Tuesday 9 September 2014

उकडीचा मोदक......

चला, उठायला हवं. वाजलेत तरी किती बघूयात. साडेसहा? बापरे, शेजारचे विनायकराव तयारही झाले असतील बोंबट्या मारत आले कसे नाहीत म्हणतो मी. रात्री डेकोरेशनच्या नावाखाली चांगलाच उशीर झाला. डेकोरेशन कसलं हो, उगाच आपलं झिरमिळ्या सोडल्या दहा बारा. मागे वहिनींची गुलाबी साडी लावली, पुढे चौरंग, दोन फ्लॉवर पॉट. संपली ताकद. मुळात डेकोरेशन कारण नव्हतंच उशिर व्हायला, गप्पा मारल्याने उशीर झाला. मी कोकणातला, त्यामुळे माझ्याकडे किस्से रग्गड, विनायकराव देशावरचे अघळपघळ. पण म्हातारपणात जात निघून जाते का हो? मी ही हल्ली गप्पा ठोकत वेळ काढतो.

दरवर्षी आम्ही याच गप्पा मारतो. बालपणापासूनचे, शहरातले, गणेशोत्सव आणि बदल काय काय झाले ते. परत जर जन्मं येणार असेल ना तर मला मात्रं तो कोकणातच हवा. ती मजा बदलत्या काळाप्रमाणे नाही येणार कदाचित पण तरीही तिथेच हवा. आता कोकणात कुणीही नाहीये माझं. वाडवडिलार्जीत घर आहे मोडकळीला आलेलं. पाडण्यापेक्षा आपोआप पडलेलं बरं म्हणून तिथे एकही वारस जात नाही (कारण पाडण्याचा खर्च जास्तं आहे हा अस्सल कोकणी विचार त्यापाठीमागे आहे). असो! तर मुद्दा होता गणेशोत्सवाचा (म्हटलं ना मी ही अघळपघळ बोलतो हल्ली). काय गम्मत असते बघा, जुने वाईट दिवस आठवून माणसं रडत नाहीत कधी, उलट क्वचित वाट्याला आलेले चार चांगले, सणासुदीचे, मायेचे दिवस आठवून रडतात.

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, तिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, 'झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, एस्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी' असं म्हणायची. मला कायम प्रश्नं पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? एकदा धपाटा घालून म्हणाली, रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं  होतं. आता यातलं कुणीही नाही. आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी.

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची. आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ये इकडे, तिचं संपायचं नाही. सात दिवस हा हा म्हणता सरायचे. विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे. लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं. आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ असं वाटत असावं का?  आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या. मग भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे.

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता. त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्या विना. उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं. आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता. पाटावर बसून मी तयार आहे. पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  प्रत्येकाची अनंत चतुर्दशी ठरलेली आहे, कधी? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. चला आता सगळंच घाईनी आवरायला हवंय.


--जयंत विद्वांस  

1 comment:

  1. "विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा! प्रत्येकाची अनंत चतुर्दशी ठरलेली आहे, कधी? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं"

    Farch sundar

    ReplyDelete