Wednesday 3 August 2016

इगो हर्ट नही करनेका...

पुलं म्हणतात तसं माझ्याबतीत हा अनुभव मला अनेकवेळा आला आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर पहिल्या फटक्यात मला अटेंड करत नाही. हा काय टिप देणारे असा विचार माझ्या तोंडाकडे बघून निश्चितच त्याचा मनात येत असणार. आता एखाद्याचा चेहरा तसा असेल तर त्याला कोण काय करणार. हातात आयफोन, डोळ्याला अरमानीचा गॉगल, रेमंडचा सूट घालून शोफर ड्रिव्हन बीएमडब्ल्यू मधून जरी मी उतरलो उद्या मॅरियट किंवा मेरिडियनला तरी तिथला माणूस धावत येऊन माझं स्वागत वगैरे करणार नाही याची मला खात्री आहे. हल्ली काय कुठलीही माणसं बीएमडब्ल्यूतून फिरतात या विचारानी तो ड्रायव्हरकडे अतीव करुणेने बघेल. नुसतं हॉटेल असं नाही, पीएनजी, रेमंडचं शोरूम, टीव्ही, मोबाईलची शोरूम, हॉटेल आराम, अमुकतमुक अँड सन्स किंवा नविन स्टाईलचं वामा, सावनी असं त्रोटक नाव धारण करणारं कुठलंही कपड्याचं दुकान, बँक, सलून यापैकी कुठल्याही ठिकाणी मला कुणी ढुंकूनही विचारत नाही. नक्षत्रंगुण दुसरं काय. 

मागे एक बँकेत गेलो होतो तर मी काहीही न विचारता एका क्लार्कनी मला 'लोन फॉर्म पलीकडे मिळतील' सांगितलं होतं, एवढा कर्जबाजारी चेहरा आहे माझा हे मला पहिल्यांदाच कळलं त्यादिवशी. एकदाच एक मिनिटासाठी फक्तं भरून आल्यासारखा अनुभव आला होता मला. लक्ष्मीरोडवरच्या एका शोरुममध्ये त्या युनिफॉर्ममधल्या दरवानानी प्रचंड चपळाईने माझा हात हँडलला जायच्या आत तो काचेचा दरवाजा उघडला होता. म्हटलं जाताना याच्याबरोबर सेल्फी काढावा, दुर्मिळ गोष्टीचं अप्रूप असतंय बघा माणसाला. पण माझा तो आनंद एक जानेवारीच्या संकल्पांइतकाच अल्पकाळ टिकला. मला निदान लांब तरी जाऊ द्यायचं होतं. तो दुस-या कलीग दरवानाला म्हणाला, 'पुल आणि पुश कळत नाही लोकांना, दरवाजा तुटण्यापेक्षा आपणंच उघडलेला बरा'. आत्तापर्यंत कर्जबाजारी, ऐपत नसलेला चेहरा होता, आता तर माझ्या साक्षरतेवरपण लोकांना शंका येऊ लागलीये ह्याची जाणीव झाली. 

तर एकदा 'जयहिंद'ला गेलो होतो. गेल्या वीसेक वर्षात मी शर्टपॅंट शिवून घेतलेला नाही. आपण कितीही चांगलं कापड आणा, टेलर एकतर सातवीतल्या मापाचा नाहीतर वाढत्या अंगाचा शिवतो म्हणून मी तो प्रकार कधीच बंद केला आहे. बदलापूरच्या एका टेलरनी आमच्या काकांना चक्कर आणायची बाकी ठेवली होती मागे. लंगोट शिवलेले. नाडीचे तीन राऊंड होतील कमरेला, ते एक ठीक आहे नाडी कापता येईल पण किती मोठा शिवावा? दुपटं म्हणून चाललं असतं. काका चिडून त्याच्याकडे गेले. त्यानी शांतपणाने सांगितलं, 'जरा वाढत्या अंगाचेच शिवलेत'. तर मी आणि मित्रं 'जयहिंद'ला गेलो, जातानाच माझं ठरलेलं असतं काय घ्यायचं ते. उगाच ढीग काढायला मला फार गिल्टी वाटतं. पँट मळखाऊ रंगाची, शक्यतो निळी आणि चेक्सचा शर्ट इतका सिंपल चॉईस असल्यावर वेळ कशाला लागतोय. तेंव्हा ब्लॅक किंवा नेव्ही ब्ल्यू पँटवर व्हाईट शर्टचं वेड होतं मला. आम्ही गेलो होतो जीन घ्यायला. सेक्शन कळेपर्यंत समोर जे तागे लावलेले असतात ते बघत होतो. 

वरच्या अंगाला एक मस्तं व्हाईट कापड होतं. त्याच्यावर नक्षी होती एम्बॉस केल्यासारखी. म्हटलं यावेळा कापड घेऊन शिवावे शर्ट. खालचे एकदोन चेक्स बघितले. अतिशय नाखुषीने तो दाखवत होता. म्हटलं, 'वरचा व्हाईट दाखवा हो तो'. मयसभेत दुर्योधनाला अपमान एवढा जिव्हारी का लागला याची जाणीव मला झाली. लक्ष्मीरॊड, पुणे, या पत्त्याला जागून तो म्हणाला, 'तो महाग आहे'. आजूबाजूला कुणी नव्हतं, त्यामुळे इन्सल्ट मर्यादित राहिला होता. 'तुम्ही दाखवा तर'. त्यानी नाईलाजाने ती गुंडाळी काढली. सगळा अपमान गिळून मी विचारलं, 'फुलशर्टला किती लागेल'. 'अडीच'. फॅमिली कोर्टात एकमेकांचं तोंड बघायची इच्छा संपलेली जोडपी बोलतात तसा तुटक संवाद सगळा. मी उगाच आपल्याला काही कमी नाही असा आव आणत मला एक, भावाला एक असे अडीच मीटरचे दोन पीस कट करून घेतले. आता तरी तो माझ्याकडे आदराने बघेल असं वाटलं मला. पण उपयोग शून्यं. मग मी आम्ही पेशव्यांचे वंशज आहोत अशा धर्तीवर रेमंडचा एक काळा आणि एक निळा असे दोन महागडे पॅंटपीस कापून घेतले. 

'पैसे कुठे द्यायचे'. 'काऊंटरला थांबा, तिथे येतील पीसेस'. द्रौपदीनीसुद्धा एवढ्या तुच्छतेने कर्णाकडे किंवा कौरव ब्रदर्सकडे पाहिलं नसेल एवढ्या तुच्छतेने तो माझ्याकडे बघत होता. काउंटरला चिक्कार गर्दी होती. मित्राला सांगितलं, गप माझ्यामागे यायचं, येड**सारखं तिथे बोलायचं नाही, अरे आपले कपडे घ्यायचेत म्हणून. हात हलवत परत चाललेल्या खाली हाथ कस्टमरकडे जेवढ्या आपुलकीने बघता येईल तेवढ्या प्रेमळ नजरेने बघत दरवानानी दरवाजा उघडला. एक सिनेमात तो अरनॉल्ड टायमर लावून बॉम्ब लावतो आणि जसा हसत पुढे जातो तसे आम्ही बाहेर पडलो. शोधू दे त्याला; ऐपत नसलेला दाढीवाला कुठे गेला ते. 

जयकांत शिक्रे २०११ च्या 'सिंघम'मध्ये म्हणाला 'कुछ भी करनेका लेकिन जयकांत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका' पण जयंत शिक्रे मागेच हे म्हणालाय, ''कुछ भी करनेका लेकिन जयंत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका'. 

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment