Thursday 21 February 2013

अपेक्षाभंग(?) .....

दोघं समोरच बसले होते रेल्वेत. लांबचा प्रवास असला की माणसं थोड्यावेळानी सैलावतात, गप्पा मारु लागतात. प्रत्येक वेळेला गप्पा होतातच अस नाही. पुणे दादर हा प्रवास तसा काही फार नाही पण खडकी सोडलं की माणसं गप्पा मारू लागतात, पेपरची, मासिकांची देवाण घेवाण होते. लोणावऴयापर्यंत ती परत दिली जातात. मग घाटात एक डुलकी आणि कर्जत आल की घाम पुसायला सुरवात, मग बाहेरचा वारा सुखावह वाटतो, मग आपल स्टेशन येईपर्यंत बाहेर बघायच किंवा गप्पा मारायच्या किंवा माणसं  न्याहाळायची.

मला अशा आटोपशीर प्रवासात माणसांचे चेहरे वाचायची, त्यांचा स्वभाव कसा असेल याचा तर्क करण्याची जुनी खोड आहे, क्वचित गप्पा झाल्या तर तर्क कितपत बरोबर आहे याचाही अंदाज घेता येतो. पण आजची समोरची जोडी जरा वेगळीच होती. प्रत्येकजण मूकपणानी त्यांना न्याहाळत होतं. मी ही उत्सुकतेनी त्यांच्या विनासायास कानावर पडणा-या गप्पा ऐकत होतो. मोठ्या मजेशीर आणि प्रेमळ होत्या गप्पा त्यांच्या. बहुतेक पहिल्यांदाच ते दोघं एकत्र आणि ते ही रेल्वेतून एवढ्या लांब निघाले असावेत. ती उत्सुकता, आनंद, आश्चर्य तिच्या चेह-यावर अगदी ओसंडून वाहत होतं. फक्तं दोघच असल्याचा आनंदही तिच्या चेह-यावर दिसत होता.

ती होती मात्रं सुंदर, कुणीही पटकन वळून बघाव अशी आणि बघत राहाव अशीच. गोरीपान, गालावर मधेच दिसणारी नाजुकशी खळी, पडल्यासारखी वाटे पर्यंत गायब होणारी, लाल चुटूक ओठ आणि बाळसेदार गोबरे गाल, खांद्यापर्यंत रुळणारे छान व्यवस्थित कापलेले केस, ड्रेसच्या रंगाप्रमाणे लावलेल्या चारपाच पिना, त्यातून निघालेल्या त्या चुकार बटा, वारा आला की, तिच्या त्या सुंदर गो-या मुखड्यावर रुऴणा-या त्या बटा अजूनच तिचा मोहकपणा वाढवायच्या, कपाळाच्या बरोबर मध्ये दोन धनुष्याकृती भुवयात लावलेली बारीकशी टिकली आणि तो सगळा एकूण अवखळपणा मोहक आणि बघत राहावा असाच होता. तो ही काही कमी नव्हता तसा. स्मार्ट, व्यवस्थित मापातले कपडे, दाढी तुळतुळीत केलेली, चेह-यावर एक मिश्किल आव आणि वागण्या बोलण्यातली मार्दवता लक्ष वेधणारीच होती.

पहाटेच्या गार वा-याची झुळूक आत आली आणि ती शहारली. त्यानीही पटकन तिला जवळ ओढलं आणि मिठीत घेतलं. ती इतकी लाजली की काही विचारूच नका, अजूनच छान आणि गोड दिसायला लागली ती. त्यानी काही मिठी मात्र सोडली नाही. उलट तिला अजूनच जवळ घेतलं, नको ना म्हणत ती लांब जाऊ पाहत होती तर त्यानी मग सरळ तिला आपल्या मांडीवरच घेतल. मग ती अजूनच लाजली. तिनी पण मग त्याला त्रास द्यायला सुरवात केली आणि ते भुरभुरणारे केस बरोब्बर त्याच्या नाकात जातील असं पहात त्याच्या छातीवर डोकं घुसळायला सुरवात केली. त्यानी खिडकीतून बाहेरचं काहीतरी दाखवलं आणि ती बाहेर बघत असताना तिच्या गालाच एक तोंडभरून मनसोक्त चुंबन घेतलं. मग ती अजूनच लाजली आणि  वैतागून म्हणाली, किती वेळा सांगितलं तुझी मिशी टोचते म्हणून, ऐकत नाही अजिबात. पण बदल्यात मात्र तिनीही त्याच्या गालावर तीच कृती केली आणि अजूनच घट्ट मिठी मारली त्याला.

सारखं  त्यांच्याकडे बघत बसणं चांगल दिसणार नाही म्हणून मी गालातल्या गालात हसत खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. अधून मधून मात्र मी बघत होतोच. मीच काय प्रत्येक जण त्यांच्याकडे अधून मधून बघत होताच. तिला डुलकी येईपर्यंत त्यांचा हाच कार्यक्रम चालू होता. तिला झोप येतीयेसं वाटल्यावर त्यानी तिला छातीशी अजूनच जवळ ओढून घेतलं आणि थोपटायला सुरवात केली.

सत्तरीच्या आसपासचा तो पिकलेला मधाळ देखणा आजोबा आणि त्याची ती ४-५ वर्षाच्या आतली ती गोंडस नात अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून हलत नाहीत, इतकी वर्ष झाली तरी.

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment