Wednesday 20 February 2013

हंसा वाडकर - 'सांगत्ये ऐका'....



हंसा वाडकर - 'सांगत्ये ऐका'....

काल हंसा वाडकरांच आत्मचरित्र वाचलं - 'सांगत्ये ऐका'. खूप वर्षांपूर्वी लहान असताना वाचल होतं, काही संदर्भ लक्षात होते फक्त. शब्दांचे अर्थ फार न कळण्याच्या वयात वाचलेलं होत ते. आत्मचरित्र नाही म्हणता येणार, काही भाग आहे आयुष्यातला. पन्नास एक पान असतील सगळी मिळून. स्मिता पाटील, अमोल पालेकरचा 'भूमिका' नावाचा चित्रपट येउन गेला त्या स्टोरी वर (आजच कळलं गुगल कृपेने).

लहान वयात मिळालेलं यश, त्यात सौंदर्य, मिळणारा पैसा, प्रसिद्धी या मुळे माणूस कसा वाहत जातो, हे समजत. (होम अलोन मधल्या गोंडस, निरागस मेकौले कल्किनची अवस्था ही तशीच झाली अस वाचलय, त्याचा फोटो तर बघवत नाही इतका तो रोड आणि गालफडं आत गेलेला आहे. असच 'समर ऑफ फोर्टीटू' च्या सुंदर हिरोईन बद्दल शिरीष कणेकरांनी लिहिल्याच वाचलं होतं आणि सुंदर परवीन बाबीची तीच शोकांतिका.) वाडकरांनी सगळं मोकळेपणानी लिहिलं आहे याच कौतुक करायच की त्यांच्या पतनाबद्दल दु:ख वाटून घ्यायचं हा प्रश्न मनात येतो. कमी शिक्षण, लहान वयात मिळालेली प्रसिद्धी, यश, सौंदर्य या सगळ्या गोष्टी जरी कारणीभूत धरल्या तरी कुठे तरी वाटत राहत की त्यांना मागे वळून पहावस का वाटल नसावं. वाटलं असेल ही पण वेळ निघून गेली असेल, उमेद संपली असेल किंवा कुणाकरता हा ही प्रश्न असेल.

त्या काळाच्या मानानी त्या भलत्याच धाडसी होत्या हे मात्र मान्य करावच लागेल. जोशी नावाच्या माणसा बरोबर ३ वर्ष घरातून पळून जाऊन त्याच्या आधीच्या २ बायका असताना पण त्या तिथे राहिल्या. तिथून सुटका करून घेताना म्हाता-या म्याजीस्ट्रेटनी त्यांच्यावर नव-याला बाहेर बसवून, दुस-या खोलीत त्याची बायका मुलं असताना वाडकरांवर बलात्कार केला हे वाचताना त्यांच्या दुर्दैवाचं दु:ख वाटतं. बाई ही तिचा मानमरातब कर्तुत्वाने, चारित्र्याने मिळवते हे पटत. पण त्या प्रसंगाबद्दल त्यांनी कुठलाही त्रागा केलेला नाही. आपण जे अनिर्बंध जीवन जगलो त्याची शिक्षा आहे असही कदाचित त्यांना वाटल असाव.

दारू घात करते हे जरी कळत असलं तरी वळत नाही हेच खरं. भले भले लोक नादी लागले आणि संपले. सैगल, जुना नट चंद्रमोहन, बेर्डे, मीनाकुमारी अशी अनेक उदाहरणं आहेत. आपणही त्या लिस्ट मध्ये का नाही असं तर नसेल न वाटत लोकांना?, असा प्रश्न पडतो. प्रसिद्धीची हाव, वाढणारं वय, ओसरणारं तारूण्य, आपल्यापेक्षा तरुण असणा-या, दिसणा-या प्रतिस्पर्धी, मस्तीमुळे कुणाशीच धड नसलेले संबंध आणि मग येणारं एकाकीपण यामुळे मरण हा अत्यंत सोप्पा मार्ग आहे असं वाटत असावं.
असे पतित पण प्रसिध्द लोक जेंव्हा सत्यं लिहितात तेंव्हा ते मोठ दाहक आणि घातक असतं. काही लोकांच्या ख-या प्रतिमा यातून उघड होतात आणि आपल्याला 'अरे, हा अमुक तमुक असा होता?' असा धक्का देऊन जातात. बरेच वाचक वाचताना काहीतरी सनसनाटी वाचायला मिळाव या अपेक्षेनी वाचतात म्हणजे त्यामधे मसाला घालून विधानं करायला बर पडत. मला वाटतं या लोकांनी हे सनसनाटीसाठी लिहिलेलं नाहीये तर आम्ही जे जगलो, भोगलं, ज्या चुका केल्या त्या आपण आपल्या आयुष्यात करू नये एवढाच हेतू आहे.

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment