Wednesday 24 August 2016

तिची आणि त्याची गोष्टं...

चोवीस वर्षांपूर्वी मुली, काय मुलं काय एवढी डेरिंगबाज नव्हती. ती अपघाताने दोन दिवस त्याच्या घरी आली त्याच्या बहिणीबरोबर. तो चोवीस, ती सतरा. दोन वेण्या, काळभोर डोळे, नावाप्रमाणे हसमुख चेहरा. प्रपोझ वगैरे करायची गरजच पडली नाही. काय झालंय ते दोन्हीकडे समजलं होतं मग उगाच शब्दं कशाला खर्चायचे. तिनी एकटक बघावं आणि या बावळटानी चुकून तिच्याकडे बघितलं तर तिनी पटकन लाजून दुसरीकडे बघावं इतकं सगळं अलवार आणि नवखं. बाकी पब्लिकला कळलं होतं पण दोघांनाही ते टॉप सिक्रेट वाटत होतं. एकदम 'पुष्पक' सिनेमा, सायलंट मुव्ही. तो तिला स्टेशनला सोडायला गेला जाताना. एरवी अखंड बडबड करणारा तो एकही शब्दं बोलला नाही आणि ती पण मागे टीचभर गाडीवर वितभर अंतरात अर्ध्या फुटाचं अंतर कसोशीने पाळत गप्पं बसलेली. 

साधनं जेवढी मदत करतात तेवढीच गंमत पण घालवतात. आता मोबाईल आले. लोकं सतत बोलतात एकमेकांशी, पटकन जवळ येतात तेवढ्याच वेगानी लांब जातात. तेंव्हा दोघांच्या घरी लँडलाईनपण नव्हता. कित्त्येक महिन्यात बोलणं शक्यं व्हायचं नाही. पत्रं हाच उपाय, ते पण कुणाच्या तरी पत्त्यावर पाठवायचं. ते वहीत ठेवून किंवा कुणाच्या घरी बसून वाचायचं. तो वीसेक पानं लिहायचा, ती दोन तीन. दोनेक  महिन्यातून कधी तरी ते भेटायचे. दोस्ताच्या घरी किंवा कुठे सेटिंग लावून. मधे दोन हात अंतर ठेवून बसायची ती. साहजिकच होतं ते, बंद घरात काहीही होऊ शकलं असतं, म्हणून. ती एकटक सगळं ऐकायची. एकदा ती म्हणाली, 'तुझे डोळे खूप छान आहेत'. तो म्हणाला. 'आत्तापर्यंत कुणी सांगितलंच नाही मला असं'. 'म्हणून तर सांगितलं, तू एक गोड बावळट आहेस'. 'तू तरी कुठे मोठी शहाणी आहेस?' 'तुला हो म्हटलं तिथे झालंच की सिद्ध मी मूर्ख आहे ते'. निघताना तिचा चेहरा निर्माल्यं व्हायचा, त्यालाही परत येताना जीवावर यायचं. 

मग एक दिवशी तिनी आईला गुपित सांगितलं. तिनी वेळकाळ बघून नव-याला सांगितलं. मग शहाण्या बापासारखा तो त्याच्या घरी गेला. 'लग्नं इथे का आमच्या इथे? अपेक्षा काय आहेत?' वगैरे विचारपूस झाली. ती एकुलती एक आणि एक लहान भाऊ. तिच्या आईला तो आवडला होता पण नवरा आग्यावेताळ. ''घरी बोलून फोन करतो', म्हणाले. घरी गेल्यावर त्यानी दोन महिन्यांनी सांगितलं, 'नको, त्याचा पार्टनरशिपमधे धंदा आहे, नोकरी असती तर हो म्हटलं असतं'. ती फुरंगटली. कसं सांगायचं हे तिला कोडं. तिनी धीर करून त्याला सांगितलं. मग तो म्हणाला, 'अशीच येशील? लग्नं करू, मी सांगितलंय घरी'. ती म्हणाली, 'बाबांना दोनवेळा अँटॅक येऊन  गेलाय, मी तसं केलं आणि काही बरं वाईट झालं तर आयुष्यभर खात राहील, मागे लहान भाऊ आहे म्हणून नको'. मग परत ते भेटले एकदा. 'थांबशील माझ्यासाठी?' 'थांबेन, पण अजून काही वर्षांनी तुझं हेच कारण असेल तर कसं करायचं?' तिच्याकडे उत्तर नव्हतं. फक्तं प्रश्नं उरले मग दोघंही गप्पं झाले. ती रडत म्हणाली, 'तुझी पत्रं ठेवणं शक्यं नव्हतं खरंच मला, म्हणून नाईलाजाने फाडून टाकली सगळी'. तिनी आधी सांगितल्यामुळे तिची पत्रं त्यानी बरोबर नेली होती, ती तिला परत दिली. पत्राच्या शेवटी असायचे ते 'तुझी, तुझी आणि फक्तं तुझीच' हे अर्थ संपलेले शब्दं तिचे तिनी परत घेतले. 

मग दोघंही अनोळखी झाले. सातेक महिन्यांनी तिनी एकदा झोपेच्या गोळ्या घेतल्याचं कळलं त्याला. मग तो तिला भेटून आला पण घटना घडून महिने लोटल्यामुळे तेवढा असर शिल्लक नव्हता. 'का केलंस असं? आणि कळवता पण नाही आलं साधं?' 'काय कळवणार होते नाहीतरी? वाचले हे? आठ दिवस होते दवाखान्यात, परत नाही करणार असं काही'. एकेकाच्या पश्चातापाच्या कल्पना असतात. आपण याला नाही म्हटलंय या गंडापोटी अर्धा फूट लांब बसणा-या तिची समर्पणाची तयारी होती. तो मोठा होता वयानी, ती अजाण होती. त्यामुळे घडलं काहीच नाही. सगळं बोलून झाल्यावर निघताना तिचा चेहरा खट्टू झाला, त्यालाही कदाचित हे शेवटचं भेटणं या विचारानी परत येताना जीवावर आलं. निरोप पटकन संपवावा. मागे वळून बघितलंत की काँक्रीट स्लॅबपण ढासळतो. तिचं मग वीस वर्षांपूर्वी लग्नं झालं, त्याचं नोकरी लागल्यावर सतरा वर्षांपूर्वी. एकोणीस वर्षांपूर्वी ती दिवाळीत त्याला रस्त्यात भेटली. 'कसा आहेस?' 'मस्तं, तू कशी आहेस?' 'ठीक, लग्नं केलंस?' 'नाही अजून पण करणार तर आहेच :) ', 'किती अचानक भेटलास'. 'बाकी बरी आहेस ना?' 'हो'. 'चल निघू? आईकडे चाललीये'. 'बाय'. अजून एक वर्षानी 'बीस साल पहले की बात है' म्हणता येईल. 'त्या'ची बायको गंमतीने म्हणते, 'ती' सुखी झाली, सुटली आणि मी अडकले. तो फक्तं हसतो. तिनी सुखीच असावं अशी त्याची कायमच इच्छा आहे. 

चोवीस वर्ष झाली. आता त्याला कुणी म्हटलं 'तुमचे डोळे खूप छान आहेत' तर तो म्हणतो 'थँक्स' आणि मनात म्हणतो, 'तिनी चोवीस वर्षांपूर्वीच सांगितलं होतं हे मला पण कुणी म्हटलं की बरं वाटतं, त्या निमित्ताने का होईना ती आठवते'. तिची आणि त्याची गोष्टं अशीच आहे, अर्धी राहिलेली. जग खूप छोटं आहे, त्याला वाटतं, कधी तरी ती त्याला भेटेल रस्त्यात. तेंव्हा कदाचित त्याला चष्मा असेल, तो मुद्दाम काढेल आणि ती हसून म्हणेल, 'अजूनही तुझे डोळे खूप छान आहेत बर का '.  

तिची आणि त्याची गोष्टं... 

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment