Wednesday 3 August 2016

अरबी घोडा...

ऐंशी साली आला होता कुर्बानी. मी सातवीत होतो. वयात आल्याची जाणीव करून देण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते झीनत अमान आणि परवीन बाबीला आहे. ७८ च्या 'सत्यम शिवम' पुढे हा काहीच नव्हता. पाचवीत कुठे कळायचं एवढं, काय बघायचं ते. अख्खा डावा लेगपीस उघडा टाकून बसलेली ओलेती झीनत पोस्टरवर होती. त्यात सगळी गाणी हिट्ट झालेली आधीच. अमजदचा वेगळा रोल, नाझिया हसनचं 'आप जैसा कोई मेरे जिंदगीमें आये' आणि 'लैला मैं लैला' गाजत होतं. 'टूबुक टूबुक' म्हणणारा अमजद पब्लिकला आवडला होता. 

फिरोजखान, मनमोहन देसाई, दादा कोंडके यांच्याकडे सिनेमा हिट करायचा स्वतःचा एक फॉर्म्युला होता. फिरोजखान म्हटलं की कायम उकाड्याचा त्रास होत असलेल्या कमी कापडातल्या (कपड्यातला नाही, आपण घालतो ते कपडे, त्या सेन्सॉरसाठी नाईलाजाने गुंडाळतात ते कापड) हिरोईनी, कार्स, बाहेरची लोकेशन्स, फिरोजचं नाव राजेश, कल्याणजी आनंदजीची हिट गाणी आणि ढिशूम ढिशूम असा ऐवज असायचा. 'गॉडफादर' वरून 'धर्मात्मा' तसा कर्क डग्लसच्या 'द मास्टर टच' (१९७२) वरून 'कुर्बानी आला. अर्थात त्यानी कधी ओरिजिनल वगैरेचा आव आणला नाही. यातलं 'क्या देखते हो' (बिकिनीतली झीनत विचारते) आणि हा म्हणतो 'सुरत तुम्हारी' हे सगळ्यात विनोदी गाणं होतं. आम्ही पण फिरोजदादासारखा झीनतचा चेहराच बघितला म्हणा गाणं संपेपर्यंत.

नटराजला लागला होता कुर्बानी. काचा फुटल्या आगाऊ तिकीटविक्रीला, प्रचंड गर्दी, पोलीस बंदोबस्त वगैरे होता. नुसती हवा 'कुर्बानी'ची. नटराज बंद झाल्याचं मला अतीव दु:खं आहे. 'शोले' मी तिथे पाहिला होता आयुष्यात पहिल्यांदा सत्तर एमएमवर. इमानदारीत एसी चालू ठेवणारं थेटर. तिकीट दर तरी काय २.२०, ३.३० आणि ४.४० (लोअर स्टोल, अप्पर स्टोल आणि बाल्कनी). तेंव्हाही ते महागच वाटायचे अशी परिस्थिती असायची. माझी काय ऐपत नव्हती तेंव्हा तिथे जायची. फार हळहळ वाटायची. तीन चार रुपयात ओलेता लेग पीस काही महाग नव्हता. प्रचंड ब्लॅक चालू होतं. नुसत्या अफवा अप्परचं तिकीट दहा रुपये वगैरे. इथे ३.३० ची मारामार, दहा कुठून आणायचे. फार वाईट दिवस हो. 

आमच्या शाळेत मंडईतली बरीच पोरं होती. दहावीत वाटतील अशी मुलं सातवीला होती बिचारी. तर त्यातला एक टग्या ग्रुप गेलाच, ब्लॅकनी घेईन पण कुर्बानी बघेनच असा पण करून. ठेवणीतल्या फुलपॅंटी घालून गेले अगदी सेकंड शो ला. पिक्चर फुल. एकानी चोवीस इंचीची छप्पन इंच केली छाती फुगवून आणि गेला एका ब्लॅकवाल्याकडे. एकदम हेरॉईन मागायच्या धर्तीवर पुटपुटणं वगैरे. बाजारात सात रुपये रेट असताना मुलं म्हणून चक्क पाच रुपये रेट ठरला. साताठ जणांचे खिसे रिकामे झाले आणि चाळीसेक रुपये देऊन जगज्जेत्याच्या थाटात काफिला तिकिटं नाचवत गर्दीत घुसला. काय सांगावं लेगपीस टायटलला असला तर? तेंव्हा लाल पिवळी तिकिट असायची, बाल्कनीतल्या रांगेतले तुच्छतेने बघायचे लोअर, अप्परकडे. तिकीट फाडणा-या माणसानी यांना बाजूला केले. यांच्या पोटात गोळा, सिनेमा ऍडल्ट आहे की काय? सगळे आत गेले तरी हे तिथेच. 

डोअरकीपरनी जो टाकलाय ना शॉट, लै हसलो तेंव्हा पण आणि आत्ता पण. 'च्युत्या बनवलंय तुम्हांला, फर्स्टशोची आहेत ही'. आपल्याला कुणीतरी अरबी घोडा लावलाय हे कळायलाच पाच मिनिटं गेली. प्रत्येकजण डोळे फाडून शो टायमिंग बघत होता. ब्लॅकवाला शोधून झाला. त्याला मानलाच पाहिजे, डेअरिंग लागते बॉस, लक्षात आलं असतं तर फटके पडले असते. पण चाळीस घेऊन काय खुश झाला असेल गडी. मग 'भ'च्या सगळ्या शिव्या, आया, बहिणी झाल्या, कुठे कुठे पाय घालून झाले पण अरण्यरुदनच ते. हे साताठ जण उभे फक्तं तिथे. वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखे खाली मान घालून सगळे परत आले. चोवीस इंचीवाल्याला शो कितीचा बघता येत नाही का यावरून शिव्या देणे एवढाच काय तो विरंगुळा. 

गंमत म्हणजे मी 'कुर्बानी' अजूनही पाहिलेला नाही पण ही चाळीस रुपयांची कुर्बानी माझ्या अजून लक्षात आहे. एकदम अरबी घोडा :P ;) 

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment