Monday 29 December 2014

आदमी उठ जाता है.....

प्रिंट मिडीआ काय आणि च्यानल्स काय यांच्यासाठी काहीतरी आचारसंहिता, कायदा, दंडात्मक कारवाई करणं असे उपाय गरजेचे आहेत. अर्धवट माहिती बोंबलून सांगायची आणि एखाद्याला आयुष्यातून उठवायचं. बरं, वाचणारे, पाहणारे पण इतके हरामखोर असतात की त्याच बातमीवरच्या खुलाश्यांकडे त्यांचं लक्ष जात नाही. च्यानल्सवर चालणा-या एकांगी चर्चा, एखादयाला कॉर्नर करून वदवून घ्यायच्या पद्धती आणि त्यातून निर्माण होणारे वाद, एकूणच किळसवाणा प्रकार असतो. तरुण वयात चमकण्याची संधी मिळते म्हणून असं होतं, हे म्हणायलाही वाव नाही, दिग्गज लोक हक्क असल्यासारखा तोच प्रकार करत असतात. चटपटीत, निरुत्तर करता येईल असं बोलता येणं हे क्वालिफिकेशन हवं, ज्ञान कमी असलं तरी चालेल, माहिती जास्तं हवी. 

शिरीष कणेकरांनी सांगितलेला किस्सा आहे. संपादकांनी तरुण पत्रकार पोरीला काम सांगितलं, 'परवा आंबेडकर जयंती आहे त्यांच्यावर लिहा काहीतरी'. पोरगी पंधरा वीस मिनिटांनी खूप श्रम करून आली आणि म्हणाली 'But he is not in Directory'. संपादक काय करेल आता यावर. एकूणच चकमकाट जास्ती आहे सगळा. दिखावा, सूज आहे, ताकद कमी. व्यासंग कमी आणि इंस्टन्ट अभ्यास दांडगा. आपण जे बोलतोय, छापतोय याची शहानिशा करावी, त्या माणसाची बाजूही छापावी, आधी मोघम बातमी देऊन पूर्ण बातमी संपूर्ण सत्यं कळाल्यावर द्यावी वगैरे प्रकार अस्तित्वात नाहीत. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे पुढची गोष्टं (अजून एक आहे पण ती नंतर कधीतरी) -
    
मित्रमंडळ कॉलनी मधे एक दातांचे डॉक्टर आहेत. गेली पस्तीस एक वर्ष त्यांचा दवाखाना आहे. सज्जन माणूस. मी, माझ्या आईने त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. एक तर पार्टीशन घालून केलेला दवाखाना,  चाललंय ते बाहेर दिसू शकेल असा. एका भल्या सकाळी पेपरला बातमी आली 'डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग'. 'काल पर्वती दर्शन येथे अमुकतमुक डॉक्टरांनी ढमुक महिलेचा विनयभंग केला, तिच्या नव-यानी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे'. नाव, पत्ता सगळं बिनचूक. जंगी बातमी होती. आश्चर्य वाटलं. रिकामटेकड्या लोकांनी आपापल्या परीनी मसाला घालून शरीरसंबंधाच्या जवळपास बातमी आणली असणार.

दोन दिवसांनी आतल्या पानावर छोटा खुलासा छापून आला होता. त्या बाईचा नवरा दारू पिऊन ट्रीटमेंटला गेलेला. डॉक्टरांनी त्याला सभ्यं भाषेत सांगितलं, 'शुद्धीवर असताना या'. अपमानच की हा त्या पेशंटचा. त्याची बायकोही त्याच्या लेव्हलचीच असणार. या अत्यंत मानहानिकारक अपमानाचा बदल घ्यायलाच हवा. दोघं तडक पोलीस चौकीत गेले. पोलिसांनाही काम नसणार, तक्रार करणा-याची शारीरिक अवस्था दिसली नसावी बहुतेक. त्यांनी लगेच त्याची ब्रेकिंग न्यूज केली. काय मिळालं हा प्रश्नं आहेच. हिंदी/साउथचे देमार पिक्चर तुफान चालायचं हे एक कारण आहे. डॉक्टरांनी तिथेच वाजवायला हवं होतं फिल्मी स्टाईल. चुकलंच त्याचं. कार्यतत्पर पोलिसांनी विनासायास बसल्या जागी, एका सज्जन माणसाला आयुष्यभर लक्षात राहील अशी कुप्रसिद्धी मिळवून दिली.  


छापणा-याला काय घाई होती एवढी? डॉक्टर हा खालच्या दर्जाचा माणूस आहे? त्याचं स्टेटमेंट छापायला नको? दोन  दिवसांनी सॉरी म्हणून त्याची गेलेली पत कशी परत येणार? अशीच दुसरी एक जीवघेणी स्टोरी आहे, ती परत कधी तरी. स्टोरी शब्दं चुकीचा आहे कारण ज्याच्या बाबतीत घडतं त्याला तो कडू घोट असतो. 

जयंत विद्वांस   

Thursday 25 December 2014

साबळेमामा.....

पर्वती दर्शनला चाळीत रहायचो तेंव्हा. एका रात्री समोरच्या साळवींच्या दारालगतच्या कट्ट्यावर साबळेमामा अवतीर्ण झाले. पाच फुटाच्या आतली उंची, टिळकांसारख्या झुबेकदार पांढ-या मिशा, टोपी, नेहरू शर्ट आणि धोतर कुठल्याही जगन्मान्यं वाशिंग पावडरला हात टेकायला लावतील अशा, वर्णन करायला मराठी भाषा अपुरी आहे असं वाटायला लावणा-या, मातकट रंगाला पोचलेलं. बरोबर एक वळकटी, एक बंडी आणि एक धोतर अतिरिक्त आणि सुतारकामाच्या हत्यारांनी भरलेलं एक गोणपाट, एवढीच स्थावर जंगम मालमत्ता. सुतारकाम करायचे ते.

माणुसकी तेंव्हा घराघरात शिल्लक होती. कोण कुठले महाबळेश्वरजवळच्या एका खेड्यातले साबळे मामा, आधी कधी इथे केलेल्या कामावर, जुजबी ओळखीवर जगायला पुण्यात आले, स्थिरावले, संपले. हळूहळू शेजारच्या मारण्यांकडे जेवायची सोय झाली, त्यांना चार पैसे मिळाले, यांचीही सोय झाली. पावसाळ्यात उघड्यावर कसं झोपणार म्हणून मग झोपायचीही सोय झाली. आतल्या खोलीकडे जाणा-या बोळात कमीत कमी जागा व्यापून झोपायचे. परका, नात्यागोत्याचा नसलेला हा माणूस त्यांच्या घरातलाच होऊन गेला.

आमच्या त्या घरात जे काय सुतारकाम झालं ते त्यांनीच केलं. पैसे बाबा देतील तेवढे, ठरवणं, तक्रार वगैरे प्रकार नाही. कामाला फिनिशिंग नसायचं फार पण दणकट काम करायचे. आमची शोकेस, टी.व्ही.चं कोलाप्सिबल डोअर त्यांनी केलं हा आश्चर्याचा भाग होता. कंटाळा येउन माणूस नविन शोकेस आणेल एवढं स्लोमोशनमधे फास्ट काम असायचं. बाहेरच्या खोलीला प्लायवूडचं सिलिंग, फोल्डिंग विळीचं झाकण तुटलं म्हणून त्यांनी मोठ्ठ्या पाटावर लावून दिलेलं ते पातं, दीड माणूस बसेल एवढे मोठ्ठाले पाच सहा पाट, एक स्टूल, उकिडवं बसायला लागू नये म्हणून केलेलं पाऊण फूट उंचीचं स्टूल, मांडणी आणि तिचा तहहयात मेंटेनंस, टेबल कम कपाटाच पुनरुज्जीवन, पट्ट्या मारणे, काढणे हे सगळं त्यांनीच केलंय. पाट, स्टूल आणि विळी अजून धडधाकट आहेत, अजून तीस चाळीस वर्ष टिकतील. 
बरं हे सगळं काम टाकाऊतून टिकाऊ, अगदीच लागलं तर नविन मटेरीअल आणायचे. शनिवारी, रविवारी ते पटाशी, करवतीला धार लावायचे. खालच्या ओठाला फोड येउन तो सुजलाय की काय असं वाटेल एवढी तंबाखू ओठात ठेवून चार चार तास एका जागी बसून गाण्याचा रियाझ केल्यासारखं काम चालू असायचं. बघणारा कंटाळेल. तीच गत पॉलिश करताना, मन लावून करायचे, आपल्याला कंटाळा येईल इतकं. पण त्यांनी भरलेलं मेण आणि पॉलिश टिकायचं मात्रं भरपूर. तसे लहरी होते. कितीही कडकी असली तरी ज्या माणसाशी पटत नाही त्याचं काम ते घ्यायचे नाहीत. कुणाकडे हाताखाली कामही करायचे नाहीत. त्यामुळे आवक तुटपुंजी असायची पण कधी कुणापुढे हात पसरायचे नाहीत. माझी आई त्यांची बँक होती. अधूनमधून ओव्हरड्राफ्ट लागायचा.       

रोज उठून सुतारकाम कुणाकडे निघणार? वयही होत चाललेलं, मग ते त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पुतण्याकडे रहायला गेले. जाताना पत्ता आणि जवळचा फोन नंबर देऊन गेले. एकादशीच्या घरी शिवरात्र असा प्रकार असणार. फार महिने राहिले नाहीत. परत आले. सुतारकाम कुठलं जमायला आता. बाणेर रोडला एका प्लॉटवर खोपट्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागले. तसेही ते एकटेच होते आता तर एकांतवासातच गेले. आजूबाजूला फक्तं रिकामे प्लॉटस आणि त्यांचे गार्ड. दिवसाच्या आणि आयुष्याच्या संध्याकाळी असं एकट जगणं फार क्रूर असतं. दारू कितीही वाईट असली तरी अशा लोकांना ती मोठी मदतीची असते.
एका रात्री त्यांनी त्या खोपटातच राम म्हटला. दोन दिवसांनी शेजारच्या गार्डनी डोकावलं, मग पोलिस आले. त्यांनी जागामालकाला आमचा पत्ता, फोन नंबर दिलेला त्यामुळे ससूनमधून फोन आल्यावर मी, मारण्यांचा शशा, रमेश आणि अजून एक जण ससूनला गेलो. तोपर्यंत आईनी त्यांच्या पुतण्याला आणि पुतणीला गावाला फोन लावला. दोघांच्या भाडेखर्चाची तजवीज, एसटी मिळायला पाहिजे, त्यांना उशीर झाला. प्रेत फार वेळ ठेवण्याच्या लायकीचं नव्हतं, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टर म्हणाले, फार वेळ ठेवू नका, फुटतील. त्यामुळे घरी नेण्याचा प्रश्नं नव्हता. रीतसर ताबा घेऊन वैकुंठात आलो, पुतण्याची वाट बघितली थोडा वेळ, भडाग्नी देऊन चौघं परत आलो.  

संध्याकाळी दोघे आले. साधी माणसं खूप मायेने, पोटातून रडतात. एवढ्या दु:खात सुद्धा आम्ही सगळं केल्याचं त्यांना कौतुक वाटत होतं. म्हटलं ना,  कुणाचे कोण. काही काळ सोबत राहिले, निघून गेले. जयवंता म्हणायचे ते. अहो, जयंता असं नाव आहे असं सांगितलं तर मिशाळ हसत 'माझ्या तोंडात जयवंता बसलंय' म्हणायचे. तशी हाक क्वचित कानावर पडते. गावाकडचा माणूस आला कुणी की पडते कानावर मग स्लोमोशन साबळे मामा आठवतात. 

कुठे सोय नसली, पैसे नसले की घुटमळायचे. खाताय का भात म्हटलं की ओशाळून हो म्हणायचे. वर्षातील प्रत्येक सण, सकाळ किंवा दुपारचा चहा किंवा एरवीही चांगलं चुंगलं काही केलं तरी साबळेमामांचा भाग काढलेला असायचा. घरात काही चांगलं चुंगलं केलं की मला आमचे व्ही.व्ही.बी, साबळे मामा, शेजारचे ओगले, माझी आजी आठवते आणि पापण्यांच्या पागोळीला थेंब जमा होतो.

आधी आई आणि आता बायको अन्नपूर्णा आणि सढळ हाताच्या आहेत हे माझं भाग्यं. आई, बाबांनी त्यामुळे अनेक माणसं जोडली, आपलीशी केली. त्या लोकांचे तृप्ततेचे, कृतज्ञतेचे आशिर्वाद 'यांच्या पोराबाळांचे चांगलं  होऊ देत' असेच असणार. आई वडील असतील तेवढे पैसे, इस्टेट तर ठेवतीलच मागे पण ह्या लोकांच्या तृप्तीच्या, कृतज्ञतेच्या अगणित आशिर्वादांची पुंजी त्यांनी आमच्याकरता ठेवलीये त्याची मोजदाद नाही करता येत.


--जयंत विद्वांस   
                           


Friday 19 December 2014

वन्स अपॉन अ टाईम (४)......

जर्मन लोकांची परफेक्शनची हौस आणि लढाऊ वृत्ती मोठी घेण्यासारखी आहे. कणखर मानसिकता त्यांच्या डिएनए मधेच असावी. हिटलरचा डाग सोडला तर त्यांच्याबद्दल वाईट बोलावं असा तो देश नाही. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे १९९३ ची विम्बल्डन फायनल. रुथलेस जर्मन ग्राफ आणि मेहनती चेक नोव्होत्ना. असाच त्यांचा मेहनती पण कमनशिबी माणूस इव्हान लेंडल.

अभ्यास करून, कठोर मेहनत करून काहीजण मार्क मिळवतात तर काहीजण उपजत बुद्धीवर फार कष्ट न घेता पहिले वगैरे येतात. अशावेळेस मेहनती लोकांना काय वाटत असेल ते तेच जाणे. लेंडल असाच मेहनती, कठोर परिश्रम घेणारा माणूस होता. ऑस्ट्रेलियन दोन वेळा, युएस ओपन तीन वेळा, फ्रेंच चार वेळा त्यानी जिंकलं. पहिल्या जागी एकदा विम्बल्डन हे त्याचं स्वप्नं शेवटपर्यंत पूर्ण झालं नाही. क्रिकेटमधे लॉर्डस वरच्या शतकाची जी किंमत आहे तेवढीच टेनिस प्लेयरला विम्बल्डन जिंकल्याची. माझी सगळी पदके, कप परत घ्या हवंतर पण एक विम्बल्डन द्या असं म्हणाला होता लेंडल.  दोनदा त्याला नशिबानी हुलकावणी दिली.

साल १९८६. विम्बल्डन फायनलला जर्मन बूम बूम बेकर. एक सळसळता उत्साह, एक व्यासंगी, अभ्यासू विद्यार्थी. एक जम्पिंग ज्याक जितेंद्र, एक धीरगंभीर बलराज सहानी. सहानीच्या अभिनयाचं तुम्ही कौतुक करता पण तुम्हांला आवडतो तो जितेंद्रच. तसंच झालं, बेकरनी त्याला सरळ तीन सेट मधे घुमवला. साल १९८७.  लेंडल एक  नंबर होता. कोनर्स, विलंडर आधीच हरले होते आणि विम्बल्डन फायनलला ऑस्ट्रेलियाचा प्याट कॅश. विम्बल्डन सोडून लेंडल सगळीकडे जिंकला आणि कॅश आयुष्यात ग्रांड स्लाम मधली एकंच फायनल जिंकला, ती विम्बल्डनची. कॅशनी पण त्याला सरळ तीन सेटमधे घुमवला. नशिबात नव्हतं हेच खरं. 


साल १९९३. याना नोवोत्ना आणि स्टेफी ग्राफ. पहिला सेट नोव्होत्ना काट्यावर हरली ६-७ (टायब्रेक ६-८), दुसरा सेट तिनी ६-१ घेतला. तिस-या सेट मधे ४-१ (४०-३०) वर तिची सर्व्हिस होती. तो गेम जिंकला की ५-१ ची सणसणीत आघाडी, ग्राफनी सर्व्हिस राखली तरी स्वत:ची सर्व्हिस राखली की संपला विषय. आनंदात हातात तोंड झाकून गुडघ्यावर बसायचं आणि नेटजवळ शेकहांडसाठी थांबलेल्या स्टेफी कडे जायचं. पण तिला हाकेच्या अंतरावर खुणावणा-या यशाचं तिला टेन्शन आलं. यश पचवायला ताकद लागते तसंच आत्मविश्वासानी पाय न डगमगू देता त्याच्यापर्यंतचं अंतर पार करणं याला सुद्धा ताकद लागते. यानानी डबल फौल्ट केला आणि रुथलेस स्टेफीनी यानाची मानसिक स्थिती ओळखत तिचं खच्चीकरण केलं. स्टेफीनी सलग सहा गेम घेतल्या आणि सामना ७-६, १-६, ६-४ असा जिंकला. यानाच्या डोळ्यासमोरून तिचं हातातोंडाशी आलेलं विजेतपद, ते ही विम्बल्डनचं, आपल्याच प्रियकराने दुस-या मुलीच्या गळ्यात हात घालून आपल्यासमोरून हसत हसत निघून जावं तसं लांब गेलं. निदान नोव्होत्नानी नंतर ९८ ला जिंकलं तरी विम्बल्डन, देशबांधव लेंडल एवढी फुटक्या नशिबाची नाही निघाली ती.

पदक देण्याच्या समारंभात ती डचेस ऑफ केंटच्या खांद्यावर ढसाढसा रडली आणि माझ्या पण डोळ्यासमोरचं चित्रं जरा धुसर झालंच.

जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (३).....

वेस्टइंडीजचा सुवर्णकाळ संपला ही क्रिकेटच्या दृष्टीने फार वाईट घटना होती, आहे, राहील. एकदम दिलदार प्रतिस्पर्धी. त्यांना हरवल्यावर आपण काही तरी कमावलं अशी भावना जेत्याच्या मनात निर्माण करणारा. थोरले रावसाहेब गेल्यावर त्यांच्या समृद्धीची, दरा-याची पुसटशी आठवण त्यांच्या वारसात  अधून मधून व्हावी आणि त्यावरच आपण समाधान मानावं अशी त्यांची दुरावस्था झाली. लारा, हूपर, अम्ब्रोस, वाल्श आणि इतर यांनी त्यांच्या परीनी बुडती बोट काही काळ सावरली. पुढचा वारस तोडीचा नसेल तर मग अवघड होतं. मरेच्या जागी दुजा फिट होता त्यानंतर थोडा फार रिडली जेकब सोडला तर त्यांचा विकेटकिपर आठवावा लागेल. मुळात त्यांचे आग ओकणारे भन्नाट गोलंदाज दुष्काळ पडावा तसे गायब झाले.

अम्ब्रोस आणि वाल्श ही शेवटची भन्नाट जोडगोळी होती. वाल्श आधी लेगस्पिन टाकायचा आणि कुंबळे मध्यमगती. कोचच्या सांगण्यावरून वाल्शनी फास्ट टाकायला सुरवात केली आणि कुंबळेने लेगस्पिन. त्यामुळे वाल्शचा लेगकटर इतरांपेक्षा घातक होता तर कुंबळेचा लेगस्पिन टर्नपेक्षा वेगवान होता. मनगटात ताकद असली की, आत्मविश्वास असला की लोक मनगटाच्या पुढचा भाग ज्योतिषापुढे पसरून बसत नाहीत. 
इंग्लंडमधे इंग्लंड विरुद्ध सामना चालू होता. विंडीज हरणार हे कन्फर्म होतं. बहुतेक रिची रिचर्डसन कप्तान होता. चौथ्या दिवशीच डावानी हरायची नामुष्की समोर होती. अतीव करुणेतून उत्तम विनोद, उपहास निर्माण होत असावा. रिचर्डसननी अम्ब्रोसला विचारलं, कितीचा लिड मिळाला तर आपण इंग्लंडला हरवू शकू? ब्याट्समन बीट झाल्यावर क्वचित त्याच्याकडे बघून तो "वाचलास लेका" अशा अर्थाचं स्मित करायचा. त्याची ब्याटिंग मात्रं विनोदी असायची. अम्ब्रोसनी एकंच शब्दं सांगितला "शंभर". संपताना १०५ चा लिड देऊन विंडीज संघ बाद झाला. 

सकाळी लंचच्या आत इंग्लंड जिंकणार हे शेंबड पोर सांगू शकलं असतं. जे घडलं ते अविश्वसनियं होतं. इंग्लंड सर्वबाद ९५. अम्ब्रोस पाच वाल्श पाच. अंगावर बोलिंग न करता. भन्नाट वेग आणि इंग्लंडचा स्विंग यांनी वापरला. याला म्हणतात जिगर, स्वत:च्या कर्तुत्वावरचा आत्मविश्वास. रावडी राठोडच तो विंडीजचा. जो वो बोलता है वो करताच है.   
 
जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (२).....

स्लेजिंग हा आता खेळाचाच भाग आहे. फक्तं घाणेरडा बोलणं म्हणजे स्लेजिंग नव्हे तर तुच्छतेनं बघणं, थुंकणं, कुत्सित हसणं, कुचकट बोलणं असं प्याकेज आहे ते. एक तर तुमचं कर्तुत्वं अफाट असलं पाहिजे की लोक तुम्हांला डिवचायला घाबरले पाहिजेत किंवा वेस्टइंडीजसारखी ताकद. बिशाद होती काय त्यांच्या ब्याट्समनला डिवचायची, पाच वखवखलेले लांडगे असायचे. तुमची ब्याटिंग जर अबला देखणी नारी असेल तर समोरचे पाच शक्ती कपूर, अमरीश पुरी, प्राण, सुधीर आणि रणजित समजा म्हणजे यातना कळतील.

अफाट कर्तुत्वाची उदाहरणं म्हणजे गावसकर, सचिन तेंडूलकर. शारजात झिम्बाब्वेचा हेन्री ओलोंगा सचिनला आउट केल्यावर नाच रे मोर सारखा हाफ पिच पर्यंत नाचला, होतं असं अतीव आनंदात खरं तर. पुढच्या म्याचला स्पिनरला हाणावा तसा पुढे येऊन येऊन मारला सचिननी त्याला.चामिंडा वाझ बोलता बोलता एकदा म्हणाला, दोनचार फोर कटवर दिल्या की होतो आउट. दुस-या दिवशी बाळासाहेबांनी मिडऑफ, मिडऑन मधे खेळत श्रीलंकादहन केलं. खरंतर हे स्लेजिंग नव्हतं.


मन्सूरअलीखान पतौडी त्याच्या वन लायनर करता प्रासिद्ध होता. समोरच्याला निरुत्तर करायचा. त्याला हसून गडाबडा लोळायला लावलं ते आपल्या पद्माकर शिवलकरनी. आपल्या तुपल्यातल्या म्याचेस होत्या. पतौडी कप्तान होता. त्यांनी शिवलकरला विचारलं, यॉर्कर जमेल काय? शिवलकर हो म्हणाले. निम्म्या रनप मधून थांबून जवळ येउन त्यांनी विचारलं, कशावर टाकू, ऑफ, मिडल की लेग? 

महाराष्ट्र विरुद्ध मुंबई अशा जुन्या शत्रूंची रणजी होती. महाराष्ट्राचा लेगस्पिनर सुनिल गुदगे बोलिंगला होता. विकेट पडल्यावर संदीप पाटील आला, इकडच्या टोकाला रवि शास्त्री उभा. पाटीलनी गुद्गेला ऐकू जाईल असं शास्त्रीला विचारलं, काय टाकतो रे हा? (गुदगे नाव असलेले लेगी होते). शास्त्रीनी शक्यं तेवढा उपहास आणत सांगितलं, 'दोन लेगस्पिन टाकले की तिसरा गुगली टाकतो, बाकी घाबरण्यासारखं काही नाही. गुदगे खच्चीकरण झाल्यासारखे पायापाशी गोळा झाले. संपूर्ण सामन्यात गुगली नाही, फुल्टास आणि शोर्ट पिच, नुसती धुलाई. 

जावेद मियांदादला एकदा विचारलेलं, पाकिस्तानी खेळाडूंवर सेल्जिंगचा परिणाम होताना का दिसत नाही? मियांदाद पण भारी, आमचे सगळे अशिक्षित, इंग्लिश येतंय कुणाला, अर्थ कळाला तर राग येईल ना. तात्पर्य काहीवेळेस निरक्षर असणंही फायदेशीर असतं तर. 

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१)…

कुठलीही गोष्टं अती वाईटच पण योग्यं प्रमाणात घेतलेलं अल्कोहोल हे भूक लागण्यासाठी चांगलं असतं असं म्हणतात (आसव म्हणजे वेगळं काय असतं? द्राक्षासव आख्खी बाटली पिऊन बघा). काही लोक मात्रं अपवाद असतात. शरीराची रचना, सवय की अजून काही कारण माहीत नाही पण नियम वगैरे ते लोक धाब्यावर बसवतात. 

खळ्या पडणारा, लंकेला वर्ल्डकप मिळवून देणारा, पहिल्या पंधरा ओव्हरमधे धुवा फक्तं असा संदेश देणारा, पोट सुटलेला अर्जुना रणतुंगा माझा आवडता माणूस या बाबत. फुग्यासारखं पुढे लोंबणारं पोट घेऊन खेळणारा रणतुंगा फसवा होता. थर्डम्यानला, कव्हरला तो चिकी सिंगल जबरा काढायचा, तो रनाउट होईल या आशेपोटी त्याला इतर प्रकारांनी बाद करायला विसरायला व्हायचं बहुतेक. तोपर्यंत हा जाडूमल पन्नाशीच्या जवळ असायचा. दमला म्हणून तो फिल्डिंगला आला नाही असं क्वचित घडलं असावं. ९३ टेस्ट आणि २६९ वनडे खेळणं हा गमतीचा भाग नाही. दोन्हीत मिळून साडेबारा हजारच्या आसपास धावा आणि पंचाण्णव विकेट घेतल्या त्यानी. खेळाडूचं म्हणून त्याचं शरीर कधीच वाटलं नाही. 

ऑस्ट्रेलियाचा मर्व्ह ह्यूज असाच वल्ली माणूस आणि नावाप्रमाणेच ह्यूज. तो ४-५ जग बिअर प्यायचा रोज म्याच झाली की. एकदा बोर्डरनी त्याला भोसडला. ह्यूज पण खमक्या, तुला काय हवं ते सांग, बिअरचं मी बघतो. बोर्डर म्हणाला, उद्या पाच विकेट हव्यात. दुस-या दिवशी ह्युजनी पाच काढल्या, आवाज बंद, बिअर झिंदाबाद. असाच ऑस्ट्रेलियाचाच लंबूटांग डावखुरा ब्रूस रीड (सहा फुट आठ इंच, जवळपास जोएल गार्नरच्या उंचीचा) होता. त्याला दमा होता. त्यामुळे तो फार खेळू शकला नाही पण जे काय टाकायचा तो वेग भन्नाट असायचा त्याचा.

वर्ल्डवाईड सर्टिफाईड कामदेव विव्ह रिचर्डस बद्दल काय बोलावं? पावणे सहाफुटावर एक इंच असलेला ऐंशी किलोचा रिचर्डस लौइड, गार्नर, होल्डिंग मुळे बुटका वाटायचा. (काय साला डौल होता त्याच्या चालण्याला. नीनाची काय चूक नाय). एकतर वेस्ट इंडीज असा देश अस्तित्वात नाही. बेटांचा समूह मिळून ते टीम बनवतात त्यामुळे ते एकमेकाला फारसे जुमानत नाहीत. इंग्लंडमधे म्याच संपली की रिचर्डस तीनचार जणी बगलेत घेऊन गायब व्हायचा, रात्रभर दारू आणि स्त्रीसंग. सकाळी मैदानात हजर. एकदा लौइडनी दिवस संपल्यावर जाळ काढला, उद्या आपली ब्याटिंग आहे आज तू जायचं नाहीस. रिचर्डस काय विभागवार निवड समितीतून आलेला नव्हता. त्यानी जाता जाता सांगितलं, ग्रिनिज, हेंस लंचपर्यंत आरामात खेळतील. झालाच चुकून लवकर आउट तर तू जा, मी लंचच्या आत येतोच. रात्रभर रासक्रीडा करून सकाळी पठ्ठा लंचच्या आधी एक तास हजर. विकेट पडल्यावर गेला खेळायला धुमसत. टी टायमाला सेन्चुरी हाणून आउट, परत हा जायला मोकळा. लौइडचा खेळ होतो, जीव इंग्लिश गोलंदाजांचा गेला.

ज्याची जशी बुद्धी तसं तो घेतो. रिचर्डसचे संध्याकाळी बाहेर जायचे गुण रवि शास्त्रीनी बरोबर घेतले. 

--जयंत विद्वांस

Thursday 18 December 2014

न फिटणारी ऋणं.....

जर माझ्या अंगात जे काय हाताच्या बोटावर मोजण्याइतके सद्गुण असतील तर ते मी दुस-यांचे उचलले आहेत. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा हा गुण उपजत लागतो, तो अंगी बाणवायला फार त्रास होतो. पण दुसरा जेंव्हा ते आपल्यासाठी करतो तेंव्हा माझ्यातली ती उणीव प्रकर्षानी मला जाणवत आली आहे. या गुणांचे दोन वानगीदाखल नमुने सांगतो.  

घर नसल्यामुळे आम्ही ७४ ला बदलापूरला काकांकडे रहायला होतो वर्ष दीड वर्ष. मी पहिलीला होतो, आपटे चाळीत जाधव कुटुंबिय समोर रहायचं. त्यांना दोन मुलं. आमच्यावर त्यांचा भारी लोभ. वडिलांना भाम्बुर्ड्यात खोली मिळाली मग आम्ही निघालो पुण्याला. आम्हाला भेट म्हणून जाधव काकांनी 'नवा व्यापार' आणला होता. सकाळी निघताना त्यांनी भली थोरली पिशवी हातात ठेवली. आम्हाला उत्सुकता, कधी एकदा घरी नेउन खेळतोय याची. त्या खेळात कागदी नोटा असायच्या आणि तो मरतुकडा, कधीही जरासंधासारखा दोन तुकडे होतील असा, चौकोनी कागद. घरी गेलो. दुस-या दिवशी पिशवी उघडली. त्या वयात फार नाही कळली किंमत पण कुठे तरी नोंद झाली. थोडी अक्कल आल्यावर त्यांचा व्यवस्थितपणा, प्रेम समजलं. संपूर्ण कागदाच्या मागे पुठ्ठा मापात चिकटवलेला. एवढंच नाही तर प्रत्येक नोटेच्या मागेही. कुठेही तिरकं नाही, नोटेच्या बाहेर नाही, अर्धवट चिकटलेलं नाही, कॉर्नर हाताला लागणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतलेली. बरं सगळ्या पुठ्ठ्यांची जाडी एकंच. संपूर्ण रात्रभर ते कुटुंब हे काम करत होतं.

पंधरा एक वर्ष तरी तो 'व्यापार' आमच्याकडे होता. आता कुणी तो खेळ खेळताना दिसत नाही. पण आम्ही तो रग्गड खेळलाय कारण तो टिकला खूप वर्ष. काय कोण डोक्यावर न फिटणारं ऋण ठेवून जाईल सांगता येत नाही. आता जाधव काका नाहीत. हल्लीच्या 'नव्या' व्यापारात त्यांच्या तो जुना झालेला 'नवा व्यापार' डोळे ओले करून जातो एवढं मात्रं खरं.


तशी परिस्थिती ओढ्ग्रस्तीचीच होती ८३ पर्यंत. मग जरा बाळसं यायला सुरवात झाली म्हणजे खाऊनपिऊन सुखी या क्याटेगरीत आलो. भाऊ माझ्या मागे दोन वर्ष. बाबांच्या दुकानात राजा मंडलिक म्हणून सहकारी होता. त्याचा भाऊ महेश मंडलिक. आता कमिन्सला आहे तो. तो माझ्या पुढे एक वर्ष. त्याची पुस्तकं तो आम्हांला द्यायचा पाचवी ते दहावी. माझी वापरून झाली की दोन वर्ष जपून मग भाऊ वापरायचा. त्याची परीक्षा संपली की आठवड्याचा आत त्याचे काका सायकलवर व्यवस्थित खालीवर पुठ्ठा लावून, कागदात प्याक करून सुतळीनी बांधलेला गठ्ठा पोच करून जायचे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर महेश मंडलिक, इयत्ता अमुकतमुक एवढंच असायचं. बायांना मिशा, सफाचटवाल्याला दाढी, कुंकू, कोपरे दुमडलेले, पान गायब/फाटलेलं, मागचं पान गायब असलं काहीही नसायचं. त्याला जमत नसलेली ती काम आम्ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न मनापासून करायचो.

बरं कुठंही आपण काही उपकार करतोय अशी पुसट भावना चेह-यावर नसायची. तेंव्हा नागरिक शास्त्राचं पुस्तक दोन की तीन वर्षाला एकंच असायचं. त्यानी दुकानात निरोप पाठवला होता. तेवढं प्लीज तुम्ही घ्या कारण मला ते लागणार आहे. एवढं चांगलं, माणसाप्रमाणे सगळ्यांना वागता आलं तर काय सांगायचं होतं. गलबलून येतं विचार केला की. दुस-याला पुढे अजून तीन चार वर्ष परत वापरायचीयेत म्हणून जवळपास माझ्याच वयाचा तो मुलगा ती पुस्तकं जीवापाड जपून वापरायचा. 


न फिटणारी ऋणं म्हटलं ना तेच खरं. त्यामुळे कुणालाही मी गिफ्ट, भाऊबीज देतानाही पुस्तकंच देतो, लोकांना नसेलही आवडत कदाचित पण त्याला कारण हे आहे. अरे मरायच्या आधी थोडंतरी कर्ज फेडू द्याल की नाही.

जयंत विद्वांस


Saturday 6 December 2014

लग्नंघर.....

मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय. बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.

मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.


उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो. 

नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.

शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो.मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.

 
--जयंत विद्वांस 


Monday 1 December 2014

कुत्तेकी मौत.....

रविवार, चार जुलै चार. सहसा तारखा माझ्या लक्षात रहात नाहीत (त्याचं कारण पुन्हा कधीतरी). ही तारीख एवढी लक्षात रहायचं कारण म्हणजे आर्याला आठ महिने पूर्ण झाले होते म्हणून. माझ्या वहिनीचं बदलापूरला ऑपरेशन झालं होतं. प्रथमच आर्याला एकटीला घरी ठेवून तिला बघायला मी आणि क्षमा फ़िएरोवर वर गेलो होतो सकाळी सकाळी. येताना रणजीत त्याच्या क्रक्सवर सोबत होता. पोचलो, तिला बघितलं आणि लवकर घरी पोचायच्या हेतूने दुपारीच निघालो, पाऊस नव्हता हे नशीब. खोपोलीच्या अलीकडे "अंकल'ज किचन"ला जेवलो. लोणावळ्याच्या आसपास पाऊस पडून गेलेला. कामशेत नंतर मला हेल्मेटचा कंटाळा आला म्हणून ते मिररला अडकवलं. दोघांच्या अंगावर रेनी ड्रेस तसाच. रस्त्याला गर्दीही फारशी नव्हती. वडगाव सोडलं असेन आणि ते घडलं.

मी रोडच्या कडेला उभा होतो, शेजारी क्षमा आणि रणजीत. तो, "बरा आहेस ना?". "कुठे आहोत आपण?", मी. सिनेमात दाखवतात तसं माझी याददाश्त गेली बहुतेक असं त्याच्या चेह-यावर दिसत होतं. आम्ही उभे होतो त्याच्या मागच्या बाजूलाच एक ढाबा होता. तिथे जाऊयात म्हणाला, तोंड धू आणि बस जरा म्हणाला. बसलेलं तमाम पब्लिक मी शेलेब्रिटी असल्यासारखं माझ्याकडे बघत होतं. तेंव्हा कपड्यांसकट माझं वजन लाजत लाजत पन्नास भरायचं. हातभार म्हणून दाढीही वाढवायचो. तर मी बेसिनला गेलो आणि आरशात पाहिलं. दुसराच माणूस आधी तोंड धुतोय की काय वाटून बाजूला होणार होतो म्हटलं दाढी तर आपलीच दिसतीये, थांबलो. उजव्या नाकपुडीच्या खाली आणि मिशीच्या वर एक लाल रेघ, मिशीच्या उजव्या भागात फाळणी झालेली, हनुवटीवर एक लाल स्ट्राबेरी एवढा गुच्छ (गॉगल फुटून घुसलेला), सटपटलो. काय झालंय नेमकं? माझा चेहरा जेमतेम दिसेल एवढाच आरसा होतो, तोंडावर पाणी मारायला गेलो आणि बोंब ठोकण्याच्या बेतातच होतो मी. पाणी लागल्यावर दोन्ही हात झोंबले.


डाव्या हाताची चारी बोटं क्लचसकट रोडवर घासली गेल्यामुळे सोललेल्या चिंबोरीसारखी लिबलिबीत दिसत होती. तीस एकतीसचे महिने मोजतो त्याच्यावर चार ठिकाणी बोराएवढे चार सोलवटलेले लाल डाग, चौथं बोट पार कामातून गेलेलं. निर्जीव, ताकद नसलेलं (ते अजूनही वाकडच आहे). दोन्ही गुडघ्यावर, कोपरांवर रेनी ड्रेस फाटून आतली जीन फाटलेली आणि गुडघे, कोपरं किसणीवर किसल्यासारखी अशी एकूण अवस्था होती. चहा प्यायलो आणि जरा तरतरी आली. रणजीतनी विचारलं, काय झालं काही आठवतंय का? 'नाही, काय झालं नेमकं?' 'तुम्ही पुढे होतात, मी मागे पन्नास फुटांवर. आपल्या डाव्या बाजूला शेतात दोन कुत्री भांडत होती. एक दुस-याला जोरात चावलं, ते जे तडक १२०० सीसीच्या स्पीडनी निघालं ते बरोब्बर तुझ्या दोन चाकात पर्पेंडीक्युलर आलं. गाडी जागेवर वेडी झाली आणि तू गाडीबरोबर स्कीईंग केल्यासारखा फरफटत गेलास. मागे कुठेलीही मोठी गाडी नसल्यामुळे अनर्थ टळला". क्षमाला फार नव्हतं लागलं, मुका मार आणि घाबरली जास्ती होती. 

गाडीवर बसता येईना. क्लच दाबायला डाव्या हाताची करंगळी फक्तं शाबूत होती. रणजीतनी कात्रजलाच जाणा-या एका माणसाला रिक्वेस्ट केली डबलसीट घ्यायला पण मागे मला पाय दुमडून बसता येईना. शेवटी म्हटलं राहू दे, क्षमा त्याच्या गाडीवरच होती नाहीतरी, मला कव्हर दे चौक आला की, देहूरोड ते कात्रज फक्तं सेकंड गिअरवर, ब्रेक दाबायला लागणार नाही एवढाच स्पीड, गिअर बदलायला किंवा ब्रेक दाबायला पाय गुडघ्यात मुडपताच येत नव्हते. दोन अडीच तास लागले घरी यायला. घराजवळ रस्त्यात डॉक्टर होता तरी थांबलो नाही म्हटलं आधी घरी जाऊ मग परत चालत येतो पण आत्ता घरी चल. हेकटपणाला हसलेही असतील माझ्या. पण ड्रेसिंग केल्यावर पाय ताठ झाले असते, गाडी नसती चालवता आली. अजूनही फुटलेला उजवा इंडिकेटर आणि घासलेला डावा क्लच मी तसाच ठेवलाय. कुत्तेकी वजहसे कुत्तेकी मौत आनेवाली थी, बच गया, मैं भी, वो कुत्ता भी.  




घरी आलो आणि बेडरूममधे गेलो. न घडलेल्या अनर्थाच्या नुसत्या कल्पनेनेही माझ्या चेह-यापेक्षा सगळ्यांचे चेहरे भेसूर झाले होते. आर्या शांत झोपली होती. तिला बघितलं आणि का माहित नाही पण आयुष्यात आनंदानी पहिल्यांदाच एवढा ढसाढसा, हमसून हमसून रडलो.

--जयंत विद्वांस