Tuesday 12 February 2013

कपाट.....

काल ब-याच दिवसांनी घर आवरलं
काय काय सापडलं तिच्या कपाटात

साखरपुड्याची घडीवर विरलेली साडी
लग्नातला घडी विस्कटलेला मोरपिशी शालू
लग्नाआधीचा तिचा हडकुळा फोटो आणि
इतिहास झालेला लग्नाचा फुगलेला अल्बम

काहीच न लिहिलेली एक कुमारी डायरी
पानांमधे ठेवलेल्या दहाच्या को-या नोटा
एक गणपतीचा आणि एक आमचा फोटो
आणि दोन्हीकडच्या एकेक लग्नंपत्रिका

उलट सुलट टाक्यात गुंतलेल्या थंडगार सुया
अर्धवट राहिलेला स्वेटर आणि गुंता झालेले,
उब संपलेले लोकरीचे रंगीत गुंडे आणि
गुंडाळून ठेवलेलं भरतकामाचं घर

दागिन्यांच्या रिकाम्या मखमली पिशवीत
काळ्या पडलेल्या काही वस्तू, दोन वेढण्या
एक चाफ्याचं फूल, एक छल्ला, एक पोत
आणि एक बिन झाकणाचा रिकामा करंडा

वरच्या सोनेरी पाकिटाएवढच् पिवळं पडलेलं
मी पाठवलेलं पहिलं वहिलं पत्रं,
एक संपूर्ण चार्तुमास, एक अकरावा अध्याय
एक सुवर्ण भिशी योजनेची जाहिरात

आता तिचे भिंतींवर, वस्तूंवर, माझ्या अंगावर
रेंगाळणारे स्पर्श आवरले की झालं सगळं
म्हणजे मग काही काही उरणार नाही मागे

ब-याच दिवसांनी आवरतोय ना घर, त्यामुळे धांदल
ती गेल्यानंतर पहिल्यांदाच्.....

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment