Monday 29 September 2014

पुन्हा पुन्हा......

पुन्हा पुन्हा...... 

थरथरे हात माझा
हात सोडताना तुझा
अडखळे श्वास माझा
आठवांनी तुझ्या पुन्हा

दाटलेले हुंदक्यांनी
कोंडलेला प्राण आहे
जळतो, तरी नंतर
नशिबी सरण पुन्हा


सांगताना गोष्टं माझी
तुझ्या समीप थांबते
पूर्ण ती होणार नाही
राहते अपुरी पुन्हा

जयंत विद्वांस

पुन्हा......

पुन्हा......
 
संपले क्षण सुखाचे
शल्यं झाली ताजी पुन्हा

खंगलेले भाग्यं अन्
उद्या जगायचे पुन्हा

अंधार माझा सोबती
उजेडी एकटी पुन्हा

शिवते एकेक टाका
उसवतो जरी पुन्हा

जटायूचा आव माझा
एकांती चिमणी पुन्हा

जयंत विद्वांस

Friday 12 September 2014

लल्याची पत्रं (१६) …'रजनीगंधा फूल तुम्हारे… '

लल्याची पत्रं (१६) …'रजनीगंधा फूल तुम्हारे… '
 
ब-याच दिवसात काही पत्रं नाही. काल एका च्यानलवर लागलं होतं 'रजनीगंधा फूल तुम्हारे…'. तीच 'आनंदची जोडी. योगेश आणि सलील चौधरी. हा चित्रपट काही मी पाहिलेला नाहीये पण दोन्ही गाणी मात्रं लक्षात आहेत त्यातली. एक मुकेशचं 'कई बार युंही देखा है' आणि हे एक लताचं. स्टोरी बिरी काय माहित नाही मला त्यामुळे सिच्युएशनल आहे का हे गाणं, माहित नाही. विद्या सिन्हा काय, अमोल पालेकर काय मला खूप आवडतात असं म्हणणारा माणूस मला सापडायचाय. पण दोघांनी खूप चांगल्या चित्रपटात कामं केली आहेत, इमाने इतबारे अगदी. मला तिचा 'इन्कार' आठवतो, मुळात तो लोकांना 'मुंगडा मुंगडा'साठी आठवतो यात तिचा दोष नाही. सणसणीत शरीरयष्टीची होती ती. तिचा 'सबूत' नावाचा थ्रिलर मी बालपणी पाहिला होता, एवढा आठवत नाही
आता. पुढे कुठे गायब झाली काय माहित. असो! 

या गाण्याची चाल अप्रतिम तर आहेच पण म्हणण्याचा जो स्लो स्पीड आहे ना त्यामुळे ते जास्तं चांगलं वाटतं मला. रात्रीच्या अंधारात ऐकावं हे गाणं (ती एक वेगळी यादी आहेच माझ्याकडे, डोळ्यात बोट घातलं तर दिसणार नाही अशा शांत एकांती अंधारात ऐकायच्या गाण्यांची). कोमल आणि शुद्ध असे दोन्ही गंधार आहेत त्यामुळे वेगळीच मजा येते ऐकायला. तांत्रिक भाग सोड पण अशी चाल बदलली की कानाला गोड लागतं एवढं खरं.

काही वेळा आपण नावं ऐकून गोष्टी ऐकतो, बघतो, लक्ष देतो. पण काही वेळेस असंही होतं नावं नसेनात का माहित लोकांना गाणी, गोष्टी माहित असतात. हे गाणं खूप लोकांना माहित असेल पण चित्रपट, हिरोईन, गीतकार, संगीतकार माहिती असेलंच असं नाही कारण ते समजल्यानी किंवा माहिती नसल्यानी ऐकण्याच्या आनंदात काहीही फरक पडणार नाहीये. हळूवार लिहिणं हे ऐ-यागै-याचं काम नाहीये. योगेश यात हातखंडा असलेला माणूस.  माणसाला खरं तर मुक्तं जगायला किती आवडतं, पण लादलेली आणि स्वत: लादून घेतलेली बंधनं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. शरीरावर हक्क सांगता येतो, मनावर? ज्याच्या त्याच्या हातात आहे ते, पण योगेश - तो म्हणतो, श्वासावर अधिकार दिलाय. क्या बात है! हे लोक असं अवघड लिहून जातात ना, आपल्या कल्पना दारिद्र्याची जाणीव करून देतात.कितना सुख हैं बंधन में ही ओळ ज्या पट्टीत म्हटलीये ना त्याला तोड नाहीये, अगदी गुपित सांगितल्यासारखी. बंधन लादून घ्यायचं आणि त्यात आनंदात रहायचं, किंबहुना त्यामुळेच जास्ती आनंद झालाय ही कल्पनाच रोमांचित करणारी आहे.

योगेश मोरपीस दौतीत बुडवून लिहितो बहुतेक. कल्पना सुद्धा हटके असतात. डोळ्यात फक्तं त्याचीच स्वप्नं घेऊन फिरतीये ती, प्रेमभावनेनी ओथंबलेला रंगबिरंगी ढग व्हायचं आणि त्याच्या अंगणात रितं व्हायचं. बाप्या माणूस बाईच्या मनातलं लिहितोय, दाद द्यायलाच हवी त्याच्या तरलतेला. विद्या सिन्हा त्या निशिगंधा इतकीच सुंदर, प्रसन्नं, ताजी दिसते. फास्ट गाण्यांपेक्षा हळुवार गाण्यांवर अभिनय करणं जरा अवघडच वाटतं मला. जागा भराव्या लागतात, टेम्पो स्लो असतो, कसब लागतं. आपल्या राशीजवळून नेपच्यून जात असेल तर दिवसभर आपण एकंच ओळ गुणगुणतो असं वाचलं होतं, आपल्या राशीत तो वस्तीलाच असावा बहुतेक.

--जयंत विद्वांस          

 

रजनीगंधा फूल तुम्हारे, महके यूँ ही जीवन में
यू ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में

अधिकार ये जब से साजन का हर धड़कन पर माना मैने
मैं जब से उन के साथ बँधी, ये भेद तभी जाना मैने
कितना सुख हैं बंधन में

हर पल मेरी इन आखों में बस रहते हैं सपने उन के
मन कहता हैं मैं रंगों की, एक प्यार भरी बदली बन के
बरसू उन के आँगन में

गीतकार : योगेश
गायक : लता मंगेशकर
संगीतकार : सलील चौधरी
चित्रपट : रजनीगंधा - 1974

Wednesday 10 September 2014

नंदुशेठ.....


 त्याची आणि माझी फार काही ओळख नाही. काही मुक्तछंद मी टाकले होते मराठी कविता समूहावर, त्यातला एक जरा बरा होता (मी काय म्हणते….) तो नंदुशेठनी शेअर केला, मग काहीवेळा बोलणं झालं (फेसबुकवर होतं ना, तसंच, फार काही भारी बिरी नाही). नंदुशेठ गझल लिहितो? नाही, तो लिहितो ती गझलच असते. माणसानी नेहमी चांगलं वाचत राहावं म्हणजे आपल्याला काय काय येत नाही ते कळतं. मला झाडाखाली न बसता हे ज्ञान प्राप्तं झालं आणि कविता हा आपला प्रांत नाही (गझल तर कोहिनूर समान आहे मला, दुर्मिळ, अप्राप्य, अशक्यं) याची जाणीव झाली.



शिंक कशी सहज येते तसं नंदू सहज लिहितो. कुठलाही आवेश, अविर्भाव मला त्याच्या लिहिण्यात दिसलेला नाही. त्याच्या इंग्रजी लिखाणावर तर मी आता न बोलणे उत्तम कारण माझे शब्दं कमी पडतात (वर्णन करण्यासाठी, इंग्लिशचे आहेतच कमी). मोहाच्या फुलांचा वास घेतला की कसं गरगरल्या सारखं होतं, तसं होतं. शब्दांनी संमोहित करायची जादू त्याच्या इंग्रजीत आहे. शेवटापर्यंत तो तुम्हांला वाचायला भाग पाडतो (कुण्या एकाची भ्रमणगाथा, तुंबाडचे खोत वाचताना तसं झालं होतं मला). एंड काय आहे, पुढे काय घडणार आहे का वेगळं, असल्या गोष्टींची गरज त्याच्या इंग्रजीला पडत नाही. लोक साध्या गोष्टींवर का लिहित नाहीत कारण त्यात काही चमकदार नसतं. नंदू शब्दसंग्रह आणि वाक्यरचनेच्या जोरावर साधी गोष्टं पण चमकदार करतो (मोटारसायकल-एक वेडा पोस्ट अभ्यासूंनी वाचावी). हाताला चव असते म्हणतात तशी त्याच्या लिखाणाला चव आहे.

दाद देणे, कुणी लिहिलंय यापेक्षा काय लिहिलंय ते वाचणे आणि त्याची पोच देणे हे त्याचे मोट्ठे गुण आहेत. 'जे जे आपणांसी ठावे…' च्या धर्तीवर तो 'जे जे चांगले आपणांसी ठावे…' ते सगळ्यांना सांगावे, हे सुद्धा स्वभावात लागतं. त्याचा गझलरंग मी आजवर दोनवेळा पाहिलाय. वाचन करताना कान योग्यं जागी दाद येतीये की नाही ह्यासाठी टवकारलेले असतात. पण छप्परतोड दाद आली तरी त्याचा शर्ट फार फुगत नाही. छातीशी हात लावून तो मान झुकवतो, पुढे सरकतो. शब्दांचे योग्यं (मूळ) आणि अभिप्रेत असलेले अर्थ तो वाचण्यातून बरोब्बर पोचवतो. अभिप्रेत अर्थाला आलेली दाद त्याला  सुखावून जाते (ऐका : … ही वेळ नाही). मग त्याच्या ब्रौन्झ चेह-यावर मस्तं तकाकी येते. कार्यक्रम सुरू असताना आपलं झालं की तो टिवल्या बावल्या करत नाही. दुस-याचं पण कान देऊन, लक्ष देऊन ऐकतो, कुणी काही जबरा बोलून गेलं की तो उठून टाळ्याही वाजवतो. ज्यातलं आपल्याला येत नाही त्या क्षेत्रातल्या माणसाचं कौतुक करतोच आपण, ज्यातलं आपल्यालाही येतं त्यात कुणाचं तरी कौतुक करणं यासाठी मोठं मन लागतं. त्याच्याकडे संकुचितपणा नाही.

पाच फुटाच्या आसपासचा नंदू असाच रहावा, नाव मोठं होईलच अजून. पाय हवेत गेले की भौतिक उंची वाढल्यासारखं वाटतं, नंदूची भौतिक उंची त्याच्या गुणांच्या, प्रसिद्धीच्या, लेखनाच्या दर्जाशी व्यस्त प्रमाणात राहो, ही सदिच्छा. मला जे दिसलं ते सांगितलं, कुणाला त्याचे अवगुणही माहित असतील पण मला त्याचाशी काही कर्तव्यं नाही. कुणाकडून घेता आलं तर चांगलं घ्यावं या मताचा मी आहे. वाईट गुण दुस-याचे कशाला घ्यायचे, आपल्या स्वत:कडे ते असतातच भरपूर. त्याचंही क्रेडिट का उगाच लोकाला द्या. असो! नंदुशेठ, तुम ऐसाच लिखता रहो!  




--जयंत विद्वांस

मुक्ताबाई…

तिसरीत असेन, पंचाहत्तरच्या सुमारास आम्ही पर्वती दर्शनला चाळीत रहायला आलो. पूरग्रस्त वसाहत. घरात फरशी नाही, आधीच्या माणसानी बिल भरलं नसल्यामुळे लाईट नाही, चार बि-हाडात एक संडास (त्यात आमच्या चौघांचा होता त्याचं भांड फुटल्यामुळे तो बंद, दुस-याकडे किल्ली मागावी लागायची), पाणी मागे नळ कोंडाळ्यावर भरावं लागे अशी सगळी परिस्थिती. संपूर्ण पर्वती दर्शनमधे चार ते पाच ब्राम्हण कुटुंब. समान धागा एकंच, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती एकसारखीच. शेजारी एकाबाजूला ओगले आणि दुस-या बाजूला मारणे.

माझ्या आईला ताई नाव तिथेच पडलं. तिच्या अर्ज करण्यामुळे संडास रिपेअर झाला. त्यामुळे वट वाढला. जातीमुळे मान आपोआपच मिळू लागला, चांगलं सांगणारं शेजार लाभल्याचा त्यांना आनंद झाला. मारण्यांची स्टोरी  फारच अवघड होती, तीन मुली, एक मुलगा, घरात लाईट नाही, नोकरी नाही. आंधळी सासू, परत आलेली मेव्हणी आणि ही सहा माणसं. कचकचून भांडायचे, सोप्पा उपाय दारू पिणे, मारणे पिऊन यायचे आणि कुणाला तरी एकाला रगडायचे, स्पेसिफिक असं कुणी नाही, जो पहिला हातात सापडेल तो. मुक्ताबाई त्यांची बायको. साडेचार फूट उंची, नऊवारी, मोठ्ठ कुंकू आणि चार वाक्यानंतर 'म्हणून म्हणलं' असं पालुपद.

त्यांची बहिण चार घरी कामं करायची, आमचं पाणी भरायच्या. मग मुक्ताबाई आमची धुणीभांडी करू लागल्या. जवळजवळ सत्तावीस वर्ष. बाबा दुकानात होते. तिथेच मारणे कामाला लागले मग मुक्ताबाई जाऊ लागल्या धान्यं निवडायला. लिहिता वाचता काही यायचं नाही, म्हटलं, बस कशी कळते, म्हणायच्या ४ चा आकार पाठ झालाय तो दिसला की आपली बस. प्रचंड कष्टाळू बाई. काम स्वच्छ, चोख, बसून दिवसात दोन दोन पोती धान्यं, डाळी निवडायच्या दुकानात. बसनी ये जा, आयुष्यात छत्री, रेनकोट, स्वेटर असली कुठलीही ऐश नाही, अगदीच उठवत नाही असं वाटलं तर डॉ.मेहंदळे बाईंना (यांच्यावर पण लिहिणार आहे) दर्शन द्यायच्या.

कधी दांडी नाही, खोटी कारणं नाहीत. त्यांच्या एवढं हंसासारखा शुभ्रं धुतलेला बनियन मी पाहिलेला नाही. आमचे कपडे खूप काळ टिकण्यात त्यांचाही वाटा आहे, पितळ्याचे डबे, भांडी अशा घासायच्या की खराब होतील या भीतीने हात लावायला लाज वाटली पाहिजे. कधीही कपड्याला, भांड्याला साबण, पावडर राहिलीये असं चुक्कून नाही. स्वच्छपणा, टापटीप, काम आपलं समजून करणे या गोष्टी मुळात स्वभावात लागतात, तिथे शिक्षणाचा संबंध काही नाही. एक पितळ्याचा कडीकोयंडा असलेला डबा आहे आमच्याकडे (ते डबे कसे आले त्याची स्टोरी परत कधीतरी), कधीही त्या कोयंड्याच्या कडेनी, कपाचे, कढइचे कान -   हिरवं राहिलेलं किंवा काळपटपणा पाहिलेला नाही. फरशी अशी पुसायच्या की संगमरवरावरून फिरतोय असं वाटावं.
 
अनेक वर्ष पगार घेतलाच नाही हातात. मुलींची काळजी, आईच्या नावावर रिकरिंग काढायच्या. तिन्ही मुलींची लग्नं त्या बाईनी एकटीच्या हिमतीवर केली, पुढे नव-यानी माळ घातली. तो त्रास संपला. त्यांचे दोनेक लाख आईच्या नावावर होते. दोन वर्षामागे आई एकदा त्यांनी म्हणाली, अहो तुमचे पैसे तुमच्या नावावर ठेवा, उद्या मला काही झालं तर तुमचे पैसे आहेत हे कुणाला माहित नाही, बुडतील तुमचे. त्या जे म्हणाल्या ते आपण नाही म्हणू शकत. भाबडेपणाला पण यश असतं जगात. म्हणाल्या, आयुष्यं तुमच्या मदतीनी चांगलं गेलं, अन्नाला, नोकरीला लावलंत, अडीअडचणीला उभे राहिलात मागे कायम, मुलींची लग्नं झाली, सुखात आहे, तुमच्या मुलांना मिळाले म्हणून मला वाईट नाही वाटणार.

चार वर्षामागे मारणे गेले. मुक्ताबाई दोन आठवड्यापूर्वीच घरी येउन गेल्या. कमरेत वाकल्यात, बोळकं झालंय, केस पांढरे झालेत, चेह-याचं अगदी पिंपळपान झालंय. माझ्या मुलीला त्यांनीच आंघोळ घातलीये. आर्या म्हणायची, या आज्जींचे हात एवढे खरखरीत कसे? म्हटलं आपल्या भांड्यांवरून हात फिरव, त्यांचे हात खरखरीत आहेत म्हणून ते डबे अजून स्मूथ लागतायेत हाताला. अजून कुठे पांढरं स्वच्छ काही नजरेला पडलं की मुक्ताबाई डोळ्यापुढे येतात, येत रहातील.



--जयंत विद्वांस  

  

Tuesday 9 September 2014

उकडीचा मोदक......

चला, उठायला हवं. वाजलेत तरी किती बघूयात. साडेसहा? बापरे, शेजारचे विनायकराव तयारही झाले असतील बोंबट्या मारत आले कसे नाहीत म्हणतो मी. रात्री डेकोरेशनच्या नावाखाली चांगलाच उशीर झाला. डेकोरेशन कसलं हो, उगाच आपलं झिरमिळ्या सोडल्या दहा बारा. मागे वहिनींची गुलाबी साडी लावली, पुढे चौरंग, दोन फ्लॉवर पॉट. संपली ताकद. मुळात डेकोरेशन कारण नव्हतंच उशिर व्हायला, गप्पा मारल्याने उशीर झाला. मी कोकणातला, त्यामुळे माझ्याकडे किस्से रग्गड, विनायकराव देशावरचे अघळपघळ. पण म्हातारपणात जात निघून जाते का हो? मी ही हल्ली गप्पा ठोकत वेळ काढतो.

दरवर्षी आम्ही याच गप्पा मारतो. बालपणापासूनचे, शहरातले, गणेशोत्सव आणि बदल काय काय झाले ते. परत जर जन्मं येणार असेल ना तर मला मात्रं तो कोकणातच हवा. ती मजा बदलत्या काळाप्रमाणे नाही येणार कदाचित पण तरीही तिथेच हवा. आता कोकणात कुणीही नाहीये माझं. वाडवडिलार्जीत घर आहे मोडकळीला आलेलं. पाडण्यापेक्षा आपोआप पडलेलं बरं म्हणून तिथे एकही वारस जात नाही (कारण पाडण्याचा खर्च जास्तं आहे हा अस्सल कोकणी विचार त्यापाठीमागे आहे). असो! तर मुद्दा होता गणेशोत्सवाचा (म्हटलं ना मी ही अघळपघळ बोलतो हल्ली). काय गम्मत असते बघा, जुने वाईट दिवस आठवून माणसं रडत नाहीत कधी, उलट क्वचित वाट्याला आलेले चार चांगले, सणासुदीचे, मायेचे दिवस आठवून रडतात.

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, तिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, 'झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, एस्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी' असं म्हणायची. मला कायम प्रश्नं पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? एकदा धपाटा घालून म्हणाली, रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं  होतं. आता यातलं कुणीही नाही. आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी.

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ये इकडे, तिचं संपायचं नाही. सात दिवस हा हा म्हणता सरायचे. विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ असं वाटत असावं का?  आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या. मग भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे.

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्या विना. उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मी तयार आहे. पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  प्रत्येकाची अनंत चतुर्दशी ठरलेली आहे, कधी? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. चला आता सगळंच घाईनी आवरायला हवंय.


--जयंत विद्वांस