Tuesday 16 June 2015

मेहेंदळे बाई.....

डॉ.सौ.अपर्णा अशोक मेहेंदळे, एम.बी.बी.एस.ही पाटी मी अनेक वर्ष वाचत आलोय. जुन्या घरातून बाहेर पडलं की जाताना डाव्या हाताला ती दिसायची. डॉ.सौ.हे फक्तं पाटीपुरतं. बाकी सगळ्यांच्या त्या मेहेंदळेबाई होत्या. १९७८ ते जवळजवळ २००३, पंचवीस वर्ष आम्ही, आमच्याकडे येणारे नातेवाईक यांनी त्यांची औषधं आणि बोलणी खाल्ली. ती पाटी काढली असती तरी चालली असती इतक्या त्या प्रसिद्ध होत्या. अतिशय स्पष्टवक्त्या आणि अचूक निदान असलेल्या. नऊ म्हणजे नऊला त्या यायच्या आणि संध्याकाळी पाचला. रस्त्यात कुणी पेशंट भेटला तरच काय तो उशीर. लोक थांबलेले असायचे याची जाणीव चालण्यात दिसायची. 

साडेपाच फुटाच्या आसपासची उंची. थोड्याश्या स्थूल, चष्मा, गो-यापान आणि देखण्या होत्या. निम्मे आजार स्टेथो न लावताच कळायचे त्यांना. उगाचच बाहेरची औषध लिहून देणे हा प्रकार नव्हताच. एमार कडून आलेले स्याम्पल्स त्या गरजूला फ्री द्यायच्या. बाकी जी काय गोळ्या औषधं असतील ती त्यांच्याकडची. त्यामुळे बाहेर बसलेल्यांकडे बाटली असायचीच. त्यांनी रंगीत पाणी दिलं असतं तरी लोक ते पिऊन विश्वासावर बरे झाले असते. टेस्ट प्रकार कधीच नव्हता. प्रत्येकाची आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थिती त्यांना माहित होती त्यामुळे आजार नेमका कशामुळे हे त्यांना चटकन कळत असावं, वर्षानुवर्ष आमचं आणि एकूणच पर्वती दर्शनचं उधारीखातं त्यांच्याकडे होतं. अगदीच खूप पैसे साठले तर त्या आठवण करायच्या, नाहीतर पैशाची आठवण त्यांनी कुणाला केलेली मी ऐकली नाही. त्यांच्यासमोर कुणाला खोटं बोलताच यायचं नाही. सोज्वळपणा, न बोलता केलेला चांगुलपणा जास्ती भेदक असतो. 

आई त्यांच्याकडे सवाष्णं म्हणून जेवायला जायची वर्षातून एकदा. दवाखाना संपला की दुपारी कार्यक्रम असायचा तो. तिथली ट्रीटमेंट वेगळी असायची. एक पदर खोचून स्वागत करणारी गृहिणी. एकदा मी कामावर दांडी मारून त्यांच्याकडे सर्टिफिकेट आणायला गेलो होतो. 'काय झालंय रे तुला, खोटं  बोलतोयेस, आज देते, पुढच्यावेळेला मिळणार नाही', म्हणाल्या. मी त्यांच्याकडून घेतलेलं ते एकमेव सर्टिफिकेट असेल. लग्नं झाल्यावर आमचे पैसे आम्ही द्यायचे म्हणाल्या. आता त्यांनी दवाखाना बंद करून पण चार पाच वर्षे झाली असतील. त्याआधी दोनेक वर्ष त्या फक्तं संध्याकाळी यायच्या. दोन्ही मुलं डॉक्टर झालीत त्यांची. मुलगी अमेरिकेला असते आणि मुलगा ऑर्थोपेडीक आहे. त्यामुळे कितीतरी वर्षात त्यांची भेट नाही.  

नऊ दहा वर्ष झाली, माझ्या चेह-याचा उजवा भाग थोडा प्यारलाईझ झाल्यासारखा वाटला. जाम टेंशन आलं होतं, आधीच बाकी सगळी परिस्थिती बिकट होती. कामावर जवळच्याच हॉस्पिटलमधे गेलो तर म्हणे बीपी वाढलाय, दाखल व्हा. बाकी टेस्ट करायला लागतील. घरी जाऊन येतो म्हटलं. पैसे नव्हतेच एवढे. पण काही वेळेला बुद्धी साथ देते. संध्याकाळी सुटल्यावर मेहेंदळेबाईंच्याकडे गेलो. काय होतंय ते विचारलं, तीन वाक्यात निदान झालं, "१) डायरेक्ट पंख्याच्या वा-यात झोपला होतास? नाही. २) खिडकीत बसून प्रवास करताना गार वारं लागलं? नाही. ३) नागीण झाली होती? हो". एक चिट्ठी लिहून दिली. शॉक घे पंधरा दिवस, होईल बरं.

फ्यामिली डॉक्टर हा नातेवाईक असलेली आमची पिढी नशिबवान म्हणायची. आता सगळं फास्ट झालंय. मेडिकल स्टोअर मधून लोक डायरेक्ट औषधं घ्यायला लागले. उगाच ताप आला म्हणून गेलो तर बाई एकाच दिवसाचे औषध द्यायच्या. 'लगेच घेऊ नकोस, अगदीच वाढला ताप तर घे, अरे ताप बाहेर नको का पडायला, वर्षातून एकदा येउन जायला हवाच ताप'. आता असलं काही कानावर पडत नाही. जेम्स सारख्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या आणि महागडी औषधं लिहून मिळतात. आजार बरा होतोय, रोग वाढतोय. 

एकदा जाऊन येईन आता. इतकी वर्ष त्यांनी आम्हांला विचारलं, आता मी विचारेन, "ब-या आहात ना?"

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment