Thursday 25 December 2014

साबळेमामा.....

पर्वती दर्शनला चाळीत रहायचो तेंव्हा. एका रात्री समोरच्या साळवींच्या दारालगतच्या कट्ट्यावर साबळेमामा अवतीर्ण झाले. पाच फुटाच्या आतली उंची, टिळकांसारख्या झुबेकदार पांढ-या मिशा, टोपी, नेहरू शर्ट आणि धोतर कुठल्याही जगन्मान्यं वाशिंग पावडरला हात टेकायला लावतील अशा, वर्णन करायला मराठी भाषा अपुरी आहे असं वाटायला लावणा-या, मातकट रंगाला पोचलेलं. बरोबर एक वळकटी, एक बंडी आणि एक धोतर अतिरिक्त आणि सुतारकामाच्या हत्यारांनी भरलेलं एक गोणपाट, एवढीच स्थावर जंगम मालमत्ता. सुतारकाम करायचे ते.

माणुसकी तेंव्हा घराघरात शिल्लक होती. कोण कुठले महाबळेश्वरजवळच्या एका खेड्यातले साबळे मामा, आधी कधी इथे केलेल्या कामावर, जुजबी ओळखीवर जगायला पुण्यात आले, स्थिरावले, संपले. हळूहळू शेजारच्या मारण्यांकडे जेवायची सोय झाली, त्यांना चार पैसे मिळाले, यांचीही सोय झाली. पावसाळ्यात उघड्यावर कसं झोपणार म्हणून मग झोपायचीही सोय झाली. आतल्या खोलीकडे जाणा-या बोळात कमीत कमी जागा व्यापून झोपायचे. परका, नात्यागोत्याचा नसलेला हा माणूस त्यांच्या घरातलाच होऊन गेला.

आमच्या त्या घरात जे काय सुतारकाम झालं ते त्यांनीच केलं. पैसे बाबा देतील तेवढे, ठरवणं, तक्रार वगैरे प्रकार नाही. कामाला फिनिशिंग नसायचं फार पण दणकट काम करायचे. आमची शोकेस, टी.व्ही.चं कोलाप्सिबल डोअर त्यांनी केलं हा आश्चर्याचा भाग होता. कंटाळा येउन माणूस नविन शोकेस आणेल एवढं स्लोमोशनमधे फास्ट काम असायचं. बाहेरच्या खोलीला प्लायवूडचं सिलिंग, फोल्डिंग विळीचं झाकण तुटलं म्हणून त्यांनी मोठ्ठ्या पाटावर लावून दिलेलं ते पातं, दीड माणूस बसेल एवढे मोठ्ठाले पाच सहा पाट, एक स्टूल, उकिडवं बसायला लागू नये म्हणून केलेलं पाऊण फूट उंचीचं स्टूल, मांडणी आणि तिचा तहहयात मेंटेनंस, टेबल कम कपाटाच पुनरुज्जीवन, पट्ट्या मारणे, काढणे हे सगळं त्यांनीच केलंय. पाट, स्टूल आणि विळी अजून धडधाकट आहेत, अजून तीस चाळीस वर्ष टिकतील. 
बरं हे सगळं काम टाकाऊतून टिकाऊ, अगदीच लागलं तर नविन मटेरीअल आणायचे. शनिवारी, रविवारी ते पटाशी, करवतीला धार लावायचे. खालच्या ओठाला फोड येउन तो सुजलाय की काय असं वाटेल एवढी तंबाखू ओठात ठेवून चार चार तास एका जागी बसून गाण्याचा रियाझ केल्यासारखं काम चालू असायचं. बघणारा कंटाळेल. तीच गत पॉलिश करताना, मन लावून करायचे, आपल्याला कंटाळा येईल इतकं. पण त्यांनी भरलेलं मेण आणि पॉलिश टिकायचं मात्रं भरपूर. तसे लहरी होते. कितीही कडकी असली तरी ज्या माणसाशी पटत नाही त्याचं काम ते घ्यायचे नाहीत. कुणाकडे हाताखाली कामही करायचे नाहीत. त्यामुळे आवक तुटपुंजी असायची पण कधी कुणापुढे हात पसरायचे नाहीत. माझी आई त्यांची बँक होती. अधूनमधून ओव्हरड्राफ्ट लागायचा.       

रोज उठून सुतारकाम कुणाकडे निघणार? वयही होत चाललेलं, मग ते त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पुतण्याकडे रहायला गेले. जाताना पत्ता आणि जवळचा फोन नंबर देऊन गेले. एकादशीच्या घरी शिवरात्र असा प्रकार असणार. फार महिने राहिले नाहीत. परत आले. सुतारकाम कुठलं जमायला आता. बाणेर रोडला एका प्लॉटवर खोपट्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागले. तसेही ते एकटेच होते आता तर एकांतवासातच गेले. आजूबाजूला फक्तं रिकामे प्लॉटस आणि त्यांचे गार्ड. दिवसाच्या आणि आयुष्याच्या संध्याकाळी असं एकट जगणं फार क्रूर असतं. दारू कितीही वाईट असली तरी अशा लोकांना ती मोठी मदतीची असते.
एका रात्री त्यांनी त्या खोपटातच राम म्हटला. दोन दिवसांनी शेजारच्या गार्डनी डोकावलं, मग पोलिस आले. त्यांनी जागामालकाला आमचा पत्ता, फोन नंबर दिलेला त्यामुळे ससूनमधून फोन आल्यावर मी, मारण्यांचा शशा, रमेश आणि अजून एक जण ससूनला गेलो. तोपर्यंत आईनी त्यांच्या पुतण्याला आणि पुतणीला गावाला फोन लावला. दोघांच्या भाडेखर्चाची तजवीज, एसटी मिळायला पाहिजे, त्यांना उशीर झाला. प्रेत फार वेळ ठेवण्याच्या लायकीचं नव्हतं, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टर म्हणाले, फार वेळ ठेवू नका, फुटतील. त्यामुळे घरी नेण्याचा प्रश्नं नव्हता. रीतसर ताबा घेऊन वैकुंठात आलो, पुतण्याची वाट बघितली थोडा वेळ, भडाग्नी देऊन चौघं परत आलो.  

संध्याकाळी दोघे आले. साधी माणसं खूप मायेने, पोटातून रडतात. एवढ्या दु:खात सुद्धा आम्ही सगळं केल्याचं त्यांना कौतुक वाटत होतं. म्हटलं ना,  कुणाचे कोण. काही काळ सोबत राहिले, निघून गेले. जयवंता म्हणायचे ते. अहो, जयंता असं नाव आहे असं सांगितलं तर मिशाळ हसत 'माझ्या तोंडात जयवंता बसलंय' म्हणायचे. तशी हाक क्वचित कानावर पडते. गावाकडचा माणूस आला कुणी की पडते कानावर मग स्लोमोशन साबळे मामा आठवतात. 

कुठे सोय नसली, पैसे नसले की घुटमळायचे. खाताय का भात म्हटलं की ओशाळून हो म्हणायचे. वर्षातील प्रत्येक सण, सकाळ किंवा दुपारचा चहा किंवा एरवीही चांगलं चुंगलं काही केलं तरी साबळेमामांचा भाग काढलेला असायचा. घरात काही चांगलं चुंगलं केलं की मला आमचे व्ही.व्ही.बी, साबळे मामा, शेजारचे ओगले, माझी आजी आठवते आणि पापण्यांच्या पागोळीला थेंब जमा होतो.

आधी आई आणि आता बायको अन्नपूर्णा आणि सढळ हाताच्या आहेत हे माझं भाग्यं. आई, बाबांनी त्यामुळे अनेक माणसं जोडली, आपलीशी केली. त्या लोकांचे तृप्ततेचे, कृतज्ञतेचे आशिर्वाद 'यांच्या पोराबाळांचे चांगलं  होऊ देत' असेच असणार. आई वडील असतील तेवढे पैसे, इस्टेट तर ठेवतीलच मागे पण ह्या लोकांच्या तृप्तीच्या, कृतज्ञतेच्या अगणित आशिर्वादांची पुंजी त्यांनी आमच्याकरता ठेवलीये त्याची मोजदाद नाही करता येत.


--जयंत विद्वांस   
                           


No comments:

Post a Comment