Wednesday 3 August 2016

शब्दं...

मूल जन्माला आलं की त्यानी पहिला शब्दं कुठला उच्चारला ह्याची आई आणि बाबा नोंद करत असतात. जीवाचे कान करून ऐकतात तो शब्दं, ती हाक आपलीच असावी अशी दोघांची इच्छा असते पण ते पोर वात्रट असतं, त्याला सतत खेळवणा-या शेजारच्या दादाला ते दाद्दा किंवा द्दा अशी पहिली हाक मारतं आणि त्यांचा हिरमोड करतं. तो कडेचा दादा हरखून जातो. पहिलेपणाचा आनंद अफाट असतो. 'मला', मला हाक मारली त्याने पहिली, या प्रेमापोटी तो त्या बाळावर अजून माया करतो. एक शब्दं कारणीभूत ठरतो प्रेम वाढायला. शब्दांना त्यांचे स्वतःचे उपजत अर्थ असतात, लय असते. काही आपण चिकटवलेले, काढलेले, अभिप्रेत असलेले लाक्षणिक अर्थ असतात. मलमली, दुडूदुडू, गुळगुळीत, सुळसुळीत, गुबगुबीत, गरगरीत, दणकट, जबरदस्त, थरथराट, आघात या शब्दातली अक्षरं त्या शब्दांच्या अर्थाला अर्थ आणतात असं मला कायम वाटत आलंय. कुठून आले असतील हे शब्दं, कुणी तयार केले असतील, का करावेसे वाटले असतील, काय शास्त्र असेल त्यामागे. हजारो भाषेत लाखो शब्दं वेगवेगळे आकार, ध्वनी, अर्थ घेऊन वावरतायेत. प्रत्येकाला आपली भाषा उच्च वाटते. 

शब्दानी शब्द वाढला असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर वाद वाढला. संवाद वाढतोच की शब्दांनी पण दोघांना तो हवा असेल तर. 'तुटे वाद, संवाद तो हितकारी', रामदास म्हणाले. पहिल्यांदा चित्रातून लोकांनी भावना व्यक्तं केल्या. प्रत्येकजण चित्रं काढू शकत नाही मग स्पर्श, खुणा वापरल्या गेल्या असतील त्याच्याबरोबर. तरीसुद्धा काही अपूर्ण राहिलं असणार मग शब्दं आले असतील. त्यांचे अर्थ त्या त्या काळानुसार असतील, कालौघात किती बदल झाले अर्थात त्याचा हिशोब कोण ठेवणार. एखादा भाषातज्ज्ञ त्याचा उगम, मूळ अर्थ, आत्ताचा अर्थ असा गहन अभ्यास करेलही पण सामान्य माणसाला प्रचलित अर्थानी शब्दं वापरायची सवय असते आणि ती त्याला सोपी असते म्हणून आवडतेही. पण किती प्रकार आले ना. शब्दांचे ग्रंथ झाले, ज्ञान देता आलं, मिळवता आलं, गाणी झाली, श्लोक झाले, धर्मग्रंथ झाले, शिव्या झाल्या. ज्याची जशी बुद्धी तशी त्याने ती वापरली. प्रत्येकाला समोरच्याला काहीतरी सांगायचंय. सांगणा-याच्या ताकदीवर, ज्ञानावर, आवेशावर, घटनेच्या परिणामावर शब्दांची ताकद ठरते. शब्दं सुद्धा वापरता आले पाहिजेत. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे, ठाकरे काका पुतण्या, अटलबिहारी, शंकर अभ्यंकर, बाबामहाराज सातारकर यांच्यात शब्दं वापरण्याची हातोटी आहे. आवाज चांगला असला म्हणजे शब्दंफेक जमेल फारतर पण नेमका शब्दं योजून त्याचा पुरेपूर परिणाम साधायचं कसब अंगी लागतं. शब्दं कसा भूसुरुंगासारखा हवा. पाय ठेवल्यावर अर्थ फुटणारा. वाचणा-याच्या डोळ्यांचे पाय मजबूत असतील तर तो त्यावर बिनदिक्कत पाय ठेवेल आणि स्फोट करेल. जो नाजूक पावलांनी त्यावरून जाईल त्याला हिरवळ असेल ती. खुनाच्या खटल्यात वकील विचारतो, घटना घडली तेंव्हा तुम्ही कुठे उभे होतात? किती अंतरावर होतात? म्हणजे अंतर बदललं, दृष्टिदोष असेल तर वेगळं दिसू शकतं यावर केसचा निकाल बदलू शकतो. शब्दांचं तसंच आहे. तुम्ही त्यातून कुठले अर्थ काढताय त्यावर अनुभूती अवलंबून असेल. लिहिणा-याच्या, बोलणा-याच्या मनात असलेला अर्थ वाचला, ऐकला जाईल असं नाही. ब-याचदा आपल्याला सोयीस्कर, हवे असलेले अर्थ काढलेले असतात. 

