Wednesday 24 August 2016

जेम्स हॅडली चेस...

मृत व्हायच्या आत काही मृत व्यक्तींना भेटायचा अशक्यंयोग जर शक्यं झाला तर माझ्या लिस्टीत चेस वरती असेल. रेनेलॉज ब्राबझान रेमंड हे त्याचं खरं नाव आणि जेम्स हॅडली चेस, जेम्स डॉचर्टी, आर. रेमंड, रेमंड मार्शल आणि अँब्रोस ग्रांट ही टोपणनावं. १९०६ ते १९८५ तो भौतिक आयुष्यं जगला आणि त्याच्या थ्रिलर्समधून आता तो जिवंत आहे. नव्वद पुस्तकं लिहिली त्यानी, त्यातल्या पन्नासवर चित्रपट निघाले. न सांगता काढलेले वेगळे (आर या पार - द सकर पंच). नुकताच येऊन गेलेला 'जॉनी गद्दार' त्याच्या स्टोरीवर नाही पण धाटणी तीच. डायरेक्टर श्रीराम राघवननी विजय आनंद आणि चेसला अर्पित केलीये ती फिल्म. नील मुकेशच्या हातात चेसचं पुस्तक आणि हॉटेलमध्ये टीव्हीवर 'जॉनी मेरा नाम' चालू असतो अशी श्रद्धांजली त्यानी वाहिलीये त्यात. 

तो एवढी वेगवेगळी पात्रं जिवंत कशी उभी करू शकला याचं मला कोडं पडायचं. अठराव्या वर्षी घरातून तो निघून गेला. तो पुस्तकं विकायचा, तो उत्तम फोटोग्राफर होता (Cade - वाचा त्याची त्यासाठी), तो वाचायचा खूप, क्लासिकल संगीत ऐकायचा, मेकॅनो खेळायचा. नकाशांच्या सहाय्याने त्यानी अमेरिकन गँग्ज वरती 'नो ऑरकिड्स फॉर मिस ब्लाँडीश' लिहिली आणि मग तो सुटलाच तिथून. त्याच्यावर मग नाटक आणि मग सिनेमाही निघाला. आयुष्यात फक्तं दोनदा अमेरिकेला धावत्या भेटी देणा-या या माणसाने नकाशे आणि माहितीवर आधारीत अमेरिकेचं अंडरवर्ल्ड खरं वाटेल असं उभं केलं. त्याच्या पुस्तकांना दंड झाले, केसेस झाल्या. मग त्यानी टोपणनावं घेतली. प्रसिद्ध होण्यासाठी अशा गोष्टी खूप मदत करतात. 

८३-८४ च्या आसपास भानू शिरधनकर अनुवादित 'गिधाडांची जातच चिवट' (Vulture is a patient Bird) आणि 'कुणीतरी आहे तिथे' (Knock, Knock! Who's There?) वाचलं होतं. नंतर स्टोरी लक्षात अजिबात नव्हती पण चेस वाचावा असं याच पुस्तकामुळे डोक्यात फिट्ट बसलं होतं. 'शेवटपर्यंत चेस खिळवून ठेवतो' या वाक्यात नाविन्यं काहीही नाही. चेस कडून काय शिकलो असेन तर माणूस डोळ्यासमोर उभा करणे आणि सगळं समोर घडतंय असं वाटायला लावणे. मानवी स्वभावांचे नमुने पेश करण्यात चेसचा हातखंडा आहे. अति तिथे माती, हव्यास वाईट असतो, जे मिळालंय त्यात समाधान मानावं, हातचं सोडून पळत्या पाठी जाऊ नये या सगळ्या उपदेशांचा अर्थ चेसची पुस्तकं वाचली की कळतो. माणसांचे विविध नमुने तो पेश करतो. एकाच माणसात वाईटाबरोबरच कुठेतरी तीट लावावी एवढा चांगुलपणा असतोच हे तो सांगतो. सस्पेन्स आणि थ्रिलर्स यात फरक आहे. उगाच ओळखा पाहू खुनी कोण असला त्रास चेस देत नाही. 

त्यामुळे अंदाज चुकला म्हणून वाचक खट्टू वगैरे होत नाही. अतिशय बांधेसूद वाटणारे प्लॅन्स कसे मातीत जातात हे चेस दाखवतो. मग कधी माणसं चुकतात, कधी अशक्यं घटना घडतात, कधी कुणीतरी हिशोबात न धरलेलं अचानक टपकतं आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. सहसा त्यातल्या बायका टंच, घातक, लोभी, कृतघ्न, दगाबाज असतात आणि क्वचित चांगल्याही असतात पण त्यांचंही वाईट होतं (A Lotus for Miss Quon). But a short time to Live वाचताना तर प्राक्तनात असेल तर कुसंगतीनी चांगल्या माणसाच्या नशिबी कसे भोग येतात ते वाचून विषण्णता येते. खानोलकरांना कुणीतरी विचारलं, 'अरे त्या ह्याला पांगळा का केलास कथेत?' ते म्हणाले, 'मी केला नाही, तो झाला'. लेखकाच्या हातात काही नसतं. त्याची पात्रं आपापलं नशीब आणि भोग घेऊनच येतात तर. चेसच्या पुस्तकातून अशी अनेक माणसं आढळतील जी हतबल आहेत, मनाविरुद्ध विनाशाकडे वाटचाल करतायेत.

चांगलं पुस्तक कुठलं? डोळ्यांवर झापड येत असतानाही जे बाजूला ठेवावंसं वाटत नाही ते. अर्थात हे अवलंबून आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी मी वाचायला घेतली तर मला झोप येईल कारण माझी आवड ती नाही, बौद्धिक कुवतही नाही तेवढी. थ्रिलर्स मात्रं मला मोह घालतात याला कारणीभूत चेस. पाठलाग, कुणीतरी पुढे पळतंय आणि कुणीतरी मागावर आहे, पुढच्याची सुटण्याची धडपड आणि मागच्याची त्याला पकडण्याची धावपळ हा उंदीरमांजराचा खेळ 'पैचान कोन'पेक्षा मला जास्ती आवडतो. इथे कानशिलं गरम करणं वगैरे प्रकार नाही तो शेल्डन आणि रॉबिन्सकडे. इथे जरासा कुठे उल्लेख येतो पण तो डिटेल्ड का नाहीये असं वाटतंच नाही इतके तुम्ही त्या Chase मध्ये इन्व्हॉल्व्ह्ड असता. अशक्यं योगायोगही आहेत त्याच्या कथेत पण ते फार मनावर घेण्यासारखं नाही. मार्क गरलँड, स्टिव्ह हर्मास, इन्स्पेक्टर लेपस्की, बिगलर, फ्रॅंक टेरेल, डॉन मिक्लेम अशी पात्रं वारंवार वेगवेगळ्या पुस्तकातून भेटतात. 

मला चेस आवडला म्हणजे दुस-याला आवडेल असं नाही पण एकदा वाचून बघा, सगळं लक्षात असलं तरी परत परत वाचाल. अतिशय सोप्प्या इंग्रजीत लिहिलंय (मला कळलं म्हटल्यावर हे खरंतर वेगळं सांगायला नकोय). त्याच्या पुस्तकाला फेरारीचा वेग आहे. मी सूक्ष्मरूपाने इंग्लंड, तिथली खेडी, अमेरिका बघून आलोय त्यातून. ती सगळी पात्रं मी माझ्या बाजूला अनुभवली आहेत. त्याचे पुस्तकातून असलेले तोंडाला पाणी आणणारे मेन्यू आणि अमुक इयर्स ओल्ड वाईन, बर्बन, स्कॉच त्या ठिकाणी जाऊन अनुभवाव्यात अशी दुर्दम्य इच्छा आहे. माझी वीसेक वाचायची राहिलीयेत अजून त्याची, एकदा डेक्कनला यादी घेऊन जाईन आता. पुण्यात असाल तर डेक्कनला मिळतील नाहीतर वासन पब्लिकेशन्स, चेन्नई, एअर मेलनी घरपोच पाठवतात. पीडीएफपण मिळतील नेटवर पण पुस्तक हातात धरून लोळत वाचण्यात जी मजा आहे ती त्यात किंवा किंडलला नाही. 

कोल्हापूरहून निघालेले लेटेस्ट अनुवाद त्यानी पाहिले असते तर रंकाळ्यात उडी घेतली असती इतके भिकार आहेत. मला कुणी दत्तक घेतलं आणि उदरनिर्वाहाची ददात मिटली तर मी चेस मराठीत आणेन कारण मुळामुठेत जीव दिला त्यानी तरी जीव जाईल एवढं पाणी नसतं, दगड लागून काय खरचटेल तेवढंच, त्याला वर काढता येईल. कादंबरीची झेप अजून माझ्या आवाक्याबाहेर आहे, शॉर्ट स्टोरीज आत्ता कुठे जमू लागल्यात असा भ्रम आहे पण कधी लिहिलंच मोठं काहीतरी तर चेससारखं थ्रिलरच लिहीन आणि त्यालाच अर्पण करेन. त्याचा इंग्रजी अनुवाद कुणाला करायचा असेल तर आत्ताच सांगून ठेवा. ;) :)  

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment