Wednesday 24 August 2016

फेसबुकीय वाढदिवस...

फेसबुकानी काय काय दिलं आजवर? मित्रं दिले, लिहायला शिकवलं, चांगलं वाचता आलं, माणसं सापडली, काही जवळ आली, काही हरवली, काही टिकून राहिली. भांडणं, वाद, उखाळ्यापाखाळ्या वगैरे उद्योग हौस असेल तर आहेतच इथे रग्गड पण इथे खदखदून हसायला त्यापेक्षा जास्ती मिळालं. लाईक्स, कॉमेंट्सच्या नादात रोज काहीतरी उमटण्याच्या खेळात चांगलं लिहिणारी माणसं घसरताना बघितली. जागतिक चावडी आहे ही, आपल्याला योग्यं वापर करता आला का हा प्रश्नं मला वारंवार पडतो. इथेही लाटा असतात. अर्धवट, चुकीच्या, खोट्या ऐकीव माहितीवर लोक तत्परतेने स्टेटस टाकतात. इथे बाजू मांडणारे कमी आणि घेणारे जास्ती. एकदा एक झेंडा हातात धरला की त्यात न पटणारं असलं तरी मान्यं करायचं नाही हा इथला प्रघात आहे. धार्मिक, राजकीय, जातीय पोस्ट्सवर तर न फिरकलेलं बरं. सगळा माल पामेला अँडरसनसारखा सिलिकॉन घालून फुगवलेला, भोपळा दिसत असला तरी त्यात सत्यं लिंबाएवढं,.   

इथे अनेक 'डे' असतात. टॅगाटॅगी, दिंड्या, सणवार वेगळे. एकूणच हा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे तूर्तास फेसबुकीय वाढदिवस घेऊयात. वर म्हटलं तसं खळखळून हसता येण्याचा दुर्मिळ योग यामुळे येतो. झुकेन्द्रानंद सरस्वती हा स्वतः मानसोपचार तज्ञ असणार. लोकांना खुश करण्याचे मार्ग त्याच्याइतके कुणी शोधले नसतील. 'मला कुणीतरी विचारतंय' ही आनंद देणारी गोष्टं त्यानी अनेक प्रकारे राबवली. फलाण्यानी तुम्हाला लाईक केलं, कॉमेंट केली, रिऍक्ट केलं, पोक केलं, फॉलो केलं अशा सुखावणा-या बातम्या तो होज पाईप लावून २४ x  ७ ओतत असतो. याच दिवशी मागच्या वर्षी तुम्ही काय काय कचरा इथे टाकलात ते सांगतो. कुणाचे वाढदिवस आहेत, कुणी इव्हेंटला बोलावलंय वगैरे आमंत्रणं मागच्या वेळेला तुम्ही आला नाहीत वगैरे कुठलाही राग मनात न धरता देत असतो. यामुळे कुणाचे वाढदिवस विसरलो वगैरे पापातून आपोआप मुक्तता मिळते. नोटिफिकेशन आलं की धावायचं. 

सोहळा असतो. रात्री बारा वाजता उत्सवमूर्तीच्या भिंतीवर जाऊन पताका लावण्यात बोल्टसुद्धा मागे पडेल असा स्पीड असतो. उत्सवमूर्ती स्वतः दबा धरून असते. हाच माझा खरा हितचिंतक म्हणून लगेच लाईकचं हळदीकुंकू केलं जातं (सवाष्णीच्या गुणधर्मानुसार तिचा/ त्याचा असेल की आपली दोन बोटं लगेच करंड्यात गेली पाहिजेत) आणि अनेकविध प्रकारांनी आभारप्रदर्शन चालू होतं. जुन्या काळी राजे महाराजे भेटले की इकडून नजराण्यांच्या डिश दिल्या जात मग समोरून परतीचे नजराणे दिले जायचे तसं लगेच thankkkkkkkkku so much, थँक्स, धन्यवाद आणि अशा अनेक थाळ्या भरभरून परतभेटी दिल्या जातात. वाणं लुटावीत ना तशा अनेकविध कॉमेंट्स असतात. बाहेर विकत घेतला तर हजार रुपये पडतील असे दोन तीन मजली केक डझनात गिफ्ट मिळालेले असतात. ते गुलाब गुलकंदाचे नसतात म्हणून नाहीतर पतंजली तोट्यात जाईल असा वर्षभर पुरेल इतका गुलकंद निघेल एवढाले पुष्पंगुच्छ मिळतात. कुणी हौशी माणूस कविता करतं, कुणी उत्सवमुर्तीचा फोटो निवडून त्यावर चारोळी लिहितं. आपण फ्लेक्स लावणा-यांना का हसतो? ते काय वेगळं करतात?    

एकमेकांच्या नावाचे अपभ्रंश करून जी जवळीक दिसते ती अजून कशात नाही. लब्यू, जियो, आभाळभर शुभेच्छा, हॅपीवाला बर्थडे, अजून शंभर वर्षे जग (हा शाप शुभेच्छा म्हणून देतात हल्ली) वगैरे प्रकार म्हणजे इतरांना जरा जास्ती जवळीक दिसते. प्रगटदिन (की प्रकटदिन), भूतलावर आल्याचा सुदिन वगैरे म्हणजे साहित्यिक पातळी. मग पार्टी मागितली जाते, द्यायची नसल्यामुळे लगेच होकार दिला जातो. सगळ्याच शुभेच्छा खोट्या नसतात किंवा त्यावरची आभारप्रदर्शनंही. त्यामुळे उगाच प्रत्येकानी ते स्वतः:ला लावून घेऊ नये. पण नाटकीपणाचं एकूण प्रमाण जास्ती आहे त्याबद्दल आहे हे. विश केलं नाही म्हणून रुसवे फुगवे पन्नाशीला आलात तरी शिल्लक असतील तर फक्तं वय वाढलं एवढाच त्याचा अर्थ आहे. आमच्या इथे एक सत्तरी पार केलेलं (वाचा - नमुने (५) ) विचित्रं विश्वं होतं. ते स्वतः:च आज माझा वाढदिवस आहे म्हणायचे आणि लहान मुलासारखं विश करणा-यावर खुश व्हायचे. नाही केलं तर फुरंगटायचे सुद्धा. मी आपला साधा माणूस, मी विचारलं, 'दरवर्षी याच तारखेला येतो का?' त्यांनी तसंही माझं नाव टाकलंच होतं पण त्यामुळे नंतर 'विशा'यचा माझा त्रास कायमचा संपला. 

मधे एकानी स्वतः:चा फोटो टाकून उद्या वाढदिवस आहे त्याची तयारी अशी स्वतः:च दवंडी पिटवली होती (या क्षणापर्यंत फ्रेंड आहे तो, नंतर असेल की नाही माहित नाही). बिलेटेड असतात तशा बिफोर शुभेच्छा सुरु झाल्या. दुसया दिवशी उद्यापन झालं ते वेगळं. मला हसू नाही आलं. आजार किती बळावलाय असं वाटून गेलं. अटेंशन सिकींग असतंच माणसाच्या स्वभावात, माझ्याही आहे, पण इतकं नको. आपण हास्यास्पद होतोय वगैरे लक्षात येत नसावं का? अजून एक किस्सा मला आठवतोय. एकानी काही काळ फेबू कुलूप लावून ठेवलं होतं. वाढदिवसाच्या आधी दोन दिवस कुलूप काढण्यात आलं. लोकांना नोटिफिकेशनचे खलिते पोच झाले. मग धरणाचे दरवाजे उघडावेत आणि पाण्याचे लोट वहावेत तशा काही क्युसेक शुभेच्छा आल्या. पूर ओसरण्यासाठीच असतो, तो ओसरला. काय साध्यं झालं? तुम्ही फेबूला असा नसा, ज्याला विश करायचंय तो करेलच की. पण मग त्यात क्वांटिटीची मजा नाही. जाहिरात झाली पाहिजे. संख्या दिसली पाहिजे. 

नंतरची जी आभारप्रदर्शनं असतात ती तर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यावर जी भाषणं होतात त्या तोडीची असतात. शुभेच्छांच्या पावसात न्हाऊन गेलो, मेक माय डे, कसा उतराई होऊ कळत नाही, असाच लोभ असू द्या, कुणाला धन्यवाद म्हणायचं राहून गेलं असेल तर माफ करा. मला ओरडून सांगावसं वाटतं, 'अरे बाबा, देऊळ दिसल्यावर जसा हात छातीपाशी जातो कारण तो उगाच नाराज नको म्हणून तसंच नोटिफिकेशन दिसल्यावर एक ओळ टायपायला खर्च काही नाही आणि नोंद होते, आपल्या तारखेला परतफेड होते म्हणून आहे हे सगळं. तारीख पुसून टाक आणि बघ पुढच्या वर्षी किती शुभेच्छा येतात ते'. पण असं कुणी करणार नाही कारण एकदा एक नाकपुडी बंद करून दुस-या नाकपुडीत सतत बोर्डावर रहायच्या नशेची पावडर ओढली की त्यापासून सुटका नाही. काही गोष्टी वैयक्तिक असाव्यात. एक दिवसाचा खोटा, मागून घेतलेला आनंद मिळवण्यात हशील नाही. 

मी वाढदिवस कधीही साजरा करत नाही. त्यात साजरं करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. बायको आणि मुलगी नशिबवान, दोघी तिथीने दस-याला अवतीर्ण झाल्या. त्यामुळे साजरा करताना धर्माचा आधार घेऊन तारखेपेक्षा तिथी महत्वाची या नावाखाली वाढत्या महागाईत एकाच खर्चात तीन सोहळे पार पडतात हा माझा त्यापाठीमागचा शुद्ध हेतू आहे. माझ्या नशिबात ते ही नाही. भाद्रपद कृष्णं चतुर्दशी हा जन्माला येण्याचा मुहुर्त साधणं काही माझ्या हातात नव्हतं. एक दिवस उशीर केला असता तर काय बिघडलं असतं खरंतर? पण सर्वपित्रीचा सुवर्णमुहुर्त काही साधता आला नाही, हे खरं. सगळीकडे माझ्या वाढदिवसानिमित्त घराघरात खीर, वडे चालू आहेत हे पाहून मला भरून तरी आलं असतं. पण ते सुद्धा नशिबात लागतं. 

खरंतर वाढदिवस म्हणजे आयुष्यातलं एक वर्ष संपल्याची नोंद. ते कुणाबरोबर गेलं, कसं गेलं, काय राहून गेलं हे आठवण्याचा दिवस. आपल्या व्यक्तीच्या डोळ्यात कौतुक दिसलं की झालं. मग जगानी विश केलं काय न केलं काय, काय फरक पडतो. निदान मला तरी नाही.     

जयंत विद्वांस 

(सदर शोधनिबंध 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P )

  

No comments:

Post a Comment