शब्दं बबलगम सारखा असतो. चावलात की त्याचा किती मोठा फुगा करायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे. शब्दं कडधान्यासारखा असतो. एवढुस्सा असतो पण भिजत घातलात, मोड आला की कसा फुगीर, दळदार दिसतो. शब्दं वाचता आला पाहिजे, त्यातला दळ काढता आला पाहिजे. सांगितलेला, अभिप्रेत असलेला अर्थ कळला पाहिजे. एखाद्याची चूक जेवढ्या प्रयत्नपूर्वक आपण शोधतो तसा लपलेला एखादा अर्थ शोधता आला पाहिजे. एखादा चेहरा दुस-या कोनातून बघितला तर वेगळा किंवा जास्ती सुंदर दिसतो तसा शब्दं बघता यायला हवा वेगळ्या मितीतून. शब्दात ताकद असते, प्रेम असतं, लय असते, गाणं असतं, ऊर्जा असते. चेहरा असतो, रूप असतं, तिरस्कार असतो, माया असते, तळतळाट असतात. शब्दाला भावना चिकटून आली की त्याचं शस्त्रं होतं किंवा मोरपीस होतं. 'स्वामी'मध्ये सतत संयत बोलणारे माधवराव, राघोबादादांची बिनपाण्याने करतात असा एक पानभर अंगार आहे. शब्दाची ताकद म्हणजे काय ते कळेल त्यात. समोरच्याच्या तोंडातून शब्दं फुटणार नाहीत अशी ताकद त्यात आहे. 'श्यामची आई'मध्ये 'आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी' ऐकताना डोळ्याला झारीसारखे अनेक डोळे फुटतात, याला शब्दांची ताकद म्हणतात.    

म्हटलं ना, भावना चिकटून आली की शब्दांचे अणकुचीदार भाले होतात, मंत्र होतात, गाणी होतात. बेलवलकरांची स्वगतं बार्बेक्यूवर सळई ठेवावी तशी आपल्याला होरपळवतात, बालगंधर्वांच्या, लताच्या, आनंद भाटेंच्या मुखातून शब्दं आला की शब्दाचा स्वरार्थ होतो, नानाच्या तोंडातून आले तर कधी बारिशकर होतो तर कधी क्रांतिवीरचा प्रताप होतो, अमिताभच्या तोंडातून आले तर खर्जातलं 'नीला आसमां' होतात, बोरकरांचे शब्दं पुलंच्या तोंडातून आले की त्यांना नाद येतो आणि ते 'तुझी गो पायजणे' होतात, कुणाच्याही आवाजात 'जन गण मन' ऐकलं तरी रोमांच उभे रहातात कारण ते शब्दंच तसे आहेत. म्हणणा-या कितीजणांना त्याचा अर्थ माहित असेल? तरीही त्याला चिकटलेल्या भावनेमुळे ते आपलेसे आहेत. आजी पहाटेच्या अंधारात मानसपूजा म्हणायची, अस्पष्ट ऐकू येणारे शब्दं अंगावर पांघरूण घातल्यासारखे पसरायचे, पाया पडल्यावर पुटपुटलेल्या आशीर्वादाचे शब्दं कसे झोळीत दान पडावं तसे कानात पडतात, कुणी टाहो फोडून नाहीतर मायेनी मारलेली हाक असेल त्या शब्दाला मायेचा पदर असतो. शब्दं तिळासारखा असतो त्याचा फुलवून हलवा करता यायला हवा. 

शब्दं.... एवढं सगळं असून सुद्धा काही गोष्टी उरतातच सांगण्यासाठी, ज्या शब्दात मावत नाहीत, नविन शब्दं सापडत नाहीत, बुद्धी कमी पडते, आकलन कमी पडतं. धबधबा मग नायगारा असो नाहीतर कोकणातला त्याचं रौद्र रूप शब्दात कसं पकडणार, मधुबाला सुंदर दिसते म्हणजे नेमकं काय हे शब्दात सांगता नाही येणार, प्रचंड तहान लागल्यावर सावलीला उभं राहून पोटात गेलेला थंडगार पाण्याचा घोट कसा होता हे नाही सांगता येणार शब्दात, बॅटीच्या मधे लागून गेलेल्या चौकाराचा तो आवाज, तिनी पहिल्यांदा आपल्याला चोरून बघावं आणि ती सापडल्यावर कुलूपबंद झालेल्या नजरांचा तो क्षण, बाळानी मुठीत बोट पकडावं आणि तेंव्हा आत कुठेतरी हलतं ते शब्दात कसं येणार? म्हणून आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद किंवा दु:खाचा क्षण नि:शब्दं असतो. काहीही बोलून अंगुळभर शिल्लक राहील अशी अवस्था ती. म्हणून न बोलणे उत्तम. मौन, अबोला, एकांत किती बोलका असतो, फक्तं तिथे शब्दं नसतात, अव्यक्तं भावनांचे, शरीर धारण न केलेले, आत्मे वावरतात तिथे.    

शब्दं... म्हणजे पसारा. नेमकं न सांगणारा. शब्दं फार मौल्यवान असतात. जपून वापरावेत, नेमके वापरावेत, कधी कधी एखादा शब्दं वगळून जो परिणाम होतो तो वापरून होत नाही, उन्हाळ्यात पावसासाठी जसं गवत राखून ठेवतात तसा एखादा शब्दं हातचा म्हणून राखलेला असावा, शब्दात मंत्राची ताकद हवी, सायीची माया हवी. शब्दं कोडं घालणारा हवा, शब्दं उकल करणारा हवा. मेंदूच्या हुकूमावर ओठाच्या उंबरठ्याशी लगाम खेचल्यासारखा थांबणारा शब्दं ताब्यात हवा. शब्दं नि:शब्दं करणारा पण हवा. काय गंमत आहे बघा. प्रत्येक शब्दं काहीतरी सांगत असतोच. 'शब्दं' हा शब्दं घ्या. ना काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, अनुस्वार, विसर्ग, किती सरळमार्गी आहे पण 'द'च्या पोटावर बसलेल्या त्या अर्ध्या 'ब' मधे काय आहे हे बघायची उत्सुकता लागली की शब्दांची ओढ सुरु झालीच. जे दिसतंय त्याची माणसाला आवड कमीच असते, दडलंय काय हे वाकून बघायची उत्सुकता जास्ती.  

एका शब्दावर इतके शब्दं झाले, अपशब्दं ऐकायच्या आत नि:शब्दं झालेलं बरं. ;) :P   

जयंत विद्वांस 

  
 

No comments:

Post a Comment