Saturday 23 February 2013

त्या दिवशी.....



त्या दिवशी.....

आता मला पावसाची भिती वाटत नाही
खरंतर कशाचीच वाटत नाही
बरीच वर्ष झाली, की महिने, की दिवस?
आता काहीच आठवत नाही

काही गोष्टी मात्रं लख्खं आठवतात
त्या दिवशी पडलेल्या वीजेसारख्या
आभाळ उर बडवून ओरडत होतं
ढग धाय मोकलून रडत होते… 

सादळलेल्या भिंती आणि गळकं छप्पर
जलतरंगसारखी घरभर मांडलेली भांडी
कुडकुडणारे देह आणि वाजणारी खिडकी
आमचं घाबरलेलं मौन आणि
उजाडण्याची वाट पहाणारी मनं…. 

गोठ्यातलं वासरू अशुभ हंबरलं
पोर घाबरलं असेल, आत आणू का?
न रहावून ती उठली आणि बाहेर गेली
अंधारात तिला दिसावं म्हणून असेल
आणि नेमकी तेंव्हाच् वीज दारात आली…. 

आठवतो फक्तं तिचा कोळसा झालेला
बाकी सगळं कसं शांत शांत
पुढचं काही म्हणजे काही आठवत नाही
अंगणात एक वासरू मात्रं आहे
कुणाचं आहे काय माहित…

--जयंत विद्वांस 
 



No comments:

Post a Comment