Tuesday 16 June 2015

मेहेंदळे बाई.....

डॉ.सौ.अपर्णा अशोक मेहेंदळे, एम.बी.बी.एस.ही पाटी मी अनेक वर्ष वाचत आलोय. जुन्या घरातून बाहेर पडलं की जाताना डाव्या हाताला ती दिसायची. डॉ.सौ.हे फक्तं पाटीपुरतं. बाकी सगळ्यांच्या त्या मेहेंदळेबाई होत्या. १९७८ ते जवळजवळ २००३, पंचवीस वर्ष आम्ही, आमच्याकडे येणारे नातेवाईक यांनी त्यांची औषधं आणि बोलणी खाल्ली. ती पाटी काढली असती तरी चालली असती इतक्या त्या प्रसिद्ध होत्या. अतिशय स्पष्टवक्त्या आणि अचूक निदान असलेल्या. नऊ म्हणजे नऊला त्या यायच्या आणि संध्याकाळी पाचला. रस्त्यात कुणी पेशंट भेटला तरच काय तो उशीर. लोक थांबलेले असायचे याची जाणीव चालण्यात दिसायची. 

साडेपाच फुटाच्या आसपासची उंची. थोड्याश्या स्थूल, चष्मा, गो-यापान आणि देखण्या होत्या. निम्मे आजार स्टेथो न लावताच कळायचे त्यांना. उगाचच बाहेरची औषध लिहून देणे हा प्रकार नव्हताच. एमार कडून आलेले स्याम्पल्स त्या गरजूला फ्री द्यायच्या. बाकी जी काय गोळ्या औषधं असतील ती त्यांच्याकडची. त्यामुळे बाहेर बसलेल्यांकडे बाटली असायचीच. त्यांनी रंगीत पाणी दिलं असतं तरी लोक ते पिऊन विश्वासावर बरे झाले असते. टेस्ट प्रकार कधीच नव्हता. प्रत्येकाची आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थिती त्यांना माहित होती त्यामुळे आजार नेमका कशामुळे हे त्यांना चटकन कळत असावं, वर्षानुवर्ष आमचं आणि एकूणच पर्वती दर्शनचं उधारीखातं त्यांच्याकडे होतं. अगदीच खूप पैसे साठले तर त्या आठवण करायच्या, नाहीतर पैशाची आठवण त्यांनी कुणाला केलेली मी ऐकली नाही. त्यांच्यासमोर कुणाला खोटं बोलताच यायचं नाही. सोज्वळपणा, न बोलता केलेला चांगुलपणा जास्ती भेदक असतो. 

आई त्यांच्याकडे सवाष्णं म्हणून जेवायला जायची वर्षातून एकदा. दवाखाना संपला की दुपारी कार्यक्रम असायचा तो. तिथली ट्रीटमेंट वेगळी असायची. एक पदर खोचून स्वागत करणारी गृहिणी. एकदा मी कामावर दांडी मारून त्यांच्याकडे सर्टिफिकेट आणायला गेलो होतो. 'काय झालंय रे तुला, खोटं  बोलतोयेस, आज देते, पुढच्यावेळेला मिळणार नाही', म्हणाल्या. मी त्यांच्याकडून घेतलेलं ते एकमेव सर्टिफिकेट असेल. लग्नं झाल्यावर आमचे पैसे आम्ही द्यायचे म्हणाल्या. आता त्यांनी दवाखाना बंद करून पण चार पाच वर्षे झाली असतील. त्याआधी दोनेक वर्ष त्या फक्तं संध्याकाळी यायच्या. दोन्ही मुलं डॉक्टर झालीत त्यांची. मुलगी अमेरिकेला असते आणि मुलगा ऑर्थोपेडीक आहे. त्यामुळे कितीतरी वर्षात त्यांची भेट नाही.  

नऊ दहा वर्ष झाली, माझ्या चेह-याचा उजवा भाग थोडा प्यारलाईझ झाल्यासारखा वाटला. जाम टेंशन आलं होतं, आधीच बाकी सगळी परिस्थिती बिकट होती. कामावर जवळच्याच हॉस्पिटलमधे गेलो तर म्हणे बीपी वाढलाय, दाखल व्हा. बाकी टेस्ट करायला लागतील. घरी जाऊन येतो म्हटलं. पैसे नव्हतेच एवढे. पण काही वेळेला बुद्धी साथ देते. संध्याकाळी सुटल्यावर मेहेंदळेबाईंच्याकडे गेलो. काय होतंय ते विचारलं, तीन वाक्यात निदान झालं, "१) डायरेक्ट पंख्याच्या वा-यात झोपला होतास? नाही. २) खिडकीत बसून प्रवास करताना गार वारं लागलं? नाही. ३) नागीण झाली होती? हो". एक चिट्ठी लिहून दिली. शॉक घे पंधरा दिवस, होईल बरं.

फ्यामिली डॉक्टर हा नातेवाईक असलेली आमची पिढी नशिबवान म्हणायची. आता सगळं फास्ट झालंय. मेडिकल स्टोअर मधून लोक डायरेक्ट औषधं घ्यायला लागले. उगाच ताप आला म्हणून गेलो तर बाई एकाच दिवसाचे औषध द्यायच्या. 'लगेच घेऊ नकोस, अगदीच वाढला ताप तर घे, अरे ताप बाहेर नको का पडायला, वर्षातून एकदा येउन जायला हवाच ताप'. आता असलं काही कानावर पडत नाही. जेम्स सारख्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या आणि महागडी औषधं लिहून मिळतात. आजार बरा होतोय, रोग वाढतोय. 

एकदा जाऊन येईन आता. इतकी वर्ष त्यांनी आम्हांला विचारलं, आता मी विचारेन, "ब-या आहात ना?"

--जयंत विद्वांस

Friday 12 June 2015

पी.एल. …….

मोठा माणूस. कर्तुत्वानी, दातृत्वानी, बुद्धीनी. अनुकरण करावा असा. अनुकरण मुद्दाम म्हणतोय कारण कॉपी करायला धारिष्ट्यं हवं, कुवत हवी आणि असली समजा तरी कातडं किती काळ पांघरणार, कोल्हेकुई समजतेच आज ना उद्या. पुलंचा सगळ्यात मोठा मला भावलेला गुण काय असेल तर खुदकन हसू आणणारा विनोद आणि टचकन पाणी आणणारं साधं सरळ वाक्यं किंवा शब्दं. त्यांनी खूप पण वाचनीय लिहिलंय पण फक्त 'व्यक्ती आणि वल्ली' जरी त्यांनी लिहिलं असतं तरी ते थोर म्हणूनच गणले गेले असते इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी. 

माणूस नजरेसमोर उभा राहील असं वर्णन कसं करायचं हे मी त्यांच्याकडून शिकलो, किंबहुना जी काही सत्यं/काल्पनिक व्यक्तिचित्रं आजवर लिहिली ती त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच. कॉपी शक्यं नाही त्यामुळे केली नाही पण शैली मात्रं असेल काही तर ती त्यांचीच. त्यांच्या काल्पनिक माणसांचं एखादं वाक्यं सुद्धा त्यांना आणि त्या पात्राला अजरामर करून गेलं. अजूनही 'ही गेल्यापासून दारचा आंबा मोहरला नाही' या वाक्याला पाणी येतंच, हरितातात्यांवरच्या लेखात 'पाठीला डोळे फुटावेत…' हा परिच्छेद वाचताना आवंढा येतोच, 'बटाट्याची चाळ' कालबाह्य झालं असेल कदाचित पण त्याचं शेवटचं चिंतन मात्रं चटका लावून जातं.  

दुसरा मोठा गुण म्हणजे कौतुक. चांगल्याचं जाहीर कौतुक करायचं, प्रस्तावना लिहायची आणि त्या माणसाला उभा करायचा. 'रामनगरी'मधे प्रत्येक प्रयोगाला राम नगरकर त्यांच्या ऋणाचा उल्लेख करायचे, मच्छिंद्र कांबळीचं 'वस्त्रहरण' फ्लॉप होतं आल्या आल्या, पुलंनी उचलून धरलं त्यानंतर मागे वळून पहायची गरज पडली नाही त्या नाटकाला. मूळ नाटक, पुस्तक सुंदर असणारच हे मान्यं पण प्रथितयश माणसाची थाप पडली की त्याचा प्रवास लवकर आणि विनासायास होतो. 

पुलंच्या लिखाणात तुम्हाला व्हिलन दिसणार नाही. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. वाईट दिसणार नाही, पहाणार नाही, ऐकणार नाही, सांगणार नाही. स्वत:च्या दु:खाचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात, लेखात मला सापडलेला नाही. त्यांची पहिली बायको लग्नाच्या दुस-या दिवशी गेली. निपुत्रिक होते. पण कुठेही कडवट सूर, उल्लेख नाही. पण बरं झालं ते निपुत्रिक राहिले. त्या वारसाची तुलनाहत्या झाली नाही त्यामुळे (अभिषेक बच्चन, रोहन गावसकर बघा - जिंदगीभर अमक्या तमक्याचा मुलगा हीच ओळख नशिबात). जे काही होतं ते पुलंबरोबर संपलं.

कधी विषण्णता आली, एकटं वाटलं, निरस वाटलं की मी पुलं हातात घेतो, हसतो, रडतो, रमतो, बाकी सगळं विसरतो आणि रिफ्रेश होतो. कुठल्याही पानापासून सुरवात करा, अडचण नाही. कधीही बघायला शोले, गणपतीत वाजायला नाच रे मोरा, मुंगडा मुंगडा आणि एकांतात/गर्दीत वाचायला पुलं, यांना पर्याय नाही. अजूनही पुलं दुकानात खपतात. पंधरा वर्षात नवीन काहीही आलं नसतानाही, अजून काय पाहिजे. पुलं म्हणालेत म्हणून मला वुडहाउस वाचायचाय. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला मिळाला होता वुडहाउस हैदोस लेव्हलच्या मासिकाशेजारी. मी कर्मदरिद्री, घेतला नाही तेंव्हा. आता घेईन आणि मरायच्या आधी वाचेन एवढं निश्चित. 

पुलंच्या अंत्यंयात्रेला मी गेलो नाही कारण मला तिथे हमसाहमशी रडता आलं नसतं. घरी टीव्ही वर दाखवत होते, जेवत असताना मला अनावर रडू आलं. त्या माणसानी आयुष्यं सुंदर केलं हे निश्चित. अजूनही तीच तीच पुस्तकं वाचताना खुदकन हसू येतं, कधी डोळे पाणावतात, हुंदका येतो, गलबलायला होतं.शेवटचा श्वास घ्यायच्या आधी इंद्रिये शाबूत ठेव एवढीच मागणी आहे देवाकडे, रात्री झोपताना 'व्यक्ती आणि वल्ली', गणगोत, गुण गाईन आवडी', 'साठवण' किंवा कुठलंही वाचून आनंदात झोपावं आणि सकाळी जाग येउच नये. असं झालंच तर फक्तं हस-या चेह-यानी जाण्याचा योग येईल. :) 

--जयंत विद्वांस
 
 

Monday 8 June 2015

वन्स अपॉन अ टाईम (१९).....

रिचर्डस, जयसूर्या, अरविंदा डिसिल्व्हा, सेहवाग, मार्क ग्रेटब्याच, कालुवितरणा, श्रीकांत, अतुल बेदाडे, रियाझ पूनावाला अशी उतरती कळा आठवण्याचं कारण म्याड म्याक्स डिसिल्वा. सगळे तडाखेबंद फलंदाज होते. बंडखोर सगळे. धुवायचं एवढंच माहित यांना. अजूनही माणसं राहिलीत या यादीत खरंतर. तसेही हिटर, पिंच हिटर असतात प्रत्येक टीम मधे. डिसिल्व्हा आला तेंव्हा रियाझ पूनावालाच होता. प्रत्येक बॉलला चौकार मारण्याची इच्छा असलेला. पण चुकतो तो डिसिल्व्हा आणि परत परत चुकतो तो श्रीकांत, पूनावाला, बेदाडे आणि तत्सम मंडळी. रिचर्डस या सगळ्यांचा बाप होता, बेदरकार, बिनधास्त आणि खेळाची मजा घेणारा. ते उपजत लागतं, पेंशनची सोय, रेकॉर्ड बुक मधलं स्थान वगैरे महत्वाच्या गोष्टींकडे या माणसांचं लक्ष नसतं. मला वाटलं मी केलं, परिणाम होतील ते होतील (हे विधान अतुल बेदाडे, रियाझ पूनावाला या आणि अशा इतर मंडळींसाठी लागू नाही). 

टी-ट्वेंटी आत्ता आली. रिचर्डस, डिसिल्व्हा, सेहवाग आधीपासून हेच खेळत होते. टी-ट्वेंटीमधे फिल्डिंग रेस्ट्रीक्शन असताना कुणीही तुडवेल हे लोक टेस्ट, वनडेला पण असंच धुवायचे. अर्थात शेवटी नशिबात असावं लागतं. ग्रेटब्याच सेम तुडवायचा पण न्यूझीलंड वर्ल्डकप जिंकू शकलं नाही डिसिल्व्हा नशीबवान. ते टीम जबराटच होती लंकेची. जयसूर्या, कालुवितरणा, अरविंदा डिसिल्व्हा, रणतुंगा, अटापटटू, महानामा, गुरुसिंघे, तिलकरत्ने, धर्मसेना, मुरली, वकारचा डुप्लिकेट पुष्पकुमारा. रणतुंगाची आयडिया भन्नाट होती. तुम्ही हाणा बिनधास्त, औत आउट झालात तरी चालेल पण पंधरा ओव्हर संपताना मला बोर्डावर शंभर हवेत. एवढासा देश आहे पण वर्ल्डकप नेला आणि दोनदा उपविजेते आहेत. रणतुंगाचे श्रम आहेत ते. समाजवादी संघ नसल्यामुळे सगळ्यांनी त्याचं ऐकलं हे महत्वाचं. 

एक तर अष्टपैलू भरपूर. रणतुंगा, डिसिल्व्हा, जयसूर्या दहा ओव्हर पूर्ण करण्याच्या लायकीचे गोलंदाजही होते. फलंदाजीतलं अपयश ते भरून काढायचे. अतिशय फ्लेक्झी टीम होती ती. आपल्याला सेमी फायनलाला त्यांनी लायकी दाखवली. पहिल्या दोन ओव्हरमधे अहिरावण महिरावण आउट झाले होते. श्रीनाथचा चेहरा सुद्धा कधी नव्हे ते हसरा झाला होता १-१, २-१ असताना डिसिल्व्हा आला आणि त्याने म्याच शांतपणाने काढून नेली. कुंबळेला मारलेले कव्हरड्राईव्ह शालीन होते. आपला एक्का निष्प्रभ म्हटल्यावर बाकी सगळ्यांनी माना टाकल्या. २५१ केल्या त्यांनी, आपण १२०. डिसिल्व्हा ६६ आणि एक विकेट तेंडूलकर ६५ आणि दोन विकेट, बाकी फरक उरलेला स्कोअरबोर्ड वाचला की कळेल. पेशवे पडले की आपल्याकडे बाकीच्यांनी गर्भगळीत होण्याचा प्रघात पूर्वीपासूनचा आहे. 

बाकी रेकॉर्ड काय वगैरे मारू देत, नसतीलही कदाचित त्याच्या नावावर फार पण शहाण्णवची फायनल मात्र या माणसानी एकहाती खेळली. नुसती जिद्द असून चालत नाही, मोक्याच्या क्षणी कर्तुत्व सिद्ध करावं लागतं, म्याड म्याक्सनी ते केलं. पहिल्यांदा बॉलिंग आली म्हणून त्यांनी माती खाल्ली नाही. अरविंदानी ४४ मध्ये तीन विकेट घेतल्या. दोन झेल घेतले आणि नंतर नाबाद १०७ काढल्या. म्याग्रा, राफेल, वार्न , फ्लेमिंग असे सरस गोलंदाज होते. इसको कहते है कर दिखाना. आता असं वेड बघायला मिळत नाही. संघात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नं भरपूर असतात पण खांद्यावर द्रोणागिरी आणणारा हनुमान विरळ, दुर्मिळ झालाय. रावणाच्या लंकेतला त्यांना संजीवनी, प्रतिष्ठा देणारा हा हनुमान मात्रं लक्षात राहिलाय, एवढं खरं.    

--जयंत विद्वांस

Wednesday 3 June 2015

लल्याची पत्रं (२१) …'ये क्या हुआ …'

लल्यास…… 

सेट म्याक्सच्या कृपेने वरचेवर जुने सिनेमे बघण्याचे योग येतात. परवाच 'अमर प्रेम' परत बघितला. खरंतर मला तो सिनेमा जीव टाकावा एवढा आवडत नाही कारण लहान नंदू ते मोठा नंदू यातला काळ मिसिंग आहे म्हणून असेल आणि शर्मिला टागोर फार काळ सहन होत नाही हा एक भाग. खन्नाचं पात्रं वरवरचं वाटतं मला तरी. त्याचा घरातला प्रॉब्लेम फार झटपट मांडलाय. तरीपण मी तो बघतो कारण आरडी, किशोर, आनंद बक्षीसाठी. एकाचढ एक गाणी आहेत. एसडीच्या आवाजातलं एक डोलीमे बिठायके, लताची दोन रैना बीती जाये आणि बडा नटखट है रे, किशोरची तीन चिंगारी कोई भडके, कुछ तो लोग कहेंगे आणि ये क्या हुआ. किशोरची तीनही गाणी अजरामर आहेत. आनंद बक्षीच्या वहीत पडलेली कविता ' चिंगारी कोई भडके' आरडीनी हट्टानी घेतली आणि तिला फिल्मफेअर मिळालं. 

चिंगारी आणि कुछ तो लोग कहेंगे वर नंतर कधी तरी लिहीन पण आज 'ये क्या हुआ …' वर. धोतर घालून झिंगणारा ओम प्रकाश आणि राजेश खन्ना. शर्मिलानी एन्ट्री नाकारल्यावर निराश झालेला राजेश खन्ना. घटना घडून जाते तेंव्हा आपण त्या धक्क्यात असतो. काळ गेला की किंवा सावरल्यावर आपण त्याची कारणं शोधतो. कुणावर तरी खापर फोडायला मिळालं तर उत्तमच नाहीतर कुणी मिळालं तर नशीब हाताशी असतंच. बरं तुम्ही त्याला नावं ठेवा, दोष द्या, त्या बिचा-याची काहीही तक्रार नाही. ज्याच्या बाबतीत घटना घडते किंवा धक्का बसतो त्यालाच अनेक प्रश्न पडलेले असतात, काय झालं, कसं झालं, केंव्हा झालं, का झालं असे प्रश्न विचारून बाकीच्यांनी त्याला हैराण करू नये खरंतर. आपण जे विचारतो तेच आनंद बक्षीनी लिहिलंय. पण संवादाला चाल लावावी आरडीनीच. 
 
 

मन जेवढं हळवं असतं ना त्याच्या उलट ते नेहमी लिहितं बघ. ते धक्क्याचं विश्लेषण करतं आपल्यापुरतं आणि मग बाहेर वेगळंच दाखवते की आपल्याला काहीही फरक पडलेला नाही किंवा स्वसमाधानासाठी ते कारणमीमांसा देतं. तरीही अर्थात घाव किती खोलवर पोचलाय ते कळतंच म्हणा. जब हुआ, तब हुआ छोडो, ये ना सोचो ही बेफिकिरी सांगायला फक्तं. एकांतात जाऊन खपल्या काढायच्या आणि कुरतडत बसायचं, फक्तं ते दाखवायचं नसतं. प्रत्येक कडव्यात मनाचं समाधान करून घेतलंय बघ. काचेचं खेळणं, तुटणारच की, त्याची कशाला तक्रार हवीये, हे फक्तं म्हणायला झालं. पण मग ते तुकडे मात्रं टाकायचे नाहीत, जपून ठेवायचे मखमली आवरणात कितीही टोचले तरी.   

स्वप्नंच ते, तुटणारच की. तीन मिनिटाच्या वर कुठलंही स्वप्नं नसतं असं मी वाचलंय. त्यामुळे त्याला क्षणभंगुरत्वाचा शाप आहेच. जे घडत नाही ते पण घडावंसं वाटतं त्याचं स्वप्नं होतं. पाहिलेली स्वप्नं वेगळी, त्याकरता माणूस जिद्दीही होतो पण स्वप्नवत म्हणजे सगळं सुखकारक चाललेलं असताना मधेच भंगलं की मग प्रश्नं पडतो, जे अनुभवलं ते सत्यं की स्वप्नं? मग परत एकदा समाधान, स्वप्नंच ते, चिरकाल कसं असणार, तुटणारच की ते कधी ना कधी, आंब्याची शेवटची रसाळ फोड खाताना, तुला गाडीत बसवून निघताना मला जे सुख संपल्याचं दुखं होतं तेच इथेही आहे. घटना अटळ होती हे ही समाधानच एक प्रकारचं. बदनामी होणार होतीच, झाली. आता कशाला त्याची खंत, जो हुआ सो हुआ, छोडो यार, ये ना सोचो. माणूस एकदा बदनाम झाला की त्यासारखं सुख नाही बघ. उगाच कुणाला घाबरायला लागत नाही, बंधनं नाहीत. कोण काय म्हणेल ही चिंता नाही. पण या सगळ्याची किंमत मोठी असते फ़ार. 

धृवपदातल्या प्रत्येक 'हुआ' नंतर जी बासरी वाजते त्याला तोड नाही बघ. कडव्यातल्या शेवटच्या 'हुआ'ला किशोरचा 'ह' ऐकण्यासारखा, करुण हसतो तो. असाच 'ह' ऐकायचा असेल तर 'फंटूश' मधल्या 'दुखी मन मेरे' मधलं 'पत्थर के दिल मोम न होंगे' मधला ऐक. त्याचं 'गाडी  रही है' मधल्या 'जानेके बाद आते है याद, "बिछडे" हुए वो मेले' मधील "बिछडे" ऐक. गो-यापान कपाळावर छोटासा लाल कुंकवाचा ठिपका कसा चेहरा सुंदर करून जातो तसं किशोर करतो बघ. एखाद्या अक्षराला, शब्दाला असं काही अत्तर लावून जातो की जीव जावा आपला. 

चल, आता पुढच्या पत्रापर्यंत ऐका हे गाणं. 

--जयंत विद्वांस 
   
  
ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ
क्यों हुआ, जब हुआ, तब हुआ
छोडो, ये ना सोचो

हम क्यों शिकवा करे झूठा
क्या हुआ जो दिल टूटा
शीशे का खिलौना था
कुछ ना कुछ तो होना था, हुआ

हमने जो देखा था, सुना था
क्या बताये वो क्या था
सपना सलोना था
ख़तम तो होना था, हुआ

ऐ दिल, चल पीकर झूमे
इन्ही गलियों में घूमे
यहाँ तुझे खोना था
बदनाम होना था, हुआ
 
(आनंद बक्षी, आरडी, किशोर, अमर प्रेम)
 
 
 https://www.youtube.com/watch?v=saApSghVCOU