवत मनावर जास्ती परिणाम करतात ते यामुळेच.

कोकणात, अंधारात, निर्मनुष्य ठिकाणी फिरायला पण जायचं नाही मग अंगुष्टीक विसरेपर्यंत. नार्वेकरांनी शब्दांत बाजी मारली आहे. नारळाच्या हलणा-या झावळ्या, अमावस्येचा अंधार, त्यातून निर्माण होणारे चित्रं विचित्रं आकार, घुबड, टिटवी, मांजराचा आवाज असलं काही नाही. शहरी वातावरणात घडतं सगळं पण इफेक्ट तोच. साध्या शब्दांची ताकद अफाट असते. संमोहित केल्यासारखे त्यांचे शब्दं गोष्टीतल्या अभद्राकडे आपल्याला खेचून नेतात. 


माणूस चित्रपटाशी निगडीत असल्यामुळे असेल त्यात फ्लाश्ब्याकही आहे. दोन समांतर पातळीवर चालणा-या पण एकमेकांशी निगडीत असलेल्या कथा गुंगवून टाकतात. अंगुष्टीक कदाचित दोनदा वाचावं लागेल तुम्हांला त्यासाठी. फिल्म मधे शॉट कट होतो तो इफेक्ट नार्वेकर  वाचताना देतात. अंगुष्टीक / अबिस च्या कथा  सांगण्यात काही हशील नाही. मस्त ब्लान्केट गुंडाळून अंधार करून वाचा, थंडी असो नसो, काटा यायची ग्यारंटी आहे.

पुस्तकाच्या शेवटी हेवा वाटावा असा त्यांचा परिचय आहे पण खेळाडू, पर्फोरमर, गायक किंवा लेखक यांना त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण त्यांना प्रत्येक पुढच्या वेळेस तेवढीच मेहनत घ्यावी लागते. लेखकाची कामगिरी तर फारच कष्टप्रद. तिथे तुमचं नाव लक्ष वेधण्यापुरतंच उपयोगी असतं. बाकी स्वत:चा स्तर टिकवायचे, वाढवायचे कष्ट असतातच. नार्वेकरांनी या विषयात अजून बरंच लिहावं अशी अपेक्षा.

चांगला लेखक कोण? ज्याच्यासारखं चांगलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे असं आपल्याला वाटणं (त्याच्या शैलीतलं नव्हे) मग नार्वेकर या व्याख्येने चांगले लेखक आहेत. :)


जयंत विद्वांस


       

Wednesday 22 October 2014

सविता……

बदलापूरला काकांच्या घरासमोर कुलकर्णी कुटूंब रहायचं. नाईलाज म्हणून एकत्रं रहायचे. तात्या रेल्वेतून रिटायर्ड. त्यांनी सगळे पैसे घालून पार्टनरशिपमधे प्याकिंग बॉक्सेस तयार करायचा कारखाना काढला. पार्टनरकडे पैसे आणि यांच्याकडे बुडण्याचा अनुभव असं वाटप लवकरच झालं. तात्या सैरभैर झाले. एक मुलगा राजू, लग्नं झालेली आशा आणि दुसरी सविता. घरात कायम एक स्मशान शांतता. साधं भांडण सुद्धा नाही. आशा तिच्या काकांकडे शिकायला त्यामुळे ती बी.एस.सी.झाली, नोकरी होतीच तिला. बुटकी, गोरी, देखणी आणि मुंबईत राहिल्यामुळे एकूणच पुढारलेली. ती ही फार कमी यायची इकडे.

त्या घरात कायम एक अदृश्य नैराश्याचा काळोख पसरलेला असायचा. चाळीसच्या बल्बचा भिकार रोगट पिवळट प्रकाश घरभर असायचा. कित्त्येक वेळा तर रॉकेलच्या टेंभ्यात स्वैपाक चालू असायचा. जेवायला मात्रं सगळे एकत्रं बसायचे. जेवताना बोलू नये याचं तंतोतंत पालन करणारं माझ्या पाहण्यातलं हे एकमेव कुटुंब. पुढ्यात असेल ते खायचं आणि झालं की उठायचं. कसलंही संभाषण नाही. आर्थिक कारणानीही असेल कदाचित पण त्यांचं एकत्रं राहणं हे नाईलाजाने आहे असं वाटायचं. रूप काही आपल्या हातात नसतं पण व्यवस्थित रहाणं निश्चित असतं. कुलकर्णी वहिनी अजागळपणातला शेवटचा शब्दं. दात पुढे त्यात बायफोकल, गांधीजींसारखा गोल चष्मा, खालचा ओठ कायम लोंबता, मागे वीतभर लांबीची बोटभर जाडीची वेणी आणि कपडे अमुक एका जागी हवेतेच असा आग्रह नसल्यासारखे. कुठेही जाणं येणं नाही, चाळीत कुणाकडेही उठबस नाही, बोलणं नाही, कशात सहभाग नाही.

राजू म्हणजे तर पात्रच, दात पुढे, अमिताभसारखे कान झाकणारे केस, डोक्याला चप्प तेल आणि कुठलंही स्किल नाही, वाचन नाही, अपडेट्स नाहीत. त्यानी मराठी लघुलेखन शिकलं होतं. स्पीड भन्नाट होता फक्त काय लिहून घेतलंय ते त्याचं त्यालाच कळायचं नाही. तिथल्याच लोकल एम.आय.डी.सी.मधे नोकरी करायचा. झकपक मुंबईत त्याला कुणी उभा केला नसता हे निश्चित. कुठलीही महत्वाकांक्षा नाही, ध्येय नाही, छंद नाही. राजू हा एक चेष्टेचा आणि टाईमपासचा विषय होता. लहान मुलं सुद्धा त्याची चेष्टा करायचे. (तो सुद्धा आता ५५ च्या आसपास असेल, कित्त्येक वर्षात भेटलेलो नाही.) लग्नं न झाल्यामुळे आपोआप पाळलं गेलेलं ब्रम्हचर्य.केवळ माणुसकी पोटी, कुठलंही काम करतो, असू दे, निदान पैसे खात नाही अशा काही कारणांमुळेच तो नोकरीत टिकून राहिला असावा.

सगळ्यात लहान सविता. तेलकट चेहरा, मधून भांग, केसाला चप्प तेल, दात पुढे, बारीकपणाच्या मर्यादा ओलांडलेली देहयष्टी, अभ्यासात यथा तथाच, तरी मुलींबरोबर ती हजेरीला तरी असायची. एकदा सगळ्या खेळत होत्या आणि वारा सुटलेला, त्या वा-यात ती पडली आणि तिला 'बुळी' नाव मिळालं. तेंव्हापासून ती कमी झाली. उंबरठ्यात उभी राहून तासंतास ती खेळ बघायची लांबून. न्यूनगंडानी उठली ती आयुष्यातून. गरिबीत माणसं निदान तोंडाळ तरी असतात, कुठवर ऐकून घ्यायचं या भावनेनी. सविता मुखदुर्बळ होती. तिचं मिसळणं कमी झालं, तारुण्याच्या उंबरठ्यावरचा न्यूनगंड, रूप नाही, हौस नाही, समजून घेणारं कुणी नाही, व्हायचा तो परिणाम झालाच. एकांताकडून वेडसरपणाकडे वाटचाल चालू झाली. शरीर बोंब मारत असणार, ती तरी काय करणार. एकटक बघत बसायची कुणाकडेही. कुणीही तिचा गैरफायदा घेतला नाही हे नशिब. रूप, आकार उकार नसल्याचा हा एकमेव फायदा.

चाळीतल्या एका मुलाचा हात धरला तिनी एकदा आणि लग्नं कर म्हणाली. गैरसमज होणं शक्यं नव्हतंच, मग तिला कोंडायला सुरवात झाली, व्हायोलंट व्हायची, तिची भीती वाटू लागली लोकांना. मग तिला वेड्यांच्या दवाखान्यात टाकलं. बरीच वर्षे असावी तिथे. आउटगोइंग नसलेली जागा ती. खंगून, झुरून, वासना दाबत ती तिथेच गेली. सगळ्या कुटुंबाची एकच पत्रिका असणार. कुणीही सुखी नाही. मुल नाही म्हणून आशाचा घटस्फोट झाला पण निदान तिला बँकेत नोकरी आहे, तात्या, कुलकर्णी वहिनी, सविता काळाच्या ओघात संपले, राजू आहे.

सविता आठवायचं कारण म्हणजे ती निरागस पण आवाज न करता हसायची. कुठेतरी पटकन बोलावसं वाटायचं तिलाही पण एकूणच वातावरण अभद्र होतं घरात. माझ्या बहिणीच्याच वयाची ती. दिवाळीत चाळीत सगळी मुलं कल्ला करायची, सविता नवीन कपडे घालून उंब-यात उभी असायची. कधी बालसुलभ इच्छा नसतील झाल्या तिला? सणासुदीला का कुणास ठाऊक काही लोकं मला हटकून आठवतात आणि बेचैन करतात.

शेक्सपिअर म्हणाला ते खरंच आहे 'नावात काय असतं?' काहीही नसतं ब-याचदा. नाव सविता पण तिच्या आयुष्यात सुर्य कधी उगवलाच नाही, जन्माला येताना संध्याकाळ घेऊन आली आणि नंतर उरली सगळे प्रश्नं संपवणारी, नाहीसे करणारी, सामावून घेणारी, चिरशांती देणारी रंगहीन रात्रं.



जयंत विद्वांस 

Wednesday 15 October 2014

पितळी डबे.....

पितळी डबे.....
१९७९/१९८० साल असेल. वडिल दुकानात होते तेंव्हा. चितळे कुटुंब राहायचं डेक्कनला. चितळे आजी आल्या एका सकाळी. म्हणाल्या, ' माझे पितळी डबे वजन करायचेत, आणू का? साहजिकच आश्चर्य वाटलं. डब्याचं वजन का? मोडीत काढण्याची परिस्थिती असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांनीच उलगडा केला. त्यांचा मुलगा अमेरिकेला स्थायिक झाला. आई वडील पण कायमचे तिकडे निघाले. घरातल्या चमच्यांपासून ते मोठया वस्तूंपर्यंत सगळं विकायला काढलेलं. पैसे करणं यापेक्षा योग्यं, गरजू व्यक्तीला त्या मिळाव्यात हा स्वच्छ हेतू होता.
वडिल म्हणाले, मी घेतले डबे तर चालेल का? 'घ्या की, माहितीच्या माणसाला दिले तर मला जास्तं बरं वाटेल'. बावीस रुपये किलो मोडीचा भाव होता. त्यावेळेस ते पैसे सुद्धा उसने घेऊनच दिले असणार याची खात्री आहे. तो सोनेरी खजिना रिक्षानी घरी आणण्याचीही परिस्थिती नव्हती. सायकलवर आणले वडिलांनी एकेक करून.

त्यात एक कडीचा डबा आहे, आजपर्यंत कडी तसूभरही हललेली नाही. एक फुलं ठेवण्यासाठी सगळीकडून भोकं असलेला डबा आहे. सगळी होल्स एकसमान अंतरावर आहेत. प्रकाशात धरल्यावर मस्तं आकृत्या उमटतात. कपभरच पाणी बसेल अशी दोन सुबक झाकणा सहीत छोटी ठोक्याची पातेली त्यांनी वजन न करता तशीच दिली. माझ्या दोन्ही चुलत बहिणी त्यावर भातुकली खेळल्या. पातेली आहेत तशी आहेत.

आमच्याकडे आल्यास त्याला आजपर्यंत कल्हई केलेली नाही कारण ती शाबूत आहे. एकही डबा, झाकण तिरळलेलं नाहीये. डब्यावर 'लक्ष्मीबाई चितळे, १९४०' असं गोंदलय. आधीची माणसं काय, वस्तू काय, दोन्ही भक्कम. निर्जीव वस्तूंवर मायेचा सजीव हात फिरायचा आणि ती वस्तूही जबाबदारी असल्यासारखं सोबत करायची. आम्हांला देताना त्यांचा जीव किती गलबलला असेल माहित नाही, कुणी सांगावं, वडिलांच्या डोळ्यात दिसलं असावं कदाचित 'मी जपेन, विकणार नाही' असं. जिवंत असलो २०४० पर्यंत तर शतकोत्सव करायची इच्छाही आहे. आई, वडील नसतील कदाचित तोवर, लक्ष्मीबाई चितळे नसतीलच आत्ताही पण 'लक्ष्मीबाई चितळे, १९४०' हे मात्रं पुसटसं का होईना निश्चित असेल. 

बेघर झालेल्या वडिलांना कदाचित त्यांचं हरवलेलं जग त्यात दिसलं असावं. बोलता बोलता एकदा म्हणाले, ' दोन माणसं समोरासमोर बसून आंघोळ करू शकतील एवढं मोठ्ठ घंगाळं होतं घरी' आणि गप्पं झाले. गेलेली माणसं आणि वस्तू परत मिळत नाहीत, त्यासदृश जे असेल ते जपणं फक्तं आपल्या हातात आहे, हेच खरं. 

जयंत विद्वांस 


Saturday 11 October 2014

प्रकाश बाबा आमटे.....


प्रकाश बाबा आमटे..... 

आजच्या काळात असा सिनेमा काढतात? समृद्धी पोरे वेड्या आहेत किंवा पैसे कुठे खर्च करावेत असा प्रश्नं असावा.पुढची यादी वाचा कळेल त्यात काय काय नाहीये ते - व्हिलन नाही, बागेतली गाणी, आयटम सौंग नाहीत. नानाचे जबरा डायलॉग नाहीत, पुढे काय घडणार याची उत्सुकता नाही, कौमेडी नाही, लोकेशन्स नाहीत, मोठाले बंगले, गाड्या, देखण्या बायका नाहीत.

जे आहे ते मात्रं अंगावर येतं. एक प्रार्थना आहे, साधा नाना आणि सोनाली आहे, आदिवासी आहेत, त्यांचे आजार आहेत, हताश परिस्थिती आहे, कल्पनेच्या बाहेरची संकट आहेत, अंगावर काटा आणि डोळ्यात टचकन पाणी आणणारी वस्तुस्थिती आहे. आपल्या खुजेपणाची, क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारी क्वचितच घडू शकणारी सत्यकथा आहे.

असो! या सिनेमाचे परिक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही, तेवढा वकूबही नाही. दिवसेंदिवस समाजातील आदर्श कमी होत असताना असे सिनेमे पाहिले की दिलासा मिळतो. अव्यक्तं, निरपेक्ष प्रेम दुर्मिळ झालंय त्यामुळे हेमलकसाला वीज नाही म्हटल्यावर वीस वर्ष साधना ताईंनी तिकडे पंखा लावला नाही हे ऐकल्यावर, मुलाकडे लक्ष ठेवा, येताना एक लेकरू रस्त्यात गेलं त्याला पुरून येते हे ऐकल्यावर क्षणभर पडद्यावरील चित्रं दिसेनासं झालं. 

मोजून १०० लोक असतील बघायला. वाईट वाटलं. लोकांना चिरडणा-या, लायकीशिवाय पद्मश्री मिळणा-या हिरोंचे सिनेमे पहिल्या दिवशी जेवढा गल्ला जमवतात तेवढा सुद्धा एकूण धंदा होणार नाही कदाचित. पण लायकीमुळे पद्मश्री, रेमन मगसेसे मिळालेल्या या रिअल हिरोला पदरमोड करून पहायला हरकत नाही. तेवढं देणं आपण निश्चितच लागतो त्यांचं. 
जयंत विद्वांस