Wednesday 22 October 2014

सविता……

बदलापूरला काकांच्या घरासमोर कुलकर्णी कुटूंब रहायचं. नाईलाज म्हणून एकत्रं रहायचे. तात्या रेल्वेतून रिटायर्ड. त्यांनी सगळे पैसे घालून पार्टनरशिपमधे प्याकिंग बॉक्सेस तयार करायचा कारखाना काढला. पार्टनरकडे पैसे आणि यांच्याकडे बुडण्याचा अनुभव असं वाटप लवकरच झालं. तात्या सैरभैर झाले. एक मुलगा राजू, लग्नं झालेली आशा आणि दुसरी सविता. घरात कायम एक स्मशान शांतता. साधं भांडण सुद्धा नाही. आशा तिच्या काकांकडे शिकायला त्यामुळे ती बी.एस.सी.झाली, नोकरी होतीच तिला. बुटकी, गोरी, देखणी आणि मुंबईत राहिल्यामुळे एकूणच पुढारलेली. ती ही फार कमी यायची इकडे.

त्या घरात कायम एक अदृश्य नैराश्याचा काळोख पसरलेला असायचा. चाळीसच्या बल्बचा भिकार रोगट पिवळट प्रकाश घरभर असायचा. कित्त्येक वेळा तर रॉकेलच्या टेंभ्यात स्वैपाक चालू असायचा. जेवायला मात्रं सगळे एकत्रं बसायचे. जेवताना बोलू नये याचं तंतोतंत पालन करणारं माझ्या पाहण्यातलं हे एकमेव कुटुंब. पुढ्यात असेल ते खायचं आणि झालं की उठायचं. कसलंही संभाषण नाही. आर्थिक कारणानीही असेल कदाचित पण त्यांचं एकत्रं राहणं हे नाईलाजाने आहे असं वाटायचं. रूप काही आपल्या हातात नसतं पण व्यवस्थित रहाणं निश्चित असतं. कुलकर्णी वहिनी अजागळपणातला शेवटचा शब्दं. दात पुढे त्यात बायफोकल, गांधीजींसारखा गोल चष्मा, खालचा ओठ कायम लोंबता, मागे वीतभर लांबीची बोटभर जाडीची वेणी आणि कपडे अमुक एका जागी हवेतेच असा आग्रह नसल्यासारखे. कुठेही जाणं येणं नाही, चाळीत कुणाकडेही उठबस नाही, बोलणं नाही, कशात सहभाग नाही.

राजू म्हणजे तर पात्रच, दात पुढे, अमिताभसारखे कान झाकणारे केस, डोक्याला चप्प तेल आणि कुठलंही स्किल नाही, वाचन नाही, अपडेट्स नाहीत. त्यानी मराठी लघुलेखन शिकलं होतं. स्पीड भन्नाट होता फक्त काय लिहून घेतलंय ते त्याचं त्यालाच कळायचं नाही. तिथल्याच लोकल एम.आय.डी.सी.मधे नोकरी करायचा. झकपक मुंबईत त्याला कुणी उभा केला नसता हे निश्चित. कुठलीही महत्वाकांक्षा नाही, ध्येय नाही, छंद नाही. राजू हा एक चेष्टेचा आणि टाईमपासचा विषय होता. लहान मुलं सुद्धा त्याची चेष्टा करायचे. (तो सुद्धा आता ५५ च्या आसपास असेल, कित्त्येक वर्षात भेटलेलो नाही.) लग्नं न झाल्यामुळे आपोआप पाळलं गेलेलं ब्रम्हचर्य.केवळ माणुसकी पोटी, कुठलंही काम करतो, असू दे, निदान पैसे खात नाही अशा काही कारणांमुळेच तो नोकरीत टिकून राहिला असावा.

सगळ्यात लहान सविता. तेलकट चेहरा, मधून भांग, केसाला चप्प तेल, दात पुढे, बारीकपणाच्या मर्यादा ओलांडलेली देहयष्टी, अभ्यासात यथा तथाच, तरी मुलींबरोबर ती हजेरीला तरी असायची. एकदा सगळ्या खेळत होत्या आणि वारा सुटलेला, त्या वा-यात ती पडली आणि तिला 'बुळी' नाव मिळालं. तेंव्हापासून ती कमी झाली. उंबरठ्यात उभी राहून तासंतास ती खेळ बघायची लांबून. न्यूनगंडानी उठली ती आयुष्यातून. गरिबीत माणसं निदान तोंडाळ तरी असतात, कुठवर ऐकून घ्यायचं या भावनेनी. सविता मुखदुर्बळ होती. तिचं मिसळणं कमी झालं, तारुण्याच्या उंबरठ्यावरचा न्यूनगंड, रूप नाही, हौस नाही, समजून घेणारं कुणी नाही, व्हायचा तो परिणाम झालाच. एकांताकडून वेडसरपणाकडे वाटचाल चालू झाली. शरीर बोंब मारत असणार, ती तरी काय करणार. एकटक बघत बसायची कुणाकडेही. कुणीही तिचा गैरफायदा घेतला नाही हे नशिब. रूप, आकार उकार नसल्याचा हा एकमेव फायदा.

चाळीतल्या एका मुलाचा हात धरला तिनी एकदा आणि लग्नं कर म्हणाली. गैरसमज होणं शक्यं नव्हतंच, मग तिला कोंडायला सुरवात झाली, व्हायोलंट व्हायची, तिची भीती वाटू लागली लोकांना. मग तिला वेड्यांच्या दवाखान्यात टाकलं. बरीच वर्षे असावी तिथे. आउटगोइंग नसलेली जागा ती. खंगून, झुरून, वासना दाबत ती तिथेच गेली. सगळ्या कुटुंबाची एकच पत्रिका असणार. कुणीही सुखी नाही. मुल नाही म्हणून आशाचा घटस्फोट झाला पण निदान तिला बँकेत नोकरी आहे, तात्या, कुलकर्णी वहिनी, सविता काळाच्या ओघात संपले, राजू आहे.

सविता आठवायचं कारण म्हणजे ती निरागस पण आवाज न करता हसायची. कुठेतरी पटकन बोलावसं वाटायचं तिलाही पण एकूणच वातावरण अभद्र होतं घरात. माझ्या बहिणीच्याच वयाची ती. दिवाळीत चाळीत सगळी मुलं कल्ला करायची, सविता नवीन कपडे घालून उंब-यात उभी असायची. कधी बालसुलभ इच्छा नसतील झाल्या तिला? सणासुदीला का कुणास ठाऊक काही लोकं मला हटकून आठवतात आणि बेचैन करतात.

शेक्सपिअर म्हणाला ते खरंच आहे 'नावात काय असतं?' काहीही नसतं ब-याचदा. नाव सविता पण तिच्या आयुष्यात सुर्य कधी उगवलाच नाही, जन्माला येताना संध्याकाळ घेऊन आली आणि नंतर उरली सगळे प्रश्नं संपवणारी, नाहीसे करणारी, सामावून घेणारी, चिरशांती देणारी रंगहीन रात्रं.



जयंत विद्वांस 

2 comments: