Monday 9 November 2015

मोठेपणी कोण होणार?.....

मोठेपणी कोण होणार?.....

आपण जन्माला येतो तेंव्हा काही माहित नसतं आपण पुढे कोण होणार ते. हाक मारायला बरं म्हणून आपलं नाव ठेवतात. मग ते आपल्याला चिकटतं ते कायमचंच. ते पुढं मोठं होतं की नाही ते आपल्या बुद्धीवर, मिळणा-या संधीवर, लायकीवर, कर्तुत्वावर अवलंबून असतं. लहानपणापासून आपले कुणी न कुणी वयपरत्वे आदर्श असतात. फार काळ प्रभाव टिकेल असं कुणी नसतं खरंतर पण आपल्याला अमक्या ढमक्या सारखं वागायची, रहायची सुरसुरी येते आणि आपण कळत नकळत अनुकरण करतो. आपण काय वाचतो, बघतो त्याप्रमाणे हंगामी विचार मनात रुजतो आणि नाहीसा पण होतो. माझ्या मनात तर नेते स्टेटमेंट नाकारायला जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा फास्ट बदल घडतात.

लहानपणी कुणाचं तरी चरित्रं वाचलं आणि ठरवलं, आपल्यालाही या माणसासारखं मोठं व्हायचंय. काय करता येईल? त्यांनी जे जे केलं ते आपण करायचं म्हणजे नाव होईल असा माझा समज. 'ते' दिवे नसल्यामुळे कंदिलात अभ्यास करायचे असं होतं त्यात. मी मुळात लहानपणापासून स्वयंघोषित हुशार आहे. हे मी सोडून कुणालाही आजतागायत पटलेलं नाही हा भाग वेगळा. माळ्यावरून मी कंदील काढला कुणाला समजू न देता. दिवसभर काहीही अभ्यास केला नाही, अंधार पडायची वाट बघितली. आईनी लाईट लावला आणि कुठेतरी बाहेर गेली. मी आधीच पुसून ठेवलेला कंदील काढला, त्यात रॉकेल घातलं, वात वर काढून कात्रीनी कापली, अजून थोडी वर घेण्याच्या नादात ती त्या खाचेतून बाहेर आली आणि रॉकेल सांडलं. तरीही मी तिला परत आत घालून सेट केलं. काच व्यवस्थित बसवून वात मोठी केली आणि लाईट घालवला. सवय नसल्यामुळे काहीही दिसत नव्हतं पुस्तकातलं. म्हणून वात मोठी केली तर कंदील भगभगला आणि वर काच काळी व्हायला लागली. 


लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. उठलो, फडकं ओलं करून घेतलं, म्हटलं रोज अभ्यास करायचाय, मोठं व्हायचंय, काच स्वच्छ पाहिजे. पुसायला गेलो, काडकन आवाज आला, तडकली काच, सगळीकडे तुकडे, हात काळे, तोंडावर काळं, रॉकेलचा वास सगळीकडे. तेवढ्यात आई आली. तिला वाटलं दिवे गेले. काळजीने मला हाक मारली. म्हटलं, बटण दाब, आहेत लाईट. बटण दाबल्यावर दिवा लागला आणि मग मी लावलेले दिवे दिसले, त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. काचा गोळा करून, कंदील जागेवर ठेऊन मग मला तोंडानी सांगून समजत नसल्यामुळे ठोकून काढण्यात आलं आणि महाराष्ट्र कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून मोठा होऊ घातलेल्या माणसाला मुकला. कसा अभ्यास करणार सांगा ध्येयं संपल्यावर. अशी किती असेल काचेची किंमत? पण पुढे एक नररत्नं पूर्णत्वाला गेलं नाही याचा तोटा किती हे कुणी लक्षात घेत नाही याचं दु:खं (अर्थात मला एकट्यालाच) जास्ती आहे. 

पुण्यात ते टोळी युद्धं चालू होतं त्यावेळी. मला वाटायला लागलं भाई व्हावं. काय साली दहशत असते. हिंदी पिक्चरमूळे तर अजूनच भारी वाटायचं. आजूबाजूला बघायची खोटी, 'हुकुम' म्हणत माणसं धावत येतात, रिझल्ट दिला नाही, खाली हाथ वापस आया, डायरेक्ट गोळी घालायची. सगळ्या स्कॉचच्या बाटल्या भिंतीला लावलेल्या, हातात सिगार, गॉगल, एकापेक्षा एक टंच बायका अंगाला सतत चिकटून, फोन आला तर उचलून द्यायला सुद्धा माणूस, प्लायमाउथ सारख्या लांबसडक गाड्या, फिटिंगचे भारी कपडे, पॉलीश्ड शूज, बप्पी लाहिरी सारखे अंगावर दागिने, हिरोईनला पाहिजे तेंव्हा पळवता येण्याची मुभा. बरं मला सगळं असंच हवं होतं असंही नाही, मध्यमवर्गीय अपेक्षेप्रमाणे यातलं पन्नास टक्के पण चाललं असतं. मग निरीक्षणाला सुरवात केली. पहिल्यापासून माझं ते काम चोख आहे, डिटेलिंग परफेक्ट पाहिजे. मी तर यावेळी लिस्टच केली. भ आणि इतर वर्णाक्षरापासून सुरवात होणा-या शिव्या लिहून काढल्या. काही आल्टर करून नवनिर्मिती केली. आई** ऐवजी आय**, भेंचो* ऐवजी भैsssन्चो* असं आलाप, तानयुक्तं म्हटलं की वजन येतं हे लक्षात आलं. त्या कुणी ऐकायला नसेल त्यावेळेस उच्चारून पाठ केल्या.  

शरीराचे विविध अवयव गुंफून, हाताची बोटं वापरून पण शिव्या देता येतात त्याची माहिती गोळा केली. (ही कला लोप पावतीये हल्ली याचा विचार व्हायला हवा). असो! तर हिंदी प्रथमा, द्वितीया परीक्षा द्याव्यात तसा मी ज्ञानसंपन्नं होत होतो. आता थिअरी पक्की झाली होती. इतर अभ्यासात पुढील गोष्टींची टिपणं काढली  - दम कसा द्यावा, भांडण कसं उकरून काढावं, खुन्नस देण्यासाठी विशिष्ठ पद्धतीनी कसं थुंकावं, शर्टची बटणं कुठल्यावेळी एक, कुठल्यावेळी दोन उघडी ठेवावीत, कल्ला, हेअरस्टाईल कशी हवी, पारदर्शक पांढ-या शर्टात हिरवी, लाल बनियन कधी घालायची, गळ्यात काळा दोरा, मनगटाला चार पाच विविध रंगाचे दोरे कसे बांधावेत, सिग्रेट काडेपेटीनी कधी, लायटरनी कधी पेटवायची, खिशात सफरचंद कापायचा चाकू ठेवायचा की बटण दाबल्यावर फाटकन बाहेर येतो तो की खाली वाकून बुटातून करकर आवाज करत उघडल्यावर तळपतो तसा ठेवावा. एक मुद्दा म्हणून सोडला नव्हता बघा पण व्हायचं तेच झालं, ते ही स्वप्नं धुळीला मिळालं. 

आम्ही क्रिकेटची म्याच घेतली होती. मागची खुन्नस होतीच. मागच्या वेळेला त्यांनी, आमच्या ब्याटिंगची वेळ आल्यावर, तुम्ही जिंकलात असं म्हणून फुकट फिल्डिंग करून घेतलेली. यावेळेला आम्ही वचपा काढायचं ठरवलं. आधी आमची ब्याटिंग या बोलीवर ठरवली म्याच. आमची इनिंग झाल्यावर मी अप्रेंटीस भाई पुढे आलो आणि म्हणालो, 'तुम्ही जिंकलात, आम्ही चाललो घरी' आणि आम्ही निघून आलो. आता जलद चालण्याला कुणी पळणं म्हणत असेल तर बोलणंच खुंटलं. येताना फक्तं चारी बाजूंनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव चालू होता, महागुरू सचिन सारखं मी ही 'गेल्या पंधरा सोळा वर्षातले माझे दमदाटीचे किस्से' यावर सांगत माझ्याबद्दल आणि फक्तं माझ्याबद्दलच बोलून हातभार लावत होतो. घरापाशी आल्यावर मुलं कौतुकमिश्रित नजरेनी पहात आपापल्या घरी गेली. मी ही आलो घरी. पाऊल ठेवल्या ठेवल्या आईनी विचारलं, ब्याट कुठाय? जेम्स ह्याडली चेसच्या पुस्तकात शेवटच्या क्षणी अचूक आखणी केलेला, त्रुटी रहीत मास्टर प्लान सुद्धा जसा धुळीला मिळतो नं तसं झालं.

मी सर्वस्वं गमावल्यासारखा, एके हंगल पेक्षा पडलेला चेहरा घेऊन परत एकटा मैदानावर गेलो.  त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. गेल्या गेल्या सगळ्यांनी कानफटवून झालं, शरीराच्या शक्यतो सगळ्या अवयवांचा वाक्यात उपयोग करून झाला, तीन तास उन्हातान्हात फिल्डिंग करून घेतली. थिअरी शिकलो पण कर्णासारखा आयत्यावेळी महत्वाचा मुद्दा विसरलो, "दुश्मन के अड्डे पर कभी अकेले नही जानेका". लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. ब्याट मिळाली पण स्वप्नं धुळीला मिळालं, त्यामुळे आत्मविश्वास पार दो गज जमीन के नीचे गेला. मी काय म्हणतो, गेला बाजार राजनसारखं इंडोनेशियातून नसतं आणलं अगदी मला पण नेपाळ बॉर्डर, गोव्यातल्या एखाद्या बोटीवरून, काहीच नाही तर निदान तळजाईच्या टेकाडावरल्या एखाद्या झुडपातून तरी उचलून आणलाच असता की. स्वप्नं बघणं आपल्या हातात असतं पूर्ण होऊ देणं, न देणं त्याच्या हातात असतं म्हणा. 


त्यानंतर अनेक वेळा काय बनायचं ते ठरवत गेलो आणि फिसकटतही गेलं. फक्तं अंगावर माप घेणारा अशी पाटी लावून लेडीज टेलर व्हावं, तहहयात सुग्रास जेवणासाठी हॉटेलमालक व्हावं, सतत गाड्यातून फिरायला मिळावं म्हणून ड्रायव्हर व्हावं, स्वप्नात येणा-या नट्यांबरोबर लव्हसीन मनासारखे होईपर्यंत रिटेक घेणारा परफेक्शनिस्ट कलाकार व्हावं, गर्दीचा त्रास नको म्हणून मोटरमन किंवा गार्ड व्हावं, जाहिराती मिळतील म्हणून क्रिकेटर किंवा टेनिसपटू व्हावं, रग्गड पैसे खाता यावेत म्हणून पीडब्ल्यूडी मधे लागावं, कुणालाही हाणता येतं म्हणून इन्स्पेक्टर व्हावं, प्रसिद्धी, मानमरातब मिळतात म्हणून गायक, वादक व्हावं अशी भुछत्राएवढीच टिकणारी हंगामी आणि कुवतीबाहेरची स्वप्नंही पाहून झाली. मुळात ठरवल्याप्रमाणे सगळं व्हायला पण तसं नशिबात असावं लागतं. त्या त्या वेळेला सुचेल ते आपण करत जातो. मोठी माणसं आपल्यावर कळत नकळत लादत रहातात आपण काय व्हायचं ते. "तुला काय वाटतंय, काय व्हावंस तू?' असं विचारायला हवं खरंतर. मला मात्रं असं कुणी, काहीही लादलं नाही. मिळेल ते करत गेलो एवढंच, त्यामुळे अपयश काही असेल तर ते माझ्या एकट्यामुळे आहे.

आता मागे वळून बघताना वाटतं आपण हे अमूक अमूक होऊ शकलो असतो, हे जरा अजून बरं करता आलं असतं, हे जरा चुकलंच, ते जरा सुधारता आलं असतं पण फार काही खंतावण्यासारखं नाहीये हे ही आहे. प्रत्येकाची एक कुवत असते आणि ती त्याला माहित असते. त्यामुळे चारचौघात कितीही बढाया मारल्या तरी स्वत:ला माहित असतं खरं काय ते. अशावेळी मला 'यादोंकी बारात' मधे कणेकर कुंदनलाल सहगलवर लिहितात ते आठवतं. सहगल गेल्यावर त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक मित्रं सगळं चंबूगबाळं आवरून कायमचा कलकत्त्याला निघून गेला. सहगलबद्दल तो म्हणाला, 'कुंदन दोस्त बडा अच्छा था'. मला कायम त्या वाक्याचं कौतुक वाटत आलाय. एखादा माणूस त्याच्या गायकीबद्दल, अभिनयाबद्दल बोलला असता, त्याच्या मी किती जवळचा होतो वगैरे सांगितलं असतं पण त्याच्या दृष्टीने तो एक चांगला मित्रं, माणूस म्हणून प्रथमस्थानी होता. मानमरातब, हुद्दा, श्रीमंती, कर्तुत्व हयात असताना मोजलं जातं, नंतर तुम्ही कसे होतात, कसे वागलात याचीच चर्चा जास्ती होते. 

कदाचित मोठेपणी मी फक्तं वयानी मोठा झालो असेन पण सहगलच्या मित्राप्रमाणे चार लोकांनी हयातीत किंवा नंतर ''तसा माणूस बरा होता'' एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे, बाकी काही नाही.  

जयंत विद्वांस