Wednesday 24 August 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१५)…. राखी मजुमदार…

काल राखी एकोणसत्तर वर्षाची झाली. भारताच्या स्वातंत्र्याला जितकी वर्ष पूर्ण होतील तितकीच वर्ष राखीलाही होत रहातील कारण ती १५ ऑगस्ट १९४७ ला बंगाल मधे जन्माला आली. तिच्या वडिलांचा बुटाचा धंदा होता तो सोडून त्यांना बांगलादेश मधून बंगालला यावं लागलं. ती ही हेलनसारखीच विस्थापित होती. सोळाव्या वर्षी तिचं लग्नं पत्रकार अजय विश्वासशी झालं जेंव्हा तिला लग्नाचा अर्थही माहित नव्हता आणि अठराव्या वर्षी ते मोडलं. तिचं दुसरं लग्नं मात्रं ब्रेकिंग न्यूज होती. संपूर्णसिंह कालरा उर्फ गुलझारशी तिचं लग्नं झालं. स्वप्नं कितीही सुंदर असलं तरी फार काळ टिकत नाही तसं काहीसं झालं. मीनाकुमारीमध्ये अडकलेल्या गुलझार आणि एक वर्षाच्या मेघनाला मागे सोडून ती एक दिवस घर सोडून गेली. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी लघुकथा' असं म्हणायचा गुलझार तिच्या बाबतीत. ती निघून गेल्यावर तो म्हणाला होता, 'शहर की बिजली गई, बंद कमरेमें बहोत देर तक कुछभी दिखाई न दिया, तुम गई थी जिस दिन, उस रोज ऐसाही हुआ था'. बडे लोग, बडी बाते. 

शशी कपूर (१०) आणि अमिताभ (८) बरोबर तिनी जास्ती काम केलं. 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'मुकद्दरका सिकंदर', 'कभी कभी', 'कस्मे वादे' ('शान' मधे वहिनी होती आणि 'लावारीस' धरला नाही कारण पडद्यावर समोरासमोर नाहीत पण ती त्याची आई होती त्यात) हिट झाले पण 'बेमिसाल', 'जुर्माना', 'बरसात की एक रात' फ्लॉप झाले. राखीचं एक कौतुक मला कायम वाटत आलंय. सिनेमा हिट असो फ्लॉप असो, तिच्या करिअरवर काही फार परिणाम झाला नाही त्याचा. 'जीवनमृत्यू', 'शर्मिली', 'ब्लॅकमेल' 'लाल पत्थर' मधली राखी अवखळ, लोभस, गोंडस होती नंतर ती फार मॅच्युअर्ड वाटायला लागली पडद्यावर. ग्रेसफुल होतीच ती. अतिशय गंभीर चेह-याची खरतर ती, आब राखून असलेली, गप्पं असणारी माणसं एक वचक निर्माण करतात. कधीही स्फोट होईल या भितीनी लोक चार हात लांब असतात. राखी तशी होती. ती एकूण १६ वेळा नॉमिनेट झाली फिल्मफेअरसाठी (बेस्ट ८, सपोर्टींग ८) आणि माधुरी (६/१४) पण म्हणून तिची काही माधुरीसारखी क्रेझ नव्हती. 

राखीचे पटकन दहा भन्नाट रोल, अजरामर डायलॉग, गाणी सांगा म्हटलं तर अवघड आहे पण मला राखी आवडायची. तिचे काही रोल्स माझ्या लक्षात आहेत. 'दुसरा आदमी', 'परोमा' 'तृष्णा', 'श्रद्धांजली' मी पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यावर उगाच पिंक टाकणार नाही. अशोककुमार जेवढ्या सहजतेने नायकाचा चरित्रं अभिनेता झाला तेवढ्याच सहजपणे राखी आई झाली. निरुपा रॉय, रत्नमाला, रिमा यांचं कौतुक झालं तेवढं राखीचं नाही झालं. विधवा, अन्याय झालेली आणि मुलं मोठी झाल्यावर सूड घेतात अशा भूमिका तिच्या वाट्याला जास्ती आल्या. 'करण अर्जुन', 'खलनायक'. 'रामलखन', 'सोल्जर', 'बाजीगर' यात ती तशी होती. 'बाजीगर' मध्ये ती वेडी होती त्यामुळे सूड घेतल्याचा आनंद तिला मिळत नाही एवढाच फरक. मद्यसेवनानी बोजड झालेल्या जिभेनी 'मेरे करण अर्जुन आयेंगे' म्हणते तेंव्हा मला थोडं वाईट वाटतं. घा-या डोळ्यांची, गोब-या गालांची, रॉयल लूक असलेली राखी 'गीत गाता हू मैं 'गाण्यात 'लाल पत्थर'मध्ये हेमा मालिनीपेक्षा सरस दिसते. 

'गदर-एक प्रेमकथा' काढणारा पण एक्याऐंशी साली पैसे नसलेला तेवीस वर्षाचा डायरेक्टर अनिल शर्मा तिच्याकडे गेला होता 'श्रद्धांजली' साठी. राखीने केला तो सिनेमा तरीही आणि तो हिट ही झाला. राखीचे काही अभिनयकण माझ्या लक्षात आहेत. 'शक्ती' मध्ये बापलेकात घुसमटलेली आई तिनी काय मस्तं उभी केलीये. 'बसेरा' मध्ये शशीकपूरच्या संसारात रमलेली रेखा बघून ती वेडी असल्याचं नाटक करून परत दवाखान्यात जायला निघते तेंव्हा ते नाटक ओळखलेल्या पूनम धिल्लनकडे ती जे बघते, बास, फिल्मफेअर किती मिळाले वगैरे काही संबंध नाही अशी बघते ती. तिचे तीन तळतळाट माझ्या लक्षात आहेत. असं वाटतं की वास्तवात ती जर कुणाला असं म्हणाली तर लागतील तिचे शाप. एक 'करन अर्जुन' मधला, एक 'रामलखन' मधला आणि एक 'बाजीगर' मधे दलीप ताहिलला ती बोलते तो. तिचा स्वभाव जसा शांत आहे तशा भूमिकेत ती त्यामुळे अजून जमून जाते. 'त्रिशूल' आणि 'काला पत्थर' मध्ये ती कुठेही कमी पडलेली नाही अमिताभसमोर. 

पण मला तिचा सगळ्यात आवडलेला चित्रपट 'साहेब'. मी तो खूपवेळा बघितलाय. ती बडी बहू आणि सासरा उत्पलदत्त. प्रेमळ, घर सावरून घेणारी, मानानी मोठी आणि मनानेही मोठी असलेली, धाकटा दिर अनिलकपूरवर पुत्रवत प्रेम करणारी तिची भाभी बघाच. माणूस बोलतो समोरच्याला एक राग आल्यावर तावातावाने, चिडून आणि एक सात्विक संतापानेही बोलतो. राखीच्या त्या सात्विक रागाच्या उद्रेकी संवादाला मला हमखास रडू येतं. दवाखान्यात ती बघायला जाते त्याला, तेंव्हा काचेतून बघणारी राखी. संपूर्ण चित्रपटात कदाचित लेखक सचिन भौमिकनी लिहिलेल्यापेक्षा काकंणभर सरस बडी बहू तिनी पडद्यावर दाखवलीय. मतलबी दीरजावेकडे ती फक्तं बघते त्यात, उत्पलदत्तला सासरा म्हणून तिनी दिलेला रिस्पेक्ट बघाच एकदा. असल्या परफॉर्मन्सना बक्षिस नसेल मिळत पण मला आवडला तो. तसं तर काय 'शोले'ला पण एकंच फिल्मफेअर होतं म्हणून तो काय पाहिला नाही का कुणी?  

राजेश खन्ना हा अमिताभपेक्षा व्हर्सेटाइल अभिनेता होता असं तिचं मत आहे. काही काही गोष्टी मोठ्या गंमतीशीर असतात, पटकन लक्षात येत नाहीत. राखीच्या नशिबात तीन गोष्टी कधीच पडद्यावर नव्हत्या - कॉमिक रोल, गुलझारच्या दिग्दर्शनाखाली काम आणि नृत्यं. तिच्यावर एकही डान्स नाही. ती आली तेंव्हापासून ते आत्तापर्यंत गोबरे गाल आणि तब्येत राखून आहे. एकतर ती स्वतः किंवा इतरांविषयी खूप कमी बोललीये. मीनाकुमारीच्या 'मै चूप रहूंगी'सारखी ती गप्पं आहे. आधी ती अमिताभच्या शेजारी रहायची. त्याच्या लग्नात 'भादुरी आणि मंडळी' तिच्याच घरी उतरली होती. नंतर तिनी पुलंचा 'मुक्तांगण' बंगला विकत घेतला. २०१५ नंतर ती आता पनवेलच्या फार्महाउसवर राहतीये. आता थकलीये, फारशी दिसतही नाही कुठे. 

काय करत असेल फार्महाऊसवर एकटी? असले दळिद्री प्रश्नं मला पडतात आणि विषण्ण व्हायला होतं. सूर्यास्त तरुणपणात कॅमेरात टिपायची मोठी हौस असते पण आता फक्तं सनसेट अशी वेळ आली की काय टिपणार? अवघड आहे सगळं. 'पल पल दिलके पास' ऐकतो आता , नको ते अभद्र विचार उगाच. 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment