Thursday 18 December 2014

न फिटणारी ऋणं.....

जर माझ्या अंगात जे काय हाताच्या बोटावर मोजण्याइतके सद्गुण असतील तर ते मी दुस-यांचे उचलले आहेत. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा हा गुण उपजत लागतो, तो अंगी बाणवायला फार त्रास होतो. पण दुसरा जेंव्हा ते आपल्यासाठी करतो तेंव्हा माझ्यातली ती उणीव प्रकर्षानी मला जाणवत आली आहे. या गुणांचे दोन वानगीदाखल नमुने सांगतो.  

घर नसल्यामुळे आम्ही ७४ ला बदलापूरला काकांकडे रहायला होतो वर्ष दीड वर्ष. मी पहिलीला होतो, आपटे चाळीत जाधव कुटुंबिय समोर रहायचं. त्यांना दोन मुलं. आमच्यावर त्यांचा भारी लोभ. वडिलांना भाम्बुर्ड्यात खोली मिळाली मग आम्ही निघालो पुण्याला. आम्हाला भेट म्हणून जाधव काकांनी 'नवा व्यापार' आणला होता. सकाळी निघताना त्यांनी भली थोरली पिशवी हातात ठेवली. आम्हाला उत्सुकता, कधी एकदा घरी नेउन खेळतोय याची. त्या खेळात कागदी नोटा असायच्या आणि तो मरतुकडा, कधीही जरासंधासारखा दोन तुकडे होतील असा, चौकोनी कागद. घरी गेलो. दुस-या दिवशी पिशवी उघडली. त्या वयात फार नाही कळली किंमत पण कुठे तरी नोंद झाली. थोडी अक्कल आल्यावर त्यांचा व्यवस्थितपणा, प्रेम समजलं. संपूर्ण कागदाच्या मागे पुठ्ठा मापात चिकटवलेला. एवढंच नाही तर प्रत्येक नोटेच्या मागेही. कुठेही तिरकं नाही, नोटेच्या बाहेर नाही, अर्धवट चिकटलेलं नाही, कॉर्नर हाताला लागणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतलेली. बरं सगळ्या पुठ्ठ्यांची जाडी एकंच. संपूर्ण रात्रभर ते कुटुंब हे काम करत होतं.

पंधरा एक वर्ष तरी तो 'व्यापार' आमच्याकडे होता. आता कुणी तो खेळ खेळताना दिसत नाही. पण आम्ही तो रग्गड खेळलाय कारण तो टिकला खूप वर्ष. काय कोण डोक्यावर न फिटणारं ऋण ठेवून जाईल सांगता येत नाही. आता जाधव काका नाहीत. हल्लीच्या 'नव्या' व्यापारात त्यांच्या तो जुना झालेला 'नवा व्यापार' डोळे ओले करून जातो एवढं मात्रं खरं.


तशी परिस्थिती ओढ्ग्रस्तीचीच होती ८३ पर्यंत. मग जरा बाळसं यायला सुरवात झाली म्हणजे खाऊनपिऊन सुखी या क्याटेगरीत आलो. भाऊ माझ्या मागे दोन वर्ष. बाबांच्या दुकानात राजा मंडलिक म्हणून सहकारी होता. त्याचा भाऊ महेश मंडलिक. आता कमिन्सला आहे तो. तो माझ्या पुढे एक वर्ष. त्याची पुस्तकं तो आम्हांला द्यायचा पाचवी ते दहावी. माझी वापरून झाली की दोन वर्ष जपून मग भाऊ वापरायचा. त्याची परीक्षा संपली की आठवड्याचा आत त्याचे काका सायकलवर व्यवस्थित खालीवर पुठ्ठा लावून, कागदात प्याक करून सुतळीनी बांधलेला गठ्ठा पोच करून जायचे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर महेश मंडलिक, इयत्ता अमुकतमुक एवढंच असायचं. बायांना मिशा, सफाचटवाल्याला दाढी, कुंकू, कोपरे दुमडलेले, पान गायब/फाटलेलं, मागचं पान गायब असलं काहीही नसायचं. त्याला जमत नसलेली ती काम आम्ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न मनापासून करायचो.

बरं कुठंही आपण काही उपकार करतोय अशी पुसट भावना चेह-यावर नसायची. तेंव्हा नागरिक शास्त्राचं पुस्तक दोन की तीन वर्षाला एकंच असायचं. त्यानी दुकानात निरोप पाठवला होता. तेवढं प्लीज तुम्ही घ्या कारण मला ते लागणार आहे. एवढं चांगलं, माणसाप्रमाणे सगळ्यांना वागता आलं तर काय सांगायचं होतं. गलबलून येतं विचार केला की. दुस-याला पुढे अजून तीन चार वर्ष परत वापरायचीयेत म्हणून जवळपास माझ्याच वयाचा तो मुलगा ती पुस्तकं जीवापाड जपून वापरायचा. 


न फिटणारी ऋणं म्हटलं ना तेच खरं. त्यामुळे कुणालाही मी गिफ्ट, भाऊबीज देतानाही पुस्तकंच देतो, लोकांना नसेलही आवडत कदाचित पण त्याला कारण हे आहे. अरे मरायच्या आधी थोडंतरी कर्ज फेडू द्याल की नाही.

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment