Thursday 28 June 2018

चकवा...


चकवा...

अभद्र कथा लिहिल्यावर ब-याच जणांनी भुताखेताचे अनुभव आलेत का कधी असं विचारलं होतं. तसे अनुभव कधीच आले नाहीत. कोकण डोकावत असलं काही कथांतून तरी मी काही फार कोकणात राहिलेलो नाही किंवा तिथले असले अनुभवही नाहीत. सहसा हे अनुभव ऐकीव असतात. ते सांगणा-या माणसाला दुस-या कुणीतरी सांगितलेले असतात. अर्थात कोकणात मी स्वतः पाहिलंय असं सांगणारी पाचपन्नास माणसं सहज मिळतील. 'चकवा' नावाचा एक प्रकार असतो. तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी परत तिथेच येता असा प्रकार असतो त्यात अर्थात त्याचे अनेक किस्से आहेत ऐकलेले पण अनुभवलेला एकंच आहे. अर्थात त्याला चकवा म्हणायचं का हे माहित नाही. आता चिंचवड, आकुर्डी कायच्याकाय बदलून गेलं. मी सांगतोय गोष्टं ८६/८७ ची.

पिंपरीला आत्या रहायची. काकांना घेऊन तिच्याकडे गेलो होतो. आकुर्डीला अजून एक जण रहायचे त्यांच्याकडे जायचं होतं. त्यांच्याकडे मी एकदा गेलो होतो आधी. सहसा मी रस्ता विसरत नाही. बजाज ऑटोच्या समोरच्या गल्लीतून गेल्यावर मला कसं जायचं ते माहित होतं. आम्ही बसने उतरलो. सहा साडेसहा वाजले असतील. एका गल्लीतून गेलो तर समोर रेल्वेलाईन आली. त्यांच्या घरी जाताना ती लागायची नाही हे कन्फर्म होतं. मागे आलो, अलीकडच्या गल्लीत शिरलो, परत रेल्वेलाईन. असं अजून एकदा झालं. मग रिक्षास्टॅन्डला गेलो. विठ्ठलमंदिराजवळ एवढंच माहित होतं. तो म्हणाला, दोन आहेत, खालचं की वरचं? आता आली का पंचाईत. तोवर अंधार पडलेला. काका म्हणाले, राहू दे, सकाळी येऊ. आम्ही परत पिंपरीला आलो. बसमधे येताना त्यांनी मला चकवा प्रकार काय असतो ते सांगितलं. रिक्षेवाल्यानी आम्हांला नक्कीच गंडवलं असतं आणि फिरवून पैसे काढले असते. आम्ही एका संकटातून वाचल्याचा आनंद झालेला मला.

आम्ही सकाळी परत निघालो बसने, बजाज ऑटोला उतरलो. समोरच्या गल्लीत गेलो. तिथून दहा पंधरा मिनिटात चालत त्यांच्या घरी गेलो. झालं काही नव्हतं, अंधारात मी बस थांबली त्या समोरच्या गल्लीत शिरल्यामुळे खरंतर रेल्वेलाईन आली होती. पलीकडच्या गल्लीत जायच्या ऐवजी दोनदा अजून अलीकडच्या गल्लीत शिरल्यामुळे रेल्वेलाईन आली. तेंव्हा आणि आताही हसू येत असलं तरी सलग तीनवेळा रेल्वेलाईन, अंधार, निर्मनुष्यं रस्ता वगैरे अनुभव थ्रिलिंग होता. अनुभव हे नेहमी ऐकायला थ्रिलिंग असतात, ते जो अनुभवतो त्याची काय फाटलेली असते ते त्याचं त्यालाच माहित. माझ्या सास-यांच्या बाबतीत असं झालं होतं. ष्टोरी ऐकताना लय भारी वाटतं पण आपण स्वतःला त्याजागी बघितलं की घाम सुटतो. गणपती पुळ्याच्या रोडला एका गावात ते पूजा की कायतरी कामाला गेले होते. बरोबर अजून चारपाचजण होते. बाकी माणसं पाच वाजेस्तोवर आपापल्या घरी पण आली. कोकणी माणूस गप्पिष्ट त्यामुळे कुठे गप्पा मारत असतील उभे म्हणून फार फॉलोअप नाही झाला. सात, आठ वाजले तरी पत्ता नाही मग फोन झाले. बाकीची माणसं कधीच घरी आली म्हटल्यावर सासूच्या मनात नाय नाय ते. त्यात तुफ्फान कोकणातला पाऊस. एकटी बाई कुठे जाणार रात्री शोधायला. ज्यांच्या घरी गेले होते, ते म्हणाले आमच्याकडून दुपारीच गेले.

मग माणसं गेली दुस-या दिवशी सकाळी शोधायला. बरं शोधायचं कुठे. निर्मनुष्यं जंगलं जास्ती. दुस-या दिवशी संध्याकाळी चार वाजता एक पोरगी म्हणाली, एक म्हातारबा बसून आहेत तिकडे झाडाखाली. मग ते सापडले आणि घरी आणलं. एसटीच्या रस्त्याला येताना त्यांची पायवाट चुकली आणि ते जंगलात जात राहिले. त्यात मिट्ट काळोख आणि तुफान पाऊस. एका झाडाखाली ते रात्रंभर बसून होते पावसात भिजत. पोटात काहीही नाही. बरं, दुस-या दिवशी काय करावं ते सुचलंच नाही त्यांना. झपाटले गेले असा सगळ्यांचा सूर होता. त्यामुळे ते एकाच जागी रात्रंभर भिजून तसेच बसून होते. घरी आणल्यावर कोकणातले सगळे उपाय करून झाले. पण तेंव्हापासून त्यांची तब्येत ढासळत गेली ती शेवटपर्यंत. त्यांच्या स्वभावात पण बराच फरक पडला. नक्की काय झालं असेल ते त्यांच्या गावच्या झोळाईला माहित.

भुतंखेतं आणि त्यांचे अनेक प्रकार या गोष्टी वाचायला, चघळायला, तिखटमीठ टाकायला सुरस असतात. अनुभवतो तो माणूस हे सगळं विसरत असणार त्यावेळी. मग देवगण आहे की मनुष्यगण, आज अमावस्या की पौर्णिमा वगैरे गोष्टी या फक्तं त्यातून सुटका झाल्यानंतरच्या खमंग चर्चेसाठी असतात. अभद्र लिहिताना ते एक बरं असतं, आपण अनुभवण्याची गरज नाही, ऐकीव माहितीवर किंवा वाईट सुचण्यावर आपल्या कल्पनेचं कलम केलं की जमतंय.

चकवा, वाचायलाच बरा, अनुभव नको रे बाबा.

जयंत विद्वांस



Wednesday 27 June 2018

आदर्श...

एक तिरंदाज सरावासाठी जंगलात जातो. बघतो तर अनेक झाडांवर गोल आणि त्याच्या मध्यात अचूक बाण मारलेले. आश्चर्याने त्याने चौकशी केली तेंव्हा त्याच्यासमोर एका मुलाला आणून उभं केलं गेलं.
'काय रे, कसा काय एवढा अचूक नेम साधतोस?'

'मी आधी बाण मारतो आणि मग त्याच्याभोवती वर्तुळ काढतो'.

तो पोरगा आदर्श आहे आपला. पोस्ट चांगली जमली तरंच टाकायची अन्यथा बाद करायची म्हणजे मग 'नेहमीप्रमाणे अप्रतिम' अश्या कॉमेंट्स येण्याची दाट शक्यता असते.

आधी वर्तुळ काढून मग बाण मारायला जमेल तेंव्हा जमेल, तोपर्यंत....

:P  :P :P

जयंत विद्वांस